“अनित्यतेसंबंधीची ध्यानधारणा कशी करावी” याचा भावानुवाद

गुंगथांग रिंपोछे (Gung-thang-tshang dKon-mchog bstan-pa'i sgron-me) (१७६२-१८२३) यांच्या ‘ट्रेनिंग फॉर हाउ टू मेडिटेट ऑन इम्परमनन्स, रिटन इन व्हर्स’ (Mi-rtag sgom-tshul-gyi bslab-bya tshigs-su bcad-pa bcas) या संहितेची सुरुवात त्यांच्या सर्व गुरूंना आदरांजली वाहून होते. असंख्य रूपांमध्ये आविष्कृत होणारे हे गुरू मनःशांतीसाठी शिकवण देतात:

मर्यादित जीवांच्या अनेक गरजा व प्रवृत्तींशी जुळवून घेण्यासाठी विभिन्न रूपांमध्ये व वैविध्यांमध्ये आविष्कृत होणाऱ्या परमानंद व पोकळी यांच्या महान ऐक्याला आदरांजली.

अमूल्य मानवी शरीरामध्ये आठ दुःखनिरोधाची साधनं आहेत व दहा परमिता शील मार्ग आहेत, आणि हे एकदाच प्राप्त करता येतं. ही संधी गमावण्याचा धोका असतो, चिरकालीन मूल्य असलेलं काहीच साध्य न करता हे सगळं पुनर्जन्मापर्यंत जाण्याची शक्यता असते. आपण मुक्तिमार्गावर जाण्याची हीच वेळ आहे. इथे आपण सगळेच वीस ते तीस वर्षं वयोगटातील आहोत, त्यामुळे खरंतर यासाठी उशीरच झालेला आहे. धर्माचरणासाठी आपण स्वतःला सतत आठवण करून द्यायला हवी आणि हत्तीला प्रशिक्षण देताना वापरल्या जाणाऱ्या टप्प्यांसारखं जागरूक राहायला हवं. सर्व ऐहिक व सांसारिक गोष्टी या महिन्यामध्ये किंवा किमान या वर्षात संपवण्याचा प्रयत्न करताना किंवा धर्माचरण पुढे ढकलण्याचा व इतर सर्व गोष्टी आधी आत्ताच करून टाकण्याचा विचार करताना आपली अवस्था भुताने पछाडल्यासारखी असते. जगण्यासाठी पुरेसं झालंय का, याची चिंता धार्मिक लोकांनी कधीही करू नये, असं एका शिक्षकाने म्हटलं होतं. धर्माचरणासाठी आपल्याला पैसा कमवावा लागतो, अशी कारणं काही लोक देतात, पण कोणताही गंभीर धर्मोपासक भुकेने मरण पावलेला नाही.

पूर्णतः समर्पणाने धर्माचरण करण्याचा विचार करा. या जीवनातील कृती पाण्याच्या लाटांप्रमाणे आहेत. लहरीप्रमाणे पहिली कृती होते, मग तत्काळ दुसरी होते. अधिकाधिक कृती करत गेल्यावर नवनवीन कृती समोर येत राहतात: हे कधीच संपत नाही. लक्ष्यहीन होऊन इतस्ततः भरकटण्याऐवजी स्वतःवर काही निर्बंध नसताना आत्ताच हे सोडण्याचा ठाम निश्चय करणं चांगलं नाही का? उदाहरणार्थ, आणीबाणीची परिस्थिती असेल, तर तुम्ही ठाम, निश्चयी निर्णय घेऊन सगळं सोडून त्या परिस्थितीवर उपाय करायला जाता. नरोपा तिलोपाला भेटायला गेले, त्या गोष्टीसारखंच हे आहे. नालंदातील मठाधीशाचं पद त्यांनी निर्णायकपणे सोडलं आणि ते निघून गेले. किंवा प्राथमिक उपासनांसाठी एकान्तात जाण्याची सूचना त्सोंग्खापा यांना मंजुश्रीकडून मिळाली, त्यानंतर निश्चयपूर्वक त्सोंग्खापा त्यांच्या हजारो अनुयायांना सोडून निघून गेले.

स्वतःला मूर्ख बनवू नका. उद्याचं धर्माचरण होण्यापूर्वी आजचा मृत्यू लवकर येण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणाला धर्माचरण करायचं असेल, तर ते आजपासून करावं.

त्सोंग्खापा व पद्मसंभव यांसारख्या थोर गुरूंचं कार्य जगात सर्व दिशांनी पसरलं असलं, तरी हे सर्व गुरू मरण पावले आहेत. त्यांची केवळ नावं आहेत, शरीर गेली आहेत, आणि आपण त्यांना केवळ त्यांच्या शिकवणुकींमधून जाणून घेऊ शकतो. या सगळ्यातून त्यांच्या अनित्यतेचं सूचन होतं. कुशिनगरमधील बुद्धाच्या कलंडलेल्या पुतळ्यामधूनही आपल्याला बुद्ध मरण पावल्याची आठवण करून दिली जाते. ‘एन्गेजिन्ग इन बोधिसत्व बिहेविअर’ (sPyod-‘jug, Skt. Bodhicharyavatara) या संहितेमध्ये शांतिदेव सांगतात की, बुद्ध, प्रत्येकबुद्ध व श्रावक असे सर्व मरण पावले असतील, तर आपणही मरण पावणार यात काही शंका आहे का? आठव्या दलाई लामांचीही ही शिकवण आहे. आपल्या सर्व शिकवणुकी लिहून ठेवलेल्या गुरूंप्रमाणे हे दलाई लामाही आता हयात नाहीत. परंतु, एक नमूद करायला हवं- या महान जीवांच्या रूपांचं विच्छेदन होतं, तेव्हा ते पुन्हा बुद्धाच्या (स्वाभावकाया) आवश्यक निसर्गसाठ्यामध्ये मिसळून जातात. संभ्रमित अनुयायांना अनित्यता शिकवण्यापुरतंच हे केलेलं असतं.

या महान जीवांप्रमाणेच पुढील शंभर वर्षांनी आपल्यापैकी कोणीही असित्त्वात नसेल. राजे व मुत्सद्दी स्वतःच्या संपत्तीविषयी व सामर्थ्याविषयी, हारतुऱ्यांविषयी, पराक्रमांविषयी बढाया मारू शकतात, पण तेही शंभर वर्षांनी अस्तित्वात नसणार. जगातील आजच्या अनेक प्रसिद्ध नेत्यांनाही हे लागू होतं: ते भविष्यात इथे नसतील. तुमचे समवयीन असणारे व तुमच्याइतकंच शारीरिक सामर्थ्य असणारे लोकही मरण पावतील. अचानक त्यांना मृत्युदेवता घेऊन जाईल. मग आपण चिरकाल जगू, असा आत्मविश्वास आपल्यात कुठून येतो? अनित्यतेसंबंधी शिकवलेलं असूनही मृत्यूचं भय न बाळगणं हा अतिशय मूर्खपणा आहे. मेंढीसारख्या निर्बुद्ध व नीरस प्राण्यांनाही कळतं की, खाटकाने समोरच्या मेंढीला मारलं, याचा अर्थ आपणही त्याच वाटेने जाणार आहोत. हे कळल्यावर तिचं हृदय वेगाने धडधडू लागतं.

गेशे पोटोवा यांची एक सयुक्तिक ठरणारी गोष्ट आहे. त्यांच्या गावात राहणारी एक व्यक्ती त्यांच्यापाशी येऊन म्हणाली, “माझा मृत्यू येणार असेल, तेव्हा तुम्ही मला एखादा संदेश पाठवाल का?” नंतर वरच्या गावात कोणीतरी मरण पावलं आणि या माणसाकडे संदेश पाठवण्यात आला, पण त्याने काहीच केलं नाही. खालच्या गावात, मग मधल्या गावातही असंच घडलं. तरीही या माणसाने काहीच केलं नाही. अखेर त्याच्या मृत्यूच्या खुणा दिसायला लागल्या, तेव्हा तो गेशे पोटोवा यांच्याकडे धावत गेला आणि त्याने विचारलं, “तुम्ही मला संदेश का पाठवला नाहीत?” गेशे पोटोवा म्हणाले, “मी संदेश पाठवले हते, पण तुम्हाला कळलं नाही.” गेशे पोटवा ज्या खोऱ्यात राहायचे त्या पेन्पो भागातील मृत्यूंची नोंद ठेवून ते स्वतःदेखील अनित्यतेसंबंधी ध्यानधारणा करत असत.

अनित्यतेसंबंधीची समज धर्मशास्त्रीय संदर्भांवर आधारलेली असायला हवी असं नाही; सर्व सजीवांवर परिणाम करणाऱ्या मृत्यूच्या आकलनातूनही हे दिसू शकतं. मृत्यूचा स्वाभाविकपणा लक्षात येऊनही काही लोक स्वतःच्या जगण्यात तो लागू करत नाही, ते डोळे उघडे ठेवलेल्या अंध लोकांप्रमाणे असतात. भविष्यात आपले मित्र, नातेवाईक, सेवक व अनुयायीवर्ग सर्व काही लुप्त होणार आहे. तुम्ही त्यांच्यासोबत असताना तेव्हा वाऱ्याने एकत्र आणलेल्या पानांच्या संचाप्रमाणे असता, हा संच नंतर विखुरणार हे ठरलेलं आहे. आत्ता आपण एकत्र असलो, तरी भविष्यात आपण भेटू तेव्हा निराळ्या रूपांमध्ये असू आणि आपण एकमेकांना ओळखणार नाही. अनित्यतेसंबंधी क्वचितच विचार केला जातो, पण आपण किमान ऐहिक व अध्यात्मिक जीवनात समतोल तरी साधायला हवा, त्यातून स्थैर्य निर्माण होतं.

ऋतू बदलतात, पानं गळतात व इतर नैसर्गिक घटितं उलगडू लागतात, त्यातूनही अनित्यतेचे धडे मिळत असतात. मिलारेपा म्हणतात त्याप्रमाणे, “माझ्या अवतीभवतीच्या सगळ्याकडे मी शिक्षण म्हणून पाहतो.”

अनित्यतेसंबंधीचं आणखी एक रूपक म्हणून जत्रेचा विचार करता येईल. अशा कार्यक्रमांसाठी वेगवेगळ्या गावांमधील लोक एकत्र येतात आणि मग ते परत विखरून जातात. ते कुठे जातात हे आपल्याला माहीत नसतं आणि त्यांना पुन्हा तसं एकत्र आणलं जाणार नाही. आपल्या अवतीभवतीची ही मित्रमंडळी व नातेवाईक हे जत्रेतील लोकांप्रमाणे किंवा शरद ऋतूमध्ये येणाऱ्या माश्यांप्रमाणे आहेत. ते परत विखरून जाणार.

पावसाळा व उन्हाळा यांसारख्या गोष्टी मोहवणाऱ्या सुंदर वाटणं शक्य आहे, पण त्यातून अनित्यतेची व सततच्या बदलाचीच शिकवण मिळते, आणि मूलभूत तत्त्वांचंही तसंच असतं. वनस्पती पहिल्यांदा हिरव्या असतात, मग नारंगी होतात व मग उजाड होतात. झऱ्यामधील पाण्याचं तापमान, रंग व ध्वनी ऋतुमानानुसार बदलतं. सुंदर नृत्यसदृश लहरी असणारे, सुंदर खळखळणारा आवाज करणारे हिरवे-निळे झरे अखेरीस वरून गोठून जाणार असतात. आणि पांढरा बर्फ व पाणी यातून कोणीतरी खुसफुसत असल्यासारखा आवाज येतो. लोकांच्या बाबतीतही असंच होतं. लोक तरुण असतात तेव्हा ते अनेक पार्ट्यांना जातात व नाच-गाणं-पिणं यांचा आनंद घेतात. पण त्यांचं वय वाढतं तशा त्यांच्या सवयी बदलतात. आधीच्या उदाहरणाप्रमाणे लोकही खुसफुसल्यासारखा आवाज करू लागतात!

उन्हाळ्याच्या काळात गाणाऱ्या मधमाश्या सुंदर बागांमधील फुलांचा रस शोषतात. आपण तरुण असतानाही असंच होतं. आपण जगातील सुखं व सोयी उपभोगतो. पण शरद ऋतूत फुलांच्या बागा उजाड होतात, आणि हिवाळ्यात बागेतून वारा वाहतो, तेव्हा त्याचा उदास सूर लागलेला असतो. लोकांना तिथे जाऊन असा उजाडपणा बघावासा वाटत नाही. काही वेळा संपूर्ण डोंगर फुलांनी आच्छादित असतो, पण हिवाळ्यात तो पूर्णतः उजाड होतो. घरांच्या बाबतीतही तसंच होतं: ऋतुमानानुसार ती बदलतात व जुनी होतात. ही सर्व अनित्यतेची उदाहरणं आहेत. परंतु, स्वतःचं शारीरिक रूप हा अनित्यतेचा सर्वांत जवळचा शिक्षक आहे. आपण वृद्ध होतो तसतसं आपल्याला तरुणपणी जे करणं शक्य व्हायचं ते करणं शक्य होत नाही: आपण संथ होतो व आपलं दिसणं बदलतं.
अनित्यता केवळ सजीवांनाच लागू होते असं नाही, तर इमारती, निसर्ग, माळीकाम व काळ यांसारख्या निर्जीव गोष्टींनाही लागू होते. नागार्जुन व असंग जिथे शिकले ते नालंदासारखे मोठे मठ, आणि बोधगयेतील मठ, या गोष्टी पूर्वीच लुप्त झाल्या आहेत. तिबेटमधील गान्दन, सेरा व इतर मोठ्या मठरूपी विद्यापीठांबाबतही असंच घडलं. आत्ता आपण लायब्ररी ऑफ तिबेटन वर्क्स अँड अर्काइव्ह्जमध्ये आहोत, या जागेचंदेखील कधीतरी विघटन जाईल आणि तिचे अवशेष उरतील. नागार्जुन यांनी ‘लेटर टू अ फ्रेंड’मध्ये (संस्कृत- सुहर्ल्लेख) म्हटल्याप्रमाणे, “सात सूर्यांच्या पेटण्याने संपूर्ण विश्वाचा विध्वंस होणार असेल, तर आपली शरीरंही अशाच प्रकारे नष्ट होतील यात काही शंका नाही.” या विध्वंसामध्ये सर्व काही नष्ट होईल- हलक्या रूपांमधील प्रथम स्तरावरील अविचल ब्रह्म प्रांतासह सर्व नष्ट होईल.

पिवळ्या गवताची पेंढी बांधण्यासाठी वापरलेली दोरी एक काळा उंदीर व एक पांढरा उंदीर आळीपाळीने खातायंत. या उदाहरणार्थ, काळा उंदीर व पांढरा उंदीर रात्र व दिवस यांचं प्रतिनिधित्व करतात, गवताची पेंढी म्हणजे आपलं आयुष्य आणि पेंढी बांधण्यासाठी वापरलेली दोरी म्हणजे आयुष्याचा कालावधी. ही दोरी पूर्णतः उद्ध्वस्त होण्याआधी, आपलं आयुष्य असणारी गवताची पेंढी खाली कोसळते, त्यामुळे शक्य तितक्या रचनात्मक कृती करण्याची जबाबदारी आपण स्वीकारायला हवी.

काळाचा प्रत्येक क्षण आपल्याला मृत्युदेवतेच्या समोर नेत असतो. इतर एखाद्या प्राण्याला कत्तलखान्यात नेलं जातं, त्याप्रमाणे प्रत्येक टप्पा आपल्याला मृत्यूच्या जवळ नेत असतो. आपला प्रत्येक श्वास आपल्याला मृत्युपाशी नेतो. आज सकाळी उठल्यापासून आपण किती जवळ आलोत असू. आपण तरुण असल्यामुळे मरणार नाही, असं वाटणं मूर्खपणाचं आहे. मृत्युदेवतेला वयाने काहीच फरक पडत नाही. पांढरे केस झालेले व थरथरत्या शरीरांचे अतिशय वृद्ध पालक पाठीत वाकल्यानंतरही त्यांच्या मुलांची प्रेतं दफनभूमीमध्ये घेऊन जातात, अशा वेळी मृत्युदेवता वय पाहून भेदभाव करते, असं आपल्याला कसं म्हणता येईल? तर वयाच्या अलाहिदा आपण धर्माचरण करायला हवं, केवळ वृद्ध झाल्यावरच ते करायला हवं असं नाही. केवळ धर्म ही एकच गोष्ट उपकारक आहे. तुमचं आचरण / उपासना हाच एकमेव विश्वसनीय मित्र आहे. लोक विश्वसनीय नसतात. वाईट परिस्थितीमुळे कोणाच्या संपत्तीचं पीक होरपळून जातं, तेव्हा त्या व्यक्तीने ज्या लोकांची काळजी घेतली असेल त्या अवलंबी वर्तुळातील लोकांचाही प्रतिसाद मिळणं अवघड होतं. आपण गरीब झालो की सगळे आपल्याला तुच्छ मानतील व दूर लोटतील. हा प्राथमिक मानवी स्वभाव आहे. आपण वृद्ध व गरीब असलो, की लोक आपल्याकडे लक्ष देत नाहीत. आपण श्रीमंत व प्रसिद्ध असलो की लोक आपलं लक्ष वेधून घेऊ पाहतील. कोणी श्रीमंत असतं तेव्हा लोक पुढे येतात आणि आपण या त्या व्यक्तीच्या प्रसिद्धीमध्ये योगदान दिल्याचं दाखवतात. लोक तुमच्या सुखात वाटा घेण्याचा प्रयत्न करतात, पण दुःखाच्या बाबतीत असं कोणी करत नाही. तुमच्याकडून त्यांना काही मिळत नसेल, तर ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतात. बुद्धाची कृती याच्या विरोधी होती, त्याने गरीब व गरजूंकडे अधिक लक्ष दिलं.

तुमची परिस्थिती चांगली नाही, असं कोणा प्रभावशाली व्यक्तीने तुमच्या सर्वांत विश्वासू मित्राला सांगितलं, तर हा मित्र त्याचा विचार बदलेल आणि तुटकपणे वागेल. अगदी मोजके शब्द ऐकूनही त्याला दुसऱ्या दिवसापासून तुमच्याविषयी अप्रीति वाटू शकते. यातून एक म्हण सिद्ध होते: “आधी काही इंच पार केल्यावर जिथे पोचता येत होतं, तिथे आता एक यार्ड अंतर पार केल्यावरही पोचणं शक्य उरलेलं नाही.” आधी निकटवर्तीय असलेल्या लोकांमधील अंतर काही मोजक्या शब्दांनीही खूप वाढण्याची शक्यता असते, असा याचा अर्थ. आपण धर्मामध्ये स्थिर मित्र शोधणं गरजेचं आहे. मित्र एकमेकांशी सावधपणे वागतात आणि तुमच्या चुका व उणिवा दाखवायला कचरतात. परंतु आपला शत्रू मात्र अधिक मदतीला येतो, कारण तो आपल्या उणिवांवर बोटं ठेवत असतो.

काही लोक आयुष्यभर संपत्ती जमवतात, परिणामी ते खूप बदलतात आणि त्यांना बरंच दुःखही होतं. श्रीमंती मोठ्या दुःखाचं कारण ठरते, त्यामुळे आपण श्रीमंतीपासून दूर असावं. संपत्तीचा मुखवटा सुखाचा असतो, पण वास्तविक ती सुख देत नाही. एखादा पतंग किंवा फुलपाखरू ज्योतीकडे आकर्षित होतं, तसंच आपलं संपत्तीविषयीचं आकर्षण असतं: जास्त जवळ गेल्यास आपण नष्ट होतो. श्रीमंत लोक सुखी वाटतात, चांगले दिसतात, त्यांचं घर छान असतं आणि त्यांना पैशाची काही चिंता नाही असं वाटतं. हे आकर्षक दिसतं, पण या परिस्थितीमध्ये आपण पूर्णतः बुडून जातो, तेव्हा त्यातील अडचणी व तोटे दिसू लागतात. उदाहरणार्थ, काही लोक धार्मिक असतात, पण ते श्रीमंत झाल्यावर त्यांचा धर्मातील रस आटतो आणि त्यांचं मन अधिकाधिक संपत्तीचा संचय करण्यावर केंद्रित होतं. आपण संचयाच्या गुणाला कायम कंटाळतो, पण संपत्तीचा संचय करायला कधी कंटाळत नाही.

थोडक्यात, जीवन अनित्य आहे आणि मृत्यू येणं अनिवार्य आहे, त्यामुळे आपण त्यासाठी तयार असायला हवं. मृत्यू कधी येईल याची काही खात्री नसते, पण एकदा का तो आला की त्याची माघार अशक्य आहे. श्रीमंत लोक त्याला लाच देऊ शकत नाहीत, सुंदर लोक त्याला भुलवू शकत नाहीत आणि बलदंड लोक त्याच्याशी कुस्ती खेळू शकत नाहीत. काही ठिकाणी पैशाने व्हिसाचा किंवा निवासी परवान्याचा कालावधी वाढवून घेता येतो, पण आपल्या आयुष्याचा कालावधी पैसे देऊन वाढवता येत नाही.

मृत्युदेवतेने आपल्याला गाठलं, की आपल्याला जन्मापासून आपल्यासोबत असलेलं शरीर मागे सोडावं लागतं. आपण उबदार पलंगावर मरण पावतो, परंतु आपली जाणीव गेल्यानंतर आपल्या नातेवाईकांकडे, मित्रांकडे व संपत्तीकडे मागे वळून पाहायची संधी एक क्षणभरही मिळत नाही. हे जीवनाचं वास्तव आहे आणि त्यासाठी आपण तयारी करायला हवी. आपण संचय केलेल्या सर्व गोष्टी आपल्याला मागे ठेवून जावं लागतं, प्रत्येक कष्ट अथकपणे सहन करावा लागतो. आपल्या रचनात्मक व विध्वंसक कृतींचं ओझं व जबाबदारी पाठीवर टाकून आपल्याला या जीवनापलीकडे जावं लागतं. काही वृद्ध पालक त्यांच्या मुलांसाठी व नातवंडांसाठी घरं बांधतात, पण ते मरण पावतात तेव्हा त्यांच्या विध्वंसक वर्तनाचं- म्हणजे घर बांधल्याचं, कीटक मारल्याचं, इत्यादीचं- ओझं त्यांच्या पाठीवर वाढलेलं असतं, आणि मुलं मात्र त्या घरात राहिल्याचा आनंद घेत राहतात. अशा कृतींनी आपण केवळ नकारात्मक कर्माचं ओझं जमवत राहतो.

‘बार्डो’च्या भयंकर मार्गांवरून आपण प्रवास करतो आणि मृत्युदेवतेचे सैनिक आपल्याला थांबवतात, तेव्हा आपल्याला संपत्ती जमवण्याच्या प्रयत्नातील निरर्थकता लक्षात येते. त्या वेळी आपल्याला खूप पश्चात्ताप झाला, तरी त्याचा काही उपयोग होत नाही. एक म्हण अशी आहे: “कोणाला आगाऊ विचार करता येत असेल, तर तो सुज्ञ असतो; कोणाला पश्चात्ताप होत असेल, तर तो मूर्ख असतो.” धर्म हा अनोळखी ठिकाणी आलेल्या व्यक्तीचा खरा मार्गदर्शक असतो. आपल्याला महासागराच्या दुसऱ्या किनाऱ्यावर सुरक्षितपणे आणून पोचवतो तो नावाडी म्हणजे धर्म. तर, आजपासून तुम्ही तुमचं शरीर, वाणी व मन धर्मासाठी वापरा.

स्वतःचं सुख आपल्याच हातात असेल तोवर आपण ते करायलाच हवं. असं केलं नाही तर कधीतरी आपण गोंधळून जाऊ आणि काय करायचंय हे आपल्याला कळणार नाही. धार्मिक व्यक्ती मरण पावते व अवगुणी व्यक्ती मरण पावते त्यात खूप फरक असतो. अवगुणी व्यक्ती जागरूकतेविना व वेदनेत मरण पावते. धार्मिक व्यक्ती शांततेत व पुढील क्षणासाठी आगाऊ तयारी करून मरण पावते, तिथे आपली संपत्ती गरीबांना, नातलगांना वाटलेली असते. धार्मिक व्यक्तीसारखं होयासाठी आपण या शिकवणुकी शक्य तितक्या शिकून घ्यायला हव्यात. आपण चुकीच्या रितीने सर्वसंगपरित्याग करायला नको- अन्न, झोप व संपत्ती सगळं सोडून द्यायची गरज नाही, उलट अध्यात्मिकता व भौतिक आस्था यांमध्ये समतोल साधावा आणि शक्य तितक्या सर्वोत्तम रितीने धर्माचरणाचा प्रयत्न करावा.

धर्माचरण म्हणजे विशिष्ट पेहराव करून विशिष्ट रूढी पाळणं नव्हे, तर स्नेहशील व करुणामय काळीज असणं म्हणजे धर्माचरण होय. एक गोष्ट आहे- एकदा एक तिबेटी स्त्री मरण पावते, तिथून ती नरकात जाते आणि मृत्युदेवतेला भेटते. शारीरिक पातळीवर तिने हानिकारक गोष्टी केलेल्या आहेत पण मानसिक पातळीवर तिने हे सगळं चांगल्या हेतून केलं, असं ती त्याला सांगते. त्यामुळे तिला पुन्हा जुन्या रूपात पुन्हा जगात पाठवलं जातं. उदार अंतःकरण असण्याची गरज यातून दिसते, मग आपल्या कृती बाहेरून कशाही दिसू देत.

एक म्हण अशीही आहे: “धर्माबद्दल बरंच बोलणारे लोक आचरण मात्र फारसं करत नाहीत.” अतिशा यांनी यावर कायमच भर दिला आणि कोणाही व्यक्तीला भेटल्यावर ते नेहमी विचारत की, “तुमचं मन चांगलं आहे का?” अतिशा यांच्या मृत्यूबद्दल द्रोम्तोन्पा यांना कळलं तेव्हा ते खूप दुःखी झाले होते. अतिशांच्या मृत्यूसमयी आपण उपस्थित नसल्याचं त्यांना वाईट वाटलं. परंतु, अतिशा अनुयायांना एक संदेश देऊन गेले होते की, त्यांचं मन चांगलं असेल, तर हे त्यांना भेटल्यासारखंच आहे. इतरांना उपकारक ठरता येत नसल्याबद्दल आपण आता तक्रार करत असलो, तरी आपण इतरांना हानी पोचवली जाणार नाही याची काळजी घेतली, तर आपल्या पातळीवर ते उपकारकच ठरतं, ही कदम्प शिकवण लक्षात ठेवणं चांगलं. कोणाला दुःखी केलं जाऊ नये, असा प्रयत्न करा.

श्वासोच्छवासाचा प्रवाह बंद पडत नसला, तरी सकारात्मक सामर्थ्याचा संचय करण्याची व भवितव्य आश्वस्त करण्याची संधी व ताकद आपल्याकडे असते. तुम्ही स्वतःचे सर्वांत घनिष्ठ मित्रही असता व स्वतःचे सर्वांत वाईट शत्रूही असता. भविष्यात तुम्हाला मिळणारं सुख तुमच्यावरच अवलंबून असतं. धर्माचरण न करता मरण पावणं म्हणजे कुत्र्यासारखंच मरण असतं, विशेषतः ‘बार्डो’मध्ये हे लागू होतं. तुम्ही मानव म्हणून जन्माला आल्याने काहीच फरक पडणार नाही. धर्माचरण न करणारा चक्रवर्ती सम्राट आणि रस्त्यावर मरण पावलेला कुत्रा यांच्यात काहीच फरक नाही. किंबहुना, ते मरण पावतात तेव्हा कुत्र्याने कमी नकारात्मक कर्म केलेलं असण्याची शक्यता आहे. तर आचरणाच्या सुरुवातीला, मध्यात व अंतकाळात अनित्यतेसंबंधी विचार करणं आवश्यक असतं. सर्वांत साक्षात्कारी व अनुभवी गुरूही अनित्यतेसंबंधी ध्यानधारणा करतात.

हत्तीचा पावलाचा ठसा सर्वांत मोठा असतो. सर्वांत मोठा ठसा उमटवणारा विचार अनित्यतेचा असतो.

आपल्या काळ्या जादूच्या गुरूंच्या गुरूचा मृत्यू आपल्यामुळे झाल्याचं पाहिल्यावर मिलरेपा यांनी धर्मात प्रवेश केला. गाम्पोपा यांनी पत्नीच्या निधनानंतर धर्मात प्रवेश केला. त्याचप्रमाणे बुद्धाने पहिल्यांदा मृत्यू पाहिला तेव्हा त्याला धर्मात प्रवेश करण्याची प्रेरणा झाली व या दुःखावर उपाय शोधावासा वाटला. अनित्यता हा मध्यवर्ती मार्ग म्हणून सुचवलेला आहे (याचा संबंध मध्यमाकाशी जोडू नये). या जीवनाशी असलेले अनुबंध तोडण्याचं कार्य मध्यवर्ती मार्ग करतो आणि व्यक्तीच्या उपासनेशी सकारात्मक विचार जोडतो. अनित्यतेला ‘मध्यवर्ती मार्ग’ मानण्याचं अधिक मूलगामी अर्थनिर्णयनही करता येईल. मध्यमाकाच्या संदर्भातही याचं स्पष्टीकरण देता येईल. मध्यमाक तत्त्वज्ञानाशी संबंधित मर्मदृष्टी विकसित करण्यासाठी अनित्यतेचा पाया उपयोगी पडतो. यातून भ्रामक स्वच्या संकल्पना नष्ट होतात आणि पारंपरिक स्वच्या वास्तवात आपल्याला प्रस्थापित व्हायला मदत होते.

विचलित करणाऱ्या गोष्टींपासून मन दूर नेलं आणि धर्मावर लक्ष केंद्रित केलं की मग आपण पुढील गोष्टी कराव्यात. मूलगामी स्तरावर जाण्यासाठी या जगात अनेक उपासनेच्या / धर्माचरणाच्या परंपार असल्या, तरी आपण धर्माचरणाबाबत पूर्णतः स्वागतशील झालो की त्सोंग्खापा यांच्या प्रस्थापित परंपरेद्वारे तीन वेळा बुद्धाच्या शिकवणुकींचे पूर्ण सार अनुसरण्याचा प्रयत्न करणे सर्वांत चांगलं असतं. यासाठी आपण सूत्र व तंत्र यांच्या संयुक्त व एकत्रित पद्धती अनुसरण्याची गरज आहे, यात स्पष्टीकरण व उपासना या दोन्हींचा समावेश होतो. हे अनुसरण्यासाठी आपल्याला या मार्गाचं स्वरूप, टप्पे व विभाग यांची माहिती असायला हवी आणि आपण त्यांचं योग्य अनुसरण करायला हवं. उदाहरणार्थ, आपण सूत्राआधी तंत्राचं आचरण करता कामा नये, किंवा मूल्यवान मानवी पुनर्जन्म, सुरक्षित दिशा (आश्रय), अवलंबी उदय, इत्यादींविषयी माहिती करून घेतल्याशिवाय बोधिचित्ताचा अभ्यास करू नये.

आपण पूर्णतः अचूक मार्गाच्या प्रेरणा व आवश्यक शिकवणुकी रोज आपल्या मनांमध्ये रुचवण्याचा प्रयत्न करायला हवा. रोज शक्य तितकी विक्री करायचा प्रयत्न करणाऱ्या व्यापाऱ्यांप्रमाणे आपण रोज शक्य तितकी शुभ्र बिजं रोवण्याचा प्रयत्न करायला हवा, जेणेकरून शक्य तितके सकारात्मक सामर्थ्य निर्माण होईल. प्रत्यक्ष उपासनेवेळी आपण सूत्र व तंत्र यांच्यात सामायिक असलेल्या लघुसंहितांवर दृष्टिक्षेप ध्यानधारणा करू शकतो. द फाउंडेशन फॉर गुड क्वालिटीज् (Yon-tan gzhi-gyur-ma) यासारख्या संहितांचं पाठांतर करणं, हळूहळू वाचन करणं आणि ध्यानधारणा करणं- असा यासाठीचा मार्ग असावा. जोर्चो (sByor-mchod) या प्राथमिक उपासनेमध्येही हे आढळतं. द अब्रिव्हिएटेड पॉइन्ट्स ऑफ द ग्रेडेडे पाथ (Lam-rim bsdus-don) अशीही एक संहिता आहे, त्यात सहा दूरदर्शी प्रवृत्तींचा उल्लेख आहे. ही संहिता द फाउन्डेशन फॉर गुड क्वालिटीज या संहितेइतकी उघड स्वरूपाची नाही, पण त्यात नैतिक स्वयंशिस्तीचे तीन प्रकार नमूद केलेले आहेत, त्यात पुहा सहा दूरदर्शी प्रवृत्तींचा समावेश आहे. अशा प्रकारच्या दृष्टिक्षेप ध्यानधारणेसाठी आपण द गुरू पूजा- लामा चोपा (Bla-ma mchod-pa) या संहितेतील लाम-रीम श्रेणीबद्ध टप्प्यांच्या भागाचा उपयोग करू शकतो. आपण काय शिकलो याचं परिशीलन करण्यासाठी दृष्टिक्षेप ध्यानधारणा ही एक सक्षम पद्धती आहे, त्यातून आपल्याला मनात या गोष्टी सामूहिकरित्या संघटित करायला मदत होते. एखादं ठिकाण कुठे आहे हे पाहण्यासाठी नकाशा तपासणं किंवा पर्वतावरून संपूर्ण मैदानी प्रदेशाचा विहंगम आढावा घेणं, यासारखं हे असतं.

आत्ता लाम-रिमचा अनुभव घेणं अवघड असेलही, पण दररोज दृष्टिक्षेप ध्यानधारणा केल्याने शिकवणुकींच्या संपूर्ण संचाविषयीच्या सूचना आपल्या मनामध्ये रुजतात. आपण लाम-रीमसंबंधी ध्यानधारणा करतो तेव्हा आपण सूचनांमध्ये दिलेली योग्य प्रक्रिया अनुसरणं गरजेचं असतं. पहिल्यांदा आपण बोधिचित्ताची प्रेरणा निश्चित करावी आणि अखेरीस समर्पणाची भावना व्यक्त व्हावी. सत्राच्या सुरुवातीला आपण प्रेरणा निश्चित केल्यामुळे आपण इतरांसाठी ध्यानधारणा करतो आहोत, असा विचार करावा लागतो. हे शक्य नसेल तर आपण किमान सर्वसंगपरित्याग तरी करावा. आपल्या ध्यानधारणेच्या अखेरीला आपण निर्माण केलेलं सकारात्मक सामर्थ्य सर्व मर्यादित जीवांच्या सुखासाठी व त्यांना बुद्धत्व प्राप्त करता यावं यासाठी समर्पित करावं. अशा प्रकारच्या उपासनेमध्ये सहभागी होऊन तुमच्या मूल्यवान मानवी जीवनाचं सार अनुभवावं, अशी आग्रहाची विनंती मी तुम्हाला करतो आहे. “सार अनुभवण्या”चा अर्थबोध तीन पातळ्यांवर लावता येतो: महान, मध्यम व लहान. या जीवनामध्ये बुद्ध होणं, ही महान पातळी, अस्वस्थकारक भावनांच्या सर्व निकृष्ट रूपांपासून मुक्ती प्राप्त करणं ही मध्यम पातळी, आणि कनिष्ठ पुनर्जन्मांपासून स्वातंत्र्य मिळवणं म्हणजे लहान पातळी.

समर्पण

यातून निर्माण झालेल्या सकारात्मक शक्तीच्या ताकदीवर आपल्याला दुःखाचे स्त्रोत नष्ट करणं शक्य होईल: शाश्वतता, अनुबंध व तिटकारा हे पकडण्याचा ध्यास सोडणं शक्य होईल. खऱ्या अस्तित्वावर पकड घेण्यासाठी खटपट करणाऱ्या शक्ती (ज्या संसारातील दुःखाचं मूळ असतात त्या) नष्ट करण्याची क्षमता आपल्यात येईल. प्रत्येकाला पवित्र अमरत्वाची स्थिती- म्हणजे बुद्धत्व प्राप्त होईल.

धर्माचा ऱ्हास होत असताना एक दिवस केलेलं धर्माचरण हे धर्माची भरभराट होत असताना केलेल्या शेकडो नैतिक कृत्यांहून चांगलं असतं. धर्माचरण म्हणजे चांगलं मन, असणं, दयाळू असणं, समजून घेणं, करुणाभाव ठेवणं आणि इतरांना इजा न पोचवणं. गुरूंच्या दयाभावाची परतफेड करण्याचा हा मार्ग आहे. मनात द्वेष जोपासताना करुणामय असल्याचा बहाणा करण्याऐवजी सरळपणे धर्माचरण करणं उत्तम. मिलारेपा म्हणाले होते, “केवळ तुमच्या सुखासाठी नव्हे, तर इतरांच्या सुखासाठी काम करा. तुमच्या पितासदृश गुरूची परतफेड करण्याचा हा मार्ग आहे.”

धर्मात प्रवेश करण्यासाठी नवागतांनी आधी दहा विध्वंसक कृतींविषयी शिकून घ्यायला हवं आणि तसं करण्यापासून स्वतःला थांबवायला हवं. मग हळूहळू स्वतःचं आचरण / उपासना विकसित करता येते आणि ध्यानधारणेच्या दिशेने जाता येतं. तत्काळ ध्यानधारणेला सुरुवात केल्याने निराशा पदरी पडू शकते, गोंधळ उडू शकतो, आणि मग ध्यानधारणेबद्दल तिटकाराही वाटू शकतो. तर, धर्माचरणाचा हा हानिरहित, अतिशय ठाम पाया असलेला व ढोंगी नसलेला आधार आहे. दहा रचनात्मक कृतींच्या नैतिकतेचं आचरण करत असताना आपण नैतिक आत्मप्रतिष्ठा विकसित करणं गरजेचं आहे, आपल्या कृती इतरांवर कसा परिणाम करतात याची काळजी करायला हवी, सजग व सतर्क राहायला हवं. केवळ आपल्याला सुखी करतं तेवढंच करू नये, तर आपण कोणते कपडे घालतो, काय करतो, कोणता विचार करतो, काय बोलतो याचा इतरांवर होणारा परिणामही विचारात घ्यावा. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे आपण कोणालाही इजा पोचवू नये.

Top