सहा पारमिताः सहा व्यापक दृष्टिकोनांचे सिंहावलोकन

सहा व्यापक दृष्टिकोन अशा मनोवस्था आहेत, ज्या मुक्ती आणि ज्ञानप्राप्तीच्या दिशेने घेऊन जातात. क्रोध, लोभ, असूया, आळस अशा आपल्या मानसिक अडथळ्यांविरोधात त्या प्रतिरोधकासारखे कार्य करतात. सहा पारमिता एकत्रित येऊन जीवनातील कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आपल्याला सक्षम करतात. हे सहा दृष्टिकोन विकसित करून हळूहळू पण खात्रीशीरपणे आपण आपल्या क्षमतांबाबत जागृत होतो आणि आपल्यासोबत इतरांसाठीही सर्वोच्च लाभ मिळवू शकतो.

बुद्धांनी सहा मनोवस्था निर्देशित केल्या आहेत. आपल्या जीवनातील रचनात्मक उद्दिष्टांच्या प्राप्तीची इच्छा असल्यास त्या मनोवस्था विकसित करण्याची गरज आहे. त्यांचे भाषांतर सामान्यतः ‘परिपूर्णता’ असे केले जाते. त्यांच्या परिपूर्तीतून बुद्धांप्रमाणे आपणही मुक्ती आणि ज्ञानप्राप्ती मिळवू शकतो. मला त्यांना त्यांच्या पारमिता या संस्कृत संज्ञेनुसार  ‘सहा व्यापक दृष्टिकोन’ असे संबोधावे वाटते, कारण त्यांच्यासोबत आपण आपल्या दुःखांचा समुद्र पार करू शकतो. 

आपण या सहा मनोवस्थांना केवळ दिखाव्याखातर सजावटीचे सामान म्हणून पाहत नाही. उलट आपण त्यांना एकत्रित करून आपल्या दैनंदिन जीवनात त्यांचा वापर करतो. लाम-रिममध्ये (श्रेणीबद्ध मार्ग) आढळणाऱ्या तीन प्रेरणादायी ध्यानसाधनांप्रमाणे त्यांचा आपल्या जीवनात अंगीकार केल्यास आपणांस ते अत्यंत उपयुक्त ठरतेः

  • त्या आपल्याला समस्यांपासून बचावासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी सक्षम बनवतात. 
  • त्या तणावदायी भावना आणि मनोवस्थांपासून मुक्ती मिळवण्यासाठी मदत करतात. 
  • त्या आपल्याला इतरांची मदत करण्यासाठी सक्षम करतात. 

हे सकारात्मक दृष्टिकोन विकसित करत असताना आपण वरील उद्दिष्टांपैकी एक किंवा अधिक उद्दिष्ट्ये मनात बाळगायला हवीत. त्यातून आपल्याला ती अधिक सक्षम करण्यासाठी कार्यरत राहण्याची प्रेरणा मिळते. 

. औदार्य (दानपारमिता)

इतरांच्या गरजा पुरविण्यासाठी जो जे वांछिल, ते ते देण्याची इच्छा बाळगणे म्हणजे औदार्य. त्याचे लाभ खालीलप्रमाणे आहेतः 

  • यातून आपल्यात आत्मसन्मानाची भावना जागृत होईल, की आपल्याकडे इतरांना देण्याजोगे काहीतरी आहे आणि ते आपल्याला आत्मवंचना आणि निराशा टाळण्यासाठी  किंवा दूर करण्यासाठी साहाय्यक ठरेल. 
  • दानशूरपणा आपल्याला आसक्ती, कृपणता आणि लोभासारख्या वारंवार समस्या उत्पन्न करणाऱ्या अस्वस्थ मनोवस्थांतून मुक्त होण्यासाठी साहाय्यक ठरेल.  
  • गरजू लोकांसाठीही ते लाभकारक ठरेल. 

. नैतिक स्वयंशिस्त (शीलपारमिता)

विध्वंसक वर्तनांच्या दुष्परिणामांची जाणीव होऊन स्वतःला अशा वर्तनापासून रोखणे म्हणजे नैतिक स्वयंशिस्त. त्याचे लाभ खालीलप्रमाणे आहेतः  

  • विध्वंसक वर्तन, वाणी आणि विचारातून उद्भवणाऱ्या सर्व समस्यांपासून दूर राहण्यासाठी आपल्याला नैतिक स्वयंशिस्त साहाय्यक ठरते. त्यातून इतरांना आपल्याप्रति विश्वास वाटतो, जो खऱ्या मैत्रीच्या नात्याचा पाया असतो. 
  • बंधनकारक नकारात्मक वर्तनावर विजय मिळवण्यासाठी, आत्मनियंत्रण विकसित करण्यासाठी व अधिक शांत, स्थिर चित्त विकसित करण्यासाठी साहाय्यक ठरते. 
  • इतरांना इजा पोहचवण्यापासून आपल्याला परावृत्त करते.

. संयम (क्षांतीपारमिता)

क्रोधित किंवा निराश न होता कठीण परिस्थितीचा सामना करण्याची क्षमता म्हणजे संयम होय. त्याचे लाभ खालीलप्रमाणे आहेतः 

  • चुकीच्या गोष्टी घडल्या किंवा आपल्याकडून वा इतरांकडून चुका घडल्यास आपल्याला दंगा घालण्यापासून दूर ठेवण्यास संयमाची मनोवस्था साहाय्यक ठरते. 
  • संयम आपल्याला क्रोध, अधिरता आणि असहिष्णुता सारख्या तणावदायी मनोवस्थांना नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो. आपण कोणत्याही कठीण परिस्थितीत शांत राहू शकतो. 
  • संयमामुळे आपल्याला इतरांच्या भल्यासाठी मदत करता येते. इतरांनी आपला सल्ला न ऐकल्यास, चुका केल्यास, अविवेकी वर्तन केल्यास वा अविवेकी बोलल्यास आणि आपल्यासाठी अडचणी निर्माण केल्यास आपण त्यांच्यावर रागवत नाही. 

. चिकाटी/धैर्य (वीर्यपारमिता)

निरुत्साही न होता कठीण परिस्थितीचा सामना करत अखेरपर्यंत प्रयत्नरत राहणे म्हणजेच धैर्य होय. त्याचे लाभ खालीलप्रमाणे आहेतः

  • आपण जे काम हाती घेतले आहे, ते निराश न होता शेवटापर्यंत नेण्यासाठी धैर्य आपल्याला बळ देते. 
  • हे आपल्याला अपुरेपणा आणि चालढकल करण्याच्या आळशीपणाच्या भावनांना नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. अशा भावनांकडून लक्ष हटविण्यासाठी आपण क्षुद्र गोष्टींमध्ये स्वतःला व्यग्र ठेवत असतो. 
  • यामुळे आपणास कठीणातल्या कठीण कामात यश प्राप्त करण्यास मदत मिळते आणि हे आपल्याला अशा लोकांच्या मदतीसाठीही साहाय्यक ठरते, ज्या लोकांमध्ये सुधारणा घडविणे कठीण असते. 

. मानसिक स्थैर्य/एकाग्रता (ध्यानपारमिता)

मानसिक स्थैर्य किंवा एकाग्रता अशी मनोवस्था असते, जी मानसिक भरकट, मरगळ किंवा निराशेपासून पूर्णतः मुक्त असते. याचे लाभ खालीलप्रमाणे आहेतः 

  • मानसिक स्थैर्य आपल्याला आपण जे काही करत असू त्यावर ध्यान केंद्रित ठेवायला मदत करते, जेणेकरून आपल्याकडून चुका किंवा अपघात घडणार नाहीत. 
  • तणाव, चिंता, अतिउत्साह, भावनिक उद्विग्नता अशा समस्यांपासून मुक्त होण्यासाठी साहाय्यक ठरते. 
  • मानसिक स्थैर्य इतर लोक काय बोलत आहेत आणि त्यांचे वर्तन कसे आहे, यावर ध्यान केंद्रित करू देते, जेणेकरून आपण त्यांची अधिक चांगल्या रीतीने मदत करू शकू. 

. विवेकी जागरूकता/शहाणीव (प्रज्ञापारमिता)

विवेकी जागरूकता अशी मनोवस्था आहे, जी योग्य-अयोग्य आणि चूक व बरोबरदरम्यानचा फरक नेमकेपणाने ओळखते. तिचे लाभ खालीलप्रमाणे आहेतः 

  • एखाद्या विशिष्ट स्थितीत काय करावे, कसे वागावे, याचे विवेकी जागरूकता स्पष्ट आकलन करून देते, जेणेकरून नंतर पश्चाताप होईल असे वर्तन आपल्याकडून घडणार नाही.  
  • अनिश्चितता आणि गोंधळाच्या अवस्थेपासून मुक्त होण्यास मदत करते. 
  • इतरांच्या स्थितीचे नेमके मुल्यमापन करण्यास मदत करते, जेणेकरून आपण अधिक चांगल्या रीतीने त्यांच्याशी बोलू शकू आणि त्यांच्या भल्यासाठी मदत करू शकू. 
Top