प्रामाणिकता, विश्वास आणि मैत्री

Study buddhism dalai lama oa

सुख म्हणजे काय?

प्रत्येकाला सुखी जीवन हवे असते, मग प्रश्न येतो, सुख म्हणजे नक्की काय? शाश्वत आणि खरे सुख म्हणजे नक्की काय? यावर आपल्याला सखोल विचार करण्याची आवश्यकता आहे. इंद्रियांच्या माध्यमातून मिळणारे सुख किंवा आनंद – जसे काही चांगले पाहणे, चांगले ऐकणे आणि स्वादिष्ट भोजन आणि सुगंध अनुभवणे – यातून आपल्याला सुख प्राप्ती होते. पण हे इंद्रियसुख फार वरवरचे आणि उथळ असते. जोपर्यंत विशिष्ट सुखसोयी उपलब्ध असतात, तोपर्यंतच हे सुख टिकून असते. पण एखादी मोठी अस्वस्थ करणारी घटना वा स्थिती समोर आल्यास, हे सुख नाहीसे होते. किंवा तुम्ही लोकांना टीव्ही पाहण्यातून मिळणारे सुख पाहू शकता, टीव्ही नसेल तर तासाभरात त्यांना कंटाळा यायला लागतो. काही लोकांना पर्यटनातून, जगातील विविध पर्यटन स्थळांना भेटी देण्यातून, नव्या जागा, नवी संस्कृती, संगीत आणि नव्या चवी अनुभवण्यातून सुख मिळते. मला वाटते हे सर्व मनाला प्रशिक्षित करून मनःशांती निर्माण करता येत नसल्याच्या अभावातून येते.

पण जे लोक वर्षानुवर्षे एकांतवासी आणि संन्यस्त जीवन जगतात, ते निरंतर सुखी जीवनाचा अनुभव घेतात. एकदा बार्सेलोना येथे माझी एका ख्रिस्ती धर्मगुरूंशी भेट झाली. त्यांचे इंग्लिश माझ्यासारखेच होते. आणि त्यामुळे मी त्यांच्याशी बोलताना अधिक धाडसाने बोलत होतो. आयोजकांनी मला सांगितले की त्या धर्मगुरूंनी पाच वर्षं डोंगरदऱ्या आणि शिखरांमध्ये व्यतीत करत संन्यस्त जीवन अंगीकारले होते. मी त्यांना विचारले की त्यांनी डोंगरांमध्ये काय केले? तेव्हा त्यांनी सांगितले की त्यांनी प्रेम या विषयावर चिंतन आणि ध्यानधारणा केली. त्यांनी हा उल्लेख केला, तेव्हा त्यांच्या डोळ्यात वेगळीच चमक होती, जी निर्देशित करत होती की त्यांनी खरोखरच मनःशांती अनुभवली होती. तर हे एक इंद्रियसुखांवर आधारित नसलेल्या, पण विशिष्ट मूल्यांच्या मशागतीतून लाभलेल्या मनःशांतीचे उदाहरण आहे. प्रेमाबाबत निरंतर ध्यानधारणा करण्याने त्यांच्यात खरी शांतता विकसित झाली आहे.

त्यामुळे मी माझ्या भाषणातून या मुद्दावर नेहमी भर देतो की, भौतिक विकास शारीरिक समाधानासाठी फार गरजेचा असेल, पण भौतिक मूल्ये मानसिक समाधान कधीच देऊ शकत नाहीत. काही वेळा लोक श्रीमंत झाल्यावर अधिक लोभी होतात आणि अधिक तणाव ओढवून घेतात. परिणामी माणूस दुःखी होतो. त्यामुळे सुखी जीवनाच्या प्राप्तीसाठी फक्त भौतिक मूल्यांवर विश्वास ठेवू नका. भौतिक मूल्ये आवश्यक असतात, पण त्याहीपलीकडे आपल्याला आंतरिक मूल्यांचा गांभीर्याने विचार करायला हवा. आपण धार्मिक असो वा नसो, माणूस म्हणून आपल्यासाठी आत्मशांती महत्त्वाची आहे.

मनःशांती आणि निरोगी स्वास्थ्य

काही शास्त्रज्ञांच्या मते,  त्यांच्या संशोधनानुसार अती तणावामुळे रक्ताभिसरणाच्या समस्यांसोबतच अनेक प्रकारचे विकार उत्पन्न होतात. आणि काही वैद्यकीय शास्त्रज्ञ सांगतात, सततची भीती, क्रौध आणि तिरस्कारामुळे रोगप्रतिकारशक्तीवर विपरित परिणाम होतो. म्हणून निरोगी स्वास्थ्यासाठीचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे मनःशांती होय. कारण उत्तम आरोग्य आणि उत्तम मन यांचा निकटचा संबंध आहे. माझ्या स्वतःच्याच उदाहरणावरून सांगायचे झाल्यास दोन वर्षांपूर्वी एका पत्रकार परिषदेत एका माध्यम प्रतिनिधीने मला माझ्या पुनर्जन्माविषयी विचारले. मी त्याच्याकडे गमतीशीरपणे पाहिले, माझा चश्मा उतरवला आणि त्याला विचारले, “माझ्या चेहऱ्याकडे पाहून तुम्हाला काय वाटते, माझा पुनर्जन्म लगेच व्हायला हवा की तशी गरज नाही?” आणि त्याने सांगितले की, काही घाई नाही.

काही दिवसांपूर्वी मी युरोपमध्ये होतो आणि माझे काही मित्र माझ्या विसाव्या वर्षी, तिसाव्या वर्षी आणि अगदी चाळीसाव्या वर्षी घेतलेल्या छायाचित्रांची तुलना करत होते. आणि प्रत्येकाचे मत होते की मी माझा चेहरा अजूनही तरुण दिसतो. तुम्ही पाहू शकता, वास्तवतः मी माझ्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंगांना, अगणित समस्यांना सामोरा गेलो आहे आणि त्या चिंता, तणाव आणि एकाकीपण निर्माण करायला पुरेशा होत्या. पण मला वाटते, माझे मन तुलनेने शांततामय आहे. काही प्रसंगी मला राग आला आहे, पण मूलतः माझी मनोवस्था शांत आहे.

सौंदर्यप्रसाधनांवर प्रचंड पैसे खर्च करणाऱ्या तरुण मुलींची थट्टा करायला मला आवडते. सर्वात आधी तुमचे नवरे तक्रार करू शकतात की ते फार खर्चिक आहे. तसेही बाह्य सौंदर्य महत्त्वाचे असले तरी आंतरिक सौंदर्य अधिक महत्त्वाचे आहे. तुमच्याकडे भलेही सुंदर चेहरा असेल, पण एखादा कुरूप चेहराही नितळ हास्य आणि प्रेमपूर्ण भावांमुळे मेकअपशिवायही छान दिसतो. तेच खरे सौंदर्य आहे; खरी मूल्ये आपल्या आत आहेत. बाह्य सुविधांसाठी प्रचंड पैसा लागतो – मोठमोठी दुकाने आणि सुपरमार्केट्स लागतात. पण आत्मशांतीसाठी पैसे लागत नाही. या आंतरिक मूल्यांचा विचार करा आणि त्यांची ओळख करून घ्या. त्यातूनच विघातक भावना कमी होतील आणि आत्मशांती लाभेल.

इतरांप्रति करुणादायी दृष्टिकोन आणि इतरांच्या भल्याचा विचार आपल्यात आत्मविश्वास निर्माण करतो. तुमच्यात आत्मविश्वास असतो, तेव्हा तुम्ही तुमची सर्व कार्ये पारदर्शीपणे, खरेपणाने आणि प्रामाणिकपणे पार पाडता. त्यातून इतरांप्रति विश्वास वाढीस लागतो. आणि विश्वास हाच मैत्रीचा आधार आहे. आपण माणसे सामाजिक प्राणी आहोत आणि आपल्याला मित्रांची गरज असते. पैशाच्या बळावर किंवा शिक्षण आणि ज्ञानाच्या आधारे मैत्री निर्माण होईल, असे गरजेचे नसते, तर विश्वास हाच मित्रत्वाचा मूलभूत घटक आहे. त्यामुळे इतर लोकांच्या भल्याचा विचार, त्यांच्याबद्दल काळजीची आणि आदराची भावना परस्पर संवादाचा आधार असते.

Top