करुणा कशी विकसित करावी

How zo develop compassion clay banks unsplash

आपल्या सर्वांमध्ये जन्मजात करुणामयतेच्या क्षमता असतात, ज्याच्या माध्यमातून आपण इतरांनी वेदना आणि वेदनादायी कारणांपासून मुक्त असावे, अशी आशा करतो. स्वतःसोबत इतरांनाही असाधारण लाभदायी असणारी ही क्षमता आपण विकसित करू शकतो.

करुणा विकसित करण्याचा योग्य मार्ग म्हणजे प्रथमतः आपण आपल्या परिघात असणारे लोक, ऑनलाइन भेटणारे लोक आणि अगदी काही प्राण्यांच्या बाबतीतही सीमित असायला हवे. हळूहळू, आपण स्वतःला प्रशिक्षित करून आपल्या करुणेचा परीघ वाढवून प्रत्येकाला समाविष्ट करून घेऊ शकतोः जसे अनोळखी माणसे आणि अगदी आपल्याला अजिबात न आवडणारी माणसेही. आपण आपल्या करुणाभावाच्या परिघात संपूर्ण जगाचा समावेश करेपर्यंत प्रयत्न करू शकतो – हो, अगदी झुरळांचाही!

करुणेत भावनिक आणि विवेकशील असे दोनही घटक अंतर्भूत असतात. भावनिक स्तरावर आपण पृथ्वीवरील सर्व जीवमात्रांचा परस्परसंबंध समजून घ्यायला हवा. जागतिक अर्थव्यवस्था किंवा आपण उपभोगत असू अशी कोणतीही गोष्ट – अन्न, कपडे, उपकरणे, घर, वाहन आणि इत्यादी – इतरांच्या कष्टातून आपल्यापर्यंत पोहचते. इतर लोक नसते तर, आपल्याकडे रस्ते नसते, वीज नसती, इंधन, पाणी किंवा अन्न काहीच नसते. हा एकमात्र विचारही आपल्यात कृतज्ञता भाव उत्पन्न करतो, एक सुखी मनोवस्था ज्याला आपण ‘आनंददायी प्रेम’ म्हणतो. आपण जितके अधिक या कृतज्ञतेच्या भावनेवर विचार करतो, तितकेच आपण इतरांवर प्रेम करू लागतो, जसे एखाद्या एकुलत्या एक मुलाच्या आईने त्याची काळजी करावी. आपल्याला इतरांच्या दुर्दैवाबद्दल वाईट वाटू लागते, पण त्यांची दया येत नाही. कारण आपल्याला ती जणू आपलीच समस्या असल्यासारखे वाटते.

करुणेच्या प्रसाराचा विवेकशील आधार इतका थेट आहे, तरी अनेक लोक याचा विचारही करत नाहीतः प्रत्येकाला सुखाची अपेक्षा बाळगण्याचा आणि प्रत्येकाला दुःख किंवा वेदना नको असण्याचा समान अधिकार आहे. एखाद्या सोबत आपले जवळचे संबंध असोत किंवा दूरचे आणि ते काहीही करत असोत, ही दोन तथ्ये प्रत्येकासाठी वास्तवच आहेत. एखादा अगदी विघातक कृत्य करत असेल तरीही, तो ते अज्ञान, गोंधळ आणि भ्रमाच्या प्रभावातून करत आहे, असा विचार करून करत आहे की त्याच्या कृतीतून त्याचे वा समाजाचे भलेच होईल. तो मूलतः वाईट आहे म्हणून ते करत नाही; कोणीच मूलतः वाईट नसते. त्यामुळे त्यांच्याप्रति करुणा बाळगणे तार्किक आणि योग्य आहे कारण जसे आपल्याला वेदना नको असतात, तसेच त्यांनाही नको असतात.

करुणेचे ध्यान

करुणा विकसित करण्याचा सराव त्या भावनेला टप्याटप्याने तीव्र करत नेतो. प्रथम आपण आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीच्या वेदनेवर लक्ष केंद्रित करतो, नंतर जे तटस्थ आहेत त्यांच्याविषयी आणि त्यानंतर जे आपल्याला आवडत नाहीत त्यांच्याविषयी. अंततः आपण सर्वांच्या सदासर्वकाळ जाणवणाऱ्या वेदनांवर आपले लक्ष केंद्रित करतो.

प्रत्येक टप्प्यावर आपल्यामध्ये तीन प्रकारच्या भावना निर्माण होतातः

  • ते त्यांच्या दुःखातून आणि दुःख निर्माण करणाऱ्या कारणांपासून मुक्त झाले तर किती छान होईल.
  • कदाचित ते मुक्त होतील; मला आशा आहे ते मुक्त होतील.
  • कदाचित त्यांच्या मुक्तीसाठी मी प्रयत्न करू शकेन.

अशा प्रकारे करुणेच्या भावनेत इतरांना त्यांच्या दुःखातून मुक्त करण्यासाठी उपयुक्त ठरण्याच्या इच्छेचा अंतर्भाव आहे. वास्तववादी पद्धतीचा अवलंब करून समस्या सोडवणे शक्य आहे, हे निश्चित आहे, अर्थात कोणतीही परिस्थिती निराशाजनक नसते. त्यामुळे बौद्ध धर्मातील करुणेचे तत्त्व हे मनाच्या जागरूक अवस्थेशी निगडित आहे, ज्यात कोणत्याही क्षणी इतरांच्या भल्यासाठी तत्पर असण्याचा समावेश आहे.


Top