कोरोना व्हायरसबाबत दलाई लामा यांचे मतः केवळ प्रार्थना पुरेशी नाही

आपल्याला करुणेच्या आधारे कोरोना व्हायरसशी लढा द्यावा लागणार आहे

Studybuddhism dalai lama oaa

काही वेळा माझे मित्र मला एखाद्या ‘जादुई शक्ती’ने जागतिक समस्यांशी लढायला मदत करण्याविषयी सुचवतात. मी त्यांना नेहमी सांगतो की दलाई लामांकडे जादुई शक्ती नाही. माझ्याकडे तशी शक्ती असती तर मी स्वतः पायदुखी किंवा घसादुखीसारख्या वेदना अनुभवल्या नसत्या. आपण सर्वच मनुष्य आहोत, आणि सर्व जण एकसारखीच भीती, आशा आणि अनिश्चिततेची भावना अनुभवत असतो.

बौद्ध दृष्टिकोनातून पाहिल्यास प्रत्येक संवेदनशील जीव वेदना, आजारपणाचे वास्तव, वृद्धत्व आणि मृत्युच्या जाणिवेशी परिचित असतो. पण माणूस म्हणून आपल्याजवळ क्रोध, भय आणि लोभाच्या भावनांवर विजय मिळवण्यासाठी मानसिक क्षमता असतात.  क्रोध किंवा भयाविषयीच्या भ्रमाच्या भावनेशिवाय वास्तवाकडे नितळ दृष्टिकोनातून पाहण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून अलीकडच्या वर्षात मी ‘भावनिक शस्त्रसंन्यास’ या संकल्पनेचा विचार करतो आहे. समस्येवर उपाय असेल तर आपण निश्चितच तो शोधण्यासाठी प्रयत्न करायला हवेत; पण उपाय नसेल तर त्याबाबत विचार करण्यात वेळेचा अपव्यय करणे योग्य नाही.

आम्हा बौद्ध लोकांची धारणा आहे की सर्व जग परस्परावलंबी आहे. म्हणूनच मी सातत्याने जागतिक जबाबदारी विषयी बोलत असतो. या भयानक कोरोना व्हायरसच्या उद्रेकाने दाखवून दिले आहे की एका व्यक्तीच्या आयुष्यातील एखादी घटना इतर जिवांवरही लगेचच कशी परिणाम करू शकते. पण सोशल डिस्टन्सिंग पाळणे किंवा इस्पितळात सेवा बजावणे, या सारख्या करुणादायी किंवा विधायक कृतींमध्ये इतरांना साहाय्यक ठरण्याच्या किती क्षमता असू शकतात, याचीही या निमित्ताने पुन्हा जाणीव होते आहे. 

वुहानमधील कोरोना व्हायरससंदर्भातील वृत्त आल्यापासून मी चीनसोबतच जगभरच्या माझ्या बंधुभगिनींसाठी प्रार्थना करतो आहे. आपण पाहू शकतो की सध्यातरी कोणीच या व्हायरसशी लढण्यासाठी प्रतिकारक्षम नाही. आपण सर्वच आपल्या प्रियजनांबाबत आणि आपल्या भविष्याबाबत (जागतिक अर्थव्यवस्था आणि आपले व्यक्तिगत आयुष्य दोन्हीच्या भविष्याबाबत)चिंतित आहोत. पण त्यासाठी प्रार्थना पुरेशी नाही.

या संकटाने दाखवून दिले आहे की प्रत्येकाने शक्य तितकी जबाबदारी उचलणे आवश्यक आहे. या काळात परिस्थिती पालटण्यासाठी  आणि भविष्यातील धोके टाळण्यासाठी वैद्यकीय चिकित्सक आणि परिचारिका प्रायोगिक विज्ञानाच्या मदतीने उपचार पद्धती अवलंबून अनोखे धैर्य दाखवत आहेत, त्यासाठी आपण एकजुटीने साहाय्य करायला हवे.

या भयावह कालखंडात, आपण संपूर्ण विश्वासमोरील दीर्घकालीन आव्हानांचा आणि क्षमतांचा विचार करण्याची गरज आहे. अवकाशातून टिपलेली छायाचित्रे स्पष्टपणे दर्शवतात की आपल्या या निळसर ग्रहावर वास्तविक कोणत्याही सीमा नाहीत. त्यामुळे आपण सर्वांनीच याची काळजी घ्यायला हवी आणि पर्यावरणीय बदल व इतर विनाशकारी शक्तींचा सामना करण्यासाठी एकत्रितपणे काम करायला हवे. ही महामारी धोक्याची घंटा आहे, जी सुचित करते की आपल्यासमोरील आव्हानांचा सामना करण्यासाठी एकजुटीने संघटित रित्या जागतिक कृती कार्यक्रमातूनच अभूतपूर्व परिणाम साधणे शक्य आहे. 

कोणीच वेदनेपासून मुक्त नसते, याची जाणीव ठेवून आपण निराधार आणि कौटुंबिक आधार नसणाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी मदतीचा हात पुढे करायला हवा. या संकटाने आपण एकमेकांपासून भिन्न नसल्याचे दाखवून दिले आहे - जरी आपण वेगवेगळे राहत असलो तरी. त्यामुळे आपल्या सर्वांवरच करुणा आणि परोपकारी भाव बाळगण्याची जबाबदारी आहे.

एक बौद्ध या नात्याने माझा नश्वरतेच्या तत्त्वावर विश्वास आहे. जसे मी माझ्या आयुष्यात युद्ध आणि इतर भयानक घटना सरून गेलेल्या पाहिल्या आहेत, तसेच कालांतराने हा व्हायरसही निघून जाईल. आणि आपण यापूर्वीही अनेक संकटांवेळी स्वतःला सिद्ध केल्याप्रमाणे पुन्हा एकदा आपल्याला जागतिक समुदायाच्या पुनर्निर्माणाची संधी मिळेल. मला आशा आहे की, प्रत्येक जण सुरक्षित आणि शांत राहू शकतो. या कठीण परिस्थितीत आपण आशा हरवून बसता कामा नये आणि अनेक जण हे संकट थोपवण्यासाठी जी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत, त्यांच्या विधायक कामावरील विश्वास ढळू देता कामा नये.

Top