सरकाँग रिंपोछे यांचं जीवन व व्यक्तिमत्त्व

दलाई लामा यांचे सहायक शिक्षक म्हणून भूमिका पार पाडणारे रिंपोछे

त्सेनझाब सरकाँग रिंपोछे प्रचंड होते- केस पूर्ण काढलेलं मस्तक, लाल पायघोळ कफनी आणि चेहऱ्यावरच्या सुरकुत्या अशा रूपातला हा संन्यासी त्याच्या वयापेक्षाही प्राचीन वाटत असे. त्यांची नम्र, सुज्ञ वागण्याची पद्धत आणि सौम्य विनोदबुद्धी यांमुळे ते दंतकथांमधील आदिम साधूसारखे वाटत असत. उदाहरणार्थ, धरमशाला इथे त्यांना पाहिल्यानंतर ‘स्टार वॉर्स’ या लोकप्रिय चित्रपटाच्या कर्त्यांनी ‘योडा’ या पात्रासाठी रिंपोछे यांना प्रारूप म्हणून वापरायचं ठरवलं. ‘स्टार वॉर्स’ या महाकथनामध्ये अध्यात्मक मार्गदर्शक म्हणून ‘योडा’ हे पात्र येतं. रिंपोछे यांनी हा चित्रपट कधीही पाहिला नाही, पण या विडंबनचित्राची त्यांना निःसंशय गंमत वाटली असती. परंतु, परम पूज्य दलाई लामा यांच्याशी असलेलं नातं हेच रिंपोछे यांचं सर्वांत लक्षणीय वैशिष्ट्य होतं.

दलाई लामा हे तिबेटचे आध्यात्मिक व ऐहिक नेते आहेत. त्यांचा वारसा पुनर्जन्माने सुरू राहिलेला आहे. एका दलाई लामांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे सर्वांत निकटवर्तीय सहकारी व्यामिश्र प्रक्रिया पार पाडून त्यांचा पुनर्जन्म कोणत्या लहान मुलाच्या रूपात झाला आहे हे शोधतात. प्रत्येक नवीन दलाई लामाला सर्वांत पात्र शिक्षकांकडून सर्वोत्तम शिक्षण दिले जाते. यांमध्ये ज्येष्ठ व कनिष्ठ शिक्षकांचा आणि सात ‘त्सेनझाबां’चा, म्हणजेच ‘सहायक शिक्षकां’चा समावेश असतो.

तिबेटी बौद्ध धर्माच्या चार मुख्य परंपरा आहेत. विविध वारशांद्वारे त्या भारतातून बाहेर पडल्या, पण त्यांच्या मूलभूत शिकवणुकीमध्ये काही मोठे अंतर्विरोध नाहीत. दलाई लामांचे नऊ मध्यवर्ती शिक्षक गेलुग परंपरेतून येतात; हीच परंपरा उपरोल्लेखित चार परंपरांमध्ये सर्वांत मोठी आहे. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते न्यिन्ग्मा, काग्यू व शाक्य या तीन वंशावळीच्या गुरूंसोबत अभ्यास करतात. तिबेटची राजधानी ल्हासाजवळच्या सात मोठ्या गेलुग मठांमधून सात त्सेनझाब येतात. त्यांचे शिक्षण, साधनेतील उपलब्धी, आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे चारित्र्यविकास यांच्या आधारे त्यांची निवड केली जाते. गेलुग परंपरेचे संस्थापक त्सोन्गखापा यांनी स्थापन केलेल्या गँदेन जगत्से या मठामधून त्सेनझाब सरकाँग रिंपोछे यांची नियुक्ती करण्यात आली. १९४८ साली त्यांनी हे पद स्वीकारलं तेव्हा ते ३४ वर्षांचे होते; आणि दलाई लामा १३ वर्षांचे होते. सात त्सेनझाबांपैकी फक्त सरकाँग रिंपोछे यांना परम पूज्य दलाई लामांसमवेत १९५९ साली भारतामध्ये निर्वासितावस्थेत येणं शक्य झालं.

रिंपोछे तज्ज्ञ होते अशी क्षेत्रं

ऑगस्ट १९८३मध्ये रिंपोछे यांचं निधन होईपर्यंत त्यांनी आधी ल्हासा इथे आणि नंतर धरमशाला इथे परम पूज्य दलाई लामांची श्रद्धेने सेवा केली. परम पूज्य दलाई लामांना दिल्या जाणाऱ्या सर्व धड्यांवेळी उपस्थित राहणं आणि नंतर परम पूज्य दलाई लामांच्या अचूक आकलनाची खातरजमा करण्यासाठी त्यांच्याशी वादचर्चा करणे, ही रिंपोछे यांची मुख्य जबाबदारी होती. आपल्याला मिळणाऱ्या प्रत्येक शिकवणुकीवेळी रिंपोछे उपस्थिती असावेत, असा परम पूज्य दलाई लामांचाही आग्रह असे, जेणेकरून आणखी एका लामाला आपल्या शिक्षणाची व प्रशिक्षणाची पूर्ण व्याप्ती प्राप्त झालेली असावी. त्यामुळे परम पूज्य दलाई लामांप्रमाणे रिंपोछे यांचे चारही तिबेटी परंपरांवर प्रभुत्व होतं. बौद्ध प्रशिक्षणातील दोन प्रमुख विभागण्यांच्या- सूत्रतंत्र- बाबतीत ते तज्ज्ञ होते. सूत्रं प्राथमिक शिकवण देतात, तर तंत्र आत्म-परिवर्तनाच्या सखोल जाणाऱ्या पद्धती सांगतात.

पारंपरिक बौद्ध कला व विज्ञान यांमध्येही रिंपोछे यांना चांगली जाण होती. उदाहरणार्थ, तंत्रविधीमध्ये वापरल्या जाणाऱ्या दोन व तीन मितींच्या प्रतिकात्मक विश्वव्यवस्थांचं (मंडल) आणि अवशेष ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या स्तुपांचं मोजमाप व बांधकाम यांमध्ये ते तज्ज्ञ होते. शिवाय, काव्य, गीतरचना व तिबेटी व्याकरण यांमध्ये ते प्रवीण होते. त्यांची आस्था व तांत्रिक तपशील यांमध्ये सुंदर समतोल साधणारा डौल व संवेदनशीलता त्यांच्या अध्यापनशैलीमध्ये होती. 

तिबेटी प्रकारातील भविष्यवाणीमध्येही (मो) सरकाँग रिंपोछे तज्ज्ञ होते. या व्यवस्थेमध्ये एखादी व्यक्ती एकाग्रतेने ध्यानस्थितीमध्ये जाते, अनेकदा तीन फासे टाकते, आणि लोकांना अवघड निर्णय घेण्यासाठी मदत करते. शिवाय, रिंपोछे यांना तिबेटी ज्योतिषाचंही ज्ञान आहे. यामध्ये ग्रहस्थिती जाणून घेण्यासाठी व्यामिश्र गणितावर प्रभुत्व मिळवावं लागतं. या गूढ विषयांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन मात्र कायम व्यावहारिक व जमिनीवरचा राहिला. सर्वसामान्य समजेला पूरकता म्हणून या विषयांबाबत सल्लामसलत करावी, आपल्या समजेऐवजी हे विषय वापरू नयेत.

दलाई लामांचे शिक्षक असल्यासंदर्भातील रिंपोछे यांची नम्रता

त्यांच्याकडे महत्त्वाचे अधिकृत पद होते आणि त्यांच्याकडे सखोल ज्ञान होतं, तरीही रिंपोछे कायम नम्र राहत. ते परम पूज्य दलाई लामांच्या प्रमुख शिक्षकांपैकी एक राहिले होते, विशेषतः कालचक्र या सर्वांत व्यामिश्र तंत्रव्यवस्थेचं अध्यापन त्यांनी केलं, आणि त्यांनी आपल्या या तारांकित विद्यार्थ्याला अनेक तंत्रिक अधिकार बहाल केले, पण तरी त्यांना इंग्रजीमध्ये ‘असिस्टन्ट टीचर’ असं संबोधलेलं कधीच आवडत नसे. त्सेनझाब या उपाधीचं भाषांतर ‘डिबेट सर्व्हन्ट’ (वादचर्चा सेवक) असं करावं, अशी त्यांची इच्छा होती. पण अखेरीस त्यांनी ‘मास्टर डिबेट पार्टनर’ (प्रवीण वादचर्चा भागीदार) हे भाषांतर स्वीकारलं.

सरकाँग रिंपोछे औपचारिक व अनौपचारिक मार्गांनी परम पूज्य दलाई लामांची सेवा करत. उदाहरणार्थ, परम पूज्य दलाई लामा एकंदर जगाच्या कल्याणासाठी आणि विशेषतः स्वतःच्या लोकांसाठी अनेकदा विशेष ध्यानधारणा करतात व पूजाअर्चा करतात. यांतील काही विधी ते खाजगीत करतात, काही विधी मोजक्या निवडक संन्याशांसोबत करतात, आणि इतर विधी मोठ्या समूहासमोर करतात. या विधींवेळी उपस्थित राहण्याची विनंती परम पूज्य दलाई लामांनी रिंपोछे यांना केली होती आणि दलाई लामा इतर बाबींमध्ये खूप गुंतलेले असतील तर त्यांच्या वतीने हे विधी करण्याची किंवा त्यांवर लक्ष ठेवण्याची विनंतीही त्यांनी रिंपोछे यांना केली होती. शिवाय, परम पूज्य दलाई लामा काही शिकवण देत असतील, तर रिंपोछे त्यांच्या उजव्या बाजूला बसत, त्यामुळे परम पूज्य दलाई लामांना काही शब्द गरजेचे असतील, तर ते रिंपोछे पुरवत असतं, किंवा परम पूज्य दलाई लामांनी विचारलं तर प्रश्नांची किंवा शंकांची उत्तरंही देत. परम पूज्य दलाई लामांना थेट शिकवण व वारसा पुरवण्याबाबतीत इतर जणांना भिडस्त वाटत असेल, तर ते हे सगळं रिंपोछे यांच्या स्वाधीन करतात. आध्यात्मिक नरसाळ्याप्रमाणे रिंपोछे हे सर्व परम पूज्य दलाई लामांकडे पाठवतात.

राजनैतिक कौशल्यं

आपली धोरणं मठांसमोर व जनतेसमोर नेण्याबाबत सरकाँग रिंपोछे आपले सल्लागार व प्रमुख सहकारी असतात, असं परम पूज्य दलाई लामांनी अनेकदा म्हटलं आहे. धार्मिक व ऐहिक या दोन्ही अवकाशांमध्ये रिंपोछे प्रवीण राजनैतिक मुत्सद्दी होते. स्थानिक वादांमध्ये ते अनेकदा मध्यस्थी करत आणि आपल्याला माहीत असलेल्या प्रदेशांमधील स्थानिक शिष्टाचाराबाबत परम पूज्य दलाई लामांना सल्ला देत.

उबदार विनोदबुद्धीमुळे त्यांची राजनैतिक कौशल्यं आणखी वृद्धिंगत झालं. लोक अनेकदा त्यांना विनोद सांगण्यासाठी व मजेशीर गोष्टी सांगण्यासाठी येत असत. रिंपोछे हसायचे व लोकांना चांगली दाद द्यायचे, एवढ्याचमुळे हे घडलेलं नव्हतं, तर हेच विनोद ते इतरांना अतिशय चांगल्या तऱ्हेने सांगत, त्यामुळेही हे घडत होतं. हसताना त्यांचं सगळं शरीर हसायचं, आणि ते हसायला लागले की त्यांच्या आसापस असलेल्या इतरांनाही हास्यबाधा होत असे. व्यावहारिक शहाणीव व संवेदनशील विनोदबुद्धी यांचा मिलाफ झाल्यामुळे त्यांना भेटणाऱ्या सर्व व्यक्तींचे ते लाडके होऊन जात.

राज्य धर्मसंकेतांचं माध्यम म्हणून मठ व प्रशिक्षणाची पुनर्स्थापना

चिनी आक्रमणामुळे तिबेटमध्ये उद्ध्वस्थ झालेले अनेक मठ पुन्हा स्थापन करण्यामध्ये रिंपोछे यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. लोकांना पारंपरिक विधी करता यावेत यासाठीचे अधिकार व शिकवण देऊन त्यांनी हे साधलं. नेचुंग व गदाँग या दोन राज्य धर्मसंकेतांच्या मठांबाबत हे विशेषत्वाने खरं आहे. त्यांनी आयुष्यभर या मठांशी जवळचं नातं राखलं. रिंपोछे परम पूज्य दलाई लामांचा प्रमुख सल्लागार म्हणून सेवा देत होते, त्याप्रमाणे हे राज्य संकेत दलाई लामांचे पारंपरिक पारलौकिक सल्लागार राहिले. ते समाधीवस्थात असताना हे धर्मसंकेत त्यांच्याशी बोलतात. माध्यमं उच्चतर शहाणीवेची निखळ वाहक बनावीत, यासाठी माध्यमांचं आध्यात्मिक प्रशिक्षण दिलं जाईल, अशी तजवीज रिंपोछे यांनी केली.

बुद्धाची शिकवण घेण्यासाठी वा देण्यासाठी रिंपोछे यांनी कधीही कष्ट करायला मागेपुढे पाहिलं नाही. उदाहरणार्थ, एकदा उन्हाळ्यामध्ये कालचक्राविषयी कुनू लामा रिंपोछे यांच्याकडून सूचना मिळणार असल्यामुळे त्यासाठी ते बोधगयेतील तीव्र उष्णताही सहन करत थांबले होते. हिमालयाच्या भारतीय बाजूला असलेल्या किनौर या तिबेटी सांस्कृतिक प्रदेशातील हा महान शिक्षक म्हणजे बोधिसत्व मानला जाणारा आधुनिक काळातील एकमेव हयात गुरू होता. पूर्णतः निःस्वार्थी झालेला व इतरांच्या लाभासाठी साक्षात्कार प्राप्त करण्यासाठी पूर्णतः समर्पित झालेल्या माणसाला बोधिसत्व म्हणतात. बोधगया हे पवित्र स्थळ असून तिथल्या बोधी वृक्षाखाली बुद्धाला साक्षात्कार झाला. भारतातील सर्वांत गरीब व सर्वांत उष्ण प्रदेशामध्ये हे स्थळ आहे. उन्हाळ्यामध्ये इथलं तापमान नियमितपणे १२० अंश फॅरेनहाइटच्या, म्हणजे जवळपास ५० अंश सेंटिग्रेडच्या वर जात असतं. वारंवार वीजपुरवठा खंडित होणं, पाण्याचा तुटवडा व वातानुकूलनाचा पूर्ण अभाव, यांमुळे या ठिकाणी राहणं हीच एक परीक्षा असते. कुनू लामा या ठिकाणी खिडकी व पंखाही नसलेल्या खोलीत नियमितपणे राहत असत.

स्पितीमधील हिमालयीन खोऱ्यातील बौद्ध धर्मातील सुधारणा

भारत, नेपाळ आणि दोनदा पाश्चात्त्य युरोप व उत्तर अमेरिका या ठिकाणी बौद्धविचाराची शिकवण देण्यासाठी रिंपोछे यांनी प्रवास केला. मोठ्या केंद्रांना त्यांनी भेटी दिल्या असल्या, तरी लहान, दुर्गम जागांना त्यांची कायमच जास्त पसंती असे, कारण या ठिकाणी शिक्षक दुर्मिळ असतात आणि इतरांना तिथे जाण्याची इच्छा नसायची. उदाहरणार्थ, काही वेळा ते भारत-तिबेट सीमेवर भारतीय सैन्याच्या तिबेटी तुकडीमधील सैनिकांना शिकवण्यासाठी याकच्या पाठीवरून प्रवास करत असत. अतिशय उंचीवरच्या या प्रदेशामध्ये, अडचणींची फिकीर न करता ते तंबूमध्ये राहत.

या दुर्गम सीमावर्ती प्रदेशांपैकी स्पिती या भागाशी रिंपोछे यांची विशेष जवळीक होती. किनौरच्या पुढेच उंचीवर हे भारतीय हिमालयीन खोरं आहे. तिथेच रिंपोछे यांचं निधन झालं व पुनर्जन्म झाला. एक हजार वर्षांपूर्वी ही पडीक, धुळीने भरलेली भूमी तिबेटमध्ये समाविष्ट करण्यात आली आणि बौद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनाचं ते केंद्र बनलं. परंतु, अलीकडच्या काळात परिस्थिती खालावली. संन्याशांनी ब्रह्मचर्याच्या व मद्यापासून दूर राहण्याच्या प्रतिज्ञांकडे दुर्लक्ष केलं. बुद्धाच्या प्रत्यक्षातील शिकवणुकींचा त्यांनी फारसा अभ्यास केला नाही आणि त्यानुसार आचरणही केलं नाही.

या खोऱ्याला पाच वेळा भेट दिल्यावर रिंपोछे यांनी तिथे दुसरं पुनरुज्जीवन साधू पाहिलं. स्पितीमधील ताबो गोन्पा या सर्वांत प्राचीन मठासाठी समर्पितपणे काम करून त्यांनी हे साधलं. या मठातील संन्यासांना त्यांनी पारंपरिक विधींसंदर्भातील अधिकार दिले व मौखिक ज्ञान पुरवलं. त्यांनी विद्वान आध्यात्मिक शिक्षक तिथे आणले आणि स्थानिक मुलांसाठी एक शाळाही स्थापन केली. अखेरीस जुलै १९८३मध्ये रिंपोछे यांनी ताबोमध्ये कालचक्राची दीक्षा देण्यासाठी परम पूज्य दलाई लामांना निमंत्रित केलं. भारतामधून १०२७ साली कालचक्राची शिकवण तिबेटमध्ये प्रवेश करती झाली. दीर्घ काळ गोंधळात गेल्यानंतर या ठिकाणी बौद्ध धर्माची पुनर्स्थापना करण्यासंदर्भात ही घटना अत्यंत महत्त्वाची होती. प्रस्तुत अधिकारप्रदानाचा सोहळाही तोच उद्देश साध्य करेल, अशी त्यांना आशा होती.

मठांना मोठ्या प्रमाणात दान करणं

सरकाँग रिंपोछे हे शिकवणुकींचे महान आश्रयदाते होते. उदाहरणार्थ, स्पितीमध्ये त्यांना मिळणाऱ्या दक्षिणा ते मठालाच परत दान करत असत. अशा उदार दानामुळे ताबो गोन्पा मठाला वार्षिक प्रार्थना समारोह सुरू करणं शक्य झालं. या वेळी तीन दिवस स्थानिक लोक एकत्र जमतात आणि ओम मनी पद्मे हम असं पठण करतात. हे मंत्र अवलोकितेश्वराशी संबंधित आहेत. करुणेचे मूर्त रूप असलेले अवलोकितेश्वर ही बुद्धप्रतिमा (यिदम) आहे आणि तिबेटी बौद्ध धर्माच्या अनुयायांना ती जास्त जवळची वाटते. सर्व जीवांवरील प्रेमावर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा मंत्राचं पठण उपयुक्त ठरतं.

पश्चिमेकडील देशांच्या पहिल्या दौऱ्यामध्ये मिळालेली दक्षिणा रिंपोछे यांनी कालचक्रातील बुद्ध प्रतिमा असलेल्या प्रचंड मोठ्या नक्षीदार कापडी गुंडाळीच्या निर्मितीसाठी खर्च केली. या ध्यानपद्धतीद्वारे अधिकारप्रदान करण्यासाठी परम पूज्य दलाई लामा विविध ठिकाणी जातात, तेव्हा प्रवासात त्यांना वापरण्यासाठी ही कापडी गुंडाळी त्यांनी भेट दिली. त्सोंगखापा यांच्या जीवनावरील गुंडाळी-चित्रांचा एक पूर्ण संच तयार करायचं कामही त्यांनी या पैशाद्वारे करवून घेतलं. ही गुंडाळी त्यांनी गान्देन इआंगत्से या त्यांच्या मठाला भेट दिली. अनेक वर्षांपूर्वी त्यांनी दक्षिण भारतातील मुंडगोड इथे हा मठ पुनर्स्थापित करण्यासाठी मदत केली होती. पश्चिमेकडील दुसऱ्या दौऱ्यानंतर त्यांना मिळालेल्या दक्षिणांमधून त्यांनी चार हजारांहून अधिक भिक्खूंना व भिक्खुणींना मोठ्या प्रमाणावर दान दिलं.  भारतामधील पहिल्या पूर्ण मोनलाम सोहळ्यासाठी मार्च १९८मध्ये मुनगोड इथे द्रेपंग मठामध्ये हे सर्व लोक जमले होते. मोनलाम हा एक पारंपरिक प्रार्थना सोहळा असून, या सोहळ्यामध्ये सामूहिक भक्तीसाठी सर्व मठवासी ल्हासा इथे महिनाभर एकत्र येतात.

औपचारिकतेची नावड आणि साधेपणाचं आचरण

रिंपोछे विधी व शिष्टाचारामध्ये प्रवीण असले, तरी अहंकाररहित राहिले आणि औपचारिकतांबाबत त्यांना नावड होती. उदाहरणार्थ, ते पश्चिमेला प्रवास करत तेव्हा ते कधीही नक्षीदार विधी उपकरणं किंवा चित्रं आणत नसत. तिकडे ते अधिकारप्रदान करायला जात तेव्हा गरजेच्या असतील त्या आकृती स्वतः काढत, कोरीव नक्षीकाम केलेली कणीक देण्याऐवजी कुकी किंवा केक देत (तोरमा) आणि विधीसाठीच्या शोभापात्रांऐवजी फुलदाणी किंवा अगदी दुधाच्या बाटल्या वापरत. द्वैमासिक त्सोग विधीसाठी -पवित्र मद्य, मांस, तोरमा, फळं व मेणबत्त्या प्रसाद म्हणून दिल्या जातात असा कार्यक्रम- ते प्रवास करत तेव्हा कोणतीही विशेष तयारी केलेली नसेल, तर त्यांना जे काही जेवण दिलं जाईल, तेच ते प्रसादासाठी ठेवत. 

शिवाय, रिंपोछे कायम समोरच्या श्रोतृवर्गाचा कल असेल त्यानुसार बुद्धाची शिकवण सादर करत असत. एकदा रिंपोछे यांना न्यूयॉर्कमधील वूडस्टॉकजवळच्या माउन्ट ट्रेम्पर झेन सेंटर इथे निमंत्रित करण्यात आलं. मंजुश्रीचं- प्रज्ञानाचं मूर्त रूप असलेल्या बुद्धप्रतिमेचं- आचरण करण्यासाठी परवानगी देण्याचा समारंभ (जेनांग) करावा, अशी विनंती तिथल्या सदस्यांनी रिंपोछे यांच्याकडे केली. साधेपणाची झेन परंपरा पाळत रिंपोछे जमिनीवर बसले, सिंहासनावर नव्हे, आणि कोणतेही विधीचे साधन न वापरता किंवा शोभिवंत सोहळा न करता त्यांनी जेनांग देऊ केलं.

अहंकाररहित व प्रामाणिकपणे नम्र असणं

त्सेनझाब सरकाँग रिंपोछे हे खरे कदम्ब गेशे आहेत, असं वर्णन परम पूज्य दलाई लामा नेहमी करत असत. कदम्प गेशे हे तिबेटी बौद्ध गुरू होते, अकराव्या शतकापासून तेराव्या शतकापर्यंत कार्यरत राहिलेले हे गुरू प्रामाणिक, थेट आचरणासाठी व नम्रतेसाठी ओळखले जातात. उदाहरणार्थ, एका प्रवचनावेळी परम पूज्य दलाई लामांनी रिंपोछे यांचा उल्लेख केला आणि इथे नम्रपणे बसलेल्या एकमेव व्यक्तीला याची गरज नाही, बाकीचे सगळे अहंकाराने बसलेले आहेत. एकदा आपला प्रमुख सल्ला कोणता, असं विचारलं असता रिंपोछे यांनी सांगितलं की, कायम नम्र, अहंकाररहित राहावं, सहानुभूती राखावी आणि प्रत्येकाला गांभीर्याने घ्यावं.

रिंपोछे त्यांचं जीवन पूर्णतः या सल्ल्यानुसार जगले. एके काळी इटलीतील मिलान इथे एका चांगल्या कुटुंबाच्या मोठ्या सदनिकेत रिंपोछे राहत असत. या शहरात आलेले बहुतांशी उच्च लामा याच घरात राहिले होते. या घरातील आजी म्हणाली की, या सर्वा लामांपैकी सरकाँग रिंपोछे तिला सर्वाधिक आवडले. इतर जण आपापल्या खोल्यांमध्ये अतिशय औपचारिकरित्या बसायचे आणि आपलं जेवण एकट्यानेच खात. याउलट, सरकाँग रिंपोछे सकाळी लवकरच अंडरस्कर्ट व अंटरशर्ट घातलेल्या स्थितीत स्वयंपाकघरामध्ये येत असत. स्वयंपाकघरातील टेबलापाशी बसून अहंकार न दाखवता ते चहा पीत, प्रार्थनेच्या माळेतील मणी मागे घेत मंत्रपठण करत, एकदम निवांत व स्मित असलेल्या स्थितीत हे त्यांचं काम चालत असे, तेव्हा आजी नाश्ता तयार करत.

इतरांना नम्रता शिकवण्यामधील कौशल्य व प्रत्येकाला गांभीर्याने घेणं

इतरांना सर्व अहंकार सोडून देण्याची शिकवणही रिंपोछे देत असत. फ्रान्समधील लावौर इथल्या नालंदा मठातील पाश्चात्त्य भिक्खूंनी एकदा रिंपोछे यांना शिकवण देण्याकरिता तीन दिवसांसाठी बोलावलं. अठराव्या शतकातील भारतीय गुरू शांतिदेव यांच्या बोधिचार्यावतार या संहितेमध्ये प्रज्ञानावर एक अतिशय अवघड प्रकरण आहे, त्याचं स्पष्टीकरण करावं, अशी विनंती एकदा पाश्चात्त्य भिक्खूंनी रिंपोछे यांच्याकडे केली. रिंपोछे यांनी भावशून्यतेचं स्पष्टीकरण इतक्या परिष्कृत व व्यामिश्र पातळीवर सुरू केलं की कोणालाही ते समजत नव्हतं. मग रिंपोछे थांबले आणि ते समोरच्या भिक्खूंना इतकं अहंकारी असल्याबद्दल ओरडले. त्सोंगखापा यांना भावशून्यतेचं अचूक आकलन होण्यासाठी इतक्या अडचणी आल्या असतील आणि प्राथमिक आचार शिकण्यामध्ये त्यांनी इतके प्रयत्न खर्च केले असतील, तर हे शिकणं सोपं असेल आणि संपूर्ण विषय आपल्याला तीन दिवसांमध्ये समजेल, असा विचार तरी त्यांनी कसा केला. असं बोलून झाल्यावर रिंपोछे यांनी सोप्या पातळीवरून ती संहिता शिकवायला सुरुवात केली, तेव्हा भिक्खूंना ते कळायला लागलं.

पश्चिमेतील इतक्या लोकांना बुद्धाच्या शिकवणुकीमध्ये प्रामाणिक रुची आहे, ते वकळता तिकडचं काहीच आपल्याला आकर्षक वाटत नसल्याचं रिंपोछे एकदा म्हणाले होते. त्यामुळे सूचना कोणीही केली असली, तरी त्यांच्या रुचीचा रिंपोछे आदर करत. त्यांना कळेल अशा पातळीवर ते शिकवत असले, तरी उपस्थितांना स्वतःच्या क्षमतेबाहेरचं वाटेल इतपत किंचित पुढे नेण्याचंही काम ते नेहमी करत. रिंपोछे यांना सर्कशींची आवड होती, त्यामुळे त्यातील दाखला देऊन ते म्हणत की, एखाद्या अस्वलाला सायकल चालवायला शिकवता येतं, मग कुशल साधनं व संयम यांद्वारे मानवाला काहीही शिकवता येऊ शकतं.

बौद्ध धर्माबाबत नवखा असलेला, अंमली पदार्थांनी बधीर झालेला हिप्पीसारखा दिसणाऱा पाश्चात्त्य इसम रिंपोछे यांच्याकडे आला आणि नरोपाची सहा आचरणं शिकवावीत अशी विनंती त्याने रिंपोछेंना केली. सर्वसाधारणतः अनेक वर्षं काटेकोर ध्यानधारणा केल्यानंतर हा अतिशय प्रगत विषय शिकला जातो. तरीही, या विसंगत बोलणाऱ्या व अहंकारी तरुणाला त्यांनी खोडलं नाही, त्याउलट रिंपोछे यांनी त्याच्या म्हणण्याला सहमती दर्शवली आणि त्याला वाटत असलेली रुची उत्तम आहे असं सांगितलं. पण यासाठी आधी त्याला स्वतःला तयार करावं लागेल, असं त्यांनी सांगितलं. आत्मविकासामधील लोकांची रुची गांभीर्याने घेऊन रिंपोछे यांनी अनेक पाश्चात्त्यांना स्वतःला गांभीर्याने घेण्याची प्रेरणा दिली. यामुळे त्यांना आध्यात्मिक मार्गावर पुढे जाण्यासाठी खूप मदत झाली.

प्रत्येकाला समान आदर

ते कोणालाही भेटले, मग ती व्यक्ती परम पूज्य पोप असो, रस्त्यावरचा एखादा दारुणा असो, किंवा लहान मुलांचा गट असो, रिंपोछे त्या सर्वांना समवृत्तीने आणि समान आदराने वागवत. त्यांच्यापैकी कोणाकडेही ते तुच्छतेने पाहत नसत, त्यांच्याकडून काही लाभाची अपेक्षा ठेवत नसत, किंवा त्यांना आकर्षित करून घ्यायचाही प्रयत्न करत नसत. एकदा न्यूयॉर्कमधील इथाका इथल्या ‘विस्डम्स गोल्डन रॉड सेंटर’मधील सदस्यांनी रिंपोछे यांना त्यांच्या मुलांशी बोलण्याची विनंती केली. तर, तुम्ही तरुण व खुल्या मनाचे असल्यामुळे तुमचा मला अतिशय आदर वाटतो, असं त्यांनी तिथल्या मुलांना सांगितलं. आपल्या पालकांना मागे टाकण्याचं सामर्थ्य या मुलांमध्ये आहे, असं सांगून त्यांनी या मुलांना स्वतःचा आदर ठेवायची प्रेरणा दिली.

विशेष कर्मजन्य दुवे ओळखण्याची क्षमता

भेटलेल्या लोकांशी असलेलं कर्मजन्य नातं सरकाँग रिंपोछे अनेकदा ओळखत असत, पण शक्य असेल त्याहून अधिक मदत करण्याची आपली क्षमता असल्याचा बहाणा त्यांनी कधीही केला नाही. एकदा धरमशाला इथे एक स्विझ माणूस त्यांना भेटायला आला आणि आपल्याला भुतांनी त्रस्त करून सोडलं आहे असं त्याने रिंपोछेंना सांगितलं. या समस्येबाबत त्या माणसाशी आपलं काही कर्मजन्य नातं नसल्याचं रिंपोछे यांनी त्याला सांगितलं, आणि तसं नातं असलेल्या दुसऱ्या लामाकडे त्या माणसाला पाठवलं. परंतु, पहिल्या भेटीमध्ये रिंपोछे यांच्या तत्काळ लक्षात आलं की, ते अशा व्यक्तींचे पत्ते नोंदवून ठेवायची सूचना त्यांच्या सहायकांना करत. यातून अपरिहार्यपणे सखोल नाती विकसित व्हायची. अशा सुदैवी लोकांपैकी एक मी आहे, पण माझा पत्ता घ्यायची गरज रिंपोछे यांना कधी वाटली नाही. मीच परत-परत येत राहिलो.

Top