क्रोधाचा सामना करण्यासाठी ८ बौद्ध टिपा

आपण अशा युगात जगत आहोत, जिथं आपल्याला क्रोध व्यक्त करण्याविषयी सांगितलं जातं, पण बुद्ध याला सहमत होणार नाही. क्रोधातून केलेली कृती पुन्हापुन्हा तशाच पद्धतीने व्यक्त व्हायला भाग पाडू शकते आणि त्यातून न संपणारी साखळी तयार होऊ शकते. बुद्ध आपल्या भावना दाबून ठेवायलाही सांगत नाही, किंवा त्या आवेगानं व्यक्त करायलाही सांगत नाही. तर आपल्याला त्याचं नेमकं विश्लेषण करून क्रोधाच्या मागे दडलेली चुकीची धारणा समजून घेण्याची शिकवण देतो.
Study buddhism 8 buddhist tips dealing with anger

बौद्ध साधक भलेही प्रेम, करुणा आणि सहनशीलतेविषयी बोलत असतील, पण परमपूज्य दलाई लामांसारखे महान गुरूही काही वेळा राग अनावर झाल्याचे सांगतात, तेव्हा आपल्यासारख्यांना कोणती आशा आहे का? क्रोधाची भावना नैसर्गिक असल्याचे विज्ञान सांगू शकते, मनोविश्लेषक क्रोध व्यक्त करण्याचा सल्ला देऊ शकतात, आणि अगदी काही धर्मांमध्येही न्याय्य क्रोधाला मान्यता असेल, पण बौद्ध धर्म मात्र क्रोध वाईटच असल्याचे स्पष्ट करतो.  

८व्या शतकातील बौद्ध गुरू शांतिदेव क्रोधाला, आपण कष्टाने मिळवलेला चांगुलपणा नष्ट करण्याची क्षमता असणारी सर्वात नकारात्मक भावना समजतात. याविषयी विचार करून पाहा. क्रोधाचा एखादा क्षण आणि हातात बंदूक असेल तर त्या व्यक्तीचे भविष्यच बदलून जाऊ शकेल. त्याचा मुक्त जगण्याचा अधिकार असलेले जीवन गजाआड व्यतीत होऊ शकेल. दैनंदिन जीवनातले उदाहरण घ्यायचे झाल्यास क्रोध अशी मैत्री आणि विश्वास नष्ट करू शकतो, जी कमावण्यासाठी आपण कित्येक वर्षे घालवली असतील. यातून असा निष्कर्ष निघू शकतो की क्रोध हा जगभरातल्या स्फोटकं, बंदुका आणि सुरीपेक्षा धोकादायक असतो.   

आपल्याला जाणीव आहे की क्रोध हे चांगल्या मनोवस्थेचं लक्षण नाही, पण मग करायचे काय? बौद्ध धर्म आपल्या मन परिवर्तनासाठी अनेक सोप्या पद्धती सुचविते. पण हे लक्षात ठेवा की – ती काही जादुची कांडी नाही. क्रोधाचा सामना करण्यासाठी आमच्या ८ बौद्ध टिपा येथे दिल्या आहेतः

१. हेच जीवन आहेः संसार

२५०० वर्षांपूर्वीची बौद्ध शिकवण थेट एका मुद्द्याविषयी सांगतेः जीवनात असंतोष भरलेला आहे. आणि कल्पना करा? आपले जीवन कधीच समाधानकारक असू शकत नाही.

आपण जन्मतो, आपण मरतो. दरम्यान काही चांगला काळ असतो, काही वाईट काळ असतो आणि काही काळ असाही असतो जेव्हा कसलीच अनुभूती नसतेः या न संपणाऱ्या चक्राला बौद्ध धर्मात ‘संसार’ म्हणतात. आपण जेव्हा या जगात आलो, तेव्हा कोणीही सांगितले नाही की जीवन फार सुंदर असेल, चिरंतन हसतखेळत जगता येईल आणि नेहमी आपल्याला हव्या त्या गोष्टी मिळत राहतील. जेव्हा आपण संसारातली आपली स्थिती समजून घेऊ, आपल्याला इतरांच्या स्थितीचीही जाणीव होण्यास मदत होईल.

२. धैर्यशील व्हाः संयम राखा

अस्वस्थ करणाऱ्या भावना त्यांच्या विरोधी भावनांनी नष्ट करता येऊ शकतात; आगीचा आगीने मुकाबला करणे शक्य नाही. का? कारण एकाच वेळी मनात दोन परस्पर विरोधी भावना बाळगणे अशक्य असते. तुम्ही एकाच वेळी एखाद्यावर रागवू किंवा त्याच्याबाबतीत  शांत राहू शकत नाही – हे होऊ शकत नाही. संयम अनेकांना असे दुबळेपणाचे लक्षण वाटतो, जिथे तुम्ही दुसऱ्याला त्याला हवे तसे तुमच्याशी वागू देता. खरेतर वास्तव याहून फार वेगळे असते. आपण वैतागलेले असू तेव्हा इतरांवर आरडाओरड करणे , आकांडतांडव करणे सहजसोपे आहे. आणि फक्त शांत राहून स्वतःच्या भावनांवर नियंत्रण मिळवणे किती अवघड आहे? आपल्या भावना आपल्याला ज्या दिशेने ओढत नेतात, तिकडे ओढले जाणे आपल्याला धैर्यशील बनवत नाही – ते आपल्याला दुबळे बनवते. त्यामुळे पुढील वेळी जेव्हा तुम्ही ओरडण्याच्या काठावर असाल, तेव्हा संयमाचं शस्त्र काढा आणि तुमच्या क्रोधाचं डोकं छाटून टाका.

हे कसे साध्य करता येईल? आपण तणावग्रस्त होत असल्याचं लक्षात आल्यास आपण दीर्घ श्वासोच्छवासाचा सराव करू शकतो – हा तणावमुक्तीचा सरळसोपा मार्ग आहे कारण आपण क्रोधीत झाल्याने आपला श्वासोच्छवास अस्थिर होतो. आपण मनात १०० पर्यंत आकडे मोजू शकतो, जेणेकरून आपल्याला नंतर पश्चाताप होईल, असे बोलण्यापासून आपण स्वतःला रोखू शकू.  किंवा आपण जर अशा स्थितीत असू की जिथे भांडण होऊ शकते, तिथून आपण स्वतःला तात्काळ वेगळे करू शकतो. प्रत्येक स्थिती वेगळी असते. त्यामुळे आपण आपला मेंदू वापरून कोणता उपाय लागू पडू शकतो, ते ठरवायला हवे. 

३. विवेकवादी व्हाः परिस्थितीचं विश्लेषण करा

आपण क्रोधीत होतो, तेव्हा आपला राग एखाद्या संरक्षकासारखा अवतरतो, जसे आपल्या चांगल्या मित्राने आपल्या भल्याची काळजी घ्यावी आणि आपल्याला लढाईच्या मैदानात मदत करावी. हा भ्रम आपल्याला क्रोधीत होणे न्याय असल्याचा विचार करायला वाव देते. पण आपण काळजीपूर्वक निरीक्षण केल्यास, क्रोध आपला मित्र नसून शत्रू आहे.

क्रोधामुळे आपल्याला तणाव, मनस्ताप, निद्रानाश आणि भूक न लागणे सारख्या गोष्टी जाणवतात. एखाद्यावर आपण सतत क्रोधीत होत राहिलो तर आपल्यावर रागीट म्हणून शिक्कामोर्तब होईल. आणि वास्तवतः रागीट व्यक्तीसोबत कोण राहू शकेल?

जेव्हा आपल्यावर एखाद्या गोष्टीसाठी आरोप केले जातात आणि बचावात्मक दृष्टिकोनातून आपण अस्वस्थ होऊ लागतो, तेव्हा आपण शांत होऊन विवेकी विचार करण्याची गरज असते. आपल्या समोर दोनच पर्याय असतातः आरोप बरोबर असतो किंवा चुकीचा असतो. जर तो बरोबर असेल, तर आपण का रागवतो? आपण जर समजूतदार वागण्याची इच्छा बाळगत असू तर आपण त्या आरोपांचा स्वीकार करायला हवा, त्यातून बोध घ्यायला हवा आणि जीवनात पुढे जायला हवे. आणि आरोपात तथ्य नसेल, तरी रागवून काय फायदा? एखाद्या व्यक्तीने एखादी चूक केली आहे –  तशी चूक आपण आपल्या जीवनात कधी केलेलीच नाही का?  

४. मनावर लक्ष केंद्रित कराः ध्यानधारणा

क्रोधाशी लढण्यासाठी ध्यानधारणा आणि सजगता अतिशय परिणामकारक ठरू शकते. काही लोक ध्यानधारणेला वेळेचा अपव्यय समजू शकतात – आपण दिवसभर बसून घालवत असू तर वीस मिनिटे वेगळे ध्यानाला बसून काय फायदा, बरोबर असाच विचार करतो ना आपण? तर काही जण म्हणतात ध्यानधारणा म्हणजे वास्तवापासून पळ काढणे आहे, जिथे आपण मुले/इमेल/नवरा/बायको अशा गोष्टींमध्ये वेळ घालवू शकतो.

पण ध्यानधारणा त्याहून फार अधिक काहीतरी आहे – ही खऱ्या जीवनासाठीची पूर्वतयारी आहे. आपण सकाळी करुणेविषयी ध्यान केले, पण कामावर जाताच लगेच कर्मचाऱ्यांवर ओरडायला सुरुवात केली किंवा सहकाऱ्यांच्या तक्रारी सुरू केल्या तर काहीच उपयोग नाही.

ध्यानधारणा आपल्या मनाला सकारात्मक विचारांशी परिचित करते – संयम, प्रेम, करुणा – आणि हे आपण सदासर्वकाळ अमलात आणू शकतो. जर आपण सकाळचा अर्धा तास आपली आवडती गाणी ऐकण्यात घालवत असू तर, कमीतकमी त्यातील दहा मिनिटे आपण आपले करुणामय विचार जागृत करण्यासाठी देऊ शकतो – जे आपला क्रोध कमी करण्यासाठी परिणामकारक ठरू शकते आणि इतरांना आपल्या अवतीभोवती असावी, अशी व्यक्ती बनण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

५.नतमस्तक व्हाः शत्रूकडूनही शिका

बौद्ध धर्म आपल्याला नेहमीच्या वागण्याच्या पद्धतीपेक्षा विरुद्ध वागण्याची शिकवण देतो. जेव्हा आपण एखाद्यावर क्रोधीत होतो, आपली बदला घेण्याची इच्छा बळावते. त्याचा परिणाम काय होतो? आपण आधी इतके नसलो तरी दुःखी राहतोच. हे आपल्या सहज भावनेपेक्षा विरुद्ध वाटू शकते. पण उलट वागण्याने उलट परिणाम मिळतातः जसे सुखाचा मार्ग गवसतो.

हे विचित्र वाटू शकते, पण तुम्ही ज्या व्यक्तीवर रागावले आहात, त्याला आपला गुरू माना. जर आपल्याला अधिक चांगले व्हायचे असेल – म्हणजे अधिक संयमी, अधिक प्रेमळ, दयाळू आणि आनंदी – तर आपल्याला साधना करायला हवी. आपल्या सर्वांना माहीत आहे की चांगला फुटबॉलपटू किंवा व्हायोलिनवादक होण्यासाठी  वेळ आणि कठोर परिश्रम आवश्यक असतात, तर बौद्धिक व्यायामाची परिस्थिती त्याहून वेगळी कशी असेल? जर आपण नेहमी आपल्या मताप्रमाणे वागणाऱ्या माणसांनी घेरलेले असू तर आपण कधीच परिवर्तन अनुभवणार नाही.

अशा प्रकारे, ज्या व्यक्तीवर आपण रागावले आहोत, ती अत्यंत महत्त्वाची असते, ती व्यक्ती आपल्याला संयमाचा अभ्यास करण्याची संधी देते. त्यामुळे आपण क्रोधाच्या उकळत्या भावनांमधून बाहेर येतो, कारण आपल्या दृष्टिकोनात बदल होतो, आणि आपण ते आपल्यासोबत कसे वागले आहेत हा विचार करण्याच्या जागी ते आपल्यासाठी काय करत आहेत, याचा विचार करतो.

६. मृत्युचा विसर पडू देऊ नकाः नश्वरता

तुम्ही मरणार आहात. मी मरणार आहे. आपण सर्वच जण मरणार आहोत. त्यामुळे एखाद्या नावडत्या व्यक्तीने असे काही केले, ज्यामुळे आपल्याला राग अनावर झाला आहे, तेव्हा क्षणभर शांत बसून असा विचार कराः ‘जर मी मृत्युशय्येवर असतो, तर मला त्या गोष्टीची इतकी काळजी वाटली असती का?’ आणि जर ती व्यक्ती अगदी जगाचा विध्वंस करण्या इतकी धोकादायक नसेल तर तुमचं उत्तर निश्चित्तच ‘नाही’ असंच असेल. ही टीप अगदी सोपी आहे, पण त्यामुळे अगदी छोट्याछोट्या समस्याही सोप्या होऊ शकतात.

आपल्या सर्वांना माहीत असते की आपण नश्वर आहोत, पण आपल्याला त्याचा खरा बोध झालेला नसतो. मृत्यू म्हणजे एखादी अमूर्त, दूर असणारी आणि दुसऱ्यांबाबत घडणारी घटना वाटते – वयस्कर, आजारी किंवा अपघातांची शिकार झालेल्यांवर ओढावलेली घटना. पण ते वास्तव नाही. प्रत्येक दिवशी कितीतरी तरुण मुले म्हाताऱ्या माणसांच्या आधीच मरतात, कितीतरी स्वस्थ माणसे आजारी माणसांच्या आधीच मरतात.

जेव्हा आपण आपल्या भविष्यातील मृत्युवर (कदाचित उद्या? कदाचित काही वर्षांनी? कदाचित ५० वर्षांनी?) ध्यान केंद्रित केले, तर एरव्ही महत्त्वाच्या वाटणाऱ्या गोष्टी क्षुल्लक वाटू लागतात.

असे नाही की आपल्याला त्या गोष्टींचा अजिबात त्रास होणार नाही, पण आपल्याला जाणीव होईल की अशा गोष्टींवर आपला वेळ, ऊर्जा आणि श्वास खर्च करण्यात काहीच अर्थ नाही.

७. आपल्या कर्माचे फळ

लोक म्हणतात, ‘जसे करावे, तसे भरावे’ किंवा ‘ते त्याचे कर्मच आहे – तो त्याच लायकीचा आहे.’ याचा अर्थ लोक जसे वागतात, त्याचे ते फळ असते. पण बौद्ध धर्मातील कर्माची संकल्पना अशी नाही. ती अधिक जटिल आणि सूक्ष्म आहे. जेव्हा लोक इतरांच्या आयुष्यातील स्थिती त्यांच्या कर्माचे फळ आहे, म्हणून आनंदी होतात, तेव्हा ते आपल्या आयुष्यातील दुःखे आपल्या कर्माची फळे असल्याचे बोलत नाहीत.

आपण जे काही अनुभवतो – सर्वोच्च आनंदापासून ते खोल वेदनेपर्यंत – ते कारणांमधून उत्पन्न झालेले असते. पण ही कारणे विनाकारण उत्पन्न होत नाहीत, तर ती आपण निर्माण केलेली असतात. त्यामुळे जेव्हा आपण कष्टदायी परिस्थिती अनुभवत असू, तेव्हा क्रोधीत होण्यापेक्षा आपण शांत होऊन क्षणभर विचार करू शकतोः हे कशातून उत्पन्न झाले आहे आणि आपल्याला ते अधिक त्रासदायक करायचे आहे का?

कर्माचा संबंध आपल्या बंधनकारक वागण्याशी आहे. प्रत्येक गोष्टीला पारंपरिक पद्धतीने प्रतिक्रिया देण्याच्या सवयीशी आहे.  जर आपण समजून घेतले की कर्म नेमके कसे काम करते, तर आपल्याला जाणीव होऊ शकते की  वर्तमानातील कृतींद्वारे आपल्या भविष्यातील अनुभवांमध्ये बदल करण्याची आपल्यात क्षमता असते – याचा संबंध क्रोधाच्या वेळी संयमाने परिस्थिती हाताळण्याशी आहे.

८. हे वास्तव नाहीः शून्यता

संयम हा थेट उतारा असला तरी शून्यता हा तीव्र उतारा आहे. फक्त आपल्या क्रोधावरच नव्हे, तर आपल्या सर्व समस्यांवरचा तो उतारा आहे. खरेतर आपण कितीही संयमी असलो, पण आपल्याला शून्यत्वाची जाणीव नसेल, तर भारतीय मान्सूनप्रमाणे आपल्यावर समस्यांचा वर्षाव होईल.

आपण क्रोधीत झाल्यावर क्षणभर आपल्या मनाचे विश्लेषण केले तर एक गोष्ट आपल्या ध्यानात येईलः ती म्हणजे ‘मी’ किंवा ‘स्व’ची तीव्र जाणीव. ‘तो मला जे काही बोलला त्याने मला प्रचंड राग आला आहे. मला विश्वासच बसत नाही, तो माझ्या मित्राशी असा वागला. याबाबतीत मीच योग्य आहे आणि ती चुकीचीच आहे.’ मी, मी, मी.

जेव्हा आपण क्रोधीत होते, तेव्हा या ‘मी’पणाच्या तीव्र भावनेचे विश्लेषण करण्याची योग्य संधी असते. त्याचे अस्तित्वच नसते. आपण असे म्हणत नाही की आपले अस्तित्व नाही. किंवा कोणत्याच गोष्टीला महत्त्व नाही, पण आपण हे शोधण्याचा प्रयत्न करत आहोत की तो ‘मी’ कुठे आहे – तो आपल्या मनात आहे का? तो आपल्या शरीरात आहे का? की दोन्हीत? – असा कोणताही मार्ग नाही, जो स्पष्ट करेल, ‘हो..तो तिथे आहे.’

लोकांना हे समजणे कठीण आहे. पण सत्य  हे आहे की जेव्हा आपण वास्तवाचे विश्लेषण करू लागतो, त्यातून आपला दृष्टिकोन पूर्णपणे बदलू शकतो. आपल्याला हा बोध होतो की ज्यावर क्रोधीत व्हावे, असे कारण खरेतर अस्तित्वातच नाही.  

सारांश

आपण कितीही वेळा ‘मी क्रोधीत होणार नाही’ म्हणू, पण खऱ्या प्रयत्नांशिवाय आपल्याला इच्छित मानसिक शांती मिळणे शक्य नाही.

वर दिलेले मुद्दे केवळ चांगली यादी नाही – स्वतःला निराशा, क्रोध आणि दुःखातून मुक्त करण्याची साधने आहेत. त्यांचा सराव केल्यास कोणालाही ती साध्य करता येऊ शकतात.

Top