बौद्ध उपासकांसाठी सरकाँग रिंपोछे यांचा सल्ला

आपल्या अध्यात्मिक गुरूबाबत समजूतदार असावं

सर्व लामांबाबत समजूतदार असावं आणि त्यांचा वेळ वाया घालवू नये, हे सरकाँग रिंपोछे कायम भर देऊन सांगत असत. स्पितीमधील धर्माभिमानी लोकांचा दाखला टाळावा, असं त्यांनी सुचवलं होतं. त्यांना औपचारिक गळपट्टा (कता) देण्यासाठी रांगेत उभे असताना स्पितीमधील त्यांचे भक्त थेट त्यांच्या समोर येऊन दंडवत घालायला मिळेपर्यंत थांबून राहत आणि प्रत्येक वेळी एकच जण पुढे येत होता. अशा प्रक्रियेला अनेकदा कित्येक तास लागू शकतात. शिवाय, एखाद्या लामांना प्रश्न विचारताना कधीही लांबलचक गोष्ट सांगू नये किंवा प्रदर्शन मांडू नये, असं रिंपोछे म्हणत. किंबहुना, असे प्रश्न कधीशी शब्दशः भाषांतरित करू नयेत, तर केवळ मुद्दा नमूद करावा, अशी सूचना त्यांनी मला केली होती. 

शिवाय, पाहुण्यांनी सतत आपल्याला कता आणि ‘घाणेरड’ कुकींचे खोके आणून देऊ नयेत, असं रिंपोछेंना वाटत होतं. कोणत्याही लामाला दक्षिणा देऊ इच्छिणाऱ्यांनी त्या व्यक्तीला वापरता येईल किंवा आवडेल असं काहीतरी खरोखर चांगलं असेल ते द्यावं. शिवाय, कोणी त्यांना वारंवार भेटत असेल, उदाहरणार्थ- मी, तर अशा लोकांनी वस्तू आणणं थांबवावं, असं ते म्हणत. त्यांना काहीही नको होतं किंवा गरजेचं नव्हतं.

एखादी गोष्ट योग्यरित्या झाली नाही, तर व्यवहारज्ञान वापरणं आणि पर्यायी योजना तयार ठेवणं

लोकांनी व्यवहारज्ञान वापरावं असा सल्ला रिंपोछे कायम देत असत. त्यामुळे, लोकांनी क्षुल्लक बाबींमधील भविष्याबद्दल विचारणा केलेलं त्यांना आवडायचं नाही. सर्वसामान्य मार्गांनी प्रश्न- विशेषतः अध्यात्मिक बाबतीतील प्रश्न सुटत नसेल, अशा वेळीच भविष्यकथनाची विनंती करणं उचित ठरतं. एकदा मला माझ्या भाड्यासंदर्भात काही अडचण आली तेव्हा मी काय करावं याबद्दल भविष्यकथनाची विनंती केली. त्यावर रिंपोछे यांनी मला हाकलून लावलं आणि वकिलाला भेटण्यास सांगितलं.

शिवाय, कोणत्याही कामाचं नियोजन करत असताना, किमान तीन संभाव्य कृतिआराखडे तयार करावेत, असं रिंपोछे सुचवत. एखादी योजना अपयशी ठरली, तर असहायतेने भयग्रस्त व्हावं लागू नये यासाठी आवश्यक लवचिकता या व्यूहरचनेमधून प्राप्त होते. अनेक पर्याय उपलब्ध असल्यामुळे त्यातला एक तरी यशस्वी होईल या आत्मविश्वासामुळे सुरक्षिततेची भावना निर्माण होते. 

परंतु, अनुयायी काही वेळा भविष्यकथनावर विसंबून राहतात, त्यामुळे स्वतःचा विचार स्वतः करण्याची क्षमता ते गमावून बसतात. स्वतःच्या जीवनाची जबाबदारी टाळून अशा व्यक्तीने दुसऱ्या कोणीतरी आपल्यासाठी निर्णय घ्यावेत असं वाटत असतं. मोठ्या निर्णयांबाबत अध्यात्मिक गुरूशी सल्लामसलत करणं अनेकदा उपयुक्त ठरतं, पण हे करण्याचा सर्वांत सूक्ष्म मार्ग म्हणजे त्या शिक्षकाची किंवा शिक्षिकेची मूल्यं आत्मसात करणं. संबंधित लामा अनुपस्थित असेल, तरी ही मूल्यं सर्वांत योग्य कृतिआराखडा अनुसरण्यासाठी आपल्याला कायम मदत करतात. 

आपल्याला हवंय ते उत्तर मिळेपर्यंत एकच प्रश्न अनेक लामांना विचारून भविष्यकथनाची विनंती लोकांनी करू नये, असा सल्ला रिंपोछे देत असत. भविष्यकथनाची विनंती करणं म्हणजे लामावर विश्वास दाखवणं असतं. ते जो काही सल्ला देतील त्यानुसार कृती करायची इच्छा त्यात असते. शिवाय, अमुकएका शिक्षकाने असं करायला सांगितलं आहे किंवा ते करायला सांगितलं आहे, असं एखाद्या लामाकडे जाऊन सांगू नये. तुम्हाला काय वाटतं, मी काय करायला हवं, एवढंच विचारावं. इतर अध्यात्मिक गुरू चुकीचा आहे असं बोलायला लावणाऱ्या अवघड स्थितीत लामांना टाकणं असंवेदनशील वाटतं.

योग्यरित्या प्रश्न कसे विचारायचे हे शिकणं

लामांना योग्यरित्या प्रश्न कसे विचारायचे, हे बहुतांश पाश्चात्त्यांना माहीत नसतं. हे लोक मूर्खासारखे प्रश्न विचारत तेव्हा सर्वसाधारणतः रिंपोछे त्यांना दुरुस्त करायचा प्रयत्न करत. उदाहरणार्थ, अधिकारदानाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं की नाही, हे कोणाला कळत नसेल, तर “या दीक्षादानाला उपस्थित राहणं चांगलं आहे का?” असा प्रश्न विचारणं हास्यास्पद ठरतं. अशी उपस्थिती अर्थातच चांगली असते; ती वाईट असते असं कोणीच म्हणणार नाही. “मी उपस्थित राहू की नको?” असं कोणी विचारलं, तर त्याचा गर्भितार्थ असा असतो की, “मी उपस्थित राहणं बंधनकारक आहे का?” कोणालाही उपस्थित राहणं बंधनकारक नसतं. अशा बाबतीत अध्यात्मिक गुरूचा सल्ला घेताना असं विचारावं की, “मी काय करावं असं तुम्ही सुचवाल?”

शिवाय, एखाद्या लामाकडे जाऊन त्याच्याकडून अथवा तिच्याकडून दीक्षा घेण्याची परवानगी मागताना, “मी आपल्याकडून दीक्षा घेऊ शकतो की नाही?” असं विचारणं मूर्खपणाचं ठरतं. “मी समर्थ आहे का?” असा यातला गर्भितार्थ पूर्णपणे असंगत आहे. “कृपया मला दीक्षा द्याल का?” असं विचारणं योग्य आहे. परदेशामध्ये राहण्यासाठी व्हिसाची मुदत वाढवून घेताना, “मी अजून जास्त काळ राहू शकतो का?” असं एखादा मूर्खच विचारेल. “आपण दयाळूपणे परवानगी दिलीत, तर मला थोडं अधिक काळ राहायची इच्छा आहे,” ही विनंती करायची प्रगल्भ पद्धत आहे.

एकदा टर्नर यांना सहा हातांच्या महाकाळ या अध्यात्मिक रक्षणकर्त्याला आवाहन करण्यासाठी विधी करायचा होता, त्याची परवानगी मागत त्यांनी रिंपोछे यांना अनेक महिने सतत त्रस्त केलं. अखेरीस रिंपोछे यांनी संमती दिली तेव्हा दैनंदिन पठण किती असावं, असं टर्नर यांनी त्यांना विचारलं. यावर रिंपोछे यांनी त्यांना अक्षरशः मारलं, वचनबद्धता म्हणून काहीही करायची त्यांची तयारी असायला हवी, असं रिंपोछेंनी सांगितलं.

वचन देण्यापूर्वी तपासणी करणं

दीक्षा समारंभामध्ये पठणासंबंधीच्या वचनबद्धतेबाबत तडजोड करू पाहणाऱ्या पाश्चात्त्यांबाबत रिंपोछे अतिशय नाराज होत असत. सर्वांच्या लाभासाठी साक्षात्कार प्राप्त करून घेण्याच्या उद्देशाने एका विशिष्ट बुद्धप्रतिमेची उपासना करायचा पर्याय स्वीकारला जातो, त्यासाठी दीक्षा घेण्यावर रिंपोछेंनी कायम भर दिला. केवळ “चांगले भाव” जाणवतात किंवा सगळे जातायंत, म्हणून अशा समारंभाला उपस्थित राहणं असंगत आहे, असं त्यांना वाटत असे. शिवाय, ओळख करून घेण्याच्या उद्देशाने छोट्याशा सहलीप्रमाणे अशा कार्यक्रमाला उपस्थित राहून मग साधनेविषयी विसरून जाणं, हेसुद्धा अयोग्य आहे. एखाद्या विशिष्ट तांत्रिक उपासनेला आयुष्यभरासाठी वचनबद्ध राहायचं असतं.

अध्यात्मिक उपासनांशी व शिक्षकांशी जोडून घेण्यापूर्वी त्यांची छाननी करावी, त्यासाठी वाट बघत थांबू नये, यावर रिंपोछे भर देत असत. पाश्चात्त्यांमध्ये हा एक मोठा दोष रिंपोछेंना दिसत होता. आम्ही अप्रगल्भपणे गोष्टी करायला धावतो. गोठलेल्या तलावात जाऊन उडी मारणाऱ्या आणि आपलं वजन पेलवण्याइतका बर्फ सक्षम आहे का हे नंतर काठीने तपासणाऱ्या वेड्या माणसासारखं होऊ नये, असा सावधानतेचा इशारा रिंपोछे यांनी दिला.

लोकांनी कोणाचीही शिकवण घ्यावी आणि नम्रतेने त्या गुरूच्या संन्यस्त पोशाखाला किंवा खोलीतील बौद्ध चित्राला दंडवतही करावा, पण त्या गुरूचा विद्यार्थी होणं ही वेगळी बाब आहे, असं रिंपोछे म्हणत. मी कोणत्याही लामांसाठी भाषांतर करावं, पण कोणासोबत काम केल्यामुळे ती व्यक्ती माझी अध्यात्मिक गुरू होत नाही, असं त्यांनी मला सांगितलं होतं. मी एखादी तांत्रिक दीक्षा भाषांतरित करत असेन, तरीही हे लागू होतं, असं त्यांनी स्पष्ट केलं. संबंधित गुरूषयीची आपली वृत्ती काय आहे, ते महत्त्वाचं असतं.

अप्रगल्भावस्थेत भिक्खू किंवा भिक्खुणी होण्याचं टाळणं

अनेक पाश्चात्त्य लोक आपल्याला उर्वरित आयुष्यभर खरोखर हेच करायचं आहे का, याचा तपास न करता खूपच चटकन बौद्ध भिक्खू व भिक्खुणी होतात, असं रिंपोछेंना वाटत असे. त्यांच्या धर्माधिकारदीक्षेने त्यांच्या पालकांवर कोणता परिणाम होईल किंवा ते भविष्यात स्वतःची उपजीविका कशी करतील, याचा विचारही ते करत नाहीत. कोणी गतकाळातील महान सर्वसंगपरित्यागी व्यक्तींप्रमाणे असेल, तर त्याला किंवा तिला कुटुंब व पैसा यांसारख्या घटकांचा विचार करण्याची गरज नसते. परंतु, आपण मिलारेपा आहोत की नाही, हे आपलं आपल्याला माहीत असतंच.

या संदर्भात, रिंपोछे यांनी वारंवार द्रुबकांग गेलेग्यात्सो यांचा दाखला दिला होता. या महान तिबेटी गुरूला तरुणपणीच भिक्खू व्हायची इच्छा होती, पण त्यांच्या कुटुंबांनी याला संमती दिली नाही आणि कुटुंबीय बरेच नाराज झाले. त्यामुळे द्रुबकांग यांनी आईवडील हयात असताना त्यांची सेवा केली आणि ते मरण पावल्यानंतर त्यांच्या वारशात आलेलं सगळं काही मूल्यवान कामांसाठी दान केलं. त्यानंतरच ते भिक्खू झाले.

आपल्या पालकांचा आदर करणं व त्यांची सेवा करणं, यावर रिंपोछेंनी कायम भर दिला. प्रत्येक जण गतजन्मांमध्ये आपली माता व पिता होते आणि त्यांच्या दयाळूपणाची परतफेड आपण करायला हवी, असं आपण पाश्चात्त्य बौद्ध वरकरणी बोलतो. पण वैयक्तिक पातळीवर, आपल्यापैकी अनेक जण या जीवनकाळामध्येही आपल्या पालकांशी चांगळ्या तऱ्हेने वागू शकत नाही. आपल्या पालकांची सेवा करणं व त्यांच्याबाबत दयाभाव राखणं, हे एक थोर बौद्ध आचरण आहे, अशी रिंपोछेंची शिकवण होती.

कोणी आधी पुरेशी तपासणी करून मग भिक्खू किंवा भिक्खुणी झालं, किंवा कोणाला आधीच भिक्खू होण्याचा आदेश मिळाला असेल, तर त्यात वटवाघळासारखं अर्धवट उतरू नये, असं रिंपोछे यांचं म्हणणं होतं. वटवाघूळ पक्ष्यांमध्ये असेल आणि त्यांना अनुसरण त्याला शक्य नसेल, तेव्हा ते म्हणतं, “अरे, मला हे करता येत नाही. मला दात आहेत.” वटवाघूळ उंदरांमध्ये असतं, तेव्हा म्हणतं, “अरे, मला हे करता येत नाही. मला पंख आहेत.” असं वागणं म्हणजे सोयीसाठी संन्याशाचा पोशाख करण्यासारखं आहे. स्वतःला आर्थिक आधार देणं यांसारख्या सर्वसामान्य कृती करणं शक्य नसतं, तेव्हा अशा व्यक्ती आपल्या संन्यस्त पोशाखाचा वापर करतात. पण लांबणाऱ्या विधींमध्ये सहभागी होणं किंवा कफनी घालून प्रवास करणं, यांसारख्या संन्यस्त कार्यांबद्दल किंवा रूपांबद्दल त्यांना फिकीर वाटत नसते, तेव्हा ते पाश्चात्त्य असल्याचं कारण देतात. “तुम्ही कोणाला फसवत आहात?” असा प्रश्न रिंपोछेंनी यावर विचारला असता.

अध्यात्मिक आचरण करणं म्हणजे नोकरी न शोधण्यासाठीचं कारण द्यायचा पर्याय नव्हे

बौद्ध धर्माचं आचरण करणाऱ्यांनी काम करू नये, असा याचा अर्थ नसल्याचं स्पष्टीकरण रिंपोछे यांनी दिलं. सर्वसामान्य व्यक्ती असो किंवा धर्माधिकारदीक्षा घेतलेली व्यक्ती असो, प्रत्येकाने व्यावहारिक व नम्र असणं गरजेचं आहे. आपण आपल्या शरीराचा वापर कसा करतो, यापेक्षा आपण आपल्या मनाचा व वाणीचा वापर कसा करतो, हे जास्त महत्त्वाचं असल्याची शिकवण रिंपोछे यांनी दिली. त्यामुळे स्वतःची उपजीविका साधण्यासाठी उत्कट उपासकांनी श्रमाची कामं करावीत, असा सल्ला त्यांनी दिला. असं काम करत असताना आपण मंत्रपठण करू शकतो आणि स्नेहपूर्ण भावना व दयाळू विचार ठेवू शकतो. काम करत असताना शिकवणुकींचा विचार करणं खूप अवघड जात असेल आमि आपल्याला तांत्रिक धर्माधिकार मिळाले असतील, तर आपण किमान आपल्या स्व-प्रतिमा तरी बदलू शकतो. दिवसभर आपण स्वतःची बुद्ध-प्रतिमेच्या रूपात कल्पना करू शकतो आणि आपलं पर्यावरण अध्यात्मक विकासासाठी परिपूर्ण पूरकता देणाऱ्या शुद्ध भूमीसारखं आहे अशीही कल्पना करू शकतो. त्यानंतर सकाळी लवकर व रात्री आपण साधनेचं तपशीलवार कल्पनाचित्र उभं करू शकतो. बौद्ध धर्म जीवनापासून विभक्त करू नये, यावर रिंपोछे यांनी कायम भर दिला.

अनेक वर्षं टर्नर इंग्लंडमध्ये बेरोजगार म्हणून राहिले, सामाजिक कल्याणकारी धोरणांच्या आधारावर ते त्यांच्या पत्नीसह व दोन मुलांसह जगले. त्यांनी त्यांचा जवळपास सगळा वेळ उत्कट साधनेच्या उपासनेमध्ये घालवला. मला शिकवणुकींचं आचरण करता येत असेल, तर काम करण्यात वेळ का वाया घालवायचा, असं त्यांना वाटत होतं. त्या पूर्वी श्वेत महाकाळाचा विधी करायची परवानगी त्यांना रिंपोछे यांनी दिली होती. संपत्तीशी संबंधित रक्षणकर्ती अशी ही देवता असून आपल्या आर्थिक समस्या सोडवल्या जाव्यात अशी प्रार्थना टर्नर रोज करत असत. आपण बरं व्हावं यासाठी आजारी माणसाने कधीच औषध न घेता औषधी बुद्धाची प्रार्थना करण्यासारखा हा प्रकार होता. टर्नर यांनी नोकरी करावी आणि सकाळी व रात्री थोड्या वेळापुरतीच उत्कट उपासना करावी, असं रिंपोछे यांनी सांगितलं. त्यानंतर श्वेत महाकाळाला आवाहन केल्याने त्यांचं काम आर्थिकदृष्ट्या यशस्वी होईल.

कायम व्यावहारिक व कार्यक्षम असणं

लोकांनी व्यावहारिक व कार्यक्षम असावं, विचलित होऊ नये, असं रिंपोछे यांना वाटत असे. त्यामुळे ते कायम उपासना व पठण चटकन आटपणं पसंत करायचे. एकदा इटलीतील मिलान येथील घेफलिंग सेंटरमधील विद्यार्थ्यांनी रिंपोछे यांना एक साधना-सत्र घेण्याची विनंती केली. श्रेणीबद्ध मार्ग (लाम-रीम) आणि अवलोकितेश्वराची उपासना यांबद्दलचा त्यांचा तिथला अभ्यासक्रम संपत असताना त्यांनी हे सत्र घ्यावं, अशी विद्यार्थ्यांची इच्छा होती. रिंपोछेंनी याला संमती दर्शवली आणि सहा स्तरीय प्रक्रियेद्वारे विद्यार्थ्यांनीच स्वतःला अवलोकितेश्वर म्हणून घडावावं अशी सूचना केली, त्यानंतर लाम-रीमच्या डझनावारी मुद्द्यांवर चिंतन करायला सांगितलं, आणि हे सर्व विद्यार्थ्यांनी दोन मिनिटांत करावं अशी त्यांची अपेक्षा होती. विद्यार्थ्यांनी याबद्दल अविश्वास व्यक्त केला आणि हे सगळं करायला इतका कमी वेळ कसा पुरेल, अशी तक्रार केली, तेव्हा रिंपोछेंनी माघार घेतली आणि ते म्हणाले, “बरं, मग हे तीन मिनिटांत करा.” त्यानंतर त्यांनी स्पष्ट करून सांगितलं की, घोड्यावर बसताना खोगीरावर पाय ठेवण्यासाठी जितका वेळा लागतो तितक्या वेळात चांगला उपासक संपूर्ण लाम-रीम प्रक्रिया पार पाडू शकतो. मृत्यू येतो तेव्हा धड बसायला आणि शांत व टप्प्याटप्प्याच्या प्रक्रियेद्वारे कल्पनाचित्र उभं करायला वेळ नसतो.

आपल्या बौद्ध आचरणामध्ये वास्तववादी असणं

बौद्ध आचरणाच्या सर्व बाबींमध्ये वास्तववादी असण्याची गरज आहे, असं रिंपोछे यांनी ठामपणे मांडलं. इतरांच्या लाभासाठी आपण बोधिसत्व होऊ इच्छित असू, तर हे विशेष महत्त्वाचं आहे. आपल्या बाजूने आपण कायम इतरांना मदत करण्यासाठी इच्छुक असायला हवं, त्याचप्रमाणे आपल्या सहकार्याबाबतचा इतरांचा खुलेपणा आणि अखेरीस आपल्या प्रयत्नांचं यश त्यांच्या कर्मावर- त्यांचं मन घडवणाऱ्या आधीच्या आकृतिबंधांवर- अवलंबून आहे. त्यामुळे आपल्याशी संबंधित नसलेल्या बाबींमध्ये किंवा इतरांना आपलं सहकार्य स्वीकारण्यात रस नसेल, अशा वेळी मदत देऊ करण्याबाबत सावध राहावं, असं रिंपोछे म्हणाले होते. अशा परिस्थिती आपण हस्तक्षेप केल्याने रोषच उत्पन्न होईल आणि आपली मदत अपयशी ठरली, तर सगळ्याचा ठपका आपल्यावर येईल.

आपल्याला करणं शक्य आहे त्याहून जास्त आश्वासन न देणं

फारसं पुढे-पुढे न करणं, हे नेहमीच योग्य असतं. आपली मदत करण्याची इच्छा आहे, आणि त्यांनी विनंती केली तर आपण निश्चितपणे त्यांच्या कामामध्ये सहभागी होऊ शकतो, हे आपण इतरांना सांगू शकतो. परंतु, आपण “भाड्यावर मिळणारे बोधिसत्व” असल्याप्रमाणे जाहिरात करणं टाळण्याची गरज आहे. आपली दैनंदिन साधना करणं आणि साधेपणाने जगणं हे सर्वांत योग्य. आपल्याला साध्य करता येईल त्याहून जास्त आश्वासन देणं किंवा आपण एखादी गोष्ट भविष्यात हाती घेऊ किंवा पूर्ण करू अशी जाहिरात करणं, अशा गोष्टी करू नयेत असा इशारा रिंपोछे यांनी दिला होता. अशाने अडथळेच वाढतात आणि अखेरीस आपल्याला घोषणेप्रमाणे प्रत्यक्षात कृती करता येत नाही, आपण मूर्ख ठरतो आणि सगळी विश्वसनीयता गमावून बसतो.

आपल्याला करणं शक्य आहे त्याहून जास्त आश्वासन न देण्याचा हा मुद्दा आपल्या अध्यात्मिक गुरूंशी असलेल्या संबंधांबाबत विशेष प्रस्तुत ठरणारा आहे. अश्वघोषाच्या गुरुपंचशिक या संहितेमधील मार्गदर्शक तत्त्वांचं कायम अनुसरण करावं, असं रिंपोछे म्हणत असत. ते स्वतः साधनेवेळी या श्लोकांचं पठण करत. आपल्या गुरूने आपल्याला काही करायला सांगितलं असेल, आणि आपल्याला कोणत्याही कारणामुळे ते करणं शक्य नसेल, तर आपल्याला आज्ञेचं पालन का करता येणार नाही ते साधेपणाने व नम्रपणे सांगायची गरज असते. अध्यात्मिक गुरूशी मनःपूर्वक बांधील राहणं, याचा अर्थ गुलाम किंवा रोबोट होणं असा नाही, तर स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकणं, स्वतःचा विचार करणं आणि साक्षात्कारी होणं असाच त्याचा अर्थ रिंपोछे यांना अभिप्रेत होता. आपल्या गुरूंनी सांगितलेलं आपल्याला करता आलं नाही, तरी त्याबद्दल अपराधी वाटून घेणं पूर्णतः अयोग्य आहे. आपण आपल्या गुरूंना नाराज करतो आहोत, त्यामुळे आपण वाईट शिष्य आहोत, असं वाटून घेऊ नये. योग्य अध्यात्मिक गुरू हा अवाजवी जुलुमशहा नसतो.

कोणासाठी, आपल्या शिक्षकांसाठी किंवा इतर कोणाहीसाठी, काही करायचं आपण मान्य केलं असेल, तर सुरुवातीपासूनच सगळं स्पष्ट करावं असा सल्ला रिंपोछे यांनी दिला होता. भाबड्या सद्हेतूवाल्यांप्रमाणे आपण काही करायचं मान्य केलं, आणि नंतर काम करत असताना किंवा पूर्ण झाल्यावर आपल्याला त्यातून काही परतफेडीची अपेक्षा असल्याचं जाहीर केलं, तर त्यातून घोळ होऊ शकतो. आपण व्यावहारिक व वास्तववादी असलो, आणि गोष्टींचा आधी विचार करत असलो, तर ऐहिक व अध्यात्मिक अशी दोन्ही कामं चांगल्याने होतात. आपण अव्यावहारिक व अवास्तववादी असलो, आणि अविचारीपणे गोष्टी करत सुटलो, तर कशातच यश मिळत नाही.

बौद्ध केंद्रांसाठी सल्ला

पाश्चात्त्य बौद्ध केंद्रांबाबत रिंपोछे यांनी अशाच दृष्टिकोनाचा सल्ला दिला. कर्जाचं व अंमलात आणता येणार नाही किंवा पूर्ण होणार नाही इतक्या प्रकल्पांच्या आश्वासनांचं ओझं पेलावं लागेल इतकं मोठं होणं टाळावं, असं त्यांनी या केंद्रांना सांगितलं. लहान पातळीवर, साधेपणाने सुरुवात करावी, आणि दूर गावात केंद्र स्थापन करण्याचा मोह टाळावा. शहरवासीयांना जाण्या-येण्यासाठी सोयीचं ठरेल आणि रहिवाशांना जवळपास काम शोधता येईल, अशा ठिकाणी बौद्ध केंद्र असावं. गरज पडल्यास संबंधित समूहाला ते केंद्र विकून मोठं केंद्र विकत घेता येऊ शकतं, पण सगळं योग्य वेळ आल्यावर करावं.

एखाद्या सर्कशीसाठी भपकेदार जाहिरात करतात, तसं करून मोठी गर्दी खेचणं हा बौद्ध केंद्रांमागचा उद्देश नाही. रिंपोछे यांना कायमच प्रामाणिक विद्यार्थ्यांचे लहान गट पसंत होते. शिवाय, अध्यात्मिक गुरूची निवड करताना, संबंधित व्यक्ती किती मनोरंजन करते किंवा किती गंमतीशीर गोष्टी सांगते यांचा काही संबंध नसतो. आपल्याला हसायचं असेल किंवा काही अनोखं पाहायचं असेल, तर सर्कशीत जाऊन विदूषक पाहावेत किंवा प्रदर्शनाला भेट द्यावी.

Top