आनंद शारीरिक किंवा मानसिक दोन्ही प्रकारचा असतो. आनंदाप्रमाणे दु:खही शारीरिक असते तसे मानसिकही असते. आपल्यापैकी अनेकांना सुख हवे असते, पण ते सुख मिळवण्याच्या मार्गांविषयी आपण अनभिज्ञ असतो. त्यामुळे सुख मिळवण्यासाठी आपण जी धडपड करतो, त्यातून आपल्या वाट्याला दु:खच येते.
काही माणसे उदरनिर्वाहासाठी दरोडे घालतात, खून करतात. हे असे करून आपल्याला सुख मिळेल असे त्यांना वाटत असते. पण हे असे नसते. व्यापारी, शेतकरी अशी अनेक प्रकारची माणसे आनंदाने जगता यावे म्हणून कायद्याने घालून दिलेल्या चौकटीत राहून आपापले व्यवसाय करीत असतात. अशा सचोटीने केलेल्या व्यवसायातून अनेक व्यावसायिकांना भरपूर संपत्ती मिळते, प्रसिद्धी मिळते. पण यातून मिळणारा आनंद शाश्वत असेलच असे नाही, कारण अंतिमत: जो आनंद अपेक्षित असतो, तो सर्वोच्च आनंद यात नसतो. कितीही सुख, भौतिक संपत्ती मिळाली तरी आपले समाधान कधीच होत नाही. संपूर्ण देशावर आपली सत्ता असली, तरी आपल्याला आणखी काही हवेसे वाटणारच असते.
सुख मिळविण्यासाठी आपण अविरत प्रयत्न करीत असतो. हिंडण्या-फिरण्यासाठी गाडीसारखे सर्वात जलद वाहन वापरण्याकडे आपला कल असतो. अशा ऐहिक सुखांच्या मागे लागण्याला अंतच नसतो. म्हणूनच संसाराच्या व्यापतापाची वहिवाट न संपणारी असते असे म्हटले जाते. हा अनुभव सगळ्यांनाच येतो – ऐहिक सुखाचा ध्यास कधीच मावळत नाही.
नुकतेच उमललेले फूल ताजे तवाने असते आणि कालांतराने शिळे झाल्यावर ते सुकून जाते. तुम्ही आयुष्यात कितीही यश, सुख मिळवले तरी त्याला कुठेतरी शेवट असतोच. आयुष्यात प्रगती करून पुढे जात असताना कर्तृत्त्वाला हळू हळू ओहोटी लागते आणि आयुष्याच्या शेवटी प्रचंड दु:खाला सामोरे जावे लागते. याचे उदाहरण म्हणजे आपले वाहन. भंगाराच्या डेपोजवळून जात असताना त्या डेपोत जुन्या गाड्या टाकून दिलेल्या दिसतात. हा शेवट असतो आणि या शेवटच्या अवस्थेत प्रत्येक गोष्टीचे भंगार झालेले असते. पण गाडी वापरत असताना ती कितीही उत्तम चालत असली तरीही काही तरी मोडेल, तुटेल अशी भीती आपल्याला वाटत असते. आपण त्या गाडीच्या प्रत्येक भागाची काळजी घेतो, गाडीचा कर भरतो, विम्याचे हप्ते भरतो. आपल्या प्रत्येक भौतिक मालमत्तेसाठी हाच नियम लागू होतो. आपली मिळकत जेवढी जास्त तेवढी आपल्याला काळजीही जास्त करावी लागते.
मानसिक सुखाच्या जोपासनेच्या मार्गांची शिकवण आपल्याला धर्मामुळे मिळते. कोणतेही मानसिक सुख मिळविण्यासाठी आपल्याला शारीरिक श्रम करावे लागत नाहीत; त्यासाठी आपल्याला आपल्या मनाची मशागत करावी लागते. आपले मन हा निरंतर वाहणारा झरा असतो. आपल्या पूर्वजन्मापासून संगतीला असलेला हा झरा आपल्या पुढील जन्मातही आपल्या सोबतीला असतो. प्रत्येक जन्मात आपल्याला नवे शरीर लाभते आणि या शरीराच्या सुखासाठी आपण धडपडत असतो. शरीराचा मृत्यू झाला तरी मनाचा प्रवाह तसाच अबाधित राहतो. म्हणूनच अशा सुखाची अपेक्षा करावी जे अत्युच्च असेल, शाश्वत असेल आणि कुठेही खंडित न होता, आपल्या प्रत्येक पुनर्जन्मात आपल्या सोबत असेल.
आपण केलेल्या प्रत्येक कर्माची गणना - मग ते सृजनात्मक असो किंवा विध्वंसक असो - धर्मात करता येत नाही. पण आपल्या पुनर्जन्मांत हितकारक ठरेल असे केलेले सकारात्मक कर्म म्हणजे धर्म.
सुख किंवा दु:ख हे आपल्याच कर्माचे फळ असते. नकारात्मक कर्मांमुळे वाईट फळे मिळतात आणि सकारात्मक कर्मामुळे उत्तम फलप्राप्ती होते. शेतामधे पेरणी करण्यासारखी कोणतीही चांगली कामे आपल्या हातून होत असली, तर ते आपल्या पूर्वजन्मात केलेल्या पुण्याचे फळ असते. आपण जराजर्जर झालो, दु:खीकष्टी झालो, अल्पायुषी ठरलो, तर तो आपण पूर्वजन्मात केलेल्या कुकर्मांचा परिणाम असतो.
एक उदाहरण बघू या. समजा, दोन व्यापारी आहेत. त्या दोघांमधील एका व्यापाऱ्याला भरपूर यश मिळाले आहे आणि दुसरा मात्र अयशस्वी ठरला आहे. याचे कारण पूर्वजन्मात त्यांनी केलेल्या पाप पुण्यात दडलेले आहे. या दोघा व्यापाऱ्यांमधील अयशस्वी व्यापारी भरपूर कष्ट करतो आहे, पण त्याचे यथायोग्य फळ त्याला मिळतच नाही आणि दुसऱ्या व्यापाऱ्याला मात्र फारसे परिश्रम करावे लागत नाहीत आणि तरीही यश त्याच्या दारी चालून येते. आणखी एक उदाहरण सांगतो. तुम्ही जिवंत प्राण्याच्या जिवावर उठलात, तर तुम्हीही अल्पायुषी ठरता, जराजर्जर होता. या संदर्भात इथे उपस्थित असलेले गुरू गेशे-ला यांचे मार्गदर्शन तुम्हाला मिळू शकते.
कुकर्म करून पापाचे धनी होण्याचे तुम्ही टाळले, तर पुढील जन्मात नीच योनीत जन्म मिळण्याचे दुर्भाग्य तुमच्या वाट्याला येणार नाही, तुम्हाला मनुष्य रूपात किंवा देवगण म्हणूनही जन्म घेण्याचे भाग्य लाभेल. पण केवळ मानव किंवा देव म्हणून जन्म मिळाला, म्हणून तुम्हाला परमोच्च आनंदाची प्राप्ती होत नाही कारण त्याही जन्मात दु:खाची शक्यता असते. पण हे असे का? तुम्ही कुठे तळागाळात असाल तर तुम्ही प्रगती करू शकता. पण तुम्ही उच्च स्थानी विराजमान झालात की तुम्ही पदच्युतही होऊ शकता. इथे मग फार मोठ्या दु:खाला सामोरे जावे लागते. हेच उदाहरण पाहा: तुम्ही भुकेले असाल तर तुम्ही अन्नग्रहण करता, पण तुम्ही जास्त खाल्ले तर आजारीही पडता. तुम्हाला थंडी वाजत असेल तर तुम्ही ऊब मिळवता, पण ही ऊब जास्त झाली तर त्याच्या झळा तुम्हाला त्रासदायक होतात आणि मग तुमची गारव्यासाठी पुन्हा तगमग होते. अशी अनेक दु:खे आपल्याला दिसून येतात.
संसार (अनियंत्रित पुनर्जन्मांचे फेऱे) अशा प्रकारच्या दु:खाने भरलेला असतो. हा कर्म, तणावदायी भावना आणि दृष्टिकोनाचा परिणाम असतो. आपल्याला शून्यत्वाचे ज्ञान (विवेकी जागरूकता) किंवा ओळखहिनता विकसित करण्याची आवश्यकता असते.
सोळा अर्हता आणि अनेक आर्य, ज्यांनी संसारापासून मुक्ती मिळवली आहे, आपण त्यांची उदाहरणे पाहू शकतो. ऐहिक जीवनातून आपण मुक्ती प्राप्त केली तरी ते पुरेसे नसते कारण अत्यंत सामान्य म्हणून गणल्या गेलेल्या सर्व सचेतन जिवांनी आपल्यावर अगणित उपकार केलेले असतात. गाईगुरांच्या कृपेने आपल्याला दुग्धजन्य पदार्थांचा लाभ झालेला असतो. आपल्याला मांसाहाराचा आनंद उपभोगता येतो कारण त्यासाठी जिवंत आणि सुदृढ प्राण्यांची कत्तल केली जाते. हिवाळ्यात आपण लोकरीचे आणि केसाळ कातड्यांचे कोट परिधान करतो ते आपल्याला पशूंच्या कृपेनेच मिळतात. जिवंत प्राणीमात्रांच्या या कृपेची परतफेड करण्यासाठी आपण बुद्धत्व प्राप्त करणे आवश्यक आहे - असे झाले तरच सर्वसामान्य जिवांच्या जीवनाचे सार्थक होऊ शकेल.
सामान्य जिवांच्या जीवनातील आयुष्यातील उद्दिष्टे श्रावक आणि अर्हत पार पाडू शकत नाहीत. हे कार्य फक्त बुद्धच करू शकतात. म्हणूनच सामान्य जिवांचे हीत जपायचे असेल तर आपल्याला बुद्धत्व प्राप्त करायला हवे.
पण असे होण्यासाठी काय करावे लागते? फक्त धर्माचे पालन करावे लागते. भारतात अत्यंत निपुण महासिद्ध होऊन गेले आहेत. यातील ऐंशी सिध्दपुरुषांची चरित्रे आपल्याजवळ उपलब्ध आहेत, पण असे इतरही अगणित सिद्धीप्राप्त सत्व आहेत. त्यांच्या जीवनाच्या कालमर्यादेतच त्यांना आत्मज्ञान होऊन संतत्त्व प्राप्त झाले होते. तिबेटमधील मीलारेपा आणि काग्यू, निंग्मा, साक्या आणि गेलूग परंपरेतील अनेकांची नावे नावे देता येतील.
जेव्हा बुध्दत्त्वाची पातळी गाठली जाते, तेव्हा धर्माचरणाच्या प्रयत्नांची गरज राहिलेली नसते. धर्माचरणाच्या सुरवातीच्या काळात कर्मकांडाचे पालन करणे अतिशय कठीण असते, पण सरावाने हे कर्मकांड सोपे वाटू लागते आणि त्यातून मिळणारा आनंदही वाढत जातो. आपल्याला संपूर्ण आनंदानुभवाची प्राप्ती झाली की आपले धर्माचरण पूर्ण होते. भौतिक कार्यपूर्तीने मात्र आपल्यासमोर दु:खच वाढून ठेवलेले असते.
जेव्हा माणसाचा मृत्यू होतो, तेव्हा त्याच्या आयुष्याची सांगता झाली किंवा त्या आयुष्याचा शेवट मृत्यूने झाला असे म्हटले जाते. पण ज्याचा मृत्यू होतो त्याला प्रचंड त्रास भोगावा लागतो, इतकेच नाही तर मृत माणसाच्या अंत्यविधीच्या वेळी त्याच्या मागे राहिलेल्या माणसांना झालेल्या अतीव दु:खाचे दर्शन होते. याचा विचार करून आपल्याला धर्माचरण करण्याची गरज आहे. कर्मकांडामुळे आत्मज्ञान होऊन धर्माचरणाची सांगता झाली की आपल्यासोबत इतरांनाही आनंदाची प्राप्ती होते.
आपण स्वत:ला दहा नकारात्मक कार्ये करण्यापासून परावृत्त करायला हवे. आपली वर्तणूक सकारात्मक असेल तर आनंदाचा अनुभव मिळतो. आपल्या हातून दुष्कृत्ये घडली, तर त्यातून दु:खच मिळते. आपल्या कर्मांच्या परिणामाचे आपण परिक्षण करायला हवे. आपल्या कर्माचे मूळ आपल्या मनात दडले असल्याने आपल्या मनाचाही सतत मागोवा घ्यायला हवा. मग आपल्या मनात तीन विखारी भावना आणि वृत्ती आढळून येतात: हाव, वैर आणि भोळेपणा.
या तीन मूलभूत भावनांमधून ८४००० तणावदायी भावना आणि मनोविकारांचा उगम होतो. याच कपटी भावनांचे आपल्याशी वैर असते म्हणूनच आपला शत्रू आपल्या आजूबाजूला शोधण्याची गरज नाही, तो आपल्याच अंतरंगात दडून बसलेला असतो. या ८४००० शत्रुंपैकी हाव, वैर आणि भोळसटपणा या तीन विषारी भावना सर्वात परिणामकारक असतात आणि त्यातही भोळेपणा आपल्या मनाच्या गाभ्यात घर करून राहिलेला असतो.
या सगळ्याचा सारांश असा की आपल्या मनातील या शत्रुंवर मात करण्यासाठी आपण आपल्याच मनाचा ठाव घ्यायला हवा. म्हणूनच सतत स्वत:च्या मनाचा शोध घेणाऱ्या सर्व बौध्द धर्मीयांना ‘अंतस्थ’ (नांग-पा) असे संबोधले जाते. आपल्या एकसंध मनातील या तणावदायी भावना आणि वृत्तींचा आपण समूळ नायनाट करू शकलो, तर आपली सगळी दु:खे लयाला जातील. असे आचरण करणाऱ्या माणसाला धार्मिक म्हटले जाते.
स्वत:च्या तणावदायी भावना आणि वृत्तींचा त्याग करण्याची धार्मिकता ही बुध्दांच्या हिनयान पंथाच्या धार्मिकतेच्या पंथातील असते. आपल्याला दु:खातून मुक्तता मिळावी म्हणून आपण वाईट भावनांचा त्याग करत असतानाच इतरांच्या दु:खालाही तितकेच महत्त्व दिले आणि आपल्याबरोबरच इतरांच्या मनातील हीन भावना विरून जाव्यात म्हणून प्रयत्न केले, तर बौध्दधर्माच्या महायान पंथाच्या अनुयायांसारखे आपण वागायला लागलेलो असतो. या जन्मातील या देहाचे कार्य म्हणून महायान पंथांची तत्त्वे आचरणात आणली, तर गौतम बुध्दांसारखे आत्मज्ञान प्राप्त होऊ शकते.
सदासर्वकाळ सर्वांचे भले व्हावे आणि कुणीही दुखावले जाऊ नये यासाठी प्रयत्न करणे हेच यातील मुख्य तत्त्व आहे. आपण ‘ओम् मणि पद्मे हुं’चा जप करताना तर ‘या जपाच्या सकारात्मक ऊर्जेमुळे सर्वसामान्य जनांचे हित साधले जावे’ असा विचार करतच हा जप केला पाहिजे.
धार्मिकतेचे आचरण करण्यासाठी मानवाचा हा देह आपल्याला प्राप्त झाला आहे. मानवजन्म सहजासहजी मिळत नाही. मानवाचा जन्म मिळणे फार दुर्मिळ आहे. आपल्या पृथ्वीचेच उदाहरण घ्या. पृथ्वीचा जास्तीत जास्त भाग पाण्याने व्यापलेला आहे. या सर्व समुद्रांच्या पाण्यात असलेल्या माशांच्या संख्येचा विचार करा. या जगातील जिवंत प्राण्यांमधे पशू आणि कीटकांचे प्रमाण सर्वात जास्त आढळते. संपूर्ण पृथ्वीवरील जिवांचा विचार केला, तर मनुष्यप्राणी खूप कमी प्रमाणात आढळतो. त्यामुळेच मनुष्यजन्म मिळणे दुर्मिळ आहे असेच म्हणावे लागेल.
सारांश
धर्माची जाण येण्याची आणि ज्ञान मिळण्याच्या प्रक्रियेची गती संथ असते. काही दिवस, महिने अथवा महिन्यांमधे पुरा होणारा हा अभ्यासक्रम नाही. प्रत्यक्षात फार थोडे लोक धर्मासंबंधी विचार करताना आढळतात. धर्माची जाणीव असणे ही अत्यंत वेगळी बाब आहे. ही जाणीव होऊन धर्मामुळे आत्मज्ञान होण्यासाठी दीर्घ काळ सातत्याने साधना करावी लागते. आज आपल्याकडे अत्यंत निपुण ‘गेशे’ उपस्थित आहेत, ते तुमच्या सर्व शंकांचे निरसन करतील. पुढील काळात बौद्ध धर्माचा सर्वत्र प्रचार आणि प्रसार होतच राहणार आहे. बौद्ध धर्माचे अनुयायी वाढत आहेत आणि बौद्ध धर्माची व्यापकता वाढत आहे. गौतम बुध्दांनी धर्म प्रचाराला सुरुवात केली तेव्हा त्यांचे फक्त पाच अनुयायी होते. याच पाच लोकांमुळे ह्या धर्माचा प्रचार सुरू झाला आणि आज बौद्ध धर्माचा प्रसार प्रचंड प्रमाणात झालेला आपण पाहतो आहोत.
प्रत्यक्ष शाक्यमुनी गौतम बुध्दांचा अवतार म्हणावे असे परमपूज्य दलाई लामा ऑक्टोबरमध्ये इथे येत आहेत. आपल्या या परमपूज्य गुरूंकडून मिळणारी शिकवण मनापासून स्वीकारा आणि त्याचे प्रामाणिकपणे आचरण करा. ‘कुणालाही कधीही त्रास होऊ नये आणि कोणतेही विनाशकारी विचार मनात नसावेत - कुणाचेही भलेच करावे’ हेच आपल्या आचार्यांच्या शिकवणुकीचे सार आहे. याचा अंगीकार केला तर पुढील काळात तुम्हाला याचा लाभ होईल.