‘संघ’ हा शब्द संस्कृतमधील ‘समुदाय’ अशा अर्थाच्या संज्ञेतून आला आहे आणि तो मुख्यत्वे बुद्धाच्या दीक्षा मिळालेल्या अनुयायांच्या संदर्भात वापरला जातो, आणि त्यांना भिक्खू किंवा भिक्खुणी असं म्हटलं जातं. आज बौद्ध धर्म पाश्चात्त्य जगामध्ये पसरला आहे, त्यामुळे एकंदर बौद्ध समुदायाला किंवा अगदी सर्वसामान्य अनुयायांच्या लहान गटांना ‘संघ’ असं संबोधलं जातं.
What is sangha 1

संघाचा उगम

बुद्धाला साक्षात्कार झाल्यानंतर त्याने चार आर्य सत्यांवर पहिली शिकवण दिली, असं धर्मचक्रप्रवर्तन सूत्रामध्ये सांगितलं आहे. अनेक वर्षं ज्या पाच मित्रांसोबत बुद्धाने तपश्चर्या केली होती त्यांना त्याने ही शिकवण दिली. यांपैकी कौंडिण्याने अरहत ही स्थिती प्राप्त केली. काही दिवसांनी, स्वतःचं शून्यत्व किंवा स्व अशक्य मार्गांनी कसा अस्तित्वात असू शकत नाही हे शिकवत असताना, इतर तपस्वींनीही अरहत ही स्थिती प्राप्त केली. त्यामुळे हे पाच अनुयायी संघाचे पहिले सदस्य झाले किंवा पहिले बौद्ध भिक्खू झाले.

त्यानंतर बुद्धाने उर्वरित आयुष्य- एकूण सुमारे ४५ वर्षं- त्याला लक्षात आलेल्या धर्माच्या शिकवणीचा प्रसार करण्यात व्यतीत केली. त्याचे अनुयायी उत्तर भारतीय प्रदेशांमधील गावांमध्ये व शहरांमध्ये प्रवास करून स्वतः बुद्धाच्या संदेशाचा प्रसार करत होते. लवकरच बुद्धाचे अनेक अनुयायी झाले. यांमध्ये सर्व सामाजिक स्तरांमधील लोक होते- इतर आध्यात्मिक गुरू, राजे व राण्या, शेतकरी व खाटिक, इत्यादी. बहुसंख्य अनुयायांना ऐहिक जीवनाचा परित्याग करायचा नव्हता, तर ज्यांना सर्वसामान्य जीवन सोडून संघात यायचं होतं, त्यांचं संघात स्वागत करण्यात आलं. काम करणं व विवाह करणं, आदी व्यवहार पार पाडणाऱ्या संघाबाहेरच्या सर्वसामान्य अनुयायांनी संघाला अन्न व वस्त्रं यांचा पुरवठा केला.

हळूहळू, अधिकाधिक लोक औपचारिकरित्या बुद्धापाशी येऊ लागल्यावर सौहार्दपूर्ण आध्यात्मिक समुदाय निर्माण करण्याकरता अनुयायांसाठी नियम करणं आवश्यक ठरलं. तर, गरजेनुसार चाचपणी करत व चुकांमधून शिकत, संघात घडणाऱ्या अनिष्ट घटनांना प्रतिसाद देत नियम तयार करण्यात आले. बुद्धाच्या जीवनाच्या अखेरीला, भिक्खू व भिक्खुणी यांच्यासाठी शेकडो नियम होते.

स्त्रियांना दीक्षा 

सुरुवातीला बुद्धाने संघात केवळ पुरुषांनाच प्रवेश दिला. संघाची स्थापना झाल्यानंतर पाच वर्षांनी बुद्धाची मावशी महाप्रजापती गौतमी हिने स्वतःला भिक्खुणी म्हणून दीक्षा देण्यासाठी बुद्धाकडे विनंती केली, पण त्याने ती अमान्य केली. तरीही, महाप्रजापती अविचल राहिली आणि इतर ५०० महिलांसह डोक्यावरचे केस काढून पिवळी वस्त्रं परिधान करायची व बुद्धाला अनुसरायचं असं तिने ठरवलं.

महाप्रजापतीने बुद्धाला आणखी दोनदा विनंती केली, पण प्रत्येक वेळी बुद्धाने त्यांना दीक्षा देण्यास नकार दिला. चौथ्या वेळी बुद्धाचा चुलत भाऊ आनंद तिच्या वतीने बाजू मांडली. आध्यात्मिक मार्गावर चालण्याची व साक्षात्कार प्राप्त करण्याची पुरुषांइतकीच क्षमता स्त्रियांमध्ये असते का, असं त्याने विचारलं. यावर बुद्धाने होकारार्थी उत्तर दिलं. मग स्त्रियांनी भिक्खुणी होणं चांगलं ठरेल, असं आनंदाने सुचवलं. बुद्धाने ते मान्य केलं आणि महिला अनुयायांच्या दीक्षेला परवानगी दिली.

पारंपरिक संघ व आर्य संघ

सर्वसाधारणतः बुद्धाची शिकवण अनुसरणाऱ्या भिक्खू व भिक्खुणी या दोन गटांसाठी संघ ही संज्ञा वापरली जाते. प्रत्यक्षात भिक्खू ही संज्ञा ‘भीक मागणं’ अशा अर्थाने आलेली आहे आणि दीक्षा मिळालेल्या संघसदस्यांना सर्वसंगपरित्याग करून ठिकठिकाणी भटकावं लागतं, परिणामी ते अन्नासाठी इतरांवर अवलंबून असतात. संघासाठी किमान चार पूर्ण दीक्षा मिळालेले किंवा नवखे भिक्खू वा भिक्खुणी आवश्यक असतात- त्यांच्या साक्षात्काराच्या जागरूकतेची पातळी कितीही असली तरी चालते. याला आपण पारंपरिक संघ असं म्हणतो. आर्य संघसुद्धा असतो- ज्यामध्ये दीक्षा मिळालेल्या वा दीक्षा न मिळालेल्या व्यक्तींनी धर्माच्या मार्गावर काही साक्षात्कार प्रत्यक्ष प्राप्त केलेले असतात.

पारंपरिक संघ व आर्य संघ यांच्यात भेद करणं महत्त्वाचं असतं. अनेक उत्कृष्ट सर्वसामान्य भिक्खू व भिक्खुणी असल्या तरी त्यांतही आपल्यासारख्या भावनिकदृष्ट्या अस्वस्थ व्यक्ती असू शकतात आणि आपण त्यांच्या कक्षेत आश्रय का घ्यायचा असा प्रश्नही आपल्याला पडू शकतो. तर, तीन रत्नांपैकी एक असणारा आर्य संघ हे खरं रत्न असून त्यामध्ये आपण आश्रय घ्यावा. योग्य दिशेने जाण्यासाठी ते आपल्याला खरोखरची मदत करू शकतात.

संघाचे गुण

तर, आपल्याला संघातील कोणत्या प्रकारचे गुण स्वतःच्या अंगी बाणवावेसे वाटतात?

  1. ते शिकवण देतात तेव्हा ते केवळ पुस्तकांमधून शिकलेल्या गोष्टींची पुनरावृत्ती करत नाहीत. ते स्वतःच्या अस्सल अनुभवातून बोलतात- आणि हे खरोखरच स्फूर्तिदायी असतं.
  2. इतरांना मदत करावी एवढीच त्यांची इच्छा होती आणि ते जे बोलतात तसंच वर्तन करतात. एखादा धूम्रपान करणारा मनुष्य आपल्याला धूम्रपानाच्या धोक्यांविषयी ओरडत असेल, तर आपण त्याचा सल्ला का मानावा, असा विचार करतो, हो ना? त्यामुळे संघ जे काही करतात त्यामध्ये कायम प्रामाणिक असतात, जेणेकरून आपल्याला त्यांच्यावर खरोखरचा विश्वास ठेवता यावा.
  3. आपण वाईट लोकांच्या संगतीत वेळ घालवतो तेव्हा बहुतेकदा आपण त्यांचे किती दुर्गुण उचलतो आहोत हे आपल्याला कळतही नाही. त्याचप्रमाणे आपण चांगल्या मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवला, तर फारसा प्रयत्नही न करता आपण अनेक गुण प्राप्त केलेले असतात. तर, संघाचा आपल्याला खूप चांगला प्रभाव पडतो, त्यातून आपलं धर्माचरण सुधारतं.

संघाचं महत्त्व

बुद्धाचे सुमारे २५०० वर्षांपूर्वी महापरिनिर्वाण झालं. त्याने आपल्या आचरणासाठी त्याची शिकवण- धर्म- मागे ठेवला. बौद्ध धर्मात हेच आहे. पण आपल्याला चांगल्या तऱ्हेने धर्माचरण करण्यासाठी, विश्वसनीय उदाहरणं गरजेची असतात. बुद्धाची शिकवण प्रत्यक्ष शिकलेले, अभ्यासलेले व त्यांचं आचरण केलेले आणि त्यातील काही उद्दिष्टं प्राप्त केलेले लोक आपल्या मदतीला व मार्गदर्शनाला असावेत, असं आपल्याला वाटतं. अशा लोकांचा समुदाय म्हणजे संघ.

आजकाल आपण आदर्श म्हणून विख्यात व्यक्तींकडे पाहतो: नट-नट्या, मॉडेल, गायक व क्रीडापटू यांच्याकडे पाहतो. पण या लोकांच्याही त्यांच्या काही समस्या असतात, बरोबर? त्यांच्या खाजगी जीवनात अनेकदा ते अस्वस्थ असतात, हे आपल्याला माहीत असतं! एवढंच नव्हे तर, आपण जेव्हा विख्यात व्यक्तींमागे व त्यांच्या जीवनामागे वेडे होतो, तेव्हा सर्वसाधारणतः त्यातून आपण आपल्या मित्रांसोबत गॉसिप करतो आणि भौतिक ओढ नेहमीपेक्षा जास्त वाटू लागते; यातून आपल्याला कोणताही खरा लाभ किंवा सुख मिळत नाही. दुसऱ्या बाजूला, संघातील लोक आधीच एका पातळीपर्यंत त्यांच्या समस्यांपासून मुक्त झालेले असतात- हे थोर नाही का!- आणि उर्वरित समस्यांपासून मुक्त होण्यासाठी ते कार्यरत असतात. आपल्याला स्वतःच्याही समस्यांपासून मुक्त व्हायचं असेल, तर त्यांचा दाखला अनुसरणं सुज्ञपणाचं ठरतं, नाही का?

आपल्या आधुनिक जगामध्ये आज केवळ संघामुळे आपण बुद्धाची शिकवण पिढ्यानुपिढ्या उत्तमरित्या जतन करून ठेवलेली आहे. संघ आपल्याला तात्कालिक समस्यांपलीकडे पाहायला स्फूर्ती देतात आणि आपल्याला सर्व दुःखातून पूर्णतः बाहेर काढण्यासाठीचा मार्ग दाखवतात. ते आपल्याला केवळ स्फूर्ती देत नाहीत, तर आपल्याला मार्गदर्शन करतात, प्रोत्साहन देतात आणि या मार्गावर प्रत्येक पावलावर पाठिंबा देतात. त्यामुळे संघाशिवाय बौद्ध धर्म नाही, असंही काही वेळा म्हटलं जातं.

सारांश

आपण आयुष्यात चांगला आदर्श कसा निवडावा? आपल्याला संघाचा खरा सदस्य- खरोखर काही प्राप्त केलेला, आर्य संघ- कदाचित भेटणार नाही, परंतु धर्माबाबत अधिक अनुभवी असलेल्या लोकांना आपण भेटू शकतो आणि त्यांच्याकडून स्फूर्ती घेऊ शकतो. त्यांचा आदर्श घेऊन त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन मिळतं. 

बौद्ध भिक्खू व भिक्खुणी यांच्या समर्पणभावाद्वारे, पारंपरिक संघाद्वारे, धर्म जगभर पसरला. बुद्धाची तुलना डॉक्टरशी व धर्माची तुलना औषधाशी केली जाते, त्याप्रमाणे संघ परिचारिकेसारखे असतात- आपण आपल्या सर्व समस्यांपासून मुक्त होण्यासाठी कार्यरत असताना ते आपल्याला या मार्गावर प्रोत्साहन देतात व मार्गदर्शन करतात.

Top