योंगत्झिन लिंग रिंपोछे यांच्याविषयीच्या माझ्या आठवणी

मी जानेवारी १९७०मध्ये बोधगया इथे योंगत्झिन लिंग रिंपोछे यांना पहिल्यांदा भेटलो. हिवाळ्याच्या कालावधीमध्ये ते नियमितपणे तिथे राहायला येत आणि तिथल्या तिबेटी मंदिरामध्ये वार्षिक शिकवणूक देत. त्या वेळी बोधगया तितकंसं विकसित झालेलं नव्हतं आणि अतिशय हलाखीत होतं. तिथल्या स्तुपाकडे जाणाऱ्या धुळकटलेल्या रस्त्यावर कुष्ठरोग्यांची अस्ताव्यस्त गर्दी जमलेली होती, त्यांच्या चिघळणाऱ्या हातांचे खुंट जोडून ते एकसुरी विलाप करत यात्रेकरूंकडे भीक मागत होते. तिथे आलेल्या मोजक्या परदेशी यात्रेकरूंपैकी एक मी होतो, त्यामुळे फाटक्या कपड्यांमधल्या लहान मुलांचा घोळका मी जाईन तिथे डासांच्या झुंडीसारखा माझ्या पाठी यायचा. ते माझे कपडे ओढत होते आणि “बक्षीस, मेमसाहब” अशा घोषणा उंचावलेल्या एकसुरी आवाजात वारंवार देत होते, थोडी चिल्लर मी त्यांना द्यावी यासाठी भीक मागत होते. तळमळीने तिथे आलेले यात्रेकरून स्तुपाला प्रदक्षिणा घालून साष्टांग नमस्कार घालत होते, तेव्हा मागच्या वावरात जंगली कुत्रे व प्रागैतिहासिककालीन वाटावीत अशी डुकरं मुक्त विहरत होती. ते वावरच खुल्यावरील शौचासाठी वापरलं जात असे. ते दृश्य मी कधीही विसरणार नाही.

त्या वेळी मला योंगत्झिन लिंग रिंपोछे यांच्याकडून पहिलं चिंनरेझिग दीक्षादान मिळालं आणि माझ्या पहिल्या बोधिसत्वविषयक प्रतिज्ञा मी तेव्हाच घेतल्या. योंगत्झिन रिंपोछे यांच्या असाधारण उपस्थितीमधून प्रतिष्ठा व सामर्थ्य यांचं उत्सर्जन होत होतं आणि मठाच्या फाटकांबाहेर असलेला ओंगळपणा व अनागोंदी यांना तीव्र छेद देणारी अशी त्यांची उपस्थिती होती. योंगत्झिन रिंपोछे शिकवायचे तेव्हाचा त्यांचा आवाज विशेष लक्षणीय होता. अगदी सहजतेने व सुरेलपणे, स्थिर झऱ्यासारख्या, आणि श्वासासाठीही थांबत नसेल अशा आवाजात ते बोलत होते.

त्यानंतर सप्टेंबर १९७१मध्ये धरमशाळा इथे मी योंगत्झिन लिंग रिंपोछे यांना मी दुसऱ्यांदा भेटलो. माझे गुरू गेशे न्गवांग धारग्ये यांनी मला डलहौसीहून तिथे एका मोठ्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आणलं होतं. आमच्यासोबत शर्पा व खामलुंग रिंपोछेसुद्धा होते. परम पूजनीय दलाई लामांचे दोन शिक्षक त्यांना व उपस्थित तांत्रिक विद्यार्थ्यांना गेलुग परंपरेतील तीन प्रमुख सर्वोच्च तंत्र धर्माधिकार देत होते. योंगत्झिन लिंग रिंपोछे १३ देवतांच्या वज्रभैरव व गुह्यसमाज यांचं दीक्षादान करणार होते आणि क्याब्जे त्रिजंग रिंपोछे चक्रसंवर लुईपा दीक्षादान करणार होते. आपल्या दोन शिक्षकांकडून सार्वजनिकरित्या दीक्षादान स्वीकारण्याचा परम पूजनीय दलाई लामांचा हा बहुधा शेवटचा प्रसंग होता. प्रमुख शिष्य म्हणून परम पूजनीय दलाई लामा त्यांच्या शिक्षकांसमोर बसले होते; ते शिक्षकांकडेच तोंड करून पण थोड्या कमी उंचीच्या आसनावर बसले होते. तिथे उपस्थिती असलेला एकमेव पाश्चात्त्य व्यक्ती मीच होतो, त्यामुळे आसनाशेजारच्या बेचक्यात मी बसलो होतो, तिथे आता गुरू रिंपोछे व १००० सशस्त्र चेनरेझिग पुतळे उभे आहेत. मला अगदी व्यवस्थित दिसत होतं. परम पूजनीय दलाई लामा त्यांच्या शिक्षकासमोर ज्या गांभीर्याने, नम्रतेने वा आदरपूर्वक बसले होते, त्यातून आपल्या आध्यात्मिक शिक्षकासमोर व तांत्रिक गुरूसमोर योग्यरित्या बसण्याचा एक कायमस्वरूपी आदर्श दाखलाच मिळाला.

त्यानंतरच्या काही वर्षांमध्ये मी योंगत्झिन रिंपोछे यांच्याकडून अनेक शिकवणुकी व दीक्षादान यांचा स्वीकार केला. त्यानंतर पुन्हा एकदा बोधगया मंदिरातील वज्रभैरवासाठी झालेली भेट सर्वाधिक संस्मरणीय आहे. त्या वेळी योंगत्झिन रिंपोछे यांनी मंडल महालाचं वर्णन करताना आपल्या भोवतीच्या अवकाशातील विविध वैशिष्ट्यांकडे निर्देश केला. हे कल्पनाचित्र त्यांच्या साठी इतकं विविधरंगी होतं की श्रोत्यांमधील आम्हालाही त्याचा जिवंत अनुभव घेता आला.

आपल्या भोवतीच्या लोकांचं सामर्थ्य वृद्धिंगत करणं, हे योंगत्झिन लिंग रिंपोछे यांचं एक विलक्षण वैशिष्ट्य होतं. तथाकथित “संवृद्धीसाठी प्रबुद्ध वर्तना”चा दाखला म्हणून मी या वैशिष्ट्याचा अनेकदा उल्लेख करतो. माझ्या शिक्षकांच्या वतीने तोंडी भाषांतर करण्याइतकी माझी तिबेटी भाषा सुधारण्यापूर्वीच्या काळात मी योंगत्झिन रिंपोछे यांना जेव्हा-जेव्हा भेटायचो तेव्हा त्यांच्यातून उत्सर्जित होणारी स्पष्टता व प्रेरणा याने मला कायम अचंबा वाटायचा. त्या वेळी इतर कोणाहीपेक्षा मला त्यांचे तिबेटी शब्द खूप जास्त चांगल्या रितीने समजत होते. त्यांनी मनाची स्पष्टता थेट माझ्या मेंदूच्या दिशेने पाठवली असावी.

तिबेटी भाषेमधील माझं कौशल्य पुरेसं सुधारल्यानंतर मी वेळप्रसंगी योंगत्झिन रिंपोछे यांच्यासाठी भाषांतर करायला लागलो. ते इतर परदेशी व्यक्तींना खाजगी शिकवणुकी देत असत तेव्हा मी हे काम करायचो. विविध उपासनांचं अधिक स्पष्टीकरण करण्याची विनंती मान्य करण्याबाबत ते अतिशय उदार होते. मला गरज भासायची तेव्हा माझ्या धर्मविषयक प्रश्नांची उत्तरं द्यायलाही त्यांनी दयाळूपणे सहमती दर्शवली होती. या अविश्वसनीयरित्या दुर्मिळ व मूल्यवान विशेषाधिकाराचा गैरवापर करायचा नाही, एवढी काळजी मी घेतली.

एकदा ते गुंतागुंतीच्या अवलोकितेश्वर उपासनेचं स्पष्टीकरण देत होते, तेव्हा एक विद्यार्थी खोलीत प्रवेश करण्यापूर्वी योंगत्झिन रिंपोछे मला म्हणाले की, ही व्यक्ती खरोखरच या शिकवणुकीला धरून उपासना करेल का याबद्दल शंका वाटते. मी त्या वेळी त्यांच्या शिकवणुकीचं भाषांतर करत होतो. तर, त्या विद्यार्थ्याला काही स्पष्ट करून सांगणं त्यांना गरजेचं वाटलं. त्यानंतर योंगत्झिन रिंपोछे यांनी अतिशय कुशल स्पष्टीकरण द्यायला सुरुवात केली, त्यात ते अगदी खोलात किंवा तपशिलात गेले, पण संबंधित व्यक्तीला उपासनेचा अधिक शोध घेण्यासाठी त्यांनी प्रेरणा मिळेल इतपत त्यांचं स्पष्टीकरण होतं. हा माझ्यासाठी एक आदर्श दाखला ठरला. शिकवणूक देताना, प्रामाणिक उदार प्रेरणा असणं हा शिक्षकासाठी सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. या प्रेरणेने आपण विद्यार्थ्याच्या पातळीपर्यंत व गरजांपर्यंत स्पष्टीकरण नेणं स्वाभाविक होऊन जातं. त्यानंतर मग तो विद्यार्थी शिकवणुकीचं उपासनेत उपयोजन करतो की नाही ही त्या विद्यार्थ्याची जबाबदारी राहते. परिपूर्ण शिक्षक कसं व्हायचं याचं हे उच्च परिमाण साधणं अवघड आहे.

वज्रभैरवाचं सुविख्यात मानवी रूप, मंजुश्री रूपातील बुद्ध-प्रतिमा सर्व बुद्धांची स्पष्टता, बुद्धिमत्ता व प्रज्ञान यांना समाविष्ट करून घेते, त्याप्रमाणे योंगत्झिन लिंग रिंपोछे यांच्या भोवती स्पष्टतेची शक्तिशाली ऊर्जा वावरत असे. ते स्वतः मात्र स्थैर्य व आधार देणाऱ्या ठाम खडकासारखे असत. या ऊर्जेच्या सान्निध्यात असताना आपण नाटकीपणा करणं किंवा गोंधळल्यासारखं वागणं, लहान मुलांना नाराज करणं थांबवतो, त्यापेक्षा स्पष्ट व धारदार आकलनाचा प्रयत्न करतो आणि भावनिक व मानसिकदृष्ट्या साधं व स्थिर होऊ पाहतो.

या गुणाचा एक दाखला आठवतो, तो असा: एकदा मी योंगत्झिन रिंपोछेंना धरमशाळा येथील त्यांच्या घरी भेटायला गेलो. खोलीच्या एका कोपऱ्यात कमी उंचीच्या पलंगावर योंगत्झिन रिंपोछे बसले होते आणि मी दुसऱ्या कोपऱ्यात तशाच कमी उंचीच्या पलंगावर बसलो होतो. माझ्या साधनेतील उपासनेसंदर्भात काही प्रश्न मी विचारले, त्यांचं उत्तर देत असताना अचानक आमच्या मध्ये फरशीवर एक मोठा विंचू आला. कायम प्रतिष्ठा राखत वागणारे योंगत्झिन रिंपोछे यांनी त्रस्तावस्थेत हवेत हात उगारले आणि उत्तेजित होऊन भावनिक सुरात ओरडले, “अरे प्रिय, विंचवा!” मग त्यांनी सताड उघड्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि ते म्हणाले, “तुला भीती वाटत नाही का?” मी त्यांच्याकडे पाहत म्हणालो, “खुद्द वज्रभैरवासमोर असताना मला भीती कशी वाटेल?” आणि हे खरं होतं, मला भीती वाटत नव्हती. माझ्या उत्तरावर योंगत्झिन रिंपोछे खदखदून हसले. त्यानंतर त्यांचा सहकारी एक भांडं नि कागदाचा तुकडा घेऊन आला, त्याने कागद विंचवाच्या खाली सरकावला, त्यावर भांडं ठेवलं आणि समारंभपूर्वक त्याला बाहेर घेऊन गेला आणि त्याला अंगणात सोडून दिलं. माझ्या धड्याचा भाग म्हणून योंगत्झिन रिंपोछे यांनी हा सगळा प्रसंग घडवल्यासारखं वाटलं.

बऱ्याच लोकांना योंगत्झिन लिंग रिंपोछे यांची दहशत व धास्ती वाटत असे, त्याला ही अविश्वसनीयरित्या सक्षम व दबाव वाटेल अशी वज्रभैरवी ऊर्जा कारणीभूत होती. हा प्रतिसाद योग्य आहे असं खुद्द योंगत्झिन रिंपोछे यांना मात्र कधीही वाटत नसे. एकदा बोधगयेतील मंदिरामध्ये मी त्यांच्या खोलीत त्यांच्या सोबत बसलो होतो, तेव्हा खालच्या मजल्यावर भिक्खू करत असलेल्या “त्सोग” पुजेतील प्रसाद ताटलीत घेऊन एक तरुण भिक्खू खोलीत आला. इतक्या मोठ्या गुरूच्या नजरेसमोर कसं जायचं, या विचाराने तो मुलगा उघडच अवघडलेला आणि घाबरलेला होता. तो गेल्यानंतर योंगत्झिन रिंपोछे खुदूखुदू हसले आणि मला म्हणाले, “हे सगळे मला इतके घाबरतात. घाबरण्याची काही गरज नाहीये. काय?”

शांततापूर्ण मंजुश्री हृदयात असणाऱ्या शक्तिशाली वज्रभैरवाप्रमाणे योंगत्झिन लिंग रिंपोछे बाहेरून कठोर, स्थैर्याचा गंभीर आधार होते, तर आतून स्नेहशील, दयाळू व अमर्याद प्रज्ञानी होते. त्यांचा विद्यार्थी आणि वेळप्रसंगी भाषांतरकार राहिल्याबद्दल मी स्वतःला अत्यंत सुदैवी मानतो.

Top