धर्माचे पालन आणि दु:खापासून बचाव

संस्कृत भाषेतील धर्म या शब्दाला तिबेटी भाषेमध्ये चो म्हटले जाते. त्याचा अर्थ धारण करणे अथवा कायम राखणे असा होतो. कोणती गोष्ट वाढवली जाते किंवा कायम राखली जाते? दु:खाला समाप्त केले जाते आणि सुखाची प्राप्ती केली जाते. धर्म केवळ आपल्यासाठीच नव्हे तर सर्व जीवमात्रांसाठी ही गोष्ट शक्य बनवतो.

दु:ख जाणून घेणे 

आपली दु:खं दोन प्रकारची असतात. एक म्हणजे मनुष्य म्हणून आपण जी प्रत्यक्षात अनुभवू शकतो. दुसरी मात्र अत्यंत संवेदनशील शक्तींशिवाय अनुभवताच येत नाहीत. पहिल्या प्रकारच्या दु:खानुभूतीत जन्माच्या प्रक्रियेशी जोडलेल्या वेदना, वेळोवेळी होणाऱ्या आजारपणांतून होणारे त्रास, वाढते वय आणि वृद्धावस्थेशी जोडलेले कष्ट आणि मृत्यूची भीती यांचा समावेश असतो.  

मृत्यूनंतर येणारे दु:खाचे अनुभव हे माणसाच्या अनुभव घेण्याच्या सामान्य क्षमतेच्या बरेच पलीकडचे असतात. आपल्या मनात विचार येऊ शकतो की, मृत्यूनंतर कदाचित आपला पुनर्जन्म मनुष्यरूपातच होऊ शकेल. परंतु, असे होईलच याची काही खात्री देता येत नाही. आपण असे गृहित धरूनच चालावे असे कोणते तर्क सुसंगत कारणही नाही. त्याचबरोबर मृत्यूनंतर आपला पुनर्जन्म होणारच नाही असेदेखील काही नाही. 

आपला पुनर्जन्म नक्की कोणत्या योनीमध्ये होईल हे जाणणे तसे खूप अवघड आहे. ही माहिती आपल्या वर्तमानातील ज्ञानाच्या चौकटींच्या पलीकडची आहे. जर आपण या जन्मात सकारात्मक कर्म केले, तर भविष्यातील आपला पुनर्जन्म अगदी स्वाभाविकपणे सुखदायक असा असेल. त्याच्या उलट, जर आपली बहुतांश कर्मं ही नकारात्मकतेवर आधारित असतील, तर आपला पुनर्जन्स निश्चितच सुखदायक नसेल. उलट आपल्याला विविध जिवांच्या रूपांद्वारे जन्म घेऊन दु:ख भोगतच राहावे लागेल. हे तर अगदी निश्चित आहे. पुनर्जन्माचे चक्र याचपद्धतीने सुरू राहते. जर आपण गव्हाचे दाणे पेरले तर त्यातून गव्हाचेच पीक येणार आहे. जर आपण तांदुळाचे दाणे पेरले तर तांदळाचेच पीक येणार आहे. त्याचप्रमाणे आपण आपल्या नकारात्मक अशा कर्मांतून तीन स्तरांपैकी कोणत्यातरी एकामध्ये जीव, अतृप्त प्रेतात्मा किंवा पशूच्या रूपामध्ये पुनर्जन्माचे बीज रोवत असतो. 

नरक या संकल्पनेच्या चार अवस्था किंवा क्षेत्र असतात. दाहक, शीतल, निकटवर्ती आणि सामाईक नरक असे प्रकार आहेत. या नरकाचे प्रकार पुढे जाऊन आठ प्रकारच्या दाहक नरकांमध्ये विभाजित केले जातात. यातील पहिल्या प्रकारातील नरकाला संजीवन नरक म्हटले जाते. या प्रकारामध्ये अपेक्षेपेक्षा सर्वांत कमी कष्ट भोगावे लागतात.  इथे अनुभवाव्या लागणाऱ्या दु:ख कष्टांची कल्पना येण्यासाठी भयंकर ज्वालेमध्ये जळणाऱ्या माणसाला ज्या वेदना भोगाव्या लागतील त्या तुलनेत येथील कष्ट, दु:ख ही कमीच वाटतील अशी असतात. संजीवन नरकच्या खाली असणाऱ्या प्रत्येक प्रकारामध्ये कष्ट व दु:खांची तीव्रता वाढत जाते. 

अर्थात नरकातील जीव आणि उपाशी प्रेतांचे कष्ट आपल्याला दिसून येत नाहीत. परंतु जनावरांचे कष्ट तर आपण प्रत्यक्षात पाहू शकतो. त्यामुळे जर आपल्याला एखाद्या पशूचा जन्म मिळाला तर मोकाट जनावरे आणि भारतात ओझी वाहणारी जी पाळीव जनावरे असतात, त्यांच्या कष्टांकडे पाहून आपल्याला कल्पना येऊ शकते. धर्म आपल्याला लगाम घालण्याचे काम करतो आणि पुनर्जन्मातील कठोरतम कष्टांपासून आपल्याला वाचवण्याचे काम करतो. 

पुनर्जन्माचे पूर्ण चक्र म्हणजे आपल्या नियंत्रणाच्या पलीकडची बाब असून वारंवार होणाऱ्या पुनर्जन्माची ही प्रक्रिया (संसार) म्हणजे दु:ख होय. सर्व प्रकारच्या सांसारिक दु:खापासून धर्म आपले रक्षण करतो. या शिवाय, महायान धर्म, बृहत्तर वाहनाची शिकवण केवळ आपलेच नाही तर सर्व सजीवमात्रांचे रक्षण करते.  

शरणागतीच्या सुरक्षित मार्गावर स्वार होणे

बुद्ध धर्मामध्ये शरणागतीचे तीन मार्ग बुद्ध, धर्म आणि संघ यांची विस्तृत चर्चा करण्यात आलेली आहे. यातील पहिल्या रत्नामध्ये पूर्ण ज्ञानोदय प्राप्त जिवांचा समावेश होतो. ते आपल्याला धर्माची शिकवण देतात. वाराणसीमध्ये चार आर्य सत्यांची शिकवण देऊन धर्मचक्राला प्रवर्तित करणारे बुद्ध शाक्यमुनी आपल्यासाठी सर्वाधिक महत्त्वपूर्ण आहेत. या चारहीमधील अंतिम सत्य - सत्य मार्ग - धर्म हाच आहे. मुक्ती प्राप्त करण्यासाठी धर्माचे पालन करावयास हवे. हे सुरक्षित मार्गाचे आश्रयस्थान आहे, त्यास धर्म रत्न म्हटले जाते. 

धर्म आचरणासाठी दोन गोष्टी आवश्यक असतात. संसारातील दु:खाचे मूळ कारण जाणणे आणि ती समूळ नष्ट करणे गरजेचे असते. पुन्हा पुन्हा होणाऱ्या जन्मांचे कारण काय आहे. याचे कारण प्रत्यक्षात अस्तित्वात असणारे शरीर आणि आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्यक्षातील घटनांविषयीची आसक्ती यात दडलेले आहे. आपल्या प्रत्येक दु:खाचे कारण बनणाऱ्या आसक्तीच्या जागी अनासक्तीचा भाव विकसित होणे गरजेचे आहे. आपल्या मूळ अस्तित्वाबाबतच्या आकलनासाठी आवश्यक असलेले प्रतिरोधक ओळखणे आवश्यक आहे. हे प्रतिरोधक म्हणजेच  नि:स्वार्थता किंवा अस्मिताहिनतेचे ज्ञान (विवेकी जागरूकता) आहे. अस्मिताहिनतेचा हाच बोध आपल्याला दु:खातून मुक्त करेल. 

संसारात आपल्याला जी दु:खे भोगावी लागतात ती विनाकारण कधीही नसतात. ही दु:खे तणावदायी मनोभावांमुळे आणि दृष्टिकोनांमुळे (मिथ्या दृष्टी) आणि त्यातून उत्पन्न होणाऱ्या कर्मांचा परिणाम असतात. स्वत:च्या संदर्भात असणारी आसक्ती हेच  सर्व प्रकारच्या तणावदायी मनोभावांचे, दृष्टिकोनांचे आणि कर्मांचे मूळ आहे. आपल्या मानसिक पातळीवर आपण त्याचा अद्याप प्रतिकार का करू शकलो नाही? अस्मिता हिनता आपल्या ध्यानात का येत नाही. मृत्यू आणि नश्वरता याचा सुयोग्य असा बोध नसणे हे त्यामागचे एक प्रमुख कारण नक्कीच आहे. 

मृत्यू आणि नश्वरता 

जन्म घेतल्यानंतर त्याचा एकमात्र निश्चित परिणाम म्हणजे मृत्यू आहे. आपल्या सर्वांचा मृत्यू होणार ही निश्चित अशी बाब आहे. ज्याचा मृत्यू होणारच नाही असा कोणताही सजीव नाही. मृत्यू टाळता यावा यासाठी लोक अनेकानेक उपाय करीत राहतात, परंतु ही गोष्ट अशक्य आहे. आपल्याला मृत्यूपासून मुक्त करू शकेल असे कोणतेही औषध नाही. 

माझा मृत्यू होणार आहे, असा विचार करणे म्हणजे मृत्यूच्या संदर्भात योग्य विचार करणे नव्हे. अर्थातच प्रत्येकाचा मृत्यू होणारच आहे. परंतु या सत्याचा अशापद्धतीने विचार करीत राहणे हा काही योग्य मार्ग नव्हे. आपले हे शरीर नष्ट होऊन जाईल. आपले शरीर विकृत होऊन जाईल. असा विचार करीत राहणे योग्य नाही. ही वस्तुस्थिती असली तरी त्याचा विचार करीत राहणे योग्य नाही. अशापद्धतीने होणारा अध:पात कसा रोखता येईल याचा विचार करायला हवा. 

मृत्यूच्या वेळी उत्पन्न होणाऱ्या भीतीचा विचार आपण करीत राहिलो आणि या भीतीतून मुक्त कसे होता येईल याचा विचार केला तर मृत्यूच्या संदर्भात आपले चिंतन प्रभावशाली ठरू शकेल. आपल्या जीवनामध्ये अधिकाधिक नकारात्मक कर्मांचे संचय करणारी व्यक्ती मृत्यूच्या वेळी अधिक भयभीत होऊन जात असते. ते ओरडतात, किंचाळतात. त्यांच्या गालांवरून सातत्याने अश्रू ओघळू लागतात. त्यांच्या तोंडातून लाळ गळू लागते. त्यांच्या कपड्यांमध्येच मलविसर्जन होऊ लागते. मृत्यूच्या भीतीने ते संपूर्णत: गर्भगळीत होऊन जातात. जीवनात केलेल्या नकारात्मक कर्मांच्या प्रभावामुळे मृत्यूच्या समयी या सर्व पीडा त्रास देऊ लागतात हा त्याचा स्पष्ट संकेत असतो. 

तेच दुसऱ्या बाजूला जर आपण आयुष्यात नकारात्मक कर्मांपासून दूर राहिलो, तर मृत्यू जवळ आला तरीही त्याचा सामना करणे सुसह्य होते. ती अनुभूती एका आनंदाची अनुभूती असते. एखादे लहान मूल आपल्या आई वडिलांकडे परत जावे तसा काहीसा हा आनंद असतो. जर आपण आपले मन निर्मळ केले तर आपण आनंदाने मृत्यूला कवटाळू शकतो. दहा नकारात्मक प्रवृत्तींचा निग्रह करून त्याच्या विरुद्ध परिणाम निर्माण करणाऱ्या दहा सकारात्मक  कर्मांचा विकास करून आपण मृत्यूचा अनुभव सुसह्य करू शकतो. आपल्याला दु:ख, कष्ट देणाऱ्या पुनर्जन्माच्या फेऱ्यातही अडकावे लागणार नाही, असाही त्याचा एक चांगला परिणाम होऊ शकतो. अधिक भाग्यशाली अशा पुनर्जन्माची अपेक्षा आपण करू शकतो. औषधी गुण असणारे बी पेरून आपण औषधी गुण असलेली झाडे प्राप्त करू शकतो, परंतु विषारी बीज पेरले तर त्याची फळेही विषारीच येत असतात. त्याचप्रमाणे आपण आपल्या चेतनेमध्ये सकारात्मक कर्मांचे बीज पेरले तर आपल्याला पुनर्जन्मांमध्ये निश्चितपणे सुख प्राप्त होईल. मानसिक आणि शारीरिक स्तरावर आपल्या बाबतीत जे काही घडेल ते निश्चितच सद्भाग्य म्हणावे असे असेल. नकारात्मक कर्मांपासून दूर राहावे आणि सकारात्मक कर्मांचा विकास करावा ही धर्मविषयक शिकवण केवळ बौद्ध धर्मातच दिली जाते असे नाही, तर ख्रिश्चन धर्मासहीत जगातील विविध धर्मांची हीच शिकवण आहे. 

मृत्यू आणि नश्वरता या बाबतीत आपला दृष्टिकोन कसा असायला हवा? यापूर्वी मी उल्लेख केला त्याप्रमाणे, माझा मृत्यू होणार आहे. असा विचार करीत राहणे हे अजिबात उपयोगाचे नाही. याउलट आपण असा विचार करायला हवा की, दहा नकारात्मक कर्मांपैकी कोणतेही एक कर्म मी केलेले असेल तर मृत्यूच्या वेळी मला भीती आणि दु:खवेदना यांचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे कदाचित मला असा एखादा पुनर्जन्म लाभेल जो खरोखर दुर्भाग्यपूर्ण असू शकेल. त्याउलट जर मी माझ्या सकारात्मक कर्मांनी नैतिक शक्ती (पुण्य) प्राप्त केली, तर मृत्यूच्या वेळी मला भीती आणि दु:खाचा सामना करावा लागणार नाही आणि माझा पुनर्जन्म अधिक मंगलमय स्थितीमध्ये सुरू होईल. मृत्यूच्या बाबतीत चिंतन करण्याचा हा सर्वांत योग्य मार्ग आहे. 

आपले चिंतन हे केवळ विषादाने भरलेले आणि निराशावादी विचारांपुरते मर्यादित असता कामा नये. माझा मृत्यू निश्चित आहे आणि मृत्यू येऊ नये म्हणून मी काहीही करू शकत नाही. मात्र असा विचार करण्यापेक्षा मृत्यूनंतर माझे काय होणार असा विचार आपण करायला हवा. मृत्यूनंतर मी नक्की कुठे जाणार? मी कोणत्या प्रकारची कारणे निर्माण केलेली आहेत? माझ्या मृत्यूचा अनुभव मी सुखकारक बनवू शकेन का? माझे भविष्यातील पुनर्जन्म मी सुख देणारे बनवू शकतो का? याचा विचार करणे अधिक योग्य ठरते. 

भविष्यातील पुनर्जन्माच्या संदर्भात विचार करत असताना आपण हे लक्षात ठेवायला हवे की, या संसारविश्वात विश्वासास पात्र अशी एकही जागा नाही. आपण कोणतेही शरीर धारण केले तरी अंतिमत: ते नष्ट होणारच आहे. शंभर अथवा हजार वर्षे जिवंत राहिलेल्या लोकांविषयी आपण अनेकदा वाचतो. या गोष्टी कितीही आश्चर्यकारक वाटल्या तरीही मृत्यूच आलेला नाही अशी व्यक्ती या भूतलावर नाही. या भूतलावर आपण कोणतेही शरीर धारण केले तरीही आज ना उद्या मृत्यू येणारच आहे. 

त्याचप्रमाणे मृत्यूपासून आपण स्वत:चा बचाव करू शकू अशी भूतलावर एकही जागा अस्तित्वात नाही. आपण कुठेही असलो तरी आपली वेळ भरली की मृत्यू आपल्याला गाठणारच आहे. त्यावेळी कोणताही मंत्र, कोणतेही औषध किंवा कोणतीही तपश्चर्या आपल्या मदतीला धावून येणार नाही. शरीरावर शस्त्रक्रिया केल्याने शरीरातील अनेक व्याधी दूर होऊ शकतात, परंतु मृत्यूला मात देऊ शकेल अशी कोणतीही शस्त्रक्रिया अस्तित्वात नाही.

आपला पुनर्जन्म कोणत्याही रूपामध्ये झाला तरी त्या जन्मातही आपला मृत्यू निश्चितपणे होणार आहे. ही कधीही न थांबणारी, रोखता न येणारी अशी प्रक्रिया आहे. आपल्या कर्मांचे दूरगामी परिणाम काय होतील आणि जन्म, जीवन, मृत्यू आणि पुनर्जन्म यांच्या सतत चालणाऱ्या प्रक्रियेबद्दल चिंतन केल्याने आपल्याला सकारात्मक कर्म करण्याच्या दृष्टीने मदत मिळू शकते. 

अर्थात कधी कधी असेही होते की आपण धर्माच्या मार्गावरून चालण्याचे निश्चित करतो. परंतु या संकल्पाला आपण उद्या किंवा परवावर असे पुढे ढकलत राहतो. परंतु आपला मृत्यू निश्चितपणे केव्हा होणार याविषयी आपण कुणीही काहीही ठामपणे सांगू शकत नाही. जर आपण हजार वर्षे जिवंत राहू अशी काही हमी देता आली असती तर आपण साधनेची कोणती तरी वेळ निश्चित करू शकलो असतो. परंतु मृत्यूची कोणतीही निश्चित वेळ आपल्याला माहीत नाही. अशा परिस्थितीमध्ये साधनेला पुढे टाळत राहणे हा मूर्खपणा आहे. काही माणसांचा मृत्यू त्यांच्या जन्माच्या पूर्वी गर्भामध्येच होऊन जातो. काही चालायला शिकण्यापूर्वीच बालपणीच काळाच्या जबड्यात ओढले जातात. त्यामुळे आपल्याला दीर्घायुष्यच असेल अशी काही हमी देता येत नाही. 

आपले शरीरदेखील क्षणभंगुर आहे. आपले शरीर दगडाचे किंवा लोखंडाचे बनलेले असते तर कदाचित ते कदाचित दीर्घकाळ टिकेल असा विश्वास वाटला असता. परंतु आपल्या असे लक्षात येईल की मानवी शरीर हे अतिशय दुर्बल असते. हे शरीर कोणत्याही व्याधीने ग्रासले जाऊ शकते. हातावरचे मनगटी घड्याळ जसे छोट्या छोट्या नाजूक भागांनी बनलेले असते तसे काहीसे आपले शरीर असते. त्यामुळे त्याच्यावर फार अवलंबून राहता येत नाही. आपल्या मृत्यूला निमित्त ठरू शकतात अशी अनेक छोटी छोटी कारणेही पुरेशी असतात. कधी खराब जेवणामुळे मृत्यू होऊ शकतो तर कधी एखादा छोटासा कीटकसुद्धा मृत्यूला कारणीभूत होतो. एखादा विषारी काटा टोचला तरीही मृत्यू उद्भवू शकतो. अशा अगदी सामान्य गोष्टीही मृत्यूसाठी पुरेशा ठरतात. ज्या अन्न आणि पाण्याच्या मदतीने आपण आयुष्य दीर्घकाळापर्यंत वाढवू पाहतो, तेसुद्धा मृत्यूचे कारण बनू शकते. आपला मृत्यू केव्हा होईल आणि कोणत्या कारणाने होईल ही संपूर्णत: अनिश्चित असणारी बाब आहे. 

आणि आपल्याला जर असे वाटत असेल की आपण १०० वर्षे जगू, तर त्यातीलसुद्धा अनेक वर्षे अगोदरच पूर्ण झालेली आहेत आणि अजूनपर्यंत तरी आपण कोणतीही विशेष सिद्धी प्राप्त केलेली नाही. रेल्वेच्या डब्ब्यात बसून झोपून प्रवास करणाऱ्या एखाद्या प्रवाशासारखी आपली अवस्था आहे. कारण, तो क्षणाक्षणाला त्याच्या अंतिम स्थानापर्यंत पोहोचतो आहे, फक्त तो झोपलेला असल्याने त्याला त्याची जाणीव होत नाही. ही प्रक्रिया रोखण्यासाठी आपण काहीही करू शकत नाही. आपला प्रवास निरंतर मृत्यूच्या दिशेने होत राहतोच. 

आपण आपल्या जीवनात कितीही पैसे, दागिने, घरे जमवलेली असली तरी मृत्यूसमयी त्या सगळ्याचा काहीही उपयोग होत नसतो. जेव्हा मृत्यू येईल तेव्हा आपल्याला रिकाम्या हातानेच परतायचे आहे. अगदी छोट्यात छोटी भौतिकवस्तूसुद्धा आपण आपल्या समवेत घेऊन जाऊ शकणार नाही. इतकेच काय पण आयुष्यभर जे धारण केले ते शरीरसुद्धा इथेच सोडून जावे लागणार आहे. शरीर आणि मन वेगवेगळे होऊन जाईल आणि मनाचा प्रवाह पुन्हा स्वतंत्रपणे सुरू राहील. त्यामुळे आपली कोणतीही ऐहिक संपत्ती सोबत घेऊन जाणे तर सोडाच, पण आपल्याला आपले हे शरीरही सोबत घेऊन जाता येणार नाही. 

कर्म 

मृत्यू झाल्यानंतर चेतना जाते. त्यावेळी तिच्यासमवेत कोण जाते? जर आपल्याला हे शरीर, आपले जवळचे लोक आणि आपली संपूर्ण संपत्ती सोडून जायचे आहे तर अशी कोणती गोष्ट किंवा सहायक आहे का जो आपल्या भविष्यातील जीवनात आपल्या चेतनेसमवेत जात असेल?

अशी काही तरी गोष्ट नक्की आहे जी भविष्यात चेतनेसमवेत सहचारी बनून जाते. आपल्या आयुष्यात आपण केलेल्या कर्मांचे संचित बीजरूपाने चेतनेच्या समवेत जात असते. दहा नकारात्मक कर्मांपैकी कोणतेही नकारात्मक कर्म आपण केलेले असेल तर एक नकारात्मक कार्मिक वारसा किंवा कार्मिंक ऋण आपल्या भविष्यातील पुनर्जन्मांमध्ये आपल्या मानसिक सातत्य असणाऱ्या चेतनेसमवेत जात राहील. दुसऱ्या जीवांची हत्या केल्याने, दुसऱ्याची संपत्ती चोरल्याने किंवा लैंगिक अत्याचार केल्याने शरीरातील या नकारात्मक कर्मांची उपलब्धी मानसिक प्रवाहावर आरुढ होतात. खोटे बोलणे, खोटी निंदा केल्याने, लोकांमध्ये गट-तट पाडल्याने दुसऱ्याना आपल्या शब्दांनी दुखावल्याने त्यातून निर्माण होणारे नकारात्मक कर्म व त्यांचे नकारात्मक कार्मिक ऋण मृत्यूच्या वेळी आपल्या समवेत जातील. जर आपले विचार हे लालसेने भरलेले असतील, दुसऱ्याची संपत्ती प्राप्त करण्याची आपली इच्छा असेल, जर आपण इतरांच्या प्रती विद्वेषाची भावना ठेवलेली असेल, त्यांचे वाईट व्हावे अशी आपली इच्छा असेल किंवा दूषित विरोधी भावनेतून आपण विचार करत असू, जसे की, पूर्वीचा किंवा पुढचा जन्म अशी कोणतीही गोष्ट अस्तित्वात नसते. कार्यकारण यासारखे काहीही अस्तित्वात नसते. शरणागतीसारखे कोणतेही सुरक्षित मार्ग अस्तित्वात नसतात. तर चित्तातील अशी विनाशकारी कर्मे नकारात्मक कार्मिक कारणे बनतील आणि आपल्या चित्ताच्या समवेत राहतील. आपल्या भविष्यातील पुनर्जन्मातील आपल्या चित्ताची दिशा ते ठरवतील.

जर आपण ख-या अर्थाने विचार करण्यास सुरुवात केली, तर आपण हरप्रकारे सकारात्मक कर्मांना संचित करण्याचा आणि नकारात्मक कर्मांना दूर करण्याचा कृतीसंकल्प निश्चितपणे करू. जितके शक्य होईल तितके नकारात्मकतेला आपल्यापासून दूर ठेवण्याचा आपण प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे भविष्याच्या जन्मात त्याची भरपाई करावी लागेल असे एकही कार्मिक ऋण शिल्लक राहणार नाही असा प्रयत्न आपण करायला हवा. 

कार्यकारण सिद्धांतांचा परिणाम म्हणून कोणत्या प्रकारच्या प्रतिक्रिया येऊ शकतात हे आपण समजून घेणे गरजेचे आहे. एखादी व्यक्ती अशी आहे जिच्यामध्ये अनेकानेक सद्गुण होते, परंतु तिचे बोलणे मात्र अतिशय कडवट होते. त्याने दुसऱ्या व्यक्तीला शिवीगाळ करून अपशब्द वापरले आणि ती व्यक्ती दुस-या व्यक्तीला म्हणाली, तू एखाद्या कुत्र्यासारखा भुंकतोस. याचा परिणाम असा झाला की त्यालाही पाचशे वेळेला कुत्र्याचाच जन्म मिळाला. छोट्याशा वाटणाऱ्या एका कर्माचे परिणाम फार मोठे असू शकतात. 

त्याचप्रमाणे एखाद्या छोट्याशा सकारात्मक कर्माचाही परिणाम मोठा असू शकतो. एका छोट्याशा मुलाने बुद्धाला अगदी साधीशीच भेट अर्पण केली. त्याचा परिणाम म्हणून त्या बालकाचा जन्म सम्राट अशोकाच्या रुपामध्ये झाला. त्याने हजारो बुद्ध स्मारके उभी केली आणि असंख्य उत्तमोत्तम कामे केली. 

त्याग आणि करुणा 

आपल्या हातून घडलेली अनेक प्रकारची विनाशकारी कृत्ये आणि त्यांच्या परिणामांविषयी चिंतन करणे हा आत्मकल्याणाचा आणि आनंद प्राप्त करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. आपल्या नकारात्मक विचारांमुळे आपल्याला किती दु:खे सहन करावी लागतील आणि आपल्याला त्या दु:खाच्या अनुभवातून जावे लागूच नये अशी उत्कट इच्छा जर आपल्या मनात निर्माण झाली तर आपल्या मनामध्ये तो भाव विकसित झालेला असेल ज्याला त्याग म्हटले जाते. 

स्वत:ला अशा प्रकारच्या विचारांची ओळख करून देणे हीसुद्धा स्वत:च्या संदर्भात एक प्रकारची ध्यानधारणाच आहे. सर्वप्रथम आपल्याला आपल्या दु:खाच्या संदर्भात चैतन्य भाव जागृत करावा लागेल. त्यानंतर त्या चैतन्याचा भाव सर्व जीवितमात्रांपर्यंत विस्तारत न्यायला हवा. सर्व प्रकारचे जीवितमात्र हे किती प्रकारच्या दु:खापासून मुक्त होऊ पाहत आहेत. तरीही ते सारे दु:ख आणि संकटांनी वेढलेले आहेत, असा विचार करावा. अशाप्रकारचे चिंतन आपल्याला करुणेच्या दिशेने घेऊन जाते. जर आपण स्वत:मध्ये दु:खापासून मुक्त होण्याची इच्छा विकसित करू शकलो नाही, तर इतर जीवितमात्र त्यांच्या दु:खापासून मुक्त व्हावेत अशी इच्छा कशी विकसित करू शकू? आपण आपली सारी दु:खे नष्ट करू शकतो. परंतु त्या परमोच्च लाभाची स्थिती प्राप्त होणे गरजेचे असते. आपली जी व्यापक इच्छा आहे त्याच्या परीघामध्ये सर्व जीवितमात्रांना आणणे गरजेचे आहे. कारण त्यांनाही सुख प्राप्त करावयाचे आहे. सर्वचजण दु:खातून मुक्त व्हावेत अशी मनोकामना करणारे चित्त आपण विकसित करणे गरजेचे आहे. हा अधिक व्यापक आणि हितकारक असा दृष्टिकोन आहे. 

इतर जिवांची काळजी आपण कशासाठी करायची?  याचे कारण आपल्याला आयुष्यात कायमच दुसऱ्यांकडून खूप गोष्टी मिळत असतात. उदा. आपण जे दूध पितो ते आपल्याला गाई-म्हशींकडून प्राप्त होते. जे कपडे थंडी आणि हवेपासून रक्षण करतात ते आपल्याला मेंढ्या आणि बकऱ्यांच्या लोकरीपासून मिळतात. अशा कितीतरी गोष्टी आपल्याला दुसऱ्यांकडून मिळत असतात. त्यांचे दु:ख दूर करण्याचे माध्यम आपण शोधायला हवे यासाठी ही काही मोजकी उदाहरणे पुरेशी ठरावीत. 

आपण जी साधना करू त्यामध्ये आपण मंत्रोच्चार करीत असू किंवा कोणत्याही प्रकारची ध्यानधारणा करीत असू, ते करीत असताना आपण सातत्याने एका गोष्टीचे भान कायम ठेवणे गरजेचे आहे. आपल्यासमवेत मर्यादित क्षमता असणाऱ्या सर्व जिवांचाही लाभ व्हावा. स्वाभाविकपणे यातून सर्वांचेच कल्याण होईल. आपल्या जीवनातील दररोज घडणाऱ्या घटनांतून आपण हे नीट समजून घेऊ शकतो. उदाहरणादाखल विचार करायचा झाला तर, एखादी व्यक्ती खूप स्वार्थी असेल आणि ती प्रत्येकवेळी फक्त व्यक्तिगत लाभाचा विचार करीत असेल तर इतर लोकांना अशी व्यक्ती अजिबात आवडत नाही. त्याचवेळी जर एखादी व्यक्ती दयाळू असेल आणि कायम दुसऱ्याची मदत करायला तत्पर असेल तर सर्वसाधारणपणे अशी व्यक्ती सर्वांनाच आवडते. 

सर्वजण सुखी व्हावेत. कुणीही दु:खी नसावे. हा विचार आपल्या मानसिक विचारांच्या प्रवाहात सातत्याने रुजवणे गरजेचे आहे. या विचाराचे सातत्याने स्वत:ला स्मरण करून देत राहणे गरजेचे आहे आणि हा भाव आपल्या विचारांमध्ये स्थापित होणे आवश्यक आहे. हे खूपच उपयुक्त ठरू शकते. भूतकाळामध्ये ज्यांनी आपल्या विचारांना या पद्धतीने विकसित केले ते सारे आज बोधिसत्व आणि संतांच्या रूपात ओळखले जातात. या सृष्टीतील सर्वच महान महिला आणि पुरुषांनी याच विचाराला आपल्या चिंतनाचा आधार बनवले आहे. आपण आपल्यामध्येही हा विचार रुजवू शकलो तर खरंच किती चांगले होईल.

आपल्या निकटच्या व्यक्तीसाठी दुस-यांचे नुकसान करणे 

आपल्याला नेहमी असे शिकवले जाते की, जर आपले नुकसान करण्याचा कुणी प्रयत्न करीत असेल, तर आपण आपल्या रक्षणासाठीसुद्धा प्रयत्न करायला नको का?

या प्रश्नाची व्याप्ती खूपच मोठी आहे. जर एखादा माणूस आपल्या डोक्यावर काठीने प्रहार करीत असेल तर आपण मनात उमटणारा सर्वांत चांगला विचार, प्रतिक्रिया हीच असते, की माझ्यावर ही जी वेळ आलेली आहे तो माझ्याच नकारात्मक कर्मांचा परिणाम आहे. असा विचार करावा की, ती व्यक्ती जो कार्मिक वारसा भविष्यात भोगावा लागणार होता त्याला कशाप्रकारे व कोणत्याही वेगळ्या संधीऐवजी या वेळी फलित करून देण्याचे काम करीत आहे. त्यामुळे उलट आपण त्याच्याप्रति आभारी राहायला हवे. आपल्या मानसिक प्रवाहाला या नकारात्मक ऋणांतून मुक्त केले म्हणून त्याला धन्यवाद द्यायला हवे. 

आणि माझ्यावर ज्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आहे ती माझी पत्नी, माझी मुले यांच्यावर कुणी हल्ला केला तर? मी त्यांचे रक्षण करावे का? असे करणे नकारात्मक कर्म ठरेल का

पत्नी आणि मुलांचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे जितके शक्य होईल तितक्या कौशल्याने त्यांचे रक्षण करण्याचा आपण जरूर प्रयत्न करायला हवा. आपण त्यावेळी सतर्क राहणे गरजेचे आहे. हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे नुकसान न करता आपण जर त्यांना वाचवू शकलो तर तो सर्वांत उत्तम मार्ग ठरेल. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर तुम्हाला रक्षणासाठी अशी काहीतरी क्लृप्ती शोधावी लागेल, ज्यामुळे तुम्ही दुसऱ्याचे नुकसान न करता त्यांचे रक्षण करू शकाल. 

तो हल्लेखोर माझ्या मुलांचे नुकसान करू शकतो मी मात्र त्याचे नुकसान करायचे नाही? हिंसकता आणि क्रूरता यापासून आपल्या मुलांचे आपण रक्षण करायला हवे हे आपले उत्तरदायित्व नाही का? आपण आपले जीवन असेच वाया जाऊ द्यायचे का?

अशी परिस्थिती मोठ्या कौशल्याने हाताळावी लागते. त्यासाठी अंगी धाडस असणे फार महत्त्वाचे आहे. बुद्धाच्या एका पूर्वजन्माची कहाणी सांगितली जाते. एका लपवलेल्या खजिन्याचा शोध घेण्यासाठी बाहेर पडलेल्या ५०० नाविकांच्या दलाचे ते प्रमुख होते. या सर्वांमध्ये एक व्यक्ती असा होता जो खूपच लोभी होता. सगळी बहुमूल्य रत्ने एकट्याने मिळवायची आणि त्यासाठी गटातील सगळ्या लोकांचा खून करून टाकण्याची योजना त्याच्या मनात आकार घेत होती. बोधिसत्व (पूर्वजन्मातील शाक्यमुनी बुद्ध) त्याच्या मनातील ही योजना जाणून होते. त्यामुळे त्यांनी विचार केला की ही परिस्थिती अशीच सुरू राहू देणे योग्य होणार नाही. कारण एक माणूस पाचशे लोकांचा खून करून टाकेल. त्यामुळे त्यांनी धाडसाने मनाशी एक विचार केला. पाचशे लोकांच्या रक्षणासाठी त्याने त्या एका व्यक्तीला मारून टाकायचे मनाशी ठरवले आणि त्यानंतर स्वेच्छेने त्या हत्येची संपूर्ण जबाबदारी स्वत:वर घेतली. जर दुसऱ्यांचे रक्षण करण्यासाठी तुमची नरकात पुनर्जन्म घेण्याची तयारी असेल, तर आपले विचार खूपच धाडसी आहेत असे म्हणावे लागते. अशा परिस्थितीत आपण ते कृत्य करू शकता जे स्वत: बुद्धाने केले होते. 

अशा परिस्थितीत केलेली हत्यासुद्धा नकारात्मक कर्म म्हणूनच गणली जाईल का

नागार्जुन यांनी आपल्या एका मित्राला लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, जर कोणताही माणूस आपले माता, पिता, पुत्र, बौद्ध धर्म, शरणागतीच्या त्रिरत्नांच्या रक्षणार्थ नकारात्मक कर्म करीत असेल तर त्यालाही त्याचे परिणाम भोगावे लागतील. फरक इतकाच आहे की आपल्याला या परिणामांची माहिती आहे की नाही आणि आपली पत्नी अथवा मुलांच्या रक्षणासाठी त्या नकारात्मक कर्मांची जबाबदारी आपण आपल्या खांद्यावर घेण्यास तयार आहात की नाही एवढाच प्रश्न उरतो. जर आपण शत्रूला हानी पोहोचवाल तर तुम्हाला पुनर्जन्मामध्ये कष्ट भोगावेच लागतील. त्यामुळे याचा विचार करून भविष्यात त्यासाठी ज्या हालअपेष्टा सोसाव्या लागतील त्या सहन करण्याची तयारी ठेवावी लागेल. मी या दु:खाला स्वत: झेलेन. तेव्हाच माझ्या पत्नीला आणि मुलांना त्या दु:खाची झळ पोहोचणार नाही.

परंतु मग बौद्ध धर्माच्या दृष्टीने पाहिले तर हे सुद्धा एक नकारात्मकच कर्म नाही का

आपली पत्नी व मुलांचे रक्षण करणे हे एक सकारात्मक आणि रचनात्मक कार्य आहे. परंतु शत्रुचे नुकसान करणे हे एक नकारात्मक आणि विनाशकारी कृत्य आहे. या दोन्हीचे परिणाम स्वीकारण्यासाठी आपल्याला तयार राहावे लागेल. 

आपण सांगितले की जर मनुष्य नकारात्मक कर्म करेल तर त्याला भविष्यात दु:ख भोगावे लागेल. परंतु तो जर चांगले कर्म करीत राहिला तर भविष्यात त्याला निश्चितपणे सुखप्राप्ती होईल. या सत्कर्मांच्या माध्यमातून पूर्ण मोक्षाला प्राप्त होऊन माणूस पुनर्जन्माच्या बंधनातून मुक्त होऊ शकतो का

जर आपल्याला मोक्ष मिळवायचा असेल तर आपल्याला जे शिकवले आहे त्याचे अगदी बारकाईने आणि काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. उदाहरणादाखल सांगायचे झाले तर आपण जर ख्रिश्चन धर्माचे पालन करीत असाल तर येशू ख्रिस्तांनी दिलेल्या शिकवणुकीचे आपण तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे. तेव्हाच ख्रिश्चन धर्मविचारधारेनुसार मोक्षप्राप्ती मिळू शकते. केवळ येशू ख्रिस्त हेच एकमेव आपल्याला आपल्या पापांपासून मुक्त करू शकत नाहीत. त्यासाठी आपण स्वत:देखील काही प्रयत्न करणे गरजेचे आहे. अन्यथा येशू ख्रिस्तांनी पाप न करण्याची शिकवण का दिली असती? जर आपण योग्य रीतीने येशू ख्रिस्तांच्या शिकवणुकीचे पालन केले तर मला असे प्रामाणिकपणे वाटते त्या शिकवणुकीद्वारे मुक्ती शक्य आहे. जर आपण बुद्धांच्या सम्यक शिकवणुकींचे यथायोग्य पालन केले तर बौद्ध मतानुसार, मोक्ष अर्थात मुक्ती मिळणे शक्य आहे. 

Top