गेशे न्गवांग धारग्ये यांच्याविषयीच्या माझ्या आठवणी

गेशे न्गवांग धारग्ये यांना मी भारतात डलहौसी इथे १९७० साली पहिल्यांदा भेटलो व त्यांच्यासोबत अभ्यास सुरू केला. त्याच्या आदल्या वर्षी मी फुलब्राइट शिष्यवृत्ती घेऊन माझ्या पीएच.डी. प्रबंधासंबंधी संशोधन करण्याकरता भारतात आलो होतो. हार्वर्डमध्ये तिबेटी भाषा शिकत असताना न्यू जर्सी इथे गेशे वांग्याल यांच्याशी माझी आधीच ओळख झाली होती, आणि भारतात आल्यावर मला शर्पा व खामलुंग रिंपोछे यांची मदत झाली. अमेरिकेमध्ये गेशे वांग्याल यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्रजी शिकलेले हे दोन तरुण पुनर्जन्मित लामा (तुल्कू) होते.

प्रबंधासाठी गुह्यसमाज तंत्राविषयी लिहिणं माझ्या डोक्यावरून जात असल्याचं माझ्या लक्षात आलं, तेव्हा परम पूजनीय दलाई लामांचे कनिष्ठ शिक्षक, क्याब्जे त्रिजांग रिंपोछे यांनी मला लाम-रिम (साक्षात्काराचे श्रेणिबद्ध टप्पे) शिकण्याचा सल्ला दिला. गेशे न्गवांग धारग्ये हे शर्पा व खामलुंग रिंपोछेंचे शिक्षक होते, त्यामुळे ते मला लाम-रीम शिकवतील का, अशी विचारणा या दोघांनी माझ्या वतीने धारग्ये यांना केली आणि त्यांनी दयाळूपणे संमती दिली. मी त्यांचा पहिला पाश्चात्त्य विद्यार्थी होतो.

एका सोडून दिलेल्या शेणामातीच्या गोठ्यात गेशे धारग्ये राहायचे. तिथे केवळ त्यांचा पलंग आणि समोर जमिनीवर त्यांचे विद्यार्थी बसू शकतील एवढीच जागा होती. त्यांचा तोंडाचं बोळकं झालेला, सतत आनंदी असणारा आचारी खेदूप तारचिन त्याहून लहानशा स्वयंपाकघरातील जागेत राहायचा. गेन रिंपोछे, “मूल्यवान ज्येष्ठ” असं आम्ही गेशे धारग्ये यांना संबोधायचे. ते तरुण तुलुकांचे शिक्षक म्हणून प्रसिद्ध होते. त्या वेळी त्यांच्या देखरेखीखाली नऊ तुल्कू होते. शिवाय, ते विद्वान वादविवादकर्ते व उपासक म्हणूनही ख्यातनाम होते. ते अत्यंत पात्र असल्याबद्दल मला खात्री होती.

माझे धडे दर आठवड्याला सहा दिवस असायचे. शर्पा व खामलुंग मला भाषांतरित करून सांगत, कारण गेन रिंपोछे अवजड खाम्पा बोलीमध्ये बोलत, जी त्या वेळी मला जवळपास पूर्णतः अनाकलनीय होती. दुसरा एक तरुण तुल्कू झाडो रिंपोछेही माझ्या धड्यांच्या तासांना बसायचा. तो कालांतराने दलाई लामांच्या नामग्याल मठाचा अधिपती झाला आणि सध्या तो ग्युतो तांत्रिक मठाचा मठाधिपती आहे. गेन रिंपोछेंच्या पलंगाशेजारी अरुंद जागेत आपण गर्दी करून बसायचो.

त्या झोपडीत कायम माशा घोंघावताना दिसत. पण खोलीत मी सोडून कोणालाही त्याचा काही त्रास असल्याचं दिसायचं नाही. किंबहुना खामलुंग रिंपोछे माश्यांचे खेळ खेळायचा, त्यांना स्वतःच्या हातात पकडायचा- यात तो विलक्षण कौशल्य राखून होता, त्यांना हलवायचा आणि सोडून द्यायचा. माश्या चक्कर आलेल्या अवस्थेत उडून जायच्या आणि सर्व हसायचे. मला याची काही गंमत वाटायची नाही. मी अवघडल्याचं पाहून एकदा गेन रिंपोछे त्यांच्या पलंगावर उभे राहिले आणि माशांना हुसकावून लावण्यासाठी त्यांनी स्वतःची कफनी हवेत अस्ताव्यस्त झाडली. मग माझ्याकडे पाहून ते हसले. त्यानंतर मी माझ्या धड्यांवर जास्त लक्ष केंद्रित केलं आणि माश्यांकडे दुर्लक्ष करायला शिकलो.

नंतर गेन रिंपोछेंना दुसऱ्या चांगल्या ठिकाणी राहायला जाण्यासाठी मी काही पैसे दिले. त्यांनी दयाळूपणे ते स्वीकारले, पण गूढ राखण्याची व विनोद करण्याची आवड असलेल्या रिंपोछेंनी ते कुठे राहायला गेलेत ते आम्हाला सांगितलं नाही. ते निव्वळ गायब झाले आणि आम्ही त्यांना शोधत येऊ याची वाट पाहत थांबले. आम्ही त्यांना शोधल्यावर ते खळखळून हसले. ग्युमे तांत्रिक मठाच्या शेजारी एका पत्र्याच्या झोपडीत ते राहायला गेले होते- मोठीच सुधारणा होती. तिथे आम्ही माझे धडे सुरू ठेवले आणि वेळोवेळी तरुण तुल्कूंसोबत आम्ही लांब पर्वतांमधील सुंदर कुरणांमध्ये चालायला व सहलींना जायचो. गेन रिंपोंछेंना सहली आवडायच्या.

परम पूजनीय दलाई लामांना आमच्या या धड्यांच्या वर्गांविषयी माहीत होतं आणि त्यांनी आम्हाला इंग्रजीमध्ये प्रकाशनासाठी काही छोट्या तिबेटी संहिता भाषांतराला द्यायला सुरुवात केली. त्यानंतर १९७१ साली परम पूजनीय दलाई लामांनी धरमशालेत लायब्ररी ऑफ तिबेटन वर्क्स अँड अर्काइव्ह्ज उभारलं. त्या वसंतामध्ये आम्ही सगळे धरमशाला इथेच होतो. परम पूजनीय दलाई लामा गुह्यसमाजाविषयीच्या काही शिकवणुकी देत होते. ग्रंथालयामध्ये पाश्चात्त्यांना शिकवण्याचं काम करावं, असं परम पूजनीय दलाई लामांनी गेन रिंपोछे यांना सांगितलं. शर्पा व खामलुंग रिंपोछे भाषांतरकार होते. मीही मदत करू का असं विचारलं, आणि परम पूजनीय दलाई लामांनी संमती दिली, पण आधी हार्वर्डला जावं, माझा प्रबंध सादर करावा, डॉक्टरेटची पदवी घ्यावी आणि मग परत यावं, असं त्यांनी सचवलं. मी तसं केलं आणि पुढच्या वर्षी परत आलो, धरमशालेतील गेन रिंपोछे व दोन तुल्कूंसोबत राहू लागलो. आम्ही एकत्रितरत्या ग्रंथालयात भाषांतर केंद्राची स्थापना केली.

पुढची बारा वर्षं, एक धकाधकीच्या आंतरराष्ट्रीय शिकवणुकींचा दरा वगळता, दर आठवड्यातील सहा दिवस गेन रिंपोछे ग्रंथालयामध्ये शिकवत असत. त्यांच्या सर्व वर्गांना मी उपस्थित राहिलो आणि त्यांनी शिकवलेल्या सगळ्याची तपशीलवार टिपणं नोंदवली. त्या वेळी राष्ट्रकुलातील नागरिकांना व्हिसाविना भारतात राहणं शक्य होतं, त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अनेक वर्षं धरमशालेत राहणं शक्य होतं. त्यामुळे अनेक बौद्ध तत्त्वग्रंथांवर अनेक वर्षं चालणारे अभ्यासक्रम शिकवणं आणि आम्हाला साधनेविषयी सूचना करणं, गेन रिंपोछे यांना शक्य झालं होतं. ते तांत्रिक दीक्षाही देत आणि उपासनेबद्दल सखोल शिकवणूकही देत. काही आठवडे गेल्यावर आम्ही गुरू-पूजा करण्यासाठी एकत्र यायचो. ही पूजा कशी करायची हे त्यांनी आम्हाला शिकवलं होतं. हा अविश्वसनीय काळ होता: ही दुर्मिळ संधी मिळाल्याबद्दल आम्ही स्वतःला सुदैवी मानतो.

शिकवताना प्रत्येक वेळी गेन रिंपोछे अतिशय उत्साही असत आणि प्रत्येक वेळी ते मूलगामी स्पष्टीकरण आणि दैनंदिन विनोद यांचं मिश्रण करत, हे विशेष लक्षणीय होतं. त्यांनी शिकवलेलं आमच्या लक्षात राहिलं नसेल तर एकच गोष्ट वारंवार स्पष्ट करून सांगताना ते थकत नसत. करुणा व संयम यांचा हा एक प्रेरक दाखला होता. शिस्तीबाबत आणि स्वतःच्या भिक्खू म्हणून घेतलेल्या प्रतिज्ञांबाबत ते अतिशय काटेकोर होते. संडासात जाण्यासाठी ते मध्यरात्री उठले, तरी स्वतःची मठातील शाल पांघरून जात.

अनेक अडचणीच्या कालखंडांमध्ये गेन रिंपोछेंनी मला मदत केली. त्सेनझाब सरकाँग रिंपोछे स्पितीमध्ये अचानक मरण पावले, तेव्हा मी लगेच गेन रिंपोछेंच्या खोलीत गेलो. सरकाँग रिंपोछे हे गेन रिंपोछेंच्या शिक्षकांपैकी एक होते. मी आत गेलो, तर गेन रिंपोछे त्यांच्या काही तिबेटी मित्रांसोबत चहा पीत व आनंदाने गप्पागोष्टी करत बसल्याचं मला दिसलं. त्यांनी मला खाली बसायला आणि मित्र जाईपर्यंत वाट पाहायला सांगितलं. मित्र निघून गेले आणि सरकाँग रिंपोछे यांच्या निधनाबद्दल आत्ताच बातमी आल्याचं मी त्यांना सांगितलं. त्यांनीही ही बातमी ऐकल्याचं ते म्हणाले. मग त्यांनी आधीच मरण पावलेल्या त्यांच्या प्रत्येक शिक्षकाच्या नावाने जपमाळ ओढायला सुरुवात केली. प्रत्येकच जण मरण पावतो: त्यात आश्चर्यकारक असं काही नाही, असं ते म्हणाले. आपण आपल्या शिक्षकांना व त्यांच्या सल्ल्याला मनामध्ये स्थान दिलं असेल, तर ते शारीरिकदृष्टा मरण पावले तरी फरक पडत नाही, त्यानंतरही ते कायम आपल्या सोबतच राहतात. आणि जीवन सुरूच राहतं. त्यांच्या या बोलण्याने मला प्रचंड आधार मिळाला.

गेन रिंपोछे यांनी १९८४ साली ग्रंथालयाचा निरोप घेतला आणि न्यूझिलंडमधील दुनेदिन इथे स्थायिक होऊन शिकवण्याचं निमंत्रण स्वीकारलं. युरोप व उत्तर अमेरिका यांपासून इतक्या दूर असलेल्या दुर्गम भागात त्यांनी राहायला जावं, हे सुसंगतच होतं. त्यांना कायम थोडंसं गूढ राहायला आवडायचं आणि विद्यार्थ्यांनी आपल्याला शोधण्यासाठी व आपली शिकवणूक घेण्यासाठी प्रयत्न करावेत, असं त्यांना वाटायचं. 

गेन रिंपोछे १९९५ साली मरण पावेपर्यंत न्यूझिलंडला राहिले. मधुमेहामुळे त्यांची दृष्टी गेली, पण त्यांनी शिकवणं सुरू ठेवलं आणि त्यांच्या सर्व दैनंदिन उपासनाही ते अखेरपर्यंत करत होते.

गेन रिंपोछे न्यूझिलंडला गेल्यानंतर मी त्यांना केवळ दोनदाच भेटलो. पण सर्व प्राथमिक बौद्ध शिकवणुकी व उपासनांबद्दल मला पायाभूत शिक्षण दिल्याबद्दल आणि महान भारतीय व तिबेटी तत्त्वग्रंथ शिकवल्याबद्दल मी त्यांचा कायम ऋणी राहीन. यांग्सी रिंपोछे या रूपामध्ये १९९६ साली त्यांचा पुनर्जन्म झाला, आणि तो सध्या दक्षिण भारतातील सेरा जे मठामध्ये शिक्षण घेतो आहे.

Top