प्रत्येक जण बुद्ध होऊ शकतो

04:17
आपल्या सर्वांना चिरंतन सुखाची अपेक्षा असते, त्यामुळे सर्वात महत्त्वाचा आणि तर्कशुद्ध विचार हाच असेल की त्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी आपण वास्तववादी दृष्टिकोन ठेवून प्रयत्न करावेत. भौतिक गोष्टी भलेही काही प्रमाणात सुख देत असतील, पण खऱ्या सुखाचा स्रोत आपल्या मनात आहे. जेव्हा आपल्या सर्व क्षमता परिपूर्णपणे विकसित होतात आणि आपल्या कमतरांवर आपण विजय मिळवतो, तेव्हा आपण बुद्ध होतो. फक्त स्वतःच्याच नव्हे, तर प्रत्येकाच्या सुखाचा स्रोत असणारा बुद्ध. आपण सर्वच जण बुद्ध होऊ शकतो, कारण आपल्या प्रत्येकात त्या कार्यक्षमता असतात, ज्या उद्दिष्टप्राप्तीसाठी उपयुक्त असतात. आपल्या प्रत्येकात बौद्ध प्रकृती असते.

आपण सर्व बुद्ध होऊ शकतो, यावर बुद्धांनी भर दिला होता. पण बुद्ध होणे म्हणजे नक्की काय? बुद्ध म्हणजे अशी व्यक्ती, जिने आपल्या सर्व कमतरतांवर विजय मिळवला आहे, आपल्यातील सर्व दोष संपवले आहेत आणि स्वतःतल्या क्षमतांची त्याला पूर्ण जाणीव झाली आहे. प्रत्येक बुद्धाची सुरुवात सर्वसामान्य माणसाप्रमाणेच झालेली आहे. जो आपल्या मिथ्या कल्पनांमुळे आणि वास्तवाबाबतच्या  वैचारिक गोंधळामुळे जीवनात वारंवार दुःख अनुभवत असतो. त्यांना जाणीव झाली आपल्या हटवादी  कल्पना वास्तवाला धरून नाहीत आणि वेदनेतून मुक्त होण्याच्या त्यांच्या दृढ निश्चयामुळे त्यांनी आपोआप आपल्या मानसिक कल्पनांवर विश्वास ठेवणे बंद केले. त्यांनी तणावग्रस्त भावनांच्या प्रभावाखाली वागणे बंद केले आणि स्वतःला वेदनेतून मुक्त केले.

या पूर्ण प्रक्रियेत त्यांनी प्रेम आणि करुणेसारख्या सकारात्मक भावना सुदृढ करून इतरांना शक्य तितकी मदत करण्याच्या प्रयत्नांचा अभ्यास केला. एखाद्या आईचे आपल्या मुलांप्रति असावे, असे प्रेम त्यांनी सर्वांसाठी विकसित केले. प्रत्येकाप्रति असलेल्या त्यांच्या या तीव्र प्रेम आणि करुणेमुळे आणि इतरांची मदत करण्याच्या त्यांच्या संकल्पामुळे, त्यांची वास्तवाबद्दल जाणीव अधिकाधिक प्रगल्भ होत गेली. ही जाणीव इतकी सक्षम होत गेली की त्यांच्या मनाने प्रत्येक गोष्टीचे स्वतंत्र अस्तित्व असते आणि ते इतर सर्व गोष्टींपासून वेगळे असते, अशा भ्रामक कल्पना करणेही बंद केले . कोणत्याही अडथळ्याशिवाय त्यांना सर्व जीवमात्रांमधील परस्परसंबंध आणि परस्परावलंबन स्पष्ट पाहता आले.

या सिद्धीमुळे त्यांना ज्ञानप्राप्ती झालीः ते बुद्ध झाले. त्यांचे शरीर, त्यांच्या संवादाच्या क्षमता आणि त्यांचे मन सर्व प्रकारच्या मर्यादांमधून मुक्त झाले. त्यांच्या शिकवणीचा इतरांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन ते सर्व जीवमात्रांच्या शक्य तितक्या मदतीसाठी सक्षम झाले. पण बुद्धही सर्वशक्तिमान नाहीत. बुद्ध त्याच व्यक्तींवर सकारात्मक प्रभाव पाडू शकतात, जे मोकळेपणाने त्यांच्या सल्ल्याचा स्वीकार करतात आणि त्यांचे योग्य अनुकरण करतात. 

आणि बुद्धांनी सांगितले की त्यांनी जे साध्य केले ते प्रत्येकाला शक्य आहेः प्रत्येकाला बुद्ध होणे शक्य आहे. प्रत्येकाजवळ बुद्धत्वासाठी आवश्यक असणारी मूलभूत कार्यसामग्री असणारी ‘बौद्ध-प्रवृत्ती’ असल्याने हे शक्य आहे.

मज्जातंतू शास्त्रात न्युरोप्लास्टिसिटीचा उल्लेख आहे - ज्यात संपूर्ण जीवनभर आपल्या मेंदूच्या मज्जातंतू मार्गिकांमध्ये बदल करून नव्या मार्गिका विकसित करणे शक्य आहे. उदाहरणार्थ, पक्षाघातात आपला उजवा हात नियंत्रित करणारा मस्तिष्क भाग बाधित झाल्यास फिजिओथेरपीच्या माध्यमातून नव्या मज्जातंतू मार्गिका विकसित करणे शक्य आहे, ज्यामुळे आपण आपल्या डाव्या हाताचा वापर करू शकतो. अलीकडेच झालेल्या संशोधनानुसार करुणेवर आधारित ध्यानधारणासुद्धा नव्या मस्तिष्क मार्गिका करू शकते, ज्या आपल्याला सुख आणि मनःशांती प्राप्त करण्यास उपयुक्त ठरू शकतात. त्यामुळे आपण जसे न्युरोप्लास्टिसिटीविषयी बोललो तसे मनाच्या प्लास्टिसिटीविषयीही बोलता येऊ शकते. आपले मन आणि व्यक्तिमत्त्वविषयक वैशिष्ट्ये गतिहिन व स्थिर नसल्याने नव्या मस्तिष्क मार्गिकांद्वारे त्यांना उत्तेजित करणे शक्य आहे, आणि हाच मूलभूत घटक ज्ञानप्राप्त बुद्ध होण्यासाठी  साहाय्यक ठरू शकतो.

शारीरिक पातळीवर जेव्हा जेव्हा आपण विधायक उपकारक गोष्टी बोलतो किंवा त्याविषयी विचार करतो, तेव्हा आपल्यातील सकारात्मक मस्तिष्क मार्गिका अधिक सुदृढ होतात आणि आपल्याला सकारात्मक कृती वारंवार करण्यासाठी उपयुक्त ठरतात. बौद्ध धर्मानुसार त्यामुळे मानसिक पातळीवर सकारात्मक ऊर्जेत आणि मानसिक क्षमतांमध्ये वाढ होते. अशा सकारात्मक ऊर्जेचा इतरांच्या भल्यासाठी वापर केल्यास त्या अधिकाधिक दृढ होतात. एखाद्या बुद्धाप्रमाणेच सर्व जीवमात्रांना मदत करण्याच्या दृष्टीने वापरण्यात आलेली सकारात्मक ऊर्जा, आपल्याला संपूर्ण विश्वाचे भले करण्याच्या  उद्दिष्टाकडे नेते. 

तशाच प्रकारे जेव्हा आपण वास्तवासंबंधीच्या आकलनाच्या अभावामुळे वास्तवाबाबतच्या भ्रामक कल्पनांवर लक्ष केंद्रित करतो, तेव्हा मानसिक मूर्खपणावर विश्वास ठेवल्याने आणि त्या आधारे भ्रामक कल्पना करत बसल्याने आपल्या मस्तिष्क मार्गिका दुर्बल होत जातात. कालांतराने आपले मन या भ्रामक मस्तिष्क मार्गिकांपासून मुक्त होते आणि तणावग्रस्त भावनांच्या मार्गांपासून व त्यातून घडणाऱ्या बंधनकारक व्यवहारातूनही मुक्त होते. त्याऐवजी आपण वास्तवाबाबतच्या सखोल जाणिवांच्या मार्गिका विकसित करतो. या मार्गिकांना जेव्हा सर्व जीवमात्रांच्या मदतीची जाणीव असणारे सर्वज्ञ बौद्ध मन होण्याच्या उद्दिष्टाचे पाठबळ मिळते, तेव्हा या सखोल जाणिवांचे जाळे आपल्या बुद्ध होण्याच्या प्रक्रियेसाठी साहाय्यक ठरते.     

आपल्या सर्वांजवळच इतरांशी संवाद साधण्याची क्षमता - प्रामुख्याने वाणी - आणि मन आहे आणि ही बुद्ध शरीर, वाणी आणि मन साध्य करण्यासाठीची कार्यसामग्री आहे. हे तीन घटक बौद्ध-प्रकृतीच्या घटकांसारखे आहेत.  आपल्या सर्वांजवळच काही चांगले गुण आहेत - जसे आत्मजतनाची अंतर्दृष्टी, जीवमात्रांच्या जतनाची अंतर्दृष्टी आणि आपली मातृपितृवत अंतर्दृष्टी - शिवाय इतरांशी वागण्याची आणि प्रभाव पाडण्याची क्षमता. हे दोनही घटक बौद्ध प्रकृतीचे घटक आहेत, ते प्रेम आणि दयाशीलतेसारख्या चांगल्या गुणांच्या मशागतीसाठी आणि ज्ञानप्राप्त बुद्ध होण्यासाठी साहाय्यक आहेत.

आपले मन कसे कार्य करते याचे निरीक्षण केल्यास आपल्याला बौद्ध-प्रकृतीच्या आणखी काही घटकांचा शोध लागतो. आपल्या सर्वांमध्ये माहिती मिळवणे, सम गुणधर्म असलेल्या गोष्टींची विभागणी करणे, विशिष्ट गुणधर्मांच्या गोष्टी विभागणे, प्रतिक्रिया व्यक्त करणे आणि वस्तूंचे स्वरूप समजण्याच्या क्षमता असतात. अशा पद्धतीने काम करण्याच्या आपल्या मानसिक क्षमताही मर्यादित असतात, पण त्या बुद्धत्व प्राप्तीसाठी आवश्यक कार्यसामुग्रीही असतात, ज्यात त्या आपल्या संपूर्ण क्षमतेने कार्य करतात.

सारांश

आपल्यात बुद्धत्व प्राप्तीसाठी आवश्यक घटक उपलब्ध असतात, त्यामुळे ज्ञानप्राप्तीसाठी आपण आपल्या प्रेरणांमध्ये सातत्य ठेवणे आणि उद्दिष्टप्राप्ती होईपर्यंत सातत्यपूर्ण कष्ट घेणे आवश्यक असते.  प्रगती कधीच एकरेषीय नसतेः काही दिवस चांगले जातील, तर काही वाईट. बुद्धत्व प्राप्तीचा मार्ग खडतर आहे, सहजसाध्य नाही. पण आपण स्वतःला आपल्यातल्या बौद्ध-प्रकृतीच्या घटकांची जितकी अधिक जाणीव करून देऊ, तोपर्यंत आपण नाउमेद होणार नाही. फक्त आपल्यात कायम जाणीव असायला हवी की आपल्यासोबत काहीही चुकीचे घडत नाही. आपण सबळ प्रेरणेच्या मदतीने आणि करुणा व ज्ञानाच्या कौशल्यपूर्ण संगमाच्या वास्तववादी पद्धती अवलंबून सर्व अडथळ्यांवर मात करू शकतो.

Top