महान शिक्षक असण्याबाबतचा सरकाँग रिंपोछे यांचा दृष्टिकोन

अध्यात्मिक शिक्षकाबद्दल विश्वास व मनःपूर्वक बांधिलकी विकसित करणं

अध्यात्मिक शिक्षकाबद्दल मनःपूर्वक बांधिलकी राखणं ही सर्वांत अवघड व नाजूक बौद्ध आचारपद्धतींपैकी एक आहे. या आचारपद्धतीला योग्यरित्या प्रस्थापित करण्यासाठी व ती सांभाळण्यासाठी अतिशय काळजी घेणं गरजेचं आहे. एकदा ठोस पाया दिल्यानंतर याला कोणीही छिन्नविछिन्न करू शकत नाही. सरकाँग रिंपोछे यांच्यात व माझ्यात अशाच तऱ्हेचं नातं राहील याची खातरजमा करण्यासाठी रिंपोछे यांनी बरीच तसदी घेतली. एकदा मुंडगोड इथे मोनलाम उत्सव संपल्यानंतर संध्याकाळी रिंपोछे यांनी त्यांच्या तिथल्या मालमत्तेच्या अर्थपुरवठ्याची गुंतागुंतीची कथा मला ऐकवली. हे अनावश्यक आहे, असं त्यांच्या इतर सहकाऱ्यांना वाटलं, पण मी हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे, असं रिंपोछे म्हणाले. नंतर कोणा मत्सरी घटकांकडून या मुद्द्यावरच्या खोट्या अफवा मी ऐकल्या, तरी रिंपोछे यांच्या निष्ठेविषयी किंवा माझ्या मनःपूर्वक बांधिलकीविषयी क्षणभरही माझ्या मनात शंका निर्माण होऊ नये, यासाठी खात्री करून घेणं त्यांना गरजेचं वाटत होतं.

अध्यात्मिक शिक्षकाबद्दल मनःपूर्वक बांधिलकी ठेवण्यासाठी संभाव्य शिष्य व शिक्षक यांच्यात परस्परांची सखोल व प्रदीर्घ तपासणी असणं गरजेचं आहे. काळजीपूर्वक छाननी केल्यानंतर शिष्यांनी स्वतःच्या लामांकडे बुद्ध म्हणून पाहणं गरजेचं असतं, पण याचा अर्थ अध्यात्मिक गुरू कधीच चूक करत नाहीत असा नव्हे. शिक्षक काय बोलत आहेत याची तपासणी शिष्यांनी कायम करायलाच हवी, आणि आवश्यक वाटल्यास अधिकच्या सूचनाही नम्रपणे कराव्यात. सतत सजग राहून आपले लामा काही विचित्र बोलले किंवा तसं काही त्यांनी केलं तर ते आदरपूर्वक दुरुस्त करावं.

एकदा फ्रान्समधील नालंदा मठात पाश्चात्त्य भिक्खूंसमोर हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न रिंपोछे करत होते. एका प्रवचनादरम्यान त्यांनी हेतूतः पूर्णतः चुकीच्या पद्धतीने काही स्पष्टीकरण दिलं. ते बोलले ते अगदी धडधडीत असंगत असतानाही, सर्व भिक्खूंनी अतिशय आदरपूर्वक त्यांचे शब्द आपापल्या वह्यांमध्ये टिपून घेतले. पुढच्या सत्रात रिंपोछेंनी भिक्खूंची खरडपट्टी काढली. आदल्या तासाला आपण पूर्णतः हास्यास्पद, चुकीच्या पद्धतीने काहीतरी स्पष्टीकरण दिलं होतं, असं त्यांनी सांगितलं. तरीही त्यावर कोणीच आपल्याला प्रश्न का विचारला नाही? खुद्द बुद्धाने सुचवल्यानुसार, कोणी शिक्षक काही सांगत असेल तर ते आंधळेपणाने आणि अचिकित्सकपणे कधीच स्वीकारू नये. महान गुरूंचीही कधीकधी बोलताना गफलत होऊ शकते; भाषांतरकार अनेकदा चुका करतात; आणि विद्यार्थी नेहमी चुकीची व गोंधळलेली टिपणं काढतात. काही विचित्र वाटलं, तर त्यांनी कायम प्रश्न विचारायला हवेत आणि महान संहितांच्या संदर्भात प्रत्येक मुद्द्याची तपासणी करायला हवी.

सर्वांत महान बौद्ध गुरूंच्या संहितांचंही विश्लेषण करणं व प्रश्न विचारणं

व्यक्तीशः रिंपोछे तर प्रमाणित बौद्ध भाष्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत. तसं करताना ते त्सोंगखापा यांचा दाखला अनुसरत असत. चौदाव्या शतकातील सुधारक त्सोंगखापा यांनी नमूद केल्यानुसार, भारतीय व तिबेटी गुरूंच्या अनेक आदरणीय संहिता परस्परांना छेद देतात आणि त्यात अतार्किक प्रतिपादनंही आहेत. त्सोंगखापा असे मुद्दे शोधून त्यांची छाननी करत असत, आणि विवेकाच्या कसोटीवर न टिकणाऱ्या भूमिका नाकारत किंवा आधी ज्याबद्दल गैरसमजूत झाली असेल अशा उताऱ्यांची मार्मिक अर्थनिर्णयनं सादर करत. धर्मग्रंथांचं विस्तृत ज्ञान असलेल्या आणि सखोल साधनेचा अनुभव असलेल्यांनाच अशा रितीने नवीन वाटांचा शोध घेता येतो. सरकाँग रिंपोछे अशांपैकी एक होते.

उदाहरणार्थ, निधन होण्याच्या थोडंसं आधी रिंपोछे यांनी मला बोलावलं आणि द इसेन्स ऑफ एक्सलन्ट एक्सप्लनेशन ऑफ इन्टरप्रीटेबल अँड डेफिनिटिव्ह मिनिंग्ज (द्रांग-न्जेस लेग्स-ब्शाद स्निंग-पो) या त्सोंगखापांच्या एका अतिशय अवघड तात्त्विक संहितेमधील एका उताऱ्याकडे त्यांनी निर्देश केला. दैनंदिन प्रथेचा भाग म्हणून रोज रिंपोछे हा शेकडो पानांचा ग्रंथ आठवणीतून उर्द्धृत करत असत. मनातील गोंधळ, विशेषतः गोंधळाची ‘बिजं’, दूर करण्याचे टप्पे कोणते आहेत, याच्याशी संबंधित हा उतारा होता. हे बिजं म्हणजे बदलती घटितं असतात, त्यात काही भौतिकही नसतं आणि काही जाणून घेण्याचा मार्गही नसतो, असा अर्थ प्रमाणित भाष्यांमध्ये नमूद केलेला आहे. हा मुद्दा समजावून देण्यासाठी मी त्या संज्ञेचं भाषांतर ‘बिजं’ (सीड) असं करण्याऐवजी ‘प्रवृत्ती’ (टेन्डन्सी) असं करत होतो. तर्क, अनुभव आणि त्या संहितेतील इतर उतारे यांचे दाखले देऊन रिंपोछे यांनी स्पष्ट केलं की, तांदळाचं बी हेही शेवटी तांदूळच असतं. त्यामुळे गोंधलाचं बीज म्हणजे गोंधळाचा ‘संकेत’ असतं. नेणिवेला कसं समजून घ्यायचं व त्यावर कसं काम करायचं या संदर्भात मूलगामी परिणाम करणारं हे क्रांतिकारी अर्थनिर्णयन होतं.

रिंपोछे यांची साधी जीवनशैली

सरकाँग रिंपोछे अभिनव तेजस्वी बुद्धिमत्ता राखून असले, तरी सदासर्वकाळ आणि सर्व प्रकारे ते नम्रतेवर भर देत आणि त्यांच्यात ढोंग नव्हतं. मुंडगोडमधल्या त्यांच्या मठातील ते सर्वोच्च लामा होते, पण रिंपोछे यांनी भपकेदार मोठं घर बांधलं नाही, उलट ते एका साध्या खोपट्यात राहत असत. धर्मशाळा इथलं त्यांचं घरही अत्यंत साधं होतं, त्यात केवळ चार लोकांसाठी तीन खोल्या होत्या, वेळोवेळी पाहुणे तिथे येत असत, दोन कुत्रे व एक मांजर हेसुद्धा याच घरात राहत.

रिंपोछे थोरत्वाचं प्रदर्शन पूर्णतः टाळायचे, त्याचप्रमाणे आपल्या शिष्यांनी आपल्याबद्दल अवाजवी गौरवपर बोलू नये याचीही खातरजमा ते करत असत. उदाहरणार्थ, अनेक साधनापद्धती आपल्या अध्यात्मिक गुरूशी असलेल्या संबंधांना केंद्रस्थानी ठेवतात- उदाहरणार्थ, गुरू-योग ही तपशीलवार कल्पनाचित्र सादर करणारी आणि संबंधित लामांच्या संस्कृत नावाचा समावेश असणाऱ्या मंत्राचं पठण करणारी पद्धती आहे. अशा गुरू-योग साधनेवेळी रिंपोछे शिष्यांना कायम परम पूजनीय दलाई लामांचं कल्पनाचित्र दृष्टीसमोर आणायला सांगत. त्यांच्या नावाच्या मंत्राबाबत विचारणा केली असता रिंपोछे कायम त्यांच्या वडिलांचं नाव सांगून त्याचं पठण करायची सूचना करत. रिंपोछे यांचे वडील सरकाँग दोर्जे-चांग हे विसाव्या शतकाच्या सुरुवातीचे एक महान साधक व शिक्षक होते. ते त्या काळातील कालचक्र वंशावळीचे वाहक होते, म्हणजे यातील ज्ञान व साधनेचा अनुभव पुढील पिढीकडे हस्तांतरित करण्याची जबाबदारी असलेले ते एक मान्यताप्राप्त गुरू होते.

सर्व प्रकारचा भपका टाळताना महात्मा गांधींचा दाखला अनुसरणं

रिंपोछे यांची साधेपणाची शैली विविध प्रकारे दिसून येत असे. उदाहरणार्थ, प्रवास करत असताना रिंपोछे महात्मा गांधींचा दाखला अनुसरायचे. भारतीय ट्रेनच्या तिसऱ्या वर्गातील थ्री-टिअर डब्यांमधून प्रवास करण्याचा त्यांचा आग्रह असे. अगदी काही विशिष्ट गरज असेल तरच ते वेगळा पर्याय निवडत. घाण वास येणाऱ्या शौचालयाजवळ झोपायची वेळ आली, तरीही ते हा आग्रह ठेवत असत. पाश्चात्त्य देशांच्या आमच्या पहिल्या एकत्र दौऱ्यासाठी आम्ही धर्मशाळेहून दिल्लीकडे निघालो तेव्हा असंच घडलं होतं. अशा सामायिक पद्धतीने प्रवास करणं उत्कृष्ट असतं, कारण यातून आपल्याला करुणा विकसित व्हायला मदत होते, असं रिंपोछे म्हणाले. तीनही वर्गांच्या डब्यातील प्रवासी विशिष्ट ठिकाणी एकाच वेळी पोचतात, मग वेगवेगळे पैसे का वाया घालवायचे? आपल्यावर लोकांनी पैसे वाया घालवणं रिंपोछे यांना अजिबात आवडत नसे, मग कोणी त्यांच्यासाठी पहिल्या वर्गाची ट्रेन-तिकिटं काढली किंवा कोणी त्यांना झकपकीत महागड्या उपहारगृहात घेऊन गेलं, तर ते त्यांना आवडत नसे.

एकदा रिंपोछे स्पितीवरून धर्मशाळेला परत येत होते, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी त्यांचे अनेक शिष्य व मी भारतीय बाजारात वाट पाहत थांबलो. अनेक कार व बस येऊन गेल्या पण त्यात रिंपोछे नव्हते, त्यानंतर एक घाणेरडा जुना ट्रक बाजारात आला. त्यात ट्रकच्या गर्दी झालेल्या कॅबमध्ये सरकाँग रिंपोछे बसलेले होते, त्यांच्या हातात जपाची माळ होती. रिंपोछे व त्यांचे सहकारी तीन दिवस स्पितीहून असा प्रवास करून आले होते, सुखसोयी व दिखाऊपणाची त्यांना काहीही फिकीर नव्हती.

मुंडगोड इथे मोनलाम उत्सव पार पडल्यावर रिंपोछे आपल्या सहकाऱ्यांसह व माझ्यासह धर्मशाळेला परत येत होते, तेव्हा आम्हाला पुण्यात ट्रेनसाठी दिवसभर वाट पाहावी लागली होती. त्या वेळी एका स्थानिक तिबेटी स्वेटरविक्रेत्याने आम्हाला तिसऱ्या दर्जाच्या एका हॉटेलातील अतिशय गोंगाट असलेली, गर्मी असणारी खोली वापरायला दिली होती, तिथेही रिंपोछे आनंदाने राहिले. भारतामध्ये प्रवास करताना नेहमी रात्रीच्या बसचा पर्याय निवडावा कारण या बस स्वस्त व सोयीच्या असतात, असं रिंपोछे सुचवायचे. गर्दी असलेल्या बसस्थानकांवर वाट बघायला त्यांची हरकत नसे. स्वतःला व्यग्र ठेवण्यासाठी अनेक साधनापद्धती आपल्याकडे आहेत, असं ते आम्हाला सांगत. आपल्याभोवतीचा गोंगाट, अनागोंदी व घाण याने त्यांच्या एकाग्रतेवर परिणाम होत नसे.

रिंपोछे एका ठिकाणी दीर्घ काळ राहत नसत, सतत फिरत असत. अनुबंधांवर मात करण्यासाठी हे चांगलं असतं, असं ते म्हणाले. त्यामुळे दौऱ्यावर असताना ते एका घरामध्ये काही दिवसांहून अधिक काळ राहत नसत. जास्त दिवस राहिलं, तर आपण यजमानांवर भार होऊन जातो, असं ते म्हणत असत. एखादा वृद्ध तिबेटी भिक्खू शिक्षक असलेल्या एखाद्या बौद्ध केंद्रावर आम्ही थांबलो, तर रिंपोछे त्या भिक्खूला त्यांच्या घनिष्ठ मित्राप्रमाणे वागवत. स्वतःचे मनःपूर्वक संबंध त्यांनी कधीही केवळ एका विशिष्ट व्यक्तीपुरते मर्यादित ठेवले नाहीत.

सातत्यपूर्ण, ढोंगरहित आचरण, आणि परिस्थितीनुसार लवचिकता राखणं

रिंपोछे कुठेही गेले तरी दिवसभर ते कठोर आचरण करत आणि रात्री फारसे झोपत नसत. त्यांच्या भेटीच्या वेळांदरम्यानच्या कालावधीमध्येच नव्हे तर, त्यांना कोणी परदेशी पाहुणे भेटायला आले असतील तेव्हा माझ्या भाषांतराची वाट पाहत तेवढ्या वेळेतही ते तांत्रिक कल्पनाचित्रांसाठी मंत्रांचं व संहितांचं पठण (साधना) करत. कारमध्ये, ट्रेनमध्ये किंवा विमानातही ते साधना सुरू ठेवत- मग बाहेरची परिस्थिती काहीही असली तरी त्याचा त्यांना फरक पडत नसे. रोजच्या कठोर आचरणाने आपल्या जीवनाला सातत्याची जाणीव होते, आपण कुठेही गेलो आणि काहीही केलं तरी त्यात सातत्य राहतं, असं ते सांगत. अशा आचरणाने आपल्याला अधिक लवचिकता, आत्मविश्वास व स्थैर्य प्राप्त होतं.

रिंपोछे त्यांच्या या आचरणाचं प्रदर्शन कधीही करत नसत. अशा गोष्टी ते शांतपणे व खाजगीत करत- भोजनापूर्वी आपण अन्नाचे आभार मानतो किंवा अध्यापनापूर्वी प्रार्थना म्हणतो, तशा प्रकारे हे आचरण असावं, असं ते सांगत. इतरांसोबत जेवत असताना दीर्घ गंभीर ओळी उच्चारण्याने ते अस्वस्थ होतील आणि आपण त्यांना आकर्षित करू पाहतोय किंवा त्यांना लाज वाटावी असं वागू पाहतोय, अशी त्यांची समजूत होऊ शकते. शिवाय, ते कोणावरही कोणतंही आचरण किंवा प्रथा लादत नसत. त्यांना निमंत्रित करणाऱ्या केंद्रावर सर्वसाधारणतः अनुसरल्या जाणाऱ्या प्रार्थना व रुढी ते अध्यापनापूर्वी व अध्यापनानंतर पार पाडत.

परम पूजनीय दलाई लामांना आणि तिबेटी व पाश्चात्त्य मठांना रिंपोछे बरीच दक्षिणा देत असत, पण त्याबद्दल त्यांनी कधीही बढाई मारली नाही किंवा कोणाला त्याबद्दल काही सांगितलं नाही. तसं न करण्याचीच शिकवण ते कायम देत असत. एकदा इटलीतील विल्लोर्बा इथला एक साधा मध्यमवयीन माणूस रिंपोछेंना भेटायला आला. तो खोलीतून बाहेर जात असताना त्याने एका टेबलाच्या कडेला, धड लक्षही जाणार नाही अशा ठिकाणी शांतपणे एक लिफाफा ठेवला, त्यात बरीच मोठी देणगी होती. कोणत्याही लामाला दक्षिणा देण्याची ही पद्धत आहे, असं रिंपोछे यांनी नंतर सांगितलं. 

आपली नम्रता प्रामाणिक असावी, खोटी नसावी, यांवर रिंपोछेंचा भर असायचा. आपण नम्र आहोत असा बहाणा करणारे लोक त्यांना आवडत नसत, हे लोक प्रत्यक्षात अभिमानी व अहंकारी असायचे किंवा आपण महान योगी आहोत असा त्यांचा समज असायचा. भटक्या जमातीमधून आलेला एक अभिमानी साधक एका महान लामांकडे गेला, त्याची कहाणी ते सांगत असत. पूर्वी कधीच सभ्यतेशी काही संपर्कच न आल्याचं दाखवत त्या माणसाने एकदा विचारलं की, लामांच्या टेबलावर नेहमी कोणती सामग्री असते? लामांच्या मांजराकडे बोट दाखवून त्याने हा विलक्षण पशू कोणता आहे असंही विचारलं, तेव्हा संबंधित लामांनी त्याला बाहेर हाकलून दिलं.

वैयक्तिक आचरण खाजगी ठेवणं

लोक स्वतःच्या आचरणाविषयी बढाया मारत असत, तेव्हा ते रिंपोछेंना अजिबात आवडायचं नाही. आपण साधनेसाठी दूर जाणार असू, किंवा अशी साधना आपण पूर्ण केली असेल, तर ते आपण जगजाहीर करण्याची गरज नाही, असं ते म्हणत. अशा गोष्टी खाजगी ठेवणं योग्य असतं आणि आपण काय करतोय ते इतरांना कळू देऊ नये. अन्यथा, लोक आपल्याविषयी बोलत राहतात आणि त्यातून अनेक अडथळे उत्पन्न होतात, जसं की- अभिमान किंवा इतरांविषयी मत्सर व स्पर्धा. कोणती बुद्धप्रतिमा त्सोंगखापा यांच्या मुख्य तांत्रिक आचरणासाठी वापरली जात असे, हे कोणालाही माहीत नव्हतं. त्यांच्या निधनाच्या थोडं आधी त्यांचा शिष्य केद्रुब जे याने त्यांना पाहिलं, तेव्हा ते आंतरिक दक्षिणेच्या भांड्यातून बासष्ट दक्षिणा देत असल्याचं केद्रुब जे याला दिसलं, त्यावरून परमानंदाचं मूर्त रूप असलेली चक्रसामवाराची बुद्धप्रतिमा ते वापरत असल्याचा निष्कर्ष काढला गेला. त्याच प्रमाणे सरकाँग रिंपोछे यांचं प्रमुख वैयक्तिक आचरण कोणालाही माहीत नव्हतं. ते कालचक्रातील विशेषज्ञ व तज्ज्ञ होते, त्यात त्यांना ख्यातीही प्राप्त झालेली होती, तरीही वैयक्तिक साधनेसाठी ते कोणत्या पद्धतीचं आचरण करत, ते कोणाला माहीत नव्हतं.

कदाम्प गेशे स्वतःचं तांत्रिक आचरण इतकं काटेकोरपणे लपवून ठेवत की ते मरण पावल्यानंतर त्यांच्या पोशाखाच्या कोपऱ्यामध्ये लहानसं वज्र व घंटा शिवलेली सापडल्यानंतरच लोकांना त्यांचं आचरण कोणतं होतं हे कळत असे, ही गोष्टी रिंपोछे अनेकदा सांगायचे. या आदर्शानुसार रिंपोछे त्यांचं आयुष्य जगले. रिंपोछे त्यांच्या घरी सर्वसाधारणतः इतर कोणाच्याही अर्धा तास आधी झोपी जात आणि सकाळी इतरांच्या थोडं नंतर उठत. परंतु, सर्व जण झोपी गेल्यानंतर थोड्या वेळाने त्यांच्या खोलीतला दिवा पुन्हा सुरू व्हायचा आणि घरातले सगळे जागे होण्याच्या थोडं आधी पुन्हा बंद व्हायचा, हे त्यांच्या सहकाऱ्यांनी व मी अनेकदा पाहिलेलं आहे.

एकदा जर्मनीतील जागेनदॉर्फ इथे रिंपोछेंचे एक ज्येष्ठ सहकारी चोंदझेयला त्यांच्याच खोलीत झोपायला होते. झोपल्याचा बहाणा करून चोंदझेयला सगळं पाहत होते, तर मध्यरात्री रिंपोछे उठले आणि नरोपाच्या सहा आचरणपद्धतींनुसार विविध कठोर व्यायाम ते करत होते. दिवसाच्या वेळेत उठण्यासाठी व फिरताना रिंपोछे यांना सर्वसाधारणतः कोणाचा तरी आधार घ्यावा लागत असे, पण प्रत्यक्षात हे योगसंबंधित व्यायाम करण्याइतकी ताकद व लवचिकता त्यांच्यात होती.

स्वतःचे चांगले गुण लपवून ठेवणं

रिंपोछे त्यांचे चांगले गुण कायम लपवण्याचा प्रयत्न करत. किंबहुना, स्वतःची ओळख अपरिचितांसमोर उघड झालेलंही त्यांना आवडत नसे. एकदा, एका वृद्ध इंडोनेशियन जोडप्याने त्यांना आपल्या कारमधून पॅरिस ते अॅमस्टरडॅमपर्यंत नेलं. अॅमस्टरडॅमला पोचल्यावर त्या जोडप्याने रिंपोछेंना जेवणासाठी आपल्या घरी बोलावलं. त्यानंतर रिंपोछे यांच्या शिकवणुकीसाठी यावं, अशा निमंत्रणाचा फोन स्थानिक बौद्ध केंद्राने त्या जोडप्याला केला, तेव्हा कुठे त्यांना आपल्या घरी कोण पाहुणा आला होता ते कळलं. त्यांना रिंपोछे म्हणजे कोणीतरी सर्वसामान्य, वृद्ध, मैत्रीपूर्ण भिक्खू असावा, असं वाटलं होतं.

त्याच प्रेरणेने रिंपोछे परदेशी गेल्यावर मुलांशी बुद्धिबळ खेळत किंवा त्यांचा तरुण सहकारी न्गवांग याला ते खेळायला सांगत आणि दोन्ही बाजूंना मदत करत. अशा वेळी रिंपोछे म्हणजे कोणीतरी दयाळू आजोबा असावेत, असं त्या मुलांना वाटायचं. एकदा जर्मनीतील म्युनिक शहरामध्ये नाताळच्या वेळी रिंपोछे रस्त्यावरून चालत जात होते, तेव्हा ते लाल पोशाखातील सान्ताक्लॉज असावेत असं वाटून काही मुलं त्यांच्या मागोमाग आली होती.

आपल्याला चांगळ्यापैकी इंग्रजी कळतं ही वस्तुस्थितीही रिंपोछेंनी लपवून ठेवली होती. स्पितीमध्ये कालचक्राची दीक्षा देऊन झाल्यावर, म्हणजे रिंपोछे यांचं निधन व्हायच्या महिनाभर आधी, मी ताबो मठामध्ये त्यांचा निरोप घेतला आणि धर्मशाळेला परतलो. पाश्चात्त्य लोकांच्या एका गटासाठी खास बस ठरवलेली होती आणि मला निघावं लागणार होतं. परंतु, अखेरच्या क्षणी एक परदेशी व्यक्ती क्यी मठाला भेट द्यायला गेली. हा मठ खोऱ्यातून वीस मैल वरच्या बाजूला होता. ही व्यक्ती अपेक्षित वेळेत परत आली नाही. तिला शोधण्यासाठी मी क्यी इथे गेलो, त्या दरम्यान एक इटालियन शिष्य रिंपोछेंची भेट घेण्यासाठी गेला, पण तेव्हा दुभाषी कोणीच नव्हतं. त्या पूर्वी कोणत्याही परदेशी व्यक्तीशी इंग्रजीचा एक शब्दही न बोललेले रिंपोछे या इटालियन व्यक्तीकडे वळले आणि उत्तम इंग्रजीत त्यांनी विचारलं, “अॅलेक्स कुठे आहे?” तो माणूस आश्चर्याने म्हणाला, “पण रिंपोछे, तुम्ही इंग्रजी बोलत नाही ना.” यावर रिंपोछे केवळ हसले.

Top