अलेक्झांडर बर्झिन (जन्म १९४४) अमेरिकेतील न्यू जर्सी येथे लहानाचे मोठे झाले. त्यांनी १९६२ साली रट्गर्स आणि नंतर प्रिन्सटन विद्यापीठात बौद्ध धर्माचा अभ्यास सुरू केला आणि १९७२ साली हार्वर्ड विद्यापीठातून संस्कृत व भारतीय शिक्षा अभ्यास विभाग आणि सुदूर पूर्वीय भाषा(चीनी) विभागातून संयुक्तपणे विद्यावाचस्पती पदवी प्राप्त केली. एका आशियाई संस्कृतीतून दुसऱ्या संस्कृतीतील बौद्ध धर्माचा प्रसार, त्याचा अनुवाद व त्याला अंगीकारण्याची प्रक्रिया या गोष्टींनी ते प्रेरित झाले आणि त्यामुळे त्यांनी सुरुवातीपासूनच पारंपरिक बौद्ध संस्कृती आणि आधुनिक पाश्चिमात्त्य संस्कृतींमधील दुवा ठरण्यावर लक्ष्य केंद्रित केले.
डॉ. बर्झिन २९ वर्षे भारतात राहिले, प्रथम एक अभ्यासक म्हणून तर नंतर त्यांनी धरमशाला स्थित तिबेटी ग्रंथ आणि अभिलेखांच्या ग्रंथालयाचे अनुवादक म्हणून जबाबदारी सांभाळली, ज्या ग्रंथालयाच्या स्थापनेतही त्यांचे योगदान होते. भारतातील निवासा दरम्यान त्यांनी चारही तिबेटी बौद्ध परंपरेतील आचार्यांकडून शिक्षा ग्रहन केली, तर परमपूज्य दलाई लामा, त्सेनझाब सरकॉंग रिंपोछे आणि गेशे न्गवांग धारग्ये त्यांचे मुख्य शिक्षक होते. त्यांच्या देखरेखीखाली साधना करत असताना त्यांनी गेलुग परंपरेतील एकांतवासातील प्रमुख ध्यानधारणा पूर्ण केली.
नऊ वर्षांसाठी ते त्सेनझाब सरकॉंग रिंपोछे यांचे प्रमुख भाषांतरकार होते, रिंपोछे यांच्या विदेशी यात्रांदरम्यान त्यांच्या सोबत ते यात्रा करत असत आणि त्यांनी त्यांच्या पर्यवेक्षणाखाली स्वतः स्वतंत्र बौद्ध शिक्षक बनण्यासाठी प्रशिक्षण घेतले. त्यांनी अनेक वेळा परमपूज्य दलाई लामांचे भाषांतरकार म्हणूनही काम पाहिले आणि त्यांच्यावतीने अनेक आंतरराष्ट्रीय प्रकल्पांचे व्यवस्थापक म्हणूनही भुमिका सांभाळली. यात चेरनोबिल उत्सर्जन दुर्घटनेतील पीडितांना साहाय्यक असणाऱ्या तिबेटी चिकित्सा, मंगोलियातील बौद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनासाठी आधारभूत बौद्ध ग्रंथांचा मंगोलियन भाषेतील अनुवादाचा प्रकल्प आणि इस्लामिक जगतातील विद्यापीठात बौद्ध-मुस्लिम संवाद वृद्धिंगत करण्याबाबतच्या प्रकल्पांचा समावेश होता.
१९८० सालापासून डॉ. बर्झिन यांनी जगभर प्रवास करत ७० हून अधिक देशातील विद्यापीठात आणि बौद्ध केंद्रांमध्ये बौद्ध धर्माबाबत व्याख्यानं दिली. अधिकांश साम्यवादी देश, संपूर्ण लॅटिन अमेरिका आणि अफ्रिकेतील अनेक भागांमध्ये बौद्ध शिकवण देणारे ते पहिले शिक्षक होते. आपल्या यात्रांदरम्यान त्यांनी बौद्ध धर्माबाबत प्रचलित रहस्यांवरून पडदा दूर केला आणि दैनंदिन जीवनातील बौद्ध शिकवणींची उपयुक्तता दर्शवण्याचा प्रयत्न केला.
एक सफल लेखक आणि अनुवादक असणाऱ्या डॉ. बर्झिन यांची १७ पुस्तके प्रकाशित झाली आहेत, ज्यात रिलेटिंग टू ए स्पिरिचुअल टीचर, टेकिंग कालचक्र इनिशिएशन, डेवलपिंग बॅलन्स्ड सेन्सिटिविटी आणि परमपूज्य दलाई लामा यांच्यासोबत सहलेखन केलेले गेलुग-काग्यू ट्रेडिशन ऑफ महामुद्रा या पुस्तकांचा समावेश आहे.
१९९८च्या अखेरीस डॉ. बर्झिन अप्रकाशित हस्तलिखिते, लेख, त्यांच्याद्वारे केले गेलेले अनुवाद, ज्यात महान आचार्यांच्या शिकवणींचे पुनर्लिखित अनुवाद, टीपा असे जवळपास ३०००० पृष्ठसंख्या असलेले साहित्य घेऊन पश्चिमेस परत आले. इतरांसाठी या साहित्याची उपयोगिता आणि ते नष्ट न होऊ देण्याच्या आपल्या दृढ निश्चयाच्या प्रेरणेतून त्यांनी त्याला ‘बर्झिन अर्काइव्ह’ असे नाव दिले आणि ते बर्लिन, जर्मनी येथे स्थायिक झाले. तिथे राहत असताना त्यांनी परमपूज्य दलाई लामांच्या प्रोत्साहनातून या विपुल साहित्याला जगभरच्या लोकांसाठी अधिकाधिक भाषांमध्ये इंटरनेटवर उपलब्ध करून देण्याचे काम सुरू केले.
अशा रीतीने २००१ साली बर्झिन अर्काइव्हचे संकेतस्थळ सुरू झाले. याचा विस्तार करून त्यात आता डॉ. बर्झिन यांच्या नव्या व्याख्यानांचाही समावेश करण्यात आला आहे आणि हे संकेतस्थळ (२०१५ साली) २१ भाषांमध्ये उपलब्ध आहे. यातील अनेक भाषांसाठी, विशेषतः इस्लामिक जगतातील सहा भाषांसाठी असे काम प्रथमच करण्यात आले आहे. संकेतस्थळाचे सध्याचे संस्करण (२०२१ साली ३२ भाषांमध्ये) पारंपरिक बौद्ध जगत आणि आधुनिक विश्वाला जोडणाऱ्या संवादसेतूच्या रूपात डॉ. बर्झिन यांच्या आजीवन प्रतिबद्धतेचे पुढचे पाऊल ठरत आहे. या संवादसेतूच्या माध्यमातून बौद्ध शिकवणींचा मार्ग दाखवण्यामागे आणि आधुनिक जीवनातील त्यांची प्रासंगिकता स्पष्ट करण्यामागे त्यांची धारणा आहे की, या शिकवणी जगभरच्या लोकांना आत्मसंतुलन प्राप्त करण्यासाठी साहाय्यक ठरतील.