प्रामाणिकता: वैश्विक नीतिमत्तेचा पाया

जीवनात नैतिकतेने वागण्यासाठी धर्म आवश्यक नाही, अशी काही लोकांची धारणा असते. प्रेम व करुणा यांसारखी मूल्यं कोणत्याही धर्माच्या अलाहिदा असतात, असं त्यांना वाटतं. मी या मूल्यांना “वैश्विक नीतिमत्ता” किंवा “वैश्विक धारणा” असं म्हणतो. धर्माशिवायही, अश्रद्ध असलं तरीही आपण आपल्या जीवनात नीतिमत्तेला चालना देऊ शकतो.

आपण सुखी व्हावं, आपल्यावर प्रेम केलं जावं, आणि आपला आदर व्हावा, असं वाटण्याबाबतीत प्रत्येक जण समान असतो, हे वैश्विक नीतिमत्तेचं पायाभूत गृहितक आहे. भारतीय संविधान वैश्विकतेच्या वैश्विक तत्त्वांवर आधारलेलं आहे, त्यात कोणताही अग्रक्रम न ठेवता सर्व परंपरांचा व सर्व धर्मांचा आदर ठेवलेला आहे. मूल्यशिक्षण व नैतिक जागरूकता यांद्वारे अधिक शांत जग निर्माण करणं, हे भारतीय प्रज्ञानाचं कायमस्वरूपी उद्दिष्ट राहिलेलं आहे. विज्ञान, अर्थनीती, राजकारण, तंत्रज्ञान, कला व साहित्य यांसारख्या क्षेत्रांमध्ये शिक्षणाने खरोखरच मैलाचे दगड निर्माण केले. पण आज सर्वसामान्य माणसाला भेडसावणाऱ्या समस्यांच्या तुलनेत हे मैलाचे दगड फिके ठरणार नाहीत का?

सर्व मानवता एक कुटुंब आहे, या वैश्विक तत्त्वावर परिवर्तनकारी अध्यापनशैली आधारलेली आहे. मानवतेचे गुण व निष्ठा, आणि तर्क, सहानुभूती, नैतिक विवेक व अंतःप्रेरणा यांसारख्या कार्यक्षमता विद्यार्थ्यांच्या मनांचं व भावनांचं पूर्ण सामर्थ्य प्रत्यक्षात येण्यासाठी आवश्यक असतात. वैश्विक नीतिमत्तेविना शिक्षण हे जवळपास कायमच आर्थिक विकासाच्या दिशेने जाणारं असतं, त्यात व्यक्तिगत पातळीवर मानसिक समस्याही सोडवल्या जात नाहीत किंवा स्थूल पातळीवरील सामाजिक समस्याही सोडवल्या जात नाहीत.

तंत्रज्ञानातील बदल “करण्या”च्या (doing) नवीन मार्गांना चालना देत असतील, तर वैश्विक नीतिमत्ता “असण्या”च्या (being) नवीन मार्गांना चालना देते. अस्तित्वरूपी जीव कृती करतात तेव्हा उत्क्रांती होते. तंत्रज्ञानाच्या प्रचंड वाढीने गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत. वैश्विक नीतिमत्तेमुळे आत्मपरिवर्तन कसं घडून येईल आणि मानवतेला शांतता व स्वातंत्र्य कसं लाभेल, आणि आपण स्वतःचं सक्षम व शाश्वत चारित्र्य कसं तयार करू शकू?

खुल्या मनाशिवाय आपली वाढ होत नाही. शिक्षक व विद्यार्थी या दोघांचंही परिवर्तन गरजेचं आहे. तुम्हाला चांगलं माणूस व्हायचं असेल तर नैतिक मार्ग व मूल्यं स्वीकारण्यावाचून दुसरा काही पर्याय नाही. माझ्याकडे माझी अस्मिता आहे, पण समाजामध्ये बहुविधता अस्तित्वात असल्याचं मी स्वीकारायलाच हवं. वैश्विक नीतिमत्तेमुळे व्यक्ती अधिक सक्षम व स्वतःविषयी सजग बनते. भौतिक जगामध्ये विजयी व्हायचं असेल तर नीतिमत्तेचा त्याग करावा लागतो, असा विचार करून लोक काही वेळा गोंधळताना दिसतात. पण भौतिक जगामध्ये तुम्हाला अब्जाधीश व्हायचं असेल, तरी तुम्ही विश्वासू असावं लागतं. विश्वासू असण्यासाठी तुम्ही नैतिक व प्रामाणिक असणं गरजेचं असतं. तुमच्या घरी उत्तम आचारी असेल, तर तुम्ही त्याला खूप दाद देता, पण हा आचारी तुमच्या खिशातून पैसे चोरत असल्याचं एका दिवशी तुमच्या लक्षात येतं, मग तुम्ही त्याला घराबाहेर काढता. आपण आपल्या कनिष्ठ सहायकांकडून अप्रामाणिपणा सहन करत नसू, तर आपला वरिष्ठ अधिकारी आपला अप्रामाणिकपणा सहन करेल, अशी अपेक्षा कशी काय ठेवता येईल?

या गोष्टी समजून घ्यायला अतिशय सोप्या आहेत. यात काहीच गुंतागुंतीचं नाही.

Top