आश्रयः जीवनातील सुरक्षित आणि अर्थपूर्ण दिशा

32:21
आश्रय घेणे (शरणागत होणे) हा सर्व बौद्ध शिकवणींचा आणि साधनांचा पाया आहे. याला ‘बौद्ध मार्गाचे प्रवेशद्वार’ असेही संबोधले जाते. जेव्हा आपल्याला जाणीव होते की आश्रय घेणे म्हणजे स्वतःवर काम करणे असते, तेव्हा आपण पाहू शकतो की ही स्वतःला जीवनातील सुरक्षित आणि अर्थपूर्ण दिशेने नेण्याची सक्रिय प्रक्रिया आहे. मानसिक गोंधळ, तणावदायी भावना आणि बंधनकारक व्यवहारातून मुक्तीसाठी आणि चांगल्या गुणांच्या विकासासाठी बुद्धाने दिलेल्या शिकवणीच्या मार्गावर चालत आपण स्वतःवर काम सूरू करतो. सर्व बुद्धांनी आणि सिद्धीप्राप्त गुरूंनी हाच मार्ग अवलंबलेला असतो आणि आपण त्यांच्या पाऊलखुणांवर मार्गक्रमण करण्यासाठी प्रयत्न करत असतो.

बौद्ध साधनेच्या आपल्या जीवनातील उपयुक्ततेविषयीचा भ्रम दूर करणे

मला ‘शरणागतीचा दैनंदिन जीवनाशी संबंध’ या विषयावर व्याख्यान देण्यासाठी सांगण्यात आले आहे. यावेळी मला महान भारतीय गुरू अतिषा यांच्या उदाहरणाची आठवण होते आहे. ते दहाव्या शतकाच्या अंतिम टप्प्यात तिबेटला गेले होते. बौद्ध धर्माच्या प्राथमिक धर्मप्रसारानंतर भारतात धर्मप्रसाराला उतरती कळा लागली, त्यावेळी ज्या गुरूंनी तिबेटमध्ये बौद्ध धर्माचे पुनरूज्जीवन केले, त्या महान गुरूंपैकी अतिषा एक होते. त्यावेळी तिबेटमध्ये बौद्ध धर्मातील अनेक अद्ययावत शिकवणी आणि तंत्रांबाबत गैरसमज होते. तिथे चांगले प्रशिक्षित गुरूही नव्हते. वास्तविक तिथे असे गुरूच नव्हते, जे योग्य रीतीने शिकवण देऊ शकतील. तिथे अनेक भाषांतरित धर्मग्रंथ होते, पण अर्थातच अधिकाधिक लोकांना वाचता येतील इतक्या प्रती उपलब्ध नव्हत्या. ते वाचू शकले तरी त्याविषयी योग्य मार्गदर्शन करणारे गुरूही अवतीभोवती नव्हते. ही परिस्थिती सुधारण्यासाठी, पश्चिमी तिबेटमधील एका राजाने काही शूर विद्यार्थ्यांना महान बौद्ध गुरूंच्या शोधार्थ भारतात पाठविले. त्यासाठी त्यांना पाटपीट करावी लागली, निरनिराळ्या भाषा शिकाव्या लागल्या आणि हवामानातल्या बदलांचा सामना करावा लागला. त्यातील काही प्रवासा दरम्यानच मरण पावले तर काही भारतात पोहोचल्यावर मरण पावले. पण तशा परिस्थितीतही ते महान गुरू अतिषाना भारतातून तिबेटाला परत आणण्यात यशस्वी झाले. ते अनेक वर्षे तिथे वास्तव्यास होते. त्या दरम्यान त्यांनी मुख्यतः शरणागती आणि कर्माविषयी शिकवण दिली. खरेतर ते ‘शरणागत आणि कर्म लामा’ म्हणूनच ओळखले जात होते. तिबेटी लोक त्यांना त्यात नावाने ओळखत होते.

अतिषा यांचे उदाहरण आजही प्रासंगिक आहे. आजही बौद्ध धर्माबद्दल आणि यातल्या दैनंदिन साधनांविषयी गोंधळाची स्थिती आहे. शिवाय बौद्ध धर्मातील अद्ययावत शिकवण आणि तंत्रांबाबतही अनेक गैरसमजुती आहेत. अनेकदा लोक बौद्ध शिकवणींच्या मूलभूत ज्ञानाशिवाय किंवा अगदी अल्प ज्ञानाच्या आधारे साधना करू लागतात. त्यांच्या मते, एखादी जादुई प्रार्थना करणे म्हणजेच बौद्ध साधना आहे. शरणागती किंवा आश्रय घेण्याच्या महत्त्वाला आणि त्याच्या दैनंदिन जीवनातील परिणामकारकतेला कमी लेखून ते साधनेतील महत्त्वपूर्ण मुद्दा विसरतात.

आपल्या जीवनातील परिस्थिती काहीही असो, बौद्ध साधनेत स्वतःवर काम करण्याला, स्वतःत सुधारणा करण्याला आणि चांगली व्यक्ती बनण्याला महत्त्व आहे. ते आपल्या छंदासारखं किंवा एखादा खेळ खेळल्यासारखं दिवसातला अर्धा तास, आठवड्यातून एकदा किंवा कंटाळा आला म्हणून वरवरचं करण्याजोगं नाही. उलट एखाद्या व्यावहारिक कार्यासारखं ते नित्यनेमाने करायला हवं - सतत स्वतःवर काम करत राहणं. याचा अर्थ आपल्यातील कमतरता आणि आपल्यातील गुण ओळखून कमतरतांचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि चांगले गुण विकसित करण्यासाठी योग्य पद्धतींचा अभ्यास करणे. यात आपल्या कमतरतांवर मात करून चांगल्या गुणांची जाणीव विकसित करण्याचे उद्दिष्ट असते. या साधनेतून जीवनातील खरे सुख गवसल्याने आपला फायदा होतोच, पण ते त्याचे एकमेव उद्दिष्ट नसते. ती इतरांच्या मदतीसाठीही परिणामकारक असल्याने इतरांच्या फायद्यासाठीही गरजेची असते. हाच बौद्ध साधनेचा उद्देश असतो. या साधनांना त्यात अंतर्भूत पद्धतींमुळे बौद्ध स्वरूप मिळते, ज्याचा उपयोग वरील उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी योग्य बनण्यासाठी केला जातो आणि शरणागत होण्याचा अर्थ आपण त्या पद्धतींचा स्वीकार करून आपल्या जीवनात त्या अंमलात आणतो.

शरणागती निष्क्रिय साधना नाही

तीन रत्नांना शरण जाणे - बुद्धं, धम्म आणि संघ - बौद्ध शिकवणींचा केंद्र बिंदू आहे. खरेतर शरणागत होणे हा बौद्ध असण्या-नसण्यामधील विभाजकही मानला जातो. थोडक्यात सांगायचे तर, धर्म स्वतःवर काम करण्याच्या आणि आपले इच्छित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आवश्यक पद्धतींवर भर देतो; बुद्धा म्हणजे ज्यांनी या पद्धतींची शिकवण दिली आहे आणि स्वतः पूर्णतः ते उद्दिष्ट साध्य केले आहे; आणि संघचा संबंध अशा व्यक्तींशी असतो, ज्यांनी हे उद्दिष्ट अंशतः साध्य केले आहे. ‘धर्म’ शब्दाचा खरा अर्थ ‘निवारक/बचावात्मक उपाय’ असा आहे - ज्यात स्वतःसाठी आणि इतरांसाठीही समस्या निर्माण होणार नाहीत, यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना असतात. त्या स्वतःच्या बचावासाठी केलेल्या उपाययोजना असतात.

आश्रय घेण्याच्या संज्ञेसाठी संस्कृतमध्ये ‘शरणा’ अर्थात ‘संरक्षण/बचाव’ अशी संकल्पना वापरली जाते आणि हा शब्द ‘निवारा किंवा आश्रय’ असाही वापरला जातो, हे आपल्याला योग्य रीतीने समजून घ्यायला हवे. हा अर्थ धर्म शब्दाच्या अर्थाच्या अनुरूप आहे. याचा अर्थ असा नाही की आपण निष्क्रियपणे एखाद्या व्यक्तीला शरण जावे, जी आपले संरक्षण करेल. बौद्ध संदर्भातून ‘आश्रय घेणे/शरणागत होणे’ ही सक्रिय कृती आहे; आपण स्वतःच्या संरक्षणासाठी कृती करण्याची गरज असते.

माझे गुरू नेहमी वापरायचे ते उदाहरण पाहू. समजा पाऊस पडत असेल आणि जवळच एखादी गुहा असेल. जर आपण फक्त असे म्हणले की, ‘मी गुहेत आश्रय घेतो; मी गुहेत आश्रयासाठी जात आहे.’ आणि बाहेर तसेच पावसात उभे राहिलो आणि आपलं म्हणणं पुन्हापुन्हा वदवत राहिलो, तर त्याने फायदा होणार नाही. आपल्याला खरोखर गुहेत जायला हवे. तसेच आपण जर नुसतेच म्हणत राहिलो की, ‘मी बुद्ध, धर्म आणि संघाला शरणागत होतो, त्यांच्या आश्रयाला जातो.’, पण प्रत्यक्षात त्या दिशेने मार्गस्थ झालोच नाही, आपल्या जीवनात त्यांचा स्वीकार केलाच नाही, तर त्याने काहीच फायदा होणार नाही. त्यातून जे सुचित होते, त्यावर अंमल होणे आवश्यक आहे, म्हणून आपल्या समस्यांपासून आश्रय घेणे महत्त्वाचे आहे. त्यासाठीच मी ‘सुरक्षित दिशा’ आणि ‘जीवनात सुरक्षित दिशेने प्रस्थान’ या संकल्पना वापरतो.

गुहेची प्रतिमा पुन्हा पाहायची झाल्यास, फक्त गुहेत जाऊन, आत असल्याने फक्त ओले होण्यापासूनच नव्हे तर आपल्या जीवनातील सर्व समस्यांपासून आपले संरक्षण होईल, असा विचार करणे पुरेसे नाही. मुख्य मु्द्दा हा आहे की, आपल्याला सातत्याने स्वतःवर काम करून बुद्ध, धर्म आणि संघाच्या संकल्पनेतील आदर्श दृष्टिकोन अंगीकारायला हवा. जेव्हा आपण बुद्ध, धर्म आणि संघाच्या आश्रयाला येणे सहजसाध्य समजतो, तेव्हा आपण या प्रक्रियेला ख्रिस्ती धर्मातील संरक्षकाच्या कल्पनेसारखे चुकीच्या अर्थाने घेऊ शकतो आणि बुद्ध आपले संरक्षण करणार असल्याचा समज करून घेऊ शकतो. तशा स्थितीत बुद्ध म्हणजे देव आणि संघ म्हणजे संत समजले जाऊ शकतात. शेवटी बहुतांश पाश्चिमात्त्य समाजात ख्रिस्त प्रभावाची अंतर्धारा पाहायला मिळते. अशा पद्धतीच्या विचारात आपण प्रार्थना करू लागतो की एखादी अदृश्य शक्ती एखादा चमत्कार करून आपले संरक्षण करेल. बौद्ध संकल्पनेतून पाहायचे झाल्यास ती अदृष्य शक्ती आपल्याला सर्व वेदना आणि समस्यांतून मुक्त करेल.

जर असे असते तर, आपण एखादे तिबेटी बौद्ध नाव धारण केले असते, लाल धागे बांधले असते, काही चमत्कारिक मंत्र उच्चारले असते, प्रार्थना केली असती आणि कसे तरी स्वतःचे संरक्षण केले असते. विशेषतः आपण तिबेटी भाषेत प्रार्थना म्हंटल्या असत्या आणि आपल्याला त्यातला एखादा शब्दही कळाला नसता तर त्या शब्दांमध्ये काहीतरी अद्भुत ताकद असल्यासारखे आपल्याला वाटले असते. महान लामा दझोंग्सार खेंत्से रिंपोछे अलीकडे बर्लिनच्या भेटीवर होते, जिथे माझे वास्तव्य असते. त्यांनी एक फार प्रगल्भ गोष्ट सांगितली. ते म्हणाले, जर तिबेटी लोकांना त्यांच्या प्रार्थना जर्मनमध्ये म्हणायला सांगितल्या, तिबेटी लिपीमध्ये त्या लिहून दिल्या आणि ते काय म्हणत आहेत, त्याचा अर्थ त्यांना अजिबात समजला नाही, तर त्यांना शंका वाटते की किती तिबेटी लोक बौद्ध साधना करतील. त्यावेळी अर्थातच सर्वजण हसले. पण आपण जर याचा खोलात जाऊन विचार केला , हा विचार खरेच गहन आहे, हो ना? पण आश्रयाकडे आपल्या समस्यांवरील चमत्कारिक उपाय म्हणून पाहण्याच्या कोणत्याही प्रवृत्तीतून मुक्त होणे फार महत्त्वाचे आहे आणि आपल्याला महान शक्तीला खऱ्या अर्थाने शरण जाणे आवश्यक आहे.

इथे खरा प्रश्न हा आहे की, ‘मी माझ्या जीवनाचे काय करत आहे?’ ‘माझ्या जीवनाला काही दिशा आहे का?’ आपल्यातील अनेकांना ही जाणीव होईल की आपल्या जीवनाला काही दिशाच नाही; ते फक्त एका चक्रातून मार्गस्थ होताना आढळून येईल. इथे आपण पूनर्जन्माच्या साखळीसारख्या गहन चर्चा करण्याची गरज नाही, पण आपले दैनंदिन जीवन कोणत्या दिशेने जात आहे असा विचार आवश्यक आहे. आणि ते अर्थातच अर्थहीन वाटेल. ही फार चांगली स्थिती नाही. आपल्याला जीवनात अधिक अर्थपूर्ण दिशांची गरज आहे, एखादे विशिष्ट उद्दिष्ट किंवा ध्येय हवे. आणि ते आपणच आपल्या जीवनात अंतर्भूत करणे आवश्यक आहे. ही एक सक्रिय प्रक्रिया आहे. जीवनात एखादे अर्थपूर्ण उद्दिष्ट बाळगल्यास आपल्या लक्षात येईल की आपल्या जीवनात आपण नक्की काय करत आहोत. हा विचार आपल्याला अधिक सुरक्षित करेल, हो ना?


जीवनात अर्थपूर्ण उद्दिष्ट असणे

आपल्या जीवनात आपण कशा पद्धतीचे उद्दिष्ट बाळगू शकतो? साधारणतः आपल्या जीवनातील सद्याची असमाधानकारक परिस्थिती आणि त्यातून बाहेर पडण्यासाठीच्या उपाययोजना हे आपल्या जीवनाचे उद्दिष्ट असते. अगदी मूलभूत पातळीवर आपण म्हणू शकतो की प्रत्येकाला सुख हवे असते आणि कोणलाच दुःख नको असते. बौद्ध धर्मात ही बाब सिद्धप्रमाण रूपात समोर येते आणि त्यात एक जैविक सत्य सामावलेले आहे. आपल्याला वेदनेपासून मुक्ती हवी असते. आपल्याला अडचणींपासून मुक्तता हवी असते. अगदी कीटक आणि जंतुंनाही तेच हवे असते, हो ना? तेच आपले उद्दिष्ट असते.

प्रश्न हा असतो की आपण विचार करत असलेल्या या वेदनेचे आणि दुःखाचे प्रमाण काय असते ? त्यामुळे आपण ठरवलेल्या उद्दिष्टात एका विशिष्ट समस्येपासून मुक्ती मिळवण्यासोबतच इतरही समस्यांपासून मुक्ती मिळवण्याचे ध्येय असायला हवे ना? उदाहरणार्थ, जर आपण गरीब असू किंवा आर्थिक विवंचनेत असू, ही आपली समस्या असेल, तर आपले उद्दिष्ट नोकरी मिळवून पैसा कमावणे हे असेल. कदाचित नोकरी न करता एखाद्या गुन्हेगारी कृतीतून लगेच श्रीमंत होण्याचेही असू शकते. कोणत्याही मार्गाने का असेना, एखाद्याला पैसा कमवावासा वाटू शकतो. पण आपण भरपूर पैसा असणाऱ्या लोकांच्या जीवनाकडे पाहिल्यास, त्यांच्याशी गांभीर्याने संवाद साधल्यास आणि त्यांनी त्यांच्या जीवनाबाबत प्रामाणिकपणे आपल्याशी संवाद साधल्यास आपल्याला कळू शकते की ते लोक खरोखरच सुखी असतीलच असे नाही. त्यांना मिळणारा पैसा कधीच पुरेसा नसतो. अगदी ते लाखो कमवत असले तरी त्याला अर्थ नसतो, त्यांना कायम अधिक पैशांची हाव असते. ते कधीच समाधानी नसतात.

हे मला फार गमतीशीर वाटते. असे काही लोक आहेत, त्यांच्याकडे अब्जावधी डाॅलर्स असतील, पण सध्याच्या आर्थिक तणावामुळे त्यांच्याकडे त्यातील निम्मेच, अब्ज डाॅलर्स असतील. अशा परिस्थितीत ते देणग्या देणार नाहीत, किंवा कोणत्याही सामाजिक कार्यात सहभागी होणार नाहीत, कारण त्यांच्याकडे आता अर्धे अब्ज डाॅलर्सच असतील आणि ते स्वतःला असुरक्षित समजत असतील. त्यांना वाटत असेल की त्यांनी बचत करायला हवी आणि पुन्हा त्यांच्याकडे पूर्वी इतके अब्ज डाॅलर्स येईपर्यंत इतरांना संपत्ती वाटण्याऐवजी पैसे वाचवायला हवेत. अशा स्थितीत ते कायम शेअर बाजारातील चढउतारांकडे लक्ष देऊन असतील आणि रोज काळजी करत राहतील की त्यांच्याकडे असलेल्या पैशातील आणखी थोडा पैसा ते गमावून बसू नयेत. त्यांना घरात चोरी होऊन कुणी आपला पैसा लंपास करू नये किंवा पैशासाठी त्यांच्या मुलांना किडनॅप करू नये, या विचाराने घरात सुरक्षा रक्षकही नेमावे लागतील. लॅटिन अमेरिकेतील श्रीमंत व्यक्तींच्या बाबतीत सामान्यतः हेच अनुभवास येते. भरीर भर म्हणजे त्यांना असेही वाटत असते की पैशाच्या मोहाशिवाय लोक तुमच्याशी मैत्री करतच नाहीत. त्यांना कायम शंका वाटते की त्यांच्याशी चांगले वागणारी व्यक्ती कायम त्यांच्या पैशावर डोळा ठेवून आहे. अर्थात त्यांच्या जीवनात त्यांना गरीब असण्याची समस्या नाही, पण त्यांच्या जीवनात पैशासोबत आलेल्या अनेक समस्या असतात.

सांसारिक उद्दिष्टांचा पाया अस्थिर असतो

पैसा कमावण्याच्या उद्दिष्टाशिवाय बौद्ध धर्मात अनेक तथाकथित ‘सांसारिक उद्दिष्टे’ सांगण्यात आली आहेत. सांसारिक शब्दासाठी इंग्रजीमध्ये वापरण्यात येणारा ‘वर्डली’ शब्दाला नकारात्मक छटा आहे आणि तो थोडा चिकित्सात्मक वाटतो. मुद्दा तो नाही. माझे गुरू सरकाॅंग रिंपोछे यांनी सांगितलं होतं की, तिबेटमधील ज्या शब्दाचा अनुवाद ‘वर्डली’ असा करण्यात आला आहे, त्यातील दोनच शब्दांश - जिग-तेन - खरा अर्थ ध्वनित करतात. त्याचा अर्थ आहे, एखादी अशी गोष्ट काहीतरी आधार आहे (तेन) आणि तिचे विखंडन (जिग) होणार आहे. जर आपण एखादे असे उद्दिष्ट ठेवले की त्याचे तुकडे-तुकडे होणार आहेत, तर अर्थातच त्यातून आपल्याला चिरंतन सुख मिळू शकत नाही. त्यातून केवळ समस्या निर्माण होतील, कारण त्याला कोणताही पाया नसेल.

उदाहरणार्थ, आपल्या जीवनातील उद्दिष्ट हे छान कुटुंब, भरपूर मुले, जी म्हातारपणी आपला सांभाळ करतील, असा समज ठेवून आपण जन्माला घातली असतील आणि या विचाराने आपण स्वतःला सुरक्षित आणि सुखी समजत असू. पण हे सगळे अशाच आदर्शवादी पद्धतीने साकार होत नाही, होते का? प्रसिद्धीची हाव, हे आणखी एक उदाहरण पाहा. आपण जितके अधिक प्रसिद्ध होऊ, तितके अधिक लोक आपल्याला सतावत राहतील, आपला वेळ खातील. आपण सिनेतारतारकांकडे पाहू शकतो, ते आपली ओळख लपवल्याशिवाय बाहेरही पडू शकत नाहीत. कारण ते जातील, त्या ठिकाणी लोक त्यांना घेराव घालतात, आणि अगदी त्यांचे कपडेही फाडू शकतात. खरेतर सुपरस्टार असणे एक मोठी समस्याच आहे.

आपण आपल्या जीवनाकडे एक नजर टाकल्यास, केवळ भौतिक समाधान किंवा आपल्या अवतीभोवतीच्या लोकांकडून मिळणारे मानसिक समाधान या आधारावर जीवनातील सर्व समस्यांतून मुक्त होता येत नाही. कारण आपल्यात क्रोध, आसक्ती, लोभ, असूया, अहंभाव, असंजमसपणा आणि अशा इतर भावना असतील, तर आपल्या जीवनात समस्या येणारच, मग आपण भलेही आपल्या तथाकथित सांसारिक उद्दिष्टांची पूर्ती करण्यात कितीही यशस्वी असू.

तणावदायी भावना

बौद्ध धर्मात पुनर्जन्म आणि भविष्यातील जीवनातील वेदनांबाबत चर्चा केली जाते. ज्या वेदना आपल्या ‘तणावग्रस्त भावनां’च्या प्रभावातून जन्मलेल्या असतात आणि आपण त्यांच्या प्रभावाखाली वागत नकारात्मक क्षमता विकसित करतो. म्हणूनच बौद्ध विचारधारेत याबाबत नेमके स्पष्टीकरण मांडले जाते की, ती स्थिती त्रासदायक असते आणि आपल्यासाठी हितकारक असलेल्या गोष्टी आपण ओळखू शकत असू, तर आपण ती त्रासदायक स्थिती टाळायला हवी कारण नकारात्मक क्षमता आपल्यासाठी समस्या आणि दुःखच घेऊन येतात.

पण बहुतांश पाश्चिमात्त्य लोक पुनर्जन्मावर विश्वास ठेवत नाहीत किंवा पुनर्जन्माची संकल्पनाच मान्य करत नाहीत, त्यामुळे आपण या मुद्द्याची फक्त सध्याच्या जीवनाच्या दृष्टीने चर्चा करूयात. जर आपण आपल्याच आत्ताच्या जीवनाकडे पाहिल्यास, आणि सखोल शोध घेतल्यास आपल्याला कळेल की आपल्या समस्यांचा मूळ स्रोत आपल्या आतच आहे. बाह्य घटक हे फक्त त्या परिस्थिती असतात, ज्यामुळे या समस्या निर्माण होतात. आपल्या तणावग्रस्त भावना - आपला क्रोध, आसक्ती, लोभ आणि इतर - खरेतर आपली मानसिक शांती आणि सुख संपवून टाकतात. त्या आपल्याला आपले चांगले गुण वापरण्यापासून रोखून धरतात. आपल्याला एखाद्याची मदत करायची असते, खरेतर तो आपल्यातला चांगला गूण असतो, पण आपण त्याच्यावर अचानक क्रोधित होतो. आपण त्यांना चांगला सल्ला देऊ इच्छितो, पण ते तो सल्ला घेत नाहीत. वाद घालत बसतात आणि त्यामुळे आपण संयम गमावून बसतो. अशा तणावग्रस्त भावना आपल्याला इतरांचे भले करण्यापासून खरेच रोखून धरतात.

हे आपल्या मुलांच्या बाबतीत घडतं तेव्हा ते आणखी कठीण असतं. जेव्हा आपण आपला संयम गमावून बसतो आणि मुलांवर रागवतो, तेव्हा आपल्याला वाटत असते की त्यांच्यासाठी काय योग्य आहे, ते आपल्याला अधिक चांगले माहीत आहे आणि आपण त्यांना करायला सांगितलेल्या गोष्टी मुले करतच नाहीत. त्यामुळे आपल्या मुलांसोबतचे नाते फार गुंतागुंतीचे होते, हो ना? इथे समजून घेण्यासारखा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण वेळीच काही नाही केले तर परिस्थिती आणखी वाईट होईल. शक्यता आहे की वाढत्या वयासोबत आपला स्वभाव थोडा नरम होईल, कारण आपल्याकडे तेवढी ऊर्जा शिल्लक नसेल, पण याचा अर्थ असा नाही की आपला राग आणि अशा प्रकारच्या इतर भावना आपोआप नष्ट होतील. वेळेसोबत त्यांचा प्रभाव कमी होत नाही.

अशा प्रकारच्या संभावनांसाठी आपल्याला जो भाव विकसित करण्याची आवश्यकता असते, त्याला बौद्ध धर्मात ‘भय’ ही संज्ञा वापरली जाते. पण बहुतांश भाषांमध्ये ‘भय’ हा फारच कठीण शब्द आहे. आणि त्या शब्दाची अर्थछटाही फार चांगली नाही. मी कधी कधी या शब्दाच्या ऐवजी ‘त्रास’ हा शब्द वापरतो. पण हा शब्दही इतर भाषांमध्ये अनुवादित करण्यासाठी फारसा सोपा नाही. ‘त्रास’ शब्दात अनेकदा अशी अर्थछटा प्रतिबिंबित होते की, ‘मला हे खरोखर घडू नये असं वाटतं.’ उदाहरणार्थ, आपल्याला एका अतिशय कंटाळवाण्या बैठकीला जावे लागले, असे नसते की आपल्याला त्या बैठकीला जाण्याची भीती वाटते, पण ती आपल्याला त्रासदायक वाटते. आणि आपल्याला ती करायची इच्छाच होत नाही.

पण जास्त नेमके सांगायचे झाल्यास, आपल्याला दोन प्रकारच्या भयांमधील फरक ओळखता यायला हवा. आपण भविष्यातील भयावह पुनर्जन्माविषयी बोलत आहोत की त्रासदायक वृद्धत्वाबद्दल किंवा आणखी कोणत्या भीतीबद्दल बोलत आहोत, ते जाणून घ्यायला हवे. एक भीती अशी असते की, आपल्याला त्यातून बाहेर पडण्याचा मार्गच सापडत नाही आणि आपल्याला असाहाय्य आणि आशाहीन वाटू लागतं. अशी भीती आपल्याला दुर्बल करते. हो ना? आपण ती अनेकदा अनुभवत असलो तरी, मला वाटते ती भीती अनाठायी असते. पण आश्रयासंदर्भात जी भयाची संकल्पना वापरण्यात आली आहे, तिची अर्थछटा पूर्णतः वेगळी आहे, कारण तिथे आपल्याला समस्या दूर करण्यासाठीचा मार्ग सापडतो. त्यामुळे ही भीती असाहाय्यही नसते आणि तिथे आपण आशाहीनही नसतो. पण मी आधी सांगितल्याप्रमाणे, तिथे काही एखादी अदृश्य शक्ती नसते, जी आपले रक्षण करेल, आणि केवळ कठोर प्रार्थना करून आपण आपल्या समस्यांपासून मुक्त होऊ शकू.

मुद्दा हा आहे की आपण स्वतः आपले संरक्षण करू शकतो. आपल्याला जीवनातील समस्यांपासून दूर ठेवते, अशी गोष्ट कोणती असते? काय केल्याने ते शक्य होते? व्यापक संदर्भातून पाहायचे झाल्यास, वास्तविक आपल्या तणावदायी भावना समस्या निर्माण करत असतात - आपला क्रोध, लोभ, आसक्ती आणि इतर - आणि त्या आपल्या वास्तवाबाबतच्या भ्रमाच्या / गोंधळाच्या स्थितीतून निर्माण झालेल्या असतात. सर्व तणावदायी भावना आपल्या मनाचे अंगभूत वैशिष्ट्य नसतात. त्या पुन्हा उत्पन्न होणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांना संपवणे शक्य आहे. धर्म रत्न सांगते की त्यांचा ‘पूर्ण निरोध’ शक्य आहे.

मन किंवा मानसिक कृती

 

बौद्ध धर्मात आपण मनाविषयी चर्चा करतो, तेव्हा अधिक खोलात न जाता आपण मानसिक कृतीवर लक्ष केंद्रित करतो. ही अगदी झोपेतही घडणारी एक व्यक्तीगत आणि घटनात्मक मानसिक कृती आहे. मानसिक कृतींच्या व्यक्तिनिष्ठ अनुभव घटकांशी मनाचा संदर्भ असतो. तर मस्तिष्क विज्ञान त्याला शरीर विज्ञानाच्या पातळीवर स्पष्ट करते. दोन्ही पैकी कोणत्याही प्रकारात मानसिक कृतीच्या मूलभूत नैसर्गिक स्वरूपात गोंधळाची स्थिती किंवा क्रोधासारख्या इतर भावना असतीलच असे नाही. मूलतः प्रत्येक क्षणी तात्कालीन स्थितीतून जे भाव उद्भवतात, त्याला आपण मानसिक होलोग्राम (प्रतिकृती) म्हणू शकतो. उदाहरणार्थ, शारीरिक दृष्टिकोनातून पाहायचे झाल्यास, डोळ्यामार्फत प्रकाशकिरण आत येतात आणि त्यांचे विद्युत रासायनिक संकेतांमध्ये रूपांतरण होते, तिथून ते चेतापेशींमार्फत मेंदूकडे पाठवले जातात आणि तिथे त्यांचा अर्थबोध करणारा अंतर्गत होलोग्राम (प्रतिकृती) तयार होतो. त्यालाच एखादी गोष्ट ‘पाहणे’ म्हणतात, हो ना? अर्थात ही क्रिया मानवी डोळ्यातून पाहण्याऐवजी कोळी वा माशीच्या डोळ्याने पाहिल्यास ती फारच वेगळी असेल. अशाच पद्धतीने ‘ध्वनी लहरीं’च्या कंपनातून आपल्याला जो अनुभव येतो, त्याला ऐकणे म्हणतात. मानसिक होलोग्राम हा कोणत्याही प्रकारच्या संवेदना किंवा विचारातून निर्माण होतो.

पाहण्याची प्रक्रिया एखाद्या कॅमेऱ्यासारखी तांत्रिक नसते. ज्यात प्रकाशकण आत येतात, रासायनिक संकेतांमार्फत रूपांतरित होतात आणि त्यातून चित्र तयार होते. ते एकसारखे नसते कारण मानसिक होलोग्रामला ‘संज्ञानात्मक संबंध’ही असतो. तुम्ही चेतनावस्थेत असा किंवा अचेतन अवस्थेत, तुमच्या जाणिवा जागृत असोत किंवा अजागृत, तरीही ते तुमच्या मनाचे संज्ञानात्मक वैशिष्ट्यच असते.

मानसिक कृती ही संगणकासारखीही नसते. तुम्ही संगणकाची बटणे दाबता आणि मशिनमध्ये रासायनिक संकेत जातात. ही माहिती मशिन रूपांतरित करून घेते आणि ती एखाद्या प्रतिकृतीच्या रूपात संगणकाच्या पडद्यावर किंवा स्पीकरवर ध्वनीच्या रूपात अवतरते. तरी संगणकाच्या बाबतीतही काही अंशी संज्ञानात्मक संबंध असतो, कारण कृत्रिम बुद्धीच्या साहाय्याने माहिती प्रसारित होते. तरीही संगणक सजीवांसारखा नसतो. पण नेमकी कोणती गोष्ट आपल्याला संगणकापासून भिन्न ठरवते, तर आपण मानसिक कृतीशी संबंधित आनंद किंवा दुःखाची भावनाही अनुभवत असतो, जी संगणकात नसते. संगणक कोणत्याही गोष्टीसाठी आनंद किंवा दुःखाची भावना अनुभवत नाही. संगणक काही असा विचार करत नाही की, ‘अरेरे, माझ्यात काही अंतर्गत दोष निर्माण झालेला आहे आणि मी जेव्हा रिबूट केले तेव्हा मी काम करत असलेल्या काही फाइल नष्ट झाल्या.’ आणि अशा विचाराने त्याला दुःख होते. हे असे नसते, हो ना? उलट आपल्या बाबतीत असे काही झाल्यास आपण फार दुःखी होतो.

 ही मानसिक क्रिया अशी क्रिया आहे जी आपल्या जीवनात प्रत्येक क्षणी सुरू असते. मनात एखादा होलोग्राम तयार होतो, त्याच्याशी संबंधित एखादी मानसिक गुंतवणूक असते आणि सुख किंवा दुःखाशी संबंधित भावना असतात. अगदी आपण निद्रितावस्थेत असलो तरी, अंधकारमय होलोग्राम असू शकतो आणि त्याच्याशी संबंधित अनभिज्ञतेची भावना असू शकते. पण तरीही त्यात थोडी तरी जाणीव असते, नाहीतर आपण कधीच गजर ऐकू शकलो नसतो. आपली मनोवस्था पूर्ण बंद नसते. आपण स्वप्नं पाहत नसलो तरी तिथे काहीतरी भावना हालचाली असतातच. भलेही त्या ना सुख, ना दुःख अशा तटस्थ भावना असतील. आपण स्वप्न पाहत असू तर अर्थातच क्रोध, लोभ आणि इतर भावनांच्या जोडीला सुखदुःखाच्या भावनाही आपल्यात असतातच. पण या त्रासदायक भावना प्रत्येक क्षणाच्या संपूर्ण प्रक्रियेचा भाग असतीलच, असे नाही.

अर्थात असे अनेक गुंतागुंतीचे विचारप्रवाह असतात, ज्यांच्या मदतीने आपण मानसिक क्रियांच्या मूलभूत शुद्धतेबाबत अधिकाधिक विश्वास बाळगू शकतो. पण त्यावर चर्चा करण्याची ही वेळ नाही. पण आपण याबाबत जितका अधिक विचार करू, मानसिक क्रियांशी संबंधित तणावदायी भावनांपासून मुक्त होणे शक्य असल्याचा विश्वास तितकाच दृढ होत जाईल.

सरतेशेवटी तणावदायी भावनांची व्याख्याच सांगते की त्या जेव्हा उद्भवतात, आपली मनःशांती आणि आत्मनियंत्रण दोनही संपवतात. परिणामी आपण क्रोध, लोभ आणि इतर तणावदायी भावनांच्या आहारी जाऊन बंधनकारक वागतो. त्यातून फक्त समस्याच निर्माण होतात. उदाहरणार्थ, आपण स्वतःवरील नियंत्रण हरवून बसतो आणि दुसऱ्यावर ओरडताना विचार न करता अशा गोष्टी बोलतो, ज्याचा आपल्याला नंतर पश्चाताप होतो. त्यातून ‘नकारात्मक क्षमता’ही विकसित होतात, ज्या दुःखाला कारणीभूत होतात.

जर आपल्याला भविष्यातील समस्या मनापासून दूर ठेवायच्या असतील, तर आपल्याला तणावदायी भावना आणि गोंधळाच्या स्थितीपासून मुक्ती मिळवायला हवी. त्यांच्यापासून मुक्ती मिळवणे शक्य असते कारण त्या मनाचा अंगभूत भाग नसतात किंवा मानसिक कृतीचा भाग नसतात. शिवाय आपण क्षणागणिक अनुभवत असलेल्या अशा प्रकारच्या मानसिक कृतीविषयी अधिक विचार केल्यास लक्षात येईल की मानसिक कृतींचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्या समज वाढवणाऱ्या असतात. आपण गोष्टी समजू शकतो. आपण प्रेम आणि करुणेसारखे सकारात्मक गुण वाढवू शकतो. अशा सकारात्मक क्षमता अधिकाधिक विकसित केल्या जाऊ शकतात.

यात नक्की काय फरक असतो? तणावदायी आणि अस्वस्थ करणारे घटक गोंधळावर आधारलेले असतात. तर सकारात्मक घटक परिस्थितीच्या वास्तविक आकलनावर आधारित असतात. अगदी साधे उदाहरण द्यायचे झाल्यासः गोंधळाची स्थिती म्हणजे असा विचार की, ‘मी विश्वाचा केंद्रबिंदू आहे. मी सर्वात महत्त्वाचा आहे. माझ्याकडे कायम माझा मार्ग असायला हवा. आणि सगळ्यांचे लक्ष माझ्याकडेच असायला हवे.’ इत्यादि. त्यामुळे जेव्हा सगळ्यांचे आपल्याकडे लक्ष नसते आणि गोष्टी आपल्या म्हणण्याप्रमाणे होत नसतील, आपण क्रोधित होतो. एखाद्या कुत्र्याप्रमाणे आपण दुसऱ्यावर भुंकत बसतो किंवा गुरगुरत राहतो. ‘तू मला हवे तसे केले नाहीस.’ अशा पद्धतीचा विचार गोंधळावर आधारलेला असतो. वास्तव हे आहे की आपण सगळे इथे एकसारखे आहोत. प्रत्येकाला त्याच्या मर्जीप्रमाणे गोष्टी व्हायला हव्या असतात आणि ते शक्य नसते. वास्तव हे आहे की आपण कसेतरी इतरांसोबत जगायला शिकायला हवे.

खरा निरोध/निर्मुलन

आपण जितका अधिक शोध घेतो, तितके अधिक आपण पाहू शकतो की आपला भ्रम स्वतःच्या बळावर तग धरू शकत नाही. तो मिथ्या आहे. तर दुसरीकडे योग्य आकलन वास्तव आहे. खरे आहे. त्यामुळेच सत्यावर आधारित आकलन किंवा बोध हा भ्रमाहून अधिक सक्षम असतो. जर आपण एकाग्रता आणि अनुशासनाच्या साहाय्याने सदासर्वकाळ योग्य आकलन विकसित केल्यास भ्रमाला पुन्हा उत्पन्न होण्याची संधी मिळणार नाही. आणि तो संपून जाईल.

आश्रयाला जाण्याचा किंवा शरणागत होण्याचा हा केंद्रबिंदू आहे. आपण आपल्या जीवनाला कोणत्या पद्धतीची दिशी देत आहोत? कोणत्या प्रकारचा अर्थ? आपल्याकडे कोणत्या प्रकारचे उद्दिष्ट आहे? ते उद्दिष्ट म्हणजे सर्व भ्रमांचे ‘खरे निर्मुलन’. सर्व भ्रमांपासून कायमची मुक्ती, जेणेकरून ते पुन्हा उत्पन्न होणार नाहीत. भ्रमच समस्यांचे मूळ कारण असतात, आपण त्यांचा या जीवनाच्या अनुषंगाने विचार केला काय किंवा भविष्यातील जीवनाच्या दृष्टीने केला काय. त्यांच्यापासून कायमची मुक्ती मिळवणे शक्य आहे कारण ते आपल्या मानसिक कृतीचे अंगभूत घटक नाहीत. योग्य आकलनाच्या पर्यायाने त्यांच्यापासून मुक्ती मिळवणे शक्य आहे. भ्रम नष्ट झाले की तणावदायी भावनाही फार काळ टिकत नाहीत आणि आपल्याला समस्या आणि वेदना निर्माण करत नाहीत.

यात दोन घटक अंतर्भूत असतात. पहिला घटक म्हणजे आपण ही त्रासदायक बाजू कायमची संपवू शकतो आणि दुसरा घटक म्हणजे आपण सकारात्मक बाजू विकसित करू शकतो. ही सकारात्मक बाजू म्हणजे योग्य आकलन. हे आपण ‘चार आर्य सत्यां’च्या परिप्रेक्ष्यातून पाहू शकतो, जो बौद्ध शिकवणीचा मुख्य घटक आहे. पहिले सत्य आहे की आपल्याला खरे दुःख असते, ज्याचा संबंध आपल्या जीवनातील विविध प्रकारच्या दुःखांशी असतो. दुसरे सत्य म्हणजे दुःखाला खरे कारण असते. आणि तो आपला भ्रम असतो. तिसरे सत्य म्हणजे आपण सर्व दुःखांचे आणि त्याच्या कारणांचा निरोध किंवा निर्मुलन करू शकतो, जेणेकरून ते पुन्हा उद्भवणार नाहीत. शेवटचे म्हणजे ते सर्व ‘खरा मार्ग’ अवलंबून साध्य करता येऊ शकते.

पण आपण ज्याला ‘मार्ग’ संबोधतो, आपल्याला याचे आकलन होणे आवश्यक असते की ‘योग्य आकलनातून केलेली कृती म्हणजे मार्ग.’ ही ती जाणीव असते, जी खरे निर्मुलन करते. आणि ही जाणीव सर्व तणावदायी घटकांवरचा उतारा म्हणून काम करते.

स्पष्टच आहे की आपण आपल्या जीवनाला हीच दिशा देऊ इच्छितो - ही दिशा खरे निर्मुलन आणि मनाच्या खऱ्या ज्ञानमार्गाची दिशा असते. हाच धर्माचा आश्रय असतो. जेव्हा आपण स्वतःवर काम करत असल्याचे सांगतो, तेव्हा त्या संज्ञेचा अर्थ या संकल्पनेशी निगडित असतो.

आपण या तणावदायी बाजूपासून मुक्तीसाठी आणि सकारात्मक बाजूच्या क्षमतांच्या जाणिवांसाठी अधिकाधिक प्रयत्न करत असतो. आपण असे करतो कारण आपल्यात योग्य प्रकारचे भय असते की आपण असेच काम करत राहिलो आणि आपण भरपूर पैसा कमावला, खूप मित्र मिळविले, खूप प्रसिद्धी मिळवली तरी आपल्याला समस्या असणारच आहेत. कारण तरीही आपण लोभी आणि असुरक्षित असणार आहोत. आपण क्रोधित होणार असतो. आणि अशाच इतर भावनांच्या आहारी जाणार असतो. इथे आपल्याला भय वाटत असले तरी यातून मुक्ती मिळवणे शक्य असल्याची जाणीवही होते. हे थोडेसे आगीपासून भाजले जाण्याच्या भीतीसारखे असते, पण आपल्याला माहिती असते की आपण काळजीपूर्वक वागलो तर आगीपासून स्वतःचे संरक्षण करू शकतो. इथे भय असते, पण ते स्वस्थ किंवा सकारात्मक भय असते. इथे आपण विभ्रमावस्थेविषयी बोलत नाही.

जर आपण सतत चिडखोर वागत राहिलो, विशेषतः आपल्या नातलगांवर किंवा मित्रांवर आरडाओरड करत राहिलो, तर आपल्यालाच जाणीव होईल की आपण वृद्ध झाल्यावर आपले काय होईल? आपण अशी वृद्ध व्यक्ती असू की कुणालाच त्याला भेटावे वाटणार नाही किंवा त्याची काळजी करावी वाटणार नाही कारण आपल्यासोबत असणे इतरांना त्रासदायक वाटेल. आपण फक्त तक्रार करत असू आणि आरडाओरड करत असू, तर कुणाला आपल्यासोबत राहावेसे वाटेल? कुणीच राहणार नाही. त्यासाठी म्हातारपणी काळजी घेतील म्हणून फार मुले जन्माला घालणे किंवा चांगली नर्सिंग सेवा मिळावी म्हणून तरुणपणी खूप पैसा कमावून ठेवणे हा पर्याय असू शकणार नाही, कारण तरीही आपली परिस्थिती वाईटच असेल. आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट करावी लागेल, ती म्हणजे स्वतःच्या व्यक्तिमत्त्वावर काम करणे आणि आपली भाषा एकदम सौम्य व सभ्य ठेवणे.

प्रत्येकात परिवर्तनाची क्षमता असते

आपण अनेकदा असा विचार करतो की आपले व्यक्तिमत्त्व अपरिवर्तनीय आहे आणि आपण असेच आहोत. ‘मी गरम डोक्याचा आहे, आणि तुला माझ्यासोबत तसेच जुळवून घ्यावे लागेल.’ असे वागणे उपयोगी ठरेल का, नाही ना? त्यामुळे अशा तणावदायी बाजूपासून मुक्ती मिळवून आपल्यातील चांगल्या गुणांची जाणीव विकसित करणे शक्य आहे. आपण स्वतःवर काम केले नाही तर आपले काय होईल, अशी भयाची सकारात्मक जाणीव, शिवाय आपल्या तणावदायी घटकांपासून मुक्ती मिळवून सकारात्मक घटक विकसित करणे शक्य असल्याचा विश्वास बाळगल्यास आपण जीवनाला सुरक्षित दिशा देऊ शकतो.

जर आपण हे ‘महायान’ पद्धतीने करू इच्छित असू तर त्याला करुणेची जोडही देतो. महायान दृष्टिकोन स्पष्टता देतो की जर आपण एखाद्यावर रागावलेले असू तर आपण त्याची मदत कशी करणार? आपल्याला प्रामाणिकपणे इतरांची मदत करावी वाटते आणि आपल्याला भीती वाटते की आपल्यातील त्यांच्याबाबतच्या क्रोध, आसक्ती, असूया यासारख्या भावनांमुळे गोष्टी बिघडवू.

आपण या सर्व तणावदायी भावनांपासून आणि गोंधळापासून मुक्ती मिळवणे गरजेचे असते, जेणेकरून आपण इतरांसाठी मदतगार ठरू. ही अशी भावना आहे, ज्यात आपल्याला इतरांची मदत करण्यायोग्य होण्याची प्रामाणिक इच्छा असेल, पण आपल्याला भीतीही असते की कदाचित आपल्याकडून फार मदत होणार नाही. आपल्याकडे पुरेसा संयम नसतो किंवा आपल्याकडे पुरेशी समजही नसते. आपल्याला भीती असते की आपण मदत करण्याऐवजी कदाचित नुकसानच पोहचवू. कदाचित आपण आपल्याला मुलांच्या संगोपनातही यशस्वी होणार नाही, अशी भीती वाटत असते. अशी भावना फारच वाईट आहे, हो ना? पण ती भीती आपल्याला स्वतःवर काम करायला लावते आणि जीवनात योग्य व सुरक्षित मार्गावर नेते.

खरेच हा धर्म दैनंदिन जीवनात फारच उपयुक्त आहे. आश्रयाच्या संकल्पनेतून पाहिल्यास त्याचा संबंध आपल्या समस्या आणि वेदनांशी प्रामाणिक राहण्याशी आहे. आपल्या प्रत्येकालाच त्या असतात. आपल्या सर्वांकडे या तणावदायी भावना असतात. त्यात काही विशेष नाही. कदाचित अनेक प्रकारच्या वैविध्यामुळे काही तीव्र असतील, काही कमी तीव्र असतील. इथे आपण एखाद्या गंभीर स्वरूपाच्या मानसिक रुग्णाविषयी बोलत नाही आहोत. आपण सर्वसाधारण सामान्य माणसाविषयी बोलत आहोत. पण यातीलही धोका हा आहे की ज्याला आपण सामान्य म्हणतो त्यातही कधीतरी रागावलेले असणे, लोभी, स्वार्थी आणि मत्सरी वागणे ग्राह्य धरले जाईल. आपल्याला वाटते की हे सामान्य आहे. पण हे सामान्य नाही कारण त्यातून आपल्यासाठी आणि ज्यांची आपल्याला मदत करायची आहे त्यांच्यासाठीही समस्या निर्माण होतात.

आपले उद्दिष्ट आपल्या रागासोबत जगण्याचे किंवा राग आत धुमसत असताना त्याला नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करण्याशी संबंधित नाही. आपले उद्दिष्ट तो राग दुबळा करण्याचेही नाही, तर अशा सर्व तणावदायी भावनांपासून मुक्ती मिळवण्याचे आहे. आपल्याला काही क्षणापुरती समज विकसित करायची नाही, तर वास्तवाचे अर्थात आपल्या अस्तित्वाचा आधार काय, इतरांच्या अस्तित्वाचा आधार काय किंवा संपूर्ण जगाच्या अस्तित्वाचा आधार काय, याचे पूर्ण आकलन करून घ्यायचे आहे. हे सर्व शक्य आहे कारण मानसिक कृती ही मूलतः नितळ असते आणि त्यात चांगल्या गुणांच्या सर्व शक्यता असतात.

जेव्हा आपण सुरक्षित दिशेने नेणाऱ्या घटकांविषयी किंवा आश्रयाविषयी बोलतो, तेव्हा त्याचा संबंध बुद्ध, धर्म आणि संघाशी असतो. हे तीनही घटक समजून घेण्यासाठी अनेक पातळीवरील आकलन गरजेचे असतेः प्रत्येकाला प्राथमिक स्तर असतो, सखोल स्तर असतो आणि काही असे असते, ज्यातून यांचं दर्शन होतं. प्रथम आपण प्राथमिक स्तरावरील सद्गुण पाहुयात.

बुद्धाच्या शरीरात काही असामान्य शारीरिक क्षमता आणि खास वैशिष्ट्ये असतात. उदाहरणार्थ, बुद्ध एका क्षणात कोठेही जाऊ शकतात, आपल्या शरीरापासून अगणित शारीर रूपं धारण करू शकतात आणि एकाच वेळी त्यांचं अनेक ठिकाणी अस्तित्व असू शकतं. हे सर्व थोडंसं काल्पनिक वाटू शकतं आणि अविश्वसनीयही आहे. शिवाय जेव्हा बुद्ध बोलतात, तेव्हा प्रत्येक जण त्याचं आपापल्या भाषेत आकलन करून घेऊ शकतो आणि ते कितीही दूर असले तरी बुद्धांचे म्हणणे ऐकू शकतात. त्याहून अधिक म्हणजे बुद्ध हे सर्वप्रेमी सर्वज्ञ असतात, जे सर्वांना समान प्रेम करू शकतात आणि त्यांना एकाच वेळी सर्व गोष्टींचे ज्ञान असते.

हे वर्णन फारच काल्पनिक अविश्वसनीय वाटू शकते. त्यामुळे जर आपण या एकाच पातळीवर बुद्धांकडे पाहिल्यास त्यांची चुकीची प्रतिमा निर्माण होण्याचा धोका आहे. हे एखाद्या अद्भुत शक्तीसारखे वाटते, अगदी देवासारखे, हो ना? पण बुद्ध सर्वज्ञ आहेत, याचा अर्थ असा नाही की या पृथ्वीवरील प्रत्येकाचा फोन नंबर त्यांना माहीत आहे, तर बुद्धांना प्रत्येका भोवतीच्या स्थितीची कारणे आणि त्यांच्यावर परिणाम करणारे घटक माहीत आहेत. जेव्हा बुद्ध एखाद्या व्यक्तीला एखादी शिकवण देतात, तेव्हा बुद्धांना त्याच्या भोवतीची परिस्थिती, त्या व्यक्तीवर होणारा परिणाम आणि त्याच्या संपर्कात येणाऱ्या इतर व्यक्तींवर होणाऱ्या परिणामांबाबतही ज्ञान असते. परिणामी, बुद्धांना शिकवण देण्याची योग्य पद्धत ज्ञात असते. हे फारच छान आहे, हो ना? असे करणे खरेच छान गोष्ट असेल.

आपल्याला या गोष्टीचा विश्वास असतो की बुद्ध ज्ञानी आहेत आणि आपल्या मदत करण्याच्या मार्गांचे त्यांना ज्ञान आहे. बुद्धांना माझी भाषा समजते, त्यामुळे जेव्हा जेव्हा मला गरज असेल, तेव्हा ते मदतीला धावतील. जर आपण बुद्धांना देव समजण्याच्या दिशेने जात असू, तर ते थोडंसं व्यक्तिगत ठरेल. ‘ते वैयक्तिक पातळीवर माझी मदत करतील, ते मला समजून घेतील. मला कोणीच समजून घेत नाही.’ पण आपल्याला जाणीव असते की बुद्धांना सर्वांबाबत समान प्रेम आहे. ‘हे छानच आहे. तरीही त्यांचे इतरांपेक्षा माझ्यावर अधिक प्रेम असल्यास जास्त चांगले होईल. असो. तरीही हे ठीकच आहे.’ बुद्धांचे सर्वांवर समान प्रेम आहे आणि सर्वात समाधानाची गोष्ट ही आहे की आपण काय करतो, या गोष्टीने त्यांच्या प्रेमावर परिणाम होत नाही. आपल्याला बुद्धांपुढे प्रार्थना करून प्रसाद द्यावा लागत नाही. बुद्ध तरीही आपली मदत करणार आहेत. हे फारच किफायतशीर झाले. आपल्याला काहीही पैसा खर्च करायचा नाही. कसला भारी सौदा आहे. शिवाय बुद्धांकडे अत्यंत संयम असल्याने आपण दुसऱ्या परंपरेतील दुसऱ्या एखाद्या गुरूकडे गेल्यास त्यांना मत्सर वाटणार नाही. आणि ते क्रोधित होऊन वज्रपात करणार नाहीत किंवा आणखी कुठला दंड देणार नाहीत, त्यामुळे हे अगदी सुरक्षित आहे.

जाणीवपूर्व असेल किंवा अजाणता केलेली असेल, पण ही एक सामान्य चूक आहे. आपण बुद्धाला देवाच्या जागी पाहतो ज्याच्याशी सुरक्षित मोलभाव करता येऊ शकतो. बुद्ध तुम्हाला कधीच निराश होऊ देणार नाहीत, अशा स्वरूपाच्या गोष्टी शिकवणीत सांगितल्या जातात. त्या ऐकायला छान वाटतात. पण त्यातील आपण ही गोष्टही वाचायला हवी की पायातून काटा काढावा, तसे बुद्ध तुम्हाला तुमच्या वेदनेतून बाहेर काढू शकत नाहीत. बुद्ध सर्वशक्तिमान नसतात. पण आपण ते गांभीर्याने घेत नाही. तो एखाद्या बुद्धाबाबत विचार करण्याचा सामान्य दृष्टिकोन किंवा बुद्धाचा प्राथमिक स्तर असतो. पण सखोल आकलनाच्या स्तराशिवाय त्याला तसेच सोडून दिल्यास बुद्धाला देव समजून तो आपले रक्षण करेल, असा धोकादायक विचार कायम राहू शकतो.

बुद्धांना मूर्ती आणि चित्रांमधून सादर केलं जातं. ठीक आहे. ते दर्शनीय असते. पण आपण त्यांना एखाद्या पारंपारिक ख्रिस्ती प्रतिमांप्रमाणे समजणार आहोत का? हे काय आहे? आपण मूर्तीपूजा करणार आहोत का, असा मुस्लिम आरोप करू शकतात? आपले नक्की काय चालले आहे? आपल्याला खरंच मूर्तीपुढे नतमस्तक होण्याची गरज असते का? मला वाटते, जर आपण बुद्धाबाबतचे आकलन प्राथमिक स्तरावरच सोडणार असू, तर त्यातून फारच समस्या उद्भवतील. इथे गैरसमज होण्याला वाव आहे. काही लोकांसाठी बुद्धांना अशा पद्धतीने समजून घेणे फायद्याचे ठरू शकते, पण ते सखोल आकलन नाही. त्या पातळीवर, त्यांची अगदी मूर्ती आणि चित्रांमधून दर्शवली जाणारी देव-सदृश प्रतिमा निर्माण होऊ शकते आणि आपण त्या प्रतिमेची प्रार्थना करण्याची शक्यता असते.

धर्माचे प्राथमिक स्तरावरील सद्गुण

धर्माचा प्राथमिक स्तर म्हणजे त्यातील सर्व शिकवणी. ज्यांचे बुद्धांना ज्ञान झाले आणि त्यांनी त्यांची शिकवण दिली. याबाबतचा सर्वसामान्य समज असा असू शकतो की बुद्ध आमचा व्यक्तिगत देव आहे आणि आमच्याकडे आमचा धर्मग्रंथ आहे. बायबल किंवा कुराणाच्या जागी बुद्धाचा धर्मग्रंथ. जणू बुद्धाचे बायबल आणि त्यातील प्रत्येक शब्द आम्ही पवित्र मानतो. हो, आपल्याला त्याच्याबद्दल आदर असायला हवा; पण बुद्ध स्वतः म्हणतातः ‘मी जे काही आत्ता सांगितले त्यावर निव्वळ आदरापोटी विश्वास ठेवू नका, पण सोने घेताना पारख करावी, तसे ते तपासून पाहा.’ बुद्धांनी नेहमी आपल्याला अनुयायांना त्यांच्या शिकवणीची चिकित्सा करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. पण आपण आळशी असलो की आपल्याला सगळ्याची चिकित्सा करायला आणि गोष्टी तपासून पाहायला आवडत नाहीत. अगदी दैनंदिन जीवनाच्या संदर्भातून पाहिल्यास याचे महत्त्व असते की, बुद्धाचे आपल्यावर प्रेम आहे, तो आपल्याला समजून घेतो आणि या पवित्र ग्रंथात ते सर्व नियम आहेत, ते आपण पाळायला हवेत. अर्थात दैनंदिन जीवनात याचे महत्त्व असते, पण तो खरा बौद्ध धर्म नाही. काही लोकांसाठी हे उपयुक्त असू शकते, पण बौद्ध धर्माला ख्रिस्ती धर्माचेच दुसरे रूप करण्याचा उद्देश नसावा.

संघाचे प्राथमिक स्तरावरील सद्गुण

आता संघाची काय स्थिती आहे? दुर्दैवाने, पश्चिमी जगतात आम्हाला सवय लागून गेली आहे की एखाद्या धर्म केंद्रात जाणाऱ्या सदस्यांनाच आम्ही ‘संघ’ म्हणतो. संस्कृत किंवा तिबेटी भाषेत या शब्दाचा अर्थ अर्थातच असा अपेक्षित नाही. पण अनेक लोकांसाठी ‘संघा’चा संदर्भ फक्त आपल्या धार्मिक सभा आणि आपल्या बौद्ध चर्चपर्यंतच मर्यादित असतो. आणि जर हे लोक तणावग्रस्त लोक असतील, तर आपण त्यांच्या आश्रयाला जाऊ शकू का? अर्थात माझा असा हेतू नाही की समान उद्दिष्टांसोबत काम करणारा आध्यात्मिक समुदाय जर आपल्याला साहाय्यक ठरू शकत असेल, तर त्याचं महत्त्व कमी करावे. ते अर्थातच फार महत्त्वाचे असते. पण तो आश्रयाचा घटक नाही.

संघाच्या दुसऱ्या पातळीवर आपण त्याला बौद्ध भिक्खु आणि भिक्षुणी असलेला मठीय समुदाय समजू शकतो. पण तिथेही आपण आदर्श भिक्खु आणि भिक्षुणी शोधू शकत नाही, हो ना? तिथे काही अतिशय तणावग्रस्त लोक असतात, जे धार्मिक वस्त्रे परिधान करत असतील. तरीही त्यांच्याबाबत आदर बाळगणे आणि त्यांचे समर्थन करणे आवश्यक आहे कारण ते दिक्षा घेऊन स्वतःवर काम करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. पण काही भिक्खु आणि भिक्षुणी जीवनातील समस्यांपासून पळ काढण्यासाठी किंवा माझा एक मित्र सांगतो त्याप्रमाणे दुपारचे अन्न मोफत मिळवण्यासाठी धार्मिक वस्त्रे परिधान करतात.

संघाची आणखी एक पातळी आहे. कदाचित आपण तंत्रगुरूंकडून ऐकले असेल की संघाला ‘तांत्रिक देव-देवता’ही संबोधले जाते, जसे आपल्याकडे चेन्रेझिग तारा, मंजुश्री किंवा अशा प्रकारचे इतर संदर्भ आहेत. आणि आपण कदाचित परमपूज्य माता संत तारांची प्रार्थना करू आणि ती आपले रक्षण करेल. अर्थात या बौद्ध प्रतिमा, मी ज्यांना तथाकथित तांत्रिक देव-देवता म्हणतो, ते असे संत नाहीत, जे आपल्याला भगवान बुद्धापर्यंत पोहचवणारे मध्यस्थ म्हणून साहाय्यक ठरतील.

बुद्ध, धर्म आणि संघाचा सखोल अर्थ

आपण जर बुद्ध, धर्म आणि संघाच्या सखोल अर्थाकडे पाहिल्यास, धर्म म्हणजे आपल्या सर्व भ्रमांचे समूळ निवारण आहे आणि आपल्या मानसिक स्थितीच्या सातत्यपूर्ण अवस्थेसाठी मनाच्या मार्गांचे योग्य आकलन म्हणजेही धर्म होय. तोच खरा धर्म आहे. जर आपण आपल्या मानसिक सातत्यासाठी त्याचा अवलंब केल्यास तोच आपल्याला वेदनेपासून मुक्त करेल. आपण आपले भ्रम, तणावदायी भावना, दृष्टिकोन आणि समस्यांपासून मुक्ती प्राप्त करून आणि पूर्ण ज्ञान प्राप्त करून या अवस्थेला पोहचू शकतो. बुद्धांनी हे साध्य केलेले असते आणि ते आपणही साध्य करावे, यासाठी ते आपल्याला त्याची शिकवणही देतात. संघाचा संबंध खरेतर ‘आर्य संघ’ संकल्पनेशी आहे. जे उच्चस्तरीय सिद्धी प्राप्त साधक आहेत, ज्यांनी पूर्ण नसलं तरी काही अंशी तरी दुःखाचं निवारण केलं आहे आणि ज्ञान प्राप्त केलं आहे. तुम्ही पाहाल की खरेतर भ्रमाच्या अशा अनेक पातळ्या आहेत, ज्यापासून आपल्याला मुक्ती मिळवायची आहे आणि ज्ञानप्राप्तीच्या अनेक प्रगतीशील सक्षम पातळ्या आहेत, ज्या साध्य करायच्या आहेत. मुक्ती मिळवण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्यांमध्ये साध्य होते. आर्य संघानेही त्यापासून पूर्ण अंशाने मुक्ती मिळवलेली नाही, तर काही प्रमाणात ते साध्य केले आहे. आणि ते इतर गोष्टी साध्य करण्याच्या मार्गावर आहेत.

आपल्या दैनंदिन जीवनात, पूर्वीचे आणि काही अंशी वर्तमानातीलही बुद्ध आणि आर्य संघ, हे भारतीय आणि तिबेटी धर्मगुरू प्रेरणादायी आहेत. त्यांच्याकडूनच आपल्याला आशेचा किरण मिळतो. आपण अशा काही गुरूंना पाहू शकतो किंवा परमपूज्य दलाई लामांसारख्या गुरूंना पाहू किंवा भेटू शकतो. ते आत्ता जसे आहेत, ते त्यांनी कसे साध्य केले असेल? ते धर्माच्या माध्यमातून शक्य झालेले आहे. त्यांना बुद्धत्व प्राप्त झाले आहे की नाही, ते फार महत्त्वाचे नाही. आपण त्यांच्यासारखे बनू शकलो तर ती आपल्यासाठी फारच चांगली गोष्ट ठरेल. मी इथे फक्त त्यांच्या धर्माच्या क्षेत्रातील शिकवणीच्या क्षमतेच्या परिप्रेक्ष्यातून किंवा ते तज्ज्ञ आहेत, उच्च प्रशिक्षित आहेत आणि कोणत्याही गुरूपेक्षा विद्वत्तापूर्ण आहेत, या विषयी बोलत नाही. ते ज्या रीतीने आपल्या वेळेच नियोजन करतात, बौद्ध शिकवणीच्या प्रसारासाठी जगभर प्रवास करतात, त्या विषयीही मी बोलत नाही. पण त्याहूनही अधिक म्हणजे ते चीनचे एक नंबरचे शत्रू आहेत. तुम्ही कल्पना करू शकता का की, अब्जावधी लोक तुम्हाला दैत्य समजत असतील आणि तुमच्या लोकांच्या विरोधात नाना प्रकारची कटकारस्थाने करत असतील, तरीही तुम्ही त्यांच्याविषयी प्रेम आणि करुणा बाळगू शकाल? ते अस्वस्थ नाहीत, शिवाय शांत आणि आनंदी मनाने ज्या गोष्टी करणे शक्य आहेत, त्या सर्व गोष्टी ते करू शकतात. हे अविश्वसनीय आहे, हो ना? हे सर्व प्रकारच्या तणावदायी भावनांपासून मुक्ती मिळवल्याशिवाय व ज्ञानप्राप्तीशिवाय कसे शक्य होईल? हे शक्यच नाही. त्यामुळे ते बुद्धत्व प्राप्त करण्याच्या मार्गावर आहेत की नाहीत, याविषयी विचार करण्यात काही अर्थच नाही.

शक्यता आहे की आपण बुद्धाच्या सर्व गुणांची पारख करू शकणार नाही, पण आपण परमपूज्य दलाई लामांसारख्या महापुरुषांच्या गुणांची पारख करू शकतो. ते खरेच प्रेरणादायी आहे. प्रामाणिक मन आणि त्याच्या सर्व क्षमतांसह, त्यांना ज्ञानप्राप्तीच्या त्या पातळीवर जाणे शक्य असेल तर ते आपल्याला साध्य न होण्याची काहीच कारणे नाहीत. आणि ते सर्वांना साध्य न होण्याचीही कारणे नाहीत. अर्थातच त्यासाठी अपरिणित कष्ट करावे लागतील, पण ते शक्य आहे आणि त्या दिशेने प्रवास करणेही लाभकारी आहे. जर आपण दलाई लामांना बुद्ध सदृश मानले तर त्यांना प्रशिक्षण देणारे काही लामा, ज्यांच्याकडे दलाई लामांचे सर्व गुण नसतीलही, पण ते संघसदृश असतात, त्यांच्याच संघाचे गुण असतात. ते सुद्धा फार प्रेरणादायी असतात.

दलाई लामा आणि इतर गुरूंमध्ये काय साम्य आहे? त्यांनी क्रोध, लोभ, घृणा, मत्सर आणि अशा पद्धतीच्या भावनांपासून मुक्ती मिळवलेली आहे. त्यांनी ज्ञान, करुणा, संयम यासारखे अगणित सद्गुण प्राप्त केले आहेत. या विविध लामांच्या माध्यमातून आपण समजू शकतो की या सद्गुणांना वेगवेगळ्या पातळ्यांनुसार साध्य करणे शक्य आहे. मला तर वाटते की बुद्ध, मिलारेप्पा आणि इतर ऐतिहासिक उदाहरणांच्या तुलनेत, ज्यांना समजून घेणे आपल्यासाठी तुलनात्मक दृष्ट्या अधिक कठीण आहे, त्यांच्या पेक्षा हे लोक (जर आपल्याला त्यांचा संपर्क लाभला असेल) आपल्यासाठी जिवंत उदाहरणासारखे आहेत. त्यांच्या बाबतीतल्या प्रचलित कथा आपल्याला रसपूर्ण वाटू शकतात, पण तसा कोणी व्यक्ती होता, यावर आपण विश्वास ठेवू शकू का? आपण वाचतो की गुरू रिंपोछेंचा जन्म कमळातून झाला आहे आणि आपण यावर विश्वास ठेवू शकतो का? हे समजायला जरा कठीणच आहे. परंतु त्याऐवजी आपण नकारात्मक गुणांचा अभाव आणि सकारात्मक गुणांच्या साध्यतेवर लक्ष केंद्रित करू शकतो, ज्याचे उदाहरण दलाई लामा आणि इतर महान गुरूंनी घालून दिले आहे, ते आपल्यासाठी बुद्ध आणि संघासारखे आहेत. आपल्याला जाणीव होते की आपल्यामध्येही ते साध्य करण्याची पात्रता आहे, तोच धर्म आहे आणि दुःखाचे समूळ निवारण व मनाचे प्रामाणिक मार्ग ही साध्य करता येण्याजोगी उद्दिष्टे आहेत. आपल्याला ते साध्य करणे शक्य आहे आणि ते आपल्याला जीवनातील सुरक्षित, स्थिर आणि अर्थपूर्ण दिशा प्राप्त करून देऊ शकतात.

आश्रय किंवा दैनंदिन जीवनातील सुरक्षित दिशा

व्यावहारिक पातळीवर बुद्ध, धर्म आणि संघाची दिशा आपल्या जीवनात स्वीकारायची म्हणजे नक्की काय? याचा अर्थ आपण सतत स्वतःवर काम करत राहण्यासाठी प्रयत्नशील आहोत. ते करत असताना, समजा आपण दुःखी झालो, रागावलो किंवा स्वार्थी वागलो तर त्याबाबत आपण अधिकाधिक सजग होतो. आपल्याला ते लक्षात येतं. पण याचा अर्थ असा नाही की आपण स्वतःबाबत फार दुःखी होऊन स्वतःला या विचाराने दंड द्यावा की, ‘मी फारच वाईट आहे कारण मी अजूनही क्रोधित होतो.’ तसे अजिबातच नाही. किंवा निश्चितच असेही नाही की त्याला आपण सामान्य गोष्ट समजावं. त्या स्थितीत आपण फक्त त्याची नोंद घेतो आणि विचार करतो की, ‘मग काय झालं? मी असाच असणार आहे.’ ते असेही नाही. पण आपल्यातील तणावदायी भावनांची जाणीव असणे आणि त्यांच्यापासून मुक्ती मिळवण्याचा विचार करण्यानेही नकारात्मक भावनांचा प्रभाव कमी होतो.

मुद्दा हा आहे की आपल्या दैनंदिन जीवनात जेव्हा हे नकारात्मक विचार मनात येतात आणि आपल्याला त्यांची जाणीव होते, तेव्हा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्यापासून मुक्ती मिळवण्यासाठीच्या पद्धतींचा अभ्यास करावा. आपल्याला सजग असायला हवे की आपल्याला राग येत असेल तेव्हा आपल्याला स्वतःमध्ये संयम विकसित करायला हवा. जेव्हा कुणी आपल्याशी वाईट वागत असेल तर त्याचा अर्थ ते आपल्यामुळे दुःखी आहेत. एखादी गोष्ट त्यांना सलते आहे. त्यामुळे न रागावता त्यांच्या बद्दल थोडी करुणा बाळगा.

थोडं अधिक स्पष्ट करायचं झाल्यास, आपण अशा बाजूला असता कामा नये की आपल्याला राग येतो म्हणून आपण स्वतःवरच क्रोधित व्हावे. किंवा दुसऱ्या बाजूला आपण स्वतःला , जाऊ दे, सर्व ठीक आहे, असा विचार करून एखाद्या लहान मुलाप्रमाणेही वागवणार नाही. पण आपण स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळवणार आहोत कारण ते करणे शक्य असल्याची आपल्याला जाणीव आहे. कदाचित त्यात आपल्याला लगेच यश मिळणार नाही आणि खात्रीशीरपणेच आपल्याला त्यापासून मुक्ती मिळवण्यात लगेच यश मिळणार नाही. पण ही एक दिशा आहे, ज्या दिशेने चालण्याचा आपण जीवनभर प्रयत्न करू शकतो. आपण तसे करणार आहोत कारण आपल्याला माहिती आहे की ते करणे शक्य आहे. हा त्या दिशेने जाण्यासाठीचा एखादा निष्फळ आदर्शवादी मार्ग नाही.

जर आपण एखाद्या प्रतिकूल परिस्थितीत, थोड्या जरी संयमाने घेतले, थोडी सजगता दाखवली, थोडी जरी उदारता दाखवली, तर आपल्याला जाणीव व्हायला हवी की आपण या भावना वृद्धिंगत करायला हव्या. आपण त्या अधिकाधिक सक्षम करायला हव्या. तसे करणे शक्य आहे. इतरांनी ते साध्य करून दाखवले आहे आणि आपणही ते करू शकतो. इतरांमध्येही काही वेगळे विशेष गुण नाहीत आणि आपल्यातही. हा आपला आश्रय आहे, हीच आपली जीवनातील सुरक्षित दिशा आहे कारण आपण जितके अधिक या दिशेने जात राहू, तितके आपण स्वतःचे समस्यांपासून संरक्षण करू शकू.

सारांश

 आपल्याला आश्रय, सुरक्षित दिशा म्हणजे काय आणि त्याचे आपल्या जीवनातले महत्त्व समजून घ्यायला हवे. ही बौद्ध अभ्यासातील सर्वात महत्त्वाची आणि मूलभूत गोष्ट समजली जाते. पण अनेक लोक त्याच्या महत्त्वाला कमी लेखतात, हे फारच लाजिरवाणे आहे. आपल्या जीवनात या दिशा असणं किंवा नसणं फार महत्त्वाचा बदल मानला जातो आणि त्यामुळे आपल्या जीवनात फार मोठे परिवर्तनही घडते. आश्रयाचा अर्थ असा नाही की एखाद्या समारंभाला गेलो, थोडे केस कापले, तिबेटी नाव धारण केले, गळ्याभोवती लाल धागा धारण केला आणि एखाद्या समुदायाचा भाग झालो. हे त्याचे महत्त्व कमी करण्यासारखे आणि पूर्ण प्रक्रियेला अर्थहिन करण्यासारखे आहे.

आपण स्वतःला प्रश्न विचारायला हवा कीः ‘आश्रय घेतल्यानंतर आणि बौद्ध झाल्यानंतर, मी खरेच जीवनात त्या दिशेचा अंगीकार केला आहे का? केवळ समुदायाचे सदस्यत्व घेण्यापलिकडे याचे माझ्या जीवनात काय महत्त्व आहे.’ जर आश्रय घेण्याने आपल्या जीवनात काही फरकच पडलेला नसेल, तर आपण त्यावर गांभीर्याने काम करायला हवे. ही मूलभूत गोष्ट समजल्याशिवाय कोणत्याही अद्ययावत अभ्यासाचा अंगीकार केल्याने यश मिळण्याची शक्यता फारच धुसर आहे.

Top