बुद्धिजम म्हणजे काय ?

Study buddhism what is buddhism

बुद्धिजम हा विशिष्ट कार्यपद्धतींचा गट आहे. ज्याद्वारे सत्याचं मूळ रूप समजून घेत संभाव्य मानवी क्षमता विकसित करणं शक्य आहे.

सिद्धार्थ गौतमानं (जो सर्वदूर बुद्ध म्हणून ओळखला जातो) २५०० वर्षांपूर्वी बौद्ध धर्माची स्थापना केली. बौद्ध धर्म आशिया खंडात विस्तारत गेला. आणि आज तो जगातला चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म आहे. बुद्धानं आयुष्यभर आत्मानुभूतीतून लाभलेल्या ‘ज्ञानप्राप्ती’च्या मार्गांची शिकवण दिली. ज्यामुळं इतरांना स्वतःतल्या ऊर्जेची अनुभूती येऊन त्यांना स्वतःला ‘बुद्ध’ होण्याची प्रेरणा मिळू शकते. एकीकडं गौतम बुद्धाला प्रत्येकाच्या ‘बुद्ध’ होण्याच्या समान क्षमतांची जाणीव होती, तर दुसरीकडं लोकांच्या प्राथमिकता, त्यांच्या रुची आणि बुद्धिमत्ता या घटकामुळे येणारं वैविध्यही समजत होतं. या वैविध्याचा सन्मान राखत, एखाद्याच्या मर्यादांना मात देत त्याच्यातल्या पूर्ण क्षमतांची जाणीव करून देणाऱ्या मार्गांची शिकवण त्यानं दिली.

बौद्ध धर्म स्वीकारलेल्या अनेक संस्कृतींमध्ये भिन्न घटकांवर भर देण्यात आला आहे. त्यामुळे भिन्न संस्कृतीतलं बौद्ध धर्माचं स्वरूप वेगवेगळं असलं, तरी त्यातली मूलभूत शिकवण एकच आहे.

बौद्ध धर्माची मूलभूत शिकवण- चार आर्य-सत्य

भगवान बुद्धाची मूलभूत शिकवण ‘चार आर्य-सत्य’ म्हणून ओळखली जाते. ही चार सत्ये म्हणजेच सामान्यतः सजिवांच्या आयुष्यात अनुभवाला येणारे चार सत्य वा वास्तव घटक आहेत.

पहिले आर्य-सत्य - खरी दुःखे

प्रत्येक सजिवाच्या आयुष्यात आनंदाचे अगणित क्षण असतात, पण एखादा छोटा कीटक, निराधार मनुष्य किंवा लक्षाधीश असला तरी त्याला अनेक दुःखांचाही सामना करावा लागतो. जन्म-मृत्यूच्या प्रवासादरम्यान आपण म्हातारे होतो,आजारी पडतो. आपल्या प्रियजनांचे मृत्यू ओढवतात. आपण तणाव आणि निराशेला सामोरे जातो. कधी अपेक्षित असणारं काही मिळत नाही, तर कधी अनपेक्षित समस्या समोर येतात.

दुसरे आर्य-सत्य- दुःखाचे मूळ

आपल्या दुःखे,समस्या गुंतागुंतीच्या परिस्थितीतून उदयास येतात, पण बुद्धाचं म्हणणं आहे, सर्व दुःखाचं मूळ हे ज्ञानाच्या अभावात आहे, ज्याप्रकारे आपले मन आपल्या , इतरांच्या आणि भोवतालाच्या अस्तित्त्वाविषयीच्या अशक्य मार्गांचा आभास निर्माण करते, त्यात आहे.

तिसरे आर्य-सत्य- दुःखाचे निवारण/निरोध

बुद्धानं पाहिलं की, दुःखाचे मूळ अर्थात ज्ञानाचा अभाव संपवल्यास आपल्या सर्व दुःखांचे निवारण शक्य होते आणि पुन्हा तसे दुःखं आपल्या वाट्यास येत नाही. 

चौथे आर्य-सत्य- दुःख निरोधाचा मार्ग

आपण अज्ञान संपवून सत्याचं योग्य आकलन करून घेतल्यास दुःखाचं निवारण होतं. यासाठी परस्परसंबंध आणि अवलंबन समजून घेणं आवश्यक आहे. या आधारावरच सर्व सजिवांबाबत एकसमान प्रेम आणि मैत्रीभाव विकसित करणं शक्य आहे. आपल्या आणि इतरांच्या अस्तित्वाबाबतच्या गोंधळाचं समूळ उच्चाटन झालं की आपल्याला स्वतःसोबतच इतरांच्या भल्यासाठी कार्य करणं शक्य आहे.

बुद्धाच्या शिकवणीची व्याप्ती

परमपूज्य दलाई लामा बौद्ध धर्मातील त्रिसुत्री मांडतात-

  • बौद्ध मानसशास्त्र- व्यक्तिनिष्ठ अनुभवांच्या आधारे धारणा, विचार आणि भावनांची उत्पत्ती समजून घेणं
  • बौद्ध तत्त्वज्ञान- नीतितत्त्वे आणि तर्कशास्त्र, आणि बौद्ध धर्मातील सत्याचं आकलन
  • बौद्ध धर्म-  पूर्वायुष्य, कर्म, पुनर्जन्म, विधिवत संस्कार आणि प्रार्थनेवरील विश्वास

बौद्ध धर्मातील वैज्ञानिक विचारधारा मज्जातंतूविषयक वैज्ञानिक अभ्यासाला अधिक व्यापक करते. मनाच्या संवेदना, धारणा,केंद्रीकरण,सावधपणा,स्मृती, सकारात्मक-नकारात्मक भावना अशा आकलनविषयक कार्यासंबंधी एक विस्तृत पट मांडते. मज्जातंतूंमध्ये सकारात्मकतेचे मार्ग निर्माण करत मनाच्या उपकारक क्षमता वाढवते.

बौद्ध विचारधारा श्रद्धेपेक्षा शोधावर अधिक भर देते, त्यामुळेच वैज्ञानिक शोध बौद्धिक विचारधारेला पूरक आहेत- चौदावे दलाई लामा 

भौतिक पातळीवर बौद्ध विज्ञान विविध आजारांवरील उपचारांसाठी संगतवार वैज्ञानिक चिकित्सा पद्धतीही मांडतं. भाग भौतिकशास्त्राप्रमाणेच विषय आणि ऊर्जेसंबंधीत प्रकट विस्तृत विवेचन मांडतं. आणि विश्वाची उत्पत्ती, जीवन आणि अंत याबाबत चर्चा करत अस्तित्वाच्या आरंभापासूनच्या वैश्विक प्रवाहांची चिकित्सा करतं. 

बौद्ध तत्त्वज्ञान परस्पर अवलंबन, सापेक्षता आणि कार्यकारणभावासारख्या प्रश्नांना हाताळतं.  प्रस्थापित सिद्धांतांवरील सांगोपांग चर्चेद्वारे एक तात्त्विक विचारपद्धती सादर करतं, जी मनाच्या चुकीच्या प्रक्षेपणांविषयीच्या आकलनासाठी साहाय्यक ठरते. 

बौद्ध तत्त्वे ही स्वसोबतच इतरांसाठीही उपकारक आणि विघातक असलेल्या घटकांच्या विभागणीवर आधारलेली आहेत.

आपण आस्तिक असो वा नास्तिक, आपला दैवावर विश्वास असो वा कर्मावर, प्रत्येक जण मूलभूत नीतितत्त्वे अंगीकारू शकतो- चौदावे दलाई लामा

इतरांना इजा होऊ नये याची काळजी घेत दयाळूपणा,प्रामाणिकपणा,औदार्य आणि संयम या मूलभूत मानवी मूल्यांच्या विकासाचा पुरस्कार बौद्ध तत्त्वज्ञान करतं.

बौद्ध धर्म कर्म,भूतकाळ आणि भविष्यकाळातील जीवन, पुनर्जन्माची यंत्रणा, पुनर्जन्मापासून मुक्ती आणि ज्ञानप्राप्ती आदी विषयांवर चर्चा करतो. यात जप, ध्यानधारणा आणि प्रार्थना यासारख्या पद्धतींचा समावेश आहे. बौद्ध धर्मात ‘बौद्ध बायबल’सारखा एकही पवित्र ग्रंथ नाही कारण यातील प्रत्येक परंपरेचे मूळ शिकवणीवर आधारित त्यांचे स्वतःचे ग्रंथ आहेत. तिबेटी परंपरेतील अनेक ग्रंथ आमच्या मूळ ग्रंथ विभागात पाहता येतील.

जरी लोक मंदिरात किंवा घरातील देव्हाऱ्यासमोर प्रार्थना करण्यास पसंती देत असले तरी बौद्ध शिकवणीनुसार लोक कोणत्याही जागेवर कोणत्याही क्षणी प्रार्थना करू शकतात.प्रार्थनेचा उद्देश मनोकामनापूर्ती नसून स्वतःमधील आंतरिक शक्ती,शहाणीव आणि करुणा जागृत करणं हा आहे.

इथे आहाराच्या सवयींविषयी कोणतीही बंधने नाहीत, पण धर्मगुरु विद्यार्थ्यांना शाकाहारी आहारासाठी अधिक प्रेरित करतात. स्वतः बुद्धानेही त्याच्या अनुयायांना मद्यपान आणि अमली पदार्थ वर्ज करण्याच्या सूचना केल्या आहेत. बौद्ध शिकवणीचा मूळ उद्देश सावधपणा आणि आत्मसंतुलन आहे, मद्याच्या कमी-अधिक सेवनाने आत्मसंतुलन ढळू शकते.

बौद्ध धर्मात भिक्खू आणि भिक्खूनी असलेल्या मठांची परंपरा आहे. हे बौद्ध अनुयायी ब्रह्मचर्यासह शेकडो व्रतांचे पालन करतात. ते मुंडन करून विशिष्ट पोशाख परिधान करून मठ समुदायात राहतात. अभ्यास, ध्यानधारणा, प्रार्थना आणि धर्मबांधवांच्या कल्याणासाठी धार्मिक सोहळ्यांचे आयोजन आदी गोष्टींना आपले आयुष्य अर्पण करतात. हल्ली सामान्य बौद्ध धर्मीयही बौद्ध केंद्रांमध्ये ध्यानधारणा करत बौद्ध धर्माचा अभ्यास करतात.

बौद्ध धर्म प्रत्येकाचं स्वागत करतो

बुद्ध आपल्यासारख्या मानवी जिवांचं अस्तित्व, त्यांच्या मर्यादा आणि त्यांच्यातील क्षमतांच्या जाणिवा पाहतो. बौद्ध धर्मात याला ‘ज्ञानप्राप्ती’ असे संबोधतात. बुद्ध नुसता हात फिरवून दुःख गायब करू शकत नाही. तर आयुष्यातील दुःख निवारणाचा आणि आपल्या मनातील – प्रेम,करुणा,औदार्य,शहाणीव आणि इतर- चांगल्या गोष्टी विकसित करण्याचा मार्ग दाखवतो.

या क्षमता विकसित करण्याची शिकवण कोणत्याही संस्कृतीतील कोणत्याही धर्माच्या व्यक्तीसाठी खुली आहे. बौद्ध धर्म देव-देवतांशी श्रद्धेचा संबंध जोडत नाही, तर एखादी अनमोल वस्तू विकत घेताना बाळगल्या जाणाऱ्या सावधतेप्रमाणेच धार्मिक शिकवणीची पडताळणी करण्याविषयी सांगतो. अशा रीतीने बुद्धाच्या नीतितत्त्वे, करुणा आणि शहाणपण या मूल्यांवर आधारित शिकवणीचा आपण पुरस्कार करतो. ज्यामुळे आपण विघातक कृतींपासून परावृत्त होत स्वतःसोबतच इतरांसाठीही सकारात्मक, उपकारक असणाऱ्या गोष्टींशी नैसर्गिकतः जोडले जातो. केवळ हाच मार्ग आपल्या प्रत्येकाला इच्छित आनंद आणि समृद्धीच्या दिशेने नेऊ शकतो.


Top