बोधिचित्तासाठी सात भागांमध्ये कार्यकारणभावात्मक साधना

सर्वतोपरीने इतरांना मदत करण्यासाठी बुद्धत्व प्राप्त करण्याचं ध्येय म्हणजे बोधिचित्त. हे ध्येय साध्य करण्यासाठी आणि एकदा का ते साध्य झालं की दृढ करण्यासाठी सात भागांची कार्यकारण पद्धती इथे दिली आहे. समतोल वृत्तीपासून सुरुवात करून प्रत्येक जण आपली माता आहे हे लक्षात घेणं, मातृत्वप्रेम आठवणं आणि कृतज्ञतेने या दयाभावाची परतफेड करण्याची इच्छा ठेवणं- अशा भावनांच्या व समजुतीच्या मालिकेतून आपल्याला घेऊन जाणारी ही पद्धती आहे. या पद्धतीमुळे प्रत्येकाविषयी समान प्रेम व करुणा आणि अपवादात्मक निश्चय विकसित होतो, आणि या सहज क्रमाचा परिणाम म्हणून बोधिचित्ताचं ध्येय साध्य होतं.

प्रास्ताविक

सर्व प्रकारची सवड व संपन्नता असलेलं अमूल्य मानवी जीवन आपल्याकडे आहे, त्यामुळे बौद्ध मार्ग अनुसरण्याचा वाव आपल्याला मिळतो. परंतु, ही स्वातंत्र्यं आणि संधी कायमस्वरूपी टिकणार नाहीत. त्यामुळे आपल्याकडे असलेल्या संधींचा पूर्ण लाभ आपण घ्यायला हवा.

आपल्या अमूल्य मानवी जीवनाचा पूर्ण लाभ घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे बोधिचित्ताचं ध्येय साध्य करण्यासाठी या जीवनाचा वापर करणं. आत्तापर्यंत न झालेल्या व्यक्तिगत साक्षात्कारावर लक्ष केंद्रित करणारं मन व हृदय, हे बोधिचित्ताचं ध्येय आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला बौद्ध स्वभावाचे घटक सहायक ठरतात, आणि त्यांच्या आधारे मानसिक सातत्यपूर्णता लाभते. सकारात्मक शक्ती व सखोल जागरूकता, आपले विविध गुण, आणि आपल्या मनांची नैसर्गिक शुद्धता, हे ते घटक आहेत. या बोधिचित्त ध्येयासोबत दोन उद्देश असतात: शक्य तितक्या लवकर साक्षात्कार साधणं आणि त्या आधारे सर्व जीवांचा लाभ करवून देणं.

बोधिचित्त साध्य करत असताना आपण उलट्या क्रमाने हे दोन उद्देशही साधत असतो. एक, केवळ मानवांचाच नव्हे, तर सर्व मर्यादित जीवांचा लाभ करून देण्याचा आपला पूर्ण उद्देश असतो. आपल्यामधलं प्रेम, करुणा व अपवादात्मक निश्चय यांच्यामुळे हे घडतं, त्याची चर्चा आपण सदर व्याख्यानामध्ये नंतर करणार आहोत. त्या सर्वांचा सर्वाधिक परिणामकारकतेने लाभ व्हावा यासाठी आपण साक्षात्कार साधण्याचा व बुद्ध होण्याचा उद्देश पूर्णतः राखून असतो. आपल्या सर्व मर्यादांपासून व कमतरतांपासून सुटका करून घेण्यासाठी आपल्याला साक्षात्कार गरजेचा असतो. कारण, इतरांना मदत करण्याच्या आपल्या क्षमतेला या मर्यादा व कमरतरतांमुळे प्रतिबंध होत असतो, हे आपल्याला कळतं. उदाहरणार्थ, आपल्याला इतरांचा राग आला तर आपण त्याच वेळी त्यांची मदत करणं आपल्याला कसं काय शक्य होईल? शिवाय, आपलं पूर्ण सामर्थ्य उपयोगात येण्यासाठी साक्षात्कार होणं गरजेचं असतं. त्यामुळे, बोधिचित्ताचं ध्येय साध्य करताना बुद्धत्वाची स्थिती सर्वोच्च आहे म्हणून ती साध्य करायची आणि एखादा खोडसाळ कर भरावाच लागतो तशी इतरांना मदत करायची, अशी काही गरज नसते.

बोधिचित्ताचं ध्येय साध्य करण्याच्या दोन प्रमुख पद्धती आहेत. एक, सात भागांच्या कार्यकारण शिकवणुकीद्वारे. दोन, स्वतःविषयी व इतरांविषयीच्या आपल्या प्रवृत्तीला समानतेने पाहून त्यांत देवाणघेवाण करणं. इथे आपण या दोन्हींतील पहिल्या पद्धतीची चर्चा करणार आहोत.

Top