आपल्यामध्ये किंवा आपल्या भावनांमध्ये विशेष असं काही नसतं

प्रास्ताविक

मनाचं प्रशिक्षण किंवा मनोवृत्तीचं प्रशिक्षण, तिबेटी भाषेमध्ये लोजोंग, हा अतिशय व्यापक विषय आहे. आपण आपल्या जगण्याचा अनुभव कसा घेतो आणि आपण घेत असलेल्या अनुभवाबद्दलची आपली मनोवृत्ती कशी बदलू शकतो, याचा विचार या विषयामध्ये केला जातो. जीवनात चढ-उतार असतातच आणि सर्वसाधारणपणे जीवन फारसं सोपं नसतं, हे आपण सगळेच जाणतो. आपल्याबाबतीत सदासर्वकाळ अनेक गोष्टी होत असतात, आणि कार्यकारणांच्या अतिशय व्यापक अवकाशातून त्यांचा उगम होतो.

याचं एक साधं उदाहरण म्हणून आज संध्याकाळी या संमेलनासाठी एकत्र जमलेल्या आपणा सर्वांचा विचार करून पाहा. तुम्ही इथे कसे आलात? याला वाहतुकीची एक संपूर्ण भौतिक बाजू आहे- तुम्ही शहरात राहता ही वस्तुस्थिती आहे, आणि तुमची जी काही रुची असेल ती असेल, तुमच्या कुटुंबात, कामाच्या ठिकाणी आणि एकंदर जीवनात जे काही चाललं असेल ते असेल. अशा अगणिक कार्यकारणांचा परिणाम म्हणून आपण इथे एकत्र आहोत, प्रत्येकाची पार्श्वभूमी भिन्न आहे आणि कार्यकारणांचा संच भिन्न आहे.

आज आपण इथे बसलेलो असताना, तुम्ही आहात आणि मी आहे आणि एक भाषांतरकार आहे. एक व्हिडिओ कॅमेरा आपलं रेकॉर्डिंग करतो आहे. तुम्ही माझ्याकडे पाहत असणं आणि कॅमेऱ्याकडे पाहत असणं यात भेद कोणता? आपल्याप्रमाणे कॅमेराही विविध कार्यकारणांमुळे इथे आहे- कोणीतरी त्याचं उत्पादन केलं, कोणीतरी तो विकत घेतला, आणखी कोणातरी व्यक्तीने तो उभा केला. कॅमेरा आणि आपण दोघेही माहिती घेतो आहोत. परंतु, खरा भेद हा आहे की, आपण घेतलेल्या माहितीच्या आधारे भावना विकसित करतो, म्हणजे आनंद किंवा दुःखाची काही पातळी विकसित होते. कॅमेरा व कम्प्युटर यांना मात्र त्यांच्याकडील माहितीचा अनुभव घेता येत नाही.

आनंद म्हणजे काय?

आपल्या सर्वांना आनंदी व्हायचं आहे, दुःखी व्हायचं नाही, हे जीवनाचं प्राथमिक तत्त्व असल्याचं दिसतं. “बरं, आनंद म्हणजे नक्की काय? आपल्याला नक्की काय हवं असतं?” या प्रश्नाचा विचार करण्याची प्रेरणा यातून आपल्याला होते.

बौद्ध दृष्टिकोनातून, आनंद म्हणजे अशी भावना जी अनुभवल्यानंतर आपल्याला स्वाभाविकरित्या तिच्यापासून फारकत घ्यावीशी वाटत नाही; आपल्याला ती आवडते आणि आपल्याला तिच्यामुळे समाधानी वाटतं, ती कायम राहावी असं वाटतं.

हा एक मानसिक अनुभव आहे, त्याचसोबत त्यामध्ये काही वस्तू वा व्यक्ती पाहणं यांसारखा शारीरिक बोधही आहे, किंवा कोणा वस्तूविषयी वा व्यक्तीविषयी विचार करणं यांसारखा मानसिक बोध आहे. आपण पाहतोय किंवा विचार करतोय ते आपल्याला आवडतं, हा भाग यात फारसा नसतो; उलट, ते पाहताना वा विचार करताना होणारी भावना आपल्याला आवडत असते. परंतु, आनंद म्हणजे सुखाची शारीरिक संवेदना नव्हे: आनंद ही मनोवस्था आहे. ती कवटाळून ठेवण्याच्या अस्वस्थकारक भावनेसारखीही नाही- चॉकलेट, आपलं तारुण्य किंवा अगदी खुद्द आनंद यांसारख्या गुणांची अतिशयोक्ती करताना आपण त्या गोष्टी कवटाळू पाहतो आणि त्यांना दूर जाऊ देत नाही, पण आनंद म्हणजे हे नव्हे.

एखाद्या गोष्टीकडे पाहताना, उदाहरणार्थ एखादा चित्रपट पाहताना, आपण अनुभवत असलेली आनंदाची पातळी कमी पातळीची असू शकते, पण काही मिनिटांनंतरही आपण त्या गोष्टीकडे पाहत असू तर मग आपल्याला लक्ष दुसरीकडे वळवू नये असं वाटतं, यातून आपण समाधानी आहोत आणि आपल्याला जी भावना जाणवतेय त्यापासून आपल्याला दूर जायचं नाहीये असं सूचित होतं. “याकडे पाहताना आपल्याला आनंद होतो” असं आपण म्हणू शकतो. आपल्याला त्याबद्दल दुःख वाटत असतं- दुःख म्हणजे अशी भावना जी अऩुभवल्यावर आपल्याला स्वाभाविकपणे तिच्यापासून दूर जावंसं वाटतं- तर आपण सरळ दुसरीकडे पाहून आपण अऩुभव बदलण्याचा प्रयत्न सर्वसाधारणतः करतो. शिवाय, काही वेळा आपल्याला तटस्थ भावना अनुभवाला येतात, त्यात आपल्याला दूरही जायचं नसतं किंवा दूर जाऊ नये असंही वाटत नसतं; आपण त्यापासून अलिप्त असतो.

परंतु, अनेकदा आपण “आनंदी” व “दुःखी” अशा संदर्भांत विचार करतो. आपण टोकांनुसार विचार करतो- एक तर आपल्या चेहऱ्यावर प्रचंड मोठं स्मित असतं किंवा आपण खरोखरच दुःखी व हताश असतो. पण आनंद व दुःख या भावना नाट्यमय असण्याची गरज नसते, कारण आपण आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण काही विशिष्ट पातळीच्या आनंदाने वा दुःखाने अनुभवतो आहोत, आणि बहुतांश क्षण फारसे नाट्यमय नसतात.

जीवनातील चढ-उतार

प्रत्येक क्षणी आपण विविध गोष्टी घडताना अनुभवत असतो, आणि आपल्या इथे असण्यामागच्या कार्यकारणांप्रमाणे या गोष्टीही लाखो कार्यकारणांच्या एकत्र येण्यातून घडत असतात. आपल्या भोवती किंवा आपल्या मनांमध्ये काय घडतंय याची माहिती आपण घेतो, आणि हे घडत असताना आपण विविध पातळ्यांवरचा आनंद व दुःख अनुभवतो. या घटिताचं वर्णन आपण अनेकदा मनस्थिती (मूड) असं करतो- चांगली मनस्थिती आहे किंवा वाईट मनस्थिती आहे, असं.

जीवनाचं स्वरूप असं आहे की त्यात सदासर्वकाळ चढ-उतार असतात, नाही का? आणि आपण ज्या मनस्थितीत असतो ती कायम आपण घेतलेल्या माहितीशी, आपल्या भोवती घडणाऱ्या घडामोडींशी, आणि आपण स्वतः काय करतोय त्याच्याशी जुळणारी असतेच असं नाही. उदाहरणार्थ, आपल्याला सर्वसाधारणतः आवडतं असं काहीतरी आपण करत असलो, तरी आपण वाईट मनस्थितीत असू शकतो, त्यामुळे आपण आनंदी नसतो आणि आपल्या कामात आपल्याला मजा येत नसते. किंवा कधी आपण काहीतरी फारसं मजेशीर नसलेलं करत असतो- उदाहरणार्थ, शारीरिक व्यायाम, पण ते करताना आपण आनंदी असतो, आपल्याला ते करत राहावंसं वाटतं. आपण प्रत्यक्षात काय करतोय याच्याशी आपली मनस्थिती प्रत्येक वेळी जुळतेच असं नाही, ही रोचक बाब आहे.

आपण प्रत्येक क्षण अनुभवतो, तेव्हा त्याबद्दल आपली विशिष्ट मनोवृत्ती असते. आता आपण मनोवृत्तीबद्दल बोलतो आहोत, तर ती असते तरी काय? आपण एखाद्या गोष्टीकडे कसं पाहतो, त्याला मनोवृत्ती म्हणता येईल. आपल्या मनोवृत्तीचे अनेक भिन्न प्रकार असतात आणि त्या-त्या मनोवृत्तीनुसार आपल्या मनस्थितीवर परिणाम होत असतो. सर्वसाधारण परिस्थितीमध्ये जीवनात सदासर्वकाळ अनुभवाला येणाऱ्या या चढ-उतारांमध्ये बदल घडवण्यासाठी आपल्याला फारसं काही करता येत नाही. आपल्याला चांगलं वाटेल अशी काही साधना केली, तरी दीर्घ काळामध्ये चढ-उतार राहतातच, हो ना? पण आपल्या मनोवृत्तीवर मात्र आपण काम करू शकतो. 

आता आपण आपल्या मनोवृत्तीच्या प्रशिक्षणाबद्दल बोलतो आहोत, याचे दोन पैलू आहेत. एक, वस्तूंबाबत विध्वंसक मनोवृत्ती थांबवायचा किंवा दूर करायचा प्रयत्न करणं. “विध्वंसक” हा शब्द खूप अवजड वाटू शकतो, तर आपण “अनुत्पादक” असंही म्हणू शकतो. वस्तूंकडे पाहण्याचे अधिक उत्पादक मार्ग पाहण्यामध्ये स्वतःला प्रशिक्षित करणं, हा दुसरा पैलू असतो.

लोक सर्वसाधारणतः “सकारात्मक विचारप्रक्रियेची ताकद” (पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिकिंग) असं ज्याला म्हणतात त्याबद्दल आपण बोलत नाहीयोत, हे इथे नोंदवणं आवश्यक आहे. त्यात अति आशावादी असणं अपेक्षित असतं: “सगळं विलक्षण आहे; सगळं महान आणि परिपूर्ण आहे!” हे मदतीला येऊ शकतं, पण हे खूपच सुलभीकरण करणारं आहे. आपल्या मनोवृत्तीवर काम करण्याची खरोखरची परिणामकारक पद्धत शोधण्यासाठी आपल्याला अधिक खोलवर पाहणं गरजेचं असतं.

आपल्या भावनांमध्ये विशेष असं काही नसतं

आपल्या भावनांविषयीच्या मनोवृत्तीवर पहिल्यांदा लक्ष केंद्रित करू- म्हणजे आपल्याला जाणवणाऱ्या आनंदाच्या वा दुःखाच्या पातळीबद्दल आपली मनोवृत्ती कशी असते ते पाहू. आपल्याला वाटणाऱ्या भावनेला अवाजवी महत्त्व देणं, ही समस्या बहुतांश लोकांमध्ये आढळते, त्या संदर्भात आपण हा मुद्दा पाहूया.

आपण स्वतःला- “मी”- खूप मोठं मानतो, आणि आपल्याला काय वाटतंय तेही खूप मोठं मानतो. आपल्याला सगळ्याचा अनुभव द्वैत मार्गाने येतो. उदाहरणार्थ, एका बाजूला आपलं “मी”विषयी असं अवाजवी मत असतं आणि दुसऱ्या बाजूला दुःख असतं. या दुःखाची आपल्याला भीती वाटते आणि आपण स्वतःला त्यापासून शक्य तेवढं वाचवू पाहतो, त्यापासून दूर जाऊ पाहतो. पण आपली मनोवृत्ती अशी असेल तर त्यातून आपल्याला प्रत्यक्षात कसं वाटतं? त्यातून आपल्याला वाईटच वाटतं, नाही का?

एक क्षणभर याबद्दल विचार करा: तुम्ही वाईट मनस्थितीत असता व दुःखात असता तेव्हा तुमची मनोवृत्ती कशी असते? तुम्ही रडत असता व खरोखरच विषण्ण असता, त्याबद्दल मी बोलत नाहीये. तुम्ही काम करत बसलेले असता किंवा टीव्ही पाहत असता किंवा काहीही करत असता तेव्हा तुम्ही सहजपणे म्हणता, “हूश्श, मला अगदी मलूल वाटतंय”- अशा स्थितीविषयी मी बोलतो आहे. आपण असे बसलेले असतो आणि एक मोठा काळा ढग आपल्याकडे येतो, आणि आपण स्वतःला त्यापासून वाचवू पाहतो, “मला हे नकोय!” असं म्हणतो- असा हा प्रकार असतो का? तुमच्या अनुभवात हे आलं असेल ना? वाईट मनस्थिती आपोआपच येते असं दिसतं, आणि आपल्याला ती कधीच नको असते. आपण त्यावर जितकं लक्ष केंद्रित करू तितकी ती भयंकर होते, आणखी खालावत जाते. इथे आपण घडणाऱ्या गोष्टीला अवाजवी ताणतो आणि त्यातून दोन गोष्टी तयार करतो- एका बाजूला “मी” आणि दुसऱ्या बाजूला वाईट मनस्थिती, ही समस्या आहे. 

आनंदाबद्दल काय बोलता येईल? इथे पुन्हा आपण द्वैती मार्गाने अनुभव घेतो- एका बाजूला “मी” आणि दुसऱ्या बाजूला आनंद, आणि आनंद गमावण्याची आपल्याला भीती वाटते, त्यामुळे आपण त्याला कवटाळून राहण्याचा प्रयत्न करतो. यात असुरक्षिततेची भावना असते, कारण आनंदाचा क्षण निघून जाईल याची आपल्याला भीती वाटते. निव्वळ निवांत राहून आनंदी वाटून घेत राहणं अवघड असतं, कारण असुरक्षिततेची भावना आनंद उद्ध्वस्त करते, नाही का? यात भर म्हणजे विविध प्रकारची गुंतागुंत असते- “मी आनंदी होण्यास पात्र नाही”, इत्यादी.

याबद्दल विचार केला तर आपणही थोडेफार प्राण्यांसारखे कसे वागतो याची मजा वाटते. कुत्रा कसा खातो, त्या खाण्याचा तो कथितरित्या आनंद घेत असतो, पण त्याच वेळी कायम आजूबाजूला बघत असतो, कोणीतरी आपलं खाणं घेऊन जाईल याबद्दल तो थोडासा तणावग्रस्तही असतो. तुम्हाला कधी अशी भावना जाणवते का? आपल्याला आनंदी असल्याची भावना जाणवते, पण कोणीतरी येऊन त्याला आपण दिसू आणि तो आनंद घेऊन जाईल अशी भीतीही आपल्याला वाटत असते. हे असं विचित्र असतं.

शिवाय, तटस्थ भावनाही असते- इथेही पुन्हा ‘मी’विषयीचा द्वैती दृष्टिकोन आणि तटस्थ भावना असं दोन्ही असतं. तटस्थ भावनेला अवाजवी ताणून आपण कोणतीच भावना नसलेल्या स्थितीपर्यंत नेतो. अनेकदा असं होतं की, आपल्याला काहीच भावना जाणवत नसल्यासारखं आपल्याला वाटतं. आपण खरोखरचे जिवंतच नाही असं वाटण्यासारखा हा प्रकार असतो. ही तटस्थ भावना आपल्याला काहीसं दुःखी वाटायला लावते. काहीच भावना न जाणवणं आपल्याला आवडत नाही.

आनंदी, दुःखी व तटस्थ अशा प्रत्येक शक्यतेमध्ये आपण जितकी अतिशयोक्ती करू आणि त्याला मोठं मानू, तितकं आपल्याला त्यातून अधिक दुःखी वाटतं. तर, आपल्या भावनांबद्दलची आपली मनोवृत्ती आपल्या अनुभवावर अतिशय कळीचा प्रभाव टाकत असते. आनंदी वा दुःखी वा तटस्थ भावना काहीशी विशेष आहे, असं आपण मानायला लागतो, आणि सर्वसाधारणतः आपल्यापेक्षा ती वेगळी आहे असं मानतो.

तुमच्या समोर तीन प्रकारचे पदार्थ आहेत, अशी कल्पना करा. एक भयंकर आहे, एक रुचकर आहे आणि एक नुसती बेचव आहे. हे दुःखी, आनंदी व तटस्थ भावनांसारखं आहे. या भावना आपल्याला जावतात, तेव्हा त्या आपण आपल्या आत घेतल्यासारखं, आपण त्या “खात” असल्यासारखं असतं. आणि एका अर्थी, आपण न खाण्याचा पर्याय निवडू शकतो, पण आपण खरोखरचं तसं करत नाही, “मला कोणत्याच भावना नसल्या तर बरं” असं आपल्याला भावनांबाबत करता येईल का? पण तसं झालं तर आपल्याला जिवंतही वाटणार नाही, त्यामुळे हे असमाधानकारक आहे. एका बाजूला “मी” आणि दुसऱ्या बाजूला मनस्थिती, भावना आपल्यापासून विभक्त स्थितीत आहे, असं द्वैत आहे का, हे आपण तपासू शकतो.

करून टाकावं

आपल्या मनोवृत्तीला प्रशिक्षण देत असताना “विशेष काही नाही” ही मनोवृत्ती बाळगणं ही पहिली गोष्ट आपण करणं गरजेचं असतं. हे फारसं महत्त्वाचं वाटणार नाही, पण प्रत्यक्षात ते मूलगामी आहे. “मला आत्ता जाणवणाऱ्या भावनेमध्ये विशेष असं काही नाही”- जीवनात चढ-उतार होतच राहतात, काही वेळा आपण चांगल्या मनस्थितीत असतो, काही वेळा वाईट मनस्थितीत असतो, आणि काही वेळा फारसं काहीच घडत नसतं. यामध्ये काहीच आश्चर्यकारक नाही, आणि आपल्याबाबतीत काही विशेष नसतं, त्यामुळे आपल्याला विशिष्ट पद्धतीने भावना येणार नाहीत आणि इतर भावना जाणवणार नाहीत, असं काही नसतं. आपल्याला कोणतीही भावना जाणवत असली, तरी आपण जीवनासोबत पुढे जात राहतो, ही मुख्य गोष्ट आहे.

उदाहरणार्थ, तुम्हाला तुमच्या मुलांची देखभाल करायची असेल, तर तुम्ही चांगल्या अथवा वाईट मनस्थितीत आहात याने काही फरक पडत नाही, आपल्याला देखभालीचं काम करावंच लागतं. आपण कार चालवत कामावर जातो, मग त्याने चांगला वाटू दे किंवा वाईट. आपण स्वतःवर आणि आपल्याला जाणवणाऱ्या भावनांवर जितकं अधिक लक्ष केंद्रित करू तितके आपण दुःखी होत जातो. याचा अर्थ आपण कोणतीच भावना जाणवून घ्यायची नाही असा नाही. आपल्याला कोणती भावना जाणवते आहे याबद्दल आपण जागरूक असायला हवं, पण त्याच वेळी त्याला फारसं महत्त्व न देणंही आवश्यक आहे.

काही लोकांना खरोखरच दुःखी होण्याची भीती वाटते, कारण यात आपण पूर्णतः बुडून जाऊ असं त्यांना वाटतं. कोणाचा मृत्यू झाला किंवा काहीतरी खरोखरच भयंकर झालं, तर आपल्याला दुःखी वाटण्यापासून स्वतःचं रक्षण करायचं असतं, कारण दुःख खूपच होईल असं आपल्याला वाटतं. हे अबोध स्तरावरचं असेलही; आपल्या भावना सबोधपणे थोपवण्याची गरज नसते. हे काहीतरी बाहेरचं आत येतं आहे अशा रितीने आपण ते नाकारू पाहतो. दुसऱ्या बाजूला, आपण आनंदी होण्यासाठी पात्र नाही असं काही लोकांना वाटतं. गोष्टी चांगल्या घडत असल्या तरी मुळात आपण चांगले नाही त्यामुळे आपण आनंदी असता कामा नये, असं त्यांना वाटतं. शिवाय, काहींना तटस्थ वाटतच नाही, त्यांना सदासर्वकाळ काहीतरी करमणूक हवी असते, उदाहरणार्थ त्यांना सतत संगीत ऐकावंसं वाटतं. यातून त्यांची करमणूक होईल व त्यांना आनंदी वाटेल, असं त्यांना वाटतं, आणि शांततेच्या तटस्थ भावनेची त्यांना भीती वाटते. तर, एका अर्थी आपण सतत भावनांना घाबरतो. का? त्यांना आपण मोठं मानतो आणि त्यांचं महत्त्व अवाजवी ताणतो, एवढंच यामागचं कारण आहे का? पण भावना म्हणजे जीवनाचा एक पूर्णतः सर्वसाधारण भाग आहेत; आपण नैसर्गिकरित्या दर क्षणाला त्यांचा अनुभव घेतो. भावनांमुळे आपण व्हिडिओ कॅमेरापेक्षा वेगळे ठरतो, त्यामुळे त्यात विशेष असं काही नाही. हे साधं वाटतं, पण ते तितकंसं साधं नाही.

आपल्या खिडकीत येणाऱ्या मुक्त पक्ष्याचं उदाहरण

आपण नाजूक समतोल साधणं गरजेचं असतं. आपण अर्थातच आनंदी राहणं पसंत करतो, पण आत्ता आपल्यापाशी असलेला आनंद उद्ध्वस्त न करण्याची भावनाही त्यासोबत येऊ शकते, त्यामुळे आपण त्या आनंदाला कवटाळून ठेवतो आणि त्याबद्दल असुरक्षिततेची भावना जोपासतो. आपल्या अनुभवावरून आपल्याला कळतं की आत्ता आपल्यापाशी असलेला आनंदही निश्चितपणे जाणार आहे. जीवनाचं मूळ स्वरूपच चढ-उतारांचं आहे, त्यामुळे हा आनंदही टिकणार नाही. हे आपल्याला माहीत असेल, तर चिंता करण्याची काही गरजच नाही. यातून आपल्याला आनंद आहे तोवर त्याची मजा घेण्यासाठी मोकळीक मिळते. 

यासाठी मी काही वेळा एक सुंदर उदाहरण वापरतो. आपल्या खिडकीपाशी येणाऱ्या एका मुक्त पक्ष्याची कल्पना करा, तो पक्षी थोडा वेळ तिथे थांबतो. या पक्ष्याच्या सौंदर्याचा आनंद आपण घेऊ शकतो, पण तो मुक्त पक्षी आहे आणि तो उडून जाणार आहे हे आपल्याला माहीत असतं. आपण त्याला पकडून पिंजऱ्यात ठेवायचा प्रयत्न केला, तर तो पक्षी खूप, खूप दुःखी होईल. पकडण्याच्या प्रक्रियेमध्ये पक्षी घाबरेल, पळून जायचा प्रयत्न करेल आणि कधीच परत येणार नाही. पण आपण त्याबद्दल निवांत राहिलो आणि तो पक्षी आहे तोवर त्याच्या सौंदर्याचा आनंद घेतला, तर कोणीही घाबरणार नाही वा दुःखी होणार नाही, आणि कदाचित तो परतही येईल.

आनंदाचंही बरचंसं असंच असतं, नाही का? आपल्याला खरोखरच आवडणाऱ्या लोकांबाबतही असंच होतं. ते आपल्याला भेटायला येतात तेव्हा आपली मनोवृत्ती अशीच असते की, “तुम्ही आणखी थोडा वेळ थांबत का नाही?” त्यांनी निघायची तयारी करण्याआधीपासूनच आपल्याला हे वाटत असतं. “तुम्ही पुन्हा कधी याल?” इत्यादी. आपला आनंद आपण नष्ट करतो त्याचे हे खास प्रकार आहेत. 

विशेष काही नाही. यात विशेष काहीच नाही. एक पक्षी आपल्या खिडकीपाशी येतो; एक मित्र आपल्याला भेटायला येतो; आपली मैत्रीण फोन करते- यात विशेष काही नाही. हे घडतंय तोवर त्याचा आनंद घ्यावा, कारण हे अर्थातच संपणार आहे. तर, अपेक्षा कशाची ठेवायची? होय, आपल्याला आनंदी व्हायचं असतं. आपण दुःखी असतो तेव्हा आपण काय अनुभवतो आहोत ते स्वीकारा. त्यात विशेष काही नाही किंवा आश्चर्यकारकही काही नाही. ते दुःखही निघून जाणार आहे. त्याला तुम्ही ढकलायचा प्रयत्न केलात, तर ते आणखी वाईट होतं.

तर, आपल्याला आपल्या भावनांचं विश्लेषण करता येतं आणि आपल्याला नक्की कशाची भीती वाटते हे तपासता येतं. मला दुःखाच्या भावनेची भीती वाटते का? मी पात्र नसल्यामुळे आनंदाच्या भावनेची मला भीती वाटते का? काहीच जाणवणार नाही म्हणून मला तटस्थतेच्या भावनेची भीती वाटते का? आपल्याला भीती कशाची वाटते?

संवेदनशीलता प्रशिक्षण, असं एक मी विकसित केलं आहे, आणि आपल्या भावनांविषयीच्या भीतीवर मात करण्यासाठी लोकांना याची मदत होते. हे साधं आहे; आपण आपल्या हाताला गुदगुल्या कराव्या, मग चिमटा काढावा, मग तो नुसता धरून ठेवावा. पहिली भावना चांगली असते, दुसरी तितकीशी चांगली नसते, आणि तिसरी नुसती तटस्थ असते. पण यातील कोणत्याही भावनेत विशेष असं काही नसतं, हो ना? या नुसत्या भावना आहेत. मग काय? आपण अशा प्रकारची मनोवृत्ती विकसित करण्याची गरज आहे. मी चांगल्या मनस्थितीत नाही- मग काय? यात विशेष काही नाही. आपण वाईट मनस्थितीत आहोत हे आपण स्वीकारावं आणि त्यात सुधारणा करण्यासारखं काही असेल, तर का करू नये? तसं काही शक्य नसेल, तर त्या भावनेला सामोरं जावं. प्रत्यक्षात आपल्याला तिला सामोरंही जावं लागत नाही, आपण फक्त पुढे जायचं असतं आणि आपण काय करतोय ते करत राहायचं असतं. आपण ती भावना कशा रितीने अनुभवतो हे आपल्याला बदलायचं असेल, तर आपल्याला त्याबद्दलची आपली मनोवृत्ती बदलण्यासाठी इतर मार्ग शोधावे लागतील.

“विशेष काही नाही”, ही यातील पहिली पायरी आहे. मला कोणती भावना जाणवते आहे, यात विशेष असं काही नाही. या भावनांपासून विभक्त असा “मी” नाही, आणि त्यापासून आपला बचाव करण्याची गरज नाही. चढ-उतार असतातच, जगणं असंच आहे.

माझ्यामध्ये विशेष असं काही नाही

“या भावनेमध्ये विशेष असं काही नाही” यासोबतच “माझ्यामध्ये आणि मला आत्ता वाटतंय त्या भावनेमध्ये विशेष असं काही नाही” हेसुद्धा येतं. बौद्ध धर्मात “स्वतःला बहुमोल मानणं” असं ज्याला म्हणतात तो हा विषय आहे. प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेताना आपण स्वतःला बहुमोल मानत असतो. याचा खरोखरचा अर्थ काय? फक्त स्वतःविषयीच पूर्ण आस्था असणं, असा याचा अर्थ होतो. आपलं लक्ष केवळ स्वतःवरच आणि आपल्याला कोणत्या भावना जाणवत आहेत यावरच केंद्रित झालेलं असतं, आणि इतर सगळ्याकडे आपण दुर्लक्ष करतो: “त्यांना कोणत्या भावना जाणवतायंत याने काही फरक पडत नाही. मी दुःखी आहे.”

आपल्यामध्ये व आपल्या विचारांमध्ये विशेष असं काही नाही, असा विचार करणं ही एक युक्ती आहे. “मी”ला कवटाळून बसण्याबाबतीत आपली मनं जितकी संकुचित असतील तितके आपण प्रत्यक्षात अधिकाधिक दुःखी होत जातो. टणक व ताणलेल्या स्नायूसारखं हे असतं. आपलं मन असंच असतं- “मी, मी, मी”- पण आपण या पृथ्वीवरच्या सात अब्ज मानवांचा व अगणित प्राण्यांचा विचार केला, तर आपली भावना विशेष ठरत नाही. आत्ता प्रत्येकालाच काहीतरी भावना जाणवते आहे. काहींना आनंदी वाटतं आहे, काहींना दुःखी व काहींना तटस्थ वाटतं आहे (कदाचित ते झोपले असतील!), आणि प्रत्येक व्यक्तिगणिक हे सतत बदलत असतं. अशा प्रकारे विचार केला, तर माझ्यामध्ये व मला आत्ता जाणवणाऱ्या भावनेमध्ये विशेष काय उरतं?

समजा, आपण वाहतूक कोंडीमध्ये अडकलो आहोत. कोंडीत अडकलेला प्रत्येक जण मजेत व आनंदात आहे, असं आपल्याला वाटतं का? “मी, मी, मी- मी इथे आहे, मी अडकलोय, मला बाहेर पडता येत नाहीये, किती भयंकर आहे!” असं आपल्याला जितकं अधिकाधिक वाटेल तितके आपण दुःखी होत जातो, हो ना? पण आपण वाहतूक कोंडीतील सर्वांचा विचार केला, तर आपोआप आपलं मन खुलं व अधिक निवांत होऊ लागतं.

आज आम्ही इथे येत होतो, तेव्हा वाहतूक अजिबात पुढे सरकत नव्हती, आणि आम्ही ज्या रस्त्यावर होतो त्या वाहतुकीच्या रांगेत येण्याची इच्छा असणाऱ्या आणखी कार बाजूच्या रस्त्यावर दिसत होत्या. या कारना आमचा रस्ता पार करून दुसऱ्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर जायचं होतं, त्या रस्त्यांवरची वाहतूकही हलत नव्हती. त्यांना आमच्या दिशेने येणारे विविध रस्ते ओलांडून पलीकडे जायचं होतं. पण आमच्या रस्त्यावरचे लोक त्यांना पलीकडे जाऊ देत नव्हते. “अरे देवा, ते पुढे कसे जातील?” ते इंचाइंचाने गाडी पुढे सरकवत होते आणि गाडीचं नाक या रांगेत खुपसू पाहत होते. हे सगळं खूपच रोचक व्हायला लागलं. त्यानंतर आमच्या समोरचा एक माणूस, त्याची कार पुढे नेऊ शकत होता, तरी तो त्याच्या सेल फोनवर बोलत बसला आणि आजूबाजूला त्याचं लक्षच नव्हतं. तर तो हलत नव्हता, आणि मग मागच्या कार अतिशय त्रस्त व्हायला लागल्या. 

हे सगळं सुरू असताना अचानक “मी बिचारा या ट्रॅफिकमध्ये अडकलोय” असा विचार आपण करत नाही. आपण हे अख्खं नाट्य पाहतो आहोत, असं ते होऊन जातं. “यातून हे कसा मार्ग काढतील? यातून त्यांना पुढे कसं जाता येईल?” याचं आपल्याला आश्चर्य वाटत राहतं. इथे आपण फक्त स्वतःबद्दल विचार करत नसतो. आपण आपली मनोवृत्ती बदललेली असते. “मी”ला आपण जास्त मोठं मानत नसतो. आणि आपण “मी”ला- “मी खूप विशेष आहे. या वाहतुकीमध्ये मीच विशेष व्यक्ती आहे”-  मोठं मानणं थांबवल्यानंतर आपण ज्या तऱ्हेने ती परिस्थिती अनुभवतो तेच बदलून जातं. याचा विचार करून पाहा.

स्वतःला बहुमोल मानण्यामधील समस्या

एक महान तिबेटी गुरू कुनू लामा यांनी एक अतिशय उपयुक्त स्वाध्याय शिकवला होता. एका बाजूला आपण आणि दुसऱ्या बाजूला इतर सर्व जण, अशी कल्पना करा. याकडे निरीक्षक म्हणून स्वतंत्रपणे पाहा. या चित्रात एका बाजूला असलेला “मी” दुःखी आहे, पण दुसऱ्या बाजूचा प्रत्येक जणही दुःखीच आहे. तुम्ही वाहतूककोंडीमध्ये अडकला आहात आणि इतर सर्व लोकही तसेच अडकलेले आहेत. आता तो तटस्थ निरीक्षक म्हणून आपल्याला कोण जास्त महत्त्वाचं वाटतं? एक व्यक्ती- “मी”- सर्वांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करते ती महत्त्वाची आहे की वाहतुकीत अडकलेली संपूर्ण गर्दी महत्त्वाची आहे. कृपया हा स्वाध्याय करून पाहा.

अर्थातच, एका व्यक्तीपेक्षा व्यापक समूह जास्त महत्त्वाचा ठरतो, हो ना? याचा अर्थ आपण काहीच नसतो असा नाही. उलट आपल्याला इतरांबद्दल आस्था व काळजी असेल, तर आपण स्वतःलाही “प्रत्येका”मध्ये समाविष्ट करतो. आपण इतरांपेक्षा अधिक विशेष स्थानी नाही, विशेषतः भावनांच्याबाबतीत, एवढाच मुद्दा आहे.

तर, स्वतःला बहुमोल मानणं ही समस्या आहे. “मी, मी, मी. मीच महत्त्वाचा आहे” असं सतत करणं, ही समस्या आहे. आपण दुःखी असतो, आपल्यावर हा ढग आलेला आहे असा विचार करतो आणि त्यापासून वेगळा असा “मी” असतो, यामध्ये “मी”ला जास्त महत्त्व दिलं जातं. आपण आनंदी असतो, त्यातही “मी, मी, मी” असतं. कोणा मोठ्या जीवाने येऊन आपला हिस्सा काढून घेऊ नये, असं आपल्याला वाटतं. काही वेळा आपल्याला असंही वाटतं, “मी, मी, मी. मला काहीच वाटत नाहीये. माझी करमणूक होत नाहीये. मला करमणूक हवीय.”

इतरांना बहुमोल मानण्याची सुरुवात

“मी”वर आणि मला काय वाटतं यावर मर्यादित अर्थाने सर्व लक्ष केंद्रित करणं, ही समस्या आहे. आपण हा दृष्टिकोन बदलायला हवा, प्रत्येकाच्या संदर्भात विचार करायला हवा आणि इतरांच्या संदर्भात प्रेरणा घ्यायला हवी: “प्रत्येक जण या वाहतूककोंडीतून बाहेर पडू दे.” आपण एकटेच वाहतूककोंडीतून बाहेर कसे पडू, असा विचार करावा. वाहतूककोंडी संपावी लागेल, आणि त्यात इतर प्रत्येकाचा समावेश होतो. तुमच्या आस्थेमध्ये इतर प्रत्येकाला इतपत व्यापक अवकाश असेल, तर तुम्ही अधिक निवांत होता. वाहतूककोंडीत सापडल्याबद्दल आपण तितके त्रस्त व उद्ध्वस्त होत नाही. आणि अखेरीस त्या वाहतूककोंडीतून बाहेर पडल्यानंतर केवळ “अरे वा! मी बाहेर पडलो!” एवढाच विचार करू नका, तर “अरे वा! प्रत्येक जण जिथे जात होता तिथे पोचला” अशा संदर्भात विचार करावा. मग हा आनंद कोणीतरी काढून घेईल अशा भीतीने त्याला कवटाळून राहू नये.

मुळात यालाच आपण करुणा असं म्हणतो. इतरांच्या दुःखाचा विचार करणं, स्वतःच्या दुःखाइतकीच इतरांच्या दुःखाची काळजी घेणं, आणि प्रत्येकाला त्या दुःखावर मात करण्यासाठी मदत करण्याची जबाबदारी घेणं- मग त्यात विशेष काही नसलं तरीही ही कृती महत्त्वाची असते. जगभरात होणाऱ्या सर्व भयंकर गोष्टींचा विचार करून निराश होण्यात काही अर्थ नाही. हे स्वाभाविक आहे आणि सदासर्वकाळ होत असतं; पण तरीही, प्रत्येक जण आनंदी झाला तर चांगलंच, नाही का?

आपण स्वेच्छेने काही जबाबदारी घेतो, “प्रत्येकाबद्दल मी आस्था बाळगणार आहे आणि प्रत्येक जण आपापल्या दुःखातून मुक्त होऊ दे अशी इच्छा बाळगणार आहे” असा विचार आपण करतो, तेव्हा आपल्यामध्ये प्रचंड प्रमाणात धाडस व आत्मविश्वास निर्माण होतो. परम पूजनीय दलाई लामा अनेकदा याबद्दल बोलत असतात. आपण केवळ स्वतःचा व स्वतःच्या आनंदाचा विचार केला, तर आपण प्रत्यक्षात अतिशय दुर्बल असतो. पण इतर प्रत्येकाबद्दल व प्रत्येकाच्या दुःखाबद्दल स्वेच्छेने विचार करण्यासाठी प्रचंड सामर्थ्य लागतं. हे अजिबातच दुबळेपणाचं चिन्ह नाही, तर सामर्थ्याचं चिन्ह आहे आणि त्यातून अविश्वसनीय आत्मविश्वास निर्माण होतो. या सकारात्मक मनोवृत्तीने आपोआपच आनंदी वाटायला लागतं. “अरे, बिच्चारा मी, वाहतुकीत अडकलोय” असं काही त्यात नसतं. उलट, आपण वाहतूककोंडीत अडकलेल्या प्रत्येकाचा विचार करतो, आणि स्वतःबद्दलही आपली सकारात्मक भावना होऊन जातो. आपण वाहतुकीने दुबळे किंवा दडपलेले होत नाही; अधिक सामर्थ्यवान होतो.

वाहतुकीत अडकलेल्या इतरांबद्दलही आपण विचार केला आणि केवळ स्वतःपुरता विचार केला नाही, तर त्यातून इतरांना अप्रत्यक्ष मदत होते. उदाहरणार्थ, आपण आक्रमकरित्या स्वतःचा हॉर्न सतत वाजवणार नाही (तसंही कोणीच हलत नसताना हॉर्न वाजवत बसणं निरर्थक असतं). शेजारच्या रस्त्यावरची ती कार इंचा-इंचाने पुढे येऊन आपल्या आड येते, तेव्हा आपण आपली खिडकी उघडून काहीतरी घाणेरडं बोलणार नाही. त्यामुळे आपण दोघेही निवांत राहू. पण आपल्यावर खूप जास्त प्रभाव असता कामा नये.

आपण आपली मनोवृत्ती कशी बदलू शकतो याचं हे एक साधं उदाहरण आहे. जीवनातील नैसर्गिक चढ-उतार आपण कसे अनुभवतो त्याची गुणवत्ता यातून बदलता येते. यासाठी केवळ सरावाची गरज असते आणि थोडं धाडस लागतं. आपण आणि आपल्याला वाटणारी भावना खूप विशेष आहे, अशा वाटण्यावर मात करणं आणि प्रत्येक परिस्थितीचा चांगला उपयोग करून घेणं, यासाठी धाडस लागतं.

संताप हाताळणं

आपण वाहतुकीमध्ये अडकलो असलो आणि कोणीतरी आपल्या गाडीपुढे यायचा प्रयत्न केला, तर आपण अनियंत्रितपणे संतापण्याची शक्यता असते. ही परिस्थिती उद्भवण्यामागील विविध कारणांचा विचार करणं, हा आपली मनोवृत्ती बदलण्याचा आणखी एक मार्ग आहे- उदाहरणार्थ, कदाचित त्या चालकाचं मूल आजारी असेल आणि त्याला रुग्णालयात जायचं असेल. असा विचार केल्याने आपल्याला बरंच शांत वाटतं.

पण हे सुरुवातीचे संतापाचे क्षण सदासर्वकाळ सुरू राहतात, हा मुद्दा आहे. संतापाच्या वृत्तीवर आणि सवयींवर मात करण्याची प्रक्रिया खरोखरच खूप दीर्घ असते. आपली मनोवृत्ती बदलणं हा संताप हाताळण्याचा केवळ तात्पुरता मार्ग आहे. उदाहरणार्थ, संबंधित व्यक्ती काही कारणास्तव घाईत असेल, असा विचार करणं तात्पुरता संताप आटोक्यात ठेवेल. पण संतापाची मुळं शोधण्यासाठी आपल्याला खूप, खूप खोल जावं लागतं. आपण स्वतःविषयी व इतर लोकांविषयी कसं आकलन करून घेतो, त्याच्याशी याचा संबंध असतो.

जीवनातील केवळ एका लहानशा घटनेवरून आपण स्वतःला व इतरांना ओळखू पाहतो. उदाहरणार्थ, वाहतुकीमधील ही व्यक्ती माझ्या आड येणारी भयंकर व्यक्ती आहे असं आपल्याला वाटतं आणि त्या व्यक्तीबद्दल आपला विचार एवढाच असतो. तर, त्या व्यक्तीच्या जीवनातील एकाच घटनेपुरती त्या व्यक्तीची ओळख आपल्याला जाणवते. विशेषतः आपला संबंध असलेल्या घटनेपुरतंच आपण त्या व्यक्तीकडे पाहतो. तीच दृढ ओळख आपण त्या व्यक्तीला देतो. तसंच आपण स्वतःबद्दल करतो. शिवाय, संतप्त झालेला “मी”सुद्धा दृढ होत जातो.

हे आपण प्रयत्नपूर्वक शिथील करायला हवं. इतरांना व स्वतःला कशाच्याही संदर्भात ओळखता येईल, इतक्या पातळीपर्यंत हे शिथील व्हायला हवं. पण ही सखोल व दीर्घ प्रक्रिया आहे. कोणाच्या तरी स्तब्ध चित्राविषयी विचार करा. हा त्या व्यक्तीचा एक क्षण असतो, त्या व्यक्तीबद्दलच्या सर्व गोष्टी त्यात नसतात. त्यामुळे आपण स्वतःकडे व आपल्या जीवनाकडे व इतर लोकांकडे स्तब्ध छायाचित्रांसारखं पाहणं थांबवायला हवं. सर्व गोष्टी सदासर्वकाळ बदलत असतात. आणि आपण गोष्टींकडे पाहण्याची स्वतःची फसवी दृष्टी कमी केली की आपल्याला तिची सवय करून घ्यावी लागते, कारण काठिण्याकडे जाण्याची वृत्ती सतत वरचढ ठरत असते. अखेरीस, संताप किंवा मत्सर किंवा इतर कशाचंच काठिण्य पुन्हा न जाणवणं पूर्णतः शक्य असतं.

आनंदी असण्यात काही चूक नाही

आपल्या भावनांना किंवा आपल्याला विशेष न मानणं आणि स्वतःसह इतर कोणावर मर्यादित ओळख न लादणं, यासाठी प्रशिक्षण घेतल्याने आपल्याला आपल्या जीवनाची गुणवत्ता सुधारायला मदत होते. अवघड परिस्थिती हाताळायला सोपी होते, आणि जीवन तितकंसं संघर्षरत राहत नाही. आपण भावनिकदृष्ट्या अधिक समतोल व आनंदी व्यक्ती होतो.

इतरांविषयी व इतरांशी आपण कसे वागतो याविषयी विचार करणं, हे व्यापक उद्दिष्ट असतं. आपण कुटुंबात राहत असलो आणि आपल्याला मुलंबाळं असली, आपले मित्रमैत्रिणी व सह-कर्मचारी असले, तर अशा वेळी आपण सतत वाईट मनस्थितीत असल्याने, सतत “बिचारा मी” असा विचार केल्याने आपण दुबळे होतो आणि इतरांना मदत करणं आपल्याला शक्य होत नाही, उलट आपण त्यांना दुःखी करतो. तर, आपण स्वतःच्या मनस्थितीशी अधिक उत्पादक मार्गाने पाहायला हवं, कारण त्याचा इतरांवर परिणाम होतो, आपल्या कुटुंबावर परिणाम होतो आणि आपल्याला त्यांच्याविषयी आस्था वाटत असते. स्वतःवर काम करण्यामागचं दुसरं कारण हे असतं.

आनंदासाठीची आस ही जवळपास एक जैविक गोष्ट आहे आणि आनंदी असण्यात काहीच गैर नाही, आणि आपण आनंद प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणंही गरजेचं असतं. पण आपल्याकडे आनंद असेल, तेव्हा त्याचं स्वरूप आपण जाणून घेणं गरजेचं आहे, म्हणजे आनंद निघूनही जाणार आहे हे समजून घेऊन तिथल्या तिथे त्याची मजा घ्यावी. आनंदाबद्दल आपण जितके निवांत असू, तितके आपण जास्त वेळा आनंदी राहू. आणि काही वेळा आपल्याला दुःखी वाटेल, त्याचं काय? कोणती अपेक्षा ठेवावी? यातही काही मोठं नाही. काही विशेष नाही.

जे काही घडतंय त्यात अगदी खास विशेष असं काही नाही, असा विचार आपण करतो, तेव्हा आनंदी होण्याचा तो एक अधिक निवांत मार्ग झालेला असतो. आपण चिंतित नसतो, त्यात कायमस्वरूपी असं काही नसतं, ही एक चित्तप्रकृतीमधील आस आहे: “मला कायम आनंदीच असायला हवं, मला सतत करमणूक हवी, मला सतत माझ्या मनानुसार वागता यायला हवं.” अशा प्रकारचा विचार हा वस्तुतः कडवट असतो. आपण काय बोललो ते लक्षात ठेवा, आनंदी असण्याचा संबंध मूलतः आपण काय करतोय त्याच्याशी असतोच असं नाही. आपण एखादी गोष्ट करताना आनंदी असू, तर तीच गोष्ट निराळ्या दिवशी करताना दुःखी वा तटस्थ असू शकतो. आपलं लक्ष कशावर केंद्रित आहे, एवढाच त्यातला मुद्दा असतो.

मी एक उदाहरण देतो. मला दंतवैद्याकडे जायला खरोखरच मजा वाटते, कारण माझा दंतवैद्य हा एक मस्त माणूस आहे आणि आमचे संबंध अगदी मैत्रीपूर्ण आहेत, आम्ही सतत विनोद करत असतो, इत्यादी. तिथे जाणं आल्हादक वाटतं, कारण “त्याला अमुक एका ठिकाणी भोक पाडावं लागेल किंवा तमुक करावं लागेल याची मला काहीच चिंता नसते” यावर माझं लक्ष केंद्रित नसतं. त्यात काही अस्वस्थता नसते. मी त्याकडे आनंदाने पाहतो, “अरे, मस्त, उद्या मला माझ्या मित्राला भेटायला मिळेल.”

मी जरा विचित्र बोलतोय असं तुम्हाला वाटणं शक्य आहे, पण एकदा मी रूट-कॅनाल करून घेतलं आणि मला त्यात अगदी मजा आली. माझं तोंड पूर्ण उघडलेलं होतं आणि ते वेगवेगळी अवजारं आत घालत राहिले, त्यामुळे ते रोचक होतं. किती उपकरणं ते आत घालू शकतील याची कल्पनाही मला करता येईना, तेव्हा मी हसायला लागलो. हे पाहा, मला नोव्होकिन देऊन पूर्णतः बधीर केलेलं होतं, त्यामुळे मला काहीच जाणवत नव्हतं!

अर्थातच नोव्होकिनचं इंजेक्शन दिलं तेव्हा दुखलं, पण त्याने काय होतंय? ते इंजेक्शन न घेता ३० मिनिटं रूट-कॅनाल होत असताना वेदना तुम्ही सहन कराल की इंजेक्शन घेतानाच्या मोजक्या सेकंदांच्या वेदना सहन कराल? इंजेक्शन घेऊन वेदना होत असल्या तरी आपण ते पसंत करतो, कारण ते थोडक्या कालावधीसाठी असतं.

प्रत्येक गोष्ट आपल्या मनोवृत्तीवर अवलंबून असते. याला मनोवृत्तीचं प्रशिक्षण असं म्हणतात. हे परिणामकारक ठरतं आणि आपल्या जीवनाची गुणवत्ता सुधारते. आपल्याला रूट-कॅनाल करायचं असेल, तर आपण ते अत्याचार म्हणून किंवा वाईट काहीतरी म्हणून करवून घेतो आहोत का? आपण त्याचा अनुभव घ्यावा, त्याला पर्याय नाही, त्यामुळे शक्य झाल्यास आपण तो एक बरा अनुभव म्हणून गाठीला बांधू शकतो. हे यामागचं तत्त्व आहे.

सारांश

समस्या किंवा दुःख यावं, अशी इच्छा कोणालाही सकाळी उठल्यावर वाटत नाही. आपण करतो ते सर्व आपल्याला आनंदी करण्याच्या उद्दिष्टानेच केलेलं असतं. पण, हे भ्रामक उद्दिष्ट कधीच फारसं जवळ येताना दिसत नाही. आपण स्वतःवर लक्ष केंद्रित करून, आपलं, आपल्या कृतीचं आणि आपल्या भावनांचं महत्त्व अवाजवी वाढवतो. परिणामी आपण असलेल्या आनंदाची मजा घेऊ शकत नाही किंवा आपल्याला सामोरं जावं लागणाऱ्या अडचणींचा आपण विचार करत राहतो. इतरांविषयी व त्यांच्या भावनांविषयी अधिक समावेशक होण्यासाठी आपल्या मनोवृत्तीला प्रशिक्षण देऊन, आपण अधिक निवांत होण्याचं व आपल्या जीवनातील चढ-उतारांचा आनंदी अनुभव घेण्यासाठीचं दार उघडत असतो.

Top