दैनंदिन जीवनातील उपयोजित नीतिशास्त्राची तत्त्वं

नीतिशास्त्र व मूल्यं यांचं दैनंदिन जीवनात उपयोजन करण्याला “उपयोजित नीतिशास्त्र” असं म्हणतात. यासाठीची आधुनिक संज्ञा “जीवन-शिक्षण” ही असू शकते. व्यक्तिगत वैफल्य व सामाजिक रोष या दुहेरी आव्हानावरील उपाय यातून मांडलेला आहे. व्यक्तिगत पातळीवर आपलं जीवन समजून घेण्यासाठी याची मदत होते, तर सामाजिक पातळीवर प्रगती व विकास यांसाठी आवश्यक असलेले इतरांसोबतचे सकारात्मक संबंध कसे घडवायचे हे शिकण्यासाठीही याची मदत होते. वैश्विक नीतिशास्त्र यात कळीची भूमिका निभावतं.

असं नीतिशास्त्र आपल्याला कुठे मिळेल? ते आपल्याला अॅरिस्टॉटलसारख्या इहवादी स्त्रोतांमधून मिळू शकेल, किंवा “तुमचा देश तुमच्यासाठी काय करू शकतो ते विचारू नका, तर तुम्ही तुमच्या देशासाठी काय करू शकता ते सांगा,” असं म्हणणाऱ्या जॉन एफ. केनेडी यांच्यासारख्या नेत्यांकडून मिळू शकेल. धर्म लोकांमध्ये केवळ विभाजन करतात, असं प्रतिपादन कदाचित काही जण करतील, पण धर्माचे दोन पैलू आपण नमूद करायला हवेत: त्यातील धर्मशास्त्रीय भाग प्रत्येक धर्मानुसार बदलतो, आणि नैतिक व्यवस्था सर्व धर्मांमध्ये सामायिक असतात. आपल्याला आपल्या जीवनाची तत्त्वं सर्व धर्मांतून मिळतात, त्यामुळे वैश्विक उपयोजित नीतिशास्त्राची मांडणी करण्यातही धर्म भूमिका निभावतात, असं मी म्हणेन.

मौलाना वाहिदुद्दीन खान यांनी स्थापन केलेल्या ‘सेंटर फॉर पीस अँड स्पिरिच्युअॅलिटी’ या संस्थेमध्ये आम्ही उपयोजित नीतिशास्त्राचं व्यावहारिक परिप्रेक्ष्य विकसित केलं आहे. गेली सतरा वर्षं शनिवार-रविवारी मौलाना या विषयावर वर्ग घेतात. आम्ही तयार केलेल्या हजारो जीवन-शिक्षकांनी आधी ही तत्त्वं स्वतःला लागू केली, आणि मग ते इतरांना त्याबद्दल सांगायला गेले. शिक्षकांनी हे करणं गरजेचं आहे. त्यांनी आधी ही तत्त्वं स्वतःला लागू करायला हवीत, आणि तसं करत राहायला हवं- ही जीवनभर चालणारी प्रक्रिया असते. आम्ही याची सुरुवात करतो, आणि पुढे जात असताना विद्यार्थ्यांनाही त्याच तत्त्वांचं उपयोजन करण्यासाठी मदत करतो.

आम्ही विकसित केलेला हा उपाय आहे. समकालीन जगामध्ये शांतता कशी प्रस्थापित करायची, यावर मी संशोधन केलं आहे, आणि माझ्या असं लक्षात आलं की, शांततेच्या संस्कृतीच्या दिशेने नेणारं परिवर्तन व्यक्तींमध्ये घडवणं गरजेचं आहे. असं झाल्यानंतर व्यक्ती बौद्धिकदृष्ट्या विकसित होतात, स्वतः शांत होतात आणि समाजातील शांतता, प्रगती व विकास यांसाठी योगदान देऊ लागतात. यातून आंतरराष्ट्रीय पातळीवर राष्ट्रांचा विकास होतो.

या ध्येयासाठी आम्ही व्यक्तिमत्त्वविकास कार्यक्रम विकसित केला आहे. त्यातील तीन मुख्य तत्त्वं इथे नमूद करायला मला आवडेल. ही तत्त्वं इहवादी व धार्मिक नीतिशास्त्रामधून घेतली आहेत:

१. सकारात्मक मनोवृत्ती

पहिलं तत्त्वं आहे सकारात्मक मनोवृत्ती किंवा सकारात्मक मानसिकता. एका गोष्टीमध्ये, तुरुंगात असलेली दोन माणसं खिडकीबाहेर बघत असतात. एकाला केवळ चिखल दिसतो, तर दुसऱ्याला तारे दिसतात. याचा अर्थ, वेगवेगळे लोक एकसारख्या परिस्थितीत असू शकतात, आणि कोणी नकारात्मक घटकाची निवड करून केवळ चिखल बघतं, तर कोणी त्या परिस्थितीमधून समोर आलेली संधी पाहतं. आपण जितकी अधिक मतं विकसित करू तितक्या आपल्याला संधी अधिक दिसायला मदत होते.

२. सकारात्मक वर्तन

दुसरं तत्त्व आहे सकारात्मक वर्तन. सर्व धर्मांमध्ये नीतिशास्त्राचा सुवर्ण नियम आहे. ख्रिस्ती धर्मामध्ये “लोकांनी आपल्याशी जसं वागावं असं तुम्हाला वाटतं तसं तुम्ही लोकांशी वागा” असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ, आपण इतरांकडून कोणत्या तऱ्हेच्या वर्तनाची अपेक्षा करतो हे आपल्याला अचूक कळतं. आपल्याला अनेक नीतिशास्त्रीय नियम शिकवायची गरज नसते, तर इतरांनी आपल्याशी जसं वागावं असं आपल्याला वाटतं तसंच आपण इतरांशी वागावं. आपण दुसऱ्यांना देऊ लागतो आणि आपण देतो त्यातून आपल्याला मिळतही असतं हे आपल्याला कळतं. आपल्याला आपले अधिकार, आपली मानवता- सर्व काही मिळतं.

३. शांतता व अहिंसा

माझ्या संशोधनानुसार सर्व नीतिशास्त्रांचं सार शांततेमध्ये सामावलेलं आहे. सदिच्छा, आदर, क्षमाशीलता यांसारख्या सर्व सकारात्मक जीवनतत्त्वांचं हे छत्र आहे. अशा प्रकारे ते सर्व धर्म शांतता व अहिंसा या छत्राखाली येतात. आपण ही तत्त्वं वापरतो आणि आपल्या दैनंदिन जीवनात त्यांचं उपयोजन करतो, तेव्हा आपली प्रगती व विकास होतोच, शिवाय समाजाच्या प्रगतीमध्येही आपण योगदान देऊ लागतो.

विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांसाठीही असे कार्यक्रम लाभदायक आहेत, असं मला वाटतं. अतिशय यशस्वी झालेला हा अभ्यासक्रम आपल्या शिक्षकांपर्यंत व विद्यार्थ्यांपर्यंत नेण्याची संधी रामानुजन महाविद्यालयाने आपल्याला दिली आहे. हे आणखी पुढे नेण्यासाठी ‘सेंटर फॉर पीस अंड स्पिरिच्युअॅलिटी’ने शाळांसाठी अभ्यासक्रम विकसित केले आहेत. उदाहरणार्थ, “वुई, द लिव्हिंग” असा एक अभ्यासक्रम आहे. त्यांची संशोधन सामग्री असते आणि शिक्षकांसाठीही पहिली ते बारावी अशा श्रेण्यांची पाठसामग्री असते. महाविद्यालयांसाठी आम्ही “कल्चर ऑफ पीस” हा अभ्यासक्रम विकसित केला आहे, तो रामानुजन महाविद्यालयातही सुरू करायची आमची इच्छा आहे. शिक्षणसंस्थेबाहेरच्या व्यक्ती व कंपन्यांसाठी आम्ही “गुड लाइफ प्रोग्राम” विकसित केला आहे. या कार्यक्रमांद्वारे आम्हाला हे सगळं जगापर्यंत न्यायचं आहे. आम्हाला भारतभरात केंद्रं स्थापन करायची आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर आम्ही हे ऑनलाइन उपलब्ध करून देत आहोत, जेणेकरून आमची केंद्रं व जीवनशिक्षक ते पुढे नेऊ शकतील. जीवशिक्षक किंवा नीतिशास्त्री विकसित करण्यासाठी हे एक छोटे पाऊल असेल, अशी मला आशा आहे. अशा प्रकारे आपण स्वतः बौद्धिकदृष्ट्या विकसित होऊ आणि आपल्याला प्रगती व विकास यांमध्ये योगदानही देता येईल.

Top