आध्यात्मिक शिक्षकाशी सखोल नातं निर्माण झालं तर संबंधित व्यक्तीच्या जीवनकाळातील तो सर्वांत उन्नत करणारा व अर्थपूर्ण अनुबंध असू शकतो. तो आत्मफसवणुकीचा, वेदनेचा व आध्यात्मिक निराशेचा स्त्रोतही होण्याची शक्यता असते. हे नातं सुदृढ करण्यासाठी किती सक्रियता दाखवली जाते, यावर सर्व काही अवलंबून असतं. यासाठी मुळात स्वतःविषयी व आपल्या शिक्षकाच्या पात्रतांविषयी, या अनुबंधाच्या उद्दिष्टाविषयी आणि या नात्याची गतिशीलता व मर्यादा यांविषयी वास्तववादी दृष्टिकोन असणं गरजेचं असतं.
माझ्या प्रमुख शिक्षकांशी- त्सेनझाब सरकाँग रिंपोछे, परम पूजनीय दलाई लामा, आणि गेशे न्गवांग धारग्ये- असलेल्या माझ्या नात्यातून मला अत्यंत महत्त्वाचा लाभ झाला, आणि माझ्या शिकवणुकींच्या जागतिक दौऱ्यांवेळी मला भेटणाऱ्या अनेक प्रामाणिक आध्यात्मिक साधकांना याहून खूप कमी पातळीवरचा अनुभव येतो याने मला दुःख वाटलं, त्यामुळे मी रिलेटिंग टू अ स्पिरिच्युअल टीचर: बिल्डिंग अ हेल्दी रिलेशनशिप (इथाका: स्नो लायन, २०००; पुनर्मुद्रण: वाइज टीचर, वाइज स्टुडन्ट: तिबेटन अप्रोचेस टू अ हेल्दी रिलेशनशिप. इथाका: स्नो लायन, २०१०) हे पुस्तक लिहिलं. अनेकांना लैंगिक, आर्थिक व बळाच्या अत्याचाराला सामोरं जावं लागलं, ते निरपराध बळी ठरले. या सगळ्याचा दोष पूर्णतः अत्याचारी शिक्षकांवर टाकून त्यांनी सर्व आध्यात्मिक मार्गदर्शकांपासून स्वतःला दुरू करून घेतलं आणि काहींनी तर आध्यात्मिक मार्गही सोडून दिला. इतरांनी स्वतःच्या दुबळ्या नात्यांकडे दुर्लक्ष केलं आणि प्रचलित प्रमाणकांनुसार एखाद्या गुरूने कितीही बाधक वर्तन केलं तरी ‘गुरू-भक्ती’द्वारे त्याचं केवळ समर्थनच होतं, किंबहुना त्याला पावित्र्य बहाल केलं जातं असं त्यांना वाटलं. या दोन्ही टोकांमुळे विद्यार्थ्यांना एका सुदृढ नात्यातून मिळणारे सर्व लाभ स्वीकारणं शक्य झालं नाही.
विद्यार्थी पाश्चात्त्य आहेत आणि शिक्षक तिबेटी अशा बाबतीत सांस्कृतिक गैरसमजूत हा समस्येचा एक स्त्रोत असतो, त्यात अवास्तविक अपेक्षांची भर पडते, कारण प्रत्येक जण आपापल्या सांस्कृतिक नियमांनुसार वागत असतो. विद्यार्थी-शिक्षक किंवा शिष्य-गुरू नात्याच्या प्रमाणित सांहितिक मांडणीला त्यांच्या मूळ संदर्भांपासून वेगळं करून शब्दःश त्यांचा अर्थ लावल्याने, आणि अनेकदा दिशाभूल करणाऱ्या भाषांतरामुळे त्यातील तांत्रिक संज्ञांचा चुकीचा अर्थ घेतल्याने, आणखी गोंधळ होतो.
उदाहरणार्थ, लाम-रिम (श्रेणिबद्ध मार्ग) या संज्ञेतून शिष्य-गुरू यांचं नातं “मुळांकडे जाणाऱ्या वाटे”सारखं असल्याची मांडणी केली आहे आणि हा एक पहिला मोठा विषय असल्याप्रमाणे त्याची चर्चा केली आहे. परंतु, कोणतंही झाड स्वतःच्या मुळांमुळे टिकाव धरतं, असा या रूपकाचा अर्थ आहे; ते झाड मुळापासून सुरू होतं असा अर्थ नाही. झाडाची सुरुवात बीपासून होते, आणि त्सोंगखापा यांनी या नात्याला “मार्गाचं बी” असं संबोधलेलं नाही. शेवटी, मूळ लाम-रिमचे श्रोते नवखे विद्यार्थी नसतील असं गृहित धरलेलं होतं. त्यात तांत्रिक धर्माधिकार स्वीकारण्यासाठी जमलेले भिक्खू व भिक्खुणी होते. त्यांच्या तयारीचा भाग म्हणून त्यांना सूत्र शिकवणुकींचं परिशीलन गरजेचं होतं. पूर्वाभ्यास व सराव यांद्वारे आधीच बौद्ध मार्गाला समर्पित करून घेतलेल्या अशा व्यक्तींसाठी आध्यात्मिक शिक्षकासोबतचं सुदृढ नातं मुळासारखं असतं, त्यातून त्यांना साक्षात्काराच्या संपूर्ण मार्गावर टिकाव धरण्यासाठीची प्रेरणा मिळते. पाश्चात्त्य धर्म केंद्रांमध्ये आलेल्या नवागतांनी त्यांच्या आध्यात्मिक शिक्षकांना बुद्ध मानून सुरुवात करावी, असा यामागचा हेतू कधीच नव्हता.
माझ्याबाबतीत माझ्या एखाद्या आध्यात्मिक शिक्षकाशी असलेलं माझं सखोल नातं त्या शिक्षकाच्या दोन जीवनकाळांना व्यापणारं असतं. परम पूजनीय दलाई लामांचे वादचर्चेमधील सहकारी व सहायक शिक्षक दिवंगत त्सेनझाब सरकाँग रिंपोछे यांचा शिष्य, दुभाषा, इंग्रजी सचिव व परकीय दौऱ्यांचा व्यवस्थापक म्हणून मी नऊ वर्षं व्यतीत केली. रिंपोछे १९८३ साली वारले आणि नऊ महिन्यांनी त्यांचा पुनर्जन्म झाला, चौथ्या वर्षी त्यांची ओळख पटली आणि ते धरमशाला इथे परतले. काही महिन्यांनी आम्ही भेटलो तेव्हा ते आणि मी यांच्यातला सखोल अनुबंध पुन्हा दृढ झाला. मी कोण आहे ते त्यांना (पुनर्जन्मित रूपातील रिंपोछेंना) माहीत आहे का, असं एका सहायकाने विचारल्यावर तो लहान तुल्कू म्हणाला, “मूर्खासारखं बोलू नका. मला अर्थातच हे कोण आहेत ते माहीत आहे.” तेव्हापासून रिंपोछेंनी मला त्यांच्या आध्यात्मिक कुटुंबातील निकटवर्तीय सदस्याप्रमाणे वागवलं आहे- चार वर्षांचा मुलगा अशी फसवणूक करू शकणार नाही. मलाही आमच्यातील सखोल नात्याबद्दल शंका नाहीत.
२००१ सालच्या उन्हाळ्यामध्ये मी रिंपोछेंसोबत दक्षिण भारतातील गान्देन जान्गत्से या त्यांच्या मठामध्ये एक महिना घालवला. तिथे सतरा वर्षांच्या रिंपोछेंनी उपस्थित भिक्खूंसमोर वादचर्चा केली आणि विद्वानांच्या श्रेणीमध्ये त्यांचा अधिकृत प्रवेश झाला. ते गेशे प्रशिक्षणामध्ये काय शिकत होते, याबद्दल त्यांच्याकडून मी या महिन्याभरात शिकवणूक घेतली. त्यांच्या एका मौखिक संप्रेषणाचं आणि त्यांच्या पुर्वसुरीच्या एका निकटवर्तीय पाश्चात्त्य शिष्याला त्यांनी दिलेल्या एका संहितेच्या स्पष्टीकरणाचं भाषांतर केलं. पुन्हा एकदा त्यांच्यासाठी भाषांतर करताना छान वाटत असल्याचं मी रिंपोछे यांच्याशी बोलताना म्हटलं, तेव्हा ते म्हणाले, “हे अर्थातच तुझं कर्म आहे.” त्यांनी मला गतजीवनामध्ये दिलेले धर्मविषयक व ऐहिक सल्ले मी त्यांना परत देण्याची अनौपचारिक प्रक्रियाही या कालावधीत सुरू राहिली.
सरकाँग रिंपोछे यांच्याशी दोन जीवनकाळांमध्ये राहिलेल्या माझ्या या वैयक्तिक नात्यामुळे धर्मावर आणि पुनर्जन्मावर माझा अधिक विश्वास बसला. केवळ अभ्यास व साधना यांद्वारे माझा जितपत विश्वास बसणं शक्य होतं, त्याहून ही पातळी जास्त तीव्र होती. या मार्गावरच्या सातत्यपूर्ण प्रेरणेचा हा एक स्त्रोत राहिला आहे. आपापल्या जीवनामधील एकमेकांबद्दलच्या भूमिकांबाबत ते किंवा मी कोणीच एकमेकांना फसवत नाही. आम्ही आधी जसे होतो त्याहून आम्ही पूर्णतः भिन्नही नाही आणि पूर्णतः त्यासारखेचही नाही. आम्ही दोघेही सातत्य आहोत. आम्हाला एकमेकांबद्दल सखोल आदर आहे, तेव्हाच्या व आत्ताच्या जीवनातील भिन्न टप्प्यांबाबत आमचा दृष्टिकोन वास्तववादी आहे, त्यामुळे आता आम्ही परस्परांकडून अधिक सहजतेने शिकतो व एकमेकांना शिकवतो. हे पूर्णतः नैसर्गिक वाटतं.
मी स्टार ट्रेकचा चाहता आहे, तर त्या मूळ मालिकेमध्ये आणि नेक्स्ट जनरेशन या पुढील भागांमध्येही मी त्या चमूचा भाग असलो तर काय होईल, तसं मी या अनुभवाकडे पाहतो. मूळ मालिकेत कॅप्टन किर्कच्या नेतृत्वाखालील चमूचा मी भाग असेन आणि त्याचा कॅप्टन पिकार्ड म्हणून पुनर्जन्म झाल्यावर मी त्याच्याही चमूमध्ये तरुण प्रशिक्षणार्थी म्हणून असेन. भविष्यातील सर्व उपक्रमांमध्ये चमूला सेवा देता यावी यासाठी कर्म घडवत राहणं, हे माझ्या समोरचं प्रमुख आव्हान आहे.