सरकाँग रिंपोछे यांचा तांत्रिक उपासकांना सल्ला

“अर्ध-वेळ” तांत्रिक साधना करणं

दीर्घ काळासाठी पूर्ण-वेळ तांत्रिक साधनेकरिता एकांतवासात जाणं लाभदायक असलं, तरी हा पर्याय स्वीकारण्याची चैन बहुतांश लोकांना परवडत नाही. त्यामुळे आपल्याकडे तीन महिने किंवा अधिक मोकळा वेळ असेल तरच अशा प्रकारची एकांतवासातील साधना आपल्याला करता येईल, हा विचार संकुचित आहे, असं रिंपोछेंना वाटत असे. एकांतवास म्हणजे स्वतःला इतरांपासून तोडून टाकण्याचा कालावधी नसतो, तर आपली मनं उपासनेने लवचिक करण्यासाठी तीव्र उपासना करण्याचा हा कालावधी असतो. सकाळी व रात्री प्रत्येकी एक सत्र पूर्ण करून उर्वरित दिवसभर सर्वसामान्य आयुष्य जगलं, तरी ते अगदीच स्वीकारार्ह आहे. स्वतः रिंपोछे यांनी त्यांच्या अनेक साधना अशा प्रकारे केल्या, ते साधना करत असल्याचं कोणाला कळूही नये अशा रितीने त्यांनी हे केलं होतं. 

एकाच पलंगावर झोपणं आणि एकांतवासाच्या कालावधीमध्ये त्याच जागी साधना करणं, ही या उपासनापद्धतीमधील एकमेवर मर्यादा आहे. अन्यथा, आध्यात्मिक ऊर्जा विकसित करण्यामधील ऊर्जा विस्कळीत होते. शिवाय, प्रत्येक सत्रामध्ये किमान काही मंत्र, दंडवत, किंवा इतर काही पुनरावृत्तीच्या उपासना असाव्यात, एकांतवासाच्या पहिल्या सत्रामध्ये या पुनरावृत्तीची विशिष्ट संख्या निश्चित केलेली असावी. त्यामुळे रिंपोछे यांनी प्रारंभिक सत्रामध्ये विशिष्ट निर्धारित उपासनेची केवळ तीन वेळा पुनरावृत्ती करण्याचा सल्ला दिला. अशा प्रकारे अगदी गंभीर आजारातही एकांतवासातील उपासनेचं सातत्य भंग पावणार नाही आणि पुन्हा सुरुवातीपासून सुरुवात करावी लागणार नाही.

एकांतवासातील निर्बंधांवर गरजा मात करतात तेव्हा

परंतु, बौद्ध शिस्तीच्या इतर रूपांप्रमाणे इथेही “निर्बंधांवर काही वेळा गरजा मात करतात,” पण असे प्रसंग क्वचितच येतात. एकदा धर्मशाळा इथे साधनेच्या एकांतवासामध्ये असतानाच मला परम पूजनीय दलाई लामा यांनी मनाली या भारतातील दुसऱ्या एका हिमालयन शहरामध्ये दिलेली धर्माधिकारदीक्षा व शिकवणूक यांचं भाषांतर करण्याची विनंती करण्यात आली. मी रिंपोछे यांच्याशी सल्लामसलत केली, तर त्यांनी मला कोणत्याही साशंकतेविना तिकडे जायला सांगितलं. परम पूजनीय दलाई लामांना सहकार्य करणं हे माझ्या आवाक्यातल्या इतर कोणत्याही कृतीपेक्षा जास्त लाभदायक ठरेल. दर दिवशी साधनेचं एक सत्र करता येत होतं, तोवर माझ्या उपासनेच्या गतीमध्ये खंड पडला नाही, आणि मी निर्धारित केलेल्या किमान मंत्रांचं पठणही करत होतो. मी ही प्रक्रिया अनुसरली आणि दहा दिवसांनी परम पूजनीय दलाई लामांसोबत धर्मशाळेला परतलो व माझी साधना पूर्ण केली.

विधींमधील प्रक्रिया योग्यरित्या अनुसरणं

विधींमधील प्रक्रियांमागे काही हेतू असतो व त्या गंभीर असतात, असं रिंपोछे कायम मांडत असत. या प्रक्रिया अचूकरित्या अनुसरायला हव्यात. उदाहरणार्थ, तांत्रिक साधनेमध्ये विशिष्ट मंत्रांचं विशिष्ट वेळा पठण करणं गरजेचं असतं आणि त्यानंतर ‘अग्नी पूजा’ करावी लागते. अग्नी-पूजा हा गुंतागुंतीचा विधी आहे, त्यामध्ये विशेष पदार्थांचं हवन करावं लागतं. उपासनेत काही कमतरता राहिल्या असतील तर त्यांची भरपाई करणं आणि आपण केलेल्या चुकांचं शुद्धीकरण करणं, हा या विधीमागचा हेतू आहे.

काही साधना विशेष अवघड असतात. उदाहरणार्थ, मी केलेल्या साधनेमध्ये एका मंत्राचं दहा लाख वेळा पठण करावं लागतं, आणि तपशीलवार अग्नी-पूजा करताना वेताच्या लांब  काठ्यांच्या दहा हजार जोड्या अर्पण कराव्या लागतात, या प्रत्येक जोडीचं हवन करताना एक मंत्र म्हणायचा असतो. या सर्व दहा हजार जोड्या एकाच बैठकीमध्ये अग्नीमध्ये अर्पण करायच्या असतात, त्यात खंड पडून चालत नाही. मी माझ्या साधनेच्या अखेरीस अग्नी-पूजा केली, तेव्हा माझ्याकडच्या वेताच्या जोड्या थोड्या कमी पडल्या. उर्वरित विधी संपवल्यानंतर मी रिंपोछेंना याबद्दल सांगितलं. त्यांनी काही दिवसांनी मला पूर्ण अग्नी-पूजा परत करायला लावली. या वेळी मी दहा हजार वेतांच्या जोड्या सोबत असतील याची खातरजमा करून घेतली!

विधीमधील तज्ज्ञ प्रत्येक वेळी उपलब्ध असतीलच असं नाही, त्यामुळे रिंपोछे यांनी स्वावलंबी होण्याची गरज प्रतिपादित केली. अग्नी-पूजा स्वतः कशी करायची हे त्यांनी त्यांच्या प्रगत पाश्चात्त्य शिष्यांना शिकवली. अग्नीकुंड कसं तयार करायचं आणि जमिनीवर रांगोळीने आवश्यक मंडल कसं काढायचं, याचाही त्यात समावेश होता. विधीमधील उच्चार त्यांच्या भाषेत उपलब्ध नसल्यामुळे तेवढ्यापुरती त्यांना दुसऱ्या कोणाची गरज भासली, तरी विविध पदार्थ त्यांनी स्वतःच अग्नीमध्ये अर्पण करणं गरजेचं आहे, असं रिंपोछे यांनी स्पष्ट केलं. सामूहिक साधनेबाबतीतही हे खरं आहे.

परंतु, ही प्रक्रिया अचूकरित्या अनुसरणं व्यावहारिक दृष्टिकोनाविरोधात जाणारं नाही. उदाहरणार्थ, तांत्रिक साधनेच्या सुरुवातीला घरातील वेदीवर विशेष गोष्टी अर्पण कराव्या लागतात आणि अडथळे येऊ नयेत यासाठी दर दिवशी हा विधी करत राहावा लागतो. हस्तक्षेप करणाऱ्या आत्म्यांच्या रूपात हे अडथळे येत असल्याची कल्पना आहे आणि अर्पणविधीत भाग घेण्यासाठी त्यांना रोज बोलावलं जातं. या वेळी वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक नक्षीदार तोर्माऐवजी कुकींचे खोके किंवा जार वापरले तरी काहीच हरकत नाही, असा सल्ला रिंपोछे यांनी दिला होता.

अपात्र असताना प्रगत उपासना करण्याचा प्रयत्न करू नये

काही लोक अपात्र असतानाही प्रगत उपासना करायचा प्रयत्न करत, याने रिंपोछे नाराज होत. उदाहरणार्थ, काही लोकांना दीर्घ साधना करण्याची इच्छा किंवा रस नसतो, त्यावर प्रावीण्य मिळवणं तर दूरच, पण तरी ते संपूर्ण टप्प्यातील उपासना करायचा प्रयत्न करतात. तंत्राची सर्वोच्च पातळी अनुत्तरयोग ही असून त्यातील पहिला टप्पा जागृतीचा आहे आणि मग संपूर्ण टप्प्यातील उपासना येतात. पहिल्या टप्प्यामध्ये साधनेच्या उपासनेद्वारे कल्पना व एकाग्रता यांच्या ताकदीचं प्रशिक्षण दिलं जातं. नंतरच्या टप्प्यामध्ये मनाच्या विकसित ताकदीचा वापर शरीरातील सूक्ष्म ऊर्जा व्यवस्थेसोबत केला जातो आणि प्रत्यक्षात स्व-परिवर्तन घडवलं जातं. साधनेच्या उपासनेमधून प्राप्त होणारी कौशल्यं नसतील, तर या सूक्ष्म व्यवस्थेमधील चक्र, मार्ग व ऊर्जा-वायू यांच्या संदर्भातील कृती निरर्थक ठरतात.

प्रगत तंत्र उपासना एखाद्या अपात्र व्यक्तीने चुकीच्या पद्धतीने केल्यास अतिशय हानिकारक ठरू शकतात, असा धोक्याचा इशारा रिंपोछे यांनी दिला. उदाहरणार्थ, जाणिवेचं हस्तांतरण (पोव), यामध्ये अशी कल्पना केलेली असते की आपली जाणीव मृत्यूचं पूर्वानुमान बांधताना डोक्याबाहेर गेली तर आपलं आयुष्य कमी होतं. गोळ्यांचं सार घेणं (चुलेन), यामध्ये संबंधित व्यक्ती अनेक आठवडे उपास करते आणि पवित्र केलेल्या अवशेषांच्या गोळ्यांवर जगते, ही पद्धत सामूहिक पातळीवर अंमलात आणली तर त्या भागात दुष्काळ पडू शकतो, अशा प्रकारे उपासना करणारी व्यक्ती अन्न व पाणी यांच्या अभावी गंभीर आजारी पडू शकते, आणि ती मरण्याचीही शक्यता असते.

तंत्रसाधनेसाठीचा एकांतवास हीसुद्धा एक प्रगत उपासना आहे आणि अकाली या उपासनेच्या मागे लागणं धोक्याचं आहे, असा इशारा रिंपोछे यांनी दिला होता. उदाहरणार्थ, काही वेळा लोक एक लाख मंत्रांचं पठण करण्यासाठी एकांतवासात जातात, पण या उपासनेशी त्यांचा आधी कधीच परिचय झालेला नसतो. एकांतवासाच्या कालावधीमध्ये आपल्याला अनुभव प्राप्त होईल, अशी त्यांची कल्पना असते. अभ्यास करण्यामध्ये आणि विशिष्ट उपासनेशी जुळवून घेण्यामध्ये बराच कालावधी घालवणं लाभदायक ठरतं, पण औपचारिक तांत्रिक साधनेवेळी हे करू नये. पोहता न येणारी व्यक्ती सुरुवातीलाच दिवसाचे बारा तास तलावामध्ये पोहण्याचा सराव करू शकत नाही. अशा प्रकारच्या वेडेपणाने स्नायू पिळवटतील व थकवा येईल. तीव्र प्रशिक्षण अनुभवी पोहणाऱ्यांसाठी असतं आणि त्यांना अग्रणी क्रीडापटू होण्यासाठी ते गरजेचं असतं. हेच तांत्रिक साधनेलाही लागू होतं.

आपल्या उपासनेबद्दल अहंकार न बाळगणं

तांत्रिक उपासना खाजगी राहणंही गरजेचं असतं. अन्यथा, जास्त हस्तक्षेप होऊ शकतो. अनेक पाश्चात्त्य लोक त्यांच्या उपासना व उपलब्ध स्वतःपुरत्या ठेवत नव्हते, तर त्याबद्दल बढाई मारत होते, हे रिंपोछेंना दिसत होतं. प्रस्तुत मंत्र दोनेक लाख वेळा म्हणणं आणि थोड्या काळासाठी साधना करणं, या बळावर आपण विशिष्ट बुद्ध-प्रतिमेचे महान योगी उपासक आहोत, अशी बढाई मारणं असंगत आहे, असं ते म्हणाले. आणि त्या प्रतिमेची रोज दीर्घ साधना आचरणात न आणताच इतकं नाटकी व अहंकारी वागणं उबगवाणं आहे. दीर्घ साधना नवागतांसाठी आहेत, असं रिंपोछे कायम सांगत असत. या साधनांमध्ये अनेकदा शंभरहून जास्त पानं असतात आणि दीर्घ कल्पनाचित्रांसारख्या या संहिता असतात. लघुकालीन संक्षिप्त साधना प्रगत उपासकांसाठी असतात. त्यांचा संपूर्ण उपासनेशी परिचय झालेला असतो आणि केवळ काही मोजके शब्द उच्चारून त्यांना सर्व कल्पनाचित्रं व प्रक्रिया त्यांना पूर्ण करता येतात.

हेतूपूर्ण दुर्बोधतेची तांत्रिक अध्यापन पद्धती समजून घेणं

सर्व शिकवणुकी व सूचना सुरुवातीलाच सुबोधपणे सादर केलेल्या असाव्यात, अशी अपेक्षा करणारी प्रवृत्ती पाश्चात्त्यांनी कमी करायला हवी, अशी रिंपोछेंची शिकवण होती. विशेषतः तांत्रिक साधनेच्या बाबतीत हे जास्त महत्त्वाचं आहे. महान भारतीय व तिबेटी गुरू स्पष्ट संहिता लिहिण्यामध्ये अगदी सक्षम होते. तरीही, त्यांनी हेतूतः संदिग्ध शैलीमध्ये लिहिलं. तांत्रिक सामग्री खूप स्पष्ट व सोपी केली, तर त्याने सहज हस्तक्षेप होईल आणि उपासनेचा ऱ्हास होईल. उदाहरणार्थ, लोक शिकवणुकी गृहित धरू लागतील आणि त्यासाठी गंभीर प्रयत्न करणार नाहीत.

इतरांनी अर्थाबाबत प्रश्न उपस्थित करावेत, हा बौद्ध अध्यापनतंत्राचा एक महत्त्वाचा भाग आहे. विद्यार्थ्यांना खरोखरच रस असेल, तर ते पुढील स्पष्टीकरण मागतील. यातून आपोआपच “अध्यात्मक पर्यटक” आणि साक्षात्कारासाठी आवश्यक कष्ट करायला तयार नसलेले लोक वगळले जातील. परंतु, तंत्रांचं स्पष्टीकरण करण्याचा हेतू लोकांच्या विपरित, नकारात्मक आकलनांना दूर करणं हा असेल, तर उघड स्पष्टीकरण प्रकाशित करण्याचंही समर्थन परम पूजनीय दलाई लामांनी केलं आहे. परंतु, हे केवळ सिद्धान्ताशी संबंधित मुद्दे आहेत, विशिष्ट बुद्ध-प्रतिमेची उपासना करण्याशी याचा संबंध नाही. “प्रत्यक्ष कृती” सांगणारी हस्तपुस्तिका लोकांना प्रगत उपासनेसाठी प्रोत्साहन देऊ शकते आणि शिक्षकाच्या देखरेखीशिवाय असा प्रयत्न करणं अतिशय धोकादायक ठरू शकतं.

धर्मसंरक्षकांबाबत बेफिकीरीने वागू नये

धर्मसंरक्षकांबाबत बेफिकीरीने वागणं ही सगळ्यांत धोकादायक बाब आहे, असा इशारा रिंपोछे यांनी दिला. धर्मसंरक्षक हे बलशाली असतात, अनेकदा या आत्म्यांना महान गुरूंनी मवाळ केलेलं असतं. सर्वसाधारणतः हिंसक असणाऱ्या या जीवांना बुद्धाच्या शिकवणुकींचं (धर्माचं) आणि प्रामाणिक उपासकांचं धोक्यापासून व अडथळ्यांपासून संरक्षण करण्याची प्रतिज्ञा घ्यायला लावलं जातं. केवळ महान योगीच त्यांना नियंत्रणात ठेवू शकतात.

वादचर्चेला समर्पित असलेल्या एका मठाच्या उपासनेचं संरक्षण करण्याची प्रतिज्ञा एका संरक्षकाकडून करवून घेण्यात आली, याबद्दल रिंपोछे अनेकदा सांगत असत. एखाद्याने वादचर्चेमध्ये सहभागी होणं अपेक्षित असताना तंत्राची उपासना करायचा प्रयत्न केला, तर त्या व्यक्तीला आजारी पाडणं व अपघात घडवणं, यांसारखे हस्तक्षेप सदर संरक्षकाने करायचे होते. वादविषयक प्रशिक्षण पूर्ण करून पुढील दोन तांत्रिक अभ्यासक्रमांपैकी एक पूर्ण केलेल्या भिक्खूंनाच तंत्राची उपासना करण्याची मुभा होती- पण त्यांनाही ही उपासना त्या मठाच्या आवारात करण्याची परवानगी नव्हती.

तर, अजून विद्यार्थीदशेत असलेल्या एका गेशेने मठाच्या आवारामध्ये जुनिपर झुडुपाची पानं अग्नीला अर्पण करून तंत्राशी संबंधित विधी केला. त्याला सातत्याने अडथळ्यांना सामोरं जावं लागलं. मग तो तांत्रिक अभ्यासक्रमांच्या वर्गांमध्ये दाखल झाला आणि पदवी मिळाल्यानंतर त्याने हा विधी पुन्हा सुरू केला, पण मठाबाहेर डोंगराजवळ तो हे करत असे. काही वर्षांनी या गेशेला भावशून्यतेचं स्पष्ट व असांकल्पनिक आकलन झालं, तेव्हा त्याच्या कल्पनेत तो संरक्षक आला. रागीट मुद्रेच्या त्या आत्म्याने माफी मागितली आणि तो म्हणाला, “आधी तुला बाधा पोचवावी लागल्याबद्दल मी माफी मागतो, पण तुमच्या मठाच्या संस्थापकासमोर मी घेतलेल्या प्रतिज्ञेचा तो भाग होता. आता तू भावशून्यतेचं उघड आकलन प्राप्त केलं आहेस, त्यामुळे मला वाटलं तरी मी तुला बाधा पोचवू शकत नाही.”

रिंपोछेंनी या उदाहरणाचं महत्त्व मांडलं. आपल्या क्षमतेबाहेरच्या शक्तींना मूर्ख बनविण्याचा प्रयत्न विध्वंसक ठरू शकतो. धर्मसंरक्षक हे बुद्धप्रतिमांचे सेवक असतात हे कायम लक्षात ठेवावं, ही परम पूजनीय दलाई लामांचं वाक्य ते अनेकदा उर्द्धृत करत असत. अनुत्तरयोग तंत्राच्या जागृती टप्प्यावर पूर्ण कौशल्यं प्राप्त केल्यानंतर आणि बुद्ध-प्रतिमा म्हणून अधिकार प्राप्त झालेल्यांनीच यात सहभागी व्हावं. अन्यथा अकाली सहभाग घेतला, तर लहान मूल महाकाय सिंहाला संरक्षणाचं आवाहन करत असल्यासारखा प्रकार होईल. तो सिंह सरळ मुलाला मटकावून टाकू शकतो. आपल्या कृतीने निर्माण झालेलं कर्म हेच आपलं सर्वोत्तम संरक्षक असतं, असा सल्ला परम पूजनीय दलाई लामांनी दिला आहे. शिवाय, बुद्ध, धर्म व उच्च आकलन असलेला अध्यात्मिक समुदाय- या त्रिरत्नाचा आश्रय घेतल्यावर काय होणार आहे?

Top