तणावदायी भावना म्हणजे काय?

12:18
संताप, ओढ, स्वार्थ किंवा हाव यांमुळे आपलं मन अस्वस्थ असेल, तेव्हा आपल्या ऊर्जाही अस्वस्थ होतात. आपल्याला बेचैन वाटतं; आपलं मन शांत नसतं; आपले विचार इतस्ततः धावत असतात. पश्चात्ताप वाटेल असं काहीतरी आपण बोलतो व करतो. आपल्या मनामध्ये किंवा ऊर्जांमध्ये अचानक काही अस्वस्थ झाल्यासारखं वाटत असेल, तर हे काही अस्वस्थकारक भावनांचं काम हे, हे आपण खात्रीने म्हणू शकतो. ते घडल्यावर लगेच शोधणं आणि प्रेम व करुणा यांसारखी काही विरोधी मानसिक अवस्था त्यावर लागू करणं, हा यावरचा उपाय आहे. त्रासदायक भावनांना शरण जाऊन त्यानुसार आपण कृती केली तर ज्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे, त्या समस्या टाळण्यासाठी हा उपाय गरजेचा ठरतो.

“तणावदायी/अस्वस्थकारक भावना” म्हणजे काय?

एखादी मनोवस्था निर्माण झाल्यानंतर आपली मनःशांती संपुष्टात येते आणि आपला आत्मसंयम सुटतो, त्या मनोवस्थेला अस्वस्थकारक भावना असं म्हणतात.

आपण आपली मनःशांती गमावतो, म्हणून ती भावना अस्वस्थकारक असते; ती आपल्या मनःशांतीला अस्वस्थ करते. मनःशांती गमावल्यावर आपण अस्वस्थ होतो, कारण आपले विचार किंवा आपल्या भावना स्पष्ट नसतात. या स्पष्टतेच्या अभावामुळे आपण आत्मसंयमासाठी आवश्यक असलेली भेद जाणण्याची क्षमता गमावून बसतो. विशिष्ट परिस्थितीमध्ये काय मदतीचं आहे आणि काय मदतीचं नाही, काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे यांमध्ये भेद करणं गरजेचं असतं. 

रचनात्मक मनोवस्थांसोबतही अस्वस्थकारक भावना येऊ शकतात

ओढ किंवा उत्कट इच्छा, संताप, ईर्षा, अभिमान, अहंकार, इत्यादी अस्वस्थकारक भावनांची काही उदाहरणं आहेत. यातील काही अस्वस्थकारक भावना आपल्याला विध्वंसक कृतीकडे नेऊ शकतात, पण प्रत्येक वेळी तसं असेलच असं नाही. उदाहरणार्थ ओढ व उत्कट इच्छा यांमुळे बाहेर जाऊन काहीतरी चोरण्याची विध्वंसक कृती आपल्याकडून होऊ शकते. पण त्याचप्रमाणे आपल्यावर कोणीतरी प्रेम करावं अशी उत्कट इच्छाही आपल्याला वाटू शकते आणि त्याबद्दल आपल्याला ओढही वाटते, अशा वेळी आपण इतरांकडून प्रेम मिळावं यासाठी त्यांची मदत करतो. इतरांची मदत करणं विध्वंसक नसतं; ही रचनात्मक कृती आहे, पण त्यामागची भावना अस्वस्थकारक आहे: “माझ्यावर इतरांनी प्रेम करावं असं मला वाटतं, त्यामुळे या मदतीचा मोबदला म्हणून तुम्ही माझ्यावर प्रेम करावं अशी माझी विनंती आहे.”

किंवा संतापाचं उदाहरण घ्या. संतापामुळे आपण विध्वंसक कृती करण्याची शक्यता असते, बाहेर जाऊन कोणाला तरी इजा करण्याची किंवा अगदी हत्या करण्याचीही शक्यता असते, कारण आपण संतापलेले असतो. तर, ही विध्वंसक वर्तणूक असते. पण समजा, विशिष्ट व्यवस्थेमधील किंवा विशिष्ट परिस्थितीमधील अन्यायावर आपण संतापलो असलो, तर आपण ती प्रत्यक्षात बदलण्याचाही प्रयत्न करतो. अशा वेळी आपली कृती हिंसक असेलच असं नाही. पण काहीतरी रचनात्मक किंवा सकारात्मक करताना त्यामागील प्रेरणा अस्वस्थकारक भावनेचीच असते, हा इथला मुद्दा आहे. आपल्याकडे मनःशांती नसते, आणि मनःशांती नसल्यामुळे ती सकारात्मक कृती करताना आपलं मन व भावना फारशा स्पष्ट नसतात आणि आपली मनोवस्था फारशी स्थिर नसते.

या प्रसंगांमध्ये उत्कट इच्छेमुळे किंवा संतापामुळे, इतर व्यक्तींनी आपल्यावर प्रेम करावं किंवा अन्याय संपावा, असं आपल्याला वाटत असतं. या स्थिर मनोवस्था किंवा स्थिर भावनिक अवस्था नाहीत. या स्पष्ट मनोवस्था किंवा स्पष्ट भावनिक अवस्था नसल्यामुळे आपण काय करावं याबद्दल आणि आपल्या हेतूनुसार प्रत्यक्ष कृती कशी करायची याबद्दल फारसा स्पष्टपणे विचार करत नाही. परिणामी, आपला आत्मसंयम राहत नाही. उदाहरणार्थ, कोणालातरी काहीतरी करण्यासाठी आपण मदत करतो, पण त्यांना ते स्वतः करू देणं हा मदतीचा अधिक चांगला मार्ग असण्याची शक्यता आहे. समजा, आपल्याला मोठी झालेली एक मुलगी आहे आणि तिला स्वयंपाकामध्ये किंवा घराची देखभाल करण्यामध्ये किंवा मुलांची काळजी घेण्यामध्ये मदत करायची आपली इच्छा असेल, तर अनेक अर्थांनी ते हस्तक्षेप करणारं ठरतं. स्वयंपाक कसा करावा किंवा स्वतःची मुलं कशी वाढवावी, हे आपण सांगितलेलं आपल्या मुलीला कदाचित आवडणारही नाही. पण आपल्याला प्रेम हवं असतं आणि आपण उपयुक्त ठरावं असं वाटत असतं, त्यामुळे आपण स्वतःला तिच्यावर लादतो. आपण काहीतरी रचनात्मक करत असतो, पण ते करत असताना आपण आत्मसंयम गमावतो. त्यामुळे “माझं तोंड गप्प ठेवणं, मत न देणं आणि मदत देऊ न करणं, हेच योग्य राहील”, हा विचार अशा वेळी आपल्या मनात येत नाही.

दुसऱ्या व्यक्तीला मदत करणं योग्य असेल अशा परिस्थितीत आपण मदत केली, तरी आपण त्याबाबत निवांत नसतो, कारण आपल्याला त्यातून काही मोबदला अपेक्षित असतो. आपल्याला प्रेम हवं असतं; आपली लोकांना गरज भासावी असं आपल्याला वाटतं; लोकांनी आपल्याला दाद द्यावी असं आपल्याला वाटतं. अशा प्रकारच्या उत्कट इच्छेमुळे, आपल्या मुलीने आपल्याला हवा तसा प्रतिसाद दिला नाही तर आपण नाराज होतो.

अस्वस्थकारक भावनांच्या या प्रक्रियेमुळे आपण मनःशांती व आत्मसंयम गमावतो. आपण अन्यायाशी लढायला जातो तेव्हा हे घडणं अधिक स्वाभाविक असतं. याबद्दल त्रस्त वाटून आपण खरोखरच नाराज होतो. त्या नाराज असण्याच्या आधारावर आपण कृती करणार असू, तर काय करायला हवं याचा विचार आपण फारशा स्पष्टपणे करू शकत नाही. आपल्याला हवा असलेला बदल घडवण्यासाठी जो काही सर्वोत्तम कृतीचा मार्ग असेल तो अशा वेळी आपल्याला अनुसरता येत नाही.

थोडक्यात, आपण विध्वंसक मार्गाने कृती करत असलो किंवा रचनात्मक कृती करत असलो, तरी आपल्या कृतीमागची प्रेरणा अस्वस्थकारक भावनेची असेल आणि अशी भावना आपल्या कृतीसोबत असेल, तर आपल्या वर्तणुकीमुळे समस्या निर्माण होतात. याने इतर लोकांसमोर समस्या उभ्या राहतील की नाही याचा अचूक अंदाज आपल्याला बांधता येत नसला, तरी यातून मुळात आपल्याला समस्यांना सामोरं जावं लागतं. तत्काळ होतील अशा गोष्टींसारख्या या समस्या नसतात; या दीर्घकालीन समस्या असतात, म्हणजे अस्वस्थकारक भावनांच्या प्रभावाखाली कृती केल्याने आपल्याला अशा अस्वस्थकारक मार्गाने वारंवार कृती करायची सवय लागते. अशा प्रकारे अस्वस्थकारक भावनांवर आधारलेली आपली अनिवार्य वर्तणूक दीर्घकालीन वर्तनाचे समस्याग्रस्त मार्ग निर्माण करते. मग आपल्याला कधीच मनःशांती लाभत नाही.

आपल्याला प्रेम हवंसं वाटतं किंवा दाद हवीशी वाटते, यांसाठी इतरांना मदत करण्याची व इतरांशी चांगलं वागण्याची प्रेरणा आपल्याला होते, याचं हे स्पष्ट उदाहरण आहे. यामागे मूलतः आपली असुरक्षितता असते. पण आपण अशा प्रकारच्या प्रेरणेने कृती करणं सुरूच ठेवलं, तर कधीच समाधान लाभत नाही, “बरं, आता मला प्रेम मिळतं आहे. आता बास, आता मला अधिक काही गरजेचं नाही” असं आपल्याला कधीच वाटत नाही. प्रेम मिळावं या आशेने आपण अधिकाधिक देत जातो, पण आपल्याला कायम निराश वाटतं. कोणी आपले आभार मानले तरी “त्यांना खरोखर असं काही म्हणायचं नाहीये” असा विचार आपण करतो, त्यामुळे आपल्याला निराश वाटतं. अशा परिस्थितीत आपल्याला कधीही मनःशांती लाभत नाही. उलट, मनस्थिती अधिकाधिक बिघडत जाते, कारण याच लक्षणांची वारंवार पुनरावृत्ती होते. यालाच “संसार” असं म्हणतात- अथकपणे पुनरावृत्ती होणारी समस्याग्रस्त परिस्थिती.

अस्वस्थकारक भावनेमुळे आपण नकारात्मक किंवा विध्वंसक कृती करत असतो, तेव्हा अशा प्रकारचं लक्षण ओळखणं फारसं अवघड नाही. उदाहरणार्थ, आपण कायम त्रस्त असलो आणि त्रस्त असल्यामुळे आपण छोट्याछोट्या गोष्टींवरही संतापतो, त्यामुळे इतरांशी आपण कायम कठोरपणे किंवा क्रूरपणे बोलतो. स्वाभाविकपणे कोणालाही आपण आवडत नाही आणि लोकांना आपल्यासोबत फारसं असावंसं वाटत नाही आणि त्यातून आपल्या संबंधांमध्ये अनेक समस्या उद्भवतात. इथे काय घडतंय हे ओळखणं बऱ्यापैकी सोपं आहे. पण आपल्या सकारात्मक कृतीमागे अस्वस्थकारक भावना असेल, तेव्हा ते ओळखणं सोपं नसतं. पण दोन्ही प्रकारच्या परिस्थितींमध्ये आपण ते ओळखणं गरजेचं आहे.

आपण अस्वस्थकारक भावनेच्या, मनोवृत्तीच्या किंवा मनोवस्थेच्या प्रभावाखाली आहोत, हे कसं ओळखावं

आपण अस्वस्थकारक भावनेच्या किंवा मनोवृत्तीच्या प्रभावाखाली कृती करतो आहोत, हे कसं ओळखायचं, हा प्रश्न आहे. ही केवळ एखादी भावना असेल असं नाही; जीवनाविषयीची किंवा स्वतःविषयीची ती मनोवृत्तीही असू शकते. यासाठी आपण आत्मचिंतन करण्याइतपत संवेदनशील असायला हवं आणि आपल्याला आतून काय वाटतंय हे लक्षात घ्यायला हवं. हे करण्यासाठी अस्वस्थकारक भावना किंवा अस्वस्थकारक मनोवृत्ती यांची व्याख्या अतिशय मदतीची होईल: या भावनेमुळे किंवा मनोवृत्तीमुळे आपण मनःशांती व आत्मसंयम गमावतो.

आपण काही बोलण्याच्या बेतात असलो किंवा काही करण्याच्या बेतात असलो, तर आपल्याला आतून थोडंसं उदास वाटतं, आपण पूर्णतः निवांत नसतो- आपल्या आत कोणतीतरी अस्वस्थकारक भावना उपस्थित आहे, याची ही खूण होय.

हे अनेकदा नेणिवेच्या पातळीवरचं असू शकतं आणि तसं ते असतंदेखील, पण त्यामागे काही अस्वस्थकारक भावना असते.

समजा, आपण कोणालातरी काहीतरी समजावण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपण त्या व्यक्तीशी बोलत असताना आपल्या पोटामध्ये थोडीशी बेचैनी निर्माण झाल्याचं आपल्याला वाटलं, तर यात काहीतरी अभिमान दडलेला आहे याचा हा संकेत असतो. “मी किती हुशार आहे. मला हे कळतंय. मी तुला हे समजून घेण्यासाठी मदत करतोय,” असं आपल्याला वाटण्याची शक्यता आहे. काहीतरी स्पष्ट करून सांगून आपण त्या व्यक्तीला खरोखरच मदत करू पाहत असतो, पण आपल्या पोटामध्ये आपल्याला थोडीशीही बेचैनी वाटली, तरी त्यामध्ये अभिमान असल्याचं लक्षात येतं. विशेषतः आपण स्वतःच्या उपलब्धींविषयी किंवा आपल्या गुणांविषयी बोलतो तेव्हा हे घडतं. अनेक आपण हे थोड्याशा बेचैनीने अनुभवतो.

किंवा, अस्वस्थकारक मनोवृत्तीचा दाखला पाहा. “प्रत्येकाने माझ्याकडे लक्ष द्यायला हवं”, ही मनोवृत्ती गृहीत धरावी, कारण अशी मनोवृत्ती आपण अनेकदा अनुभवतो. आपल्याला स्वतःकडे दुर्लक्ष झालेलं आवडत नाही- कोणालाच तसं आवडत नाही. “लोकांनी माझ्याकडे लक्ष द्यावं आणि मी काय बोलतोय याकडे लक्ष द्यावं”, असं आपल्याला वाटतं. यासोबतही आतून काही नाराजी असू शकते, विशेषतः लोक आपल्याकडे लक्ष देत नसतील तर अशी भावना निर्माण होते. त्यांनी आपल्याकडे लक्ष का द्यावं? याबद्दल आपण विचार करतो, तेव्हा आपल्याला काहीच ठोस कारण सापडत नाही.

संस्कृतमधील “क्लेश”- तिबेटी भाषेतील “न्योन-मोंग”- ही अतिशय अवघड संज्ञा आहे, तिचं भाषांतर मी इथे “अस्वस्थकारक भावना” (डिस्टर्बिंग इमोशन) किंवा “अस्वस्थकारक मनोवृत्ती” (डिस्टर्बिंग अॅटिट्यूड) असं केलं आहे. हे अवघड आहे कारण, यातील काही गोष्टी भावना किंवा मनोवृत्ती यातील कोणत्याही प्रवर्गात अचूकपणे बसवता येत नाहीत- उदाहरणार्थ, भाबडेपणा. आपल्या वर्तनाचा इतरांवर किंवा स्वतःवर कोणता परिणाम होतो याबद्दल आपण अतिशय भाबडे असण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ, कोणालातरी बरं वाटत नसेल किंवा कोणीतरी नाराज असेल, तर त्याबद्दल आपण भाबडे असतो. अशा परिस्थितीत त्यांना काहीही सांगितलं तरी त्याचा परिणाम काय होईल, याबद्दल आपण निश्चितपणे भाबडे असू शकतो; आपला हेतू चांगला असला, तरी त्यांना आपला त्रासही वाटू शकतो.

आपली मनोवस्था अशा प्रकारची अस्वस्थकारक असेल, तेव्हा आपल्याला आतून बेचैन वाटेलच असं नाही. पण आपण आधी नमूद केल्याप्रमाणे, आपण मनःशांती गमावतो तेव्हा आपलं मन अस्पष्ट असतं. आणि आपण भाबडे असतो, तेव्हा आपलं मन अस्पष्ट असतं; आपण स्वतःच्याच मर्यादित विश्वामध्ये असतो. असं स्वतःच्या मर्यादित विश्वामध्ये असल्यामुळे आपण आत्मसंयम गमावतो. कोणती गोष्ट मदतीची आहे व कोणती नाही, विशिष्ट परिस्थितीमध्ये काय योग्य आहे व काय अयोग्य आहे, यातला भेद आपण करत नाही. असा भेद करता न आल्यामुळे आपण योग्यरित्या व संवेदनशीलतेने कृती करत नाही. निराळ्या शब्दांत सांगायचं तर, योग्य कृती करण्यासाठी आणि अयोग्य कृती करण्यापासून दूर राहण्यासाठी लागणारा आत्मसंयम आपल्याकडे नसतो. या अर्थाने भाबडेपणा अस्वस्थकारक मनोवस्थेच्या या व्याख्येत अचूकरित्या बसतो. अन्यथा, भाबडेपणाकडे भावना किंवा मनोवृत्ती म्हणून पाहणं अवघड जातं. मी म्हटल्याप्रमाणे, “क्लेश” या संज्ञेचं अचूक भाषांतर करणं अतिशय अवघड आहे.

अस्वस्थकारक नसलेल्या भावना

संस्कृत व तिबेटी भाषांमध्ये “भावना” (इमोशन्स) यासाठी कोणताही शब्द नाही. या भाषा मानसिक घटकांबद्दल बोलतात. आपल्या मनोवस्थेचा प्रत्येक क्षण या विविध घटकांनी बनलेला असतो. या मानसिक घटकांची विभागणी अस्वस्थकारक व अस्वस्थकारक नसलेले आणि रचनात्मक व विध्वंसक अशी केली जाते. या दोन जोड्या पूर्णतः एकमेकांमध्ये मिसळत नाहीत. शिवाय, यातील कोणत्याही प्रवर्गामध्ये न बसणारे मानसिक घटक असतातच. तर, पश्चिमेत ज्याला “इमोशन्स” (भावना) संबोधतात त्या संदर्भात काही भावना अस्वस्थकारक असतात आणि काही अस्वस्थकारक नसतात. बौद्ध धर्मात आपण सर्व भावनांपासून मुक्त होऊ पाहतो, असं अजिबातच नाही. आपल्याला केवळ अस्वस्थकारक भावनांपासून मुक्त व्हायचं असतं. हे दोन टप्प्यांत केलं जातं: एक, या भावनांच्या नियंत्रणाखाली येऊ नये, आणि दोन, या भावना पुन्हा येणारच नाहीत अशा रितीने त्यांच्यापासून मुक्त होणं.

अस्वस्थकारक नसलेली भावना कोणती असेल? “प्रेम” किंवा “करुणा” किंवा “संयम” या अस्वस्थकारक नसलेल्या भावना आहे, असं आपल्याला वाटू शकतं. युरोपीय भाषेतील या शब्दांचं (म्हणजे “लव्ह”, “कम्पॅशन” आणि “पेशन्स”) विश्लेषण केल्यावर आपल्या लक्षात येतं की या भावनांमध्येही अस्वस्थकारक व अस्वस्थकारक नसलेले असे प्रकार असू शकतात. त्यामुळे आपण थोडी काळजी घ्यायला हवी. “माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, मला तुझी गरज आहे, मला कधीही सोडून जाऊ नको!” असं वाटण्याइतकं आपलं प्रेम असेल, तर अशा प्रकारचं प्रेम ही प्रत्यक्षात चांगल्यापैकी अस्वस्थकारक मनोवस्था आहे. दुसऱ्या व्यक्तीनेही आपल्यावर प्रेम केलं नाही किंवा तिला आपली गरज नसेल, तर आपण अतिशय नाराज होतो, या अर्थी ही भावना अस्वस्थकारक आहे. आपण अतिशय संतापतो आणि अचानक आपली भावना बदलते, “आता माझं तुझ्यावर प्रेम नाही.”

तर, आपण एखाद्या मनोवस्थेचं विश्लेषण करत असतो, तेव्हा ती भावनिक असल्याची मांडणी आपण करू शकतो, आणि आपण तिला “प्रेम” असं म्हणू शकतो, प्रत्यक्षात मात्र ती मनोवस्था अनेक मानसिक घटकांचं मिश्रण असते. आपण कोणतीही भावना केवळ तिच्यापुरतीच अनुभवत नाही. आपल्या भावनिक अवस्था या कायम मिश्र असतात; त्यात अनेक भिन्न घटक असतात. “माझं तुझ्यावर प्रेम आहे, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही,” असं वाटतं तो प्रेमाचा प्रकार अवलंबित्वाचा आहे आणि तो चांगल्यापैकी अस्वस्थकारक आहे. पण अस्वस्थकारक नसलेल्या प्रेमाचा प्रकारही असतो, त्यात दुसऱ्या व्यक्तीने आनंदी राहावं आणि आनंदाची कारणं त्या व्यक्तीला उपलब्ध होत राहावीत, एवढीच इच्छा असते. मग त्या व्यक्तीची वागणूक कशीही असो. आपल्याला तिच्याकडून काही परताव्याची अपेक्षा नसते.

उदाहरणार्थ, आपल्या मुलांबाबत आपण तशा अस्वस्थकारक नसलेल्या प्रेमाचा प्रकार अनुभवत असण्याची शक्यता आहे. मुलांकडून आपली तशी काही परतफेडीची अपेक्षा नसते. काही पालक अशी अपेक्षा अर्थातच करतात. पण सर्वसाधारणतः मुलांनी काहीही केलं तरी आपण त्यांच्यावर प्रेमच करतो. आपल्या मुलाने अथवा मुलीने सुखी राहावं असं आपल्याला वाटतं. पण इथेही दुसऱ्या अस्वस्थकारक मनोवस्थेशी याचं मिश्रण झालेलं असतं- म्हणजे त्यांना सुखी करता यावं यासाठीची क्षमता आपल्यात असावी असं आपल्याला वाटत असतं. आपल्या मुलांना सुखी वाटण्याच्या हेतूने आपण काही केलं, उदाहरणार्थ त्यांना बाहुल्यांचा खेळ दाखवला आणि त्याचा उपयोग झाला नाही व त्यांना त्यात सुख वाटलं नाही, तर ते संगणकावर खेळ खेळतील आणि आपल्याला अतिशय वाईट वाटेल. आपल्याला आपल्या मुलाच्या सुखाचं कारण व्हायचं होतं, संगणकावरचा खेळ हे ते कारण असायला नको होतं, त्यामुळे आपल्याला वाईट वाटतं. पण तरीही आपल्या मुलाविषयीच्या त्या भावनेला आपण “प्रेम” असं म्हणतो. “तू सुखात राहावंस, एवढंच मला वाटतं. तुला सुखी करण्याचा प्रयत्न मी करेन. मला असा प्रयत्न करणारी तुझ्या जीवनातील सर्वांत महत्त्वाची व्यक्ती व्हायचं आहे.”

तर, या सर्व तपशीलवार चर्चेमधील मुख्य मुद्दा असा की, आपल्या भावनिक स्थितींकडे आपण अतिशय काळजीपूर्वक पाहणं गरजेचं असतं आणि भिन्न भावनांवर शिक्के मारताना आपण वापरतो त्या शब्दांमध्ये अडकून पडू नये. आपल्या मनोवस्थेमधील कोणते पैलू अस्वस्थकारक आहेत आणि कशामुळे आपण मनःशांती गमावतो, स्पष्टता गमावतो, आत्मसंयम गमावतो, त्याचा तपास करायला हवा. या गोष्टींवर आपण काम करायला हवं.

अस्वस्थकारक भावनांमधील अंतःस्थ कारण- अजाणपणा

या अस्वस्थकारक मनोवस्थांपासून किंवा भावनांपासून किंवा मनोवृत्तींपासून आपल्याला मुक्त व्हायचं असेल, तर आपण त्यांच्या कारणांपर्यंत जायला हवं. त्यांचं अंतःस्थ कारण आपण नष्ट केलं, तर आपण त्यांच्यापासून मुक्त होऊ शकतो. केवळ आपल्या समोर समस्या निर्माण करणाऱ्या अस्वस्थकारक भावनांपासून स्वतःला मुक्त करण्यापुरता हा मुद्दा मर्यादित नाही. अस्वस्थकारक भावनेच्या मुळाशी जाऊन त्यापासून मुक्त होणं गरजेचं आहे.

तर, या अस्वस्थकारक मनोवस्थांचं अगदी खोलवरचं कारण काय? यात आपल्याला जे काही सापडतं त्याचं भाषांतर अनेकदा “अजाणपणा” (“इग्नरन्स”, किंवा मी “अवेअरनेस” असं वापरणं पसंत करतो) असं केलं जातं. आपण काही गोष्टींबाबत अजाण असतो, आपल्याला त्याबद्दल काहीच माहीत नसतं. “इग्नरन्स” या शब्दातून आपण मूर्ख आहोत असं वाटतं. पण हे आपण मूर्ख असण्याशी संबंधित नाही. आपल्याला फक्त माहीत नसतं, किंवा आपण गोंधळलेले असतो: आपल्याला चुकीचं आकलन होतं.

आपण कशाबद्दल गोंधळलेले असतो किंवा आपण कशाबद्दल अजाण असतो? आपल्या वर्तनाचे परिणाम आणि त्यातील परिस्थितींबद्दलचं हे अजाणपण असतं. आपण एका अर्थी अतिशय संतापलेले असतो किंवा आपल्याला ओढ वाटत असते किंवा आपण नाराज असतो, आणि त्यामुळे आपण गतकालीन सवयींच्या किंवा प्रवृत्तींच्या आधाराने अनिवार्य रितीने कृती करतो. कर्म म्हणजे हेच असतं, अस्वस्थकारक भावनेच्या किंवा अस्वस्थकारक मनोवृत्तीच्या आधारे अनिवार्य कृती करणं आणि आत्मसंयम गमावणं.

या अनिवार्य वर्तनाच्या आत अजाणपणा असतो: आपण काय केलं किंवा काय बोललो याचा परिणाम आपल्याला माहीत नसतो: एखादी गोष्ट चोरल्यामुळे आपण सुखी होऊ असं आपल्याला वाटलेलं असतं, पण तसं काही होत नाही. किंवा तुम्हाला मदत केल्याने मी सर्वांना हवाहवासा वाटेल आणि माझ्यावर प्रेम केलं जाईल, असं मला वाटत असतं; पण तसं काही होत नाही. तर, आपल्या वर्तनाचा परिणाम काय असेल हे आपल्याला कळलेलं नसतं. “माझ्या बोलण्याने तू दुखावशील असं मला वाटलं नव्हतं.” “याने मी सुखी होईन असं मला वाटत होतं, पण तसं काही झालं नाही.” किंवा त्याने तू आनंदी होशील असं वाटलं होतं, पण तसंही झालं नाही. किंवा परिस्थितींबाबत, “तू कामात असशील असं काही मला माहीत नव्हतं.” किंवा “तुझं लग्न झाल्याचं मला माहीत नव्हतं.” किंवा आपण गोंधळलेले असू, “तुझ्याकडे बराच वेळ असेल असं मला वाटलं होतं.” पण तुझ्याकडे वेळ नाहीये. “तू अजून एकटाच आहेस, कोणाशी तुझी जवळीक नाही असं मला वाटत होतं, त्यामुळे मी प्रेमसंबंध जोडायचे प्रयत्न केले,” ते अयोग्य आहे. इथेही पुन्हा आपण परिस्थितींबाबत अजाण असतो: एकतर आपल्याला परिस्थितीविषयी माहिती नसते किंवा आपण त्याबाबत गोंधळलेले असतो: किंवा आपल्याला त्याबद्दल चुकीची माहिती असते.

आपल्या अनिवार्य कृतीमागे जागरूकतेचा अभाव असतो, हे खरं आहे. पण अस्वस्थकारक भावनांचं मूळ कारणही तेच आहे आणि अस्वस्थकारक भावनाही अनिवार्य वर्तनासाठी घट्ट जोडलेल्या आहेत, हे तितकं सहज लक्षात येत नाही. त्यामुळे या मुद्द्यांकडे आपण अधिक काळजीपूर्वक पाहायला हवं.

Top