“विशेष काही नाही” अशी मनोवृत्ती जीवनात उपयोगी पडते का?

प्रश्न: ही “विशेष काही नाही” मनोवृत्तीची संकल्पना मला खरोखरच आवडली. पण अशा मनोवृत्तीसह आपण उर्वरित जगासमोर जातो, त्या परिस्थितीबद्दल मला कुतूहल आहे. उदाहरणार्थ, इतर लोकांसोबत तुम्ही एखाद्या प्रकल्पावर काम करत असाल आणि काही चुकीचं झाल्यावर तुम्ही अशा मनोवृत्तीने त्यावर बोललात, “बरं, विशेष काही नाही! होतं असं.” तर, तुम्ही गोष्टी गांभीर्याने घेत नाही आहात, असं इतर लोकांना वाटण्याची शक्यता आहे.

डॉ. बर्झिन: “विशेष काही नाही” या मनोवृत्तीबाबत गैरसमजूत करून घेऊ नका. काहीच न करण्याशी त्याचा संबंध नाही. काळजी न करणाऱ्या अलिप्त मनोवृत्तीशीही याचा संबंध नाही: “काहीही का होईना,” अशा प्रकारची ही मनोवृत्ती नाही. आपल्याला सुखी वाटतं की दुःखी वाटतं, याबद्दल नाराज न होणं आणि यापैकी कोणत्याही भावनेला अवाजवी महत्त्व न देणं, हा “विशेष काही नाही” मनोवृत्तीचा अर्थ आहे. आपण जे काही करत असतो, ते अतिशय बुद्धिप्रामाण्यवादी पद्धतीने आणि शांतपणे हाताळावं, एवढं. नाराज न होता, जे काही गरजेचं आहे ते करावं.

इतर लोक नाराज झाले तर?

ते नाराज झाले, तर तुमच्या शांततेमुळे इतरांनाही शांत व्हायला मदत होईल. एक नमुनेदार उदाहरण असं: समजा, आपण संगणकावर काही लिहीत आहोत आणि चुकीचं बटण दाबलं गेल्यामुळे मजकूर पुसला गेला. असं होतं. असं झाल्यावर आपण नाराज होऊन काही उपयोग नसतो. आपल्याकडे पूर्वस्थितीमध्ये जाण्यासाठीचं (अन्डू) बटण नसेल, तर आपण यात काही दुरुस्तीही करू शकत नाही, तो मजकूर गेलेला असतो. यावर रडून, नाराज होऊन आणि त्यावर दुःखी होऊन काही तो मजकूर परत येणार नाही. उलट, अशा प्रतिसादांनी अडथळेच निर्माण होतात. त्यापेक्षा आपण केवळ “बरं” म्हणावं आणि पुन्हा तो मजकूर लिहून काढावा. लिहिलेलं लक्षात ठेवण्यासाठी आपलं पुरेसं प्रशिक्षण झालं असेल, तर आपण तो पुन्हा तयार करू शकतो आणि कदाचित दुसऱ्या वेळी तो अधिक चांगल्या प्रकारेही लिहिला जाण्याची शक्यता आहे. आपण त्या परिस्थितीला सामोरं जातो, या सगळ्या गोष्टींबाब ‘नाटकं’ करत नाही. आपण एखाद्या चमूचा भाग असलो आणि संबंधित मजकूर त्या चमूचा असेल, तर आपल्या शांततेमुळे इतर सहकाऱ्यांनाही शांत व्हायला मदत होईल.

एखाद्या परिस्थितीमध्ये सुखी वा दुःखी भावना जाणवण्याबाबत आपण बोलतो आहोत, की एकंदरित बोलतो आहोत?

मी स्वतःला हाताळण्यासंदर्भात बोलतो आहे. आपल्याला दुःखी किंवा सुखी वाटत असेल, तर आपण जगत राहावं आणि त्या भावनांना अवाजवी महत्त्व देऊ नये. दुसऱ्या कोणाला तरी सुखी किंवा दुःखी किंवा नाराज वाटत असेल, तेव्हा काय? उदाहरणार्थ, मूल रडत असेल. अशा वेळी आपण कोणती अपेक्षा करतो? ते मूल आहे. तर आपण नाराज होत नाही, “अरेरे, बाळ रडतंय!” आपण त्याला अवाजवी महत्त्व देत नाही, पण बाळाची काळजी तेवढी घेतो. बाळ का रडतंय? याबद्दल जे काही करावं लागेल ते करतो. तसंच हे असतं. 

शांतिदेव यांनी हे अतिशय सुंदर रितीने सांगितलं आहे. ते म्हणतात, “लोक बालसुलभ असतात.” त्यामुळे ते नाराज होतात. हे मुलांच्या रडण्यासारखंच असतं. आपली काय अपेक्षा असते? अशा वेळी आपण त्या भावनांना अवाजवी महत्त्व देऊ नये, तर त्या लोकांना शांत करण्याचा प्रयत्न करावा आणि गोष्टी आजूबाजूच्या वास्तवाशी सुसंगत ठेवण्यासाठी त्यांना मदत करावी.

नाराज होणं म्हणजे कोणत्या तरी गोष्टीच्या अस्तित्वाला अधिक मोठं मानणं, अधिक महत्त्व देणं असतं. भावशून्यतेचा संबंध याच्याशीच आहे. फार काही महत्त्वाचं नाही, हे लक्षात घ्यायला हवं. फार महत्त्वाचं असं काही वास्तवाशी सुसंगत नसतं. गोष्टी घडतात, इतकंच. आपण त्यांना सामोरं जायचं असतं. आपल्याला भावना असतात का? होय, अर्थातच असतात- प्रेम, करुणा व संयम यांसारख्या सकारात्मक भावना थोर आहेत. पण संताप, उतावीळपणा व असहिष्णूता यांसारख्या नकारात्मक भावनांना आपण दूर सारायला हवं, कारण त्या अजिबातच उपकारक नाहीत.

हे आणखी थोडं पुढच्या टप्प्यावर नेलं तर लोजोंग मन-प्रशिक्षणातील शिकवणुकींसारखंच होईल, असं मला वाटतंय. आपल्या समस्यांना आधाराला घेऊन आपण त्यातून अधिक खोलवरच्या मर्मदृष्टी प्राप्त करून घेऊ शकतो.

होय, बरोबर. 

मन-प्रशिक्षणाची ही पद्धत अवास्तववादी आहे असं तुम्हाला वाटतं का? “विशेष काही नाही,” “जास्त महत्त्व देऊ नये” यांसारख्या मनोवृत्तीवर लोकांनी काम करणं अधिक वास्तववादी ठरेल, असं तुम्हाला वाटतं का?

आपली मनोवृत्ती बदलण्यासाठी मदत करण्याकरिता आपल्याकडे मन-प्रशिक्षणाच्या लोजोंग पद्धती आहेत. उदाहरणार्थ, नकारात्मक परिस्थितीकडे आपण सकारात्मक परिस्थिती म्हणून पाहू शकतो. या थोर पद्धती आहेत, पण त्या परिवर्तनापूर्वी आपल्या भावनांना व आपल्याला जाणवणाऱ्या परिस्थितीला अवाजवी महत्त्व देणं थांबवायला हवं. या भावना किंवा परिस्थितींना मोठ्या संकटाच्या पातळीवर नेल्यानंतर त्यात परिवर्तन घडवणं अतिशय अवघड असतं. “प्रत्येकाचा घाण झालेला डायपर माझ्याकडे येऊ दे. मी प्रत्येकाचा डायपर बदलेन,” या पातळीपर्यंत जाण्यापूर्वी आपण अधिक वास्तववादी दृष्टिकोन स्वीकारणं गरजेचं आहे.

आपण काही टप्पे निश्चित करायला हवेत: एक, बाळाने शी केली. मग? ते बाळ आहे. म्हणून आपण डायपर बदलतो. आता, डायपर बदलत असताना आपल्याला ही जागरूकता कदाचित सुखकारक वाटणार नाही, कारण त्याचा वास चांगला नसतो. त्यामुळे आपण लोजोंग उपासनेचा वापर करू शकतो, “बाळाला स्वच्छ करताना, मला प्रत्येकाचे डाग व घाण साफ करणं शक्य होईल का. प्रत्येकाला स्वच्छ करताना ही गोष्ट कारणमात्र ठरणं शक्य आहे.” पण तत्पूर्वी ही गोष्ट संकटात रूपांतरित होऊ नये यासाठी तिची विरचना करायला हवी. हे आपण टप्प्याटप्प्याने करतो.

प्रत्येकाचे डायपर बदलण्याबद्दल विचार केला, तरी केवढा गोंधळ उडेल, त्याचा विचार माझ्या मनात येतो.

होय, खरं आहे. संपूर्ण जगातील कचरा स्वतःकडे घ्यावा लागणार असेल, तर कोणालाच बौद्ध व्हावंसं वाटणार नाही. एक सर्वसाधारण तत्त्व म्हणून आपण गोष्टींबद्दलची विनोदी उदाहरणं वापरली तर कंटाळवाण्या उदाहरणांपेक्षा त्यांचा खोलवरचा ठसा उमटतो. बरोबर?

एखादं उद्ध्वस्त करणारं नातं किंवा दुसरं काहीतरी दुःखदायक आपण अनुभवतो, तेव्हा दैनंदिन पातळीवर ते स्वीकारावं कसं, याबद्दल मला कुतूहल आहे.

आपण एखाद्या उद्ध्वस्तकारक नात्यामध्ये असू आणि गोष्टी बिघडत असतील, तर आपण “काय करणार, संसार हा असाच असतो” असं म्हणू नये. आपण स्वतःची भेदक्षम जागरूकता वापरावी, याला परम पूजनीय दलाई लामा “आश्चर्यकारक मानवी बुद्धिमत्ता” असं म्हणतात. एखादी परिस्थिती अपकारक आहे की उपकारक आहे, यात भेद करण्याची क्षमता असणं गरजेचं असतं. एखादी परिस्थिती आपल्यासाठी व त्या नात्यातील इतर व्यक्तींसाठी लाभदायक आहे की लाभदायक नाहीये? ती लाभदायक नसेल आणि दोन्ही बाजूंसाठी हानिकारक असेल, तर आपण ते नातं संपवतो. स्पष्टपणे विचार करावा, अतिशयोक्तीने विचार करू नये आणि घडणाऱ्या गोष्टींच्या वास्तवाशी विसंगत प्रतिमा वास्तवावर लादू नयेत. काही वेळा, फारकत घेणं निश्चितपणे जास्त चांगलं असतं. पण हा निर्णय स्पष्ट विचाराच्या, स्पष्ट विश्लेषणाच्या आधारावर घ्यावा.

आपल्या नेणिवेतील भावनांबद्दल जागरूक राहण्याचा प्रयत्न करून त्या प्रामाणिकपणे व्यक्त करणं, ही सकारात्मक बाब असू शकते का?

पाश्चात्त्य संज्ञा वापरायची तर, अनेकदा आपण नेणिवेच्या पातळीवरील (अनकॉन्शस लेव्हल) भावना अनुभवतो. काही परिस्थितीमध्ये या भावना अधिक आविष्कृत झाल्या, तर चांगलं राहील का, हा प्रश्न आहे. इथे आपल्याला दोन प्रकार तपासता येतील, असं मला वाटतं. एक, विध्वंसक भावना आणि दुसरा प्रकार, रचनात्मक भावना. उदाहरणार्थ, संताप किंवा प्रेम यांची तपासणी करू. आपल्याला कोणाबद्दल तरी नेणिवेच्या स्तरावरून वैरभाव वाटत असेल, तर त्याबद्दल आपण अर्थातच जागरूक व्हायला हवं. त्याबद्दल जागरूक होणं म्हणजे संबंधित व्यक्तीबद्दलचा वैरभाव व्यक्तच करायला हवा असं काही नाही. इथेही पुन्हा काय घडतंय यातील भिन्न पैलूंचं विश्लेषण आपण करायला हवं.

उदाहरणार्थ, मला मित्र आहेत आणि मी त्यांच्याशी गप्पा मारतो. मी त्यांना प्रत्येक वेळी विचारतो, “कसे आहात? कसं चाललंय सगळं?” पण मी कसा आहे किंवा माझं कसं चाललंय, असं ते कधीही विचारत नाहीत. ते मला तसं विचारत नाहीत आणि त्यांचं आत्मकेंद्री असणं आणि मी कसा आहे याबद्दल विचार न करणं, हे मला त्रस्त करतं. इथे फरक आहे. या संदर्भात मला नेणिवेच्या पातळीवर वैरभाव वाटतो का? कदाचित असेल; पण तो व्यक्त करून त्यांच्यावर चिडून परिस्थिती सुधारणार नाही. “तुम्ही खरंच स्वार्थी आहात! तुम्ही भयंकर आहात,” असं म्हणणं आणि त्यांच्यावर ओरडणं म्हणजे विध्वंसक रितीने अनिवार्य कृती करणं असतं. “मी कसा आहे, असं तुम्ही का विचारत नाही? काय अडचण आहे त्यात?” अशा प्रकारच्या उद्गारांनी काही परिणाम होत नाही. अशा प्रकारच्या कोणत्या गोष्टीविषयी आपल्या मनात वैरभाव असेल, तर तो व्यक्त होणार नाही याची आपण काळजी घ्यावी, कारण तो व्यक्त झाला, तर आपण आत्मसंयम गमावतो आणि विध्वंसक कृती करतो.

परंतु, हा वैरभाव लक्षात आल्यावर, मी न संतापता परिस्थितीवर उपाय करण्याचा प्रयत्न करू शकतो. बहुतेकदा मी हे विनोदी ढंगाने करतो. परिस्थिती हलकीफुलकी करण्यासाठी विनोद हे अतिशय उपयुक्त माध्यम आहे, असं मला वाटतं. संबंधित व्यक्तीने तिचं कसं चाललंय याची संपूर्ण कथा सांगितल्यानंतर आणि माझी विचारपूस न करताच मग दुसरा विषय सुरू केल्यावर, मी म्हणतो, “अॅलेक्स तुझं कसं चाललंय? अरे, माझी विचारपूस केलीस त्याबद्दल धन्यवाद!” असा हा एक प्रकारचा विनोद होतो आणि त्या व्यक्तीच्या लक्षात येतं की, तिनेही माझी विचारपूस करायला हवी. अशा प्रकारे कोणताही वैरभाव आविष्कृत होत नाही.

आपल्या आत असा वैरभाव असेल, तर त्याबद्दल जागरूक होणं उपकारक ठरतं. मला त्याचा काही त्रासच होत नसेल, तर काय? त्यांनी माझी विचारपूस केली किंवा नाही, याची मला फिकीरच नसेल, तर हा मुद्दा अप्रस्तुत ठरतो. माझं कसं चाललंय, मी काय करतोय, हे मी त्यांना सांगायलाच हवं का? तसं काहीच नाही. मला खरोखरच त्यांना सांगावंसं वाटत असेल, तर मी सांगेन. आपल्या मोठ्या झालेल्या मुलांनी किंवा नातवंडांनी आपल्याला कधीच फोन केला नाही, तर आपल्याला त्यांचा आवाज ऐकावासा वाटल्याने आपणच त्यांना फोन करतो. पण हे वैरभाव न ठेवता करतो आणि आपण त्यांना फोन केल्याबद्दल त्यांना अपराधी वाटू नये, असाही प्रयत्न करतो.

रचनात्मक भावनांचं काय? आता आपण त्याचं विश्लेषण करू. याची मी पूर्वतयारी केलेली नाही, कारण मी या मुद्द्याचं विश्लेषण आधी कधी केलेलं नाही. कदाचित आपलं काही अव्यक्त प्रेम असेल, तर? त्याचा अर्थ काय होईल? कोणाबद्दल तरी छुपी किंवा लपवलेली अभिलाषा व लैंगिक आकर्षण वाटतं, अशा विध्वंसक भावनेबद्दल आपण बोलत नाही आहोत. “मला तुझ्यासोबत झोपायचंय,” हे किंवा तत्सम कशाचा इथे संबंध नाही. आता आपण खरोखरच्या सकारात्मक भावनेबद्दल बोलणार आहोत. उदाहरणार्थ, आपलं आपल्या मुलावर किंवा मुलीवर प्रेम असतं, बरोबर? आपल्या मुलामुलीवर आपलं प्रेम असतं, पण आपण किती वेळा ते व्यक्त करतो? ते अधिक व्यक्त पातळीवर आणणं आपल्याला हवं असतं का? होय, ते उपकारक ठरेल.

तर, मूल गुदमरू नये असं आपल्याला वाटत असल्यामुळे इथे भेदक्षम जागरूकता वापरावी लागते. उदाहरणार्थी, आपलं मूल पौगंडावयीन असेल आणि ते त्याच्या किंवा तिच्या मित्रमैत्रिणींसोबत असेल, तर आपण मधेच आई म्हणून तिथे येणं आणि “अरे, माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे” असं म्हणणं व आपल्या मुलाला मिठी मारून त्याचा पापा घेणं, हे सगळं त्याला मित्रमैत्रिणींसमोर लाजीरवाणं वाटू शकतं आणि हे पूर्णतः अनुचित आहे. दुसरं उदाहरण म्हणजे, आपलं पौगंडावयीन मूल बाहेर गेलं असताना आपण सतत त्याला फोन करतो किंवा टेक्स्ट मेसेज पाठवत राहतो. “अरेरे, पुन्हा आई! मी ठीक आहे ना, असं विचारतेय”, हे त्यांच्या मनात येऊ शकतं.

आपली सकारात्मक भावना कधी व कशी व्यक्त करायची, हे ठरवण्यासाठी आपण भेदक्षम जागरूकतेचा वापर करणं गरजेचं असतं. एखाद्या दोन वर्षाच्या मुलासमोर ही भावना व्यक्त करणं आणि पंधरा वर्षांच्या मुला-मुलीसमोर ही भावना व्यक्त करणं, यात फरक असतो. सकारात्मक भावना व्यक्त करणं ठीक, पण पुन्हा एकदा आपण नाटकं करण्याची गरज नसते, अधिक सूक्ष्म पातळीवरच ते ठेवणं रास्त.

भावनिक चलन

आता अतिशय उपयुक्त विषय आलेला आहे. माझा एक मित्र, सायकिअॅट्रिस्ट आहे- त्याने आर्थिक संदर्भांमध्ये हा सिद्धान्त स्पष्ट केला. लोकांची चलनं भिन्न असतात हे स्वीकारून आपण त्यांना या भिन्न चलनांनुसार रक्कम देणं शिकायला हवं. त्यांचं चलन स्वीकारण्याची क्षमता आपण विकसित करायला हवी. उदाहरणार्थ, काही लोक त्यांची माया शारीरिक पातळीवर दाखवतात, ते मिठी मारतात व चुंबन घेतात. इतर काही लोक आपली काळजी घेऊन त्यांचं प्रेम व आस्था दाखवतात. ते शारीरिकदृष्ट्या तितकीशी माया दाखवत नाहीत, पण तेही काळजी घेतात व आपल्या सुरक्षिततेबाबत जागरूक असतात.

यातील एक नमुनेदार उदाहरण जुन्या पिढीतील आहे- त्या वेळी एक वडील त्यांच्या मुलांवर प्रचंड माया करत होते. परंतु, बाहेर जाणं, काम करणं, पैसा कमावणं आणि मुलांना लागेल ते पुरवणं, या वस्तुस्थितीद्वारे ते वडील मुलांसोबत स्वतःचं प्रेम व्यक्त करत असत. वडिलांनी हे चलन वापरलं होतं. मूल म्हणून आणि नंतर प्रौढ व्यक्ती म्हणूनही आपण हे लक्षात घ्यायला हवं. “माझ्या वडिलांचं माझ्यावर प्रेम होतं आणि ते त्यांची आस्था व काळजी दाखवत असत. मला आवडणारं किंवा पसंत असलेलं चलन त्यांनी दिलं नसेल- म्हणजे मिठी मारणं किंवा माझ्यावर त्यांचं किती प्रेम आहे हे सांगणं असं त्यांनी केलं नसेल, तर त्यांनी त्यांचं ममत्व दाखवलं होतं.” आपण भिन्न चलनं स्वीकारायला शिकावं. इथे डेन्मार्कमध्ये युरो नव्हे, तर क्रोन द्यायला हवेत. पैसा हा पैसाच असतो. भिन्न लोक भिन्न प्रकारे माया व्यक्त करतात.

तुमची विचारपूस न करणाऱ्या तुमच्या मित्रांबद्दलची गोष्ट तुम्ही सांगितलीत. पण तुम्ही संतापला नाहीत, तरी त्यांनी तुमचा विचार करावा आणि तुमची चौकशी करावी, अशी आसक्ती किंवा गरज तुम्हाला वाटत असेल, तर काय? म्हणजे तुम्ही संतापलेले नसाल, तुम्हाला ओरडावंसं वाटत नसेल. पण तुम्हाला त्याबद्दल थोडं उदास वाटत असेल, प्रेम कमी झाल्यासारखं वाटत असेल. अशा वेळीही आपल्याला मनातलं व्यक्त करावंसं वाटू शकतं, पण त्यांनी आपली छोटी सूचना स्वीकारली नाही किंवा ते बदलले नाहीत, तर त्यातून वाटणारं दुःख कसं हाताळायचं? अशा गोष्टींविषयीच्या स्वतःच्या आसक्तीवर मात कशी करायची?

अशा परिस्थितीत दुःखाचे दोन संभाव्य प्रकार असतात. स्वतःला बहुमोल मानण्यातून होणारं दुःख असतं: “ते माझ्याकडे लक्ष देत नाहीत म्हणून मी दुःखी आहे. मला याबद्दल राग नाही, पण त्यांनी माझ्याकडे लक्ष द्यावं, अशी माझी इच्छा आहे.” “मी, मी, मी” अशा विचारातूनच हे आलेलं असतं. हा दुःखाचा एक प्रकार झाला. परंतु, ते खूप आत्मकेंद्री आहेत याचंही आपल्याला दुःख होऊ शकतं, पण ते आपण स्वतःला लावून घेत नाही. त्यांना ही समस्या असल्याबद्दल आपल्याला दुःख वाटतं. त्यातून आपल्याला त्यांच्याविषयी करुणा वाटू लागते. मग त्यांना मदत करण्याच्या मार्गांचा विचार आपण करू लागतो.

आपलं दुःख केवळ स्वतःविषयीच्या आस्थेपोटी असेल- “लोक माझ्याकडे लक्ष देत नाहीत, याने मला दुःखी वाटतं-, तर आपण खरोखरच त्यावर काम करायला हवं. लोकांनी आपल्याकडे लक्ष दिलं असेल, तरी आपल्याला काय हवं असतं? सदासर्वकाळ प्रसारमाध्यमांचे लोक आपल्या अवतीभवती घुटमळून आपली छायाचित्रं काढत आहेत, असं आपल्याला हवंय का? आपल्याकडे इतकं लक्ष द्यावं, असं आपल्याला वाटतं का? म्हणजे हे समाधानकारक असं कधीच वाटत नाही. आपल्या इच्छेनुसार इतरांनी आपल्याकडे लक्ष दिलं, तरी तो सर्वसाधारण आनंद असतो आणि तो टिकत नाही. दुसऱ्या बाजूला, सुरक्षेची अति काळजी करणाऱ्या पालकांप्रमाणे, कोणी व्यक्ती जास्त लक्ष देत असेल आणि दर पाच मिनिटांनी “तू कसा आहेस? तुला बरं वाटतंय का? किंवा “तुझं सगळं ठीक चाललंय ना?” असं विचरत असेल, तर?

माझ्या संबंधांमध्ये हे ठीक आहे, असं मला वाटू शकतं, पण दुसऱ्या व्यक्तीला तसं वाटेलच असं नाही. “मी असा आहे आणि तू तसा आहे,” असं चलनांबाबत आपण बोलायला हवं. आपण एकमेकांबाबत जागरूक राहायला हवं. आपण एकमेकांच्या आवडीनिवडींवर काम करून शिकू शकतो. याबद्दल बोलणं, संवाद साधणं आणि जागरूक राहणं चांगलं असतं.

नातेसंबंध सुरू असतील आणि दुसरी व्यक्ती ऐकून घेण्याच्या मानसिकतेमध्ये असेल, तर आपण याबद्दल बोलावं. “अशा पद्धतीने ममत्व दाखवलेलं मला आवडतं.” दुसरी व्यक्ती तिला कशा प्रकारे ममत्व दाखवलेलं आवडतं ते सांगेल. हे भागीदारीचे नातेसंबंध असतात; पण मूल व पालक यांच्या नात्यामध्ये हे परिणामकारक ठरत नाही. पालक निवर्तलेले असतील आणि आपण आपल्या बालपणाचा विचार करत असू, तर यात काही वाटाघाटी शक्य नसतात. संबंधित लोक मुळात बऱ्यापैकी समसमान स्थानी आहेत का, हे पाहावं लागतं. ते संवादाला तयार आहेत का आणि बदलू शकतात का? एखाद्या कार्यालयात अधिकारी व्यक्ती बाकीच्यांना ते कसे आहेत, असं कधीच विचारत नसण्याची शक्यता आहे. अशा प्रकारच्या प्रश्नावर आपण आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी वाटाघाटी करत नाही. त्याच्याबाबतीत आपण फक्त कामाशी संबंधित मुद्दे बोलतो, “आपण मला खूप काम देत आहात. याबद्दल मी नाराज आहे.” परिस्थिती पाहून भेदक्षम जागरूकतेने विचार करायला हवा.

समजा, भावशून्यतेबद्दलच्या जागरूकतेची काही पातळी आपण गाठलेली नसेल आणि संतापण्यासाठीची वास्तविक कारणं- ती अतिशयोक्त असतीलच असंही नाही- आपल्याला समोर दिसत असतील. अशा वेळी हे टाळून आपण आपला संताप व्यक्त करायचा नाही. त्याला अवाजवी महत्त्व दिलं जाणार नाही, असा प्रयत्न करायचा. पण मानसिकदृष्ट्या रोगट ठरेल, अशा कोणत्या गोष्टीत याचं रूपांतर होण्याची शक्यता असते का?

यातून दडपणुकीचा मुद्दा पुढे येतो. भावशून्यतेबद्दल जागरूक होण्यासाठीची काहीच पातळी आपण गाठलेली नसेल आणि आपण वैरभाव केवळ दडपत असू, तर ते आपल्या आत साचतं. यातून काही संकटं निर्माण होण्याची शक्यता असते. मग काय करायचं? आपण आपला संताप किंवा नाराजी व्यक्त करणार असू आणि तसं गरजेचं असेल, तर इथेही आपल्याला योग्य वेळ निवडण्यासाठी भेदक्षम जागरूकता वापरावी लागेल. दुसरी व्यक्ती खरोखरची नाराज असेल किंवा कामात खरोखरची व्यग्र असेल तेव्हा आपण संताप व्यक्त करू नये. आपला संताप व्यक्त करण्याची सर्वांत योग्य वेळ कोणती, हे ओळखण्यासाठी बुद्धिमत्ता वापरावी. संताप तीव्र असताना व्यक्त करू नये, कारण मग तो नियंत्रणाबाहेर जाऊ शकतो.

शेवटी हे सगळं आपल्या व्यवहारज्ञानाच्या व बुद्धिमत्तेच्या वापराशी येऊन ठेपतं. हे कधी मदतीचं ठरतं? याची योग्य वेळ कोणती? दुसरी व्यक्ती खरोखर थकली असेल आणि तिला झोपी जायचं असेल किंवा ती अर्धवट झोपेत असेल, तर त्यांच्या असंवेदनशीलतेबद्दल खोलवरचं व अर्थपूर्ण संभाषण साधण्याची ती वेळ नव्हे. ती व्यक्ती कामात खूप व्यग्र असेल, तरीही हेच लागू होतं. ती वेळ योग्य नव्हे. ठीक?

Top