परम पूजनीय दलाई लामांच्या जीवाला संभाव्य धोका
सरकाँग रिंपोछे यांचा मृत्यू त्यांच्या जीवनापेक्षा लक्षणीय होता. स्पितीमधाल ताबो मठामध्ये दलाई लामांच्या हस्ते कालचक्र धर्माधिकार दीक्षा देण्याचा कार्यक्रम रिंपोछेंनी जुलै १९८३मध्ये आयोजित केला होता. त्यानंतर काचेन द्रुबग्येल या स्थानिक वृद्ध भिक्खूशी बोलताना रिंपोछे म्हणाले की, तिबेटी ज्योतिषशास्त्रानुसार हे परम पूजनीय दलाई लामांचे ‘अडथळा वर्ष’ आहे. हे अडथळे त्यांनी (रिंपोछेंनी) स्वतःच्या अंगावर घेणं योग्य राहील. पण हे इतर कोणाला सांगू नये असं त्यांनी त्या वृद्ध भिक्खूला सांगितलं.
त्यानंतर तीन आठवडे रिंपोछेंनी कठोर साधनेसाठी एकांतवास स्वीकारला. त्यानंतर ते सैनिकांना एन्गेजिंग इन बोधिसत्व बिहेव्हिअर शिकवण्यासाठी जवळच्या एका तिबेटी सैन्य छावणीकडे गेले. काही एका विशिष्ट कालावधीमध्ये संथपणे ही संपूर्ण संहिता रिंपोछे शिकवणार होते, पण त्यांनी अगदी वेगात शिकवणं पूर्ण केलं. नियोजित तारखेच्या कितीतरी दिवस आधीच त्यांनी छावणी सोडली. आपल्याला एका विशेष ठिकाणी जायचं आहे, असं कारण त्यांनी दिलं. त्या दिवशी, २९ ऑगस्ट १९८३ परम पूजनीय दलाई लामा विमानाने स्विझर्लंडमधील जीनिव्हाला जाणार होते. त्याच वेळी पॅलेस्टाइन लिबरेशन ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष यासर अराफतही तिथे येणं अपेक्षित होतं. अराफत यांच्या विरोधात काही दहशतवादी कृत्य होईल, अशी चिंता स्थानिक पोलीस प्रशासनाला होती. या पार्श्वभूमीवर परम पूजनीय दलाई लामांच्या सुरक्षेची हमी आपण देऊ शकत नाही, असं पोलिसांनी सांगितलं.
परम पूजनीय दलाई लामांच्या जगण्यातील अडथळे स्वतःवर घेण्याची तयारी
रिंपोछे व न्गवांग त्या छावणीतून जीपमधून वेगाने बाहेर पडले. वाटेत ताबो मठामध्ये ते थोड्या वेळासाठी थांबले. रिंपोछेंनी काचेन द्रुब्ग्येल यांना त्यांच्यासोबत यायला सांगितलं, पण आपण नुकतीच कफनी धुवून ठेवली असल्याचं कारण त्या वृद्ध भिक्खूने दिलं. पण तसं असलं तरी नुसत्या अंडरस्कर्टवर काचन यांनी यावं, कफनी जीपवर वाळण्यासाठी बांधता येईल, असं रिपोछे म्हणाले.
स्पिती खोऱ्यामध्ये ते खोल उतरत गेले तसं रिंपोछेंनी न्गवांग यांना ओम मनी पद्मेहम हा करुणेचा मंत्र सतत म्हणायला सांगितलं. पण त्यांनी ते गांभीर्याने घेतलं नाही. हा त्यांचा निर्वाणीचा सल्ला होता.
त्यानंतर ते क्यी मठामध्ये थांबले. रिंपोछे यांना इथे दक्षिण द्यायची होती. आता उशीर झालाय, आपण सकाळी पुढे जाऊ शकतो, असं न्गवांग म्हणाले. पण रिंपोछेंनी पुढे जाण्याचा आग्रह धरला. बहुतांळ वेळा रिंपोछे हळू व कष्टाने चालायचे. पण या वेळी रिंपोछे धावू शकतील असा त्यांचा वावर होता. उदाहरणार्थ, एकदा विमानतळावर पोचल्यानंतर विमानात बसायला उशीर होत असल्याचं लक्षात आल्यावर रिंपोछे इतक्या वेगाने धावले की कोणीही त्यांच्या सोबत धावू शकलं नाही. त्याचप्रमाणे एकदा बोधगयेला बुद्धवचनांच्या (कांग्यूर) शंभर खंडी तिबेडी भाषांतराचं सामूहिक पठण होणार होतं, त्यात परम पूजनीय दलाई लामा सहभागी होणार होते, तेव्हा रिंपोछे त्यांच्या शेजारी बसले होते आणि मी रिंपोछेंच्या अगदी मागेच होतो. परम पूजनीय दलाई लामांच्या हातामध्ये मजकुराचे सुटे कागद होते, त्यातलं एक पान वाऱ्यामुळे उडालं, तेव्हा रिंपोछे त्यांच्या जागेवरून अक्षरशः उडाले आणि क्षणार्धात त्यांनी जमिनीवरून ते पान उचलून दिलं. सर्वसाधारणतः त्यांना उभं राहण्यासाठीही मदत घ्यावी लागत असे. तर, क्यी मठातील सदर प्रसंगामध्ये रिंपोछे वेगाने धावले, कोणाचीही मदत न घेता उंच पर्वतावर चढले.
रिंपोछेंची दक्षिणा देऊन झाल्यावर क्यीमधील भिक्खूंनी त्यांना रात्री तिथेच थांबण्याची विनंती केली. रिंपोछेंनी ती विनंती नाकारली. त्याच रात्री क्यिबार गावामध्ये जायचं आहे, असं त्यांनी सांगितलं. भिक्खूंना त्यांना भेटायचं असेल तर त्यांनी वर त्या गावापर्यंत यावं. मग ते तातडीने तिथून निघाले आणि पुढे काय होणार आहे याचा हा अप्रत्यक्ष संकेत दिला.
रिंपोछे व त्यांचे सहकारी उंचीवरल्या क्यिबार गावामध्ये पोचले, तेव्हा तिथे ते एका परिचित शेतकऱ्याच्या घरी गेले. तो माणूस अजून शेतातच होता आणि पाहुणे येतील याची त्याला कल्पना नव्हती. पुढच्या आठवड्यात तो माणूस काही कामात असणार आहे का, असं रिंपोछेंनी विचारलं. शेतकऱ्याने नाही असं म्हटलं आणि रिंपोछेंना तिथे राहण्याचं निमंत्रण दिलं.
साधना करत असताना रिंपोछे निवर्तले ती संध्याकाळ
आंघोळ करून थोडं दही खाल्ल्यानंतर रिंपोछे यांनी स्मरणातून त्सोंगखापा यांच्या द इसेन्स ऑफ एक्सलन्ट एक्सप्लनेशन ऑफ इन्टरप्रीटेबल अँड डेफिनिटिव्ह मीनिंग्स या संहितेचं पठण केलं. त्यात त्यांचे दोन तास गेले. पठण संपल्यानंतर त्यांनी न्गवांग यांना बोलावलं आणि आपल्याला बरं वाटत नसल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यांनी त्यांचं डोकं न्गवांग यांच्या खांद्यावर ठेवलं- सर्वसाधारणतः रिंपोछे असं कधीच करत नसत. ते निरोप घेत होते, असं आता मागे वळून पाहताना लक्षात येतं. त्यांनी या सगळ्याआधी चोंदझेयला यांना शिमल्याला पाठवलो होतं. हे सगळं घडताना पाहणं चोंगझेयलाला निःसंशयपणे अतिशय कठीण गेलं असतं, त्यामुळे त्यांनी हे केलं. सहा वर्षांचे असल्यापसून चोंगझेयला रिंपोछेंसोबत होते आणि रिंपोछेंनी त्यांना स्वतःच्या मुलाप्रमाणे वाढवलं होतं.
डॉक्टरला बोलावू का किंवा काही औषधं आणू का, असं न्गवांग यांनी विचारलं, पण रिंपोछेंनी नकार दिला. इतर काही करण्यासारखं आहे का, असं न्गवांग यांनी विचारलं. तर, संडासापर्यंत जायला मदत करशील का, असं रिंपोछेंनी विचारलं आणि न्गवांग यांनी त्यांना तसं नेलंही. त्यानंतर रिंपोछेंनी आपलं अंथरूण घालायला सांगितलं, त्यांची नेहमीची पिवळी चादर घालण्याऐवजी पांढरी चादर घालावी असं ते न्गवांग यांना म्हणाले. तांत्रिक उपासनेमध्ये इतरांना मदत करण्याची क्षमता वाढवण्यासाठी केल्या जाणाऱ्या विधींवेळी पिवळी चादर वापरली जाते, तर अडथळ्यांना शमवण्यासाठी पांढरी चादर घातली जाते.
त्यानंतर रिंपोछे यांनी न्गवांग व काचन द्रुबग्येल यांना आपल्या बेडरूममध्ये येण्याची विनंती कली, त्यानुसार ते दोघे आत गेले. मग रिंपोछे उजव्या कुशीवर, बुद्धाच्या पद्धतीने आडवे पडून राहिले. डाव्या बाजूचा हात अंगालगत आणि उजवा हात चेहऱ्याखाली, या नेहमीच्या झोपण्याच्या पद्धतीपेक्षा त्यांनी तांत्रिक आलिंगनाच्या स्थितीत झोपले. त्यानंतर त्यांनी खोलवर श्वास घ्यायला सुरुवात केली आणि ते तसेच मरण पावले. ‘देवाण-घेवाणी’च्या (तोंग्लेम) साधनाप्रक्रियेद्वारे त्यांनी प्राण सोडले असावेत. ते एकोणसत्तर वर्षांचे होते आणि त्यांची तब्येत व्यवस्थित होती. दोनच महिन्यांपूर्वी मी त्यांना दिल्लीमध्ये सखोल वैद्यकीय तपासणीसाठी नेलं होतं.
परम पूजनीय दलाई लामा जीनिव्हाला जाणाऱ्या विमानात असतानाच अचानक अराफत यांनी त्यांचा विचार बदलला आणि स्विझर्लंडचा दौरा पुढे ढकलला. त्यामुळे विमानतळावरील दहशतवादी घटनेचा धोका टळला. परम पूजनीय दलाई लामांच्या जीवनाला असलेला धोका सरला असला, तरी विमानतळावरून हॉटेलला जाण्याच्या मार्गावर परम पूजनीय दलाई लामांच्या गाड्यांचा ताफा रस्ता चुकला. परंतु, परम पूजनीय दलाई लामांचा धोका टळला. त्यांच्या जीवनातील अडथळा सरकाँग रिंपोछे यांनी यशस्वीरित्या स्वतःवर घेतला आणि त्याबदल्यात स्वतःची जीवनदायी ऊर्जा त्यांना दिली.
अडथळा अंगावर घेताना रिंपोछे यांनी वापरलेली देवाण-घेवाणीची साधना
इतरांसमोरचा अडथळा स्वतःच्या अंगावर घेऊन त्यांना आनंद देण्याचं प्रगत बोधिसत्व तंत्र म्हणजे देवाण-घेवाण साधना होय. या उपासनेबद्दल शिकवताना रिंपोछे सांगत असत की, स्वतःच्या जीवाचा त्याग करावा लागला तरीही इतरांचं दुःख स्वतःच्या अंगावर घ्यायला आपण तयार असायला हवं. कोणाच्या तरी डोक्याला झालेली इजा स्वतःच्या अंगावर घेऊन अखेरीस मरण पावलेल्या एका माणसाचा दाखला कुनू लामा रिंपोछे यांनी दिलं होतं, त्याचा उल्लेख ते अनेकदा करत. आम्ही असं करू पाहिलं, तर ते वाया जाणार नाही का, असं आम्ही विचारल्यावर रिंपोछे नकारार्थी उत्तर देत. जगाच्या प्रगतीसाठी स्वतःच्या जीवाचं दान दिलेल्या अंतराळवीरासारखीच ही कृती असेल, असं ते सांगत. शूर अंतराळवीराचा दाखला व प्रसिद्धी यांमुळे त्याच्या कुटुंबाला चांगल्यापैकी सरकारी निवृत्तीवेतन मिळेल, त्याचप्रमाणे लामाच्या त्यागाचा शूर दाखला निर्माण झाल्यामुळे त्याच्या शिष्यांचं अध्यात्मिक भरणपोषण होईल.
तीन दिवस मृत्यू-स्थितीच्या साधनेमध्ये राहणं
तीन दिवस सरकाँग रिंपोछे स्पष्टपणे मृत्यू-स्थितीच्या साधनेमध्ये होते. आपल्या पुनर्जन्माला दिशा देण्याची क्षमता असलेल्या व्यक्ती सर्वसाधारणतः पुनर्जन्मित लामांची एक वेगळी वंशावळ सुरू करण्यासाठी किंवा सुरू ठेवण्यासाठी अशी साधना करतात. या साधनाप्रक्रियेवेळी त्यांनी श्वास घेणं थांबवलेलं असलं तरी, त्यांची हृदयं उष्ण राहतात आणि त्यांच्या शरीरांचं विघटन सुरू होत नाही. सर्वसाधारणतः महान लामा अशा स्थितीमध्ये अनेक दिवस राहतात, त्यानंतर त्यांचं मस्तक कोसळतं आणि नाकपुड्यांमधून रक्त यायला लागतं. त्यांच्या शरीरांमधून प्राण निघून गेल्याचे हे संकेत असतात.
सरकाँग रिंपोछे यांच्याबाबतीत अशी चिन्हं दिसू लागल्यावर आकाशामध्ये इंद्रधनुष्यं चमकली आणि त्यांच्या दहनासाठी निवडण्यात आलेल्या ओसाड टेकडीवर विलक्षण उजेड अवतरला. दहनविधीसाठी भिक्खूंनी यावं, असा निरोप लोकांनी परम पूजनीय दलाई लामांच्या धर्मशाळेतील नामग्याल मठाकडे पाठवला, पण तिकडून कोणी वेळेत येऊ शकलं नाही. स्पितीमधील भिक्खूंनी साधेपणाने विधी केले. रिंपोछेंचीही इच्छा हीच राहिली असावी. त्यानंतर थोड्याच वेळा दहनस्थळावरून दिलासादायक ताकद असलेल्या ताज्या पाण्याचा झरा उगम पावला. बरोब्बर नऊ महिन्यांनी २९ मे १९८४ रोजी रिंपोछे यांनी स्पितीमध्येच एका गरीब कुटुंबामध्ये पुन्हा एकदा जन्म घेतला.
स्वतःच्या पुनर्जन्माला दिशा देताना
अनेक वर्षांपूर्वी रिंपोछे त्सेरिंग चोद्राग व कुंझांग चोद्रोन या पती-पत्नींना भेटले होते. या दोघांचीही चांगली छाप त्यांच्यावर पडली. धर्माचे कट्टर उपासक असलेल्या या जोडप्याने रिंपोछेंना सांगितलं की, भिक्खू व भिक्खुणी व्हावं, ही त्यांची आंतरिक इच्छा होती. परंतु, स्थानिक गावांच्या प्रमुखाने त्यांना असं करू नये असं सुचवलं, कारण नुकतंच कुटुंब सुरू केलेल्या अवस्थेतील प्रौढ व्यक्ती म्हणून त्यांनी भिक्खूजीवनात प्रवश केला, तर अनेक अडचणी निर्माण होतील. त्यांनी आधी स्वतःच्या मुलांकडे लक्ष द्यावं. गावप्रमुखाच्या सल्ल्याला रिंपोछेंनीही दुजोरा दिला. रिंपोछे यांनी याच पालकांच्या पोटी चौथं मूल म्हणून जन्म घेतला.
मृत्यू-स्थिती साधनेवर प्रावीण्य मिळवलेल्या एका महान लामाच्या पुनर्जन्माचा शोध घेण्यासाठी शिष्य विविध पद्धती वापरतात. अतिशय साक्षात्कारी गुरूंच्या दैवीसंकेतांचा व स्वप्नांचा अंदाज बांधणं, याचा या पद्धतींमध्ये समावेश आहे. यासाठी शेवटच्या उमेदवाराने अनेक सारख्या दिसणाऱ्या वस्तूंमधून निवर्तलेल्या लामांच्या वस्तू अचूकरित्या ओळखणं गरजेचं असतं. परंतु, केवळ अशा पद्धतींवर विसंबून राहू नये, असा इशारा परम पूजनीय दलाई लामा देतात. गंभीर उमेदवार मानलं जाण्यापूर्वी संबंधित मुलाने अथवा मुलीने स्वतःच्या ओळखीची स्पष्ट चिन्हं दाखवायला हवीत.
रिंपोछे यांचा पुनर्जन्म ओळखताना
स्पितीमधील लोक सरकाँग रिंपोछेंना संताप्रमाणे मानतात: जवळपास प्रत्येक घरामध्ये त्यांचं छायाचित्र असतं. लहानग्या सरकाँग रिंपोछेंना बोलता यायला लागलं आणि त्यांनी लगेचच त्यांच्या पालकांच्या घरात भिंतीवर लावलेल्या रिंपोछेंच्या छायाचित्राकडे बोट दाखवलं व ते म्हणाले, “हा मी आहे!” न्गवांग त्या मुलाला पाहण्यासाठी त्या घरी गेले तेव्हा तो मुलगा धावत त्यांच्या कवेत आला. त्याला त्यांच्यासोबत मठात जायचं होतं.
तो मुलगा कोण आहे याबद्दल कोणाच्याही मनात काहीच शंका नव्हती. रिंपोछेंनी पुढच्या वेळी स्पिती खोऱ्यात जन्म घ्यावा, अशी विनंती तिथल्या काही प्रमुख स्त्रियांनी काही वर्षांपूर्वी रिंपोछेंना केली होती. दूर सीमेवरच्या त्यांच्या जिल्ह्यामध्ये जाण्यासाठी भारत सरकारची परवानगी मिळवणं ही कायमच एक समस्या असायची. त्यामुळे त्यांचा असा पुनर्जन्म झाला, तर गोष्टी सोप्या झाल्या असत्या. त्यांच्या पालकांना हा सन्मान वाटला आणि त्यांनी संमती दिली. त्यामुळे चार वर्षांचा लहान रिंपोछे धर्मशाळेसाठी पालकांचं घर सोडून निघाला. त्यांचे पाल वेळोवेळी त्यांना भेटायला येत असतात, पण या मुलाने कधीही आईवडिलांची भेटण्याची इच्छा व्यक्त केलेली नाही किंवा त्यांची आठवणही त्याला येताना दिसत नाही. सुरुवातीपासूनच त्याला मठातील सदस्य हे आपलंच जुनं कुटुंब असल्यासारखं वाटतं. हे त्याचं मनापासून जवळ केलेलं कुटुंब होतं.
पहिल्याच भेटीत पुनर्जन्मित रिंपोछेंनी मला ओळखलं
रिंपोछे पहिल्यांदा धर्मशाळा इथे आले तेव्हा मी भारताबाहर व्याख्यानांच्या दौऱ्यावर गेलो होतो. काही महिन्यांनी परतल्यानंतर मी त्यांना भेटायला गेलो, तेव्हा जास्त अपेक्षा न ठेवणं किंवा जास्त साशंकही न होणं, असा माझा प्रयत्न होता. मी रिंपोछेंच्या खोली पाऊल ठेवल्यावर न्गवांग यांनी त्या मुलाला विचारलं की, तो मला ओळखतो का. त्यावर तो मुलगा म्हणाला, “मूर्खासारखं बोलू नको. मी अर्थातच यांना ओळखतो!” आधीच्या जन्मातील सरकाँग रिंपोछे आणि परम पूजनीय पोप यांच्यातील संभाषणात दुभाषी म्हणून मी सहभागी झालो होतो, त्या बैठकीचं छायाचित्र त्यांच्या बैठकीच्या खोलीत भिंतीवर ठळकपणे लावलेलं होतं, त्यामुळे त्यांनी मला ओळखलं असावं असं मला वाटलं. पण आम्ही भेटलो त्या क्षणापासून लहान रिंपोछेंनी मला अगदी पूर्ण परिचय असल्याप्रमाणे, एखाद्या कुटुंबसदस्याप्रमाणे सहजतेने वागवलं. चार वर्षांचं मूल असं काही बनावटपणे करू शकत नाही. इतर कशाहीपेक्षा या अनुभवाने मला ते कोण आहेत याबद्दल खात्री पटली.
१९९८ साली चौदा वर्षांचे रिंपोछे
आता, १९९८ साली नवीन सरकाँग रिंपोछे चौदा वर्षांचे आहेत. ते बहुतांश वेळ मुंडगोडमधल्या त्यांच्या मठात राहतात व शिकतात, आणि वर्षातून एकदा किंवा दोनदा धर्मशाळा इथे परम पूजनीय दलाई लामांच्या मुख्य शिकवणुकीची सत्रं असतात तेव्हा तिथे येतात. चोंदझेयला व रिंपोछेंचा जुना आचारी मरण पावले आहेत, आणि नग्वांग यांनी कफनी काढून ठेवून लग्न केलं असून ते आता नेपाळमध्ये राहतात. रिंपोछे यांची काळजी घेण्याचं काम आता भिक्खूंच्या नवीन कुटुंबाकडे आहे, या सर्वांची निवड त्यांनी व्यक्तीशः गेल्या जन्मात केली होती. उदाहरणार्थ, स्पिती व किन्नौरमधल्या दहा वर्षांच्या दोन मुलांनी आपल्या कुटुंबात सामील व्हावं आणि आपल्या आयुष्याच्या अखेरच्या काळात मदत करावी, याची निवड त्यांनी स्वतः केली होती.
आपल्या पूर्वाधिकाऱ्यासारखी विनोदबुद्धी त्यांना आहे आणि तसाच व्यावहारिक नम्रतेचा दृष्टिकोन त्यांच्याकडे आहे, पण या तरण्या सरकाँग रिंपोछेंचं स्वतःचं व्यक्तिमत्वही आहे. बुद्धिमत्ता, कल व कर्मजन्य दुवे हे एका जीवनकाळातून पुढच्या जीवनकाळामध्ये जातं. माझ्यासोबतच्या त्यांच्या संबंधांमध्ये मी कॅप्टन किर्कच्या स्टार ट्रेकमधील मूळ चमूसारखा आहे असं मला वाटतं, हा चमू स्टार ट्रेक: द नेक्स्ट जनरेशनमध्ये नुकताच कॅप्टन पिकार्डच्या दिमतीला रुजू झाला आहे. सगळं बदललं आहे आणि तरीही काहीएक निश्चित सातत्य आहे.
रिंपोछेंच्या जडणघडणीमध्ये दुय्यम भूमिका स्वीकारणं
सरकाँग रिंपोछे यांच्या जडणघडणीमध्ये आत्तापर्यंत मी दुय्यम भूमिका स्वीकारली आहे. जुन्या रिंपोछेंना मुख्यत्वे त्यांच्या लोकांची सेवा करायची इच्छा होती, असं मला वाटलं. अनेक महान लामांनी पश्चिमेमध्ये किंवा आपल्या पारंपरिक सांस्कृतिक अवकाशाबाहेरच्या आशियाई प्रदेशांमध्ये शिकवण देण्यासाठी स्वतःला समर्पित केलं, याने खुद्द तिबेटींचं मात्र नुकसान झालं. तिबेटी रूपातील बौद्ध धर्म पूर्ण ताकदीने टिकायचा असेल, तर तिबेटींच्या भावी पिढ्यांना यासंबंधीचं प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. सध्या पूर्ण बौद्ध शिकवण केवळ तिबेटी भाषेमध्ये उपलब्ध आहे. माझ्या प्रशिक्षणासाठी व आत्मविकासासाठी शक्य तितकी सर्वोत्तम परिस्थिती रिंपोछेंनी मला उपलब्ध करून दिली. त्यांच्या दयाळूपणाची परतफेड करण्यासाठी मीही त्यांच्याकरिता तसंच करायचं ठरवलं आहे.
सांस्कृतिक संघर्ष टाळण्यासाठी मी रिंपोछेंच्या आधुनिक शिक्षणात सहभाग घेतलेला नाही. किंबहुना, आम्ही भेटतो तेव्हा आमच्यातील घनिष्ठ नातं लक्षणीयरित्या स्पष्ट होत असलं तरी, त्यांच्याशी जास्त संपर्क साधणंही मी हेतूतः टाळलं आहे. उलट त्यांना इंग्रजी, विज्ञान व सामाजिक विज्ञानं शिकवण्यासाठी स्थानिक तिबेटी शिक्षकांची तजवीज करायला मी मदत केली. जेणेकरून रिंपोछेंना त्यांच्या स्वतःच्या लोकांशी पूर्णतः जोडून घेता येईल. त्याचप्रमाणे मी त्यांना पाश्चात्त्या देशांकडे नेलेलं नाही किंवा त्यांच्यासाठी संगणक वा व्हिडिओ प्लेअरही आणलेला नाही, आणि इतरांनांनाही असं काही रिंपोछेंना देण्यापासून परावृत्त केलं आहे. अनेक पुनर्जन्मित लामांना संगणकावरील खेळ व लढाईचे व्हिडिओ त्यांच्या पारंपरिक मठातील अभ्यासापेक्षा मोहक वाटतात.
पुन्हा एकदा त्यांचा शिष्य होण्यासाठी प्रार्थना
माझ्या दिशादर्शनाने किती परिणाम झाला ते मला माहीत नाही, पण रिंपोछेंना त्यांच्या स्वतःच्या संस्कृतीमध्ये अतिशय सुरक्षित व मोकळं वाटत असल्याचं दिसतं. हे त्यांना व भविष्यात त्यांना भेटणाऱ्या सर्वांना लाभदायकच ठरेल. पुन्हा एकदा माझ्या पुढच्या जन्मात मी त्यांचा शिष्य व्हावं, एवढीच माझी प्रार्थना आहे.