सोशल नेटवर्किंग संकेतस्थळं व टेक्स्ट-मेसेज यांचं व्यसन

आढावा

मनोवृत्तीचं प्रशिक्षण व मनाचं प्रशिक्षण यांच्याबाबतीत आपण कशाला सामोरं जात असतो, याचा विचार आपण केला आहे. हा आपल्या दैनंदिन जीवनातील अनुभवाचा भाग आहे. आपण आपलं जीवन जगतो आणि प्रत्येक क्षण आपला आपणच अनुभवतो. आपण आपले सर्व अनुभव फेसबुक व ट्विटरवरून प्रक्षेपित करत असलो, तरीही त्याचा अनुभव घेणारे फक्त आपणच असतो. 

आजकाल बरेच लोक टेक्स्ट-मेसेजच्या जवळपास आहारी गेल्याचं दिसतं. आपल्या भावना व उपक्रम फेसबुक आणि ट्विटरवर प्रकाशित करण्याचं व्यसन त्यांना लागलं आहे. हे सर्व दुसऱ्या कोणाच्या तरी दैनंदिन जीवनासंदर्भात वाचणं आणि आपल्या स्वतःच्या दैनंदिन जीवनासंदर्भात वाचणं, यात कोणता फरक असतो? आपले स्वतःचा जीवनानुभव आणि दुसऱ्या कोणाचे तरी जीवनानुभव यांच्यात अर्थातच काही अंतर असतं, विशेषतः अत्यल्प शब्दांमध्ये अनुभव नोंदवले जात असताना हे अंतर लक्षणीय ठरतं.

आपण इतरांबाबत व त्यांच्या जीवनामध्ये काय घडतंय याबद्दल सहानुभूती बाळगू शकतो, पण आपण स्वतः जे काही अनुभवतो त्या संदर्भातील आनंद वा दुःख वा तटस्थ भावना हे तरीही भिन्नच असतं. सर्वांत मूलभूत पातळीवर आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये याला सामोरं जावं लागतं; कधी आपल्याला आनंदी वाटतं, कधी दुःखी वाटतं. कधी आपल्याला फारसं काहीच वाटत नसतं. आपल्याला कायम आनंदीच भावना हवीशी वाटते ही वस्तुस्थिती आहे, पण आपल्या मनस्थितीमध्ये सदासर्वकाळ चढ-उतार होत असतात, आणि आपण काय करतो आहोत, याच्याशी त्याचा संबंध असतोच असं नाही. अनेकदा आपल्या मनस्थितीवर आपलाच फारसा ताबा नसल्याचंही दिसतं. आपल्या जीवनातील क्षण अनुभवत असताना प्रत्येक परिस्थितीमध्ये सर्वतोपरी चांगला प्रयत्न कसा करायचा आणि काय घडतंय व आपण काय करतोय याचा अनुभव कसा घ्यायचा, याचा विचार मनस्थितीविषयक प्रशिक्षणामध्ये केला जातो.

आपण जीवनाला कसे सामोरे जातो या संदर्भात अतिशय महत्त्वाचे दोन प्रमुख मुद्दे आपण पाहिले: आपल्याला कोणत्या भावना जाणवतात याबाबत आपण अतिशयोक्ती करतो आणि स्वतःचं महत्त्वही आपण असंच अतिशयोक्तीने वाढवतो. उदाहरणार्थ, दुःखी भावनेला आपण अवाजवी महत्त्व देतो, त्यामुळे परिस्थिती आणखी खालवते. आपण आनंदी असतो, तेव्हा त्याबद्दल आपल्याला असुरक्षितता वाटते, त्यातून आनंद उद्ध्वस्थ होतो. आपल्याला तटस्थ वाटत असतं, तेव्हा आपण त्रस्त होतो, कारण आपल्याला सदासर्वकाळ करमणूक गरजेची आहे असं वाटत असतं. शांत व निवांत भावनेमध्ये आपण समाधानी नसतो, तर आपल्याला सदासर्वकाळ काहीतरी घडायला हवं असतं, मग टीव्ही असो किंवा संगीत असो किंवा काहीही असो. कोणत्या तरी प्रकारची उत्तेजना सतत गरजेची वाटत राहते, जणू काही त्यातून आपल्याला जीवनाला काही अर्थ मिळत असावा.

माझी एक मावशी आहे, ती टीव्ही सुरू ठेवूनच झोपते. खरं म्हणजे दिवसाचे २४ तास ती टीव्ही सुरू ठेवते. रात्री तिला मधेच जाग येते, तेव्हा टीव्ही सुरू असलेला तिला आवडतं, असं ती म्हणते. शांततेची तिला प्रचंड भीती वाटते. हे नुसतं विचित्रच नाही, तर खेदजनक आहे, असं मला वाटतं.

माझ्या भावनांमध्ये विशेष असं काही नाही

जीवनातील चढ-उतारांविषयीची आपली मनोवृत्ती सुधारण्यासाठी या चढ-उतारामध्ये विशेष काही नाही हे लक्षात घेणं सर्वांत आधी गरजेचं आहे. काही वेळा आपल्याला आनंदी वाटत नाही आणि काही वेळा ठीक वाटतं, काही वेळा शांत वाटतं, या वस्तुस्थितीमध्ये काहीच विशेष असं नाही. हे पूर्णतः सर्वसाधारण आहे. हे महासागरातील लाटांप्रमाणे असतं, काही वेळा लाट उंच असते, काही वेळा लाटांच्या खळग्यात आपण असतो, तर काही वेळा समुद्र पूर्ण शांत असतो. समुद्राचा स्वभाव असाच आहे आणि त्यात काही मोठं नाही. काही वेळा एखादं मोठं वादळ येऊ शकतं, आणि अशा वेळी महाकाय, अशांत लाटा तयार होऊ शकतात; पण संपूर्ण समुद्राचा तळापासून पृष्ठभागापर्यंत विचार केला, तर खोल तळात तो खऱ्या अर्थाने अशांत होत नाही, हो ना? हवामान इत्यादींसारख्या अनेक कार्यकारणांमुळे केवळ पृष्ठभागावर तसं होतं. यात काही आश्चर्य वाटण्यासारखं नाही. 

आपली मनं समुद्रासारखी असतात. असा विचार करणं उपयुक्त ठरतं, पृष्ठभागावर आनंद, दुःख, ही भावना, ती भावना या लाटांचे चढ-उतार आले, तरी तळामध्ये आपण याने अस्वस्थ होत नाही. याचा अर्था आपण शांत व आनंदी मनोवस्थेसाठी प्रयत्नच करायचे नाहीत असा नाही. वादळापेक्षा या मनोवस्था कधीही चांगल्याच. पण टोकाच्या भावभावनांचं वादळ येतं, तेव्हा आपण त्यातून महाकाय चक्रीवादळ निर्माण करू नये. आपण ते प्रत्यक्षात जे काही आहे त्याला सामोरं जावं.

अनेक लोक बौद्ध पद्धतींची उपासना करतात आणि काही वर्षांच्या टप्प्यात त्यांना परिणामही दिसून येतात- कमी राग येणं किंवा कमी तिरस्कार वाटणं, इतरांशी भयंकर न वागलं जाणं, इत्यादी. मग अनेक वर्षांनी त्यांना खरोखरचा राग येण्याचा किंवा प्रेमात पडण्याचा किंवा विशिष्ट गोष्टीला कवळाटून बसण्याची टोकाची भावना व भावनिक क्षोभ निर्माण होण्याचा प्रसंग अनुभवायला मिळू शकतो, आणि मग त्यांना निराश वाटतं. “विशेष काही नाही” या एकंदर दृष्टिकोनाचा स्त्रोत विसरल्यामुळे त्यांना निराशा येते. आपल्या मनोवृत्ती व सवयी अतिशय खोलवर रुजलेल्या असतात आणि त्यांच्यावर मात करण्यासाठी बराचा वेळ जातो व बरेच प्रयत्न करावे लागतात. आपण तात्पुरती त्याची काळजी घेऊ शकतो, पण आपण आनंदी का होतो इत्यादींच्या मुळाशी गेलं नाही तर या भावना अधूनमधून डोकं वर काढतच राहणार. तर, या भावना परत आल्यावरही आपण “यात काही विशेष नाही” ही भावना मनात येईल याची खातरजमा करायची. “आपण अजून मुक्त झालेले जीव नसतो, त्यामुळे अनुबंध व संताप यांसारख्या भावना पुन्हा येणारच आहेत. त्याला आपण अवाजवी मोठं मानलं, तर आपण तिथेच अडकून पडू.

आपल्याला कोणता अनुभव येतो किंवा कोणत्या भावना मनात येतात, यामध्ये काही विशेष नाही, हे आपल्याला समजत असेल व त्याबद्दल आपली खात्री असेल, तर कितीही असाधारण मर्मदृष्टी असली तरी ती आपण हाताळू शकतो. अंधारामध्ये आपल्या पायाची बोटं टेबलावर आपटतात आणि दुखतं. हाड तुटलंय का हे आपण तपासू शकतो, पण मग पुन्हा तो विचार सुरू ठेवायचा. हे काही फारसं मोठं घडलेलं नाही. लगेच उड्या मारून आईने यावं आणि मुका घ्यावा अशी अपेक्षा करता कामा नये. तर आपण अशा सोप्या व निवांत पद्धतीने स्वतःचं जीवन जगायचा प्रयत्न करतो. काहीही घडलं किंवा आपल्याला काहीही वाटलं तरी शांत राहण्यासाठी याची मदत होते.

माझ्यामध्ये विशेष असं काही नाही

दुसरा मुद्दा अतिशयोक्ती करू नये असाच आहे. इथे आपल्या भावनांऐवजी आपण स्वतःचं महत्त्व अतिशयोक्तीने वाढवू नये. मनोवृत्ती प्रशिक्षणातील (मनप्रशिक्षणातील) शिकवणुकींचा मुख्य विषय हाच असतो, कारण आपल्या समस्या व अडचणी इत्यादींचा स्त्रोत एकच असतो: आपण स्वतःला बहुमोल मानतो. आपण स्वतःनेच पछाडलेले असतो आणि सतत “मी”वरच आपलं लक्ष केंद्रित झालेलं असतं, आणि आपल्याला केवळ स्वतःचीच काळजी असते. यात अहंकार व अहंभावाचा पैलू असतो, त्याचप्रमाणे स्वार्थ व स्वार्थमग्नताही असते. या मनोवृत्तीचं व गोष्टीचं वर्णन करण्यासाठी अनेक मार्ग आहेत.

आपण स्वतःला काहीतरी विशेष मानू लागतो, तेव्हा तोच आपल्या समस्यांचा खरा स्त्रोत बनतो. आपल्याला वाटतं, “मी महत्त्वाचा आहे. त्यामुळे माझ्या मनात कोणत्या भावना येतात हे खरोखरच महत्त्वाचं आहेत.” आपल्याला “मी, मी, मी”ची इतकीच काळजी असेल, तर हा “मी” आनंदी आहे की दुःखी आहे की त्याला काहीच वाटत नाहीये, याबद्दल मी चिंताग्रस्त होणारच.

आपण आपल्या भावना सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांवर का व्यक्त करतो?

बौद्ध धर्मामध्ये कायम दोन टोकं टाळण्याविषयी बोललं जातं, त्यापेक्षा मध्यम मर्गाचं अनुसरण करणं चांगलं मानलं जातं. एका टोकाला “मी”विषयी घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला मोठं मानलं जातं, या भावना संपूर्ण जगासमोर प्रक्षेपित करण्याजोग्या मानल्या जातात, कारण प्रत्येकाला त्याची फिकीर आहे असं या टोकावरून वाटतं. प्रत्यक्षात आज सकाळी मी कोणता नाश्ता केला, किंवा मला तो आवडला की नाही, याची कोणालाही फिकीर नसते. पण आपल्याला ते खरोखरच महत्त्वाचं वाटत असतं. आणि मग लोक आपल्या पोस्टला ‘लाइक’ करतात. पण मी आज सकाळी नाश्त्याला काय खाल्लं हे इतक्या लोकांना ‘लाइक’ करण्याजोगं / आवडण्याजोगं का वाटतंय, याची आपण का फिकीर करतो? यातून काय सिद्ध होतं? हा विचार करण्यासारखा रोचक प्रश्न आहे.

लोकांना वास्तव जीवनात संभाषणांचा अभाव जाणवत असेल आणि केवळ इतरांशी संवाद साधायचा असेल? तर, यामध्ये एकाकीपणाची काहीएक भावना असावी, असं मला वाटतं. पण एका अर्थी यातून आपण आणखी दूर होत जातो, कारण इतरांशी खरा संवाद होण्याऐवजी आपण केवळ आपल्या संगणकाच्या किंवा सेल-फोनच्या अधिक संरक्षित पर्वरणात काहीतरी करत असतो.

आपल्या मनात कोणती भावना आहे हे लोकांना सांगावं असं आपल्याला का वाटतं, याचा आपण विचार करावा, असं मी सुचवतो आहे. एका बाजूला, प्रत्येकाला आपली काळजी आहे आणि आपण नाश्त्याला काय खाल्लं व ते आपल्याला आवडलं की नाही, हे इतरांना कळणं महत्त्वाचं आहे, ही धारणा यामागे असते. हे अर्थातच मूर्खपणाचं उदाहरण आहे, पण तरी पुरेशा लोकांना ही पोस्ट आवडली नाही, तर आपल्याला खचल्यासारखं वाटतं. आपण याला अवाजवी महत्त्व देतो- “मी”, मी काय करतोय, मला कसं वाटतंय- आणि इतरांना काय वाटतं याला जास्तच अवाजवी महत्त्व देतो. आत्मविश्वासाने जीवन जगण्याऐवजी आपण आपल्या भावना संपूर्ण जगासमोर प्रक्षेपित करू पाहतो. आपण इतके महत्त्वाचे आहोत की इतर लोक सगळी कामं सोडून आपला संदेश वाचतील, असं आपल्याला वाटत असतं. आपल्या स्वतःच्या महत्त्वाची ही अतिशयोक्त कल्पना नाही का? त्याहून महत्त्वाचं म्हणजे आपल्याला असुरक्षितता जाणवत असते- ती अर्थातच फारशी शांततापूर्ण मनोवस्था नाही. मग आपण सतत इतरांचे प्रोफाइल तपासत राहतो, आपल्या हातून काही निसटत तर नाही ना याची खातरजमा करतो.

तर, आपणच सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहोत किंवा आपण मुळात काहीच नाहीयोत, ही दोन टोकं टाळावीत. लोकांना फिकीर असेल नसेल तरी सर्वांना आपल्या भावना कळायला हव्यात असं वाटणं किंवा आपल्या भावनांकडे आपण पूर्णतः दुर्लक्ष करायला हवं असं वाटणं- ही टोकंही टाळायला हवीत.

आपल्या मनात कोणत्या भावना आहेत ते- म्हणजे आपण कोणाशी नातेसंबंध जोडले असतील व त्यामध्ये आपण दुःखी असू, तर या भावना- संवादातून मांडणं महत्त्वाचंच असतं. सगळं मनात न ठेवता इतरांना सांगणं चांगलंच असतं, आपल्या भावना जाणून घेणं इतरांना गरजेचं वाटत असेल तेव्हा हे करावंच: “तुझ्या बोलण्याने मी खरोखरच दुखावलेली आहे,” इत्यादी. पण हे आपण समतोल पद्धतीने करू शकतो, त्यासाठी अवाजवी अतिशयोक्ती करण्याची गरज नाही, आणि आहे ती भावना नाकारण्याचीही गरज नाही. इथे अर्थातच आपण नात्यांविषयी बोलतो आहोत, यात दोन व्यक्ती असतात आणि दुसऱ्या व्यक्तीच्या भावना काय आहेत हेही तितकंच महत्त्वाचं असतं (आणि अर्थातच तेही तितकं मोठं नसतं).

आपण मनोवृत्तीच्या प्रशिक्षणाविषयी बोलतो तेव्हा त्यात केवळ माझी मनोवृत्ती नसते, तर त्या परिस्थितीत सहभागी असलेल्या प्रत्येकाच्या मनोवृत्तीविषयीचं ते असतं. निराळ्या शब्दांत सांगायचं तर, माझा दृष्टिकोन हाच एकमेव दृष्टिकोन नसतो, हो ना? कौटुंबिक उपचारांमध्ये वापरलं जाणारं हे एक प्रमुख तत्त्व आहे, यामध्ये प्रत्येक सदस्याला घरात कोणता अनुभव येतो त्याच्याशी जोडून घ्यावं लागतं. तर, पालक एकमेकांशी भांडत असतील, तर याचा आपल्या मुलावर किंवा मुलीवर कोणता परिणाम होतो आहे हे त्या मुलांकडून त्यांना कळतं. अन्यथा, पालकांना याची जाणीवच होणार नाही. कुटुंबातील या रचनेमध्ये केवळ पालकांचे दृष्टिकोन हीच महत्त्वाची गोष्ट नाही.

स्वतःला बहुमोल मानण्याच्या वृत्तीवर मात करण्याचे मार्ग

तर, स्वमग्नता किंवा नेहमीच्या भाषेत “स्वतःला बहुमोल मानणं” या वृत्तीवर मात कशी करायची आणि इतरांबाबत विचार करून स्वतःला खुलं कसं ठेवायचं, याला पारंपरिक मनोवृत्ती प्रशिक्षणामध्ये किंवा मन प्रशिक्षण महत्त्व दिलेलं असतं. हे करण्याचे काही मार्ग आपण आधी विचारात घेतले- उदाहरणार्थ, एका बाजूला आपण आहोत आणि इतर सर्व दुसऱ्या बाजूला आहेत अशी कल्पना करावी, आणि “कोण जास्त महत्त्वाचं आहे? व्यक्ती म्हणून मी की इतर सर्व जण?” याचा विचार करावा. यासाठी आपण वाहतुकीचं उदाहरण घेतलं, “वाहतूककोंडीमध्ये अडकलेल्या इतरांपेक्षा मी जास्त महत्त्वाचा आहे, त्यामुळे मी जातोय तिथे पोचणं जास्त महत्त्वाचं आहे आणि इतरांची मला फिकीर नाही?”

वाहतुकीत अडकलेल्या प्रत्येकाविषयी आपण विचार करायला लागलो की हा विचार वास्तवावर आधारलेला असतो, ही महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्येक जण वाहतुकीच अडकलेला आहे. केवळ आपण अडकलेले नाही, बरोबर? त्यामुळे आपण मनोवृत्ती सुधारण्याविषयी बोलतो तेव्हा ते वास्तवाच्या आधारावर करत असतो; वास्तव काय आहे हे आपण पाहतो आणि आपली मनोवृत्ती त्यानुसार ठेवायचा प्रयत्न करतो. माझे एक मित्र, एक बौद्ध शिक्षक म्हणाले होते की, बौद्ध दृष्टिकोनाचा सारांश एका शब्दांत सांगता येईल, तो असा: “वास्तववाद”.

बौद्ध धर्माचं सादरीकरण काही वेळा असं केलं जातं की त्यात कल्पनारम्य चित्रं उभी केली जातात व तशाच प्रथा असतात, काही विशिष्ट बौद्ध डिझ्नेलँडच असावं, असं लोकांना अनेकदा वाटतं. पण बौद्ध धर्माचा मुख्य भर यावर अजिबातच नाही. अशा गोष्टी आहेत, ते काही नाकारता येणार नाही, पण वास्तववादाशी अधिक सुसंगत राहण्याचा प्रयत्न करण्याची ती एक पद्धत आहे. या पद्धती वापरल्यानंतर आपल्याला वास्तव व कल्पनारम्यता यांच्यातला फरक कळतो, आणि कल्पनाशक्तीची ताकद कळते.

आपण मानव आहोत, तर आपल्याला प्राण्यांपासून वेगळं ठरवणारे घटक कोणते? या संदर्भात आपण अनेक गोष्टींचा निर्देश करू शकतो, पण मुख्य गोष्ट म्हणजे आपल्याकडे बुद्धिमत्ता व कल्पनाशक्ती यांची ताकद आहे. या दोन्हींचा वापर करायला आपण शिकू शकतो. उदाहरणार्थ, कोणाविषयी आपल्याला खूप जास्त लैंगिक अभिलाषा वाटत असेल, तर ते बरंच अस्वस्थकारक होऊ शकतं. त्यामुळे आपण बुद्धिमत्ता व कल्पनाशक्ती वापरून यात बदल करू शकतो.

महान भारतीय बौद्ध गुरू आर्यदेव यांनी चतुःशतक-शास्त्र-कारिकेमध्ये (III.४) लिहिलं आहे का:

“कोणालाही कोणीही आकर्षक वाटू शकतं आणि त्याची भुरळ पडू शकते आणि त्या व्यक्तीच्या सौंदर्यातून आनंद मिळू शकतो. पण हे कुत्र्यांमध्येही आढळतं, त्यामुळे, अरे, मंदबुद्धी माणसा, तुला इतरांबद्दल इतकी जवळीक का वाटते?”

निराळ्या शब्दांता सांगायचं तर, एखाद्या कुत्र्याला किंवा डुक्कराला त्याचा किंवा तिची लैंगिक साथीदार अशीच आकर्षक वाटत असेल, तर आपल्याबाबतीत विशेष असं काय असतं? लैंगिक आकर्षकतेचं वैशिष्ट्य पूर्णतः त्या व्यक्तीच्या मनातून येतं; आकर्षण ठरलेल्या वस्तूमध्ये ते अंगभूतरित्या नसतं. अन्यथा, एखाद्या डुक्कराला आपली किंवा आपला साथीदार खरोखर सुंदर व आकर्षक वाटणं शक्य आहे, आपल्याला डुक्कराची किंवा डुक्कराचा भागीदार आकर्षक वाटायला हवा. बौद्धिकदृष्ट्या हे पूर्णतः अचूक आहे. कल्पनाशक्तीद्वारे आपण या डुक्करांची कल्पना करतो, आणि त्यातून आपल्याला अर्थ लावण्यासाठी मदत होते. त्यामुळे आपल्याला आकर्षक वाटणाऱ्या व्यक्तीमध्ये विशेष असं काही नसतं. मला ही व्यक्ती आकर्षक वाटते, या व्यक्तीला ती व्यक्ती आकर्षक वाटते. हे उपहारगृहासारखं असतं: एका व्यक्तीला हा पदार्थ हवा असतो, दुसऱ्या व्यक्तीला दुसरा पदार्थ हवा असतो. मग काय? यात काही विशेष नाही.

अशा प्रकारचा विचार विस्तारला की खूप रोचक होतो. मला ज्या गोष्टी करायला आवडतात त्या इतरांनाही का वाटायला हव्यात? अशा प्रकारच्या विचारामागे स्वतःला बहुमोल मानण्याची वृत्ती असते: “मी करतोय तेच अचूक आहे” असं वाटणं असतं. कोणीतरी स्वतःचं टेबल किंवा कम्प्युटरमधील फोल्डर निराळ्या पद्धतीने लावतं त्यानेही आपण त्रस्त होतो: “एवढं चुकीचं काय आहे!” गोष्टी करण्याच्या अनेक भिन्न पद्धती आहे, त्याच प्रमाणे लैंगिक आकर्षण ठरतील अशा अनेक भिन्न वस्तू आहेत, हे कबूल करणं चांगलं असतं.

स्वतःला बहुमोल मानणं थांबवून इतरांविषयी विचार सुरू करणं, यावर भर देणाऱ्या मनोवृत्ती प्रशिक्षणाबद्दल आपण वाचतो किंवा ऐकतो, तेव्हा ते विचारप्रक्रियेच्या टोकापर्यंत नेणं गरजेचं नसतं- विश्वातील प्रत्येक जिवाच्या लाभासाठी आपण काम करतोय, इथपर्यंत ते नेणं आवश्यक नसतं. आधी म्हटल्याप्रमाणे आपण एक गोष्ट निश्चितपणे म्हणू शकतो, “या ग्रहावरील ७ अब्ज मानवांपैकी मी एक आहे, शिवाय इथे अगणित प्राणी व कीडे आहेत. प्रत्येकाला आनंदी, दुःखी किंवा तटस्थ भावना अनुभवायला मिळते, त्यामुळे माझ्यामध्ये विशेष असं काही नाही.” प्रत्येकाच्या संदर्भात आपण आपल्याला काय वाटतंय याचा विचार करतो आणि नेहमीच्या “मी, मी, मी”ऐवजी आपलं मन अधिक खुलं होतं. हे जागतिक तापमानवाढीसारखं असतं; याचा इतरांवर कसा परिणाम होतो याचा विचार आपण करायला हवा, कारण हे केवळ एका व्यक्तीपुरतं मर्यादित नसतं. 

एखादा लाभदायक बदल घडवण्यासाठी, स्वतःला बहुमोल मानण्यापासून इतरांना बहुमोल मानण्यापर्यंतचा प्रवास करण्यासाठी आपल्याला इतकं दूर जावं लागत नाही. हे आपण साध्या पातळीवरही करू शकतो, आपल्या निकटच्या परिसराकडे पाहूनही करू शकतो- “या नात्यामध्ये एकटी मीच नाहीये,” किंवा “या कुटुंबात एकटाच मी नाहीये”. अशा प्रकारे आपण संथपणे व्यापक गटाबद्दल अधिक आस्थेवाईक होतो. यात कदाचित आपण विश्वातील प्रत्येकाचा समावेश अजून केला नसेलही, पण आपण या पातळीपासून सुरुवात करू शकतो, केवळ फेसबुकवरच्या ‘लाइक’सारख्या वरपांगी पातळीपेक्षा इतरांशी प्रत्यक्ष संवाद साधून हे करता येतं.

पण तरीही हे मर्यादित आहे, कारण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण जितक्या लोकांपर्यंत पोचू शकतो, त्याहून कितीतरी अधिक लोकांपर्यंत एखाद्या सोशल नेटवर्किंग संकेतस्थळाद्वारे पोचू शकतो. पण प्रत्यक्षातील आंतरवैयक्तिक संपर्काच्या व नात्यांच्या जागी आभासी समाजमाध्यमं येतात, तेव्हा समस्यांना सुरुवात होते. तुम्ही कोणाबरोबर तरी असाल, पण प्रत्यक्षात तिथे नसाल, कारण तुम्ही लोकांना टेक्स्ट मेसेज पाठवत असाल. अशा घटना आजकाल अगदी सर्रास दिसतात, केवळ कुमारवयीन मुलामुलींमध्येच नव्हे, तर आपल्याकडे खूप दुर्लक्ष होतंय असं वाटणाऱ्या मुलांमध्येही हे आढळतं, कारण त्यांचे पालक सतत संदेश पाठवत असतात आणि मुलांकडे लक्ष देत नाहीत.

मन-प्रशिक्षणाची उपासना करण्याचे विविध मार्ग

मन-प्रशिक्षणाची उपासना करण्याच्या अनेक पातळ्या आहेत. यात कोणत्याही प्रकारची जगावेगळी उपासना गरजेची नसते; आपल्याला जे वास्तववादी वाटतं त्या संदर्भात आपण आपली बुद्धिमत्ता वापरण्याची तेवढी गरज असते. विश्वामध्ये केवळ आपणच व्यक्ती नाही आहोत, आणि विश्वातील सर्वांत महत्त्वाची व्यक्ती आपण नाहीयोत, पण आपण काहीच नाहीयोत असंही नाही, याला वास्तववाद म्हणतात. विश्वातील अनेक जीवांपैकी एक आपण आहोत, या विश्वाचा आपण भाग आहोत. सहानुभूतीच्या संदर्भात आपण आपली कल्पनाशक्ती वापरू शकतो, इतर लोकांच्या परिस्थिती व भावना आणि ते कशा रितीने गोष्टी अनुभवतात, हे समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतो. 

बुद्धिमत्ता व कल्पनाशक्ती ही दोन थोर साधनं आपल्याकडे वापरण्यासाठी उपलब्ध आहेत. आपण स्वतःच्या बुद्धिमत्तेला तर्काद्वारे प्रशिक्षित देतो, आणि कल्पनाचित्रणासारख्या गोष्टींद्वारे आपण स्वतःच्या कल्पनाशक्तीचं प्रशिक्षण करतो. आपल्या बुद्धिमत्तेचं संगणकासारखं व्हावं किंवा सर्व प्रकारच्या कल्पनारम्य तपशिलांचं चित्र उभं करून सुवर्णपदक जिंकावं, यासाठी आपण हे करत नाही, तर आपल्या स्वतःच्या जीवनातील अडचणी व समस्या यांवर मात करण्यासाठी करतो. व्यापक स्तरावर इतरांनाही असंच करता यावं यासाठी मदत करण्याचं काम आपण करतो. ही अतिशय व्यापक व रुंद व्याप्ती असणं चांगलं आहे, कारण इतरांबाबत काय घडलंय, इतरांबाबत वर्तमानात काय घडतंय, आणि इतरांबाबत भविष्यात काय घडण्याची संभाव्यता आहे, हे समजून घेऊन प्रत्येकाविषयी आपण सहानुभूती बाळगायला हवी. यासाठी थोर बुद्धिमत्ता व कल्पनाशक्ती लागते!

हे आपण विविध मार्गांनी स्वतःच्या जीवनामध्ये आणू शकतो. “विशेष काही नाही” ही भावना अंगीकारणं ही याची सर्वांत सोपी पातळी आहे. चांगलं किंवा वाईट किंवा तटस्थ असं काहीही घडलं तरी त्यात विशेष असं काही नसतं, हे समजून घेणं इथे अभिप्रेत आहे. इतिहासामध्ये कायमच, किमान प्राचीन ग्रीकांपासून आत्तापर्यंत प्रत्येक जण हेच म्हणत आला आहे की, “आताचा काळ सर्वांत वाईट आहे: तरुण पिढीचं पूर्ण अधःपतन झालेलं आहे आणि ही पिढी भयंकर व भ्रष्ट आहे.” इतक्या काळातील साहित्याकडे पाहिलं, तर तिथेही प्रत्येक जण तेच सांगताना दिसतो, पण हे प्रत्यक्षात खरं नाही. काय घडतंय यामध्ये काहीच विशेष नाही, माझ्यामध्ये काही विशेष नाही, आणि माझ्या भावनांमध्येही विशेष काही नाही. हे केवळ प्रवाहित राहिलेलं आहे, आणि एकमेकांशी अन्योन्यक्रीडा साधणाऱअया असंख्य कार्यकारणांनी याला चालना मिळते. आपण शक्य तितक्या लाभदायक पद्धतीने ते हाताळणं गरजेचं आहे, त्यासाठी इतरांबाबत सहानुभूती राखण्याकरिता आपण आपली बुद्धिमत्ता व कल्पनाशक्ती वापरायला हवी. 

सारांश

या ग्रहावरील सात अब्जांहून अधिक मानवांपैकीच एक आपण आहोत, पण आपल्यापैकी कोणीही इतर कोणापेक्षा भिन्न नाही. आपण स्वतःला बहुमोल मानण्याच्या वृत्तीवर मात करायचा प्रयत्न करतो, तेव्हा आपण आपोआपच अधिक वास्तववादी होत जातो: सगळे जण आपल्या विरोधात आहेत असं वाटण्याऐवजी आपण सगळे इथे एकत्र कसे आहोत, हे आपल्याला कळतं. आपल्यामध्ये विशेष असं काही नाही, या समजुतीने आपल्या भावनिक तब्येतीची व इतरांसोबतच्या वागण्याची गुणवत्ता बरीच सुधारते.

Top