प्रेम, करुणा व बोधिचित्त यांचं महत्त्व

बोधिचित्त प्राप्त करण्यासाठीची प्राथमिक सामग्री आपल्या सर्वांकडे असते

“बोधिचित्त” हा संस्कृत शब्द आहे. त्याचं भाषांतर करणं सोपं नाही. “चित्त” म्हणजे “मन”. पण बौद्ध धर्मामध्ये आपण मनाविषयी बोलतो तेव्हा आपण मन (माइंड) व काळीज (हार्ट) या दोन्हींबद्दल बोलत असतो. पाश्चात्त्य विचारपद्धतीत या दोन गोष्टींमध्ये केला जातो तसा भेद बौद्ध धर्मात केला जात नाही. त्यामुळे आपण एकाग्रता, समजूत, इत्यादींद्वारे आपल्या बुद्धिमत्तेचा- आपल्या मनातील बुद्धिप्रामाण्यवादी बाजूचा- विकास साधण्यापुरतं मर्यादित ध्येय ठेवत नाही, तर आपलं काळीज विकसित करण्याची गरज आपण लक्षात घेतो, म्हणजे संपूर्ण भावनिक बाजूचा विचार करतो, असं केल्याने आपण बोधिचित्तामधील पहिल्या शब्दापाशी- “बोधी”पाशी पोचू शकतो.

“बोधी” या शब्दाचा अर्थ सर्वोच्च वृद्धी व शुद्धता असा आहे. मानसिक व भावनिक पातळीवरील सर्व अडथळ्यांपासून मुक्त होणं म्हणजे शुद्धता. यामध्ये गोंधळापासून, समजुतीच्या अभावापासून, एकाग्रतेच्या अभावापासून मुक्त होण्याचाही समावेश आहे. यात भावनिक बाजूने शुद्धता साधण्याचाही समावेश होतो- म्हणजे आपल्या अस्वस्थकारक भावनांपासूनही मुक्त होणं अपेक्षित असतं. अस्वस्थकारक भावनांमध्ये संताप, मत्सर, ओढ, स्वार्थ, अहंकार, ईर्षा, भाबडेपणा.. इत्यादींचा समावेश होतो. ही यादी खूप मोठी व लांबलचक आहे; त्यात भर घालतच जाता येईल. आपल्या जीवनातील हे खरे संकटकारक घटक असतात. त्यामुळे आपल्या मनाने व काळजाने आपण या सर्व संकटकारक घटकांपासून मुक्त होण्याचं उद्दिष्ट समोर ठेवावं.

या शब्दाचा दुसरा पैलू म्हणजे “बोधी”- त्याचा अर्थ आहे “वृद्धी” / “वाढ”. याचा अर्थ असा की, आपल्या सर्वांमध्ये प्राथमिक सामग्री आहे: आपल्या सर्वांकडे एक शरीर आहे. आपल्याकडे संवाद साधण्याची क्षमता आहे. शरीराद्वारे कृती करण्याची क्षमता आपल्यात आहे. आणि आपल्या सर्वांकडे मन (गोष्टी समजून घेण्याची क्षमता) व काळीज (भावना, इतरांबद्दलचा स्नेह जाणवून घेण्याची क्षमता) व बुद्धी (उपकारक व अपायकारक यांच्यात भेद करण्याची क्षमता) आहेत.

हे सर्व घटक, हे सर्व गुण आपल्याकडे आहेत, आणि त्याचं काय करायचं हे आपल्यावर असतं. आपण ज्या तऱ्हेने कृती करतो, ज्या तऱ्हेने बोलतो, ज्या तऱ्हेने विचार करतो, त्यातून स्वतःसाठी व इतरांसाठी समस्या निर्माण करण्यासाठी या घटकांचा वापर करता येतो. किंवा इतरांना व स्वतःला लाभ व अधिक सुख मिळवून देण्यासाठी त्यांचा वापर करता येतो. आपण ज्या तऱ्हेने कृती करतो, संवाद साधतो व विचार करतो, त्यावर गोंधळाचा व अस्वस्थकारक भावनांचा प्रभाव असेल, तर अर्थातच त्यातून समस्या उद्भवतात. आपण संतापाच्या प्रभावाखाली कृती करतो, तेव्हा आपण अशा काही कृती करून बसतो ज्याबद्दल आपल्याला नंतर पश्चात्ताप होतो, नाही का? आपण स्वार्थीपणाने कृती करतो, तेव्हा त्यातूनही अनेकदा मोठ्या समस्या निर्माण होतात. स्वार्थी व्यक्ती कोणालाच आवडत नाही. 

ही एक बाजू झाली. दुसरी बाजू अशी की, आपण प्रेम, करुणा व इतरांविषयीचा समजूतदारपणा यांसारख्या सकारात्मक गुणांच्या आधारावर कृती केली, संवाद साधला व विचार केला, तर त्यातून आपल्याला जीवनात अधिक सुख, अधिक समाधान लाभतं: इतरांना आपण आवडतो; इतरांना याचा लाभ होतो. उदाहरणादाखल आपल्या मित्रांसोबतच्या आपल्या संबंधांमध्ये आपल्याला हे स्पष्टपणे जाणवू शकतं. आपण सतत त्यांच्यावर टीका करत असलो व त्यांच्यावर संतापत असलो, तर कोणालाच आपल्यासोबत असणं आवडत नाही. पण आपण त्यांच्याशी दयाळूपणे वागलो, त्यांना चांगलं वागवलं, तर अर्थातच त्यांना आपलं साहचर्य आवडतं. आपण पाळीव मांजर व कुत्रा यांच्याबाबतीतही हे पाहू शकतो: त्यांनाही त्यांच्यावर सतत ओरडलेलं आवडत नाही; त्यांना चांगली वागणूक हवी असते. तर, आपल्याकडील ही प्राथमिक क्रियात्मक सामग्री वाढण्याची शक्यता असते. 

तर, बोधिचित्त ही आपल्या मनांची व आपल्या हृदयाची अशी स्थिती असते ज्यात आपले ध्येय बोधि-अवस्थेकडे असते. आपल्या मनातील सर्व उणिवा, सर्व संकटकारक घटक या स्थितीत पूर्णतः निघून जातात आणि आपले सकारात्मक गुण शक्य तितक्या सर्वोच्च पातळीपर्यंत विकसित होतात. ही मनाची व हृदयाची स्थिती खरोखरच असाधारण गोष्ट आहे.

आणि हे अतिशय सकारात्मक भावनांमुळे घडतं. या भावना म्हणजे काय आहे? मुळात, ही केवळ सर्वच्च स्थिती आहे आणि मला सर्वोच्च व्हायचं आहे म्हणून आपण या स्थितीचं ध्येय समोर ठेवलेलं नसतं. मला सर्वांत सुखी व्हायचं आहे आणि मला इतकं सुखी होता येईल, म्हणूनदेखील हे उद्दिष्ट ठेवलेलं नसतं. आपण सर्वांचा विचार करत असतो, मानव, प्राणी असे कोणीही जगातील हे सर्व अगणित जीव- त्यांचा विचार करत असतो. प्रत्येकाला सुखी व्हायचं असतं, कोणालाही दुःखी व्हायचं नसतं, या अर्थी आपण सगळे सारखेच आहोत, हे आपल्याला कळतं. हे प्राण्यांच्याबाबतीतही खरं आहे, नाही का? प्रत्येक जण स्वतःसाठी व स्वतःच्या प्रियजनांसाठी सुख शोधायचा प्रयत्न आपापल्या परीने करतो. पण दुर्दैवाने आपल्यापैकी बहुतेकांना सुख नक्की कशाने मिळेल हे माहीत नसतं. आपण विविध प्रयत्न करतो, पण बहुतेकदा त्यातून सुखाऐवजी समस्याच निर्माण होतात. आपण कोणासाठीतरी काहीतरी चांगलं विकत घेतो- एखादी भेटवस्तू घेतो- पण त्या व्यक्तीला ती वस्तू आवडत नाही. असं हे साधं असतं. प्रत्येकाला संतुष्ट करणं अवघड आहे, नाही का? पण काहीही झालं तरी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे.

सर्वांचा सर्वाधिक लाभ व्हावा या हेतूने साक्षात्काराचं उद्दिष्ट समोर ठेवणं

आपला हेतू अर्थातच सर्वाधिक महत्त्वाचा आहे. आपल्याला इतरांची मदत करायची असते: प्रत्येकाला स्वतःच्या समस्यांपासून व या समस्यांच्या कारणांपासून स्वातंत्र्य मिळालं, तर किती चांगलं होईल. करुणा म्हणजे हेच असतं. इतरांना त्यांच्या दुःखापासून व दुःखाच्या कारणांपासून मुक्ती मिळावी, अशी इच्छा म्हणजेच करुणा.

प्रत्येक जण सुखी होऊ शकला व सुखाची कारणं प्रत्येकाला लाभली, तर किती चांगलं होईल. बौद्ध धर्मातील प्रेमाची व्याख्या ही आहे. त्यांच्या लेखी, काहीतरी परत हवं असण्याच्या इच्छेवर प्रेम आधारलेलं नाही- “तू माझ्यावर प्रेम केलंस तर मी तुझ्यावर प्रेम करीन,” असं हे नाही. दुसरी व्यक्ती कशी वागते यावर हे आधारलेलं नाही- “तू चांगला मुलगा किंवा चांगली मुलगी असशील तर मी तुझ्यावर प्रेम करेन. तू खोडकर असशील, तर मी तुझ्यावर प्रेम करणार नाही,” असं हे नाही. इतर कसे वागतात त्याचा यावर परिणाम होत नाही. तो मुद्दाच इथे लागू नाही. मुद्दा एवढाच आहे की, प्रत्येक जण सुखी झाला तर चांगलं होईल. यालाच प्रेम म्हणतात.

प्रत्येकाला असं सुखी करण्यासाठी व त्यांना दुःखातून व समस्यांमधून मुक्त करण्यासाठी काही मदत करणं मला शक्य झालं तर किती छान होईल. सध्या मी अतिशय मर्यादित आहे: माझा गोंधळ आहे, माझ्या मनात अस्वस्थकारक भावना आहेत, अनेकदा मी आळशी असतो. नोकरी शोधणं, जोडीदार शोधणं, यात अशा समस्या येतात. जीवनात आपण ज्या अडचणींना सामोरं जातो त्या सगळ्याचा इथे संदर्भ येतो. पण या सर्व उणिवा, या सर्व अडचणी माझ्यातून कायमच्या काढून टाकण्यात आल्या, तर मी पूर्ण सामर्थ्या प्राप्त करेन, प्रत्येकाला मदत करण्यासाठी उत्तम स्थान मला प्राप्त करता येईल.

तर, ‘साक्षात्कार’ असं संबोधल्या जाणाऱ्या भविष्यातील स्थितीचं उद्दिष्ट आपण ठेवतो, हा बोधिचित्तामागील हेतू असतो. ती स्थिती गाठण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असा हेतू असतो. या साक्षात्कारी स्थितीच्या वाटेवर सर्वांना अधिकाधिक उपकारक ठरेल अशा पद्धतीचा हेतू असतो, आणि एकदा का ती स्थिती प्राप्त झाली की, परिपूर्ण स्थितीपर्यंत पोचण्याचा प्रयत्न असतो.

आपल्यापैकी कोणीच सर्वशक्तिमान ईश्वर होऊ शकत नाही; ते शक्य नसतं. ते शक्य असतं तर कोणालाच दुःख भोगावं लागलं नसतं. आपण सर्वोत्तम प्रयत्न करू शकतो. पण इतरांनी स्वागतशील असायला हवं व मदतीसाठी खुलं राहायला हवं. आपण इतरांना गोष्टी स्पष्टपणे सांगू शकत असलो, तरी इतरांनी त्या स्वतःहून समजून घ्यायला हव्यात. आपण त्यांच्या वतीने समजून घेऊ शकत नाही, नाही का? आपण चांगला सल्ला देऊ शकतो, पण इतरांनी तो घ्यायला हवा.

हे आपलं उद्दिष्ट असतं- इतरांना मदत करण्यासाठी सर्वोत्तम स्थानी असणं, पण वास्तववादी कल्पना व आकलन ठेवून असं म्हणता येतं की, त्यांना खरोखर मदत होते की नाही, हे त्यांच्या प्रयत्नांवर अवलंबून असतं. पण आपला सर्व गोंधळ दूर झाला असेल अशा स्थितीपर्यंत आपण पोचलो, तर इतरांना मदत करण्याचा सर्वांत परिणामकारक मार्ग कोणता हे समजण्याची सर्वाधिक शक्यता निर्माण होते, कोणतीही व्यक्ती आत्ता कशी आहे या संदर्भातील सर्व घटक आपल्याला समजून घेता येतात.

आपल्यावर इतक्या विविध घटकांचा परिणाम होत असतो- आपलं कुटुंब, आपले मित्रमैत्रिणी, आपण राहतो तो समाज, आपण जगतो तो काळ: काही वेळा युद्धं होतात, काही वेळा आर्थिक अडचणी येतात, काही वेळा संपन्नता येते. या सगळ्याचा आपल्यावर परिणाम होत असतो. बौद्ध धर्मात गतजन्माविषयी व भावी जन्मांविषयी बोललेलं असतं. त्या दृष्टिकोनातून आपल्यावर गतजन्मांमधील प्रभावही असतात. तर, आपल्याला खरोखरच कोणाची मदत करायची असेल, तर आपण त्यांना जाणून घ्यायला हवं, आपण त्यांना समजून घ्यायला हवं- त्यांच्या वागण्यावर, त्यांच्या भावनांवर परिणाम करणाऱ्या सर्व गोष्टी समजून घ्यायला हव्यात. म्हणजे त्यांच्यात खरोखरच रस घ्यायला हवा, त्यांच्याकडे लक्ष द्यायला हवं आणि ते जसे कसे आहेत त्याबद्दल संवेदनशीलता बाळगायला हवी.

तुमच्या एकमेकांसोबतच्या संबंधांचा विचार केलात, तरीही हा मुद्दा तुम्हाला सहज कळेल, असं मला वाटतं. तुम्ही एखाद्या मित्रासोबत असाल, आणि तुम्हाला त्याच्यात काही रस नसेल, तुम्ही केवळ स्वतःबद्दल बोलत असाल, तर तुम्हाला त्याच्याबद्दल फारसं काही माहिती होत नाही. आणि तुम्ही तुमच्या मित्राकडे लक्ष दिलं नाहीत, उदाहरणार्थ- कोणातरी सोबत असताना आपण दुसऱ्या लोकांना फोनवरून टेक्स्ट मेसेज करत बसलो, तर आपण मित्राकडे लक्ष देत नसतो- तर आपल्या लक्षात येतं की, आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही, याने तो थोडा अस्वस्थ व रुष्ट झाला आहे. त्यामुळे आपल्याला खरोखरच कोणाची मदत करायची असेल, तर आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायला हवं, त्यांच्यात रस घ्यायला हवा, काय चाललंय त्याची दखल घ्यायला हवी आणि त्यानुसार प्रतिसाद द्यायला हवा. इतरांनी आपल्याला गांभीर्याने घ्यावं व आपल्याकडे लक्ष द्यावं, असं आपल्याला वाटतं, तसंच आपण इतरांशी वागावं.

स्वतः व इतर यांच्यातील समता समजून घ्यावी

स्वतः व इतर यांच्यातील समता समजून घेण्यावर हे सगळं आधारलेलं आहे, हे लक्षात घ्या. प्रत्येकाला भावना असतात, तशाच मलाही भावना आहेत. प्रत्येकाला असं वाटतं की इतरांनी त्याला गांभीर्याने घ्यावं, तसंच मलाही वाटतं. मी इतरांकडे दुर्लक्ष केलं, त्यांना चुकीच्या तऱ्हेने वागावलं, तर त्यांना वाईट वाटतं, तसंच लोकांनी माझ्याकडे दुर्लक्ष केलं व माझ्या बाबतीत समजूतदारपणा दाखवला नाही, तर मला वाईट वाटतं. प्रत्येकाला असं वाटतं असतं की तो लोकांना आवडावा, तसंच मलाही वाटतं. आपण नाकारलं जावं व दुर्लक्षिलं जावं, असं कोणालाच वाटत नाही, मलाही तसं वाटत नाही. आणि आपण परस्परांशी जोडलेले आहोत, आपण सगळे इथे एकत्र आहोत.

काही वेळा हे दाखवण्यासाठी एक गंमतीशीर उदाहरण वापरलं जातं: तुम्ही सुमारे दहा लोकांसोबत लिफ्टमध्ये आहात, आणि लिफ्ट अडकली, अशी कल्पना करा. तुम्ही तिथे या लोकांसोबत दिवसभर अडकून आहात. तर, इतरांशी तुम्ही कसं वागाल? तुम्ही केवळ स्वतःचाच विचार सातत्याने करत राहिलात, तर त्या छोट्या अवकाशातील इतर लोकांविषयी तुम्ही विचार करू शकणार नाही, त्यातून बराच संघर्ष व युक्तिवाद उत्पन्न होतील, आणि तो कालावधीही अत्यंत त्रासदायक होईल. पण तुम्ही जर हे लक्षात घेतलंत की: “आपण सगळे एकाच परिस्थितीत अडकलो आहोत आणि आपण एकमेकांबाबत समजूतदार असायला हवं, मग आपण एकमेकांना सहकार्य करून कसे तग धरून राहू आणि या पेचातून कशी सुटका करून घेऊ शकू, याचा विचार केला,” तर लिफ्टमध्ये अडकण्यासारखी त्रासदायक परिस्थितीही हाताळणं शक्य होतं.

हे उदाहरण विस्तारायचं तर: आपण सगळे या ग्रहावर अडकून पडलो आहोत, एखाद्या मोठ्या लिफ्टमध्ये अडकून पडण्यासारखाच हा प्रकार आहे, आपण एकमेकांना सहकार्य केलं नाही, तर हा कालावधी दयनीय होईल, कारण प्रत्येक जण एकसारख्याच परिस्थितीत आहे. आणि आपण एकमेकांशी ज्या तऱ्हेने वागतो, मग लिफ्टमधील दहा लोक असोत की या ग्रहावरील सर्व माणसं असोत, त्याचा सर्वांवर परिणाम होत असतो. या पार्श्वभूमीवर प्रत्येकाशी सहकार्य करणं अर्थपूर्ण ठरतं. “मी या भयंकर परिस्थितीतून कसा बाहेर येईल?” एवढाच विचार न करता, “आपण सगळे या भयंकर परिस्थितीतून कसे बाहेर येऊ?” असा विचार करावा. हे केवळ लिफ्टपुरतं लागू नाही, तर जीवनालाही लागू आहे.

मी केवळ स्वतःच्या समस्या हाताळण्यासंदर्भात विचार कसा काय करू शकतो (कारण माझ्यात विशेष असं काहीच नाही; मी लिफ्टमध्ये अडकलेल्या लोकांपैकी केवळ एक जण आहे)? ही केवळ माझी वैयक्तिक समस्या नाही: ही प्रत्येकाची समस्या आहे. आपण इथे संताप, स्वार्थ, हाव, निष्काळजीपणा या समस्यांबद्दल बोलतो आहोत, हे लक्षात ठेवावं. या सगळ्यांच्या समस्या असतात, केवळ व्यक्तिगत स्वरूपाच्या नसतात.

सर्व जीव व सर्व जीवन स्वीकारण्याइतकी आपली मनं व हृदयं विस्तारणं

त्यामुळे आपण बोधिचित्ताबद्दल बोलतो, तेव्हा आपण मन व हृदय यांच्या वैश्विक प्रकाराविषयी बोलत असतो. आपण प्रत्येकाविषयी विचार करतो, त्यात कोणीच आपलं विशेष प्रिय नसतं, आपण कोणालाही त्यातून सूट देत नाही. तर हा एक मोठाच दृष्टिकोन, मनस्थिती आहे. आपण स्वतःच्या मनाचा विस्तार करण्याविषयी बोलतो तेव्हा आपल्याला याचा सर्वांत मोठा विस्तार करता येतो, हे लक्षात घ्यायला हवं. इथे आपण सर्वांचा विचार करत असतो, म्हणजे केवळ पृथ्वीवरील मानवांचाच नव्हे, तर पृथ्वीवरील संपूर्ण जगण्याचा, विश्वातील सर्व जीवनाचा विचार करत असतो. उदाहरणार्थ, मी पर्यावरणाच्या ऱ्हासाबद्दल विचार करत असेन, तर त्याचा परिणाम केवळ पर्यावरणात राहणाऱ्या लोकांवरच होतो असं नाही, तर त्याचा प्राणीजीवनावरही परिणाम होत असतो, नाही का?

त्यामुळे आपण कशाबद्दल आस्था राखतोय, हे ठरवण्यासाठी आपल्याला बराच वाव असतो. दीर्घकालीन उपायांबद्दल विचार करण्यासाठी आपल्याला बराच वाव आहे. केवळ तात्कालिक उपायांपलीकडे जाण्यासाठी हा विचार केला जातो. आपण स्वतःच्या सामर्थ्यांसंदर्भात विचार करावा, आपलं सामर्थ्य सर्वाधिक कशातून प्रत्यक्षात येईल, त्यातून सर्वाधिक वाव कशात आहे याचा विचार व्हावा- केवळ थोडंथोडकं इथे पुरेसं नाही, तर शक्य तितकं अधिक काय आहे याचा विचार करायला हवा.

मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, ही स्थिती परस्परांच्या आदरावर आधारलेली आहे. ही स्थिती साध्य करण्यासाठीची सर्व सामग्री आपल्याकडे व प्रत्येकाकडे आहे, हे आपल्या लक्षात येतं. तर, आपण स्वतःला गांभीर्याने घेतो, इतरांनाही गांभीर्याने घेतो, आणि आपण स्वतःचा व इतरांचा आदर करत- आपण सर्व मानव आहोत, आपल्याला सर्वांनी सुखी व्हायचं असतं, दुःखी व्हायचं नसतं. आणि हे सर्व आपण जे काही करतो त्याच्याशी व आपण स्वतःचं आयुष्य कसं घालवावं याच्या संदर्भात हा विचार करावा.

ध्यानधारणेद्वारे उपकारक मनस्थिती व सवयी विकसित करणं

या मनस्थिती विकसित करण्याच्या अनेकविध पद्धती बौद्ध धर्मात दिलेल्या आहेत. “प्रत्येकावर प्रेम करा” एवढंच त्यात सांगितलेलं नाही. आपण प्रत्येकावर प्रेम करायला हवं, असं नुसतं बोलणं खूप चांगलं वाटतं, पण हे प्रत्यक्षात कसं करायचं? त्यासाठी ध्यानधारणा करायला हवी. ध्यानधारणा म्हणजे उपकारक सवयी विकसित करणं. मला एखादा खेळ खेळायचा असेल, किंवा मला एखादं वाद्य वाजवायचं असेल, तर सराव करावा लागतो. आपल्याला ती गोष्ट चांगल्या तऱ्हेने येईपर्यंत आपण ती वारंवार करत राहतो. सरावाने आपण शिकतो, आणि मग त्याबद्दल विचारही करावा लागत नाहीत- आपण अगदी सहजतेने तो खेळ खेळतो किंवा वाद्यही अतिशय सहजतेने वाजवतो.

त्याचप्रमाणे आपल्या मनोवृत्तीच्या प्रशिक्षणाबाबतही घडत असतं. ध्यानधारणेमध्ये आपण हेच करतो. आपण एक विशिष्ट भावना, एक विशिष्ट मनस्थिती निर्माण करायचा प्रयत्न करतो, त्यासाठी स्वतःवर काम करतो. तुम्ही एखाद्या खेळाचं प्रशिक्षण घेता: तेव्हा आधी तुम्हाला वॉर्म-अपसाठी व्यायम असतो, मग तुम्ही त्या खेळाचा प्रत्यक्ष सराव सुरू करता. आपण आपल्या मनस्थितीबाबतही काही वॉर्म-अप व्यायाम करतो.

सकारात्मक मनस्थिती निर्माण करण्यासाठी आपण आधी शांतचित्त व्हायला हवं, मन व भावना शांत करायला हव्यात, आपले विचार इतस्ततः पसरलेले असतील अथवा आपल्या भावना मिसळलेल्या असतील, तर ते थांबवून शांत व्हायला हवं. सर्वसाधारणतः आपण आपल्या श्वासावर शांतपणे लक्ष केंद्रित करून हे साधतो. आपण सतत श्वास घेत असतो आणि त्यावर लक्ष केंद्रित केलं, तर त्यातून शांतचित्त होऊन श्वासाचा स्थिर ताल जाणवतो, आणि तो आपल्या शरीराशी जोडला जातो, आपल्या विचारांशी “वर आकाशात” जोडला जातो. हा प्राथमिक वॉर्म-अप व्यायाम आहे.

आपण प्रेरणेच्या संदर्भातही विचार करू शकतो. मी ध्यानधारणा का करायला हवी? हादेखील वॉर्म-अपचा भाग आहे. आपण एखाद्या खेळाचा सराव करत असलो किंवा संगीत वाजवायला शिकत असलो, तर ते खरोखर समजून घेणं व त्याची परत-परत तपासणी करणं अतिशय महत्त्वाचं आहे: “मी हे का करतोय?” आपण केवळ आवडीखातर ते करत असलो, तरीही आपण स्वतःला याबद्दल आठवण करून द्यायला हवी, कारण प्रशिक्षणात अर्थातच बरेच कष्ट घ्यावे लागतात. तर, मला ध्यानधारणेद्वारे एखादी सकारात्मक सवय का लावून घ्यावीशी वाटते, याची पुनरुक्ती करावी. त्यातून मला आयुष्यातील समस्या चांगल्या तऱ्हेने हाताळायला मदत होते, हे त्यामागचं कारण आहे- उदाहरणार्थ, मी सहज संतापत नाही. मी सदासर्वकाळ संतापत असेन, तर मी बहुधा कोणालाच मदत करू शकणार नाही. मी भावनिकदृष्ट्या अस्वस्थ असेन, तर मी कोणाला मदतीचा ठरू शकत नाही.

तर, आपण हे सर्व वॉर्म-अपचे व्यायाम केले, आणि मग प्रत्यक्ष ध्यानधारणा केली: तर इष्ट मनस्थिती निर्माण करण्यासाठी काहीएक विचारांची वाट आपण वापरतो. आपल्या वैयक्तिक जीवनाशी जोडून आपण हे करतो तेव्हा ते अतिशय महत्त्वाचं ठरतं. आपण केवळ अमूर्त सिद्धान्ताचा विचार करत नसतो: मला स्वतःच्या जीवनात मदतीच्या ठरतील अशा पायऱ्यांचा विचार मी करत असतो.

उदाहरण

समजा, आपला एखादा मित्र आपल्याशी अतिशय वाईट पद्धतीने वागला असेल, तो काही निष्ठूर बोलला असेल, त्याने आपल्याला फोन केला नसेल, आपल्याकडे दुर्लक्ष केलं असेल, किंवा लोकांनी आपली थट्टा केली असेल. अशा भयंकर गोष्टी प्रत्येकाच्या बाबतीत घडतात. अशा गोष्टींना प्रतिसाद देताना आपल्याला खरोखरच भयंकर भावना जाणवतात आणि या लोकांबद्दल आपण अतिशय त्रस्त होतो, विशेषतः त्या व्यक्ती आपल्या मित्रांपैकी असतील तर ते अधिक त्रासदायक ठरतं.

ध्यानधारणेमध्ये आपण श्वासावर लक्ष केंद्रित करून अधिक शांतचित्त होतो. मग आपण स्वतःलाच पुन्हा सांगतो की, माझे मित्र, माझे वर्गसोबती: ते माझ्यासारखेच लोक आहेत: त्यांना सुखी व्हायचं आहे, दुःखी व्हायचं नाहीये. त्यांना कशामुळे तरी अस्वस्थ वाटत असणार, त्यामुळे त्यांनी मला असं वाईट पद्धतीने वागवलं किंवा माझ्याबद्दल त्यांचा नुसता गोंधळ झाला असेल- माझे चांगले गुण त्यांना दखलपात्र वाटले नसतील- त्यामुळे त्यांनी माझी थट्टा केली. त्यांच्यावर संतापून आपण निराश झालो, तर त्याचा काही उपयोग नाही. उलट, त्यांना ज्या कशामुळे अस्वस्थ वाटत असेल त्यातून ते मुक्त व्हावेत, जेणेकरून ते मला चांगलं वागवतील, आणि मग मी व ते असे सर्वच सुखी होऊ, अशी इच्छा ठेवायला हवी.

त्यामुळे त्यांच्यावर संतापण्याऐवजी त्यांच्याबद्दल प्रेम व करुणा वाटायला हवी: “त्यांना अस्वस्थ करणाऱ्या गोष्टीपासून ते मुक्त झाले तर खूप चांगलं होईल. ते सुखी होवोत. ते सुखी झाले तर ते वाईट रितीने वागणार नाहीत.” अशा पद्धतीने आपण त्यांच्याबद्दलची प्रेमभावना स्वतःमध्ये निर्माण करतो आणि संताप टाळतो. यातून आपण त्यांच्या परिस्थितीबद्दल अधिक संयमी होतो. आपण शांतपणे कृती केली, प्रेम केलं व क्षमाशीलता ठेवली, तर त्यातून आपल्यालाही शांतचित्त व्हायला मदत होते आणि परिस्थिती हाताळणं सोपं जातं.

इतरांनी आपल्याकडे कचरा फेकला तरी ते व्यक्तीशः लावून न घेणं

बुद्धाने एकदा त्याच्या एका अनुयायाला विचारलं, “एखाद्याने तुला काही द्यायचा प्रयत्न केला, आणि तू ते स्वीकारलं नाहीस, तर ते कुणाचं असतं?” अर्थातच आपण ती वस्तू स्वीकारली नाही तर ती वस्तू देण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीकडेच ती राहते. मग कोणी तुम्हाला वाईट भावना देऊ करत असेल, टीका इत्यादी करत असेल, तर ते न स्वीकारणं व ते व्यक्तीशः लावून न घेणंही महत्त्वाचं असतं. निराळ्या शब्दांत सांगायचं तर, त्या व्यक्तीला अस्वस्थ करणारी अशी ती काही गोष्ट आहे, असं मानावं. कोणी आपल्यावर टीका केली, तर अर्थातच आपण स्वतःची तपासणी करून स्वतःवर काही काम करणं गरजेचं आहे का ते पाहायला हवं. म्हणजे आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत नाही, पण कॅच घेण्यासाठी टपलेल्या खेळाडूप्रमाणे सतत कोणी आपल्याकडे फेकलेला कचऱ्याचा बॉल किंवा खोडकर विचारांचा कॅच घेण्यासाठी सज्ज राहू नये.

काही वेळा आपण तसे वागतो, नाही का? लोक आपल्याकडे कचरा फेकत असतील तर तो गोळा करण्यासाठी आपण उत्सुक असतो- खोडसाळ शब्द असतील, वाईट तऱ्हेने पाहणं असेल, किंवा काहीही असेल. यावरचा उपाय करणं सोपं नसलं, तरी आपण या सर्व गोष्टी व्यक्तीशः लावून घेतल्या जाऊ नयेत असा प्रयत्न करायला हवा. यात मी नाकारला गेलोय असं न मानता त्या दुसऱ्या व्यक्तीची काही समस्या आहे, असं पाहावं. निराळ्या शब्दांत सांगायचं तर, या दुसऱ्या व्यक्तीला भयंकर मानण्याऐवजी असं मानावं: “अरे, तिला काहीतरी अस्वस्थ करत असावं. काहीतरी अडचण असावी.”

आपण दोन-तीन वर्षांच्या मुलाची काळजी घेत असलो, आणि ते बाळ खूप थकलं असेल, तरीही त्याला झोपी जायचं नसेल, तर आपण म्हणतो, “बरं, बाळा, आता झोपायची वेळ झालेय.” मग बाळ म्हणतं, “मला तू आवडत नाहीस!” हे आपण व्यक्तीशः लावून घेतो का? बाळ खूप थकलेलं आहे, आणि आपण त्याने वापरलेले शब्द व्यक्तीशः लावून घ्यायचे नसतात. उलट आपण संयमाने वागून, बाळावर अधिक प्रेम करून त्याला शांत करायचा प्रयत्न करतो.

ध्यानधारणेमध्ये आपण आपल्या समोर समस्या निर्माण करणाऱ्या व्यक्तीबद्दल अधिक रचनात्मक रितीने विचार करू पाहतो, आणि अधिक संयम, अधिक प्रेम, अधिक सकारात्मक मनोवृत्ती ठेवायचा प्रयत्न करतो. आपल्याला प्रत्यक्ष जीवनात अशा गोष्टींना सामोरं जावं लागतं तेव्हा अधिक सक्षम रितीने ते हाताळता यावं, हा त्यामागचा हेतू असतो. थोडक्यात, बोधिचित्ताची ही विलक्षण मनोवस्था गाठण्यासाठी व साधण्यासाठी आपण स्वतःवर काम करतो, त्यातून आपण इतरांना सर्वतोपरी मदत करण्याची जबाबदारी स्वीकारतो, त्यासाठी ध्यानधारणा व इतर पद्धती अवलंबतो, शक्य तितक्या स्वतःच्या उणिवा दूर करायचा प्रयत्न करतो आणि स्वतःचं सामर्थ्य प्राप्त करायचा प्रयत्न करतो. इतरांना सुख मिळावं यासाठी मी मदत करत असेन, तर अर्थातच मी सर्वांत सुखी असेन. पण मी केवळ स्वतःच्या सुखासाठी काम केलं, आणि इतरांकडे दुर्लक्ष केलं, तर आपल्या सर्वांना दुःख भोगावं लागेल.

आता तुम्ही तरुण आहात, विद्यार्थी आहात, अशा वेळी तुमच्या सामर्थ्याचा, तुमच्या क्षमतांचा आदर ठेवण्याची उचित वेळ आहे, आणि तुमच्या सर्वांमध्ये नकारात्मक दिशेऐवजी किंवा दिशाहीनतेऐवजी सकारात्मक दिशेने विकसित होण्याची सामग्री आहे, हे लक्षात घ्यायला हवं. या जगात, या माहितीच्या व समाजमाध्यमांच्या युगात आपण एकटे नाही, आपण सर्व जण जोडलेले आहोत. आणि प्रत्येकावर रचनात्मक पद्धतीने परिणाम करणाऱ्या सकारात्मक मार्गांनी आपण अधिकाधिक विकसित होऊ शकतो.

बोधिचित्ताबद्दल हे थोडं बोललो. आता प्रश्नोत्तरांसाठी आपल्या हाती काही वेळ आहे.

बौद्ध दृष्टिकोनातून प्रेम म्हणजे काय


बौद्ध दृष्टिकोनातून तुम्ही प्रेमाबद्दल आणखी काही सांगू शकाल का, विशेषतः स्त्रीपुरुष संबंधांविषयी?

आपण बौद्ध दृष्टिकोनातील प्रेमाविषयी बोलतो, तेव्हा मी आपल्या चर्चेदरम्यान म्हणालो त्याप्रमाणे, कोणीतरी सुखी व्हावं आणि सुखाची कारणं त्यांना लाभावीत, अशी आपली इच्छा असते. यामध्ये दुसऱ्या व्यक्तीला पूर्णतः स्वीकारलं जातं, त्याच्या सक्षमता व दुर्बलतांसह स्वीकारलं जातं. अशा वेळी ती व्यक्ती मला कसं वागवते किंवा कसं वागते, याचा आणि तिने सुखी व्हावं या माझ्या इच्छेचा संबंध नसतो. काहीही झालं तरी, तिने सुखी राहावं असं मला वाटतं, यासाठी त्यांना काही अवकाश द्यावा लागला तरीही चालेल.

अनेकदा प्रेम व अभिलाषा यांची सरमिसळ केली जाते (आपल्याकडे काहीतरी नसेल आणि ते मिळवायचा आपला हट्ट असेल, तेव्हा त्याला अभिलाषा म्हणतात). त्याची ओढीशी सरमिसळ झालेली असू शकते (आपल्याकडे काहीतरी असेल व ते हातचं जाऊ द्यायचं नसेल, तेव्हा त्याला ओढ म्हणता येतं), आणि हावेशीही सरमिसळ झालेली असणं शक्य आहे (कोणीतरी आपलं मित्र आहे, आपल्यावर प्रेम करतंय, पण आपल्याला त्यांच्याकडून अधिकाधिक हवं असतं, ती हाव). हे सगळं होतं, त्याचं कारण असं की, आपण केवळ त्यांच्या चांगल्या गुणांवर लक्ष केंद्रित करतो व त्याची अतिशयोक्ती करतो, त्याला अधिक महत्त्व देतो, त्या व्यक्तीमधील उणिवांकडे दुर्लक्ष करतो. माझ्याप्रमाणेच काही गुण त्यांच्यात असतील, त्यामुळे त्या व्यक्तीसोबत असताना मला चांगलं वाटतं, ती चांगली दिसते, ती सेक्सी आहे, इत्यादी. अशा वेळी आपण त्या व्यक्तीच्या अतिशय छोट्या भागाकडे पाहत असतो, आपल्याला इतर कशाहीपेक्षा तो भाग महत्त्वाचा वाटत असतो. ही खरी वास्तववादी मनोवृत्ती नाही. यामध्ये ती व्यक्ती मला कसं वागवते यावर सर्व काही अवलंबून असतं: तिने मला चांगलं वागवलं, तर मी तिच्यावर प्रेम करतो; तिने मला चांगलं वागवलं नाही, तर मी तिच्यावर प्रेम करत नाही. हे स्थिर प्रकारचं प्रेम नसतं.

मी म्हणालो त्याप्रमाणे, आपण बौद्ध धर्माबद्दल बोलतो तेव्हा स्थिर प्रकारचं प्रेम म्हणजे आपण संबंधित व्यक्तीची चांगली बाजू व वाईट बाजू या दोन्हींचा स्वीकार करतो, कारण प्रत्येकाचे काही गुण व काही दोष असतात, कोणीच आदर्श वा परिपूर्ण नसतं. आपल्यातील अनेक जण अजूनही परिकथांवर विश्वास ठेवतात, ही समस्या आहे. परिकथांमध्ये एक आकर्षक राजकुमार असतो किंवा आकर्षक राजकुमारी असते, ते घोड्यावर बसलेले असतात, हे सगळं परिपूर्ण असतं. आणि आपण सतत एखाद्या राजकुमाराचा किंवा राजकुमारीचा शोध घेत असतो, आणि आपण ज्यांच्या प्रेमात पडतो त्यांच्यावर हे कल्पित राजकुमार किंवा राजकुमारी असणं लादतो. पण दुर्दैवाने ही केवळ एक परिकथा आहे, फादर ख्रिसमसप्रमाणेच ते वास्तवातील कशाचा निर्देश करणारं नाही.

हे लक्षात आल्याने काही सुखद वाटत नाही; याचा स्वीकार करणं खूप अवघड असतं. आणि आपण कधी हार मानू नये: “ही व्यक्ती राजकुमार किंवा राजकुमारी नाहीये, पण कदाचित पुढची व्यक्ती असेल.” आपण अशा कल्पित प्रतिमा लादत राहू आणि पांढऱ्या घोड्यावरील राजकुमारी अथवा राजकुमाराचा शोध घेत राहू, तोपर्यंत आपले इतरांसोबतचे संबंध, आपले प्रेमसंबंध अडचणीत येणारच, कारण कोणीच परिपूर्ण जोडीदाराचा आदर्श ठरणं शक्य नाही. ते राजकुमारासारखं किंवा राजकुमारीसारखं वागत नसतील तर आपण संतापतो. म्हणजे ते आपल्यासारखेच माणूस आहेत, त्यांचेही काही गुण-दोष आहेत, हे वास्तव आपण स्वीकारत नाही. तर, खरं प्रेम, स्थिर प्रेम, हे दुसऱ्या व्यक्तीचं वास्तव स्वीकारण्यावर आधारलेलं असतं.

आपण प्रेमात पडतो त्या व्यक्तीसंदर्भातील वास्तवाचा दुसरा एक पैलू असा असतो की, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये केवळ आपणच एकमेव नाही. त्या व्यक्तीचं आपल्या पलीकडचं जगणं आहे- तिचे मित्रमैत्रिणी आहेत, तिचं कुटुंब आहे, तिच्या इतर काही जबाबदाऱ्या आहेत. या इतर गोष्टीही तिच्या जीवनाचा भाग आहेत; केवळ मी एकमेव भाग नव्हे. त्यामुळे ती व्यक्ती इतर लोकांसोबत, तिच्या जीवनातील इतर गोष्टींमध्ये वेळ घालवत असेल, तेव्हा आपल्याला मत्सर वाटणं किंवा आपण नाराज होणं वाजवी नाही. आणि, उदाहरणार्थ, ती व्यक्ती बिघडलेल्या मनस्थितीत असेल, किंवा आपल्यासोबत असावंसं तिला वाटत नसेल, तेव्हा ते केवळ माझ्यामुळे नसतं. त्या व्यक्तीला जे काही वाटतं किंवा ती जे काही करते, त्या सगळ्याचं कारण केवळ मी नसतो. त्या व्यक्तीची मनस्थिती बिघडलेली असेल, तर त्याला तिच्या कुटुंबातील काही घडामोडी कारणीभूत असू शकतात; तिच्या मित्रमैत्रिणींमुळेही ती नाराज असू शकते; किंवा आजारी असू शकते, तिला बरं वाटत नसल्यामुळेही तिची मनस्थिती बिघडलेली असू शकते. त्या व्यक्तीला जे काही वाटतंय त्या सगळ्याचं कारण मीच आहे, असं मी का मानावं?

त्याचप्रमाणे या व्यक्तीशी माझे दीर्घकाळापासून संबंध असतील, तर आमच्या दैनंदिन अन्योन्यक्रीडेमध्ये अनेकानेक गोष्टी घडतात. अनेकदा असं होतं की, “तिने मला आज फोन केला नाही. आज तिने माझ्या टेक्स्ट मेसेजला उत्तर दिलं नाही,” आणि मग आपण या एका घटनेला अवाजवी महत्त्व देतो, आपल्या सर्व संबंधाचा दीर्घकालीन संदर्भ आपण पाहत नाही. अशा एका घटनेमुळे आपण निष्कर्ष काढतो की, आता तिला मी आवडत नाही. पण हे खूपच लघुदृष्टीचं उदाहरण आहे- केवळ एका गोष्टीकडे पाहायचं आणि संपूर्ण नातेसंबंधातून ती घटना वेगळी काढून पाहायची.

प्रत्येकाचं जीवन, मनस्थिती इत्यादी वर-खाली होत असतं, हे वास्तव आहे. आपल्याबाबतीतही हेच खरं आहे; प्रत्येकाच्या बाबतीत हे खरं असतं. त्यामुळे मी ज्या व्यक्तीवर प्रेम करतो तिला कधीकधी माझ्या सोबत असावंसं वाटणं आणि कधीकधी माझ्यासोबत असावंसं न वाटणं, हे दोन्ही स्वाभाविक आहे. काही वेळा तिची मनस्थिती चांगली असेल; काही वेळा तिची मनस्थिती बिघडलेली असेल- किंवा ती इतर गोष्टींमध्ये खूप व्यग्र असल्यामुळे माझ्या टेक्स्ट-मेसेजना उत्तर देऊ शकली नसेल- किंवा काहीही असेल, तरी तिचं आता माझ्यावर प्रेम नाही, असा त्याचा आपोआप अर्थ होत नाही.

आपल्याला आपले प्रेमसंबंध स्थिर करायचे असतील या काही गोष्टी शिकणं व समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. अन्यथा खूप भावनिक कोलाहल होतो.

एका महान बौद्ध गुरूंनी एक अतिशय चांगलं उदाहरण दिलं आहे- आपले इतरांसोबतचे संबंध हे शरदामध्ये झाडापासून विलग होत वाऱ्यावर उडणाऱ्या पानांसारखे असतात. काही वेळा ही पानं वाऱ्यासोबत पूर्णच उडून जातात, काही वेळा खाली पसरतात. हा जीवनाचा भाग आहे. आपल्या कोणाही सोबतच्या संबंधांमध्ये असंच असतं- कदाचित ते आपल्या संपूर्ण जीवनभर सुरू राहील, कदाचित राहणार नाही.

इतर लोकांकडे आपल्या खिडकीत आलेल्या मुक्त पक्ष्याप्रमाणे पाहण्याचा प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. एखादा सुंदर मुक्त पक्षी आपल्या खिडकीत येतो, तो खूप सुंदर दिसत असतो. माझ्या समोर काही क्षण हा सुंदर, सुखी पक्षी असल्याचं किती चांगलं वाटतं. पण हा पक्षी अर्थातच उडून जाणार आहे: तो पक्षी मुक्त आहे. आणि हा पक्षी पुन्हा माझ्या खिडकीपाशी आला, तर ते किती चांगलं होईल, मी किती सुदैवी असेन. पण मी त्या पक्ष्याला पकडून पिंजऱ्यात ठेवण्याचा प्रयत्न केला, तर तो पक्षी दुःखी होईल व कदाचित मरूनही जाईल.

आपल्या जीवनात येणाऱ्या व्यक्तींबाबत आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्याबाबतही असंच असतं. ते सुंदर मुक्त पक्ष्यासारखे असतात. ते आपल्या जीवनात येतात, खूप आनंद व सुख घेऊन येतात. पण ते मुक्त असतात, मुक्त पक्ष्यासारखे असतात. आपण त्यांच्यावर झडप घालायचा प्रयत्न केला किंवा आपल्या ताब्यात ठेवायचा प्रयत्न केला, सतत त्यांच्यामागे भुणभुण लावली- “तू मला फोन का केला नाहीस? तू मला भेटायला का आली नाहीस? तू माझ्यासोबत आणखी वेळ का घालवत नाही?”, तर ते मुक्त पक्ष्याला पिंजऱ्यात घालण्यासारखं होईल. मुक्त पक्षी शक्यतोवर पळून जायचा प्रयत्न करेल. आणि तरीही तो पक्षी आपल्यासोबत राहिला, तर आपल्या सोबत अपराधभावाने राहणाऱ्या व्यक्तीप्रमाणे तो अतिशय दुःखीच होऊन जाईल.

हे खूप, खूप उपयुक्त विचार आहेत- आपण ज्या व्यक्तीच्या प्रेमात पडतो, जी व्यक्ती आपल्या आयुष्यात येते, तिला मुक्त पक्षी मानावं. आपण याबाबतीत जितके अधिक निवांत असू, किंवा संबंधित व्यक्तीवर ताबा ठेवायचा जितका कमीतकमी प्रयत्न करू- तितका तो मुक्त पक्षी आनंदाने आपल्या खिडकीत येत राहील.

Top