जीवशास्त्र व विवेक यांवर आधारित करुणा

प्राण्यांनाही ऑक्सिटॉसिन हार्मोनमुळे स्वतःच्या नवजात बालकाबद्दल मातृत्वभाव अनुभवायला मिळतो. शिवाय, मानवाच्या व प्राण्यांच्या, सर्वच बालकांना प्रेमाची व मायाळू काळजीची गरज असते. तर, करुणेची- इतरही दुःखापासून मुक्त व्हावेत या इच्छेची- बिजं आपल्या जीवशास्त्रीय अंतःप्रेरणेमध्ये असतात आणि आपलं जगणंच मुळात करुणेवर अवलंबून आहे आणि याबाबतीत सगळेच समान आहेत, या तर्काद्वारे सदर अंतःप्रेरणा दृढमूल होत असतात.

कोणत्याही कृतीची निष्पत्ती प्रेरणेवर अवलंबून असते. त्या कृतीमागे अस्वस्थकारक भावना आहे की सकारात्मक भावना आहे, यावरून त्याच कृतीच्या वेगवेगळ्या निष्पत्ती असू शकतात. करुणेसारखी एखादी सर्वसाधारण भावना कृतीला प्रेरणा देत असेल, तेव्हाही त्या भावनेच्या मानसिक व भावनिक आधारांचा परिणाम निष्पत्तीवर होत असतो.


करुणेचे तीन प्रकार

उदाहरणार्थ, करुणेचा विचार करा. याचे तीन प्रकार आहेत:

  • करुणेचा पहिला प्रकार नातेवाईक व प्रियजनांशी निगडित असतो. पण आसक्तीवर आधारलेली असल्यामुळे ही करुणा मर्यादित व्याप्तीची असते. थोडीशी पूरक परिस्थिती लाभली तरी ही भावना संताप आणि अगदी द्वेषामध्येही चटकन बदलू शकते.
  • दुसऱ्या प्रकारची करुणा दुःखी जीवांसंदर्भातील असते, त्यांच्याबद्दल वाटणाऱ्या अनुकंपेवर आधारलेली असते. या करुणेमध्ये आपण त्यांच्याकडे हीनतेने पाहतो. करुणेचे हे दोन प्रकार अस्वस्थकारक भावनांमधून उद्भवतात आणि त्यामुळे आपण संकटात सापडतो.
  • तिसऱ्या प्रकारची करुणा निःपक्षपाती असते. ती आकलनावर आणि आदरावर आधारलेली असते. इतरही आपल्यासारखेच आहेत, हे या प्रकारच्या करुणेने आपल्याला कळतं: इतरांनाही आपल्याइतकाच आनंदी राहण्याचा अधिकार आहे आणि दुःखी न होण्याचा आपल्यासारखाच अधिकार त्यांनाही आहे. या आकलनामुळे आपल्याला त्यांच्याबद्दल प्रेम, करुणा व ममत्व अनुभवता येते. ही तिसऱ्या प्रकारची करुणा स्थिर असते. प्रशिक्षण, शिक्षण व विवेक यांतून ती विकसित होते. करुणा जितकी स्थिर असेल तितका ती अधिक लाभदायक होते.

करुणेचे हे तीन प्रकार दोन सर्वसाधारण कोटींमध्ये येतात. पहिल्या दोन प्रकारच्या भावना क्षीण मनोवृत्तीच्या आधारे उत्स्फूर्तपणे उद्भवतात. तिसऱ्या प्रकारची भावना विवेकाच्या आधारे उद्भवते.

मातेला तिच्या नवजात बालकाबद्दल वाटणारी अंतःप्रेरित जवळीक व ममता

विवेकावर आधारित असलेली आणि कोणताही पक्षपातीपणा नसलेली करुणा निसर्गाने दृढमूल केलेली असते. मानव, सस्तन प्राणी किंवा पक्षी- समुद्री कासवं व फुलपाखरं यांच्याबाबत मला माहीत नाही- यांपैकी कोणत्याही जीवाला जन्मावेळी आपोआप त्याच्या मातेबद्दल निःपक्षपाती प्रेम वाटत असतं, आपण मातेला ओळखत नसलो तरीही हे प्रेम वाटतं. आपल्याला तिच्याबद्दल नैसर्गिक आकर्षण, जवळीक व ममता वाटते. त्याचप्रमाणे मातेलाही तिच्या नवजात बालकाबद्दल आपोआपच नैसर्गिक जवळीक व ममता वाटते. त्यामुळे ती बालकाची काळजी घेते व संगोपन करते. या मायाळू काळजीच्या आधारावर बालकाचा सुदृढ विकास होतो.

जैवशास्त्रीय आधार असलेली जवळीक व ममता ही करुणेची बिजं आहेत, हे यातून आपल्या लक्षात येतं. आपल्याला मिळालेली ही सर्वांत मोठी भेट असते आणि ती आपल्याला आपल्या मातांकडून मिळते. या बिजांचं विवेकाच्या व शिक्षणाच्या आधारे संगोपन केलं की त्यातून खरी करुणा विकसित होते- ही करुणा निःपक्षपाती असते व सर्वांबाबत समान असते, आपण सर्व समान आहोत या आकलनावर ही करुणा आधारलेली असते.

करुणेवर आधारित इहवादी नीतिमूल्यं

बालकाची ममता धर्म, कायदे किंवा पोलिसी अंमलबजावणी यांवर आधारलेली नसते. ती निसर्गतः येते. त्यामुळे धर्मांनी शिकवलेली करुणा चांगली असली, तरी करुणेचं खरं बीज, खरा आधार जीवशास्त्रीय आहे. मला वाटतं, ‘इहवादी नीतिमूल्यां’चा हा आधार असतो. धर्माने केवळ हे बीज दृढमूल करावं.

आधुनिक नीतिमूल्यं केवळ धार्मिक श्रद्धेवर आधारलेली असायला हवीत, असं काहींना वाटतं. नीतिमूल्यांची जाणीव प्रशिक्षणाद्वारे विकसित करता येते, असं काहींना वाटतं. ‘इहवाद’ (सेक्युलर) म्हणजे धर्माला नकार (निधर्मी), असं काहींना वाटतं. तर, ‘इहवाद’ म्हणजे भारताच्या राज्यघटनेत म्हटल्याप्रमाणे सर्व धर्मांचा निःपक्षपादी आदर, अगदी अश्रद्धांचाही आदर (सर्वधर्मसमभाव) असंही काहींना वाटतं. नीतिमूल्यांचा हा दुसरा प्रकार, विशेषतः करुणेच्या आधारावर विकसित झालेली नीतिमूल्यं अंतःप्रेरणेत रुजलेली असतात. माता व नवजात बालक यांच्याबाबतीत होतं त्याप्रमाणे ही नीतिमूल्यं आपोआप, जगण्याची आवश्यकता म्हणून उद्भवतात. या जीवशास्त्रीय आधारामुळे ती अधिक स्थिर असतात. 

आपण अधिक करुणामय असतो तेव्हा आपली मनं व हृदयं अधिक खुली असतात आणि आपण अधिक सहजतेने संवाद साधतो.

मुलं खेळतात तेव्हा धर्म, वंश, राजकारण किंवा कौटुंबिक पार्श्वभूमी यांचा विचार करत नाहीत. ते आपल्या खेळातील सोबत्याच्या हास्याला दाद देतात, मग सोबती कोणीही असू देत, आणि याला प्रतिसाद म्हणून सोबत्यांशी चांगलं वागतात. त्यांची मनं व हृदयं खुली असतात. दुसऱ्या बाजूला, प्रौढ व्यक्ती सर्वसाधारणतः वांशिक व राजकीय भेद इत्यादींसारख्या इतर घटकांवर भर देतात. त्यामुळे त्यांची मनं व हृदयं संकुचित असतात.

या दोन्हींतील भेद पाहा. आपण अधिक करुणामय असतो तेव्हा आपली मनं व हृदयं अधिक खुली असतात आणि आपण अधिक सहजतेने संवाद साधतो. आपण आत्मकेंद्री असतो, तेव्हा आपली मनं व हृदयं बंद असतात आणि इतरांशी संवाद साधणं आपल्याला अवघड जातं. संतापाने आपली रोगप्रतिकारक्षमता दुबळी होते, तर करुणा व दयाळू हृदयामुळे आपली रोगप्रतिकारक्षमता सुधारते. संताप व भीती यांमुळे आपल्याला झोपता येत नाही आणि आपल्याला झोप लागली तरी दुःस्वप्नं पडतात. आपली मनं शांत असतील, तर आपल्याला चांगली झोप लागते. त्यासाठी आपल्याला चिंतानिवारक औषधं घ्यावी लागत नाहीत- आपली ऊर्जा समतोल राहते. तणावामुळे आपली ऊर्जा इतरत्र भरकटते आणि आपल्याला उदास वाटतं.

करुणेमुळे शांतता लाभते, मन खुलं होतं

सुस्पष्टपणे पाहण्यासाठी व आकलन करून घेण्यासाठी आपल्याला शांत मन गरजेचं असतं. आपण त्रस्त असू, तर आपल्याला वास्तव पाहता येत नाही. त्यामुळे जागतिक पातळीवरचीही बहुतांश संकटं मानवनिर्मित असतात. आपण परिस्थिती वाईट हाताळतो, वास्तव पाहत नाही, त्यामुळे ही संकटं उद्भवतात. आपल्या कृती भीती, संताप व तणाव यांवर आधारलेल्या असतात. खूप जास्त ताण असतो. आपली मनं संभ्रमात असल्यामुळे आपल्याला वस्तुनिष्ठ राहता येत नाही. या नकारात्मक भावनांमुळे मन संकुचित होतं आणि त्यातून संकटं निर्माण होतात, परिणामी कधीही समाधानकारक निष्पत्ती होत नाही.

दुसऱ्या बाजूला करुणेमुळे मन खुलं होतं, मन शांत होतं. त्याद्वारे आपल्याला वास्तव पाहता येतं. कोणालाही नको असलेलं कसं संपवायचं आणि सर्वांना हवं असलेलं कसं आणायचं, याच्या पद्धती आपल्याला पाहता येतात. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि विवेकावर आधारित करुणेचा हा एक मोठा लाभ आहे. त्यामुळे जीवशास्त्रावर आधारलेल्या आणि विवेकाचं पाठबळ असलेल्या मानवी मूल्यांना चालना देण्यासाठी माता आणि माता व बालक यांच्यातील अंतःप्रेरित प्रेम व ममत्व यांची भूमिका मौलिक ठरते.

Top