सरकाँग रिंपोछे : अस्सल लामा

जर्मनीला जाण्यापूर्वी परम पूज्य दलाई लामा यांच्याशी साधलेला संवाद

मंगोलिआ व पाश्चात्त्य देशांमध्ये व्याख्यानांसाठीचा दीर्घ दौरा करून आणि लेखनाचा उत्कट कालावधी संपवून मी एप्रिल १९९८मध्ये भारतामधील धरमशाला इथे असलेल्या घरी परतलो. मी १९६९ सालापासून हिमालयाच्या पायथ्याशी राहतो आहे, परम पूज्य दलाई लामा यांच्या भोवती जमलेल्या तिबेटी निर्वासित समुदायासोबत काम करत आणि अभ्यास करत मी हा काळ व्यतित केला. आता मला जर्मनीत म्युनिच इथे जायचं होतं; तिथे मला अधिक कार्यक्षमतेने पुस्तकं लिहिता येणार होती आणि अधिक नियमितपणे बौद्धविचार शिकवता येणार होता. माझा निर्णय परम पूज्य दलाई लामांना सांगण्याची व त्यांचा सल्ला घेण्याची माझी इच्छा होती. इतरांसाठी अर्थपूर्ण योगदान देण्याकरिता माझा वेळ सर्वाधिक परिणामकारकतेने कुठे व कसा घालवता येईल, याबद्दल स्वतःचा निर्णय स्वतःच घ्यावा, अशी सूचना परम पूज्य दलाई लामांनी मला पूर्वी केली होती. अनुभव हा माझा सर्वाधिक विश्वासू मार्गदर्शक असणार होता. 

जवळपास २९ वर्षांपूर्वी हार्वर्ड विद्यापीठातील पौर्वात्य भाषा व संस्कृत आणि भारतीय अभ्यास या विभागांसाठी पीएच.डी.चा प्रबंध लिहिण्याकरिता फुलब्राइट स्कॉलर म्हणून मी भारतात आलो होतो, तेव्हा परम पूज्य दलाई लामांना मी पहिल्यांदा भेटलो. त्या काळी तिबेटी बौद्धविचार हा एक मृत विषय म्हणून अकादमिक पातळीवर शिकवला जात असे; जवळपास इजिप्तविद्येसारखंच त्याच्याकडे पाहिलं जात होतं. मला हे गृहितक स्वीकारता येत नव्हतं आणि बौद्ध म्हणून जगणं व विचार करणं कसं असेल, याचं अनुमान बांधत मी अनेक वर्षं घालवली. परम पूज्य दलाई लामांना भेटल्यानंतर मला उत्कटपणे जाणवलं की, ही प्राचीन परंपरा अजूनही जिवंत आहे, आणि ही परंपरा पूर्णतः समजलेला व तिचं मूर्त रूप असलेला गुरू माझ्या समोर होता. 

या संदर्भातील अस्सल शिकवण व प्रशिक्षण घेण्याची संधी मला द्यावी, अशी विनंती मी काही महिन्यांनी परम पूज्य दलाई लामांना केली. त्यांची सेवा करायची माझी इच्छा होती आणि माझ्या स्वतःवर प्रचंड काम केल्यानंतरच मी या सेवेसाठी कार्यक्षम ठरेन हे मला माहीत होतं. परम पूज्य दलाई लामांनी माझं म्हणणं दयाळूपणे मान्य केलं. अखेरीस त्यांच्या नैमित्तिक भाषांतरकारांपैकी एक म्हणून सेवा करण्याचं आणि त्यांच्या वतीने जगभरातील आध्यात्मिक नेत्यांशी व अकादमिक संस्थांशी संबंध प्रस्थापित करायला सहाय्यभूत होण्याचं भाग्य मला लाभलं.

युरोपात स्थायिक होण्याचा माझा निर्णय ऐकून परम पूज्य दलाई लामांना संतोष वाटला आणि मी पुढचं पुस्तक कोणतं लिहितो आहे असं त्यांनी विचारलं. एका आध्यात्मिक गुरूशी असलेल्या संबंधांविषयी लिहायची माझी इच्छा असल्याचं मी त्यांना सांगितलं. धरमशाला इथे परम पूज्य दलाई लामांसमवेत ‘नेटवर्क ऑफ वेस्टर्न बुद्धिस्ट टीचर्स’ या संस्थेच्या तीन बैठकींना मी उपस्थित राहिलो. या विषयाबाबत पाश्चात्त्यांना ज्या समस्यांना सामोरं जावं लागतं त्याबद्दलचा परम पूज्य दलाई लामांचा दृष्टिकोन मला त्या वेळी चांगला समजला. प्रत्यक्षात अतिशय मोजकेच पात्र शिक्षक उपलब्ध आहेत, हा या समस्येचा मुख्य स्त्रोत असल्याची लक्षणीय टिप्पणी त्यांनी केली.

बौद्ध शिक्षक होण्यासंदर्भात सरकाँग रिंपोछे यांनी दिलेल्या सल्ल्यावरील विचार

संवादकक्षातून बाहेर पडल्यावर मी स्वतःलाच पहिला प्रश्न विचारला की, बौद्ध शिक्षक होण्यासाठी मी कितपत पात्र आहे? भारतामध्ये निर्वासित म्हणून राहणाऱ्या काही उत्तमोत्तम तिबेटी गुरूंकडून प्रशिक्षण घेण्याची असाधारण संधी मला गेल्या काही वर्षांमध्ये मिळाली होती. यांमध्ये केवळ परम पूज्य दलाई लामांचाच समावेश होता असं नाही, तर त्यांचे तीन दिवंगत शिक्षक आणि विविध तिबेटी परंपरांचे प्रमुख यांचाही यात समावेश होता. त्यांच्या तुलनेत माझी पात्रता काहीच नव्हती. परंतु, परम पूज्य दलाई लामांचे वादचर्चेमधील प्रवीण साथीदार, माझे मुख्य शिक्षक त्सेनझाब सरकाँग रिंपोछे यांनी १९८३ साली दिलेला एक सल्ला मला या वेळी आठवला.

रिंपोछे यांचा दुभाषा व सचिव म्हणून मी दुसऱ्या जागतिक दौऱ्यामध्ये त्यांच्या सोबत प्रवास करत होतो. व्हेनेझुएलातील काराकास इथे ओझरती भेट देऊन आम्ही परतलो. तिथे नव्याने स्थापन झालेल्या एका बौद्ध गटाला शिकवण्याचं निमंत्रण मला आलं आणि रिंपोछे यांच्या प्रोत्साहनामुळे मी ते स्वीकारलं- अशा प्रकारचं काम मी पहिल्यांदाच करणार होतो. रिंपोछे विश्रांतीसाठी काही दिवस न्यू जर्सीमध्ये गेशे वांग्याल यांच्या मठात थांबले होते. गेशे वांग्याल हे रशियातील कलम्यक मंगोल होते आणि १९६७ मध्ये मला भेटलेले तिबेटी परंपरेचे ते पहिले गुरू होते. पण त्यांच्या सोबत सखोल अभ्यास करायची संधी मला कधी मिळाली नाही.

मी व्हेनेझुएलाहून परतलो तेव्हा माझं काम कसं झालं, याबद्दल रिंपोछे यांनी एकही प्रश्न विचारला नाही. ही त्यांची नेहमीची शैली होती, त्यामुळे मला आश्चर्य वाटलं नाही. परंतु, एक आठवडा उलटला आणि लंडनमध्ये रात्रीच्या जेवणानंतर आम्ही स्वयंपारघरातल्या टेबलाभोवती बसलेलो असताना रिंपोछे म्हणाले, “भविष्यात तुम्ही एक विख्यात शिक्षक व्हाल व तुमचे विद्यार्थी तुमच्याकडे बुद्ध म्हणून पाहतील, आणि तुम्ही प्रबुद्ध नसल्याचं तुम्हाला पूर्णतः माहीत असेल, तेव्हा तुमचे स्वतःचे शिक्षक बुद्ध होते या धारणेवरील तुमचा विश्वास डळमळीत होऊ देऊ नका.” एवढंच ते म्हणाले आणि मग आम्ही दोघेही शांत राहिलो. त्यांच्या शब्दांमधील मर्मग्राही विचार समजायला मला काही वर्षं लागली.

रिंपोछे ‘अस्सल’ होते या संदर्भातील लामा झोपा यांचा दाखला

पश्चिमेतील एक लोकप्रिय तिबेटी बौद्ध गुरू लामा झोपा रिंपोछे यांनी एकदा असं विधान केलं होतं की, तुम्हाला अस्सल लामांना भेटायचं असेल, तर त्याचा सर्वोत्तम दाखला म्हणजे त्सेनझाब सरकाँग रिंपोछे आहेत. लामा या तिबेटी शब्दाचा सैल अर्थ निव्वळ संन्यासी किंवा तीन वर्षं तीव्र ध्यानधारणा पूर्ण केलेला विधी पार पाडणारा माणूस असा होत असला, तरी लामा झोपा त्या अर्थाने हा शब्द वापरत नव्हते. किंवा ते “पुनर्जन्म घेतलेला लामा”- स्वतःच्या पुनर्जन्माला दिशा देण्याची क्षमता राखणारा आणि रिंपोछे म्हणजेच “अमूल्य” ही उपाधी बाळगणारा माणूस- अशा अर्थीही हा शब्द वापरत नव्हते. संपूर्ण पात्र असलेला आध्यात्मिक शिक्षक, हा लामा या शब्दाचा मूळ अर्थ त्यांना अभिप्रेत होता. त्यामुळे असा शिक्षक असणं म्हणजे काय आणि एखाद्याशी विद्यार्थी म्हणून नातं कसं जोडावं, याचं स्पष्टीकरण करताना सरकाँग रिंपोछे यांचं आणि त्यांच्याशी असलेल्या माझ्या नात्याचं शब्दचित्र रेखाटणं मदतीचं ठरू शकेल, असं वाटतं. काही प्रतिमा व स्मृती यांच्या कोलाजद्वारे मी हे करणार आहे.

Top