चार आर्य सत्यांपासून बहुमूल्य त्रिरत्नांकडे

पुनरावलोकन 

आपण परमपूज्य दलाई लामांद्वारे रचित विशेष छंदांबाबतची आपली चर्चा पुढे नेत आहोत, ज्यात आपण दोन सत्यांच्या बोधाच्या माध्यमातून चार सत्यांच्या बोधापर्यंत पोहचतो आणि त्या आधारे त्रिरत्नांबाबत दृढ विश्वास प्राप्त करतो, याबाबतचे स्पष्टीकरण आढळते. आपण पाहिले आहे की दोन सत्यांमध्ये गोष्टी कशा रीतीने अस्तित्वमान असतात, याविषयी सांगितले गेले आहेः 

  • सापेक्ष किंवा परंपरागत सत्य; आपल्याला जे वास्तवात दिसत असते, त्याची उत्पत्ती कारण आणि परिस्थितींवर अवलंबून असते. जर आपण जगात गोष्टी कशा रीतीने कार्यरत असतात, हे पाहिले तर तेच आपल्या दृष्टीस पडते. पण दुर्दैवाने, आपण गोष्टी त्या पद्धतीने पाहत नाहीत. 
  • सत्याच्या गहनतम पातळीवर, गोष्टी असंभाव्य पद्धतीने अस्तित्वमान नसतात, जसे आपले मन त्यांना प्रक्षेपित करत असते. उदाहरणार्थ, आपण विचार करतो की गोष्टी स्वतःच्या ऊर्जेवर निर्माण होतात, जशा त्या आपल्याला दिसत असतात, आणि त्यांचे अस्तित्त्व कोणत्याही कारण, परिस्थिती किंवा यापैकी कोणत्याही घटकाशिवाय स्वतंत्रपणे अस्तित्वात असते, पण हे गैर आहे. 

तर हाच याचा आधार आहे. 

चार आर्य सत्ये आपल्या यथार्थाकडे पाहण्याच्या दृष्टी भोवतीच्या भम्रितावस्थेविषयी चर्चा करतात. जेव्हा आपण यथार्थाबाबत भ्रमितावस्थेत असतो, तेव्हा ते दुःखाचे कारण बनतेः हे कारणच दुसरे आर्य सत्य आहे आणि दुःख पहिले आर्य सत्य आहे. तर दुसरीकडे आपण यथार्थाला योग्य रीतीने पाहिले आणि त्यावर कायम लक्ष केंद्रित केले, तर आपल्याला तिसरे आर्य सत्य, दुःख निरोधाचे सत्य प्राप्त होईल. बोध हाच सत्यमार्ग आहे, हे चौथे सत्य आहे, जो खरे दुःख निवारण करतो. 

यथार्थाचा स्पष्ट बोध न झाल्यास, आपण अज्ञान आणि भ्रमावर आधारित व्यवहार करतो आणि अनियंत्रित पुनर्जन्माचा फेरा वाढवत जातो. पण जर आपण अज्ञानापासून मुक्त होऊ शकलो, तर आपण ती स्थिती उलटवू शकतो – किंवा संसारिक पुनर्जन्माच्या चक्रातून बाहेर पडून शकतो. 

बहुमूल्य त्रिरत्ने

आता आपण छंदातील तिसरी पंक्ती पाहुयातः 

प्रामाणिक बोधातून उत्पन्न होणाऱ्या आपल्या या धारणा की तीनही शरणागत अवस्था सत्य आहेत, अधिक दृढ होतात. 

जसे आपण याआधी पाहिले आहे की तीन शरणागती किंवा आश्रयांचा संबंध बुद्ध, धर्म आणि संघाशी आहे. हे तीनही संस्कृत शब्द आहेत. शाक्यमुनि बुद्ध आणि इतर सर्व बुद्ध ते आहेत, ज्यांनी ज्ञानप्राप्ती साध्य केली आहे आणि ते आपल्याला त्याबाबत शिकवण देतात. त्यांची शिकवण म्हणजेच धर्म होय. उच्च सिद्धीप्राप्त सत्वांचा समुदाय म्हणजे संघ होय. हा बोधाचा एक स्तर आहे, पण यांना आणखी गहन अर्थ आहे.  

अधिक गूढ अर्थाच्या दृष्टीने पाहिल्यास धर्माचा वास्तविक अर्थ सिद्धींशी संबंधित असतो – अर्थात तिसऱ्या आणि चौथ्या आर्य सत्याच्या प्राप्तीसाठीची सिद्धी. तुम्हाला आठवत असेल की तिसरे आर्य सत्य, दुःख आणि त्याच्या कारणांच्या निवारणाचे सत्य आहे आणि ते श्रेणीबद्ध पद्धतीने साध्य होते. जेव्हा आपण पूर्णतः ते साध्य करतो, आपण अनियंत्रित पुनर्जन्माच्या चक्रातून (संसार) मुक्ती साध्य करतो. जेव्हा आपण स्वतःला त्या कारणांपासून मुक्त करतो, जी कारण व परिणामांबाबतचा बोध प्राप्त करण्यात अडथळा आणतात, तेव्हा आपल्याला यथायोग्य जाणीव असते की प्रत्येकाला मुक्ती प्राप्त करता यावी, यासाठी कसे मार्गदर्शन करता येईल, त्या क्षणी आपण ज्ञानप्राप्त बुद्ध झालेले असतो. चौथे सत्य तो बोध असतो, जो या दुःख निरोधाच्या सत्याला संभव करतो आणि त्या निरोध सत्याच्या परिणामस्वरूप तो बोध उत्पन्न होतो.

या दोन्हीच्या संगमातून शरणागती तयार होते. शरणागती ती असते, जी आपले रक्षण करते, जसे दुःख आणि इतरांची मदत करण्याच्या दृष्टीने आपल्यात असलेल्या कमतरतांपासून रक्षण करणे. जर आपण सत्य निरोध आणि मार्ग सत्य प्राप्त करू शकलो, तर आपण दुःख आणि इतरांची अधिकाधिक साहाय्यता करताना आड येणाऱ्या कमतरतांपासून आपले रक्षण करू शकतो. ही अशी स्थिती नसते, जसे कोणीतरी दुसऱ्याने त्या सिद्धी प्राप्त केल्या आहेत आणि आपण फक्त स्वतःला त्याच्या देखरेखीखाली सुपुर्द करतो आणि कसेतरी चमत्कारिक शक्तींकडून आपले रक्षण केले जाईल.    

तथाकथित ‘इब्राहीमी धर्म’ – यहूदी, ख्रिश्चन आणि इस्लाम – हे इतिहासोन्मुखी धर्म समजले जातात. या प्रत्येक धर्मात एकेक इतिहास पुरुष झाले आहेत, ज्यांना एखाद्या ऐतिहासिक घटनेत ईश्वरी ज्ञान प्राप्त झाले आहे. त्या नंतर त्यांनी त्या ज्ञान रूपी सत्याला इतरांसमोर प्रकट केले आणि तेच अंतिम सत्य ठरले. आपण मूसा, येशू किंवा मोहम्मदाने जे केले, ते करू शकत नाही, आपल्याला फक्त त्याबाबत आस्था बाळगणे आवश्यक आहे, ज्या आधारे आपले संरक्षण होईल. इथे आस्थेचा संबंध प्रत्यक्ष त्या महापुरुषांप्रति आस्था ठेवणे किंवा त्यांच्या द्वारे प्रकट करण्यात आलेल्या ज्ञानाप्रति आस्था ठेवण्याशी असू शकतो, जसे एका ऐतिहासिक घटनेत ईश्वराने मूसाला दहा आदेशांचे ज्ञान दिले, किंवा येशूने नवविधान प्रकट केले किंवा मोहम्मदाने कुराण सांगितले. या ऐतिहासिक घटना या धर्मांच्या केंद्रस्थानी आहेत. 

हिंदू, बौद्ध आणि जैन हे भारतीय धर्म ‘धार्मिक मता’चे धर्म म्हंटले जाऊ शकतात, जे पूर्णतः भिन्न असतात. बुद्ध, कृष्ण किंवा महावीरांच्या जीवनातील ऐतिहासिक घटना या धर्मांच्या केंद्रस्थानी नाही. उलट, आपण स्वतः आणि इतरही सर्व जण ती अवस्था प्राप्त करू शकतो, जी त्या महापुरुषांनी प्राप्त केली होती. बौद्ध धर्माच्या संदर्भात सांगायचे तर आपण सर्व मुक्ती आणि ज्ञानोदय प्राप्त करू शकतो. आणि इतर धर्मातही त्यांची स्वतःची मुक्तीबाबतची सापेक्ष स्पष्टीकरणे आढळतात. हा पाश्चिमात्त्य, इब्राहीमी आणि भारतीय धर्मांमधील मूलभूत फरक आहे. 

जेव्हा आपण तीन शरणागतींबद्दल विचार करतो, तेव्हा आपण कदाचित ज्या धर्मात वाढलेले असू त्या इब्राहीमी धर्माच्या दृष्टिकोनातून शरणागतीकडे पाहणार नाही ना, याची काळजी घ्यायला हवी. असे नाही की बद्धांना एकट्यालाच ज्ञानप्राप्ती झाली होती आणि त्यांच्यावर आस्था ठेवल्यास आपले रक्षण होईल. त्यामुळे सामान्यतः मी  ‘शरणागती’ शब्दाचा वापर टाळतो कारण त्यातून थोडासा अकर्मकतेचा भाव जाणवतो, जसे इथे आपण इतकेच म्हणणे गरजेचे असते की ‘बुद्धा, मला वाटव’ आणि बुद्ध आपले रक्षण करतात. हा बौद्ध धर्म नाही. मी ‘सुरक्षित दिशा’ या संज्ञेचा वापर करणे पसंत करतो, जिथे बुद्ध, धर्म आणि संघ आपल्या प्रवासाची योग्य दिशा दर्शवतात, जिथे बुद्धांनी प्राप्त केलेली सिद्धी आपण स्वतः प्राप्त करू शकतो. तरी बुद्धांनी आपल्या रक्षणासाठीच्या मार्गांची शिकवण दिली आहे, आपल्याला त्याची साधना करायला हवी. इथे आपल्या ज्ञानप्राप्तीसाठी आपल्याला स्वतःला परिश्रम घ्यावे लागतात, जे दुःखापासून आपले संरक्षण करतील. 

धर्म रत्न 

जेव्हा आपण गहनतम धर्म रत्न किंवा यासाठी तुम्ही ज्या कोणत्या शब्दाचा वापर करू इच्छित असाल, त्याविषयी बोलायचे तर ती एक अशी गोष्ट आहे, जी दुर्लभ आणि बहुमूल्य आहे, हाच त्या दोन शब्दांचा शब्दार्थ आहे, ज्याचा अनुवाद तिबेटी लोकांनी रत्न असा केला आहे. इथे आपण निरोध सत्य आणि मार्ग सत्याच्या प्राप्तीच्या त्या वास्तविक अवस्थेविषयी बोलत आहोत, ज्यामुळे आणि ज्याच्या परिणामांमुळे त्या सिद्धी प्राप्त होतात. आपण स्वतः या सिद्धी प्राप्त करणे आवश्यक असते आणि त्यासाठी आपल्याला दृढ विश्वासही असायला हवी की त्या साध्य करणे शक्य आहे. दोन सत्य आणि चार आर्य सत्यांबाबतची आपली चर्चा आपल्याला हे समजून घ्यायला मदत करते की मुक्ती आणि ज्ञानप्राप्तीसारख्या गोष्टी वास्तवात संभाव्य आहेत आणि आपण स्वतः त्या साध्य करू शकतो. 

बद्ध रत्न 

बुद्धजन ते असतात, ज्यांनी मुक्ती आणि ज्ञानोदय प्राप्त केलेला असतो. यात फक्त शाक्यमुनि बुद्ध नाहीत, तर इतर अनेक बुद्ध आहेत. त्यांनी आपल्याला शिकवण दिली आहे आणि मार्ग दाखवला आहे की आपण कशा रीतीने स्वतः ती अवस्था प्राप्त करू शकतो. हे बुद्धस्वरूप आपल्याला दोन प्रकारे शिकवण देतातः एक त्यांच्या शिकवणीच्या माध्यमातून आणि दुसरे त्यांच्या उदाहरणातून, जे त्यांच्या बोध आणि अनुभूतीवर आधारलेले असते. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण हे दर्शविते की आपल्या मौखिक शिकवणींशिवाय आपल्या उपदेशांबाबत जिवंत उदाहरण प्रस्तुत करून इतरांना शिकवणींबाबत साहाय्यक ठरणे शक्य आहे. धर्म काही कोरे तत्त्व नाही, उलट ते एक असे ज्ञान आहे की जे सर्व लोक आणि आपण स्वतः साकार रूपात प्रस्तुत करू शकतो. 

संघ रत्न 

काही लोकांना असे वाटेल की आपल्याला तिसरे रत्न असणाऱ्या आर्य संघ रत्नाची काय गरज आहे? बुद्ध आणि धर्म पुरेसे नाहीत का? जरी संघाचा संबंध भिक्षु आणि भिक्षुणींच्या समुदायाशी असला तरी वास्तविक संघ रत्नाचा अर्थ तेवढाच मर्यादित नाही. जसे प्रतिमा आणि चित्रे बुद्धांची प्रतिमा सादर करतात, ग्रंथ संघाची, तसेच ते केवळ संघाची प्रतिमा सादर करतात. बुद्ध, धर्म आणि संघाला दर्शविणाऱ्या प्रतिरूपांच्या रूपात प्रतिमा, पुस्तके आणि भिक्षु व भिक्षुणी आपल्याला ध्यान केंद्रित करण्याची साधने प्रदान करतात, ज्यांच्या प्रति आपण आदर प्रकट करू शकतो कारण अमूर्त गोष्टींप्रति आदर व्यक्त करणे सोपे नसते. अर्थात, यात काहीही दुमत नाही की या सगळ्यालाही एक गहन अर्थ आहे. 

संघ रत्न फार महत्त्वपूर्ण आहे. संघाचा संबंध आर्य, अर्थात अशा लोकांशी असतो, ज्यांनी दोन सत्यांच्या आधारे चार आर्य सत्यांचा निर्वैचारिक बोध प्राप्त केलेला असतो. ते याबाबतचा निर्वैचारिक बोध प्राप्त करतात, त्यामुळे त्यांनी काही मर्यादेपर्यंत निरोध सत्य आणि काही मर्यादेपर्यंत चित्त मार्ग सत्याचा बोध प्राप्त केलेला असतो, पण त्यांना याचा पूर्ण बोध प्राप्त झालेला नसतो. अधिक उन्नत स्तरावर पोहोचलेले आर्य यासंबंधीचा अधिक बोध प्राप्त करत जातात आणि मुक्ती प्राप्त करतात, ज्यानंतर अंततः त्यांना ज्ञानप्राप्ती होते. आर्य सत्यांना आर्य सत्य यासाठी म्हंटले जाते कारण आर्य जन – ज्यांनी यथार्थाचा निर्वैचारिक बोध प्राप्त केलेला असतो – त्या सत्यांना यथार्थ रूपात पाहतात. त्यातून आपल्याला समजते कीः  

  • केवळ बुद्ध स्वरूपच या सर्वाबाबत पूर्ण बोध प्राप्त करू शकतात आणि निरोध सत्य आणि सत्य मार्ग चित्त प्राप्त करू शकतात. अर्थात, ती क्रमवार प्रक्रिया आहे. 
  • मुक्ती किंवा ज्ञानप्राप्ती साध्य करण्यापूर्वीच आपल्या दुःख सत्यांचा तिरोभाव सुरू झालेला असतो आणि आपण त्याच्या विभिन्न पैलुंमधून मुक्त होऊ लागलेले असतो कारण आपण त्या दुःखांच्या कारणांच्या विभिन्न स्तरांपासून मुक्त होत चाललेले असतो. 

मुक्ती आणि ज्ञानप्राप्तीची प्रक्रिया क्रमवार असते, जी आपण बुद्ध किंवा मुक्त सत्व होण्याच्या फार आधी सुरू झालेली असते. आर्यांना समजणे बुद्धस्वरूपांना समजून घेण्याच्या तुलनेत सोपे असते, कारण ते अजूनही समस्यांचा सामना करत असतात आणि काही आर्य अनियंत्रित पुनर्जन्माच्या फेऱ्यातून मुक्त झालेले नसतात. अशा दृष्टीतून त्यांना समजून घेणे सोपे असते.  

आर्य संघ आपल्याला प्रोत्साहन आणि प्रेरणा देतात की जर आपण त्यांनी अंगीकारलेल्या सुरक्षित दिशेने क्रमबद्ध रीतीने मार्गस्थ झालो, तर आपणही मुक्ती आणि ज्ञानप्राप्तीच्या अंतिम लक्ष्यापर्यंत पोहचू शकतो. जरी आपण त्या मार्गाने जाऊ शकलो नाही, तरी काही अंशी आपल्या दुःखापासून मुक्ती मिळवण्यात तरी आपण यशस्वी होऊ शकतो कारण आपण काही अंशी त्या अज्ञानातून मुक्त झालेले असू , जे दुःखाचे कारण असते. हे फक्त या गोष्टीवर अवलंबून असते की आपण यथार्थावर आपले लक्ष कशा रीतीने केंद्रित ठेवू शकतो. जर तुम्ही अजूनही आर्य स्तरावर असाल, तर तुम्ही पूर्ण वेळ लक्ष केंद्रित ठेवू शकणार नाही, पण तुम्ही बुद्धत्व प्राप्त केलेले असेल, तर ते शक्य होईल.  

मुक्ती आणि ज्ञानप्राप्ती एकच नाहीत. त्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मुक्ती ती अवस्था आहे, ज्यात आपण अनियंत्रित पुनर्जन्माच्या फेऱ्यातून मुक्त झालेले असतो, त्या स्थितीत आपण अर्हत, अर्थात मुक्तीप्राप्त सत्व असतो. ज्ञानप्राप्तीची अवस्था ती आहे, ज्यात आपण केवळ भावनात्मक अंधकारातून मुक्त होत नाही – जसे तणावदायी भावना आणि आपल्या अस्तित्वाविषयीचे अज्ञान, यातूनच मुक्त होत नाही – तर ज्ञानासंबंधीच्या अंधकारातून – अविद्येच्या निरंतर सवयीतूनही मुक्त होतो.  

दुसऱ्या शब्दात सांगायचे तर, असंभव गोष्टींच्या कल्पनेवर विश्वास ठेवण्याच्या आपल्या सवयींमुळे आपले मानसिक कार्यघटक कल्पना करत राहतात आणि आपण विश्वास ठेवतो की ते यथार्थ आहे. यातून आपल्या तणावदायी भावना जन्मास येतात. जेव्हा आपण या भ्रामक कल्पना यथार्थ आहेत, अशा प्रकारच्या अंधविश्वासातून मुक्त होतो, तेव्हा आपल्याला मुक्ती प्राप्त होते. आपल्याला बोध होतो की हा सर्व कचरा आहे, आणि जरी गोष्टी तशा दिसत असल्या तरी ते त्यांचे वास्तव रूप नाही. या स्तरावर आपली बोधक्षमता सीमितच असते, आणि गोष्टींना विभागांमध्ये वाटून पाहण्याची आपली वृत्ती कायम असते, पण आपल्याला हा बोध होतो की ते त्यांचे यथार्थ रूप नाही. 

आण्विक भौतिकीच्या अगदी सामान्य स्तरावरही आपण पाहू शकतो की परमाणु असतात आणि बल क्षेत्रे असतात, पण कोणत्याही गोष्टीच्या भोवतालात अशी एखादी मूर्त रेखा नसते, जी म्हणते की, ‘या रेखेच्या या बाजूस ती गोष्ट आहे आणि त्या बाजूला ती नाही.’ गोष्टी तितक्या मूर्त स्वरूपात नसतात, जशा त्या भासमान होतात. जर आपण स्वतःला अशा संज्ञानात्मक अंधकारातून मुक्त करू शकलो, ज्या भ्रामक प्रतिमा निर्माण करतात, तर आपले मन त्या कल्पना करणे बंद करेल आणि आपल्याला ज्ञानप्राप्ती साध्य होईल. जेव्हा आपल्याला ज्ञानप्राप्ती साध्य होते, तेव्हा आपण एकाच वेळी गोष्टींमधील परस्परसंबंध पाहू शकतो. त्यामळे आपल्याला इतरांना मुक्ती आणि ज्ञानप्राप्तीचा मार्ग दाखविण्यासाठीच्या कुशल विधींचा बोध होतो. 

जेव्हा आपण आर्यांविषयी बोलतो, तेव्हा आपण फक्त त्या बोधिसत्व आर्यांविषयी बोलत नसतो, जे ज्ञानप्राप्ती साध्य करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आपण त्या आर्यांविषयीही बोलत असतो, जे फक्त मुक्तीचे उद्दिष्ट बाळगतात. जेव्हा आपण सुरक्षित दिशेच्या संदर्भातून त्रिरत्नांविषयी बोलतो, तेव्हा आपण जे केवळ मुक्तीसाठी प्रयत्नशील आहेत किंवा जे मुक्ती व ज्ञानप्राप्ती दोन्हीसाठी प्रयत्नशील आहेत, अशा बोधिसत्वांविषयी बोलत असतो, केवळ ज्ञानप्राप्तीचे उद्दिष्ट असलेल्या बोधिसत्वांविषयी बोलत नाही.

त्रिरत्नांबाबत दृढ विश्वास विकसित करणे 

जेव्हा आपण संसारात कशा रीतीने गुंतलेले आहोत आणि त्यापासून कसे मुक्त होता येईल, या संदर्भातून दोन सत्ये आणि चार आर्य सत्ये समजून घेतो, तेव्हा आपण दृढ विश्वास प्राप्त करतो की गहनतम धर्म रत्न खरोखरच अस्तित्वात आहे आणि ते सत्य आहे. आपण स्पष्टपणे समजू शकतो की असंभव गोष्टींविषयी भ्रामक प्रतिमा उत्पन्न करणारी मिथ्या दृष्टी आपल्या मानसिक कार्यघटकाचा अंतर्भूत गुण नाही. का? कारण जेव्हा आपण अज्ञान विरोधी ध्यानावर लक्ष केंद्रित करतो, तेव्हा त्यापासून मुक्त होऊ शकतो. 

दुसऱ्या शब्दात सांगायचे, तर जेव्हा तुम्ही गोष्टींच्या अस्तित्वाविषयीच्या बोधावर ध्यान केंद्रित करता, तेव्हा तुम्ही भ्रामक प्रतिमा अनुभवत नाही आणि तुम्ही निश्चितपणे त्यांच्यावर विश्वासही ठेवत नाही. जर तुम्ही या बोधावर, या मार्ग सत्यावर पूर्णतः ध्यान केंद्रित करू शकला, तर आपल्याला निरोध सत्याची प्राप्ती होईल आणि याला तर्काचा आधार आहे. तुम्ही ही पुष्टी करून घेऊ शकता की हे यथार्थ आहे आणि त्यातूनच हा प्रभाव उत्पन्न होतो. त्यानंतर तुम्हाला दुःख आणि सामान्य सुखाच्या चढउतारांची अनुभूती होणार नाही आणि तुम्ही पुन्हा पुन्हा होणाऱ्या अनियंत्रित पुनर्जन्माच्या फेऱ्यातून मुक्त व्हाल. 

इथे तुम्ही आक्षेप घेऊ शकता की, ‘जर तुम्ही सदासर्वकाळ अज्ञानावर ध्यान केंद्रित करत राहाल, तर तुम्हाला ज्ञान किंवा बोध प्राप्ती होणार नाही’ तर काय सर्वात प्रबळ आहे – अज्ञानावर ध्यान केंद्रित राखणे, जे यथार्थाशी अनुरूप नाही, कि बोधावर ध्यान केंद्रित करणे, जे यथार्थाला अनुरूप आहे? 

जर आपण याचे विश्लेषण केले तर आपण पाहू शकतो की अज्ञानाचे समर्थन करणारे कोणतेही सक्षम कारण नसते, तर तिथेच योग्य बोधाला तर्काचा आधार असतो. गोष्टी कारण आणि परिस्थितीतून उत्पन्न होतात, त्या स्वतःच्या क्षमतेवर स्वतःच अस्तित्वात नसतात.  या शिवाय जर आपण सदासर्वकाळ योग्य बोधावर ध्यान केंद्रित करू शकलो तर त्याचा प्रभाव पडतो आणि आपल्याला दुःखाची अनुभूती आणि सांसारिक पुनर्जन्माच्या फेऱ्यातून जावे लागत नाही. 

हे आपल्याला पुन्हा चार आर्य सत्यांकडे घेऊन जाते. आपले उद्दिष्ट काय आहे? आपण सदासर्वकाळ दुःख भोगू इच्छितो का? जर आपली अशी इच्छा असेल, तर आपण अज्ञानावर ध्यान केंद्रित करत राहू आणि दुःख भोगत राहू, हे अगदीच स्पष्ट आहे. तुम्ही असे करू इच्छित असाल, तर तुमचे त्यासाठी स्वागत आहे. पण तुम्हाला या सर्वापासून मुक्ती हवी असेल, जे बौद्ध आध्यात्मिक मार्गाचे उद्दिष्ट आहे, तर ही गोष्ट एकदम स्पष्ट आहे की तुम्हाला यथार्थावर आधारलेल्या बोधावर तुमचे ध्यान केंद्रित करायला हवे. 

शरणागतीविषयीचा हा दृष्टिकोन प्रामाणिक बोधातून उत्पन्न होतो आणि तेव्हा तीनही शरणागती सत्य असल्याचा आपला विश्वास दृढ होतो. तेव्हा आपण ही पूर्वधारणा किंवा आशा ठेवत नाही की जर आपण या दिशेने वाटचाल करत राहिलो, तर आपण दुःखातून मुक्त होऊ कारण आपल्याला हा विश्वास असतो की ‘आपल्या शिक्षकांनी सांगितले होते की असे होईल.’ आपला विश्वास प्रामाणिक बोधावर आधारलेला असेल, जो निष्कर्षगत बोध आणि तर्कावर आधारित असेल. 

प्रामाणिक बोध दोन पद्धतींनी प्राप्त करता येऊ शकतो – एक तर निष्कर्षाच्या माध्यमातून तर्काच्या आधारे किंवा पाहून, ऐकून वा निर्वैचारिक पद्धतीने स्वतः अनुभूती घेऊन. दुसऱ्या प्रकारच्या बोधासाठी तुम्ही अतिशय ग्रहनक्षम असणे आवश्यक असते, जेणेकरून तुम्ही स्वतः त्याची अनुभूती घेऊ शकाल आणि अशा प्रकारे तुम्हाला प्रामाणिक बोध प्राप्त करण्यासाठी निष्कर्षाला आधार बनवून सुरुवात करावी लागते. 

आध्यात्मिक मार्गावरील प्रगती 

आता, आपण चौथी पंक्ती पाहू:

मला प्रेरणा द्या की मुक्ती देणाऱ्या मार्गचित्ताचे हे मूळ मला रूजवता येईल.

जेव्हा आपण मुक्तीच्या चित्तमार्गांची चर्चा करतो, तेव्हा त्यांना अनेक प्रकारे सादर करता येऊ शकते, यातील एक मार्ग प्रेरणेच्या तीन स्तरांचा आहे, जो सामान्यतः तिबेटी संज्ञेत ‘लाम-रिम’(श्रेणीबद्ध मार्ग)  म्हणून ओळखला जातो. हे श्रेणीबद्ध मार्ग तीन प्रागतिक उद्दिष्टे आहेतः 

  • पहिला स्तर पुनर्जन्माचा नीचतम स्तर टाळण्यासंबंधी आणि चांगला पुनर्जन्म प्राप्त करण्यासंबंधी आहे. आपण चांगला पुनर्जन्म प्राप्त करू इच्छितो, ज्यात दुःख कमी असेल कारण तेव्हा आपल्याला आध्यात्मिक मार्गावर पुढे जात राहण्यासाठी अनुकूल स्थिती उपलब्ध असेल. जर आपण एखाद्या झुरळाच्या रूपात पुनर्जन्म घेतला, तर आध्यात्मिक विकासाच्या दृष्टीने आपण फार काही करू शकणार नाही. निकृष्ट पुनर्जन्मापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपल्याला सापेक्ष सत्य, अर्थात कारण व प्रभावासंबंधीच्या भ्रामक दृष्टिकोनातून मुक्त व्हायला हवे. निष्कृष्ट पुनर्जन्माचे मुख्य कारण विनाशकारी वर्तन हेच असते आणि आपण आपल्या कृतीच्या परिणामांबद्दल अनभिज्ञ असल्याने विनाशकारी वर्तन करतो किंवा आपल्याला वाटत असते की अशा वर्तनातून आपल्याला आनंद लाभेल. 
  • मध्यवर्ती स्तराचा संबंध तीन प्रकारच्या यातनांपासून मुक्ती मिळवण्याच्या उद्दिष्टाशी असतो – दुःख, सामान्य सुख आणि या दोन्हींचा आधार, जो अनियंत्रित पुनर्जन्माच्या रूपात आपण अनुभवत असतो. हे साध्य करण्यासाठी आपल्याला शून्यतेसंबंधीचा बोध घेऊन गहनतम सत्याबाबतच्या आपल्या भ्रमापासून मुक्ती मिळवण्याची गरज असते. वास्तविकतः आपल्याला सदासर्वकाळ चार आर्य सत्यांचा बोध प्राप्त करण्याची गरज असते. या सर्व गोष्टींवर एकाच वेळी लक्ष केंद्रित करणे फार कठीण असते, त्यामुळे आपल्याला या स्तरापासून पुढे जाण्याची आवश्यकता असते. 
  • उन्नत स्तर तो असतो, जेव्हा आपण बुद्धांची ज्ञानोदयाची अवस्था प्राप्त करतो, जेणेकरून आपण प्रत्येकाची अधिकाधिक मदत करू शकू. गहनतम सत्यावर आपले ध्यान केंद्रित ठेवत आपण सापेक्ष सत्याचा बोध प्राप्त करतो. केवळ एखादा बुद्धच दोन्ही सत्यांवर एकाच वेळी ध्यान केंद्रित करू शकतो. 

जर आपण या ओळीकडे लक्षपूर्वक पाहिले, ‘दोन सत्यातून चार सत्यांकडे; चार सत्यांकडून तीन शरणागतीकडे’ , तर आपल्या लक्षात येईल की हे वर सांगितल्या गेलेल्या तीन स्तरांचे मूळ आहे. आणि त्या साधनांचे मूळ आहे, ज्या त्या लक्ष्य प्राप्तीला संभव करतात. यात सांगितले गेले आहे की हे मूळ आहे आणि मूळ काही बीज नसते. मूळच एखाद्या झाडाला स्थिरता आणि बळ प्रदान करते. जर आपण तर्कावर आधारित विश्वास प्राप्त केला की तीन उद्दिष्टांना प्राप्त करणे संभव आहे, त्यांचे काहीतरी अस्तित्व आहे आणि त्यांना आपण स्वतः प्राप्त करू शकतो, ही गोष्ट व्यावहारिक आहे, तर निःसंदेह त्यातून आपल्याला बळ आणि स्थिरता लाभेल, जी उद्दिष्टांच्या दिशेने पुढे जाण्यासाठी आध्यात्मिक मार्गावर आपल्याला बळ आणि ऊर्जा बहाल करेल. 

इतर सादरीकरणात सांगितले गेले आहे की तुमच्या आध्यात्मिक गुरूंसोबतचे आरोग्यदायी नाते हे तीन स्तरांचे मूळ आहे आणि तुम्ही हे मूलतः सर्व लाम-रिम ग्रंथात पाहू शकता. आपण आपल्या गुरूकडून घेत असलेल्या प्रेरणेच्या संदर्भातून हे आरोग्यदायी नाते संपूर्ण आध्यात्मिक मार्गाचे मूळ आहे. आणि ही प्रेरणाच आपल्याला उद्दिष्टांच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी बळ आणि ऊर्जा प्रदान करते. 

आध्यात्मिक मार्गावर आपण स्थिरतापूर्वक कसे पुढे जावे, यासाठीचे दोन घटक आहेतः 

  • एक मार्ग आहे की आपण आपल्या आध्यात्मिक गुरूंसोबतच्या संबंधांतून बळ आणि प्रेरणा घ्यावी. त्या आधारे, आपण तर्क करतो की, ‘माझे गुरू माहितीचा प्रमाण स्रोत आहेत. त्यामुळे माझे गुरू जे सांगतात की ज्ञानप्राप्ती मिळवणे संभव आहे, तर ते योग्य आहे. माझे गुरू कपोलकल्पित गोष्टी सांगण्याचे काही कारणच नाही.’ त्यामुळे इथे विशिष्ट प्रकारचा तर्क अंतर्भूत असतो. पण अधिकांश लोक याची भावनिक स्तरावर अनुभूती घेतात, जिथे गुरू आपल्याला भावनात्मक रीत्या प्रेरित करतात, जेणेकरून आपल्याला या मार्गावर पुढे पाऊल टाकण्याची असाधारण शक्ती मिळते. हे बोधिचित्त विकसित करण्याच्या दोन प्रकारातील पहिल्या प्रकाराशी मिळतेजुळते आहे. या प्रेरणेसह आपण सापेक्ष बोधिचित्त विकसित करायला सुरुवात करतो, ज्यातून आपण इतरांची मदत करण्यासाठी प्रेरित होतो आणि त्या नंतर आपण असे करणे शक्य असल्याच्या विश्वासावर ज्ञानप्राप्ती साध्य करण्याच्या दिशेने आकर्षित होतो. तद्नंतर तर्कामुळेच आपल्याला विश्वास प्राप्त होतो की हे उद्दिष्ट साध्य करणे शक्य आहे. 
  • तेच दुसरीकडे, जेव्हा आपण साधनेच्या त्या विधीबाबत विचार करतो, ज्याच्या साहाय्याने आपण प्रथम गहन बोधिचित्त विकसित करतो, तेव्हा आपल्याला छंदात सांगितल्यानुसार शून्यतेबाबत दृढ विश्वास प्राप्त होतो. सर्वप्रथम आपण हा विश्वास प्राप्त करतो की ते उद्दिष्ट साध्य करणे शक्य आहे, आणि नंतर आपण वास्तवात ज्ञानप्राप्तीसाठी आपले हृदय उदार व विशाल बनविण्यासाठी अभ्यास साधनेच्या भावनात्मक स्तरावर काम करायला सुरुवात करतो. 

आध्यात्मिक मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी दोन्ही मार्ग वैध आहेत आणि बाकी सर्व आपल्या स्वतःच्या स्तरावर किंवा क्षमतेवर अवलंबून असते. ग्रंथांमध्ये सांगितले गेले आहे की फार तीक्ष्ण मानसिक क्षमता आणि बुद्धी असणाऱ्या व्यक्तींना तर्कावर आधारित प्रस्तुती आपल्या व्यक्तित्वाच्या अनुकूल वाटेल, तर जे लोक इतके ग्रहणशील नसतील, त्यांना भावनात्मक स्तरावर काम करणे अधिक सोपे वाटेल. या दुसऱ्या वर्गासाठी गुरूंकडून लाभलेली प्रेरणा आणि प्रेम व करुणेच्या आधारावर विकसित भावावर विश्वास ठेवणे अधिक उपयुक्त असते. 

अनेक कारणांसाठी मला वाटते की या दोन्ही पद्धतींमध्ये संतुलन ठेवणे चांगले आहे. आणि आपण त्यात तिसरा धार्मिक पैलूही जोडू शकतो. काही लोकांना साधकांद्वारे हजारो वर्षांपासून केल्या जाणाऱ्या कर्मकांडात भाग घेतल्याने ज्ञानप्राप्तीच्या मार्गावर मार्गक्रमण करण्याची प्रेरणा लाभते. बौद्ध मार्गावर मार्गक्रमण करताना इतर पद्धतींना आपण या कारणास्तव दुय्यम लेखता कामा नये कारण आपल्याला तो मार्ग स्वीकारण्याची विशिष्ट पद्धती सोयीची वाटते. जर आपण स्वतःला आणि स्वतःच्या क्षमतांना विकसित करू इच्छित असू, तर आपल्याला तीनही पद्धतींमध्ये संतुलन राखायला हवे. 

परमपूज्य दलाई लामांद्वारे रचल्या गेलेल्या एका विशिष्ट प्रार्थनेतील छंदाची ही एक आधारभूत प्रस्तुती आहे. जसे की माझे गुरू नेहमी सांगत असत की , जसे तुम्ही एका गायीचे दूध काढता, तसेच या छोट्या छोट्या छंदातूनही सार्थक ज्ञान प्राप्त करणे शक्य आहे. 

प्रश्नोत्तरे 

चार आर्य सत्यांचा व्यावहारिक उपयोग 

जर माझा कोणी मित्र सतत चिंतेत असेल, तर मी त्याला शांत राहण्याचा आणि चिंता न करण्याचा सल्ला देऊ शकतो. आपण स्वतःसोबत इतरांनाही करून द्यायला हवी, अशी ही सूचना आहे. पण मी स्वार्थी होऊन इतरांशी व्यवहार करत असू, तर तेव्हा वापरण्याजोगा एखादा मंत्र किंवा सूचना आहे का की जेणेकरून मला स्वतःचे परीक्षण करण्याची आठवण राहील की माझ्या आत्मकेंद्रित मनाची कल्पना कुठे आहे आणि यथार्थ काय आहे? 

महान तिबेटी गुरू त्सोंगखापा यांच्या मते, जेव्हा आपण निर्वैचारिक पद्धतीने शून्यतेवर केंद्रित असतो, केवळ ती स्थिती सोडून बाकी सर्व स्थितीत आपले मानसिक कार्यघटक असंभव रीतीने अस्तित्वमान असण्याची कल्पना करत असतात. हे सदासर्वकाळ सुरू असते. गहन ध्यानधारणेच्या अनुभूतीचे क्षण सोडून आपली अनुभूती हर क्षण खंडन करण्यास पात्र असते. 

अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ज्या आपल्या अनुभूतीच्या भ्रामक कल्पनांना विखंडित करण्यासाठी साहाय्यक ठरू शकतात. एक उपयुक्त प्रतिमा ही असू शकते की, कल्पनेचा ‘फुगा फोडून टाकणे’, पण असे करते वेळी अद्वैत दृष्टिकोन ठेवायला हवा, जसे इथे कोणी ‘मी’ नसेल, जो पिन घेऊन उभा असेल आणि समोर एखादा फुगाही नसेल की मी जाऊन तो फुगा फोडेन. याचा अर्थ एवढाच आहे की फुगा - गोष्टी कशा रीतीने अस्तित्वात असतात त्याची अतिशयोक्तीपूर्ण कल्पना आहे- जी कल्पना नष्ट करायची आहे. या भ्रामक कल्पना अशा असू शकतात की, ‘तू किती वाईट आहेस’ किंवा ‘मी ज्या परिस्थितीत आहे, ती परिस्थिती किती भयंकर आहे.’ आणि आपण त्यांना त्या सर्व कारण आणि परिस्थितींच्या दृष्टिकोनातून आणि अशी अनुभूती घेणाऱ्या इतर सर्वांच्या दृष्टिकोनातून पाहत नाही. तेव्हा आपण फक्त ‘बिचारा मी’ या दृष्टिकोनातून पाहत असतो. आपण फक्त कल्पना करतो की हे सर्व संपायला हवे. 

दुसरी प्रतिमा एखाद्या उघडलेल्या पुस्तकाची आहे, ज्याच्या एका पानावर लिहिलं आहे ‘बिचारा मी हे सर्व दुःख सहन करत आहे,’ आणि दुसऱ्या पानावर ती कठीण परिस्थिती आहे, जी आपण हाताळू शकत नाही. हे एखाद्या भीतिदायक परिकथेसारखे आहे. आपल्या मनात पुस्तक बंद झाल्याची मानसिक प्रतिमा तयार होते आणि त्या सोबतच परिकथेचा अंत होतो. जर आणखी शब्दात सांगायचे, तर आपण याला द्वैतवादाचे पुस्तक बंद होण्यासारखे समजतो. 

जर तुम्हाला एखादा मंत्र हवा असेल, तर आपल्याला जे दिसत असते तो ‘कचरा’ किंवा ‘मूर्खपणा’ आहे, असे तुम्ही म्हणू शकता. मुख्य समस्या ही आहे की आपल्याला ते स्मरणात राहायला हवे. आपल्याला त्याची सर्वात जास्त आवश्यकता तेव्हा असते, जेव्हा आपण फार तीव्र तणावदायी भावना अनुभवत असतो. तिबेटी लोक यासाठी जे उदाहरण वापरतात, ते हे आहे की जेव्हा तुम्हाला वाटते की तुमच्यावर एखाद्या गंभीर कृतीच्या आरोपाचा ठपका ठेवला जात आहे, तेव्हा ‘मी असे काहीही केले नाही, तुम्हाला काय वाटते की मी चोर आणि खोटारडा आहे?’ अशा स्वरूपाच्या प्रबळ मीपणाचा भाव डोके वर काढतो. 

बौद्ध धर्म आणि इतर धर्मांमधील फरक 

तुम्ही सांगितले की इतर धर्मही आहेत आणि त्यातील प्रत्येक धर्म सांगतो की, समस्या तर आहेतच, पण समस्यांपासून मुक्तीही संभव आहे. अर्थात, प्रत्येक धर्म त्याच्या त्याच्या पद्धती सर्वौत्कृष्ठ समजेल, तर या अनुषंगाने बौद्ध धर्माचे वैशिष्ट काय हे तुम्ही विशद कराल का? 

तुम्ही योग्य बोललात. हिंदू, बौद्ध आणि जैन धर्म हे सर्वच अनियंत्रित पुनर्जन्माच्या फेऱ्यातून मुक्ती मिळवण्याविषयी सांगतात आणि हे ही स्पष्ट करतात की मुक्तीची अवस्था नक्की कशी असते. यातील प्रत्येक धर्म सांगतो की हे यथार्थाचा बोधच मुक्तीचा मार्ग आहे आणि ते आपापल्या पद्धतीने यथार्थाची व्याख्या करतात. या दृष्टीने बौद्ध धर्म एक भारतीय धर्म म्हणून ओळखला जाण्यासाठी पात्र आहे. जी गोष्ट बौद्ध धर्माला इतर धर्मांपासून विशेष ठरवते, ती म्हणजे चार आर्य सत्यांची शिकवण होय. बौद्ध धर्माची शिकवण आहेः 

  • इतर धर्म कदाचित दुःखाविषयी स्पष्टीकरण देत असतील, पण बुद्धांनी दुःख सत्याचा उपदेश दिला आहे;
  • इतर धर्म सांगत असतील की विशिष्ट पद्धतीचे अज्ञान दुःखाचे कारण असेल, पण बुद्धांनी गहनतम पातळीवरील अज्ञान, अर्थात सत्य कारणांचा उपदेश दिला आहे. 
  • इतर धर्म ज्याला दुःखाचा वास्तविक अंत समजतात, कदाचित ती अवस्था चिरस्थायी नसेल किंवा ती पूर्णतः स्वतंत्र नसेल. 
  • इतर धर्म ज्या बोधाविषयी सांगतात, तो एका निश्चित अवस्थेपर्यंत घेऊन जात असला तरी तो असा सत्य मार्ग नाही, जो तुम्हाला मुक्तीच्या पूर्णाववस्थेपर्यंत घेऊन जाईल. 

स्वाभाविक आहे की दुसरे धर्मही बौद्ध धर्माबाबत हेच सांगतील. त्यामुळे नक्की काय यथार्थ आहे, हे तुम्हाला स्वतःलाच तपासून पाहावे लागेल. जसे आपण या छंदात पाहिले की आध्यात्मिक मार्गाचा पूर्ण आधार यथार्थाच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे – आणि हे फक्त बौद्ध धर्मासंदर्भातच नव्हे, तर हिंदू आणि जैन धर्माबाबतही खरे आहे. याची तर्क, अनुभव आणि बोधाच्या आधारावर पडताळणी व्हायला हवी.  

या जन्मात अधिक दयाशील, करुणाशील व्यक्ती बनण्यासाठी एखाद्या आध्यात्मिक मार्गाचे अनुसरण करणे आणि मुक्तीच्या इच्छेने केलेले धर्माचरण यात फार मोठा फरक आहे. ज्ञानप्राप्तीविषयी बोलायचे झाल्यास, तुम्ही तर्क आणि शास्त्रार्थाच्या आधारे तपासू शकता की कोणती व्याख्या सर्वात योग्य आहे. पण एखाद्या आध्यात्मिक मार्गाचे अनुसरण करणाऱ्या बहुतांश लोकांचे लक्ष्य वास्तवात मुक्ती मिळवण्याचे नसतेच. ते कदाचित तसं म्हणतीलही, पण त्यांना या गोष्टीचा अंदाजच नसतो की मुक्ती म्हणजे नेमके काय आणि ते तर फक्त या जन्मात आपले जीवन सुधारण्यासाठी प्रयत्नशील असतात. आणि ते ही योग्यच आहे, त्यात काही गैर नाही. 

त्यामुळे जेव्हा परमपूज्य दलाई लामांना विचारले गेले की कोणता धर्म सर्वात चांगला आहे, तेव्हा त्यांनी उत्तर दिले की श्रेष्ठ धर्म तोच आहे आहे, जो एका व्यक्तीच्या रूपात तुम्हाला अधिक दयावान आणि अधिक करुणाशील बनण्यासाठी मदत करतो. प्रत्येक व्यक्ती भिन्न असते आणि त्यामुळे आपण असे म्हणू शकत नाही की करुणा, दया, संयम, क्षमाशीलता विकसित करण्यासाठी एखादा अधिक प्रामाणिक मार्ग आहे. अनेक वेगवेगळ्या धर्मांनुसार या गुणांना समान रूपात विकसित केले जाऊ शकते. हाच धार्मिक एकात्मतेचा आधार आहे.  

आध्यात्मिक मार्गावर कशी प्रगती कराल 

मी मार्गावर प्रगती करण्यासंदर्भात प्रश्न विचारू इच्छितो. आमच्याकडे सोवियत युनियनमध्ये आर्थिक विकासासाठी पंचवार्षिक योजना असते. तुम्ही बौद्ध साधना सरू करू इच्छिणाऱ्यांसाठी एखादा असा सल्ला देऊ शकता का की ते एक वर्ष, तीन वर्ष किंवा पाच वर्षांच्या कालावधीत काय काय करू शकतात, जेणेकरून ते भरकटणार नाहीत. 

कमीत कमी मी ज्या पद्धतींमध्ये शिकवण घेतली आहे, त्यात एक सर्वसामान्य आणि विश्वननीय मार्ग आहे लाम-रिम, अर्थात श्रेणीबद्ध मार्ग. यात क्रमवार पद्धतीने सांगितले गेले आहे की आध्यात्मिक मार्गावर प्रगती करण्यासाठी कोणत्या गोष्टी समजून घेण्याची, आत्मसात करण्याची आणि विकसित करण्याची आवश्यकता असते.  

लाम-रिम चे अनुसरण करण्याचा पारंपरिक मार्ग हा आहे की तुम्हाला एखादा बिंदू दिला जातो आणि तुम्ही पुढे काय होणार आहे, हे माहिती न करून घेता त्याचा अभ्यास सुरू करता. जेव्हा तुम्ही एका भागाचे ज्ञान मिळवता तेव्हा तुम्ही पुढील टप्प्याकडे वळता. आजकाल पूर्ण मार्गांची माहिती पुस्तकांमध्ये उपलब्ध असते, जेणेकरून तुम्ही सर्व एकदमच वाचू शकाल, पण तरीही तुम्हाला प्रत्येक बिंदुवर पुरेशा वेळ खर्च करावा लागेल. भलेही तुम्ही पूर्ण विषय वाचला असेल, तरीही तुम्हाला हे पाहण्यासाठी मागे जायला हवे की प्रत्येक बिंदू कशा प्रकारे सर्व बिंदुंशी जोडला गेलेला आहे. 

आपल्याला लक्षात ठेवायला हवे की प्रगती कधीच एकरेषीय नसते, तर त्यात सतत चढउतार होत असतात. त्यामुळे अभ्यासाचा एखादा दिवस फार चांगला जातो, तर पुढील दिवस फार चांगला जात नाही, तर त्यात काहीच विशेष नाही. तुम्ही निरंतर अभ्यास करत राहायला हवा. पुनर्जन्म घेतलेल्या माझ्या युवा गुरूंची ही फार आवडती ओळ होती, ‘त्यात काही विशेष नाही.’ तुम्ही जे अनुभवत आहात, त्यात काही विशेष नाही. अभ्यास व्यवस्थित चालला असेल किंवा नसेल, तर काय फरक पडतो? 

त्यामुळे पंचवार्षिक योजना ठरविणे अव्यवहार्य आहे कारण प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारे प्रगती करत असतो. पण परमपूज्य दलाई लामा हे आवश्य सांगतात की, तुम्ही किती प्रगती केली आहे ते दर दिवशी, दर महिन्यात मोजत बसू नये, तर त्याला पाच वर्षांच्या दृष्टिकोनातून तपासावे. आपण तुलना करून पाहू शकतो की पूर्वी आपण समस्यांचा कसा सामना करत होतो आणि आता आपण समस्यांचा कसा सामना करतो. आपले चित्त शांत झाले आहे का? या आधारावर आपण आपली प्रगती तपासू शकतो. 

याच्या दुसऱ्या पद्धतीही आहेत, ज्याला न्गोन्द्रो अर्थात प्रारंभिक साधना म्हणतात, ज्यात तुम्ही १००००० साष्टांग, शरणागती सुत्रांचा अभ्यास करता. लोक अनेकदा अशाच पद्धतीने सुरुवात करतात. मला वाटते की हे दोन दृष्टिकोन धार्मिक शिकवणींकडे पाहण्याच्या दोन पद्धती दर्शवितात. जेव्हा तुम्ही न्गोन्द्रो अभ्यास सुरू करता, तेव्हा ते एखाद्या गुरूकडून प्रेरणा घेऊन करता. शक्यता असेल की तुम्हाला विषयाचे फार ज्ञान नसेल, पण तुम्ही गुरूंच्या असाधारण प्रेरणेने ओतप्रोत असाल आणि तुम्हाला दृढ विश्वास असेल की तुमच्या गुरूंनी सांगितलेली गोष्ट लाभप्रद असेल आणि त्यामुळे तुम्ही १००००० न्गोन्द्रोचा अभ्यास करता.  

मी ज्या दृष्टिकोनावर आधारित शिक्षा प्राप्त केली आहे, ती तीच आहे, ज्या विषयी मी छंदाच्या मदतीने स्पष्ट केले आहे, तो तोच दृष्टिकोन आहे, ज्याची अनेकदा स्वतः दलाई लामा शिकवण देतात. सर्वात आधी तुम्ही मार्गाबाबत विश्वास प्राप्त करता आणि नंतर बोध प्राप्त करता – की हे संभव आहे, लक्ष्य काय आहे, इत्यादी. – आणि त्यानंतर तुम्ही न्गोन्द्रोचा अभ्यास करता. 

अर्थात, एखादी व्यक्ती मध्यम मार्ग निवडू शकते. न्गोन्द्रोची सुरुवात करण्यासोबतच तुम्ही या शक्यतेवर दृढ विश्वास प्राप्त करण्यासाठी अभ्यास सुरू करता की हे लक्ष्य प्राप्त करणे शक्य आहे. किंवा तुम्ही जेव्हा अभ्यास आणि साधना करत असता तेव्हाच तुम्ही न्गोन्द्रोही सुरू करता. अशा प्रकारे या एकत्रित अभ्यासाचे निरनिराळे मार्ग असू शकतात. मला वाटते की तुम्ही विभिन्न तिबेटी गुरूंद्वारा धर्माची शिकवण देण्याच्या पद्धतींचा विचार केला तर ती गोष्ट मी सांगत असलेल्या व्यवस्थेच्या अनुकूल आहे. ही परंपरा नागार्जुनांच्या काळापासून आहे आणि बोधिचित्त विकसित करण्याचे दोन वेगवेगळे मार्ग आहेत – पहिला सापेक्ष आणि दुसरा गहनतम सत्य, किंवा पहिला गहनतम आणि नंतर सापेक्ष सत्य. प्रत्येकाने आपल्याला कोणता अधिक उपयुक्त ठरू शकतो ते स्वतः ठरवायचे असते. 

सारांश 

चार आर्य सत्य कशा रीतीने दोन सत्यांच्या यथार्थाशी आणि परिणामतः तीन बहुमूल्य रत्नांशी संबंधित आहेत, हे फार उन्नत स्तरावरील विश्लेषण आहे. हे विश्लेषण केवळ सर्व सत्य आणि रत्ने कोणकोणती आहेत, यावर प्रकाश टाकत नाही, तर बौद्ध दर्शन आणि साधनेची एक सुस्पष्ट रूपरेखा प्रस्तुत करते. आपण या बोधांचे अधिक विवेचन करण्यासाठी आधारस्वरूप परमपूज्य दलाई लामा यांच्याद्वारे रचित एक संक्षिप्त, पण कुशाग्र छंदाचा वापर केला आहे. या विश्लेषणाचा उल्लेखनीय परिणाम आपला बोध वृद्धिंगत करण्याचा तर्कसंगत क्रम दर्शवतो, शिवाय तो हे ही दर्शवितो की प्रत्येक मूलभूत बौद्ध बोध कशा रीतीने दुसऱ्या बोधाला साहाय्यक असतो. अशा प्रकारे एक संपूर्ण आणि एकीकृत आध्यात्मिक मार्ग प्रकाशित होतो. 

Top