सरकाँग रिंपोछे यांचे इतर गुण

रिंपोछे यांचे वडील सरकाँग दोर्जेचांग यांच्या भौतिकेतर शक्ती

आपण योगी आहोत किंवा आपल्याकडे काही विशेष शक्ती आहेत, असा दावा सरकाँग रिंपोछे यांनी कधीही केला नाही. अशी ताकद असलेल्या कोणाचा दाखला आपल्याला हवा असेल तर अगदी दूर भूतकाळात जाण्याची गरज नाही, असं ते म्हणाले. त्यांचे वडील, सरकाँग दोर्जेचांग हा एक स्पष्ट दाखला होता. गँदेन जांगत्से मठामधील भिक्खू म्हणून त्यांच्या वडिलांनी अनुत्तारयोगाचा टप्पा गाठला होता, तिथे मनाच्या सर्वांत खोल पातळीपर्यंत जाण्यासाठी स्वरमेळ साधून विशेष योगतंत्रांचं आचरण त्यांना करता येत असे. या प्रगत टप्प्यावर सूक्ष्म ऊर्जाव्यवस्थेवर पूर्ण प्रावीण्य मिळवावं लागतं, शिवाय अंतर्गत व बाह्य पदार्थ व ऊर्जा यांवर पूर्ण नियंत्रण असावं लागतं. त्यांच्या ब्रह्मचर्याच्या प्रतिज्ञेमुळे सर्वसाधारणतः त्यांना अशा आचरणापासून प्रतिबंध केला जात असे. परम पूजनीय तेराव्या दलाई लामांनी त्यांच्या या प्रगतीचा पुरावा मागितला, तेव्हा सरकाँग दोर्जेचांग यांनी याकचं एक शिंग दोऱ्यात बांधलं आणि सादर केलं. याद्वारे खात्री पटलेल्या तेराव्या दलाई लामांनी सरकाँग दोर्जेचांग यांना या पातळीवरील आचरण करत असताना मठातील मालमत्ता ठेवायची परवानगी दिली. हे शिंग मूल असल्याप्रमाणे आपल्या घरात ठेवलं होतं, असा वस्तुस्थितीदर्शक उल्लेख रिंपोछे यांनी केला.

तेराव्या शतकातील भाषांतरकार मार्पा यांचा पुनर्जन्म सरकाँग दोर्जेचांग यांच्या रूपात झाला असल्याचं मोठ्या प्रमाणात मानलं जात होतं. याउलट सरकाँग रिंपोछे यांचा जन्म मात्र स्वतःच्या वडिलांचा वंश पुढे नेण्यासाठी झाला होता आणि त्यांच्या रूपात मार्पा यांचे प्रसिद्ध पुत्र दार्मा-दोदे यांचा पुनर्जन्म झाल्याचं मानलं जात होतं. पण माझ्याशी बोलतानाही रिंपोछे यांनी कधीही याचा उल्लेख केला नाही, किंवा कधीही त्यांनी स्वतःची वडिलांशी तुलना केली नाही. रिंपोछे याबाबतीत काहीही बोलले नसले, तरी त्यांचं स्वतःच्या सूक्ष्म ऊर्जा-वायूंवर नियंत्रण होतं आणि त्यांच्याकडे असाधारण शक्ती आहेत, हे त्यांच्या जवळच्यांना स्पष्टपणे कळायचं. रिंपोछे त्यांच्या इच्छेनुसार झोपी जात असत, त्यातून याचे काही संकेत मिळत. एकदा मॅडिसन, विस्कॉन्सिन इथे वैद्यकीय तपासणीचा भाग म्हणून रिंपोछे यांचा इलेक्ट्रोकार्डिओग्राम काढण्यात आला. तपासणीसाठी आडवं असताना रिंपोछे ऊर्जस्वल व सजक होते. पण डॉक्टरांनी त्यांना निवांत व्हायला सांगितल्यावर काहीच सेकंदांमध्ये ते घोरायला लागले होते.

रिंपोछे यांच्या इंद्रियेतर क्षमता

भविष्य जाणण्याच्या रिंपोछे यांच्या इंद्रियेतर क्षमता विविध दाखल्यांमधून दिसून येतात. रिंपोछे केवळ परम पूजनीय दलाई लामांच्या शिक्षकांपैकी एक नव्हते, तर वेळप्रसंगी ते परम पूजनीय दलाई लामांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांना, त्यांच्या मातेलाही प्रशिक्षण देत असत. शिष्टाचारानुसार औपचारिक वेळ घेतल्याशिवाय रिंपोछे कधीही त्या आदरणीय मातेला भेटायला जात नसत. परंतु, या आदरणीय मातेचं निधन होण्याच्या थोडं आधी, रिंपोछे यांना त्यांच्या अवस्थेचा अंदाज आला होता, त्यामुळे त्यांनी शिष्टाचार मोडून अनपेक्षितरित्या त्यांची भेट घेतली.

एकदा फ्रान्समधील लावौर इथे वज्रयोगिनी इन्स्टिट्यूटमध्ये रिंपोछे शिकवत होते आणि पॅरिसला जाण्यापूर्वी त्यांना काही दिवस विश्राम मिळणार होता. मला मित्रांना भेटण्यासाठी पुढे जायची इच्छा होती आणि कोणीतरी मला तिथे गाडीवरून सोडण्याचा प्रस्तावही दिला होता. रविवारी पॅरिसला जाण्याची परवानगी मागायला मी गेलो, तेव्हा रिंपोछे म्हणाले, “खूप छान, तुम्ही सोमवारी पॅरिसला जात आहात.” त्यावर मी उत्तरलो, “नाही, नाही. मी उद्या जातोय, रविवारी.” रिंपोछे पुन्हा म्हणाले, “खूप छान, तुम्ही सोमवारी जाताय.” मग मी त्यांना विचारलं, “रविवारी जायला काही अडचण आहे का? त्याऐवजी मी हा प्रवास पुढे ढकलून सोमवारी जाऊ का?” यावर रिंपोछे हसले आणि म्हणाले, “नाही, त्याने काही फारसा फरक पडत नाही.”

मग मी रविवारी पॅरिसकडे रवाना झालो. अर्ध अंतर पार करून आलो तेव्हा मधेच कार बंद पडली. रविवारी फ्रान्समध्ये गॅरेजं बंद असल्यामुळे आम्हाला ती रात्र एका लहान गावात काढावी लागली. सोमवारी सकाळी आम्ही कार दुरुस्त करून घेतली आणि रिंपोछे यांनी केलेल्या भविष्यकथनानुसार मी दुसऱ्या दिवशी, म्हणजे सोमवारी पॅरिसला पोचलो. 

दूरवरच्या गोष्टी पाहण्याची क्षमता रिंपोछे काही वेळा दाखवत असत. एकदा धर्मशाळा इथे, तुशिता रिट्रिट सेंटरच्या संचालकांनी रिंपोछेंना एका विधीमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी बोलावलं. जीप त्या केंद्राजवळ आली तेव्हा रिंपोछे म्हणाले, “पटकन चला! देवस्थानाच्या खोलीत पाहा! एक मेणबत्ती पडलेय!” संबंधित संचालक धावत आत गेले, तेव्हा तिला खरोखरच एक मेणबत्ती पडलेली दिसली आणि आग लागायला सुरुवात होणार होती.

लोकांशी असलेल्या कर्मजन्य नात्याचा प्रकार रिंपोछे यांना जाणवत असे, पण त्याचसोबत काहीही सांगितलेलं नसतानाही अनोळखी लोकांबाबत अनेक गोष्टी माहीत असल्याचं वेळप्रसंगी ते दाखवून देत असत. एकदा मॅडिसन, विस्कॉन्सिन इथे माझा एक जुना मित्र रिंपोछे यांना पहिल्यांदाच भेटायला आला. माझा मित्र अगदी सर्वसामान्यपणे वागत होता, आणि त्याने किंवा मी कोणीच रिंपोछेंना त्याच्या मॅरिजुआना ओढण्याच्या सवयीबद्दल बोललो नव्हतो, पण रिंपोछेंनी त्या मित्राला सांगितलं की, त्याने अंमली पदार्थांचं सेवन थांबवायला हवं. त्याने त्याच्या विकासाला बाधा पोचते आहे. रिंपोछे ज्या पाश्चात्त्य लोकांना भेटले, त्यातील फक्त माझ्या मित्रालाच त्यांनी मॅरिजुआनाबद्दल असा सल्ला दिला होता.

लोकांना स्वतःच्या कमतरता लक्षात याव्यात आणि त्यावर काम करता यावं यासाठी मदत करण्याचे कुशल मार्ग

इतरांना अडथळा ठरतील अशा त्यांच्या अनेक सवयी व प्रवृत्ती रिंपोछे यांना दिसत असत, पण लोकांना त्यांच्या चुका व त्रुटी दाखवून देण्याचे कुशल मार्ग ते कायम अनुसरत. एकदा, काही महिन्यांसाठी रिंपोछे नेपाळला होते, तेव्हा माझ्या कामामध्ये मला काही वैयक्तिक अडचणी येत होत्या. नंतर आम्ही बोधगयेला पुन्हा भेटलो, तिथे परम पूजनीय दलाई लामा यांच्या बोधिसत्व वर्तनाचं आचरण या विषयावरील प्रवचनाचं भाषांतर मी करत होतो. मी ज्या पद्धतीने काम हाताळतोय ते मूर्खपणाचं आहे असं थेट मला सांगण्याऐवजी रिंपोछे यांनी मी भाषांतरित करत असलेली संहिता पाहिली. त्याची पानं उलटत असताना त्यांनी अनेक शब्दांवर बोट ठेवून त्यांचा अर्थ विचारला. मला येणाऱ्या अडचणींशीच थेट संबंधित असे ते शब्द होते. रिंपोछे यांनी त्या शब्दांच्या पूर्ण अर्थछटा स्पष्ट करून सांगितल्या, आणि मला परिस्थितीवर उपाय करायचा मार्ग सूचित करून दाखवला.

एकदा एक श्रीमंत, वृद्ध स्विझ महिला रिंपोछे यांना टॅक्सीने झुरीचमधल्या एका झकपकीत, सर्वांत महागड्या डिपार्टमेन्ट स्टोअरमध्ये घेऊन गेली. रिंपोछे दुकानातून बाहेर पडले, तेव्हा त्यांना प्रत्यक्ष गरजेची अशी एकही वस्तू दुकानात नव्हती, अशी टिप्पणी त्यांनी केली. ही ट्रॉली परत तिच्या घरी घेऊन जाता येईल का, असं त्यांनी त्या महिलेला विचारलं. लोक सर्वसाधारणतः कसा प्रवास करतात हे बघणं मजेशीर असेल, असं ते म्हणाले. यावर शरमलेल्या त्या महिलेने सांगितलं की, आयुष्यात कधीच तिने या ट्रॉलीत बसून प्रवास केलेला नाही आणि ती कशी वापरायची, त्यातून कसं उतरायचं ते तिला माहीत नाही. अशा प्रकारे, सर्वसामान्य जीवनापासून ती किती दुरावलेय हे रिंपोछे यांनी सौम्यपणे दाखवून दिलं.

नंतर एकदा, झुरीचमधील एका प्रचंड मोठ्या महालात राहण्यासाठी रिंपोछे यांना निमंत्रित करण्यात आलं होतं, तेव्हा या इतक्या भपकेदार ऐषोआरामामध्ये घरातील महिलेला अतिशय अस्वस्थ वाटत होतं. ती साधेपणाने व नम्रतेने जगत होती. रिंपोछे यांना झोपण्यासाठी तिने ग्रंथालयातील खोली साफसूफ करून ठेवली. ओक झाडाच्या लाकडांनी तावदानं बनवलेली ही खोली घरातील सर्वांत दिमाखदार होती. रिंपोछे यांनी ती खोली एकदा पाहिली आणि त्याऐवजी पडवीत झोपण्याचा आग्रह धरला. आपल्याला तंबूत राहायला किती आवडतं, ते त्यांनी या महिलेला सांगितलं. त्या घराच्या पडवीतून बागेचा व खालच्या तळ्याचा उत्तम देखावा दिसत असे, म्हणून त्या पडवीत असताना तंबूत असल्यासारखं वाटत होतं, असं ते म्हणाले. अशा प्रकारे या महालातून मिळणाऱ्या काही साध्या सुखांची दखल घेण्यासाठी त्यांनी तिला सहाय्य केलं.

इतरांना मदत करण्यातील अष्टपैलूपणा

गरज असेल व शक्य असेल त्या मार्गाने रिंपोछे इतरांना मदत करत असत. इटलीतील पोमाया इथे संपत्ती मिळवण्याशी निगडित बौद्ध प्रतिमेच्या- पित ताराच्या- आचरणाचा दीक्षा समारंभ असताना रिंपोछे यांनी एका गरीब इटालियन कलाकाराला विधीसाठी या प्रतिमेचं चित्र रंगवायला सांगितलं. या कलाकाराला साधनेतून संपन्नतेचे लाभ मिळण्यासाठी आवश्यक बळकट कर्मजन्य दुवा या कृतीतून निर्माण करता येईल. नंतर दुसऱ्या एका केंद्रावर त्यांनी एका तरुणाला थोडे पैसे दान केले, त्या तरुणाच्या पालकांच्या घरावर नुकताच दरोडा पडला होता. त्यांच्या कुटुंबाला स्वतःची संपत्ती पुनर्स्थापित करण्यासाठी शुभारंभ म्हणून या दानाचा उपयोग करता येईल. तिबेटी शिकण्याच्या स्वचःच्या क्षमतेवर विश्वास नसलेल्या व रस नसलेल्या अॅलन टर्नर या एका जवळच्या ब्रिटिश शिष्याला रिंपोछे यांनी तिबेटी मुळाक्षरांचे तोंडी संप्रेषण दिले, जेकरून भविष्यात कधीतरी त्याचा ठसा उमटेल. मी तिबेटी भाषेचा अभ्यास करण्यासाठी एका पठारावर पोचलो, तेव्हा रिंपोछे माझ्यासोबत तिबेटी शब्दकोश वाचत होते आणि त्यातून प्रत्येक शब्दासह वाक्य लिहायची सूचना मला करत होते.

रिंपोछे एक अत्युत्कृष्ट मुत्सद्दी होते. कोणीही प्रामाणिकपणे काही दिलं तर ते स्वीकारावं, विशेषतः आपण नकार दिल्याने त्या व्यक्तीच्या भावना दुखावणार असतील आणि आपल्या स्वीकाराने त्या व्यक्तीची काही हानी होणार नसेल, तर नेहमी असा स्वीकार करावा. तर, रिंपोछे यांना गोड काही आवडत नसलं, तरी कोणी खास त्यांच्यासाठी केक भाजून आणला असेल तर ते त्याचा तुकडा उत्साहाने खात. किंबहुना, त्या व्यक्तीच्या आत्मविश्वाला बळकटी मिळणार असेल, तर हा केक कसा करायचा याची पद्धती लिहून घेण्याची सूचना ते नग्वांग यांना करत.

सर्वांत महत्त्वाचं म्हणजे रिंपोछे अतिशय खुल्या मनाचे व अष्टपैलू होते. त्यांना निमंत्रित करणाऱ्या बौद्ध केंद्राचा संप्रदाय- काग्यू, न्यिंग्मा, साक्य, गेलुग, झेन, किंवा थेरवाद- कोणताही असो, ते त्या विशिष्ट परंपरेच्या शैलीतून शिकवत असत. ही लवचिकता बौद्ध धर्माच्या सीमेबाहेरली विस्तारली जात असे. एकदा इटलीतील मिलान इथे एका कॅथलिक महिलेने त्यांना विचारलं, “आता मी आश्रय घेतला आहे, आणि बोधिचित्त व तांत्रिक पद्धतीच्या प्रतिज्ञा घेतल्या आहेत, तर मी चर्चमध्ये जाणं चुकीचं आहे का?” यावर रिंपोछे म्हणाले, “त्यात काही चूक नाही. दुसऱ्या धर्मातील प्रेम व करुणेच्या शिकवणुकीवर तुम्ही लक्ष केंद्रित केलंत, तरीही तुम्ही त्याच आश्रयाच्या व प्रतिज्ञेच्या दिशेने जात आहात, असंच होत नाही का?”

Top