दोन सत्यांपासून चार सत्यांच्या दिशेने

आध्यात्मिक उद्दिष्टाच्या प्राप्तीसाठीचे प्रयत्न 

दोन मार्गांनी आपण आध्यात्मिक उद्दिष्टाच्या दिशेने काम करू शकतोः 

  • निष्ठेच्या आधारावर  – आपली या गोष्टीवर निष्ठा असते की ते उद्दिष्ट प्राप्त करणे शक्य आहे. या निष्ठेच्या आधारावर आपण त्या दिशेने काम करू लागतो आणि जसे जसे आपण त्याबाबत प्रशिक्षित होत जातो, कालांतराने आपण आश्वस्त होतो की ती उद्दिष्ट प्राप्ती साध्य आहे. उदाहरणार्थ, वेदनेपासून कायमस्वरूपी मुक्ततेचे तुमचे उद्दिष्ट असेल आणि तुमची निष्ठा असेल की ते शक्य आहे, तर तुम्ही जसजसे त्या दिशेने काम करता आणि तुमच्या वेदना कमी होऊ लागतात, तसे तुम्हाला दृढ विश्वास प्राप्त होतो की ते उद्दिष्ट साध्य करणे खरेच शक्य आहे. तुमच्या प्रगतीचा भाग म्हणून तुम्ही अधिकाधिक ध्यानधारणा करू लागता आणि त्याद्वारे तुम्ही तार्किकदृष्टाही आश्वस्त होता की ते उद्दिष्ट साध्य करण्याजोगे आहे. 
  • विश्वासाच्या आधारावर – प्रथम तुम्ही विवेक आणि तर्काच्या आधारे आश्वस्त होतो की ते उद्दिष्ट साध्य करण्याजोगे आहे आणि नंतर ते साध्य करण्यासाठी परिश्रम घेऊ लागता.  

जर तुम्ही बोधिचित्ताकडे शास्त्रीय बौद्ध साच्यातून पाहणार असाल, तर बोधिचित्त विकसित करण्यासाठी दोन पद्धतीच्या रूपात दोन दृष्टिकोन सांगितले गेलेले आहेत. 

प्रथम आपण सापेक्ष बोधिचित्त विकसित करतो, ज्याचा उद्देश आपल्या भविष्यातील ज्ञानप्राप्ती हा असतो, जी अद्याप साध्य झालेली नाही, पण होऊ शकते. सर्वांच्या कल्याणाच्या उद्देशाने आपण ज्ञानप्राप्ती साध्य करू इच्छितो, कारण आपल्याला जाणीव होते की प्रत्येकाची मदत करण्यायोग्य बनण्याचा हाच एकमेव मार्ग आहे की आपण ही मनोवस्था प्राप्त करावी, ज्यात कारण आणि परिणामांचे यथार्थ आकलन होईल आणि इतरांना मदत करण्याचे प्रभावशाली मार्ग समजून घेता येतील. आणि शिवाय हे उद्दिष्ट साध्य करणे शक्य आहे, यावर आपली निष्ठाही असते. 

जसजसे आपण उत्तरोत्तर प्रगती करतो, आपण अशी अवस्था प्राप्त करतो, ज्याला गहन बोधिचित्त संबोधले जाते, ज्याचा संदर्भ शुन्यतेच्या बोधाशी असतो, अर्थात या बोधाशी की गोष्टी असंभव मार्गांनी अस्तित्वात नसतात. आपल्याला यथार्थाचा बोध होतो आणि जाणीव होते की आपले चित्त कल्पनारम्यतेत गुंतणारे नाही, तर ते स्वतः यथार्थाची अनुभूती घेणारे आहे. हे आकलन झाल्यावर, आपण तर्काच्या आधारे आश्वस्त होतो की हे उद्दिष्ट साध्य करता येऊ शकते. तिथे आपली निष्ठा दृढ विश्वासात रूपांतरित होते. 

दुसरा दृष्टिकोन सर्वप्रथम यथार्थाचा बोध प्राप्त करण्याशी संबंधित आहे, ज्यात आपल्याला जाणीव होते की ज्ञानप्राप्ती शक्य आहे – आणि म्हणूनच प्रथम गहन बोधिचित्त विकसित करायला हवे. या आधारावर, आपण आश्वस्त होतो की आपण ज्ञानप्राप्ती साध्य करू शकतो आणि त्या दृढ विश्वासामुळे ज्ञानप्राप्तीच्या दिशेने परिश्रम घेतो. या दुसऱ्या दृष्टिकोनाचा उल्लेख महान भारतीय गुरू नागार्जुन यांच्या ‘बोधिचित्त विवरण’ ग्रंथात आढळतो. 

या दृष्टिकोनाला त्या छंदात सादर करण्यात आले आहे, ज्याची आपण यापूर्वी चर्चा केली आहे, जसे की कसे आपण दोन आर्य सत्यांच्या आधारे चार आर्य सत्यांपर्यंत पोहोचतो आणि चार आर्य सत्यांपासून त्रिरत्नांपर्यंत पोहोचतो. या सादरीकरणाचा उद्देश ज्ञानप्राप्ती आणि मुक्ती यथार्थावर आधारित असल्याने त्यांना साध्य करणे शक्य असल्याच्या बोधप्राप्तीसाठी आपल्याला साहाय्यक ठरण्याचा असतो.  

  • मुक्तीचा अर्थ अशा अवस्थेशी आहे, ज्याचा संबंध अनियंत्रित पुनर्जन्माच्या आणि संसाराच्या फेऱ्यातून कायमस्वरूपी मुक्त होण्याशी आहे, जेणेकरून आपण दुःखापासून कायमचे मुक्त होऊ. ज्यांनी मुक्ती प्राप्त केली आहे, अशा मुक्तीप्राप्त जिवांना अर्हता संबोधतात.   
  • ज्ञानप्राप्ती अशा अंधकारापासून कायमस्वरूपी मुक्त होण्याची अवस्था आहे, जो इतरांनाही मुक्ती आणि ज्ञानप्राप्ती साध्य व्हावी, यासाठी साहाय्यक ठरण्याच्या प्रभावी मार्गांच्या बोधापासून आपल्याला दूर ठेवतो. ज्ञानप्राप्ती साध्य झालेल्या जिवांना बुद्ध संबोधतात. 

जेव्हा आपल्याला हा दृढ विश्वास प्राप्त होतो की हे साध्य करणे केवळ शक्यच नाही, तर केवळ शाक्यमुनि बुद्धच नाही, तर आपणही ज्ञानप्राप्ती आणि मुक्ती प्राप्त करू शकतो, तर त्यामुळे आपल्याला आपल्या आध्यात्मिक साधनेत खूप शक्ती आणि स्थिरता प्राप्त होते. तरीही हे समजायला सोपे नाही आणि कोणाकडून असा दावाही केला गेला नाही की हे सोपे आहे. 

दोन सत्ये

आपल्या पहिल्या सत्रात आपण पहिल्या ओळीविषयी चर्चा केली होतीः 

दोन्ही सत्यांचा अर्थ समजून घेऊन, जो की आधार आहे, की सर्व गोष्टी कशा स्वरूपात विद्यमान आहेत. 

पूर्ण चर्चा दोन सत्यांच्या प्रस्तुतीवर आधारलेली आहे, ज्याचा संबंध सर्व गोष्टी कशा स्वरूपात अस्तित्वात आहेत आणि त्यांचे कार्य कसे चालते – दुसऱ्या शब्दात सांगायचे तर, सर्व गोष्टी कशा स्वरूपात विद्यमान आहेत. ही सर्व गोष्टींसंदर्भातील दोन्ही सत्ये प्रमाणित आहेत आणि म्हणून यथार्थही आहेतः    

  • सापेक्ष सत्यः कारणे आणि परिस्थितीच्या आधारावर गोष्टी उत्पन्न होतात. अर्थात त्या गोष्टींची भूमिका आणि त्यांच्या विषयीच्या धारणा, असे स्तरही असतात, ज्यावर गोष्टी अवलंबून असतात. इथे अनुभवाच्या दृष्टीने कारणे आणि परिणाम महत्त्वाचे आहेत, विशेषतः कर्माच्या बंधनकारक स्थितीतून अनुभवास येणारा आनंद किंवा दुःख. 
  • गहन सत्यः जरी गोष्टींचे कारण आणि परिस्थितीच्या अवलंबनातून निर्माण होणे आपल्याला जाणवत नसले, तरीही असंभाव्य मार्गांनी अस्तित्वात असण्याची शक्यता यथार्थाला धरून नाही. अशी कोणतीही यथार्थता नसते, जी आपल्या कल्पनारम्यतेशी किंवा प्रक्षेपणांशी मेळ खाईल. गोष्टींच्या या आत्मनिर्भर आणि कारण आणि परिस्थितीपासून पूर्णतः स्वतंत्र राहून अस्तित्वमान राहण्याच्या अभावाच्या अवस्थेला ‘शून्यता’ म्हणून ओळखले जाते.    

चार आर्य सत्ये 

दोन्ही सत्यांच्या प्रमाणबद्धतेच्या आधारावर बुद्धांना चार आर्य सत्यांचा बोध प्राप्त करणे आणि ती प्रस्थापित करणे शक्य झाले. हे दुसऱ्या ओळीत स्पष्ट करण्यात आले आहेः 

आपण निश्चितपणे हे समजू शकतो की चार आर्य सत्यांच्या माध्यमातून आपण अनियंत्रित रूपात पुनर्जन्म घेत राहिलो, तरी ती स्थिती उलटवूही शकतो. 

चार आर्य सत्यांना उच्च सिद्धीप्राप्त सत्वांनी यथार्थ मानले आहे. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे कारण याचा अर्थ होतो की केवळ बुद्धच चार आर्य सत्यांना यथार्थ मानत नाहीत, तर बुद्धत्व प्राप्त होण्याच्या फार प्राथमिक टप्प्यावर असणारे साधकही याला यथार्थ मानतात. ही अवस्था तेव्हा प्राप्त होते, जेव्हा आपण शून्यत्वाचा निर्वैचारिक बोध, दुसऱ्या शब्दात सांगायचे तर गहन यथार्थतेचा बोध प्राप्त करतो. हा बोध पूर्णतः योग्य आणि निर्णायक असतो. हा बोध निर्वैचारिक असतो, याचा अर्थ आपण गोष्टींना श्रेणीबद्ध मार्गाने अनुभवत नाही. 

जर आपण ‘कुत्र्या’सारख्या श्रेणीतून विचार करत असू, तर तुमच्यात अशी काहीतरी गोष्ट असते, जे तुमचा कुत्रा असणे प्रदर्शित करते. हे प्रदर्शन प्रत्येक व्यक्तीसाठी निराळे असू शकते, पण जेव्हा आपण रस्त्यात किंवा कोठेही कुत्रा पाहतो, तेव्हा त्या विशिष्ट श्रेणीतून ती गोष्ट समजून घेतो. आपण कुत्र्याची एक प्रतिमा मनात निर्माण करतो – अगदी विशिष्ट प्रकारची नव्हे – पण सर्वसाधारण अनुभव निर्मित करतो. जेव्हा एखादी गोष्ट आपण निर्वैचारिक पद्धतीने अनुभवतो, तेव्हा ती अनुभूती एखादी श्रेणी किंवा त्या गोष्टीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चिन्हांच्या माध्यमातून होत नाही. म्हणूनच याला ‘केवळ बोध’ म्हंटले जाते. तुम्ही गोष्टींचे विशिष्ट स्वरूपात वर्गीकरण न करता, त्यांची अनुभूती घेता. 

उच्च सिद्धी पाप्त सत्व, किंवा ज्याला संस्कृतमध्ये आर्य संबोधले जाते, यथार्थाला ‘यथार्थ’ नावाच्या वेगळ्या बॉक्समध्ये वर्गीकृत करून अनुभव करत नाहीत, जसे, ‘आता मी यथार्थाचा अनुभव घेत आहे.’ त्यांना संपूर्ण, योग्य आणि निश्चित बोध होतो, की ते काय अनुभव करत आहेत- अर्थात यथार्थतेचा अनुभव- तोही कोणत्याही बॉक्समध्ये वर्गीकृत न करता. हे फार सोपे नव्हे. जर आपण त्या बॉक्सना विशिष्ट संबोधन देऊन परिभाषित केले नाही, ज्यात गोष्टींचे वर्गीकरण करतो, तरीही सामान्यतः आपण ते तसेच अनुभव करत असतो. आपण सर्व गोष्टींना वेगवेगळ्या बॉक्समध्ये वर्गीकृत करून पाहत असतो. जणू ते त्या बॉक्समध्ये स्वतंत्रपणे स्वतःच्या जीवावर अस्तित्वात आहेत.  

इथे वैचारिक बोधाचे वेगळे स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता नाही. मुख्य मुद्दा आहे की गोष्टींच्या अशा पद्धतीच्या आकलनासाठी तुम्ही बुद्ध असण्याची आवश्यकता नाही. जेव्हा आपण वास्तव निर्वैचारिक रूपात अनुभवतो, तेव्हा आपण चार आर्य सत्यांना यथार्थाच्या रूपात पाहतो आणि त्यांच्याबाबत आपल्याला दृढ विश्वास निर्माण होतो.

ही चार सत्ये कोणती आहेत? पहिले सत्य दुःख आहे. दुसरे सत्य दुःखाचे कारण आहे. तिसरे सत्य दुःख आणि त्यांच्या कारणांचे निवारण आहे. चौथे सत्य दुःख निवारणाच्या दिशेने आणि तद्नुषंगाने ज्ञानप्राप्तीच्या दिशेने नेणारा मार्ग आहे. यांना ‘दुःख सत्य’, ‘समुदय सत्य’ आदी रूपात सत्य संबोधले गेले आहे. 

ही पूर्ण चर्चा पुनर्जन्माच्या संदर्भातून केली जाते – अनादि आणि अनंत मानसिक सातत्य –ज्या विषयी आपण आधीच्या लेखात चर्चा केली आहे. पुनर्जन्मच आधार आहे. आपण क्षण-दर-क्षण अनुभवास येणाऱ्या गोष्टींच्या व्यक्तिगत अनुभवांची चर्चा केली होती, जर तो कारणे आणि परिणामांच्या संदर्भातून येत असेल तर तो अशा प्रकारे अनादी असणार नाही, ज्याची सुरुवात अकारण झाली असेल. तसेच याचा काही अंतही असणार नाही, जिथे तो शून्यत्व प्राप्त करेल. हे असंभव आहे. कारण आणि परिणामांच्या मूलभूत सत्यावर आपल्याला या निष्कर्षाप्रत यायल्या हवे की मानसिक सातत्याचा आरंभही नसतो आणि अंतही. म्हणूनच पुनर्जन्माला यथार्थ मानायला हवे.   

दुःख सत्य 

दुःख सत्याचे तीन घटक असतातः 

  • पहिला प्रकार आपल्या सामान्य दुःखाचा आहे, ज्याला आपण दुःखाचे दुःख म्हणतो. आपण सर्वांनीच दुःखाचा अनुभव घेतलेला असतो, पण दुःख वेदनेसमान असेलच असे काही नाही. सुख आणि दुःख व आनंद आणि पीडा किंवा वेदना या भिन्न गोष्टी आहेत. आनंद आणि पीडा या शारीरिक संवेदना आहेत, तर सुख आणि दुःख या मनोवस्था आहेत. एखादा वेदना अनुभवत असतानाही आनंदी असू शकतो, जसे कठोर शारीरिक व्यायामानंतरचा अनुभव. तसेच एखादा आनंद अनुभवत असतानाही दुःखी असू शकतो, जसे लादलेला शारीरिक संबंध. अशा प्रकारे हे दोन्ही वेगवेगळे घटक आहेत. इथे आपण अशा दुःखाविषयी बोलत आहोत, ज्याचा अनुभव प्रत्येकाने घेतलेला असतो आणि त्यांचं वर्णन सर्व प्रकारच्या दुःखाने भरलेल्या भयंकर प्रकारच्या पुनर्जन्मांच्या रूपात केले जाते. 
  • दुसऱ्या प्रकारच्या दुःखाला परिवर्तनाचे दुःख संबोधले जाते आणि याचा संबंध आपल्या सामान्य सुखाशी आहे. आपल्या सामान्य सुखाची समस्या ही असते की ते चिरंतन नसते आणि ते आपल्याला कायम समाधानी ठेवू शकत नाही. आपल्याला कायम अधिकाधिक सुखाची आस असते, पण आपल्याला अती सुख मिळाले तरी आपण वैतागतो आणि ते दुःखात परिवर्तित होते. एक सोपे उदाहरण म्हणजे पोट दुखेपर्यंत आपले आवडते खाद्य पदार्थ खाणे. त्यानंतर तुम्हाला अधिक खायची इच्छा राहत नाही आणि तुम्ही दुःखी होता. त्यामुळे आपले सामान्य सुख समाधानकारक आणि स्थिर नसते, ही खरी समस्या आहे. आपल्या सामान्य जीवनात चढउतार होत असतात, काही वेळा आपण सुखी असतो, काही वेळा दुःखी, पण याबाबत आपल्याला कोणतीही सुरक्षितता नसते. आपला भोवताल कसाही असो, पण पुढच्या क्षणी काय होईल, हे आपण सांगू शकत नाही. अचानकच आपल्याला दुःखी, कंटाळवाणे किंवा निराश वाटू लागेल. यात सातत्याने चढउतार होतच असतात.  
  • तिसऱ्या प्रकारातील दुःखाला सर्वव्यापी दुःख संबोधले जाते. आणि हाच आपल्या सामान्य सुख-दुःखांशी संबंधित चढ-उताराच्या अनुभवांचा आधार असतो. हा आधार म्हणजेच पुनर्जन्माचा अनियंत्रित फेरा, ज्याला संस्कृतमध्ये संसार संबोधले जाते. आपण पुन्हापुन्हा असे शरीर आणि मन घेऊन पुनर्जन्म घेत राहतो, जे सामान्य सुख-दुःखांशी संबंधित चढ-उताराच्या अनुभवांचा आधार असते. हेच दुःख सत्य आहे, आपली खरी समस्या आहे. आपण यथार्थ पाहू शकलो, तर हेच मुख्य दुःख आहे, जे आपण पाहू शकतो. 

दुःखाची यथार्थ कारणे 

जर आपण यथार्थ पाहू शकलो, तर सत्य रूपात पाहू शकू की आपण जे काही अनुभवतो, त्यात चढ-उतार होतच असतात, त्याचा एक आधार आहे आणि त्यातही चढउतार होत असतात. जेव्हा याचा आपल्याला बोध होईल, तेव्हा आपल्याला समजू शकेल की याची काहीतरी कारणे आहेत. सापेक्ष सत्याबाबतचा मुख्य मुद्दा हाच आहे की सर्व गोष्टींच्या उदयामागे कारणे असतात, तर छंदात वर्णिल्याप्रमाणे अनियंत्रित पुनर्जन्माच्या फेऱ्याचे कारण काय असेल? दुसऱ्या शब्दात सांगायचे तर त्याच्या घटिताचे कारण काय? या चक्राच्या अनवरत चालत राहण्यामागे काय कारण आहे?   

आपल्या मागील सत्रात आपण पाहिले आहे की आपली दुःखाची अनुभूती विनाशकारी वर्तनाचे परिणामस्वरूप असते, आणि जर आपण सामान्य सुख अनुभवत असू तर ते विधायक वर्तनाच्या फलस्वरूप लाभलेले असते. याला आपण कर्माची जोड देतो, ज्याचा अनुवाद मी अनिवार्यता असा करतो. तर आपल्याकडे असे अनिवार्य विनाशकारी वर्तन आणि अनिवार्य विधायक वर्तनही असते. हे बुद्धांच्या विधायक वर्तनासारखे नसते. तर हे वर्तन बंधनकारक असते, ज्यात आपण बंधनकारक रीत्या अहंभावातून आणि आपण योग्यच असायला हवे व योग्यच वागायला हवे, अशा दृष्टिकोनातून विधायक वर्तन करतो. हा फार वेडसरपणा आहे.     

जर आपण अनिवार्यपणे किंवा बंधनकारक वर्तन करत असू, तर त्याचे कारण आपण तणावदायी भावना आणि दृष्टिकोनांच्या प्रभावाखाली असतो, ज्याची चर्चा आपण बंधनकारक विनाशकारी वर्तनाच्या संज्ञेसंदर्भात केली आहे. रागाच्या भरात आपण एखाद्याचा खून करतो, लोभामुळे चोरी करतो, अज्ञानीपणे असा विचार करतो की आपल्या कृत्यांचा काही परिणाम होणार नाही, जसे “काहीही झाले तरी मी अजिबात पकडला जाणार नाही. मी चोरी केली तर मज्जा येईल.” 

या बंधनकारक विनाशकारी वर्तनामागे अनभिज्ञता असते, ज्याचा अनुवाद अनेकदा ‘अज्ञान’ असा केला जातो. पण याचा अर्थ आपण मूर्ख आहोत, असा होत नाही, तर आपण गोंधळलेले आहोत. तर आपण कशा बाबत अनभिज्ञ आहोत? सर्वप्रथम आपण कारण आणि परिणामांबाबत अनभिज्ञ आहोत, जर आपल्याला त्याचे वास्तव ज्ञान असते, आणि त्या बाबत दृढ विश्वास असता, तर आपण विनाशकारी वर्तन केले नसते. आपल्याला सहज बोध झाला असता की अशा वर्तनाने आपल्याला दुःख भोगावे लागेल, जी शिक्षा नसते, तर केवळ आपण निर्माण केलेल्या कारणांचे परिणाम असतात. 

वास्तविक अज्ञानाचे दोन प्रकार असतात. एक तर आपल्याला जाणीव नसते की विनाशकारी कृतीने आपल्याला दुःख भोगावे लागू शकते किंवा आपण याच्या अगदी उलट विचार करतो, जसे ‘मी असाच विनाशकारी वागलो, तर मला आनंद मिळेल. मला हवी तो गोष्ट मी चोरून मिळवली तर मला आनंद मिळेल. मी माझ्या शत्रूंना मारून टाकले, तर मला आनंद मिलेल’ अगदी आपण विनाशकारी वर्तन केल्यावर तत्क्षणी आपल्याला क्षणिक आनंदीही वाटू शकते, ‘आहा, मी तो डास मारून टाकला आहे. आता मला आराम मिळेल.’ पण जिथे दीर्घकालीन परिणामांचा संबंध आहे, काहीही घडले तरी दुःखाचा अनुभव अनिवार्य आहे आणि हा विनाशकारी वर्तनाचा परिणाम आहे. त्यामुळे विनाशकारी वर्तन हे कारण आणि परिणामांबाबतच्या अज्ञानातून घडते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर हे सापेक्ष सत्याबाबतच्या अज्ञानामुळे घडते. मी असे म्हणणार नाही की, हे सर्व समजायला फार सोपे आहे, पण आपण यासाठी परिश्रम घेण्याची आवश्यकता आहे.     

या मुद्द्याचा सारांश पाहिला तर आपण सातत्याने दुःख यामुळे भोगतो कारण आपल्याला कारण आणि परिणामांचा बोध झालेला नाही. जेव्हा आपले मन क्रोध, लोभ, मत्सर अशा भावनांनी भरलेले असते, तर ते आपल्याला हमखास बंधनकारक विनाशकारी वर्तनाच्या दिशेने घेऊन जाते. हे खरेतर आत्मघातकी आहे, कारण परिणामी आपण बहुतांश वेळा दुःखी राहतो. आपण हा संबंध समजून घ्यायला हवा. 

आपण अनुभवत असलेला आनंदही अज्ञानातूनच उत्पन्न होतो, पण इथे अज्ञान गोष्टींच्या गहनतम सत्याशी संबंधित असते. अधिक समर्पकपणे मांडायचे, तर अज्ञान दोन्ही विधायक आणि विनाशकारी वर्तनांना अधोरेखित करते. विनाशकारी वर्तनात आपण गहनतम सत्य आणि सापेक्ष सत्य दोन्हीबाबत अज्ञानी असतो. पण विधायक किंवा सकारात्मक वर्तनात आपण फक्त गहनतम सत्याबाबत अज्ञानी असतो. जणू तुमच्या मेंदूत एक आवाज घुमत असतो, ज्यामागे असा विचार असतो की, “मी काय करायला हवे? मला माझा स्वतःचा मार्ग शोधायचा आहे. मी चिंतित आहे.” असे वाटते जणू आपल्या आत शोध घेण्याजोगा एक यथार्थ छोटा ‘मी’ आहे, जो बोलतो आहे. पण हे वास्तवाला धरून नाही. अशी कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही. ते फक्त आपल्या विचारांचे भाषिक तत्त्व आहे आणि कोणताही छोटा ‘मी’ तक्रार किंवा विचार करत नाही आहे. जेव्हा आपण आपल्या अस्तित्वाच्या स्वरूपाबाबत अनभिज्ञ असतो, तेव्हा आपण गहनतम सत्याबाबतही अनभिज्ञ असतो आणि आपण ‘मी’च्या प्रक्षेपणात स्वतःची ओळख शोधतो. कारण हे यथार्थ नाही, आपण त्याबाबत असुरक्षित आहोत आणि स्वतःला सुरक्षित ठेवण्याच्या प्रयत्नात असतो. अर्थात आपण त्यात कधीच यशस्वी होत नाही. 

आपण आपल्यातल्या छोट्याशा ‘मी’ला सुरक्षित करण्यासाठी तणावदायी भावनांचा उपयोग करतो. आपल्याला वाटते, “मला एखादी गोष्ट मिळाली, तर मला सुरक्षित वाटेल,” आणि त्यामुळे आपल्यात लोभ, आसक्ती आणि हाव असते. आणि नंतर आपल्याला जाणीव होते की, “मी जर हे स्वतःपासून दूर करू शकलो, तर मी सुरक्षित होईन,” आणि त्यामुळे आपल्याला क्रोध आणि घृणा जाणवते. किंवा आपण अगदी मूर्खासारखा विचार करतो, “जर मी असा समज करून घेतला की मला भीती दाखविणारी गोष्ट अस्तित्वातच नाही, तर मला सुरक्षित वाटेल.” याच आधारे आपण विनाशकारी वर्तन करतो, जसे वाढत्या तणावाच्या पातळीकडे दुर्लक्ष करणे. क्रोधित झाल्यावर दुसऱ्यांवर ओरडतो, त्यांना इजा पोहचवतो किंवा हत्या करतो. लोभामध्ये आपण चोरी करतो किंवा दुसऱ्याला दुखावणाऱ्या अनैतिक लैंगिक संबंधांमध्ये गुंततो. अज्ञानामुळे आपण कामसू होतो, आरोग्यास घातक गोष्टींचे सेवन करतो आणि कधीच व्यायाम करत नाही. त्यामुळे हे सर्व गहनतम सत्य – आपल्या अस्तित्वाचे स्वरूप – आणि कारण व परिणामांच्या प्रभावाच्या अज्ञानामुळे घडते. 

विधायक वर्तनाच्या संबंधात भलेही ते तणावदायी भावनांवर आधारलेले नसेल, तरी ते अज्ञानावर आधारलेले असते. आपण स्वतःला पूर्णतः दोषमुक्त होऊन, चांगली व्यक्ती होऊन, आदर्श पालक होऊन किंवा अशाच स्वरूपाच्या विचारांनी स्वतःचे अस्तित्व सिद्ध करू पाहतो -  “यामुळे माझ्या मेंदूत असलेल्या छोट्या ‘मी’ला सुरक्षित वाटेल” – जे कधीच यशस्वी होत नाही. आपल्याला कधीच सुरक्षित वाटत नाही. जरी आपल्याला इतरांची मदत केल्याने आनंद वाटत असला, तरी तो सामान्य आनंद असतो आणि दीर्घकाळ टिकत नाही. त्यासोबत आपल्याला समाधानी वाटणार नाही, कारण कालांतराने आपल्याला पुन्हा वाटेल की आपण पुरेसे चांगले किंवा आदर्श नाही. स्पष्टच आहे की असे होण्यामागचे कारण आपण गहनतम पातळीवर अज्ञानी असतो की आपण कशा रीतीने अस्तित्वमान आहोत. 

तिसऱ्या प्रकारचे दुःख, जे दुःख आणि सामान्य सुखाच्या चढ-उताराच्या अनुभवांचा आधार असते, त्यासाठी आपण एका जटील “प्रतीत्यसमुत्पादचे द्वादश निदान” धोरणाचा उपयोग करतो, ज्याची विस्तृत चर्चा मी इथे करणार नाही, पण ते कर्माशी संबंधित असते. 

सोप्या शब्दात, कर्माचा संबंध बंधनकारकतेशी आहे, ज्याच्या आधारावर आपण विशिष्ट विनाशकारी किंवा विधायक मार्गाने वर्तन करतो. ही बंधनकारकता म्हणजे नक्की काय? बंधनकारकतेचा आशय आपले कोणत्याही गोष्टीवर नियंत्रण नसते, जसे कुणीतरी बंधनकारकरीत्या एखाद्या गोष्टीवर बोटांनी थापटत राहते. हे काहीतरी करण्याच्या इच्छेतून घडते. यासाठीच्या तिबेटी शब्दाचा अर्थ आहे, “मला हे करायचे आहे, मला हे करायची इच्छा आहे, मला हे करायला आवडेल,” जसे कुणावर तरी ओरडावे वाटणे, मिठी मारावी वाटणे किंवा काहीतरी खायची इच्छा होणे. तेव्हा बंधनकारकतेचा घटक सक्रिय होतो आणि आपण तसे वागतो. फक्त अशी विशिष्ट वृत्ती विकसित केल्यानेच ती गोष्ट वारंवार करण्याची इच्छा होते आणि आपले कृत्य विनाशकारी असेल तर आपण दुःख अनुभवतो आणि जर ते विधायक असेल, तर आपण आनंद अनुभवतो. काही निश्चित स्थितींमध्ये ही प्रवृत्ती सक्रिय होते. ती परिपक्व होते आणि नंतर आपण दुःख किंवा आनंद अनुभवतो किंवा आपल्याला एखाद्यावर ओरडावे वाटते किंवा एखाद्याला मिठी मारावी वाटते. 

ही एक अनवरत प्रक्रिया असते जी सतत एकामागोमाग घडत असते, कारण आपल्याला वारंवार इच्छा होते की आपण तशा पद्धतीने वागत राहावे. त्यानंतर आपल्या वर्तनाच्या त्या साच्यात आपण विनाअंत तसेच वागत राहतो कारण आपण सातत्याने तो मजबूत करत असतो. त्यामुळे आपण नेहमी सुखदुःखाचे हे चढउतार अनुभवत असतो.  

इथे सर्वात प्रासंगिक प्रश्न हा असतो की परिणाम उत्पन्न करणाऱ्या या प्रवृत्ती कशा प्रकारे सक्रिय होतात, जेणेकरून आपल्याला वारंवार ते वर्तन करावे वाटते? द्वादश निदानांमध्ये याबाबत फार सुंदर व्याख्या दिली गेली आहे, अर्थात ही व्याख्या फार जटिल आहे. आपल्या जीवनात हे सातत्यपूर्ण चढउतार असतात आणि ते अगदी नाट्यपूर्ण असतील असे काही नाही. जेव्हा आपण झोपलेले असतो, तेव्हाही कदाचित आपण अर्धनिद्रितावस्थेत असू शकतो, ज्या स्थितीत आपल्याला व्यवस्थित झोप येत नसेल, आणि फार आनंदी वाटत नसेल. तर आपण दुःख किंवा सामान्य सुख अनुभवत असतो, तेव्हा आपली मनोवस्था नक्की कशी असते? संस्कृतमध्ये यासाठी तृष्णा ही संज्ञा वापरली जाते, ज्याचा अर्थ तहान असा होतो. इंग्लिशमध्ये याचा अनुवाद ‘क्रेविंग’ असा केला जातो, पण त्या मूळ शब्दाचा अर्थ तृष्णा असाच आहे. 

वास्तविकतः जेव्हा आपण दुःख अनुभवत असतो, तेव्हा आपल्याला दुःखातून मुक्त होण्याची प्रबळ तृष्णा असते, जसे तहान लागल्यावर तुम्हाला त्या पासून मुक्त व्हावे वाटते. जेव्हा आपण सुख अनुभवत असतो, तेव्हा ते सुख संपूच नये आणि ते आणखी मिळावे, अशी तृष्णा असते. हे तसेच असते जसे तुम्हाला तहान लागलेली असते आणि तुम्ही पहिला घोट घेता – पण तो एक घोट पुरेसा नसतो, हो ना? तुम्हाला ते दूर जायला नको असते, ते जास्तीतजास्त मिळावे असे वाटत असते. त्या स्थितीत आपली एका घन ‘मी’वर पकड निर्माण होते, जिथे आपण असा विचार करतो की, ‘मला या दुःखातून मुक्ती हवी आहे’ ‘मला या सुखापासून दूर जायचे नाही.’ आणि त्यातूनच कार्मिक प्रवृत्ती जागृत होते. हेच सर्वव्यापी दुःखाचे कारण असते. अशा रीतीने सुखदुःखांच्या अनुभवाबाबतच्या प्रवृत्ती अशांतकारी भावनांनी मिश्रित बंधनकारक वर्तनातून उत्पन्न होतात आणि या भावना स्वतः गहनतम स्तरावरील यथार्थतेबाबतच्या अज्ञानातून आलेल्या असतात – जसे आपल्या भावना कशा रीतीने अस्तित्वमान आहेत (त्या सतत बदलत असतात) आणि आपण स्वतः कशा रूपात अस्तित्वमान आहोत (एखाद्या शोधल्यावर सापडेल अशा असुरक्षित सत्वाच्या रूपात नव्हे, जो एखाद्या गोष्टीवरील आसक्तीमुळे असुरक्षित असेल.)

हे अज्ञानाचे मूळ कारण आहे आणि ते सकारात्मक आणि विनाशकारी अशा दोन्ही वर्तनांशी जोडलेले आहे. आनंदी किंवा दुःखी असणे आणि ती स्थिती वारंवार उत्पन्न होण्यामागच्या प्रवृत्तीचे तेच कारण आहे. या तृष्णेकडे आपण पाहिल्यास लक्षात येईल की तिचा संबंध आपल्या अस्तिवाबाबतच्या अज्ञानाशी आहे. आपण “मी सुखी आहे किंवा दुःखी आहे, त्याने काय फरक पडतो?” असा विचार करण्याऐवजी विचार करतो की, “ मी केवळ मीच महत्त्वाचा आहे आणि म्हणून मी सुखापासून दुरावला जाऊ नये. मी दुःखी असू नये, हे महत्त्वाचे आहे,” आपल्या अनियंत्रित पुनर्जन्माच्या फेऱ्याच्या सातत्यपूर्णतेचे खरे कारण दोन सत्यांबाबतचे अज्ञान हेच आहे. 

दुःखाच्या कारणांचा सत्य निरोध किंवा निवारण 

तिसरे सत्य आहे सत्य निरोध, ज्यात दुःखाच्या कारणांचे निवारण वा निरोध केला जातो आणि त्यामुळे दुःखही संपते. वास्तवाबाबतचे अज्ञान कायमचे कसे संपवायचे? जेव्हा तुम्ही हा बोध प्राप्त करता की कोणतीही गोष्ट यथार्थ नाही, तेव्हा त्याला काही आधार नसतो. ती गोष्ट एखाद्या वास्तव गोष्टीच्या अनुरूपही नसते, आणि त्यामुळे त्याची पुष्टीही होऊ शकत नाही. 

उदाहरणार्थ, जेव्हा आपण थिएटरमध्ये एखादे दृश्य पाहतो, तेव्हा त्याच्या मागे लाकडी काठ्या असतात, ज्या त्यांना पकडून असतात. तिबेटी भाषेतील यासाठीच्या संज्ञेचा अर्थ आहे की एखाद्या असंभव गोष्टीच्या आपल्या कल्पनेला धरून ठेवण्यासाठी कोणत्याही काठ्या अस्तित्वात नसतात. जेव्हा त्या दृश्याला आधार द्यायला काहीच नसेल, तर काय होईल? ते खाली पडेल. 

जर तुम्ही तुमच्या गैर प्रक्षेपण किंवा कल्पनांना पकडण्यासाठी आधार नसल्याच्या तथ्यावर ध्यान केंद्रित करू शकलात की ध्यानधारणेच्या साहाय्याने, कालांतराने तुम्ही या बोधावर लक्ष केंद्रित ठेवू शकता. मग ते दृश्य पुन्हा कधीच उभे राहणार नाही. आपल्या मेंदूतल्या छोट्या मीचे नाटक ‘मी काय करू?’ ‘मी आदर्श असायला हे’ आणि ‘मला स्वतःचा मार्ग शोधायला हवा’ हे सर्व पूर्णतः बंद होईल. जेव्हा आपण पाहू शकतो की आपल्या प्रक्षेपणांना आधारच नाही, तेव्हा आपले मन असंभव गोष्टींचे प्रक्षेपण करत नाही. या आधारे, आपण तशा प्रवृत्तीने वर्तन करणार नाही कारण त्यांना सक्रिय करणारी यंत्रणाच अस्तित्वात असणार नाही. आणि त्यानंतर हेही असणार नाहीः ‘मी, मी, मी...मला आनंदी व्हायचे आहे आणि मी दुःखी असूच शकत नाही.’  

जर ती प्रवृत्ती सक्रिय करण्यासाठी यंत्रणाच नसेल, तर तुम्ही म्हणूच शकणार नाही की ती प्रवृत्ती शिल्लक आहे. एखाद्या परिणामासाठी प्रवृत्ती तेव्हाच असू शकेल परिणामाची संभावना असेल. त्यामुळे प्रवृत्तीची सर्व संकल्पनाच त्याच्या परिणाम घटिताशी संबंधित आहे. जर परिणाम नसेल, तर तो उत्पन्न करणारी प्रवृत्ती अस्तित्वात असणारच नाही.  

अशा रीतीने आपण वारंवार उत्पन्न होणाऱ्या अनियंत्रित पुनर्जन्माच्या चक्राला उलटवू शकतो. अगदी आपले मन अनादि काळापासून प्रवृत्तींनी भरले असले तरी त्यांना सक्रिय करणारी यंत्रणा नसेल, तर त्यांचे अस्तित्वच शिल्लक राहणार नाही. तेव्हा आपण यथार्थाच्या बोधाने परिपूर्ण होतो, आणि अधिक प्रवृत्ती निर्माण करणारे बंधनकारक वर्तन करत नाही. अशा रीतीने, अनियंत्रित पुनर्जन्माचे चक्र आणि भावनिक चढउतारांचा आधार कायमचा नष्ट होतो. हा वास्तविक सत्य निरोध आहे आणि आपल्याला मुक्ती प्राप्त होते. 

सत्य निरोध प्राप्त करण्यासाठी सत्य चित्त मार्ग 

चार आर्य सत्यांचा अनुवाद सामान्यतः ‘सत्य चित्त मार्ग’ असा केला जातो आणि त्याचा संदर्भा बोधप्राप्त मनोवस्थेशी अर्थात उद्दिष्टापर्यंत नेणाऱ्या मार्गाशी असतो. हाच दोन सत्यांचा योग्य आणि निर्णायक बोध आहे. आपल्याला हे जितके अधिक सवयीचे होईल, तसे कालांतराने सदासर्वकाळ आपल्याजवळ हा बोध असेल. हा अनियंत्रित पुनर्जन्माच्या फेऱ्याचे सत्य निवारण करणारा चित्त मार्ग असेल. 

निष्कर्ष 

अशा रीतीने आपण दोन सत्यातून चार आर्य सत्ये प्राप्त करतो. 

आपण संसारात कसा प्रवेश करतो? ज्या छंदाचे आपण विवेचन करत आहोत, त्यानुसार चार आर्य सत्यांमधील पहिल्या दोन सत्यांमध्ये अर्थात, सत्य दुःख आणि सत्य कारणे यात यासंबंधी चर्चा केलेली आहे. मूलतः आपण दोन सत्यांबाबतच्या आपल्या भ्रमामुळे आपण संसारात प्रवेश करतो. एकतर आपल्याला यथार्थाची जाणीव नसते किंवा आपण कल्पना करतो की ती खरे वास्तव काय आहे, त्यामुळे वेगळी असेल. आपण यापासून मुक्ती कशी मिळवू शकतो? तर तिसऱ्या आणि चौथ्या आर्य सत्यातून अर्थात, सत्य निरोध आणि सत्य चित्त मार्ग. त्यामुळे यथार्थातेची दोन सत्ये माहीत नसण्याच्या स्थितीतून आपण चार आर्य सत्यांपैकी पहिल्या दोन सत्यांपर्यंत पोहचतो आणि दोन सत्यांच्या बोधानंतर उर्वरित दोन सत्यांपर्यंत पोहचतो. 

हा जरी गुंतागुंतीचा विषय असला तरी, अशाच रीतीने आपण बौद्ध शिकवणींचे अनुसरण करून हा दृढ विश्वास प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो की बौद्ध धर्मात वर्णिल्या गेलेल्या लक्ष्यांना साध्य करणे वास्तवात शक्य आहे. आणि आपण आपल्या साधनेच्या साहाय्याने याच लक्ष्यांना साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहतो. एकदा का आपण याचा यथायोग्य बोध घेतला की आपण त्यात समाविष्ट सर्व गोष्टींना एकत्रित करू शकतो. आणि नंतर ध्यानधारणेच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी परिचित होतोः आपण यथार्थ पाहण्याची सवय विकसित करतो. 

अशा रीतीने श्रवण, मनन आणि ध्यानधारणेच्या साहाय्याने आपण दृढ विश्वास प्राप्त करतो की आपण आपल्या साधनेच्या साहाय्याने जे लक्ष्य साध्य करू इच्छितो, ते वास्तवात साध्य करणे शक्य आहे. आणि आपण आपल्या परिश्रमातून स्वतः ते साध्य करू शकतो. अशा रीतीने आपली साधना अधिकाधिक स्थिर होत जाते, कारण ती एखाद्या अशा डळमळीत विश्वासावर आधारलेली नसते की आपण जे लक्ष्य साध्य करू इच्छितो, ते करणे कदाचित शक्य आहे. त्याऐवजी आपण पूर्णतः आश्वस्त असतो. 

Top