आनंदाकडे जाण्याचा मार्ग म्हणून समस्यांपासून मुक्त होण्याचा निश्चय करणं

माहिती युगातील तणाव हाताळण्यासाठी आपण इंटरनेट, त्यातील समाजमाध्यमं, संदेशसेवा, इत्यादींचा वापर कसा करतो, हे तपासण्याची गरज आहे. आपल्याला अधिक तणाव देणाऱ्या आपल्या आत्मघातकी सवयी एकदा का ओळखल्या की, आपल्या दुःखाचा स्रोत आपल्या मनातच आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं. तणाव घ्यायचा नाही या निश्चयासह आणि स्वयंशिस्त, एकाग्रता, सजगता व भेदक्षम जागरूकता यांच्यासह आपण आधुनिक जीवनातील आव्हानं अधिक स्पष्टतेने व शांततेने हाताळण्यासाठी सक्षम होऊ.

आपण मोठ्या शहरात राहत असलो, लहान शहरात राहत असलो किंवा ग्रामीण भागात राहत असलो, तरी आपल्या सर्वांनाच आधुनिक जगातील समस्यांना सामोरं जावं लागतं. बहुतांश लोक याचं वर्णन “तणाव” असं करतील. माहिती, चित्रपट, टीव्ही चॅनल, संगीत, समाजमाध्यमांवरील आशय, तत्काळ संदेशांची देवाणघेवाण करणाऱ्या सेवा, ऑनलाइन उत्पादनं, इत्यादी अधिकाधिक प्रमाणात तत्काळ उपलब्ध असल्यामुळे आपल्याला ते अधिकाधिक हवं असतं. वरकरणी यातून आपलं जीवन सुधारत असल्याचं भासत असलं, तरी या गोष्टी- विशेषतः निवडीला अनेक पर्याय असतील तेव्हा- आपलं जीवन अधिक गुंतागुंतीचं व तणावदायक करतात. आपल्याला काहीच हातून सुटायला नको असतं, एखादी बातमी, किंवा एखादी ई-मेल किंवा एखादा संदेश, काहीच नजरेतून सुटायला नको. आपण या सगळ्यापासून दूर राहिलो तर एकटे पडू, अशी भीती आपल्याला वाटते. टीव्हीवरच्या एखाद्या कार्यक्रमासारख्या एखाद्या गोष्टीची निवड आपण केली, तरी याहून चांगलं काहीतरी असेल आणि ते आपल्याला पाहता येत नसेल, अशी हुरहूर आपल्या मनाला लागू राहण्याची शक्यता असते.

आपल्या समाजाचा, मित्रांच्या गटाचा भाग व्हायचं असतं; आपण समाजमाध्यमांवर काहीही प्रसिद्ध केलं, तरी त्यासाठी आपल्याला “लाइक” केलेलं हवं असतं, मगच आपण स्वीकारले गेलो आहोत असं आपल्याला वाटतं. आपण शांत नसतो, आणि आपल्याला मिळणाऱ्या “लाइक”च्या संख्येने किंवा इंटरनेटवर आपण वाजतो त्या माहितीने कधीच आपलं समाधान होत नाही. आपल्याला संदेश मिळाला आहे, असं आपल्या फोनवर सूचित होतं तेव्हा अंदाज बांधून आपण उत्तेजित होतो, आणि आपल्याला अधिक ‘लाइक’ मिळाले आहेत का हे फेसबुकवर तपासतानाही आपण उत्तेजित होतो, आणि काही नवीन घडलं असेल तर बातम्या परतपरत पाहताना आपण बातम्यांसाठी वखवखलेल्या व्यक्तीप्रमाणे उत्तेजित होतो. आपल्याला काहीच सुटू द्यायचं नसतं, पण यातून आपल्याला कधीच समाधान लाभत नाही आणि आपल्याला सतत अधिकाधिक हवंसं वाटतं.

दुसऱ्या बाजूला, आपल्या भोवतीच्या परिस्थितीचा भारही आपल्यावर येत असतो, त्यामुळे आपण मोबाइल उपकरणांकडे पाहत या परिस्थितीपासून पळायचा प्रयत्न करतो आणि सब-वेमध्ये असताना किंवा चालत असताना संगीत ऐकतो. आपल्याभोवती काय आहे या वास्तवापासून आपण दूर जाऊ पाहतो आणि आपल्या खाजगी आभासी जगामध्ये आश्रय शोधतो. सतत करमणूक व्हायला हवी, अशी अनिवार्य गरज आपल्याला भासते. एका बाजूला आपल्याला शांतता व निश्चलता हवीहवीशी वाटते आणि दुसऱ्या बाजूला माहिती, संगीत, इत्यादींच्या अनुपस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या पोकळीचं आपल्याला भय वाटत असतं. बाह्य जगाच्या तणावापासून मुक्त होण्याचा निश्चय आपण केलेला असतो, त्यामुळे आपण ते जग सोडून इंटरनेटच्या आभासी विश्वात आश्रय शोधतो. पण तिथेही आपल्याला सोबत हवीशी वाटते आणि समाजमाध्यमांवरील आपल्या तथाकथित “मित्रां”च्या संमतीचीही गरज भासते, आपल्याला कधीच आश्वस्त वाटत नाही. पण आपल्या मोबाइल उपकरणांमध्ये आश्रय घेणं, हा उपाय आहे का?

या सवयींमुळे निर्माण झालेल्या नित्यक्रमामध्ये अडकलेलं असताना अनुभवाला येणारं दुःख आणि त्याचे स्रोत आपण ओळखायला हवेत. आपण या दुःखापासून मुक्त होण्याचा निश्चय करणं गरजेचं आहे. मग या दुःखापासून मुक्त होण्यासाठीचा निश्चय करायला हवा. दुःखाच्या स्त्रोतांपासून आपल्याला मुक्त करणाऱ्या पद्धती माहीत करून घेणं आणि त्या परिणामकारक ठरतील यावर विश्वास ठेवणं, या आधारे हा निश्चय अंमलात आणावा. पण आपल्याला झोम्बीसारखं काहीच न जाणवणाऱ्या स्थितीत जायचं नसून सुखी व्हायचं आहे. सुख म्हणजे केवळ दुःखाचा अभाव नव्हेत; दुःखापासून मुक्त होऊन तटस्थ, भावनाहीन अवस्थेहून सुख वेगळं असतं.

Top