सरकाँग रिंपोछे यांच्यासोबत प्रशिक्षण

सरकाँग रिंपोछे यांच्याशी झालेली माझी पहिली भेट आणि त्यांनी दिलेला प्रारंभिक सल्ला

मी जानेवारी १९७०मध्ये बोधगयेत सरकाँग रिंपोछे यांना पहिल्यांदा भेटलो. अमेरिकेत गेशे वांग्याल यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्रजी शिकलेल्या शर्पा व खामलंग रिंपोछे या दोन तरुण पुनर्जन्मित लामांनी मला सरकाँग रिंपोछे यांच्याविषयी शिफारस केली होती. गुह्यसमाज (लपलेल्या घटकांचा समूह) शिकण्यासाठी सर्वांत योग्य अध्यापकाकडे पाठवण्याचं काम सरकाँग रिंपोछे करू शकतील. या गूढ मुख्य संहितेतील एका छोट्या भागाच्या संस्कृत व तिबेटी आवृत्त्यांची तुलना पदवीकाळातील एका परिसंवादामध्ये मी केली आणि त्यानंतर पीएच.डी.च्या प्रबंधासाठी मी या व्यामिश्र तंत्र-पद्धतीची निवड केली.

माझ्या भाषिक अभ्यासामध्येदेखील अशा प्रगत अभ्यासासाठी माझी तयारी झालेली नव्हती, तरीही सरकाँग रिंपोछे यांनी मला गांभीर्याने घेतलं. ग्युतो, उच्च तांत्रिक महाविद्यालय, इथले निवृत्त मठाधिपती केन्झूर येशे डॉनड्रब यांचं नाव त्यांनी सुचवलं. डॉनड्रब अनेक वर्षांनी गेलुग परंपरेचे प्रमुख झाले. रिंपोछे यांनी अशा प्रख्यात गुरूची निवड केल्याबद्दल मला माझा सन्मान झाल्यासारखं वाटलं.

गेशे न्गवांग धारग्ये यांच्यासोबत डलहौसीमध्ये केलेला अभ्यास

अनेक महिन्यांनी मी त्या मठाधिपतींना शेणामातीने बनवलेल्या त्यांच्या लहानशा खोपट्यात भेटलो. पर्वताळ भागात धरमशालेजवळ उंचावर डलहौसी या गावामध्ये ते राहत असत, ग्युटो मठही तिथेच होता आणि मीही तिथेच स्थायिक झालो होतो. या निगर्वी वृद्ध भिक्खूने नुकतीच सलग दोनदा तीन वर्षं साधना केली होती. मला शिकवण्याविषयी मी त्यांना विनंती केली, तेव्हा त्यांनी तत्काळ संमती दिली. मी योग्य वेळी आलो आहे, असं ते मला म्हणाले. दुसऱ्याच दिवशी ते गुह्यसमाज पद्धतीवर तीन वर्षांचं चिंतन सुरू करणार होते. मी त्यांच्या सोबत जायला तयार होतो का? मला अर्थातच तो प्रस्ताव नाकारावा लागला, पण रिंपोछे यांनी अभिजात बौद्ध पद्धतीने दिलेला धडा मात्र मी शिकलो. माझं मलाच सत्य कळेल अशा रितीने रिंपोछेंनी परिस्थिती निर्माण केली. या सर्वाधिक प्रगत तंत्राचा अभ्यास व आचरण करण्यासाठी मला सुरुवातीपासून तयारी करणं गरजेचं होतं. 

मी लवकरच माझ्या प्रबंधाचा विषय बदलून थोडा मध्यम पातळीवर आणला: लाम-रीम, अर्थात श्रेणीबद्ध मार्गाची मौखिक परंपरा हा विषय मी घेतला आणि शर्पा व खामलुंग रिंपोछे यांचे शिक्षक गेशे न्गवांग धारग्ये यांच्याकडून प्राथमिक अभ्यास शिकण्याची तजवीज केली. गेशे ही मठवासीयांसाठीची पदवी असून ती पीएच.डी.च्या समकक्ष मानली जाते. गेशे धारग्ये यांच्याकडील विद्वान अध्यापकाच्या कौशल्यामुळे त्यांना पाच किशोरवयीन पुनर्जन्मित लामांसाठी शिक्षक म्हणून स्थान मिळालं. त्या वेळी गेशे धारग्ये एका गायींच्या गोठ्याचा वापर घर म्हणून करत होते, तिथे माशा घोंगावत असत. हे खोपटं इतकं लहान होतं की तिथे फक्त त्यांचा पलंग तेवढाच राहत होता, त्या व्यतिरिक्त तीन लोकांना जमिनीवर बसायला जागा होती. ते राहत होते त्या परिस्थितीचा मला तिटकारा वाटला, तरीही मी अभ्यासाला लागलो. मला आधुनिक बोली तिबेटी भाषाही शिकावी लागली. हार्वर्डमध्ये मी केवळ अभिजात लेखी भाषा शिकलो होतो.

त्यानंतर पुढच्या वर्षी जून महिन्यात मी सरकाँग यांना भेटलो. भयंकर पटकी व विषमज्वराच्या साथीमुळे हा प्रदेश जर्जर झाला होता आणि परम पूज्य लामांनी रिंपोछेंना डलहौसी इथे येऊन हयग्रिव अधिकार बहाल करावेत अशी विनंती केली. या ताकदीच्या बौद्ध प्रतिमेचं आचरण करून सोबत स्वच्छता राखली तर लोकांना संसर्ग टाळता येतो. ही दीक्षा मिळणाऱ्या मोजक्या पाश्चात्त्यांमध्ये माझा समावेश असला, तरी रिंपोछे यांना खाजगीत भेटण्याची कोणतीही संधी मला मिळाली नाही. त्यांना इतर ठिकाणीही दीक्षा द्यायची होती, त्यामुळे ते लगेचच डलहौसीमधून बाहेर पडले. 

विद्यापीठात प्राध्यापक व्हायचं नाकारून धरमशाला इथे येणं

आम्ही परत भेटलो तोवर बरेच बदल झाले होते. १९७१च्या शरद ऋतूमध्ये परम पूज्य लामांनी गेशे धारग्ये यांना धमरशालेतील नव्याने बांधलेल्या ‘लायब्ररी ऑफ तिबेटन वर्क्स अँड अर्काइव्ह्ज’ इथे परदेशी लोकांना बौद्ध धर्म शिकवण्यास सांगितलं. शर्मा व खमलुंग रिंपोछे दुभाषी म्हणून काम पाहू लागले. मीही ग्रंथालयाच्या सेवेत राहून संहिता भाषांतरित करू शकतो का, असं मी विचारलं. त्यावर, परम पूज्य लामांनी संमती दिली. पण पहिल्यांदा मी माझा प्रबंध सादर करायला हवा, डॉक्टरेट मिळवायला हवी आणि मग परत यायला हवं. त्या वेळी जेमतेम शंभर मैलांवर पाकिस्तानसोबत सीमायुद्धाला तोंड फुटलं होतं, त्यामुळे मी विनाविलंब परतावं यासाठी त्यांनी माझं मन वळवलं. मी हार्वर्डला परतलो आणि परम पूज्य लामांच्या सल्ल्यानुसार वागलो. काही महिन्यांनी मी विद्यापीठातील अध्यापनाच्या कारकीर्दीला नम्र नकार दिला- यामुळे माझ्या प्राध्यापकांना आश्चर्यही वाटलं- आणि सप्टेंबर १९७२मध्ये मी धरमशाला इथे आलो.

रिंपोछे यांचा शिष्य होताना

नेपाळमध्ये काही नव्याने बांधलेल्या मठांना अधिकार बहाल करण्यासाठी व मौखिक दीक्षा देण्यासाठी सरकाँग रिंपोछे यांनी दोन वर्षं तिकडे घालवली. १९७४च्या शरद ऋतूमध्ये ते धरमशाला इथे परतले, तेव्हा मला थेट त्यांच्याशी संवाद साधता येईल इतपत पुरेशी तिबेटी भाषा बोलता येऊ लागली होती. त्यांचा भाषांतरकर म्हणून जोडलं जाणं हे माझं कर्मजन्य नातं होतं, हे रिंपोछे यांना माहीत असावं. पहिल्यांदा मला हे लक्षात आलं नव्हतं. पण मला त्यांनी जास्त वेळा भेटीसाठी यायला प्रोत्साहित करून हे सुचवलं. ते विविध लोकांना भेटत असताना मला शेजारी बसवून घेत. त्यांच्या भेटींच्या मधल्या वेळात ते माझ्याशी बोलत आणि मला संभाषण कळल्याची खातरजमा करण्यासाठी तिबेटी भाषेतील विविध शब्द स्पष्ट करून सांगत.

थोड्या वेळाने रिंपोछे यांनी मला तीन विलक्षण गुंडाळी-चित्रांचा संच भेट दिला. स्पितीमधील लोकांनी त्यांना दिलेली ही चित्रं श्वेत मंजुश्री, श्वेत सरस्वती व श्वेत तारा यांची होती. अगदी बालपणापासून त्यांच्या वैयक्तिक विकासामध्ये व साधनेमध्ये या बुद्ध-प्रतिमा मध्यवर्ती राहिलेल्या होत्या. अनुक्रमे इतरांना मदत करण्यासाठी मनाची स्पष्टता, प्रवाही व सर्जनशील वाङ्मयी अभिव्यक्तीसाठी उत्तम मर्मदृष्टी, आणि दीर्घ व उत्पादक जीवनासाठी मौलिक ऊर्जा, यांची ही मूर्त रूपं आहेत. या खोलवर जाणाऱ्या भेटवस्तूने आमच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं. मी आपला शिष्य होऊ शकतो का, असं मी रिंपोछेंना विचारलं, तेव्हा त्यांनी माझ्याकडे शांतपणे पाहून स्मित केलं- उघड आविष्कृत होणाऱ्या गोष्टीला शब्दांत मांडण्याची माझी गरज खास पाश्चात्त्य सवयीतून आलेली होती, हे त्यांच्या स्मितामधून सूचित झालं.

भाषांतरकार व शिक्षक होण्यासाठी मला मिळालेलं प्रशिक्षण

त्यानंतर रिंपोछेंनी मला पद्धतशीररित्या भाषांतरकाराचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. ते असं करत असल्याचं कधी त्यांनी शब्दांत नमूद केलं नाही. पहिल्यांदा त्यांनी माझ्या स्मृतीवर काम केलं. मी त्यांना भेटायला जायचो तेव्हा अनपेक्षितपणे ते मला नुकत्याच त्यांच्या बोलण्यात आलेल्या शब्दाचा पुनरुच्चार करायला सांगायचे. त्याचप्रमाणे मी नुकतंच काय बोललो त्याचा पुनरुच्चारही ते करायला सांगायचे. १९७५च्या शरद ऋतूमध्ये मी त्यांच्यासाठी दुभाषा म्हणून काम सुरू केल्यानंतर ते मला अनेकदा त्यांचे शब्द तिबेटी भाषेत पुन्हा भाषांतरित करायला सांगायचे, जेणेकरून कोणत्याही चुका राहू नयेत, भर घातली जाऊ नये किंवा काही वगळलं जाऊ नये. किंबहुना, मी त्यांचा दुभाषी म्हणून काम केलं त्या आठ वर्षांच्या कालावधीमध्ये जेव्हा-जेव्हा ते मला अशा रितीने परत भाषांतरित करायला सांगायचे तेव्हा प्रत्येक वेळी मी त्यांचं म्हणणं आधी चुकीचं समजून घेतलेलं असायचं. मी चूक केल्याचं रिंपोछेंना नेहमी कळत असावं.

त्यानंतर रिंपोछे यांनी सत्राच्या अखेरीला त्यांच्या शिकवणीचे पाच मिनिटांचे सारांश द्यायला सुरुवात केली आणि आता सारांश करायची पाळी माझी आहे असं ते मला सांगत असत. अशा प्रकारे त्यांनी अतिशय दीर्घ भाषणांचं भाषांतर करायचं प्रशिक्षण मला द्यायला सुरुवात केली, एवढंच नव्हे तर शिकवायलाही सुरुवात केली. काही वेळा मी सारांश काढत असताना ते त्यांच्या सहकाऱ्यांशी गप्पाही मारायचे, यातून माझ्या एकाग्रता क्षमतेला आव्हान मिळायचं. बाहेरच्या गोंधळाने चांगल्या शिक्षकाने विचलित किंवा उत्तेजित होता कामा नये.

माझ्या स्मृतीचं प्रशिक्षण

रिंपोछे मला खाजगीत शिकवत होते, तेव्हा ते कधीही मला टिपणं काढू द्यायचे नाहीत. मला सगळं लक्षात ठेवून नंतर लिहून काढावं लागायचं. लवकरच रिंपोछेंनी मला माझे धडे घेतल्यानंतर करायची असंख्य कामं दिली, जेणेकरून मला खूप वेळाने, रात्रीच माझी टिपणं लिहावी लागतील. काही वेळा मी एखाद्या शिकवणुकीचं भाषांतर करत असताना मधेच रिंपोछे थांबायचे आणि पूर्णतः वेगळ्या विषयावरील माझ्या धड्याबद्दल मला खाजगीत स्पष्टीकरण द्यायचे. त्यानंतर त्यांच्या शब्दांवर विचार करायला किंवा लिहायला मला क्षणभराचीही फुरसत न देता ते त्यांची मूळ शिकवण सुरू करत.

मला आधी त्यांनी सांगितलेल्या कशाबद्ल मी रिंपोछेंना प्रश्न विचारला, तर स्मरणशक्तीचा अभाव असल्याबद्दल माझी जोरदार खरडपट्टी काढली जायची. एकदा मी त्यांना एका संज्ञेचा अर्थ विचारला, त्यावर रिंपोछे धारदारपणे म्हणाले, “सात वर्षांपूर्वी मी तुम्हाला या शब्दाचं स्पष्टीकरण सांगितलं होतं! मला हे स्पष्टपणे आठवतंय. तुम्हाला का आठवत नाही?” किंबहुना ते जितके वृद्ध होतायंत, तितकं त्यांचं मन अधिकाधिक स्पष्ट होतंय, अशी टिप्पणी त्यांनी एकदा माझ्याशी बोलताना केली होती.

अधिक अचूक भाषांतरित संज्ञा शोधण्यासाठी माझ्यासोबत काम करणं

केवळ माझी चांगली स्मृती विकसित करण्यामध्येच नव्हे, तर माझं भाषांतर अचूक व्हावं, यामध्येही सरकाँग रिंपोछे यांना रस होता. पाश्चात्त्यांना शिकवण्याच्या त्यांच्या अनुभवामधून त्यांना लक्षात आलं होतं की, विशिष्ट तांत्रिक संज्ञांच्या दिशाभूल करणाऱ्या भाषांतरांमुळे पाश्चात्त्यांची बरीचशी गैरसमजूत होते. परिणामी, इंग्रजीमध्ये नवीन संज्ञावली विकसित करण्यासाठी त्यांनी माझ्यासोबत काम केलं. प्रत्येक तिबेटी संज्ञेच्या अर्थछटा ते संयमाने स्पष्ट करून सांगत आणि अर्थ जुळवण्यासाठी इंग्रजीतील संभाव्य समकक्ष संज्ञा कोणती आहे असं विचारत. नवीन संज्ञांबाबत प्रयोग करायला त्यांनी मला कायमच प्रोत्साहन दिलं आणि अपुऱ्या संकेतांचा गुलाम होऊ नये असं सांगितलं. संस्कृतमधून बौद्ध संहितांचं भाषांतर करण्यासाठी वापरली जाणारी प्रमाणित तिबेटी संज्ञावली काही शतकांच्या काळामध्ये टप्प्याटप्प्याने उत्क्रांत झाली. पाश्चात्त्य भाषांमध्ये भाषांतर करतानाही अशी सुधारणेची प्रक्रिया पार पडणं स्वाभाविकच आहे.

मला सामाजिक कौशल्यं व नम्रता शिकवणं

मला शिष्य म्हणून स्वीकारावं अशी विनंती मी रिंपोछेंना सुरुवातीला केली, तेव्हा इतरांना करुणेने व शहाणीव राखून मदत कशी करावी, याचे कुशल मार्ग मला शिकवावेत, असं मी म्हटलं होतं. उच्चभ्रू अकादमिक पार्श्वभूमीतून- त्यात मी कायमच उत्कृष्ट राहिलो होतो- आल्यामुळे माझा वैयक्तिक विकास एकांगी झाला होता. मला सामाजिक कौशल्यं व नम्रता शिकणं गरजेचं होतं. परिणामी रिंपोछे मला केवळ ‘डमी’ या एकमेव नावाने हाक मारत आणि मी जे काही मूर्खासारखं किंवा चुकीचं बोलेन किंवा करेन ते सातत्याने दाखवून देत. उदाहरणार्थ, मी भाषांतर करत असेन तेव्हा मला मूळ म्हणणं पूर्णतः समजलेलं असावं असा रिंपोछेंचा आग्रह असायचा. माझी चूक झाली तर ते मला मूर्ख म्हणत, मग त्यामध्ये कितीही वेळ जावो किंवा मला कितीही शरमल्यासारखं वाटो. माझी समजूत पटल्याशिवाय आणि मी संबंधित मुद्द्याचं अचूक भाषांतर करेपर्यंत ते दुसरं काहीही बोलत नसत. आत्मविश्वासाच्या अभावाने ग्रस्त असलेल्या विद्यार्थ्यांबाबत अशा पद्धती अयोग्य ठरतील, पण त्यांची ही तडजोड न करण्याची भूमिका मला अगदी पूर्णपणे सुसंगत ठरली. 

एकदा फ्रान्समधील लावूर इथे रिंपोछेंनी एका गुंतागुंतीच्या संहितेवरील भाष्याबाबत मला प्रवचन दिलं. मी भाषांतर करायला बसलो, तेव्हा या भाष्याच्या विविध आवृत्त्यांची तुलना करावी आणि भाषांतर करत असताना संहिता संपादित करावी, अशी सूचना रिंपोछेंनी मला केली. माझ्याकडे पेन नव्हतं, पण माझ्या थेट समोर एक महिला बसलेली होती, तिच्या केसांना उत्कृष्ट लाल रंग लावलेला होता, तिने लालभडक लिपस्टिक लावलेली होती आणि शिकवण दिली जात असताना पूर्ण वेळ तिने दातांत लाल गुलाब धरलेला होता. कोणाकडे एखादं जास्तीचं पेन असेल तर मला मिळेल का, असं मी विचारलं तेव्हा तिने तिच्याकडचं पेन मला देऊ केलं. सत्राच्या शेवटी, मला पूर्ण थकायला झालं होतं. मी उभा राहिलो, तेव्हा त्या महिलेने एकही शब्द न बोलता तिचा हात पुढे केला. मी माझ्याच विचारांमध्ये मग्न होतो आणि माझं काम चांगलं झाल्याबद्दल ती माझं अभिनंदन करू पाहत होती. मीही माझा हात पुढे केला, तेव्हा रिंपोछेंनी गर्जना केली, “डमी, तिचं पेन परत दे!”

स्तुतीची कोणतीही इच्छा न राखता, इतरांना मदत करण्याबाबतच आस्था राखण्यासाठी मला दिलेलं प्रशिक्षण

माझा आत्मकेंद्रीपणा कमी करण्यासाठी रिंपोछेंनी मला केवळ इतरांसाठी गोष्टी करायला शिकवलं. मी स्वतःसाठी विनंती केलेली कोणतीही शिकवण किंवा अधिकार मला न देता त्यांनी हे केलं. इतर कोणी विनंती केली आणि मी भाषांतरकार असेन, तरच ते याला संमती देत. मी ज्या गोष्टी शिकणं महत्त्वाचं आहे, असं त्यांना वाटत होतं त्याच गोष्टी त्यांनी मला व्यक्तिगतरित्या शिकवल्या.

शिवाय, रिंपोछेंनी समोरासमोर माझी कधीही स्तुती केली नाही, पण ते माझी खरडपट्टी मात्र नेहमी काढत असत. विशेषतः इतरांसमोर ते असं करत, जेणेकरून टीका व दबाव यांनी मी डळमळून जाऊ नये. किंबहुना, मी मदत केल्याबद्दल रिंपोछेंनी केवळ एकदाच माझे आभार मानल्याचं मला आठवतं. आम्ही पहिल्यांचा पश्चिमेतील राष्ट्रांचा एकत्र दौरा केला तेव्हा तो दौरा संपल्यानंतर त्यांनी आभार मानले होते. तर, अशा भावनिकदृष्ट्या ताकदीच्या मार्गाने रिंपोछे यांनी मला केवळ इतरांच्या लाभाची इच्छा कशी ठेवायची याचं प्रशिक्षण दिलं. माझ्या शिक्षकाकडून माझी स्तुती व्हावी किंवा मी शिक्षकाला खूश करावं, अशी इच्छा राखू नये असं सांगितलं. त्यांनी आभार मानावेत यासाठी वाट पाहणं म्हणजे एखाद्या कुत्र्याने डोक्यावर थोपटलं जावं यासाठी वाट पाहण्यासारखं असायचं. त्यांच्याकडून अशी काही प्रशस्ती मिळेल अशी अपेक्षा करणं मी लवकरच थांबवलं. त्यांनी माझी स्तुती केली तरीही मी शेपटी हलवण्यापलीकडे दुसरं काय करू शकत होतो!

तिबेटी भाषेतील महान संहिता स्वतःच वाचण्यासाठी मला प्रोत्साहित करणं

महान धर्मशास्त्रीय संहिता प्रत्येकाने स्वतः वाचाव्यात, यासाठी रिंपोछे कायम प्रोत्साहन देत. कोणालाही काही शंका किंवा प्रश्न असतील, तेव्हा रिंपोछे त्या व्यक्तीला स्वतः संहितेमध्ये पाहून तपासायला सांगत. या शिकवणी त्यांनी तयार केलेल्या नाहीत, पण त्या वैध स्त्रोतांमधून आलेल्या आहेत, असं स्पष्टीकरण ते देत असत. लामा आपल्याला सर्व काही शिकवतील अशी अपेक्षा कोणीही करू नये, असं रिंपोछे म्हणत. शिवाय, पुढील दोनेकशे वर्षं तरी बुद्धाची संपूर्ण शिकवण केवळ तिबेटी भाषेतच उपलब्ध असेल, या परम पूज्य लामांच्या विधानाची पुनरुक्ती ते पाश्चात्त्यांसाठी करत असत. तिबेटी भाषेतील प्रत्येक अक्षर अर्थपूर्ण आहे, असं ते म्हणत. त्यामुळे रिंपोछे शिकवत असताना तिबेटी तांत्रिक संज्ञांच्या अर्थछटा उकलून दाखवत असत.

या दृष्टिकोनानुसार रिंपोछेंनी मला संहिता वाचून माझा अभ्यास सुरू ठेवायला लावला आणि मला त्या संदर्भात काहीही प्रश्न पडले तर ते विचारायची मुभा होती. या मार्गाने पुढे गेल्यास अखेरीस शिष्यांना बौद्धवाङ्मयाचा कुठेही अभ्यास करता येईल- म्हणजे समुद्रात पोहताना किंवा हवेत उडतानाही ते शक्य होईल. शिष्यांनी स्वतःच्या दोन पायांवर उभं राहावं आणि नंतर उडावं, हे शिकवण्यासाठी लामा असतात, असं ते स्पष्ट करत असत. काय अभ्यास करावा आणि काय वाचावं, यासाठीचं मार्गदर्शन आपण करू, असं ते म्हणत. अशा प्रकारे आपल्या शिष्यांनी घरट्यातून बाहेर पडून स्वतःहून विहरावं, यासाठी ते प्रयत्न करत.

त्यांच्यावर मी विसंबून राहू नये यासाठी दिलेलं प्रशिक्षण

मी कोणत्याही प्रकारे त्यांच्यावर विसंबून राहू नये यासाठी रिंपोछेंनी शिकवण्याच्या अनेक पद्धती वापरल्या. उदाहरणार्थ, रिंपोछे व माझे अत्यंत जवळचे संबंध असले, तरी सर्व परिस्थितीत ते माझी मदत करू शकतील असा बहाणा त्यांनी कधीही केला नाही. एकदा मी बराच आजारी होतो तेव्हाही कोणाच्याच मदतीशिवाय स्वतःची औषधं स्वतः घेत होतो. कोणत्या औषधपद्धतीवर- पाश्चात्त्य, तिबेटी किंवा भारतीय- आणि कोणत्याही डॉक्टरावर विश्वास ठेवणं चांगलं, याबद्दलचा अंदाज मी रिंपोछेंना विचारला, तर या क्षणी आपल्याला स्पष्ट अंदाज बांधता येत नसल्याचं सांगून त्यांनी मला दुसऱ्या एका लामांकडे पाठवलं आणि या लामांनी मला अधिक परिणामकारक उपचारांच्या शोधासाठी मदत केली. लवकरच मी बरा झालो.

परम पूज्य दलाई लामांच्या उक्तीचं भाषांतर करण्यासाठी माझी तयारी

परम पूज्य दलाई लामांच्या उक्तीचं भाषांतर करण्यासाठी रिंपोछे मला प्रशिक्षण देत आहेत, हे अनेक वर्षांनी माझ्या लक्षात आलं. किंबहुना, दलाई लामांना देण्यासाठी भेटवस्तूप्रमाणे मला रिंपोछे तयार करत आहेत की काय, असंही मला काही वेळा वाटलं. परंतु, योग्य सेवा करण्यासाठी मी परम पूज्य लामांशी अनुबंध निर्माण करायला नकोत किंवा त्यांच्यावर अवलंबून राहायला नको. परम पूज्य लामा त्यांच्या भाषांतराच्या गरजांच्या सोयीनुसार निवडतील अशा अनेक गोल्फ-क्लबांपैकी मी एक असणार होतो. मलाही प्रचंड तणावाला सामोरं जात स्वतःच्या अहंकारावर मात करावी लागणार होती.

त्यामुळे दलाई लामांची सेवा करताना योग्यरित्या कसं वागायचं याचं शिक्षण रिंपोछेंनी मला दिलं. उदाहरणार्थ, परम पूज्य लामांचे भाषांतरकार कधीही नृत्य करत असल्याप्रमाणे हातवारे करत नाहीत किंवा प्राणिसंग्रहालयात असल्याप्रमाणे त्यांच्याकडे रोखून पाहत नाहीत. तर, हे भाषांतरकार डोकं खाली करून पूर्णतः एकाग्र राहतात आणि स्वतःच्या व्यक्तिमत्त्वांमधलं काहीही भाषांतरात येणार नाही याची काळजी घेतात. परम पूज्य लामा उल्लेख करतील त्यानुसार भाषांतरकारांनी लोकांची व मुद्द्यांची नोंद ठेवायची असते, त्यात काहीही बदल करायचा नसतो किंवा परम पूज्य लामा म्हणतील त्याला काही अर्थ वा उद्देश नाही असा विचारही भाषांतरकाराने करायचा नसतो.

लामांच्या उपाधींचं अचूक भाषांतर करावं, परम पूज्य दलाई लामा या उपाधींचा वापर जसा करतात तसाच वापर भाषांतरकारांनी करावा. परदेशी लोक जवळपास प्रत्येक लामाला ‘परम पूज्य’ (हिज होलिनेस) म्हणतात, तसं होऊ नये. अजाणपणातून आलेल्या या पाश्चात्त्य रूढीमुळे इतर लामांचा सन्मान होण्याऐवजी दलाई लामांचं अवमूल्यन होतं. परदेशी लोक दलाई लामांच्याच सन्माननीय उपाधींनी आपला उल्लेख करत असल्याचं कळलं तर हे लामा भयंकर धास्तावतील. कॅथलिक चर्च व राजनैतिक विभागांप्रमाणे तिबेटी शिष्टाचार व उपाधींचा श्रेणीबद्ध वापर काटेकोर नियमांनुसार व्हायला हवा.

मी परम पूज्य दलाई लामांसाठी भाषांतर करत असेन, तेव्हा अनेकदा सरकाँग रिंपोछे माझ्या समोर बसलेले असत. त्यांच्याकडे पाहिल्याने मला त्यांनी दिलेलं प्रशिक्षण लक्षात ठेवणं सोपं झालं. उदाहरणार्थ, एकदा धरमशालेत काही शेकडा पाश्चात्त्य शिष्य व हजारो तिबेटी शिष्यं समोर असताना मी भाषांतर करत होतो, तेव्हा परम पूज्य दलाई लामांनी मला थांबवलं आणि हसत त्यांनी गर्जना केली, “आत्ताच यांनी एक चूक केली!” परम पूज्य दलाई लामांना इंग्रजी अगदी पक्कं कळतं. त्या वेळी मला मुंगीसारखं स्वतःला चटईच्या खाली रांगत जावंसं वाटलं, पण माझ्या दृष्टीसमोर रिंपोछे बसलेले होते, त्यामुळे ’डमी’ला स्वतःला मानसिक समतोलपणा टिकवता आला.

माझं मूर्ख वर्तन दुरुस्त करण्यासाठी सक्षम पद्धतींचा वापर

काही वेळा मला माझ्या धड्यांची ठोसपणे आठवण करून देणं गरजेचं असायचं. उदाहरणार्थ, सुरुवातीच्या काळात परम पूज्य दलाई लामांसाठी मी भाषांतर करायचो तेव्हा बोधगयेतील बोधिवृक्षाखाली सुमारे दहा हजार लोकांसमोर त्यांनी प्रवचन दिलं होतं. त्या वेळी माझा मायक्रोफोन बंद पडला, त्यामुळे मंत्रपठण करणाऱ्या गुरूच्या जवळपास मांडीवर बसून त्याचं ध्वनी उपकरण वापरण्यासाठी परम पूज्य दलाई लामांनी मला त्याच्याकडे पाठवलं. हे उपकरणही बंद पडलं. तेव्हा आपलं सिंहासन व पुढच्या रांगेतील सरकाँग रिंपोछे यांच्या मधोमध जमिनीवर मला बसायला सांगण्यात आलं, आणि त्यांनी वाक्यांच्या मधल्या कालावधीत स्वतःचा मायक्रोफोन मला दिला. मी इतका अस्वस्थ झालो होतो की मला स्वतःवर ताबा ठेवणंच अशक्य झालं होतं. मी केवळ एक हात वापरून परम पूज्य दलाई लामांचा मायक्रोफोन घेतला व परत दिला. नेहमीच्या आदर दाखवणाऱ्या पद्धतीनुसार दोन्ही हात मी पुढे केले नाहीत. एखादं माकड केळं खेचून घेतं तशा प्रकारे मायक्रोफोन घेतल्याबद्दल रिंपोछेंनी मला जवळपास मारच दिला होता.

परम पूज्य दलाई लामा यांच्या शिकवणुकीवेळी योग्य शिष्टाचार

एकंदरित पाश्चात्त्य लोक परम पूज्य दलाई लामांसमोर चांगल्या तऱ्हेने जातील, याचीही काळजी रिंपोछे घेत असत. परम पूज्य दलाई लामांच्या सार्वजनिक शिकवणुकीवेळी पाश्चात्त्यांचं वर्तन रिंपोछेंना अनेकदा त्रस्त करत असे. परम पूज्य दलाई लामा कोण आहेत, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे, असं ते म्हणाले होते. हे काही केवळ सर्वसामान्य पुनर्जन्म झालेले लामा नाहीत. त्यांच्या सोबत उपस्थित राहताना विशेष आदर व नम्रता बाळगायला हवी. उदाहरणार्थ, दीक्षा समारंभावेळी किंवा एखाद्या प्रवचनावेळी चहाची विश्रांती असेल, तेव्हा परम पूज्य दलाई लामा तिथे नाहीतच असं समजून त्यांच्या नजरेसमोर उभं राहणं व गप्पा मारणं हे अतिशय उद्धटपणाचं असतं. कोणत्याही संभाषणासाठी बाजूला जाणं हा योग्य शिष्टाचार आहे.

धरमशालेत मी परम पूज्य दलाई लामांसाठी भाषांतराचं काम करायचो तेव्हा एकदा एका पाश्चात्त्य बौद्ध संघटनेकडून पुरस्कृत प्रवचनाचं आयोजन करण्यात आलं होतं. परम पूज्य दलाई लामांनी लेखी प्रश्नांची उत्तरं देऊ, असं सांगितलं. प्रत्येक सत्रानंतर पुढील दिवसासाठी दाखल झालेले प्रश्न वाचून दाखवावेत असं रिंपोछेंनी मला सांगितलं आणि मूर्खासारखे वा क्षुल्लक प्रश्न ते निर्णायकरित्या नाकारत होते. प्रश्न अधिक मूलगामी व्हावेत यासाठी त्यांची भाषा बदलणं किंवा रचना बदलणं, असं काम रिंपोछेंनी माझ्याकडून अनेकदा करवून घेतलं. प्रश्नांनी परम पूज्य दलाई लामांचा वेळ वाया घालवू नये किंवा त्यांच्या उत्तराचा लाभ घेण्याची अनेक लोकांना मिळणारी संधीही दवडू नये. प्रश्न किती उत्कृष्ट व सखोल आहेत, याबद्दल परम पूज्य दलाई लामांनी अनेक वेळा टिप्पणी केली होती. मी परम पूज्य दलाई लामांसोबत प्रवास करायला जायचो तेव्हा ही संपादन प्रक्रिया पार पाडायला शिकलो.

Top