आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कर्माची प्रस्तुतता

‘कर्म’ संकल्पना समजून घेताना

आपल्या दैनंदिन जीवनामधील कर्माच्या प्रस्तुततेविषयी आज मी बोलणार आहे. यासाठी सुरुवातीला कर्म म्हणजे काय हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. याची सर्वसाधारणतः दोन स्पष्टीकरणं दिली जातात. एक, आपल्याला विविध प्रकारच्या कृती करण्यासाठी- शारीरिकदृष्ट्या काही करणं, शब्दांद्वारे काही बोलणं, किंवा मानसिक पातळीवर काही विचार करणं यांसाठी- उद्युक्त करणाऱ्या प्रेरक इच्छांकडे ‘कर्म’ ही संज्ञा निर्देश करते. दुसऱ्या स्पष्टीकरणामध्ये शारीरिक व शाब्दिक कृतींच्या बाबतीत वेगळं प्रतिपादन केलं जातं. अशा कृतींसाठी कर्म हे आपल्या शारीरिक कृतींचा अनिवार्य आकार असतं, आपल्या शाब्दिक कृतींचा अनिवार्य ध्वनी असतं, आणि दोन्ही प्रकारच्या कृतींसोबत येणारी व आपल्या मानसिक सातत्यासोबत कायम राहणारी प्रेरक सूक्ष्म ऊर्जा असतं. ‘कर्म’ या संज्ञेसाठी वापरला जाणारा तिबेटी शब्द ‘कृती’ या अर्थाशी जवळीक सांगणारा असला, तरी यातील कोणत्याही स्पष्टीकरणामध्ये कर्म म्हणजेच प्रत्यक्षातली कृती असं म्हटलेलं नाही, हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. 

अशा प्रकारच्या अनिवार्य कर्मजन्य पद्धतींनी एखादी कृती केली की आपल्या मानसिक सातत्यावर काही विशिष्ट प्रकारचे कर्मजन्य परिणाम होतात. यातील सर्वाधिक चर्चा झालेली सकारात्मक वा नकारात्मक कर्मजन्य सामर्थ्यं व कर्मजन्य प्रवृत्ती यांबद्दल बोलू. या दोन्हींमध्ये किंचितसा फरक आहे, आत्ता आपण त्या तांत्रिक तपशिलात जाण्याचं कारण नाही. पुरेशी परिस्थिती उपस्थित असताना परिणामाला किंवा निष्पत्तीला वाव देण्याची क्षमता हा या कर्मजन्य सामर्थ्यं व प्रवृत्तींचा एक पैलू आहे. तांत्रिक परिभाषेमध्ये बोलायचं तर, फळाच्या फोडीप्रमाणे, हे कर्मजन्य घटक ‘परिपक्व’ होतात.

कर्मजन्य सामर्थ्यं व प्रवृत्तींमधून काय परिपक्व होतं?

या कर्मजन्य सामर्थ्यांमधून व प्रवृत्तींमधून अनेक विविध प्रकारच्या निष्पत्ती समोर येतात. आपल्या अनुभवातील प्रत्येक क्षणासोबत येणाऱ्या आनंदाची व दुःखाची काहीएक पातळी जाणवणं, ही यातील सर्वाधिक सर्वसाधारण निष्पत्ती आहे. दुःख असेल तर ते विध्वंसक वर्तनातून निष्पन्न झालेलं असतं आणि आनंद असेल, तर ते रचनात्मक वर्तनातून निष्पन्न झालेलं असतं.

शिवाय, आधीच्या प्रकारच्या कृतीची पुनरावृत्ती करण्याची भावनाही असते. कर्मजन्य परिणामांमधून कर्म थेट परिपक्व होत नाही. सुरुवातीला भावना उत्पन्न होते, म्हणजे कोणावर तरी ओरडावं किंवा कोणाला तरी आलिंगन द्यावं, अशी भावना उत्पन्न होते. त्या भावनेच्या आधारावर ती प्रत्यक्ष कृती करण्याची इच्छा आपल्यामध्ये निर्माण होते. भावना आणि इच्छा याच्यात ठळक भेद असतो. काहीतरी करण्याची भावना असणं म्हणजे ती गोष्ट करावीशी वाटणं. पण किमान इंग्रजीत ‘फिलिंग’ (भावना जाणवणं) या शब्दामध्ये केवळ वाटणं अभिप्रेत नसतं, तर त्याहून अधिक वर्णनात्मक असा काहीतरी अर्थ त्यात असतो. त्यात जाणीवपूर्वकता कमी आहे. आपण आधी केलेल्या एखाद्या कृतीची पुनरावृत्ती करावी अशी भावना आपल्याला जाणवते आणि तशाच प्रकारचं काहीतरी परत आपल्यासोबत घडावं अशा परिस्थितीत पडण्याचीही भावना आपल्याला जाणवत असते. परंतु, आपण एखाद्यासोबत जसं वागलो तसंच ती व्यक्ती आपल्याशी वागत असेल, तर त्याला आपल्या कर्मजन्य सामर्थ्यांची व प्रवृत्तींची निष्पत्ती निश्चितपणे म्हणता येत नाही. त्यांची कृती त्यांच्या कर्मजन्य सामर्थ्यांमधून व प्रवृत्तींमधून निष्पन्न झालेली असते, आपल्या नव्हे, हे इथे स्पष्ट करायला हवं. आपल्या बाजूने परिपक्व होणारी भावना एवढीच की, आपल्याला त्या परिस्थितीत पडावंसं वाटतं, त्या व्यक्तीला भेटावंसं वाटतं, इत्यादी.

या विशिष्ट बाबतीत आपल्या कर्मजन्य सामर्थ्यांतून परिपक्व होणारी दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या जीवनस्वरूपाचा प्रत्यक्ष प्रकार, शरीर व मानसिक क्रियेचा प्रकार. उदाहरणार्थ, आपला मेंदू कुत्र्याचा असेल किंवा आपला मेंदू माणसाला असेल, तर त्यातून आपल्याला भिन्न मानसिक क्षमता अनुभवायला मिळतील. प्रत्यक्षात मानसिक सातत्य आणतात त्यांना कर्मजन्य सामर्थ्यं संबोधता येतं. सस्तन प्राणी म्हणून पुनर्जन्म मिळण्यासाठी त्याची जोड विशिष्ट पालकांच्या शुक्रजंतूशी व बिजांडाशी असते. या अर्थी, आपल्या जीवनरूपाचा प्रकार व शरीर हे आपल्या कर्मजन्य सामर्थ्यांची निष्पत्ती असतं.

या जीवनकाळातील कर्मजन्य परिपक्वता मुख्यत्वे गतजीवनातील कृतींमधून निपजते

दैनंदिन जीवनातील आपल्या अनुभवांचा विचार करताना आपल्याला अनेकदा असं वाटतं की, आपण अनुभवतो त्या आनंदाच्या वा दुःखाच्या भावना आणि आपल्याला काही कृती करण्याबाबत किंवा बोलण्याबाबत जाणवणाऱ्या भावना, हे सगळं या जीवनातल्या आधीच्या कृतींमधील आपलं कर्मजन्य सामर्थ्यं व प्रवृत्ती यांच्या परिपक्वतेमधून आलेलं असतं. यामध्ये नकारात्मक व सकारात्मक वर्तनाचा समावेश होतो. विशेषतः आपल्याशी अतिशय दयाळूपणे वागलेल्यांच्याबाबतीत, उदाहरणार्थ, आपले शिक्षक वा पालक यांच्याबाबतीत हे वागणं असेल तर त्यामागे अतिशय तीव्र प्रेरणा असते. यातील बहुसंख्य परिपक्व होणाऱ्या गोष्टी व परिपक्वतेमधून आपल्या अनुभवाला येणाऱ्या गोष्टी, यांची निष्पत्ती गतजीवनांमधील कृतींतून निर्माण झालेल्या कर्मजन्य सामर्थ्यांतून व प्रवृत्तींमधून झालेली असते. 

आपल्यापैकी अनेकांना, कदाचित आपल्यापैकी बहुतेकांना हा मुद्दा समजणं अवघड जाईल. आपल्यासारख्या पाश्चात्त्यांपैकी बहुतेकांना गतजीवन व भावीजीवन हे विचार पटत नाहीत. तो वेगळा मुद्दा झाला, आणि दुर्दैवाने गतजीवन व भावीजीवनं यांचं विश्लेषण करायला आणि ते पटवून घ्यायला आत्ता आपल्याकडे वेळ नाही. पण मला वाटतं, पुनर्जन्मावर विश्वास न ठेवताही कर्माविषयीची एकंदर चर्चा आपल्या जीवनासंदर्भात व आपल्याबाबत काय घडतं त्याला सामोरं जाण्यासंदर्भात अत्यंत प्रस्तुत ठरणारी आहे.

सजगता, जागरूकता आणि आपल्या अनिवार्य वर्तनाबाबत विचक्षण सावधपणा विकसित करणं

आपण आयुष्यात जे काही अनुभवतो त्याला सामोरं जाण्यासाठी सजगता विकसित करणं गरजेचं असतं. सजगता (अटेन्टिव्हनेस) हा मानसिक घटक आहे आणि तो आपल्याला विशिष्ट उद्दिष्टासाठी मानसिक कृतिशीलता वापरायला मदत करतो. आपण प्रत्येक क्षणी अनुभवतो तेच उद्दिष्ट असेल, तेव्हा पाश्चात्त्य वर्तुळं त्याला ‘माइन्डफुलनेस’ (जागरूकता) असं म्हणतात. वास्तविक ‘जागरूकता’ या मानसिक घटकाचा बौद्ध अर्थ तो नाही. आपल्या मानसिक व भावनिक जीवनांमध्ये काय होतं आहे याबद्दल आपण सजग होतो, तेव्हा ती सजगता गमावली जाऊ नये यासाठी मानसिक डिंकाप्रमाणे आपल्याला रोखण्याचं काम जागरूकता करते. आपण अधिकाधिक सजग होत गेल्यावर आपल्याला एखादी गोष्ट का करावीशी वाटते किंवा एखादी गोष्ट का बोलावीशी वाटते हे अधिक चांगल्या तऱ्हेने लक्षात येतं. काहीतरी करावं अशी भावना आपल्या मनात कधी येते आणि प्रत्यक्षात सुसंगत वर्तन होण्यासाठी अनिवार्य इच्छा आपण कधी अनुभवतो, या दरम्यानचा अवकाशही आपल्या लक्षात येतो.

काही लोक डोक्यात येतं ते विचारही न करता बोलून टाकतात, असं वर्णन आपण अनौपचारिकरित्या करतो. हे लोक काय बोलतात किंवा काय करतात याबद्दल त्यांच्या मनात काही सेन्सॉर नसतो. मनात जे काही येईल ते उत्तेजित होऊन करून टाकणं किंवा बोलणं, असा त्यांचा कल असतो. पण एखादी गोष्ट करण्याची वा बोलण्याची भावना मनात निर्माण होणं आणि त्या भावनेच्या आधारे कृती होणं, यांमध्ये अवकाश असतो, हे लक्षत आल्यानंतर आपल्याला त्या भावनेच्या आधारे कृती करावी का हे ठरवण्यासाठी ‘विचक्षण सावधपणा’ वापरता येतो. एखादी कृती उपयोगी ठरेल की त्यातून बऱ्याच अडचणी निर्माण होतील, याचा विचक्षण दृष्टीने विचार करणं आपल्याला शक्य असतं. त्या कृतीने बऱ्याच अडचणी निर्माण होणार असतील तर ती कृती विध्वंसक मानावी आणि त्यानुसार कृती करू नये. उदाहरणार्थ, “तुम्ही किती घाणेरडा पोशाख केलाय”, असं आपण कोणाला सांगायची गरज नसते. त्याने काही उपयोग होत नाही, हो ना?

तर, मुद्दा एवढाच की, विशिष्ट तऱ्हेने कृती करण्याच्या वा बोलण्याच्या भावना सवयींमधून आलेल्या आहेत हे आपल्याला कळतं- इथे कर्मजन्य सामर्थ्यं व प्रवृत्ती यांच्यासाठीची ढोबळ संज्ञा म्हणून मी ‘सवयी’ हा शब्द वापरतो आहे. या सवयी आत्ताच्या जीवनकाळातून आलेल्या आहेत की गतजीवनामधून, हा मुद्दाच प्रत्यक्षात अप्रस्तुत ठरतो. आपण गतकालीन आकृतिबंधांच्या आधारे, गतकालीन सवयींच्या आधारे अनिवार्यपणे कृती करत असतो आणि आपण या सवयींचे गुलाम असण्यामागे कोणतंही कारण नाही, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. आपण मानव आहोत, प्राणी नाही- त्यामुळे स्वतःच्या अंतःप्रेरणांवर कोणतंही नियंत्रण नसलेल्या स्थितीत आपण कृती करत नसतो. आपण मानव असल्यामुळे आपल्याला बुद्धिमत्ता लाभलेली आहे; काय उपयोगी आहे आणि काय हानिकारक आहे यातला भेद जाणण्याची क्षमता आपल्याकडे असते. गतजीवन अस्तित्वात असेल किंवा नसेल, पण आपल्या वाईट सवयींच्या आधारे कृती करणं मूर्खपणाचं आहे, त्यातून अधिकाधिक अडचणीच निर्माण होतात, एवढं आपल्याला कळू शकतं. आणि आपल्याला अविचारीपद्धतीने स्वतःसमोरच्या अडचणी वाढवायच्या नसतात, त्यामुळे वाईट सवयींच्या आधारे अनिवार्यपणे कृती करण्यावर मात करायचा आपला प्रयत्न असतो. 

अनिवार्य वर्तनाचे पुनरावृत्त होणारे आकृतिबंध व्यसनासारखेच आहेत, हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. आपल्याला दारू, सिगरेट किंवा अंमली पदार्थ यांचं व्यसन लागू शकतं. पण त्याचप्रमाणे जुगार, किंवा लैंगिक संबंध किंवा अगदी लोकांवर ओरडण्याचंही व्यसन लागणं शक्य असतं. या व्यसनांवर मात करण्याच्या अनेक- बौद्ध आणि बौद्धेतर पद्धती आहेत. या पद्धतींचा सद्सद्विवेकाने वापर करायला हवा, अन्यथा आपलं नियंत्रण सुटतं आणि आपण अधिकाधिक अडचणी निर्माण करत जातो.

आपण व्यसनाधीन आहोत, हे ओळखणं व मान्य करणं, हे कोणत्याही व्यसनमुक्ती कार्यक्रमामधील पहिलं पाऊल असतं. हे अत्यंत आवश्यक आहे. अडचणीवर मात करण्यापूर्वी ती अडचण आहे हे ओळखणं गरजेचं आहे. पण काही व्यसनमुक्ती कार्यक्रमांमधून लोकांना असं वाटण्याची शक्यता असते की व्यसनाधीन असणं हीच त्यांची खरी, न बदलणारी ओळख आहे आणि कोणीही व्यसनाधीनतेवर मात करू शकत नाही; आपलं व्यसनाधीन वर्तन कधीही खऱ्या अर्थाने थांबवता येत नाही, असं त्यांना वाटू शकतं. पण बौद्ध दृष्टिकोनातून मात्र आपण सर्व प्रकारची व्यसनं थांबवू शकतो, ती पुन्हा उद्भवणार नाहीत अशी तजवीज करू शकतो, आणि यात आत्मविध्वंसक वर्तनांच्या व्यसनाचाही समावेश होतो. बौद्ध धर्म आचरणारे लोक म्हणून हे आपलं ध्येय असावं.

अनिवार्य वर्तनाच्या आपल्या आकृतिबंधांचा सर्वसंगपरित्याग

अनिवार्य वर्तनाच्या आकृतिबंधांचं व्यसन लागतं आणि त्यावर मात करण्यासाठी सर्वसंगपरित्यागाचा संदर्भ लक्षात घ्यावा लागतो. कशापासूनतरी मुक्त होण्याचा निग्रह आणि ती गोष्ट सोडून देण्याची इच्छा म्हणजे सर्वसंगपरित्याग. यामधील भावना पूर्ण तिटकाऱ्याची व कंटाळ्याची आहे: आपल्या वर्तनविषयक व्यसनांचा आपल्याला कंटाळा येत, मग ती आत्मविध्वंसक नकारात्मक व्यसनं असोत किंवा हळूवार मनाची सकारात्मक व्यसनं असोत. उदाहरणार्थ, सतत संतापणं व ओरडणं याचा आपल्याला कंटाळा येतो किंवा पछाडल्याप्रमाणे आपले हात सतत धुवावेसे वाटण्याचा आपल्याला कंटाळा येतो. त्यामुळे आपल्याला ओरडावंसं वाटलं किंवा नुकतेच हात धुतलेले असतानाही पुन्हा आपले हात धुवावेसे वाटले, तर पुन्हा अशी भावना मनात येण्यापासून स्वतःची सुटका करून घेण्याचा निश्चय आपण करतो. यासाठीचं पहिलं पाऊल म्हणून आपण किमान अशा भावनांनुसार कृती न करण्याचा निश्चय करतो, आणि आत्मसंयम ठेवून ती कृती करत नाही. अर्थातच आत्मसंयम हे यातील पहिलं पाऊल आहे. पण त्या पलीकडे जाऊन आपल्या अनिवार्य वर्तनाचं खोलवरचं कारण दूर करणं गरजेचं असतं.

कर्माविषयीच्या गैरसमजुती

कर्माची शिकवण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोजित करू पाहताना काही गैरसमजुतींबाबत आपण सावध राहायला हवं. एका अर्थी आपल्या कर्माच्या परिपक्व होण्यामुळे या गैरसमजुतींचा अनुभवही आपल्याला येणंही रास्तच असतं. या पराभूतवादी प्रवृत्तीने आपण असा विचार करतो की, गतकाळात आपण वाईट मुलगा किंवा मुलगी होतो, आणि आता आपल्या सोबत जे काही होतंय ती आपली शिक्षा आहे. शांतिदेव यांनी याबद्दलची शिकवण आपल्याला दिलेली आहे, ते म्हणतात- आपण लक्ष्य उभं केलं नाही तर कोणी त्यावर बाण मारणारच नाही. आपण गतकाळात विध्वंसक कृती केली नसती, तर लोक आपल्यावर चिडल्याचं किंवा आपल्याला वाईट तऱ्हेने वागवत असल्याचं आपल्याला अनुभवावं लागलं नसतं. इतरांना दोष देऊ नये, तर स्वतःलाच दोष द्यावा, असा शांतिदेव यांचा मुद्दा आहे. परंतु, आपण खूप वाईट व्यक्ती आहोत आणि हे दुःख आपल्याला सहन करायलाच हवं, तिच आपली पात्रता आहे, त्यामुळे आपण गप्प राहावं, तक्रार करू नये आणि आपल्याला झालेली शिक्षा स्वीकारावी, अशी टोकाची भावना राखावी असा याचा अर्थ नाही. कर्मविषयक शिकवणूक आचरण्याची ही सुदृढ रीत नाही असं मला वाटतं, आणि याबद्दलचं उपयोजन करण्याचा हा इष्ट मार्गही नव्हे.

अशा आत्मघातकी परिप्रेक्ष्यापेक्षा आपण कर्मविषयक शिकवणुकीच्या इतर पैलूंची तपासणी करणं गरजेचं आहे आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा लाभ कसा होईल हे पाहायला हवं. आपल्या सोबत काहीतरी घडत असल्याचं आपण अनुभवतो तेव्हा कर्मविषयक शिकवणुकीतून आपण असा अर्थ लावतो की, या घडण्याचं कारण आपल्याच कोणत्यातरी गतकालीन वर्तनामध्ये आहे. उदाहरणार्थ, न टिकणारे नातेसंबंध आपण सतत अनुभवत असू, आपल्याला प्रिय व्यक्तींसोबत टिकून राहता येत नसेल, किंवा लोक आपल्यापासून फारकत घेत असतील, तर आपण इतरांशी निर्णायकरित्या बोलतो त्याचा हा परिणाम असतो. आपण लोकांशी त्यांच्या मित्रमैत्रिणींविषयी काहीतरी ओंगळ बोललेलो असतो, त्यामुळे त्यांच्यात फारकत आलेली असते. आपण आपल्या मित्रमैत्रिणींपासून दुरावतो, तेव्हा त्या मूळ कारणामधील आपलं कर्म परिपक्व होत असतं, त्यामुळे आपल्याशीही लोक तशाच तऱ्हेने वागतील अशी परिस्थिती आपण अनुभवत असतो.

निर्णायकरित्या बोलण्यातून आणखी एक गोष्ट परिपक्व होते- अशा वर्तनाची पुनरावृत्ती करण्याची अनिवार्य भावना, ही ती गोष्ट होय. हा मुद्दा लक्षात घेता आपल्या कर्मविषयक समजुतीला रचनात्मक साधन बनवायचं असेल, तर आपल्याला स्वतःची प्रामाणिक तपासणी करावी लागेल. कोणाला काही लोक आवडत असतील, त्यांच्यासोबत ती व्यक्ती काम करत असेल, अभ्यास करत असेल किंवा त्यांची मैत्री असेल, तर अशा लोकांवर टीका करण्याची किंवा त्यांच्याबद्दल ओंगळ बोलण्याची आपली प्रवृत्तीच आहे का? आपण अवाजवी टीका करतो, असं कदाचित यानंतर आपल्या लक्षात येईल. आपण कोणाविषयी क्वचितच चांगलं बोलतो आणि आपण त्यांच्याबद्दल केवळ वाईटच बोलतो. हेच सर्रास आढळत नाही का? इतरांच्या कमतरता दाखवून देण्यासाठी आणि त्यांबद्दल इतरांना सांगण्यासाठी व तक्रार करण्यासाठी आपण खरोखरच उतावीळ असतो. पण इतरांच्या चांगल्या गुणांवर आपण किती वेळा लक्ष केंद्रित करतो, आणि किती वेळा इतर लोकांची प्रशंसा करतो? आपल्यातील बहुतेकांच्या वागण्यात असं क्वचितच दिसत असेल.

कर्माविषयीच्या या शिकवणुकींमधून हा एक अतिशय उपयुक्त मुद्दा आपल्याला शिकता येतो आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचं उपयोजनही शक्य आहे. आपल्याला ज्या गोष्टींचा अनुभव येतो, तशाच गोष्टींचा आकृतिबंध आपल्या नेहमीच्या वागण्यात दिसतो का, हे आपण शोधू शकतो. अशा वेळी पराभूतवादी प्रवृत्तीच्या गर्तेत कोसळण्याऐवजी- म्हणजे “मी गतजीवनकाळामध्ये इतकी वाईट होते, इतरांवर टीका करत होते, त्यामुळे माझ्यासोबत असंच घडायला हवं, हीच माझी पात्रता आहे”, असा विचार करण्याऐवजी- आपण आता आपल्या वर्तनावर काम करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवं. इतर कोणाबद्दल काहीतरी भयंकर बोलण्याची भावना आपल्याला जाणवेल, तेव्हा त्याऐवजी आपण त्या लोकांच्या चांगल्या गुणांचा विचार करावा आणि त्यांची प्रशंसा करावी.

विविध प्रकारची कर्मजन्य विकृत लक्षणं आपल्याला शोधता येतात. उदाहरणार्थ, आपण गरीब असू शकतो. पण आपण कायम इतर लोकांचा फायदा घेतो आणि त्यांच्या गोष्टी वापरतो, त्यांची पिळवणूक करतो, इतरांना काही मोबदला देत नाही, इतरांनीच आपल्याला द्यावं अशी कायम अपेक्षा करतो- अशा काही गोष्टी तपासणीनंतर आपल्या लक्षात येऊ शकतात. इतर लोकांची परवानगी न घेता त्यांच्या वस्तू वापरण्याचा मी विशेष उल्लेख करतो आहे. म्हणजे परवानगी न घेता त्यांच्या रेफ्रिजरेटरमधून अन्न घेणं, यांसारख्या गोष्टी. आपल्या सोबत घडणाऱ्या गोष्टी आणि तशाच तऱ्हेने वागण्याच्या आपल्या भावना व प्रवृत्ती यांच्यात सहसंबंध असल्याचं आपल्या लक्षात येतं. भारतीय गुरू धर्मरक्षित यांनी व्हील ऑफ शार्प वेपन्स या मनप्रशिक्षण साधणाऱ्या संहितेमध्ये अशा सहसंबंधांचे अनेक दाखले दिले आहेत.

शिवाय, केवळ एकाच कारणातून या निष्पत्ती होत नसतात हे आपण समजून घेण्याची गरज आहे. एखादी बादली पहिल्या थेंबामुळे किंवा शेवटच्या थेंबामुळे भरत नसते, असं बुद्ध म्हणाला होता. बादली सर्व थेंबांच्या संचयाने भरते. आपण जे काही दुःख अनुभवतो, ते केवळ आपण गतकाळात केलेल्या ओंगळ गोष्टींची निष्पत्ती नसतं, किंवा आपण पूर्वी केलेल्या विविध ओंगळ गोष्टींचा तो संचय नसतो. तर, आपल्याला असं काहीतरी अनुभवायला लागावं यासाठी जवळपास अगणित कारणं व परिस्थिती एकत्र आलेले असतात.

समजा आपल्याला एखाद्या कारने धक्का दिला. तर, आपणही गतकाळात कारने किंवा कारशिवाय कोणाला तरी इजा पोचवली असेल, एवढाच त्याचा अर्थ नसतो. तर, आपल्याला कारचा धक्का देणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीच्या कर्मजन्य सामर्थ्यांचाही संदर्भ इथे असतो. शिवाय, हवामान आहे, वाहतुकीची परिस्थिती आहे, आणि आपण त्या वेळी बाहेर गेलो त्यामागची कारणंही आहेत. रस्ता बांधणारे लोक आहेत. तर, अशी प्रचंड संख्येने कारणं व परिस्थिती एकत्र येतात आणि आपल्याला कारचा धक्का बसण्याचा प्रत्यक्ष अनुभव येतो.

कार्यकारणभावाचा आपला दृष्टिकोन आपण आणखी विस्तारला आणि इतर अनेक कार्यकारणभावांच्या संदर्भात ते तपासून घेतलं, तर अपराधी ‘मी’ची घनता विरचित करायला आपण सुरुवात करतो. आपल्या सोबत जे काही घडतंय तीच आपली पात्रता आहे आणि हा पूर्णतः आपलाच दोष आहे, याची आपण विरचना करतो. आपण अर्थातच जबाबदार असतो, पण आपल्या वर्तनाची जबाबदारी घेणं आणि दुसऱ्या बाजूला घनरूपात अस्तित्वात असलेल्या ‘मी’ला अपराधी मानणं, आपल्याबाबत घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा दोष स्वतःला देणं, या दोन्हींत बराच फरक आहे.

कर्मशी असलेल्या संबंधांमधील भावशून्यता समजून घेणं

कार्यकारणभावाविषयीचा आपला दृष्टिकोन विशाल करण्यासोबतच आपण यामध्ये समाविष्ट असलेल्या ‘तीन वर्तुळां’ची विरचना करणं गरजेचं आहे. या तीन वर्तुळांची मांडणी करण्याचे अनेक मार्ग आहेत, पण कर्माच्या परिपक्व होण्यासंदर्भात आपल्याला असं स्पष्टपणे म्हणता येतं की, कर्माच्या परिपक्वतेचा अनुभव ‘मी’ घेत असतो, कर्मामधून जे काही परिपक्व झालं ते आपण आता अनुभवतो आहोत, आणि कर्मजन्य कारणातून जे काही परिपक्व झालं आहे त्याला गतकाळातील आपली कृती कारणीभूत आहे. ही तीन वर्तुळं एकमेकांवर अवलंबून असलेल्या अवस्थेत उद्भवतात आणि ती स्वप्रस्थापित नसतात, ती परस्परांहून स्वतंत्र नसतात, हे आपण लक्षात घेत नाही तेव्हा आपण मानसिक पातळीवर बनावट रचना तयार करतो आणि घनरूप ‘मी’ अस्तित्वात असल्याचं मानतो, हा ‘मी’ इतका वाईट असतो की आपल्या सोबत आत्ता जे काही घडतंय त्यासाठीच आपण पात्र असतो असं आपल्याला वाटू लागतं. एका अर्थी, आपण बळी जातो किंवा आपण शिक्षा सहन करणारा गुन्हेगार होऊन जातो, आणि त्या वरकरणी घनरूप ओळखीला पकडून ठेवतो. ही मनाची अतिशय दुःखी अवस्था आहे, नाही का? आपण आत्ता काय अनुभवतो आहोत त्याबद्दल भयंकर समज करून घेतो आणि गतकाळात काय केलं ते खूप भयंकर होतं असाही समज करून घेतो. अशा वेळी सगळी परिस्थिती अपराधभावाने पूर्णतः भरून जाते आणि आपल्याला स्वतःबद्दलच वाईट वाटायला लागतं. या सगळ्यामुळे दैनंदिन जीवनाचा आपला अनुभव अधिकाधिक खालावत जातो.

त्यामुळे भावशून्यतेची काही समजूत असणं अतिशय महत्त्वाचं ठरतं. ही समजूत नसेल तर गोष्टी खूप घनरूप होतात आणि टोकाला जाणं अतिशय सोपं आहे, त्यातून आपण अधिकाधिक अडचणींनाच व दुःखानांच कारणं पुरवत असतो, त्याबद्दलच आपण बोलतो आहोत. पण आपल्याला भावशून्यतेची काहीही समज नसेल, तरीही आपण जो काही विचार करतो किंवा कृती करतो त्याचे कर्मजन्य परिणाम होणार आहेत हे लक्षात ठेवायला हवं. आपण विध्वंसक तऱ्हेने कृती करण्यापासून परावृत्त व्हायला हवं आणि त्याऐवजी रचनात्मक तऱ्हेने काम करायला हवं.

विध्वंसक वर्तनापासून स्वतःला परावृत्त करणं

कोणत्याही विध्वसंक कृतीमधून तोटेच होतात, त्यामुळे कोणत्याही प्रकारचं विध्वंसक वर्तन करण्यापासून परावृत्त व्हावं, अशी शिकवण बौद्ध संहितांमध्ये दिलेली आहे. आपल्याला या वर्तनाची दुःखमय निष्पत्ती अनुभवायची नसते, त्यामुळे काही विध्वंसक करायची वा बोलायची भावना आपल्या मनात येते तेव्हा तसं काही करण्यापासून आपण स्वतःला परावृत्त करतो. पण अनेकदा आपण अशा प्रकारे विचार करत नाही. काहीतरी विध्वंसक करणं योग्य नाही, असं वाटल्यामुळे आपण कृती करण्यापासून परावृत्त होतो. प्रत्यक्षात हे अतिशय रोचक असतं, कारण काही प्रकारचं नकारात्मक वर्तन योग्य मानलं जात नाही- उदाहरणार्थ, फसवणूक, तोडफोड, इत्यादी गोष्टी. असं असेल तरीही ठीक आहे. कदाचित आपण नकारात्मक परिणामांविषयी सक्रियरित्या विचार केला नसेल, पण तरीही आपण अशी कृती करत नाही, असं घडतंच.

परंतु, डास मारण्याचं काय? तुम्हाला काय वाटतं ते मला माहीत नाही, पण डास मारणं ही योग्यच गोष्ट आहे, असं मला निश्चितपणे वाटत असे, अनुभवाला येत असे. आफ्रिकेच्या सफरीवर गेल्यासारखी शिकार करत सुटावं आणि मला रात्रभर जागं ठेवणाऱ्या खोलीतल्या डासाला मारावं, हे मला योग्य वाटत असे. या डासाविरोधात अशी मोहीम उघडणं किती हास्यास्पद आहे, हे कळलं, तरीही आपण तशी मोहीम उघडतो, नाही का? या संदर्भात असंगत उदाहरणांचा विचार करणं चांगल्याबैकी उपयोगी पडू शकतं.

अशा प्रकारच्या विध्वंसक वर्तनाबाबत आपण असा विचार करायला हवा की, सहिष्णूता न दाखवता त्या डासाला मारल्यानंतर आपल्याला कोणते तोटे होतील. डासाला आपण स्वतःचं रक्त पाजत राहायला हवं, असा याचा अर्थ नाही, पण डासाच्याबाबतीत आपण शांततापूर्ण पद्धत वापरायचा प्रयत्न करायला हवा. तो भिंतीवर बसला की त्याच्यावर भांडं उपडी ठेवावं, मग भांड्याखाली एक कागदाचा तुकडा सरकवावा, आणि आपल्या खोलीतून त्याला बाहेर घेऊन जावं. ही अतिशय व्यावहारिक पद्धत आहे, पण तरीही आपल्याकडून अशी मोहीम सुरू होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. भांडं व कागदाचा तुकडा वापरताना आपल्याला अजूनही मानसिक मोहीम चालवल्यासारखं वाटणं शक्य आहे. 

प्रत्यक्षात या परिस्थितीचं विश्लेषण करायला हवं. आपल्याला चावा बसल्यानंतर खाज अनुभवायला लागू नये एवढ्याचसाठी आपण डासाला आपल्या खोलीबाहेर हाकलत आहोत का, की आपण डासाच्या बाजूनेही विचार करतो आहोत? अर्थातच आपण डासाला अन्नापासून वंचित ठेवत आहोत. आपण सतत डास किंवा माशा किंवा जे काही असेल ते मारत राहिलो, तर आपण स्वतःला कोणत्या प्रकारची सवय लावून घेतो आहोत, याचा विचार करणं गरजेचं आहे. आपल्याला त्रस्त करणाऱ्या कोणत्याही गोष्टीबाबत त्या गोष्टीचा जीव घ्यावा अशी आपली पहिली प्रतिक्रिया असते, अशी ही सवय आहे. त्रस्ततेपासून सुटका करून घेण्यासाठी शांततापूर्ण साधनं वापरण्याऐवजी हिंसक साधनं वापरण्याची ही प्रवृत्ती आहे. त्यामुळे आपण डासाला भांडं व कागद वापरून पकडतो, तेव्हा किमान आपण डासाबद्दलच्या तिरस्काराने ते करत नसतो. डासाचं जीवनरूप स्वीकारार्ह नाही आणि त्याने आपल्या अवकाशात अतिक्रमण केलं आहे त्यामुळे आपण त्यापासून सुटका करून घ्यायला हवी, असा विचार आपण करू नये.

अर्थातच याहून अधिक प्रगती पद्धतींचं उपयोजन आपण करू शकतो. उदाहरणार्थ, हा डास गतजीवनांमध्ये आपली माता राहिलेला आहे, इत्यादी लक्षात घेणं. पण आपल्यापैकी बहुतेकांसाठी असं करणं खूपच अवघड आहे, हे प्रामाणिकपणे कबूल करायला हवं. मुद्दा एवढाच की, काही गोष्टींबाबत विध्वंसक कृती न करणं योग्य ठरतं, पण इतर काही गोष्टींबाबत आपल्याला जाणीवपूर्वक स्वतःच्या प्रेरणेबाबत खात्री करून घ्यावी लागते.

कर्मजन्य प्रवृत्ती व सामर्थ्यांना कृतिशील करणारे घटक

आपल्या कर्मजन्य प्रवृत्ती व सामर्थ्य यांना कृतिशील करणारे आणि त्यांना परिपक्व करण्यासाठी कारणीभूत ठरणारे विशिष्ट घटक नमूद करणं या टप्प्यावर मला गरजेचं वाटतं आहे. मृत्यूवेळी कर्मजन्य सामर्थ्यं कृतिशील करणाऱ्या घटकांच्या परस्परावलंबी उगमासंदर्भातील बारा दुव्यांच्या शिकवणुकीची चर्चा इथे केली आहे. हे घटक आपल्या मानसिक सातत्याला भविष्यातील पुनर्जन्मामध्ये ‘फेकतात’.

यातील पहिला घटक म्हणजे लालसेचा दुवा. या दुव्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तिबेटी संज्ञेचं भाषांतर इंग्रजीत ‘क्रेव्हिंग’ (लालसा) असा आहे. दुसऱ्या घटकाचं भाषांतर सर्वसाधारणतः ‘ग्रास्पिंग’ (घट्ट पकडणं) असं केलं जातं. पण हे सुस्पष्ट भाषांतर नाही, कारण ‘ग्रास्पिंग’ हा शब्दप्रयोग इतर संज्ञांसाठीही केला जातो, म्हणजे ‘ग्रास्पिंग फॉर ट्रू एक्झिस्टन्स’ (खऱ्या अस्तित्वासाठी टिकून राहण्याची धडपड) असाही त्याचा वापर होतो. या संज्ञांचे अर्थ एकसारखे नाहीत. इथे शब्दशः ‘काहीतरी प्राप्त करणं’ (टू ऑब्टेन समथिंग) किंवा ‘काहीतरी मिळणं’ (टू गेट समथिंग) असा या शब्दाचा अर्थ आहे. त्यामुळे इंग्रजीमध्ये ‘ऑब्टेनर’ (प्राप्तकर्ता) अशी संज्ञा वापरणं मी पसंत करतो. ही प्राप्तकर्ती भावना किंवा प्राप्तकर्ती प्रवृत्ती आहे. अशी प्रवृत्ती आपण विकसित करू शकलो, तर ती आपल्याला भविष्यात पुनर्जन्म प्राप्त करून देऊ शकते, मिळवून देऊ शकते. बारा दुव्यांच्या संदर्भात भविष्यातील पुनर्जन्मामध्ये कर्म फेकण्याला कृतिशील कसं केलं जातं, याचं स्पष्टीकरण इथे केलं आहे. आपल्या कर्मजन्य सामर्थ्यांना व प्रवृत्तींना प्रत्येक क्षणी कृतिशील करणाऱ्या पर्यायी मांडण्याही आहेत.

कर्मविषयक शिकवणूक आपल्या दैनंदिन जीवनांमध्ये कशा रितीने प्रस्तुत ठरते, याच्याशी सुसंगत असा हा मुद्दा आहे. पहिल्यांदा, लालसा म्हणजे काय? तहान म्हणजे काय? आपल्याला जाणवणाऱ्या विशिष्ट पातळीवरच्या आनंदाची किंवा दुःखाची पातळी लक्ष्यस्थानी ठेवणारा आणि त्यालाच मोठं मानणारा व त्याबाबत अतिशयोक्त भावना राखणारा हा मानसिक घटक आहे. आनंदावर लक्ष केंद्रित करून आपण आनंद संपू नये अशी तहान राखून ठेवतो. दुःखाच्याबाबतीत ते संपावं अशी तहान आपल्याला लागलेली असते. तटस्थ भावना म्हणजे पूर्ण एकाग्रतेच्या उच्च स्थितीमध्ये, तथाकथित ध्यानामध्ये, आपण रत झालेले असतो तेव्हाची भावना. त्या स्थितींमध्ये आपण तटस्थ भावना रोडावू नये अशी तहान राखून असतो. अर्थातच तहानेचे व तहान पकडून ठेवण्याचे विविध स्तर असू शकतात.

प्राप्तीकर्ते अस्वस्थकारक भावनांना व अस्वस्थकारक प्रवृत्तींना पकडून ठेवतात. यातील एक वा अधिक भावना व प्रवृत्ती आणि तहान यांचा संयोग होऊन आपल्या कर्मजन्य सामर्थ्यांना व प्रवृत्तींना कृतिशीलता लाभते. यातील सर्वांत महत्त्वाची बाब असते ती खरा अस्तित्वात असलेला ‘मी’- आपलं शरीर, मन, भावना इत्यादींच्या संकलित स्वरूपात आपण अनुभवतो तो ‘मी’- किंवा ‘मला’ पूर्णतः सामावणारा खऱ्या अर्थाने अस्तित्वात असलेला ‘मी’.

थोडक्यात, आनंद वा दुःखाच्या विशिष्ट पातळीची भावना अनुभवण्यावर तहानेचं लक्ष केंद्रित झालेलं असतं आणि हे अनुभवणाऱ्या ‘मी’वर प्राप्तिकर्ता प्रवृत्ती केंद्रित झालेली असते. आपल्याला भावनाशून्यतेचं व ‘मी’शून्यतेचं आकलन झालेलं नसेल, तरी आपल्या कर्मजन्य सामर्थ्यांना कशामुळे कृतिशीलता लाभते याचं सदर विश्लेषण आपल्याला आपल्या जीवनात उपयोजित करता येतं. प्रत्येक क्षणामध्ये आपण विशिष्ट पातळीवरचा आनंद वा दुःख अनुभवत असतो. उदाहरणार्थ, तथाकथित ‘अष्टांग ऐहिक धर्मा’विषयीची शिकवण आपण उपयोगात आणू शकतो. 

‘ऐहिक’साठी जिग्तेन (‘jig rten) हा तिबेटी शब्द वापरला जातो, त्यात दोन व्यंजनं आहेत. Ten म्हणजे मूलाधार, आणि Jig म्हणजे विखरून पडणारं व नष्ट होणारं. अष्टांग ऐहिक धर्मं किंवा अष्टांक ऐहिक आस्था याचा संबंध आपल्या जीवनात घडणाऱ्या, नष्टप्राय मूलाधार असणाऱ्या गोष्टींबाबतच्या आपल्या प्रवृत्तीशी आहे. स्थिर मूलाधार नसलेल्या आणि त्यामुळे चंचल असलेल्या जीवनामध्ये घडणाऱ्या गोष्टींबाबत आपण एकतर खूप खूश होतो किंवा पूर्णतः हताश होतो.

कर्मजन्य सामर्थ्यांच्या या कृतिप्रेरक घटकांबाबत प्रस्तुत धरणारे ऐहिक धर्म आनंदी वाटल्यावर अत्यंत खूश होतात आणि दुःखी असल्यावर खरोखरच हताश होतात. या संदर्भात कशाचा मूलाधार अस्थिर असतो? आपल्याला अनुभवास येणारा आनंद वा दुःख यांच्याशी याचा संबंध आहे. स्थिर मूलाधार नसल्यामुळे ते चंचल असतात. पण त्यांना आपण मोठं मानतो, जणू काही ते घनरूपात अस्तित्वात आहेत आणि चिरकाल टिकणार आहेत असं मानतो, त्यामुळे त्यांच्याबाबतीत आपली प्रतिक्रिया अति खूश होणं किंवा पूर्णतः हताश होणं, अशी असते. तहानलेल्या माणसाला पाण्याचा एक घोट मिळाल्यावर जसं वाटतं तसं आनंदाची चव चाखायला मिळाल्यावर आपण अति खूश होतो आणि ही चव कधीच लुप्त होऊ नये असं आपल्याला वाटतं. अजिबात पाणी न मिळाल्यामुळे दुःखी झालेल्या तहानलेल्या माणसाप्रमाणे आपणही दुःखी असल्यावर हताश होतो आणि दुःख जावं अशी आपल्या मनात लालसा निर्माण होते.

आनंद व दुःख या भावनांबाबत समवृत्ती

भारतीय गुरू शांतिदेव या प्रवृत्तींना बालिश म्हणतात. आनंद व दुःखाच्या आपल्या अनुभवाला येणाऱ्या बालिश अवाजवी प्रतिक्रियांवर आपण मात करण्याची गरज आहे. यासाठी आपण समवृत्ती विकसित करण्याची गरज आहे. आपण आनंदाच्या कोणत्याही भावना अनुभवल्या तरी त्याबद्दल अवाजवी प्रतिक्रिया न देणं, असा ‘समवृत्ती’चा अर्थ आहे. कारण, साध्या भाषेत सांगायचं तर, संसाराचं स्वरूप चढ-उताराचं आहे. काही वेळा आपल्याला आनंदी वाटेल, तर काही वेळा दुःखी वाटेल. हे स्वाभाविकच आहे. आपल्याला कधी आनंदी वाटेल व कधी दुःखी वाटेल याचा पूर्वअंदाज बांधण्याचा कोणताही मार्ग नाही. वरकरणी कोणतंही कारण नसताना आपली मनस्थिती बदलू शकते. आपण अनुभवतो त्या आनंदाची वा दुःखाची पातळी नाट्यमय असेलच असं नाही. ती पातळी अतिशय कमी असू शकते. आपल्याला वाटतंय ते ‘विशेष नसतं’ एवढं समजून घेणं, हाच कळीचा मुद्दा आहे.

प्रत्यक्षात हा अतिशय सखोल मुद्दा आहे. ‘विशेष नसतं’ म्हणजे त्यात आश्चर्यकारक, किंवा असाधारण असं काही नसतं. आपण अपेक्षा कोणती ठेवावी? चढ-उतार येतच राहणार, त्यांना आपण फार मोठं मानू नये. आयुष्यात आपण काहीही अनुभवत असलो, तरी काही वेळा आपण आनंदी होतो तर काही वेळा दुःखी होतो. विध्वंसक कृती करून दुःख होतं आणि रचनात्मक कृती करून आनंद होतो, इत्यादी आपण जाणतो. पण आपण अनुभवतो ते विलक्षण किंवा भयानक आहे अशा भावनेला पकडून ठेवण्याची गरज नसते.  आणि अर्थातच, मोठ्या घनरूप ‘मी’ला पकडून ठेवण्याची- ‘मी खूप आनंदी आहे’ किंवा ‘बिचारी मी, माझी किती दुर्दशा झाली’ अशी भावना पकडून ठेवण्याची- अजिबातच गरज नसते.

प्रचलित दृष्टिकोनानुसार आपल्याला आनंदी व्हायचं असतं, दुःखी व्हायला नको असतं, हे स्पष्ट आहे. शिवाय, प्रचलित दृष्टिकोनानुसार, आपल्या बौद्ध आचरणामध्ये आपण मुक्ती व साक्षात्काराचं ध्येय ठेवतो, तिथे आपण दुःखापासून मुक्त होऊ असा त्यामागचा दृष्टिकोन असतो. पण त्याला खूप जास्त महत्त्व देऊ नये. हा मुद्दा आहे. कर्माविषयीची ही शिकवणूक आपल्या दैनंदिन जीवनात कशी प्रस्तुत ठरते आणि त्यातून आपल्याला अधिक मनःशांती कशी लाभते, हे यातून सूचित होतं. प्रत्येक दिवशी आपली मनस्थिती बदलत असते, त्यातही समवृत्ती राखली तर त्यातून मनःशांती लाभते. स्वाभाविकपणे आपल्याला काही वेळा आनंदी वाटतं आणि काही वेळा दुःखी वाटतं. हा संसाराचा भाग आहे; ते अपेक्षितच असतं. आपण फक्त धर्माचरणाची आपली रीत अनुसरत असतो. आपल्याला कोणत्याही क्षणी अत्यंत आनंदी वाटत नसेल, मग काय अडचण?

जीवनातील चढ-उतार

आपल्याला कोणत्याच भावना जाणवू नयेत, आपण आनंदी वा दुःखी होऊच नये आणि काहीच भावना नसलेली व्यक्ती व्हावं, असा याचा अर्थ नाही. असा याचा अर्थ अजिबातच नाही. आनंदी वा दुःखी होणं ठीकच आहे. काही चांगलं घडलं, की आपल्याला आनंदी वाटतं. फारसं चांगलं नसलेलं काही घडलं की आपल्याला तितकंसं आनंदी वाटत नाही. उदाहरणार्थ, आपण उपाहारगृहात जातो आणि आपल्याला आपला आवडता पदार्थ हवा असतो, पण तो आता उपलब्ध नसतो. तिथला पदार्थ संपलेला असतो, त्यामुळे आपल्याला आनंदी वाटत नाही. हे दुःखी असतं, पण त्याला आपण फार मोठं मानत नाही. दुःखी वाटणं ठीक आहे, पण त्याला पकडून राहू नये, बिघडलेल्या मनस्थितीत अडकून पडू नये.

हे उदाहरण कदाचित मूर्खपणाचं असेल, पण आपल्याला प्रिय असलेली कोणी व्यक्ती मरण पावली, तर त्या प्रसंगाचं उदाहरण इथे प्रस्तुत ठरेल. आपल्याला दुःखी वाटणं स्वाभाविक आहे. त्यात काही गैर नाही. किंबहुना, शोक न करणं हे काही सुदृढपणाचं नाही. पण ते दुःख पकडून ठेवू नये आणि अतिशय भयंकर दुर्दशा झालेल्या घनरूप ‘मी’ची खरी ओळख दुःख हीच आहे असं मानू नये. दुसऱ्या परिप्रेक्ष्यातून पाहता, ‘मी खूप आनंदी आहे. आपलं किती चांगलं सुरू आहे ना?’ असं आपण कोणाला सतत सांगत असतो, तेव्हाही सगळी मनस्थिती बिघडतेच ना? जीवनातील चढ-उतार अनुभवावेत. आपण आनंदी असतो किंवा दुःखी असतो- त्यात काही मोठं नाही, विशेष काही नाही.

आपण दुःखी असतो व परिस्थिती वाईट असते, तेव्हा उपरोल्लेखित समवृत्तीसोबतच या सगळ्याचं कर्मजन्य कारण काय हे समजून घेण्याची प्रवृत्ती व दृष्टिकोनही आपण जोपासायला हवा. आधी चर्चा केल्यानुसार, आपल्याला आकृतिबंध तपासता येतो, आधीच्याच कृतीची वा बोलण्याची पुनरावृत्ती आपण कसे करतो हे तपासता येतं आणि त्यावर उपाय करता येतो.

लाम-रिम श्रेणीबद्ध टप्प्यांमधील प्रेरणेच्या तीन पातळ्या

लाम-रिम, या श्रेणीबद्ध टप्प्यांच्या मार्गातील प्रेरणेच्या तीन पातळ्यांच्या संदर्भातही मी काही गोष्टी नमूद करू इच्छितो. सर्वसाधारणतः कर्माविषयीची शिकवण प्रेरणेच्या आरंभिक व्याप्तीमध्ये सादर केला जातो. आपण विध्वंसक कृती करत नाही, कारण त्याचे परिणाम भोगायला आपण घाबरतो. आपल्या कृतींमुळे इतरांना काय अनुभवावं लागेल, हे आपल्याला माहीत नसतं. आपल्या कृतीच्या त्यांच्यावर होणाऱ्या परिणामाची हमी आपण देऊ शकत नाही. पण आपल्या बाजूने, आपल्याला विध्वंसक वर्तनामुळे निष्पन्न होणारं दुःख अजिबात अनुभवायचं नसतं. आपल्याला त्याची भीती वा धास्ती वाटते, पण ते आपण सुदृढ पद्धतीने करतो. इथे आपण शिक्षेच्या भीतीविषयी बोलत नाही आहोत. आपल्याला खरोखरच दुःख टाळायचं असतं, एवढंच. अधिक स्पष्टपणे बोलायचं तर, आपल्या भविष्यातील जीवनांमधील दुःख टाळायचं असतं. प्रेरणेची आरंभिक व्याप्ती ही असते.

मध्यम पातळीवर, आपल्या सर्व प्रकारचं अनिवार्य कर्मजन्य वर्तन टाळायचं असतं, कारण आपल्याला मुक्ती मिळवायची असते. मुक्ती मिळाली नाही, तर सांसारिक आनंद व दुःखाचे चढ-उतार चिरकाल सुरूच राहतील. ते किती भयंकर असेल.

प्रेरणेच्या प्रगत व्याप्तीद्वारे आपल्याला सर्व प्रकारच्या कर्मजन्य वर्तनापासून परावृत्त व्हायचं असतं, कारण इतरांना मदत करण्याच्या आपल्य क्षमतेवर त्याचा विपरित परिणाम होऊ नये असं आपल्याला वाटतं. आपणच सतत चढ-उतारांना सामोरं जात असू आणि आपल्याबाबतीत सतत इतर काही अप्रिय गोष्टी घडत असतील, तर आपल्याला इतरांना मदत कशी करता येईल. इतरांना मदत करण्याच्या आपल्या क्षमतेवर याचा विपरित परिणाम होईल, हा आपला प्रमुख विचार असतो. इतरांना बाधा पोचण्याबाबत मानवतावादी दृष्टिकोनाने आपण विचार करत नाही आहोत. इतरांना मदत करण्याच्या स्वतःच्या क्षमतेसमोर अडथळे येतील, असा विचार आपण करतो आहोत.

नैतिक वर्तनाबाबतची बौद्ध प्रवृत्ती आणि ‘माझ्या कृतीने इतर कोणी दुखावत नसेल, तोपर्यंत ठीक आहे’ हा पाश्चात्त्य मानवतावादी दृष्टिकोन, यांमध्ये मोठा फरक आहे. त्या दृष्टिकोनात काही चुकीचं आहे असं नाही. पण आपल्या वर्तनाचा इतरांवर कोणता परिणाम होईल, याची हमी आपल्याला प्रत्यक्षात देता येत नाही. उदाहरणार्थ, आपण कोणाकडून तरी काहीतरी चोरू शकतो आणि त्याचा त्यांना आनंदही होण्याची शक्यता असते, कारण ती वस्तू भयंकर अवस्थेत असेल आणि त्यांना त्याची भरपाई म्हणून विम्याची रक्कम मिळू शकते. दुसऱ्या बाजूला, आपण एखाद्याला मोठी रक्कम दिली आणि त्यांच्याकडच्या ऐवजाची चोरी झाली किंवा त्यांचा खून झाला, अशीही शक्यता असते.

बौद्ध धर्मातही आपण प्रेम व करुणा विकसित करतो, आणि इतरांची हानी होऊ नये अशीच आपली इच्छा असते. पण त्यासाठी प्रेरणेची प्रगत व्याप्ती गाठण्यावर भर असतो. इतरांना मदत करण्याच्या आपल्या क्षमेला मर्यादा पडू नये, यासाठी आपण अशी कृती करण्यासाठी इच्छित नसतो. अशा प्रकारची प्रेरणा साक्षात्काराकडे जाणाऱ्या एकंदर बौद्ध अध्यात्मिक मार्गाशी सुसंगत ठरते. इतरांना शक्य तेवढी मदत करण्याचा आपला प्रयत्न असतो. बौद्ध धर्मातील कर्माविषयीच्या चर्चेचा मुख्य भर या मुद्द्यावर आहे.

आपल्या दैनंदिन वर्तनाच्या बाबतीत ही महायान प्रेरणा प्रस्तुत ठरते, कारण आपल्या नैतिक स्वयंशिस्तीला त्यातून बळ मिळतं. आपण विध्वंसक कृती करणार असू, तर आपण इतरांना खरोखरच मदत कशी करणार? उदाहरणार्थ, आपण सतत बढाई मारत असू किंवा इतरांना फसवत असू, तर कोणीही आपल्यावर विश्वास ठेवणार नाही. अशा वेळी आपण इतरांना खरोखरची मदत कशी करणार? अधिक स्पष्ट उदाहरणासह नोंदवायचं तर, आपले विद्यार्थी अचानक सोडून जातात, हेच आपल्या कर्माचं परिपक्व होणं असेल, तर या अनुभवावेळी आपण त्यांना खरोखरची मदत कशी करू शकतो? आपले विद्यार्थी कधीच आपल्या सोबत राहणार नाहीत. ते कायम सोडून जातील. स्वाभाविकपणे यातून आपल्याला इतरांवर टीका करणं थांबवायची प्रेरणा मिळेल, आणि त्याऐवजी इतरांच्या गुणांबद्दल बोलायची प्रेरणा मिळेल.

रचनात्मक वर्तनासोबत उपस्थित असलेले दोन मानसिक घटक

एक शेवटचा मुद्दा. ट्रेझर-हाउस ऑफ स्पेशल टॉपिक्स ऑफ नॉलेज या अभिधर्मकोशामध्ये महान भारतीय गुरू वसुबंधू यांनी दोन मानसिक घटकांचा उल्लेख केला आहे. हे घटक कोणत्याही रचनात्मक कृतीसोबत कायम उपस्थित असतात. असंग यांनी त्यांच्या संहितेमध्ये या मानसिक घटकांची उकल निराळ्या पद्धतीने केली आहे, पण वसुबंधूंची व्याख्याही आपण समजून घेणं गरजेचं आहे. चांगल्या गुणांचा आणि असे गुण असलेल्या व्यक्तींचा आदर करणं, हा पहिला घटक. कोडगेपणाने विध्वंसक असण्यापासून परावृत्त होणं, हा दुसरा घटक. ‘कोडगेपणाने’ म्हणजे कोणतीही फिकीर नसलेल्या वृत्तीने. कोणत्याही प्रकारचं आत्मनियंत्रण न ठेवता कृती करणं, कोणाचीही फिकीर न करता आणि विध्वंसक होण्यापासून मागे न सरता कृती करणं. आपल्याला हवं ते करणं.

रचनात्मक वर्तनामध्ये आपल्याला याच्या विरुद्ध प्रवृत्ती अनुभवाला येतात: सकारात्मक गुणांचा आणि असे गुण असलेल्यांचा आपण आदर करतो, आत्मनियंत्रण ठेवतो. आपल्या कृती कधीही कोडगेपणाने विध्वंसक नसतात; आपण काय बोलतोय व करतोय याची आपण काळजी घेतो. ‘हे योग्य वाटतंय’ याची आठवण आपल्याला यातून बहुधा राहत असावी.

दैनंदिन जीवनामध्ये आपण कशावर भर द्यायला हवा आणि कशाची आठवण ठेवायला हवी, हे यातून सूचित होतं. संयम व दयाभाव यांसारख्या चांगल्या गुणांबद्दल आणि असे गुण असलेल्या लोकांबद्दल आपण खूप आदर दाखवायला हवा. हे गुण आपल्यासाठी प्रेरणादायी स्त्रोत असतात. शिवाय, आपल्याला आत्मनियंत्रणही ठेवायचं असतं आणि आपण काय बोलतोय व करतोय याबद्दल काळजीही बाळगायची असते. पूर्णपणे विध्वंसक व भयंकर कृती करू नये.

समारोपाचे शब्द

कर्माविषयी आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये याची शिकवण कशी प्रस्तुत ठरेल, याबद्दल आपण बऱ्याच गोष्टी समजून घेतल्या. हे दोन घटक चांगल्या रितीने पचवण्यासाठी थोडं थांबून पाहावं. थोडक्यात, रचनात्मक कृती करताना केवळ चांगला मुलगा किंवा चांगली मुलगी ठरण्यासाठी अशी कृती करू नये. तो कृतीचा मूलाधार असू नये. चांगल्या गुणांबद्दल आणि असे गुण असणाऱ्यांबद्दल आदर ठेवणं आणि त्या आधारे रचनात्मक कृती करणं गरजेचं आहे. कोणत्याही आत्मनियंत्रणाविना उघडपणे विध्वंसक कृती करण्यापासून परावृत्त होणं योग्य वाटतं. तेच आपण करावं आणि त्यानुसार वर्तन ठेवावं!

Top