आठ ऐहिक चिंता आणि सांकल्पनिक रूपरेषा

आठ ऐहिक चिंता

आपल्या जीवनामध्ये आपल्या मनांमधील अनुभव व भावना यांच्याव्यतिरिक्तही आशय असतो. इथेही तसंच होतं; आपण त्याला अवाजवी महत्त्व देणं टाळायचा प्रयत्न करायला हवा. बौद्ध शिकवणुकींमध्ये जीवनातील आठ अनित्य गोष्टींची यादी अधोरेखित केली आहे- यांना “आठ ऐहिक चिंता” किंवा “आठ ऐहिक धर्म” असं म्हणतात. या गोष्टीही सतत बदलणाऱ्या इतर गोष्टींप्रमाणेच चढ-उताराचं तत्त्व अनुसरतात.

लाभ व तोटे

काही वेळा आपला लाभ होतो, काही वेळा तोटा होतो. आर्थिकदृष्ट्या काही वेळा आपण पैसे कमावतो आणि काही वेळा पैसे गमावतो. काही वेळा आपण विकत घेतलेली वस्तू चांगली असते (हा लाभ होतो), पण काही वेळा ती वस्तू लगेच मोडून जाते (हा तोटा असतो). यातही विशेष असं काही नसतं. हे पत्ते खेळल्यासारखं किंवा मुलांचे खेळ खेळल्यासारखं असतं; काही वेळा आपण जिंकतो आणि काही वेळा आपण हरतो. मग काय? विशेष काही नाही.

हरल्यावर रडणाऱ्या आणि “मला जिंकायचंय!” असं ओरडणाऱ्या लहान मुलाप्रमाणे आपण व्हायचं नसतं, याची आठवण आपण स्वतःला करून देणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळी आपणच का जिंकायला हवं? प्रत्येक जण माझ्यासारखं होईल, अशी आशा ठेवल्यासारखा हा प्रकार असतो. बौद्ध धर्मात एक उपयुक्त म्हण आहे, ती अशी- “प्रत्येका बुद्ध आवडत नसे, मग आपण स्वतःबद्दल कोणती अपेक्षा ठेवावी- प्रत्येकाला आपण आवडणार आहोत का?” अर्थातच नाही. प्रत्येक जण आपल्या फेसबुक-पानावर ‘लाइक’चं बटण दाबणार नाही. काही लोकांना आपण आवडणारच नाही. यावर काय करायचं? हे अगदी स्वाभाविक आहे.

हे सगळं लाभ व तोटा यांच्याशी संबंधित असतं. आपण कोणाशी तरी नातं जोडतो, आणि ते अखेरीस संपुष्टात येतं. या संदर्भात आपण आपल्या खिडकीत येणाऱ्या मुक्त पक्ष्याची प्रतिमा पूर्वी वापरली आहे. तिथे तो पक्षी थोड्या वेळासाठी येतो, पण तो मुक्त असल्यामुळे तो उडूनही जातो. कोणत्याही नात्याबाबतसुद्धा असंच असतं. “मला कधीच सोडून जाऊ नकोस, तुझ्याशिवाय मी जगू शकणार नाही”, असं तुम्ही म्हणालात आणि तुम्ही संपूर्ण आयुष्यभर सोबत राहिलात, तरी तुमच्यापैकी एक जण निःसंशयपणे दुसऱ्याच्या आधी मरणार आहे. एखाद्या व्यक्तीशी आपली मैत्री होते, एखाद्या व्यक्तीशी असलेली मैत्री तुटते, यात विशेष असं काहीच नाही. जीवन असंच आहे. ती व्यक्ती आपली मित्र वा मैत्रीण असताना आपल्याला आनंदी वाटणं शक्य नसतं आणि तिची मैत्री गमावल्यावर आपल्याला दुःख वाटणं शक्य नसतं, असा याचा अर्थ नव्हे. काहीच न वाटणं ही “काहीही होऊ दे” अशी मनोवृत्ती झाली, पण तिचा आणि “विशेष काही नाही” या मनोवृत्तीचा अजिबात संबंध नाही. आपण टोकांना जाऊ नये आणि संबंधित गोष्टींना अवाजवी महत्त्व देऊ नये, एवढाच याचा अर्थ आहे.

स्वतःकडे पाहणं आणि लाभ व तोटे यांना आपण कसा प्रतिसाद देतो हे पाहणं रोचक ठरतं. मी उदाहरण म्हणून कायम स्वतःकडे पाहो, कारण माझ्या संकेतस्थळाने कायम माझं मन व्यापून टाकलेलं असतं; जवळपास दिवसभर माझ्या विचारांवर आणि कामावर त्याचा पगडा असतो. आमच्याकडे सांख्यिकी आकडेवारीचा प्रोग्राम आहे आणि किती लोक संकेतस्थळ वाचतात हे मला रोज कळत असतं. एखाद्या दिवशी वाचकांची संख्या वाढली, तर खरोखरच चांगलं वाटतं, पण एखाद्या विशिष्ट संख्येपर्यंत किंवा मला वाटतंय तितके वाचक नसतील, तर ते तितकंसं चांगलं नाही. तर, अशा प्रकारे लाभ आणि तोटा हे घडत असतं. 

एका अर्थी मला आनंदाची अतिशय कमी पातळी जाणवते. ही काही नाट्यमय गोष्ट नाही. काही आठवड्यांपूर्वी एका दिवशी आमच्या संकेतस्थळाला भेट दिलेल्यांची संख्या ६,०००पर्यंत गेली होती. “अरे वा, ६,००० हे खूपच आहे!” असंच ते होतं. पण त्यातून मिळालेला आनंद अतिशय क्षुल्लक होता. त्यात काही मोठी गोष्ट नव्हती, कारण त्यातून वास्तविक काहीच घडलेलं नव्हतं. “बरं, हे चांगलं आहे. मग काय? आता नवीन काय?” अशी ती भावना होती. मग एका दिवशी वाचकसंख्या ४,५००पर्यंत खाली आली आणि मला खरोखरच निराश वाटलं. “अरे, आज फारसे लोक तिकडे फिरकले नाहीत.” पण स्वतःला त्यातच मग्न ठेवणं हे अधिक ठळक असल्याचं दिसतं, आणि मी ते कबूल करतो. कायम संकेतस्थळाशी निगडित सांख्यिकी तपशील बघावा, असं वाटत राहतं. इतर गोष्टींबाबत विचार करण्यात मग्न होण्यापेक्षा अशी आत्ममग्नतेची वृत्ती अधिक बळकट असते, असं बौद्ध धर्म सांगतो, कारण “मी”विषयी विचार करणं अंतःप्रेरणेने होतं. आपण किती विलक्षण आहोत किंवा महान आहोत किंवा कोणाचंच आपल्यावर प्रेम नाही, असा विचार आविष्कृतही व्हावा लागत नाही, पण तो कायम अंतःस्थ विचार म्हणून टिकून असतो.

तुम्ही सर्व तुमची उदाहरणं घेऊ शकता. कदाचित फेसबुक किंवा टेक्स्ट मेसेज या संदर्भात याचा विचार करता येईल का? मला आज किती मेसेज आले? माझ्या पोस्टना आज कोणी ‘लाइक’ केलं? काही नवीन आलंय का हे पाहण्यासाठी आपण स्वतःचं फेसबुक खातं किती वेळा तपासतो किंवा किती वेळा फोन खिशातून बाहेर काढतो? पूर्वी इंटरनेट वगैरे नव्हतं, पण लोक पोस्टमनच्या बाबतीत असंच वागायचे. “आज माझ्यासाठी काही पत्र आलंय का?” मग काही पत्रं आली नसतील तर, “अरेरे, कोणालाच मी आवडत नाही.” किंवा फक्त जाहिराती असतील आणि आपल्याला ते नको असेल, असंही होतं. “विशेष काही नाही” असं समजून घेणारी मनोवृत्ती असेल, तर चढ-उतारांना टोकांपर्यंत नेणं टाळण्यासाठी ती मदतीची ठरते, कारण या मनोवृत्तीद्वारे आपल्याला विविध घडामोडींविषयी अधिक मानसिक समतोल व मनःशांती साधता येते. नवीन काय आलंय, हे तपासण्याची सततची गरज कशी हाताळायची हे जास्त अवघड आहे.

आपली मनोवृत्ती बदलणं ही संथ व दीर्घ प्रक्रिया असते. गोष्टी सहज बदलत नाही, तर हळूहळू बदलतात. आपण स्वतःकडे अधिक वास्तववादी पद्धतीने बघायला सुरुवात केली की त्याची रोचकता लक्षात येते. “मला सतत कम्प्युटर आणि सेल-फोनकडे बघायची सवय लागलेय. मी त्यांचा गुलाम झालोय. किती लोक मला प्रतिसाद देतायंत हे सतत तपासायची सवय मला लागलेय. मी गुलाम का झालोय?”, असं आपण स्वतःला विचारतो. सब-वेमधील सर्व लोकांकडे पाहा आणि त्यांच्यातील किती लोकांच्या हातात सेल-फोन आहेत तेही पाहा. का? “माझ्या हातून काही सुटता कामा नये” या मानसिकतेमध्ये स्वतःला बहुमोल मानण्याची व असुरक्षिततेची भावना असते. का? इतकं महत्त्वाचं काय असतं? काही गोष्टी महत्त्वाच्या असतीलही, पण काहीच महत्त्वाचं नाही असं आपण म्हणत नाही आहोत, फक्त सतत संपर्कात राहण्याला, सतत ऑनलाइन राहण्याला आपण अवाजवी महत्त्व देतो, एवढंच म्हणणं आहे. आपल्या स्वतःच्या भावनिक समतोलाच्या संदर्भात याचं विश्लेषण करणं चांगलं असतं.

तर, काही वेळा आपण जिंकतो, काही वेळा आपण हरतो. हा एक संच झाला.

गोष्टी चांगल्या घडणं आणि गोष्टी वाईट घडणं

काही वेळा गोष्टी चांगल्या घडतात आणि काही वेळा गोष्टी वाईट घडतात, हा दुसरा संच. हेही आपण अनेक पातळ्यांवरून समजून घेऊ शकतो, पण इथे पुन्हा “विशेष काही नाही” हा प्रतिसाद असतो. एखादा दिवस खरोखरच चांगला जाईल, आणि दुसरा दिवस अनेक अडचणींनी भरलेला असेल, त्यात लोक आपल्याला त्रास देतील आणि सगळंच चुकीचं घडतंय असं वाटायला लागू शकतं. हे स्वाभाविक आहे. सकाळी आपली ऊर्जा जास्त असू शकते आणि दुपारनंतर ऊर्जा खालावू शकते. काही वेळा आपल्याला सुदृढ वाटतं, काही वेळा सर्दी होते. यात विशेष काही नाही.

प्रशंसा व टीका

प्रशंसा व टीका, या यापुढचा संच आहे. काही लोक आपली प्रशंसा करतात आणि इतर काही जण आपल्यावर टीका करतात. याला कसं सामोरं जायचं? प्रत्येक जण काही बुद्धाची प्रशंसा करायचं नाही; काही लोक, विशेषतः त्यांचा चुलतभाऊ त्यांच्यावर खूप टीका करत असे. मग प्रत्येक जण आपली प्रशंसा करेल, अशी अपेक्षा आपण का ठेवावी?

इथेही पुन्हा मी माझंच उदाहरण देतो. मला माझ्या संकेतस्थळाबद्दल अनेक ई-मेल येतात, आणि त्यातील बहुतांश लोक संकेतस्थळ त्यांना उपयुक्त ठरल्याचं सांगतात, पण क्वचित प्रसंगी टीकाही असते. प्रशंसा हाताळणं अर्थातच सोपं असतं; टीकेने आपलं मन खूप जास्त अस्वस्थ होऊ शकतं.

प्रशंसा झाल्यावर आपण टोकाला जाऊन विचार करायला नको- आपण महान आहोत असं मानायला नको. किंवा दुसऱ्या टोकाला जाऊन, “मी काही याला पात्र नाही. त्यांना खरोखरचा मी माहीत असतो, तर त्यांना मी आवडलो नसतो” असाही विचार करू नये. पण प्रशंसा स्वीकारणं खूपच सोपं असतं. टीका स्वीकारणं मात्र इतकं अवघड का असतं? कारण आपण स्वतःला बहुमोल मानतो. मनोवृत्तीच्या प्रशिक्षणाद्वारे आपण स्वतःविषयी इतरांचा विचार करतो, आपल्या कोणत्या कृतीमुळे त्यांना आपल्यावर टीका करावीशी वाटली असेल याचा विचार करतो. आपल्याला मदतीसाठी काही करणं शक्य असेल, समजा नुसती दिलगिरी व्यक्त करणं शक्य असेल तर, “तुम्हाला यामुळे त्रास झाला असेल हे मी कबूल करतो. मी खरोखरच आपली माफी मागतो, माझा तो हेतू नव्हता”, असं म्हणता येईल. हळूहळू आपण स्वतःला बहुमोल मानण्यापासून इतरांना बहुमोल मानण्यापर्यंतचा बदल करू शकतो.

आपल्या इतरांसोबतच्या सर्वसाधारण, दैनंदिन संवादांमध्ये आपल्याला हे करता येणं शक्य आहे. काही वेळा ते आपल्यावर खूश होती आणि काही वेळा तसं होणार नाही. लोक आपल्यावर खूश असतील, तेव्हा ते सोपं असतं. शिवाय, आपल्या जीवनात काही लोक असे असतात ज्यांना हाताळणं खूपच अवघड असतं आणि ते कायम आपल्यावर टीका करतात किंवा कायम आपल्याबाबतीत नकारात्मक असतात. त्यांच्याबाबतीत आपली मनोवृत्ती कशी असते? आपण त्यांना केवळ अडचण करणारी, अप्रिय व्यक्ती मानतो का? की, ती अतिशय नाखूश व्यक्ती आहे, असं आपण मानतो? तुम्हा सर्वांच्या जीवनात असे लोक असतीलच याची मला खात्री आहे. ते तुम्हाला फोन करतात किंवा तुम्हाला भेटून सोबत जेवायची इच्छा व्यक्त करतात आणि या वेळी ते १०० टक्के स्वतःबद्दलच बोलती व तक्रारी करतील हे तुम्हाला माहीत असतं. “अरे.., आता परत हाच!” असा विचार तुमच्या मनात येऊ शकतो. पण प्रत्येक वेळी आपण कामात व्यग्र आहोत असं आपल्याला सांगता येत नाही!

त्या लोकांसोबत असणं आणि त्यांच्या तक्रारी ऐकणं मला किती कटकटीचं वाटेल, याचा विचार करणं हा आपला प्रतिसाद असेल, तर आपला दृष्टिकोन आपल्याला बदलणं शक्य आहे: ही व्यक्ती सदासर्वकाळ तक्रारी करत असते, कारण ती प्रत्यक्षात अत्यंत दुःखई आहे, आणि एकाकीही आहे. तक्रारी करणाऱ्या लोकांसोबत सर्वसाधारणतः कोणालाच थांबायचं नसतं. त्यामुळे आपण त्यांच्या सोबत काही वेळ घालवणं गरजेचं आहे, त्यातून आपण अधिक सहानुभूती विकसित करू शकतो, आणि इथे आपण त्यांच्या बाजूने विचार करतो, “मी”च्या बाजूने नाही, त्यामुळे हा अनुभव तितका काही भयंकर नसतो.

चांगली बातमी व वाईट बातमी ऐकणं

चांगल्या व वाईट बातम्या ऐकणं, हा चौथा संच. हे आधीसारखंच असतं: प्रत्येक गोष्टीमध्ये चढ-उतार सुरूच  असतात. अर्थातच हे चार संच एकमेकांमध्ये मिसळतात आणि “विशेष काही नाही” हे तत्त्व या आठही संचांना लागू होतं. चांगल्या किंवा वाईट बातम्या ऐकण्यामध्ये विशेष असं काही नाही, कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये हे घडतंच असतं. 

आता काही लोक अशा प्रकारच्या प्रशिक्षणावर आक्षेप घेतात. चढ-उतार नसतील तर आपण खऱ्या अर्थाने जिवंत नसतो, त्यामुळे अशा प्रकारे भावनिक हिंदोळे असणं आपल्याला आवडतं, अशी घोषणा या लोकांनी केलेली असते. पण ही मनोवृत्ती सहायक आहे का याची तपासणी करणं गरजेचं आहे.

पहिली गोष्ट, आपण भावनिक चढ-उतारांच्या हिंदोळ्यांमध्ये असलो किंवा नसलो, तरी आपण जिवंतच असतो. हा जरा मूर्खासारखा आक्षेप आहे. आपण भावनिक हिंदोळ्यांमध्ये असतो तेव्हा काय घडतं? आपण या भावनांनीच व्यापून जातो, त्यामुळे आपल्याला खरोखरचा तर्कसंगत विचार करता येत नाही. आपण शांत नसलो, तर आपलं जीवन तितकं नाट्यमय होत नाही, आणि आपल्याला अधिक चांगल्या रितीने परिस्थिती हाताळता येतात. आपण स्पष्टपणे विचार केला नाही आणि संतापलो, तर नंतर पश्चात्ताप वाटतील अशा गोष्टी आपल्याकडून बोलल्या जातात. आफल्या भावनांबाबत समवृत्ती ठेवली तर आपण अशा प्रकारच्या गोष्टी करत नाही. प्रत्येकाला आनंद हवा असतो, या संदर्भात अशा प्रकारचा शांत आनंद हा “ए हे हे, ओ हो हो” यांसारख्या नाट्यमय आनंदापेक्षा अधिक स्थिर असतो.

Top