चौथं आर्य सत्य: सत्य मार्ग

खऱ्या दुःखाची खरी कारणं खऱ्या अर्थाने संपुष्टात आणण्यासाठीची खरा मार्ग म्हणजे शून्यत्वाचा असांकल्पनिक बोध. शून्यत्व (निर्वातता) म्हणजे आपण स्वतःच्या, इतरांच्या व सर्व घटितांच्या अस्तित्वाविषयी जे सत्य असल्याची चुकीची कल्पना करून घेतो त्या संदर्भातील सर्व गोष्टींचा संपूर्ण अभाव होय. शून्यत्वाचा असांकल्पनिक बोध हा मनाचा सत्य मार्ग आहे, कारण दुःखाची कारणं खऱ्या अर्थाने थांबवण्यासाठीचा मार्ग म्हणून कार्यरत असतो.

पहिली तीन आर्य सत्यं

आपण दुःखाचे व असमाधानी सुखाचे चढ-उतार टिकवून ठेवतो, तसंच या चढ-उतारांचा अनुभव ज्या मर्यादित शरीराद्वारे व मनाद्वारे घेतलेला असतो ते शरीर व मनही वारंवार मिळवत राहतो, हे आपल्या समोरचं खरं दुःख आहे, अशी शिकवण बुद्धाने दिली. आपण आणि या भावना कशा अस्तित्वात असतात याबद्दलचा आपला अजाणपणा, हे यामागील खरं कारण आहे. या भावना अशक्य मार्गांनी अस्तित्वात असल्याचं आपण मानतो- उदाहरणार्थ, त्यांना स्वयंपूर्ण ठोस अस्तित्व असल्याचं आपल्याला वाटतं- आणि आपल्याला ते ज्या फसव्या पद्धतीने सामोरे येतात तशाच पद्धतीने ते प्रत्यक्षात अस्तित्वात असतात असं आपण मानतो. या गैरसमजुतीमुळे अस्वस्थकारक भावना निर्माण होतात, आणि त्यातून पुन्हा आपण ‘स्वतः’ची जी कल्पना केलेली असते तिचं प्रतिपादन करणं वा तिचा बचाव करणं यासाठीच्या कर्मजन्य प्रेरणा वाढीला लागतात, पण वास्तविक हे निव्वल भ्रम सतात. आपल्या मृत्यूच्या वेळी या गैरसमजुतींमुळे मर्यादित शरीर व मर्यादित मन यांद्वारे सांसारिक जीवन सुरू  राहतं.

परंतु, खरी कारणं, आणि खरं दुःख पुन्हा कधीच उद्भवणार नाही अशा रितीने संपुष्टात आणणं शक्य आहे, असा साक्षात्कार बुद्धाला झाला आणि त्याने त्याची शिकवण दिली. असा खऱ्या अर्थाने दुःखाची कारणं थांबवणारा निरोध म्हणजे चौथं आर्य सत्य.

अजाणपणा कायमचा नष्ट करण्याचा सत्य मार्ग म्हणजे अचूक आकलन

सर्वसाधारणतः आपण दुःखाची, असमाधानकारक सुखाची किंवा शून्यत्वाची भावना अनुभवतो, तेव्हा आपण त्यातून काहीतरी असाधारण व ठोस निर्माण करतो आणि ते चिरकाल टिकेल अशी कल्पना करतो. पण अर्थातच आपण अनुभवतो त्या भावनांमधील काहीच विशेष नसतं- या सर्व भावना अचल व अशाश्वत असतात. या भावना जितका काळ टिकून असतात तितका काळ त्या बदलत राहतात आणि अखेरीस त्या नैसर्गिकरित्या संपुष्टात येतात. या वस्तुस्थितीची आपल्याला जाणीव नसते, आपण त्या उलट विचार करत असतो, त्यामुळे ‘या सुखापासून माझी कधीही फारकत होऊ नये असं मला वाटतं; हे किती भारी आहे’ किंवा ‘हे दुःख माझ्यापासून दूर जायला हवं; हे किती भयंकर आहे, मला हे सहन होत नाही’ किंवा ‘कधीच कशाचा ऱ्हास न होण्याची ही भावना मला हवी आहे; किती सुटल्यासारखं वाटतं’, असं आपल्या डोक्यात उच्चारवात ओरडलं जात असतं, त्याने आपण फसतो. ‘मी, मला, माझं’ याबद्दलची ही ओढ ‘मी’ला एक ठोस अस्तित्व देते, त्यातून अस्वस्थकारक भावना व अनिवार्य वर्तन सुरू होतं आणि आपलं खरं दुःख टिकून राहतं.

आपण ‘मी’ म्हणून- शरीर व मन यांच्याहून स्वतंत्र, स्वयंपूर्णरित्या आणि तुमच्या मनातील आवाजाच्या- एखाद्या ठोस रूपात अस्तित्वात आहे, असं आपल्याला का वाटतं, असा प्रश्न स्वतःला विचारा. ‘तसं जाणवतं, म्हणून मला तसं वाटतं’ असं तुम्ही यावर म्हणणार असाल, तर परत स्वतःला विचारा, ‘मला तसं वाटतं’ हे एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवण्यासाठी पुरेसं कारण आहे का? आपण एखाद्या कल्पनेवर, विशेषतः स्वतःविषयीच्या कल्पनेवर विश्वास ठेवतो आणि ‘मला तसं वाटतं’ एवढाच त्याचा आधार असतो, तेव्हा आपल्याला त्याबद्दल असुरक्षित का वाटत राहतं? कारण, आपल्या गैरसमजुतीला पाठबळ पुरवणारं काहीच नसतं; त्याला तथ्य किंवा विवेक यांचं पाठबळ नसतं.

सुख, दुःख किंवा आपण पाहताना, ऐकताना, वास घेताना, चव घेताना, शारीरिकदृष्ट्या काही जाणवून घेताना किंवा विचार करताना जो काही अनुभव घेतो त्यात काहीच विशेष नसतं, ही वस्तुस्थिती आहे. यातील काहीच नंतर हाती उरत नाही. यातील कोणताही अनुभव पकडून ठेवायचा प्रयत्न करणं म्हणजे ढग पकडायचा प्रयत्न करण्यासारखं असतं- ते पूर्णतः निष्फळ ठरतं. ‘मी’मध्ये आणि मला या क्षणी जे वाटतं त्यात काहीही विशेष नसतं. कायम स्वतःच्या मनासारखं हवं असं वाटणाऱ्या आणि मनातल्या मनात त्याबद्दल बोलणाऱ्या स्वयंपूर्ण ठोस अस्तित्वाच्या रूपात आपण जगत नसतो. आपण अस्तित्वात असतो, पण आपल्याला वाटतं तशा गैरसमजुतीमधील अशक्य मार्गांनी अस्तित्वात नसतो. निव्वळ तसं जाणवतं आणि ‘मला तसं वाटतं’ म्हणून तसं असतंच असं नाही.

स्वतःविषयीच्या या गैरसमजुतीपासून व संदिग्ध धारणेपासून स्वतःला मुक्त करण्यासाठी आपल्याला एका विरोधकाची गरज असते, जो या गैरसमजुती पूर्णतः पुसून टाकतो. आपलं मन शांत केल्याने आणि आपल्या मनातील असे विचार काढून टाकल्याने तात्पुरती संदिग्धता दबली जाईल, पण ती पुन्हा उद्भवण्यापासून मात्र रोखता येत नाही. आपल्या खऱ्या समस्यांच्या या खऱ्या कारणाला खरोखर थांबवायचं असेल, तर आपल्या अजाणतेपणाच्या पूर्णतः विरोधी असलेली मनस्थिती अंगीकारणे हा खरा मार्ग आहे. अजाणपणाविरोधात जागरूकता असते. तर, आपण कशाविषयी जागरूक राहायला हवं? आपण स्वयंपूर्ण रूपात अस्तित्वात असतो, ही गैरसमजूत दूर करण्याचं काम, अशी काही गोष्ट नसल्याच्या असांकल्पनिक बोधाद्वारे होतं. यामध्ये शून्यत्वाचा असांकल्पनिक बोध महत्त्वाचा असतो, केवळ आपल्याला अगदी अचूक वाटणाऱ्या शून्यत्वाच्या एखाद्या कल्पनेवर सांकल्पनिक लक्ष केंद्रित करून चालत नाही. आपली चुकीची धारणा सत्य नव्हती, ती वास्तवाशी सुसंगत नाही, अशी विवेक आणि असांकल्पनिक अनुभव यांच्यावर आधारलेली जागरूकता असेल तरच ‘मला तसं वाटतं’ एवढ्याच आधारावरची चुकीची समजूत संपुष्टात येते. कारण, अजाणतेपणाची प्रवृत्ती व सवयी खोलवर रुजलेल्या असतात, त्यामुळे गैरसमजुतीच विरून जाण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्यात पार पडते.

सत्य मार्गाचे चार पैलू

शून्यत्वाच्या असांकल्पनिक बोधासोबत येणाऱ्या भेदक्षम जागरूकतेच्या (शहाणीव) माध्यमातून हा सत्य मार्ग समजून घेता येतो, असं बुद्ध सांगतो. काय खरं आहे व काय खोटं आहे, यातील भेद या मानसिक घटकाद्वारे केला जातो.

  • एक, ही भेदक्षम जागरूकता मनाला मार्ग दाखवते, त्यातून अजाणतेपणाच्या विविध पातळ्या विरून जातात व पूर्णतः संपुष्टात येतात. सुरुवातीला त्यातून आपला अजाणपणा व आपली संदिग्धता पूर्णतः संपुष्टात येते. आपल्या पालकांनी व समाजाने आपल्यात रुजवलेल्या धारणा व मूल्यांच्या भिन्न व्यवस्था शिकणं व स्वीकारणं, यांवर आधारित अजाणतेपण व संदिग्धता यामुळे पूर्णतः दूर होते. व्यावसायिक जाहिराती व समाजमाध्यमं यांमुळे रुजलेल्या धारणांचाही यात समावेश असतो.

    समाजमाध्यमांवर इतर लोकांचे सेल्फी चांगले दिसत असल्याचं आणि ते आनंदात वेळ घालवत असल्याचं तुम्ही पाहता, तेव्हा तुम्ही कसं दिसायला हवं आणि तुमचं आयुष्य कसं असायला हवं, याबद्दलच्या तुमच्या संकल्पनेवर त्याचा परिणाम कसा होतो? यातून तुम्हाला चांगलं की वाईट वाटतं? त्या पोस्टचा वास्तव जीवनावर परिणाम होत नाही ही भेदक्षम जागरूकता असेल तर, समाजमाध्यमांवरील पोस्टचा आपल्यावर परिणाम होतो ही गैरधारणा दूर सारण्याचा मार्ग आपल्याला सापडतो. परिणामी, अशा गैरधारणेतून निर्माण झालेलं दुःख व निराशा यांपासून आपण कायमचे मुक्त होतो.

    या पहिल्या पावलानंतर आपण ‘आर्य’ होतो, तेव्हा ही भेदक्षम जागरूकता आपल्याला आपोआप उद्भवणाऱ्या अजाणतेपणापासून टप्प्याटप्प्याने मुक्त करते. उदाहरणार्थ, आपल्या मनातून जवळपास सतत येणाऱ्या आवाजामागे ‘मी’ असं काही शोधता येणारं, ठोस रूप आहे, या धारणेपासून आपण मुक्त होतो. यातून आपल्याला मुक्ती मिळते व अखेरीस साक्षात्कार प्राप्त होतो. शून्यत्वाची भेदक्षम जागरूकता आपल्याला खऱ्या दुःखाच्या खऱ्या कारणांपासून कायमचं मुक्त करते, हे आपल्याला कळतं तेव्हा त्यातून मुक्त होण्याचा काहीही मार्ग नाही ही गैरसमजूतसुद्धा दूर होते.
  • दोन, ‘मी’ असं काही स्वयंपूर्ण, ठोस रूप नसतं, या भेदक्षम जागरूकतेच्या योग्य साधनाद्वारे असं रूप अस्तित्वात असतं ही गैरधारणा व अजाणतेपणा कायमचा संपुष्टात आणता येतो. कारण, या दोन समजुती पूर्णतः परस्परविरोधी असतात. अशी गोष्ट अस्तित्वात आहे आणि अशी गोष्ट अस्तित्वात नाहीये, या दोन्हीवर तुम्ही एकाच वेळी विश्वास ठेवू शकत नाही, हो ना? खऱ्या अर्थाने या समजुतीपासून फारकत घेण्यासाठी भेदक्षम जागरूकतेचा मार्ग अयोग्य आहे, ही गैरसमजूत या मुद्द्याद्वारे खोडली जाते.
  • तीन, शून्यत्वाबाबतची भेदक्षम जागरूकता आर्य व प्रबुद्ध होण्याच्या प्रक्रियेतील एक टप्पा आहे. एकाग्रतेची सखोल स्थिती प्राप्त करणे हा आर्य व प्रबुद्ध होण्याचा मार्ग आहे, या गैरसमजुतीसुद्धा हा मुद्दा प्रत्युत्तर देतो.
  • अखेरीस, अस्वस्थकारक भावना, तसंच आपल्या मुक्तीला व प्रबुद्ध होण्याला अडथळा ठरणाऱ्या प्रवृत्ती व सवयी कायमस्वरूपी काढून टाकण्याचे साधन म्हणजे ही भेदक्षम जागरूकता. हे आपल्या मनाच्या स्वरूपाचे भाग आहेत आणि ते कधीही पूर्णतः काढून टाकता येणार नाही, या गैरसमजुतीला यातून उत्तर मिळते.

सारांश

शून्यत्वाचा असांकल्पनिक बोध, त्यामागील निर्धारक भेदक्षम जागरूकता, यांसह सिद्ध झालेल्या मनाचा मार्ग हा खऱ्या दुःखाची खरी कारणे पुसणारा विरोधक असतो. एकदा हा खरा मार्ग साध्य झाल्यावर प्रत्येक जीवनात येणाऱ्या खऱ्या दुःखामागील खरी कारणे म्हणजेच मनातील अजाणपणा व गैरसमजुती टप्प्याटप्प्याने दूर होतात.

Top