वसुंधरा दिनानिमित्त परमपूज्य दलाई लामा यांचा संदेश

Sb nasa earth

५० व्या वसुंधरा दिनी, आपला ग्रह इथल्या जनतेच्या आरोग्यासाठी नुकसानदायी ठरलेल्या सर्वात मोठ्या आव्हानाचा सामना करत आहे. आणि म्हणूनच या संकटकाळी आपण करुणा आणि परस्पर सहकार्याच्या मूल्यांची पुनर्उजळणी करत आहोत. जागतिक महामारीच्या या सद्यस्थितीने जातधर्म, संस्कृती आणि लिंग भेदाशिवाय सबंध जगाला भयग्रस्त केले आहे, या परिस्थितीत आपली प्रतिक्रिया ही सर्वांच्या गरजांच्या पूर्ततेसाठी पूरक अशी मानवतावादी असायला हवी.   

आपल्याला आवडो ना आवडो, आपण या धरेवर एकाच कुटुंबाचा घटक म्हणून जन्माला आलो आहोत. गरीब असो वा श्रीमंत, शिक्षित असो वा अशिक्षित, किंवा कोणत्याही देशाचा नागरिक असो, शेवटी आपल्यापैकी प्रत्येक जण एकमेकासारखा मानवी जीव आहे. पुढे जाऊन मी म्हणेन, आपल्या सर्वांना सुखप्राप्तीचा आणि दुःख टाळण्याचा समसमान हक्क आहे. जेव्हा आपल्याला या समतेच्या मूल्याची जाणीव होईल, तेव्हा आपोआप आपल्याला एकमेकाप्रति आपुलकी आणि सहानुभूतीची भावना जाणवेल. या भावनेतून अर्थातच इतरांची त्यांच्या समस्यातून मुक्तता व्हावी, यासाठी सक्रिय मदत करण्याची इच्छा बाळगण्याच्या वैश्विक जबाबदारीची भावना जन्मास येते.

आपली धरणीमाता आपल्याला वैश्विक जबाबदारीचे धडे देत आहे. हा निळा ग्रह आनंददायी वसतीस्थान आहे. त्याचे जीवन हेच आपले जीवन आहे, त्याचे भविष्य आपले भविष्य आहे. खरंच पृथ्वी आपल्या सर्वांची आईसारखीच काळजी घेते; आणि तिची मुले असल्याने आपण तिच्यावर अवलंबून आहोत. सध्या आपण ज्या जागतिक संकटातून जात आहोत, आपण सर्वांनी एकत्रित येऊन यावर काम करणे आवश्यक आहे.

मी १९५९ साली तिबेटमधून सुटका करून घेतल्यानंतर मला खऱ्या अर्थाने पर्यावरणाचे महत्त्व समजले. तिथे आम्ही कायम शुद्ध वातावरणात असल्याचे समजत होतो. तिथे पाण्याचा कुठलाही एखादा प्रवाह पाहिला तरी तो पिण्यासाठी सुरक्षित आहे की नाही, याची चिंता करावी लागत नव्हती. पण दुर्दैवाने आज जगभर पिण्यायोग्य स्वच्छ पाणी मिळणेही अशक्य झाले आहे. 

आजारी लोक आणि शूर आरोग्य सेवकांना मूलभूत गरज असणाऱ्या स्वच्छ पाण्याचा पुरवठा आणि रोगांचा अनियंत्रित प्रसार रोखण्यासाठी योग्य आरोग्यविषयक सुविधा पुरवल्या जायल्या हव्यात, याची आपण खबरदारी घ्यायला हवी. स्वच्छता हा परिणामकारक आरोग्य सेवांचा पाया आहे.

आपल्या ग्रहाला सध्या सतावत असणारे साथीचे आव्हान रोखण्यासाठी चांगल्या आरोग्यसेवा आणि अद्ययावत वैद्यकीय उपकरणांचा सातत्यपूर्ण पुरवठा उपयुक्त ठरेल. भविष्यातील आरोग्यविषयक समस्यांसाठीही हा प्रबळ बचावात्मक उपाय ठरेल. आणि मला जाणीव आहे की संयुक्त राष्ट्रसंघाची शाश्वत विकासत्मक उद्दिष्टे ठरविली जात असताना अशा जागतिक आरोग्यविषयक समस्यांचा सामना करण्यासाठीच्या उद्दिष्टांचा नक्कीच यात अंतर्भाव केला गेला असेल.

या संकटाचा एकत्रितपणे सामना करत असताना, आपल्या जगभरच्या कमनशिबी बंधुभगिनींच्या गरजांचा विचार करून आपण एकजुटीने आणि सहकार्याने याबाबत कार्य करायला हवे. मला आशा आहे आणि मी अशी प्रार्थनाही करतो की आगामी काळात आपल्यातील प्रत्येक जण अधिक सुखी आणि आरोग्यदायी जगाच्या निर्मितीसाठी शक्य ते कार्य करू.

दलाई लामा

२२ एप्रिल २०२०

Top