मनाच्या प्रशिक्षणाद्वारे आत्मपरिवर्तन

33:24
आपल्या समोर अवघड परिस्थिती असते किंवा आपल्या जीवनात गोष्टी बिघडत असतात, तेव्हा आपण या गोष्टींकडे पाहण्याची मनोवृत्ती बदलली, तर या अनुभवांमध्येच परिवर्तन घडवून आपली आध्यात्मिक प्रगती साधणं आपल्याला शक्य होतं. “लोजोंग”ची, म्हणजेच मन-प्रशिक्षणाची, तिबेटी परंपरा विविध प्रकारच्या लाभदायक मनोवृत्ती विकसित करण्याचं प्रशिक्षण देते. याद्वारे आपल्याला जीवनातील आव्हानं चांगल्या तऱ्हेने हाताळणं शक्य होतं.

एखादी व्यक्ती किंवा परिस्थिती यांच्याकडे आपण कसं पाहतो हे बदलण्याच्या पद्धतींना “मन-प्रशिक्षण” असं म्हणतात. परंतु, “मन-प्रशिक्षण” या संज्ञेबाबत आपण सावध राहणं गरजेचं आहे, कारण त्यात एकाग्रता व स्मृती यांच्या प्रशिक्षणाचा समावेश असेल, असं वाटतं. पण इथे आपण त्याबद्दल बोलत नाही आहोत. मन-प्रशिक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या ब्ललो-स्ब्योंग या तिबेटी संज्ञेमधील ब्लो हा शब्द केवळ “मन” या अर्थी येत नाही. या शब्दाला “मनोवृत्ती”च्या जवळ जाणाऱ्या अर्थछटा आहेत. “प्रशिक्षण”साठी वापरल्या जाणाऱ्या स्ब्योंग या तिबेटी शब्दाचे दोन अर्थ होतात: “साफ करणं”, म्हणजे आपण नकारात्मक मनोवृत्ती साफ करतो, आणि “प्रशिक्षण देणं”, म्हणजे आपण अधिक सकारात्मक मनोवृत्तीसाठी प्रशिक्षण घेतो. त्यामुळे काही वेळा मन-प्रशिक्षण म्हणजे “मनोवृत्ती प्रशिक्षण” असतं, हे समजून घेणं अधिक स्पष्टपणा आणणारं ठरेल.

स्वतःला बहुमोल मानण्याची आपली मनोवृत्ती, ही साफ करावी लागणारी मुख्य नकारात्मक मनोवृत्ती आहे. आत्मकेंद्री व स्वार्थी असणं, केवळ स्वतःचाच विचार करणं, इत्यादीचा यात समावेश होतो. प्रशिक्षण घ्यावी अशी सकारात्मक मनोवृत्ती म्हणजे इतरांना बहुमोल मानणं, त्यात प्रेम व करुणा यांद्वारे मुख्यत्वे इतरांच्या कल्याणाचा विचार करणं अभिप्रेत असतं. सर्व मन-प्रशिक्षणाच्या तंत्रांमध्ये वापरली जाणारी पद्धत बुद्धाच्या सर्वसाधारण दृष्टिकोनाशी सुसंगत असल्याचं दिसतं, हाच दृष्टिकोन “चार आर्य सत्यं” म्हणून ओळखला जातो.

चार आर्य सत्यं

आपल्या जीवनातील समस्यांवर मात कशी करायची, हे बुद्धाने अतिशय व्यावहारिक पातळीवर शिकवलं. किंबहुना, त्यांनी शिकवलेल्या प्रत्येक गोष्टीमागचा उद्देश हाच होता. आपल्या सर्वांना अनेक भिन्न पातळ्यांवरच्या व प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. काही अतिशय स्पष्ट दिसणाऱ्या समस्या असतात आणि त्यातून बऱ्याच यातनाही होतात; शारीरिक व मानसिक अशा दोन्ही प्रकारची वेदना मोठ्या प्रमाणात सहन करावी लागते. काही सूक्ष्म पद्धतीच्या समस्या असतात, पण त्याही अतिशय वेदनादायक असतातच. उदाहरणार्थ, आपण आयुष्यात विविध गोष्टींचा आनंद घेतो, पण त्याने आपलं पूर्ण समाधान होत नाही, त्यामुळे आपण त्रस्त झालेले असतो. या गोष्टी कायमस्वरूपी टिकत नाहीत, त्या बदलतात. आपल्या आयुष्यातील गोष्टी कधीही स्थिर नसतात; त्यांच्याबाबतीत चढ-उतार येत राहतो. काही वेळा गोष्टी चांगल्या घडतात, काही वेळा तशा घडत नाहीत; आणि आपल्या मनात येणाऱ्या भावनाही अस्थिर असतात. काही वेळा आपल्याला आनंदी वाटतं, काही वेळा दुःखी वाटतं; काही वेळा आपल्याला काहीच भावना जाणवत नसल्यासारखं वाटतं, आणि पुढच्या क्षणी आपल्याला कोणती भावना जाणवणार आहे याची आपल्याला काहीच कल्पना नसते. आपण ज्या लोकांसोबत आहोत किंवा आपण जे काही करतो आहोत, त्यावरही हे फारसं अवलंबून नसल्याचं दिसतं- अचानक आपली मनस्थिती बदलते.

आपल्या सर्वांच्या भावनिक समस्याही असतात, आणि त्यातून आयुष्यात इतर वेगळ्या समस्या येतात. त्यांची पुनरावृत्ती होताना दिसते, हे खरोखरच त्रस्त करणारं आहे. काही वेळा समस्या इतरांकडून येत असल्याचं वाटत असलं, तरी आपण स्वतःच आपल्या समस्या वाढवत जातो असं दिसतं. पण आपण अधिक सूक्ष्मरित्या व अधिक प्रामाणिकपणे तपास केला, तर आपल्या बऱ्याच समस्यांचा स्रोत आपण स्वतःच असल्याचं आपल्या लक्षात येतं, विशेषतः आपली जीवनात घडणाऱ्या गोष्टींविषयीची आत्मकेंद्री मनोवृत्ती याला कारणीभूत ठरते.

बुद्धाने हे सर्व पाहिलं. त्याला स्वतःच्या जीवनामध्ये हे जाणवलं; त्याला इतरांच्या जीवनामध्ये हे दिसलं. प्रत्येक जण सारख्या परिस्थितीमध्ये आहे, हे त्याला दिसलं. दृष्य पातळीवर आपल्या सर्वांसमोर आयुष्यातील सर्वसामान्य घटनांबाबतही अडचणी असतात- जन्माला येणं, मोठं होणं, आजारी पडणं, म्हातारं होणं, आणि मरण पावणं. शिवाय, आपल्या भावनांचा सतत अनियंत्रित चढ-उतार सुरू असतो. पण आपल्या समोर येणाऱ्या या सर्व समस्यांची काही कारणं असतात; अचानक शून्यातून त्या आलेल्या नसतात. कोणत्या बाह्य महाशक्तीने समस्या आपल्याकडे पाठवलेल्या नसतात- त्या बाह्यशक्तीला आपण “ईश्वर” म्हणून किंवा आणखी अमूर्त रूप देऊ किंवा नियती वा नशीब म्हणू. पण आपल्या समस्यांचा स्रोत तो नसतो.

आपल्या समस्यांचा खरा स्रोत आपल्या आत असतो. स्रोत आत असतो म्हणजे आपण अंगभूतरित्या वाईट किंवा अपराधी असतो असं नव्हे. आपण जन्मतः वाईट व पापी आहोत, असं बुद्ध म्हणत नव्हता; उलट, वास्तवाविषयीचा आपला गोंधळ हा आपल्या समस्यांचा स्रोत आहे, असं बुद्ध म्हणाला. आपण मूर्ख नाही आहोत, पण आपल्या दैनंदिन अनुभवामध्ये गोष्टी अशक्य मार्गांनी अस्तित्वात असल्यासारखं वाटतं आणि ते वास्तवाशी अजिबातच जुळणारं नसतं. आपण स्वतःकडे व इतरांकडे कसं पाहतो या संदर्भात हे विशेषतः दिसून येतं. या पाहण्यातूनच आपली स्वतःकडे व इतरांकडे पाहण्याची मनोवृत्ती घडत असते. आपल्या आत्मकेंद्रीपणामुळे आणि स्वतःला बहुमोल मानण्याच्या वृत्तीमुळे आपणच सर्वांत महत्त्वाची व्यक्ती आहोत आणि आपल्याला हवं त्या रितीनेच गोष्टी घडायला हव्यात आणि इतर लोकांचे अनुभव बिनमहत्त्वाचे आहेत, असं आपल्याला वाटतं. इतरांना काय वाटतं त्याला किंमत नाही आणि ते अस्तित्वातच नाहीत, असं वाटू लागतं. आपल्या अनुभवांचा केवढा भाग आपल्या दृष्टीकोनावर व अवास्तविक अपेक्षांवर आधारलेला असतो आणि आपल्या समोर येणाऱ्या प्रत्यक्षातील परिस्थितींशी त्याचा फारसा संबंध कसा नसतो, हे लक्षात घेतल्यावर आपल्याला सदर मांडणी समजेल, असं मला वाटतं.

पण ही परिस्थिती संपवणं शक्य आहे, असं बुद्ध म्हणाला. या समस्या पुन्हा उद्भवणारच नाहीत अशा रितीने त्यांना थांबवणं शक्य आहे. या समस्या चिरकाल सहन करण्याची शिक्षा आपल्याला झालेली आहे, असं काही नसतं. यावरचा एकमेव उपाय म्हणून अंमली पदार्थांचं सेवन करणं किंवा मद्यपान करणं योग्य नाही, आणि असं केल्याने आपलं दुःख कमी होईल आणि किमान क्षणभर तरी आपल्याला समस्यांपासून दूर गेल्यासारखं वाटेल, असं काहीच नसतं. किंवा, काहीच विचार न करण्याच्या गाढ साधनावस्थेत स्वतःला बुडवून टाकण्याचीही गरज नसते, त्यातूनच आपल्या समस्या सुटतील असंही काही नाही. असे उपाय केवळ तात्कालिक असतात, आणि त्याने आपल्या समस्या अजिबात सुटत नाही. आपल्याला समस्या सोडवायच्या असतील, तर आपल्याला त्या समस्यांच्या कारणांपासून स्वतःची सुटका करून घ्यावी लागेल. आपल्याला स्वतःच्या गोंधळापासून सुटका करून घ्यावी लागेल. गोंधळाच्या जागी अचूक आकलन आणावं लागेल. आपल्यापैकी प्रत्येकाला आनंदी व्हायचं असतं आणि कोणालाही दुःख नको असतं, आनंदावर कोणाचाही इतरांहून अधिक हक्क नसतो. शिवाय, आपण एकच व्यक्ती असतो आणि इतर अगणित असतात. हे वास्तव आपण पाहिलं आणि त्यानुसार आपली मनोवृत्ती बदलली, तर संथपणे, संथपणे आपलं आकलन अधिकाधिक सखोल होत जाईल त्यानुसार आपली भावनिक स्थितीही बदलत जाते.

मनाचं प्रशिक्षण

आपण स्वतःचं बरंचसं जीवन स्वतःच्या काल्पनिक विश्वात जगतो, त्यामुळे आपला गोंधळ आपल्या अनुभवातील प्रत्येक गोष्टीबद्दलची आपली मनोवृत्ती घडवतो. स्वतःला बहुमोल मानण्याच्या वृत्तीमुळे आपण स्वतःबाबत घडणाऱ्या घडामोडींकडे आत्मकेंद्री पद्धतीने पाहतो. त्यातून आपल्याला व इतरांना अधिक दुःख व समस्या सहन कराव्या लागतात. पण मनोवृत्तीमध्ये बदल केल्याने आपला जीवनातील घडामोडींचा अनुभव नाट्यमयरित्या बदलतो. 

उदाहरणार्थ, विमानतळावर विमान यायला विलंब झाला तर ती वैयक्तिक हानी न मानता आपण वास्तव पाहिलं, तर आपल्या लक्षात येतं की विमानाची वाट पाहणारे आपण व इतर लोक यांना आता वेटिंग-रूममध्ये अधिक वेळ मिळाला आहे. मग परिस्थितीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो, आणि इतर सर्व जण या विलंबाला कसे सामोरे जात आहेत याकडे आस्थेवाईकपणे पाहणारी मनोवृत्ती अंगीकारली जाते. एखाद्या सहप्रवाशाशी संभाषण करण्यासाठीची संधी म्हणून या विलंबाकडे पाहिलं जातं, आणि नाराज न होता आल्हाददायी पद्धतीने आपण त्या व्यक्तीला शांत होण्यासाठी मदत करू शकतो. शारीरिक व्यायामाद्वारे आपण आपल्या शरीराला अधिक बळकट होण्यासाठी व अधिक चिवटपणासाठी प्रशिक्षित करतो, त्याचप्रमाणे साधनेद्वारे आपण आपल्या मनांना व त्याच्या मनोवृत्तींना अधिक बळकट व अधिक सकारात्मक होण्यासाठी प्रशिक्षित करू शकतो, आणि भावनिकदृष्ट्या नाराज न होता संभाव्य अस्वस्थकारक परिस्थितींनाही सामोरं जाण्यासाठीचा चिवटपणा अंगी बाणवू शकतो. 

भावनिक सामर्थ्य कमावण

आपल्या समस्या काय आहेत हे काही वेळा आपल्याला समजतं. आपलं मन ताठर व संकुचित आहे, आपण केवळ स्वतःबद्दलच विचार करतो आहोत, यामुळे आपल्याला विशिष्ट प्रकारची भावनिक नाराजी अनुभवावी लागते आहे, हे आपल्याला समजतं, पण त्याने आपल्या भावना बदलताना दिसत नाहीत. आपल्या समजुतीने आपल्या भावनांवर खरोखरचा काही परिणाम होत नाही, असं आपल्याला वाटतं. पण इथे समजूत पुरेशी सखोल नसणं, हीच समस्या असते. समजूत सखोल नसतेच, शिवाय आपल्या मनोवृत्तींमध्ये बदल घडवण्यासाठी आवश्यक तितका वेळ ती “मुरवलेली” नसते. 

हे स्पष्ट करण्यासाठी पुन्हा शारीरिक आरोग्याचं उदाहरण घेऊ. समजा, आपल्याला सदासर्वकाळ शारीरिकदृष्ट्या कमकुवत, थकल्यासारखं व जड वाटत असेल, तर आपण व्यायामशाळेत किंवा फिटनेस क्लबमध्ये जायला सुरुवात करतो आणि नियमितपणे व्यायाम करतो. वेळापत्रकानुसार व्यायाम सुरू केल्यावर त्याने तत्काळ आपली शारीरिक तब्येत बदलत नाही. त्यासाठी काही काळ जावा लागतो, सर्वसाधारणतः अनेक महिने जातात, त्यानंतर आपल्याला या व्यायामाचे आपल्या आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम जाणवू लागतात. परंतु, आपण जितका अधिक काळ व्यायम करू तितका तो आपल्या जीवनाच्या नित्यक्रमाचा भाग होऊन जातो, त्यानंतर आपल्याला वेगळं वाटू लागतं: आपल्याला चांगलं वाटू लागतं. आपल्याला स्वतःविषयी चांगलं वाटू लागतं आणि आपण इतरांशी कसे वागतो या संदर्भातही चांगलं वाटण्यासाठी आपल्याला याची मदत होते.

आपल्या मनांमध्ये, आपल्या भावनांमध्ये व आपल्या मनोवृत्तींमध्ये काय होत असतं, हे समजून घेतल्यावरही असंच काहीसं होतं. आपली समजूत जितकी अधिक काळ राहील, आपण स्वतःला त्याबद्दल आठवण करून देत राहू, तितकी आपली समजूत सखोलही होत जाते. तर, भावनिक बदल तत्काळ होत नसला, तरी मनोवृत्तीमध्ये परिवर्तन घडवल्यावर आपल्याला अधिकाधिक भावनिक समतोलता व सामर्थ्य प्राप्त होतात.

स्वतःवर काम करण्यासाठी प्रेरणेच्या पातळ्या

व्यायामशाळेत जाण्यासाठी केवळ स्वयंशिस्त असून भागत नाही, तर सजगताही लागते, म्हणजे आपल्याला व्यायामशाळेत जायचं आहे हे लक्षात ठेवावं लागतं, ते विसरून चालत नाही. हे सगळं अधोरेखित करण्याला आपण “काळजी घेण्याची मनोवृत्ती” असं आपण म्हणतो- आपल्याला स्वतःची काळजी असते, आपण कसे दिसतो, आपल्याला काय वाटतं, इत्यादीची आपल्याला काळजी असते. आपण स्वतःला गांभीर्याने घेतो व स्वतःचा आदर राखतो, एका अर्थी आपल्याला आनंदी राहण्याचा व चांगलं वाटण्याचा “हक्क” आहे अशी ही भावना असते. स्वतःला समजून घेण्यासंदर्भात, आपलं भावनिक जीवन कसं कार्यरत असतं हे समजून घेण्यासंदर्भातदेखील हीच गोष्ट खरी आहे. स्वतःची काळजी घेण्यावरच हे अवलंबून असतं. अधिक चांगलं मानसिक आरोग्य राखण्याचा हक्क आपल्याला आहे, अशी आपली भावना असते. 

स्वतःची काळजी घेण्याची मनोवृत्ती आणि स्वतःला बहुमोल मानण्याची वृत्ती या एकमेकांपासून अतिशय भिन्न आहेत. स्वतःला बहुमोल मानताना आपण केवळ स्वतःचा विचार करत असतो आणि इतरांच्या कल्याणाकडे दुर्लक्ष करतो. आपली मनोवृत्ती व वर्तन यांचा आपल्या संपर्कात येणाऱ्या इतर लोकांवर कसा परिणाम होतो, याची आपण काळजी करत नाही. पण दुसऱ्या बाजूला, काळजी घेण्याच्या मनोवृत्तीमध्ये आपण हे लक्षात घेतो की जीवनातील दुःख व समस्या आपल्याच आत्मकेंद्रीपणातून व स्वार्थी मनोवृत्तीमधून उद्भवलेल्या आहेत, आणि आपल्याला आनंदी व्हायचं असल्यामुळे आपण स्वतःची इतकी काळजी घेतो की प्राप्त परिस्थितीसंबंधी काहीतरी करायची इच्छा आपल्याला होते. आपली मनोवृत्ती व वर्तन बदलण्यासाठी आपण स्वतःवर काम करतो, आणि जे साध्य करण्यासाठी आपण प्रशिक्षण घेतो आहोत ते आचरणात आणण्याचा प्रयत्न भविष्यात केला जातो.

अशा प्रकारे स्वतःवर काम करण्यासाठीच्या प्रेरणेच्या अनेक पातळ्या आहेत. स्वतःवर काम करत असतानाचं आपलं उद्दिष्ट आणि त्या उद्दिष्टाकडे जाण्यासाठी आपल्याला चालना देणारी भावनिक शक्ती म्हणजे प्रेरणा. या मार्गावर आपण पुढे जाऊ त्यानुसार प्रेरणेच्या अनेक प्रगतिशील पातळ्यांची रूपरेषा बौद्ध शिकवणुकींमध्ये दिलेली आहे. आपण स्वतःचं जीवनमान सुधारण्यासाठीही हे काम करत असण्याची शक्यता असते. आपलं आत्ताचं जीवनमान समाधानकारक नसेल, आणि ते असमाधानकारक असू नये, किंबहुना ते आणखी खालावलं नाही तर जास्त बरं होईल, असं आपल्याला वाटत असणं शक्य आहे. जीवनमान चांगलं झालं तर आपल्याला जास्त आवडेल! आपण खरोखरच असमाधानी आहोत आणि आपण पूर्ण कंटाळून गेलो आहोत, त्यामुळे जीवनाबद्दल आपल्याला काहीतरी करायचं आहे.

अधिक प्रगत पातळीवर आपण केवळ या जीवनकाळाबद्दल विचार न करता भविष्यातील जीवनकाळांचाही विचार करू शकतो. भविष्यातील जीवनकाळांमध्येही आपला प्रवास खालावू नये, असं आपल्याला वाटत असतं. या जीवनकाळामध्ये गोष्टी सुधारण्यासाठी आपल्याला जी भावनिक शक्ती चालना देते, त्याच शक्तीद्वारे आपण अधिक दीर्घकालीन काळाचा विचार करतो. या दोन्हींच्या मधलाही एक टप्पा असू शकतो, त्यामध्ये आपण आपल्या कुटुंबातील विविध समस्या सोडवण्यासंबंधीचा विचार करतो किंवा भावी पिढ्यांपर्यंत जाणाऱ्या गोष्टींबाबत विचार करतो. 

भावी जीवनाचा विचार करण्यापलीकडे जाऊन आपल्याला पुनर्जन्माच्या या संपूर्ण असमाधानकारक, कंटाळवाण्या चक्रातूनच बाहेर पडायचीही प्रेरणा वाटू शकते. किंवा करुणेने प्रेरित होऊन आपण इतरांना त्यांच्या जीवनातील समस्यांच्या या सर्व पातळ्यांवर मात करण्यासाठी मदतीचा हात देऊ शकतो. आपण तसं करत असू, तर आपली अशी कृती बुद्ध होण्याच्या दिशेने जाते.

या अधिक प्रगत प्रेरणेच्या पातळ्या असणारी व्यक्ती होण्यासाठी बरंच प्रशिक्षण घ्यावं लागतं. परंतु, आपण कोणत्याही पातळीवर असलो, तरी बुद्धाच्या शिकवणुकीतील अनेक पद्धती आपल्याला मदतीच्या ठरतात. उदाहरणार्थ, आपण केवळ या जीवनकाळाच्या संदर्भात विचार करत असलो, आपल्याला केवळ स्वतःसंबंधीच्या विचारांनी प्रेरणा मिळालेली असली, तरी आपण केवळ स्वतःबद्दलच्या विचारांनी व केवळ स्वतःच्याच समस्यांवर मात करण्याच्या विचारांनी कार्यरत नसतो, तर इतरांचाही विचार करण्यासाठी प्रेरित होत असतो. निराळ्या शब्दांत सांगायचं तर, आपल्या समस्या केवळ आपल्याला अडचणीच्या आहेत व आपल्याला त्या अतिशय वेदनादायी ठरतात, म्हणून त्यावर मात करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यापलीकडे जाऊन आपण असा विचार करतो की, इतरांना सर्वाधिक मदत करण्यापासून या समस्या आपल्याला प्रतिबंध करतात म्हणून त्यांच्यावर मात करायला हवी. मनाच्या प्रशिक्षणामध्ये आपण स्वतःवर अशा रितीने काम करतो.

उदाहरणार्थ, समजा आपण मद्यपी आहोत. मद्य आपल्याला, आपल्या आरोग्याला आणि एकंदरच आपल्याशी संबंधित सगळ्याच गोष्टींना हानिकारक ठरतं आहे, त्यामुळे मद्यावरील अवलंबित्वावर मात करण्याची प्रेरणा आपल्याला मिळते, हा एक दृष्टिकोन झाला. सकाळी आपण मद्याच्या धुंदीतच असतो याचं आपल्याला वाईट वाटतं. पण आपण आपल्या कुटुंबाचा विचार केला, तर आपल्याला त्याहून जास्त तीव्र प्रेरणा होण्याचीही शक्यता आहे. उदाहरणार्थ, माझ्या मद्यपामानामुळे मी चांगला पालक होऊ शकत नाही; मी मद्याच्या धुंदीत असताना अनेकदा वेड्यासारखं वागतो, आणि या सगळ्याने माझ्या कुटुंबाला, माझ्या मित्रमैत्रिणांन त्रास होतो आहो. आपल्या कुटुंबाला आपली गरज आहे आणि ही वास्तवातील गरज पूर्ण करण्यापासून आपल्याला मद्यपानाची सवय थांबवते आहे, हे आपल्या लक्षात आल्यावर आपल्याला या सवयीवर मात करण्यासाठी अधिक बळ मिळतं.

तर, हा जीवनकाळ सुधारण्यासाठी आपण सदर बौद्ध पद्धतींची उपासना करत असलो, तरीही इतरांविषयीचं प्रेम व करुणा यांतून मिळणारी प्रेरणाही अतिशय महत्त्वाची आहे. इतरांना बहुमोल मानण्यावर मन-प्रशिक्षणामध्ये भर दिला जातो: यातील अनेक पद्धती आपण केवळ स्वतःला चांगलं वाटण्यासाठी उपयोगात आणू शकतो, पण आपल्याला इतरांची चांगली मदत करणं शक्य व्हावं यासाठी सदर पद्धती वापरणं निश्चितपणे जास्त श्रेष्ठ ठरतं.

जीवनातील आठ अनित्य गोष्टी (आठ ऐहिक चिंता)

आपल्या जीवनात आपण अनेक अवघड परिस्थितींना सामोरं जातो. त्या वेदनादायी असतात, या अर्थाने त्या अवघड असू शकतात. त्या शारीरिक अर्थाने वेदनादायी असण्याची गरज नसते; त्या मानसिक वेदना देणाऱ्याही असू शकतात. उदाहरणार्थ, आपल्या अस्वस्थकारक भावना तीव्रपणे उफाळून येतील अशा प्रकारच्या अवघड परिस्थिती आपल्या समोर येतात. एका बाजूला या अस्वस्थकारक भावनांमध्ये संताप किंवा वैरभाव यांसारख्या भावनांचा समावेश असू शकतो, किंवा उत्कट जवळीक व ओढ अशाही भावना त्यात असू शकतात.

काही परिस्थिती विशेषकरून अवघड असतात आणि बौद्धविचारामध्ये जीवनातील अशा आठ तथाकथित “अनित्य गोष्टीं”ची यादी दिलेली आहे. काही वेळा त्यांचं भाषांतर “आठ ऐहिक चिंता” किंवा “आठ ऐहिक धर्म” असं केलं जातं, पण यात आपल्या जीवनात घडणाऱ्या व अनित्य असलेल्या गोष्टींबद्दलची चर्चा आहे; त्या स्थिर नाहीत, त्या निघून जातात. त्या चार जोड्यांच्या रूपात येतात:

  • प्रशंसा व टीका स्वीकारणं: आपल्याला प्रशंसा ऐकायला मिळाली, तर आपण अत्यानंदी होतो व त्याच्याशी आपण जोडले जातो; आणि आपल्यावर टीका होते, तेव्हा आपण नाराज होतो व संतापतो.
  • सुवार्ता व कुवार्ता स्वीकारणं: आपल्याला चांगली बातमी म्हणजे सुवार्ता कळते तेव्हा आपण अतिशय उत्साही होतो, आणि अर्थातच आपण त्याच्याशी जोडले जातो, ही सुवार्ता टिकून राहावी असं आपल्याला वाटतं, पण तसं कधीच होत नाही. आपल्याला वाईट बातमी किंवा कुवार्ता कळते, तेव्हा आपण नाराज होतो, आणि अनेकदा निराश होतो व संतापतो. 
  • लाभ व तोटे अनुभवणं: आपल्याला काही लाभ होतो, उदाहरणार्थ, कोणीतरी आपल्याला काहीतरी देतं, तेव्हा आपण आनंदी व उत्साही होतो, आणि “अरे, किती भारी!” असं आपल्या मनात येतं. मग, आपण काही गोष्टी गमावतो, किंवा लोक आपल्याकडून काही गोष्टी घेतात, किंवा तोडतात, तेव्हा आपण नाराज होतो. आपल्या जीवनात येणाऱ्या लोकांच्या संदर्भातही हे लाभ व तोटे असू शकतात. आपल्याला मित्रमैत्रिणी लाभतात, किंवा आपण आपल्या एखाद्या प्रिय व्यक्तीला गमावतो, तसंच आर्थिक पातळीवरही असे लाभ व तोटे असू शकतात.
  • गोष्टी चांगल्या घडणं किंवा वाईट घडणं: आपण एकदम उत्साही होतो व चांगल्या घडलेल्या गोष्टींशी जोडले जातो, किंवा वाईट गोष्ट घडल्यास निराश होतो व संतापतो.

आपल्या आत्ममग्नतेमुळे आपण या आठ अनित्य घटनांवेळी नाराज होतो. आपण केवळ स्वतःचा व स्वतःबाबत घडणाऱ्या गोष्टींचा विचार करत असतो, आणि “मी किती भारी आहे” किंवा “मी किती बिचारा आहे” एवढ्याच आपल्या भावना राहतात.

तात्कालिक विरोधी शक्तींचं उपयोजन

जीवनातील या आठ अनित्य गोष्टींना प्रतिसाद म्हणून सर्वसाधारणतः निर्माण होणाऱ्या अस्वस्थकारक भावनांवर मात करण्याच्या अनेक भिन्न पद्धती बुद्धाने शिकवल्या. इतरांना बहुमोल मानण्याच्या अधिक लाभदायक प्रवृत्तीने स्वतःच्या अनुभवांकडे पाहावं, यासाठीचं प्रशिक्षण यातील प्रत्येक पद्धतीमध्ये असतं. तात्कालिक विरोधी शक्तीच्या परिप्रेक्ष्यातून परिस्थितीकडे पाहणं, ही एक पद्धत आहे. यातून आपण अस्वस्थकारक भावनांपासून कायमचे मुक्त होणार नाही. तितकी खोलवर जाणारी ही पद्धत नाही, पण तरीही ती अतिशय मदतीची ठरते.

संतापाला विरोध म्हणून प्रेम

समजा, आपल्या जीवनात गोष्टी खालावलेल्या आहेत. आपल्या जीवनातील कोणी व्यक्ती आपल्याला अतिशय नाठाळ, अप्रिय पद्धतीने वागवते आहे आणि आपण कायम त्या व्यक्तीवर संतापतो आहोत. केवळ स्वतःचाच विचार करत राहिलं तर आपल्याला वाटतं, “माझ्याशी असलेलं त्यांचं वागणं मला आवडत नाही.” इथे आपण संतापाची तात्कालिक विरोधी शक्ती म्हणून प्रेमाचा वापर करू शकतो. “बरं, त्या व्यक्तीवर संतापू नका, तिच्यावर प्रेम करा” असं एकदम सुलभपणे आपण म्हणत नाही आहोत. आपल्यापैकी बहुतेकांना अशा प्रकारे अचानक बदलणं शक्य नाही, पण इतरांना बहुमोल मानून त्या आधारे आपली भावनिक स्थिती व मनोवृत्ती बदलण्यासाठी समजुतीचा वापर कसा करायचा, याचा एक चांगला दाखला पुढीलप्रमाणे.

ही अमुक व्यक्ती आपल्याशी भयंकर वागते आहे, पण ती तशी का वागते आहे? तिला काहीतरी खटकत असणार. तुमच्या जीवनात असे लोक नक्कीच असतील याची मला खात्री आहे. उदाहरणार्थ, काही जण सतत तक्रार करत असतात. ते तुमच्यासोबत असले की त्यांचं संभाषण कायम कशा ना कशाबद्दल तक्रार करणारं असतं. ते कायम स्वतःविषयी बोलत असतात, आणि त्यांच्यासोबत असणं पूर्णतः “खचवून” टाकणारा अनुभव देतं. याचं आपण विश्लेषण केलं, तर आपल्या लक्षात येतं की, ती व्यक्ती अतिशय दुःखी असल्यामुळे स्वाभाविकपणे असं वागते आहे. त्यामुळे याकडे पाहण्याची आपली मनोवृत्ती बदलण्याचा उत्पादक मार्ग म्हणून आपण असा विचार करावा की: “ही व्यक्ती आनंदी झाली, तर ती सदासर्वकारळ तक्रार करणं थांबवेल आणि मला इतका त्रास देणार नाही.” इतर लोकांनी आनंदी व्हावं आणि आनंदाची कारणं त्यांना लाभावी, अशी इच्छा ठेवणं ही बुद्ध धर्मातील प्रेमाची व्याख्या आहे. त्यामुळे ही अमुक व्यक्ती केवळ आपल्यापासून दूर जावी आणि आपल्याला तिने त्रास देऊ नये, एवढीच इच्छा करण्याऐवजी ती व्यक्ती आनंदी व्हावी, तिला त्रास होणारी जी काही गोष्ट असेल ती दूर जावी, अशी इच्छा विकसित केली, तर आपण कमी नाराज होऊ. साधना करताना अशा पद्धतीने मनोवृत्तीमधील बदलाचा सराव करणं किंवा उपासना करणं, यालाच “मन-प्रशिक्षण” असं म्हणतात.

अवाजवी लैंगिक आकर्षण कमी करणं

त्याचप्रमाणे आपण कोणाकडे खूपच आकर्षित झालो, तर आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करणाऱ्या तात्कालिक विरोधी शक्तींचा उपयोग आपण करावा. आत्मकेंद्री होऊन संबंधित व्यक्तीचा केवळ बाह्य देखाव्यासंदर्भात विचार करण्याऐवजी, त्या व्यक्तीला केवळ मी माझ्या सुखासाठी ग्रहण करायची वस्तू मानण्याऐवजी आपण त्या व्यक्तीचा आतला भाग- तिचं पोट, आतडी, मेंदू इत्यादी- कसं आहे याची कल्पना करू शकतो. तिच्या चेहऱ्याकडे पाहून तिच्या कवटीच्या रचनेची कल्पना करणं विशेष मदतीचं ठरू शकतं. आणि आपण करत असलेली कल्पना अर्थातच खरी असते, त्या व्यक्तीच्या त्वचेखाली खरोखर तेच असतं.

दुसरी परिणामकारक पद्धत म्हणजे त्या व्यक्तीची बालक म्हणून कल्पना करणं आणि मग अतिशय वृद्ध झाल्यावर ती व्यक्ती कशी दिसेल याची कल्पना करणं. अशा प्रकारे आपण आपली ओढ कमी करतो, विशेषतः लैंगिक आकर्षण असेल, तर ते केवळ बाह्य देखाव्याशी निगडीत आहे, आणि ते अर्थातच टिकणार नाहीये, हे समजून घेतो. किंवा त्या व्यक्तीला काही भयंकर त्वचारोग झाला, किंवा तिच्या शरीरावर बरीच पुरळ उठली, तरीही आपल्याला ती व्यक्ती आकर्षक वाटेल का? त्या व्यक्तीच्या आत वस्तुतः आतडी आणि सांगाडा आहे हे आपण अधिकाधिक समजून घेतल्यावर आपली मनोवृत्ती बदलते आणि आपली भावनिक नाराजी शमते. आपण अधिक स्थिर होतो.

मग त्या व्यक्तीबाबत काळजी घेणारी मनोवृत्ती विकसित करायच्या पद्धती आपण उपयोगात आणाव्यात. अमुक व्यक्तीबद्दल आपल्याला तीव्र लैंगिक आकर्षण वाटत असतं, तिच्याबद्दल उत्कट ओढ वाटत असते, तेव्हा आपण तिच्या केवळ शरीरावरच लक्ष केंद्रित केल्याचं आपल्या लक्षात येतं. ती व्यक्तीसुद्धा एक मानवच आहे आणि तिला आनंदी व्हायचंय, दुःखी व्हायचं नाहीये, आणि केवळ एक लैंगिक वस्तू म्हणून वागवलेलं तिला नको आहे, याकडे आपलं लक्ष जात नाही. या व्यक्तीच्या स्वतःच्या काही असुरक्षित भावना असतील, तिच्या स्वतःच्या काही भावनिक समस्या असतील, काही कौटुंबिक समस्या असतील- अशा प्रकारे त्या व्यक्तीकडे पाहणं म्हणजे तिच्याकडे केवळ लैंगिक वस्तू म्हणून पाहण्याच्या विरोधी शक्ती उपयोगात आणणं. आपण त्या व्यक्तीकडे वास्तव मानव म्हणून पाहतो आणि तिच्या आनंदाविषयी व कल्याणाविषयी प्रामाणिक आस्था विकसित करायला सुरुवात करतो.

भिकारी किंवा अपंग लोकांबद्दलचा तिटकारा किंवा अलिप्तता टाळणं

आपल्याला खरोखरच कुरूप किंवा तिटकाराजन्य वाटणारी कोणी व्यक्ती दिसते, तेव्हा तात्कालिक विरोधी शक्ती वापरणंही अतिशय परिणामकारक ठरू शकतं. आपल्याला भिकारी दिसतात आणि इथे मॅक्सिकोसारख्या अतिशय खालच्या स्थानावर असलेल्या देशांमध्ये अत्यंत गरीब लोक दिसतात किंवा इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये असे लोक अधिक वेळा दिसतात, तर त्यांना बघितल्यावर ही मनोवृत्ती आपल्याला जास्त मदतीची ठरते. अंध, कर्णबधीर किंवा पक्षाघात झालेल्या अपंग व्यक्तींबाबतही आपण तिचा वापर करू शकतो, त्यांच्या सोबत असताना आपल्याला अनेकदा अतिशय अवघडल्यासारखं व अस्वस्थ वाटतं, तेव्हा या मनोवृत्तीचा वापर करावा.

बर्लिनमध्ये एकदा अपंग व्यक्तींसंबंधीचं एक प्रदर्शन होतं. त्यातल्या एका विभागामध्ये पक्षाघात झालेल्या लोकांच्या व्हिडिओ मुलाखतींची मालिका होती. त्यांचे अवयव अनियंत्रितपणे आखडले होते, सगळं तोंड एका बाजूला गेलेलं होतं आणि त्यांची वाचा अस्पष्ट झाली होती. ते लोक त्यांच्या लैंगिक जीवनांबद्दल बोलत होते आणि त्यांनाही तशाच प्रकारच्या भावना असतात, त्याच प्रकारच्या लैंगिक गरजा असतात आणि इतरांप्रमाणेच त्यांनाही नातेसंबंधांची इच्छा असते, असं ते लोक बोलत होते. मग त्यांनी त्यांना लाभलेल्या प्रेमळ नातेसंबंधांच्या प्रकारांचं वर्णन केलं. शहरातील सर्व शालेय मुलामुलींनी या प्रशिक्षणाला जाणं अपेक्षित होतं. ही चांगली गोष्ट आहे असं मला वाटलं. अशा प्रदर्शनातून हे लोकही वास्तवातील लोकच आहे, आपल्यासारखेच आहेत, हे दाखवलं जातं. अशा व्यक्तींसोबत असताना आपल्या मनात येणारा आत्मकेंद्री तिटकारा किंवा अलिप्तता किंवा नुसती अस्वस्थता, यांवर मात करण्यासाठी हे अतिशय मदतीचं ठरतं.

दुसरी पद्धत म्हणजे, आपल्याला रस्त्यावर कोणी वृद्ध व्यक्ती भीक मागताना दिसली की आपण “माझी आई” तिथे असल्याची कल्पना करावी, ती बेघर होऊन भीक मागतेय अशी कल्पना करावी, किंवा “माझे वडील” तिथे असल्याची कल्पना करावी. किंवा घरातून पळालेला एखादा लहान मुलगा तुम्हाला रस्त्यात भीक मागताना दिसला, तर “माझा मुलगा” किंवा “माझी मुलगी” अशा परिस्थितीत असल्याचा विचार करावा. याने आपली मनोवृत्ती बदलते, आपण त्या व्यक्तीकडे कसे पाहतो तेही बदलतं आणि आपला भावनिक प्रतिसादही पूर्णतः बदलून जातो.

मी हे कधीही केलेलं नाही, हे मला कबूल करायला हवं. पण न्यूयॉर्कमधले एक पाश्चात्त्य झेन शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्यांना- स्वतःहून वाटत असेल तर- अजिबात पैसे न घेता किंवा क्रेडिट-डेबिट कार्डं किंवा तसं काहीच न घेता रस्त्यावर जायला सांगतात, आणि बेघर होऊन आठवडाभर भीक मागायचं काम विद्यार्थ्यांनी करायचं असतं. अशा परिस्थितीत असणं कसं वाटतं, याचा अनुभव यातून घेतला जातो.

अवघड परिस्थितीत असलेल्या इतरांविषयीच्या आपल्या अलिप्ततेवर मात करण्याची ही अतिशय ताकदवान “औषधं” आहेत. अशा प्रकारचे लोक आपल्याला दिसतात तेव्हा आपल्याला त्यांच्याकडे पाहायचंदेखील नसतं, असं किती वेळा घडतं याचा विचार मी करतो. अशा परिस्थितीत आपल्याला अस्वस्थ वाटतं. मग आपण त्या परिस्थितीत असल्याची कल्पना करावी. आपणही खटपट करतो आहोत, पण कोणाला आपल्याकडे पाहायचीही इच्छा नाही किंवा आपल्या अस्तित्त्वाची दखलही घ्यायची इच्छा नाही, किंवा आपण एखादा डास असल्याप्रमाणे ते आपल्याला हुसकावून लावत आहेत, अशी कल्पना करावी. तर, विरोधी शक्ती वापरायची ही एक पद्धत आहे, पण हे सर्व तात्कालिक आहे, त्याने समस्येचं मूळ दूर होत नाही.

सखोल परिणाम करणारी विरोधी शक्ती वापरणं

केवळ तात्कालिक औषध नसलेली, तर समस्येच्या मुळाशी जाऊन ती दूर करणारी विरोधी शक्ती वापरणं, ही मन-प्रशिक्षणाची दुसरी पद्धत आहे. परस्परांपासून भिन्न, गोंधळलेल्या मनोवस्थेच्या अगदी बरोब्बर विरोधी अशी मनोवस्था वापरण्याच्या संदर्भातला हा मुद्दा आहे. भावशून्यतेची समजूत वाढवण्याचा संदर्भही याला आहे. एखादी व्यक्ती किंवा परिस्थिती ज्या तऱ्हेने अस्तित्वात आहेत, ते वास्तवाशी अजिबातच जुळणारं नाही, हे समजून घअयायला हवं. निराळ्या शब्दांत सांगायचं तर, आपली ओढ किंवा संताप यांच्या आत असलेली भावना मुळात गोष्टी कशा अस्तित्त्वात आहे त्याबद्दलच्या गोंधळाची असते.

भावशून्यतेबद्दलच्या सखोल चर्चेची ही वेळ नव्हे, त्यामुळे आपण अतिशय प्राथमिक पातळीवरच बोलू. उदाहरणार्थ- समजा, तुम्ही वृद्धाश्रमात तुमच्या आजारी आजीआजोबांना किंवा वृद्ध आईवडिलांना भेटायला गेला आहात. हॉलमधून त्यांच्या खोलीतून जाताना तुम्हाला चाकाच्या खुर्चीवर बसलेली एखादी सुरकुतलेली नि वाकलेली म्हातारी स्त्री दिसली, ती तोंडातल्यातोंडात काहीतरी पुटपुटते आहे, तिच्या मांडीवरचा टॉवेल चावते आहे. असं कोणी आपल्याला दिसलं की आपण अतिशय अस्वस्थ होतो. ती व्यक्ती कायम तशीच राहिली असेल असा विचार आपण करतो. आणि आपण तिथून जात असताना ती तिचा हात पुढे करून आपला हात पकडण्याचा प्रयत्न करते किंवा आपल्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करते, याने आपण भडकतो. इथे आपण केवळ स्वतःचा विचार करत असतो.

हीसुद्धा एक मानव आहे, हे लक्षात ठेवण्याची तात्कालिक विरोधी शक्ती आपण इथे अर्थातच वापरू शकतो. या व्यक्तीचंही काही जीवन होतं, कुटुंब होतं, पेशा होता आणि तीही कधीतरी तरुण होती; ती कायम अशीच दिसत राहिलेली नाही. ती हात पुढे करते कारण तिला मानवी संपर्क हवा आहे. हे परिणामकारक असतं, पण आपण याहून खोलवर जाणारी पद्धतही वापरू शकतो. ती व्यक्ती कशी अस्तित्वात आहे, दिसतेय तशीच वृद्ध व खालावलेल्या स्थितीत अस्तित्वात आहे आणि ती याहून निराळी कधीच नव्हती, ही कल्पनाच मुळात अशक्यप्राय आहे, हे लक्षात घेणं, ही दुसरी पद्धत. कोणीच बहुधा असं- छायाचित्रातल्या गोठलेल्या काळासारखं अस्तित्वात असणं शक्य नाही. मग “अशी काही गोष्ट नाहीये, हे अशक्य आहे” यावर आपण लक्ष केंद्रित करतो. आपली गैरसमजूत थांबवण्याचा हा अधिक सक्षम मार्ग आहे, जेणेकरून आपण त्या व्यक्तीबाबत अधिक वास्तववादी व करुणामय मनोवृत्ती आत्मसात करू शकतो.

अंतःस्थ सखोल जागरूकता बाहेर काढण्यासाठी अस्वस्थकारक भावना शमवणं

आणखी एक पद्धत “महामुद्रा” या प्रगत साधनेमध्ये वापरली जाते. यामध्ये “अंतःस्थ सखोल जागरूकता पाहिली जाते, आणि अस्वस्थकारक भावना आपोआप स्वतःला त्यात ओतत असते.” आपलं मन ज्या प्राथमिक यंत्रणेद्वारे वास्तवाचं आकलन करून घेतं त्या यंत्रणेचा वापर ही पद्धती करते- सोप्या भाषेत सांगायचं तर, “आपलं मन कसं कार्यरत असतं” याचा वापर इथे केला जातो.

एक उदाहरण पाहू. कोणाबद्दल आपल्याला तीव्र आकर्षण व उत्कट अभिलाषा वाटत असेल, अशा वेळी आपण त्या भावनिक स्थितीमधील ताण शिथील केला, तर आतमध्ये “सखोल जागरूकतेचं व्यक्तीकरण” होत असल्याचं आपल्याला दिसतं. निराळ्या शब्दांत सांगायचं तर, आपण त्या माणसाला व्यक्ती रूप देतो. प्रत्यक्षात मनाच्या प्राथमिक रचनेबाबत हेच होत असतं. त्यानंतर आपण “ती व्यक्ती खरोखरच विशेष आहे” अशी प्रतिमा निर्माण करतो. काही गुणवैशिष्ट्यं आपण अवाजवी ताणतो आणि मग आपल्याला आकर्षण, उत्कट अभिलाषा किंवा अनुबंध यांचा अनुभव येतो.

ती वस्तू समोर नसते आणि आपल्याला ती हवीशी वाटते, त्याला उत्कट अभिलाषा म्हणतात. आणि ती वस्तू आपल्याकडे आहे पण ती आपल्याला दूर गेलेली नको असते, त्याला अनुबंध असं म्हणतात. हे दोन्ही पूर्णतः आत्मकेंद्री आहे. आपण अतिशयोक्तीची आणि या मनोवस्थेला पकडून ठेवण्यासाठी वापरली जाणारी ताठर ऊर्जा शिथील केली, तर मन त्या वस्तूबाबत जे काही करू पाहतं त्याची प्राथमिक रचना आपल्या समोर स्पष्ट होते. एवढंच.

हे खूपच प्रगत आहे, पण तुम्हाला खरोखरच वापरता येईल अशी ही अतिशय परिणामकारक पद्धत आहे, पण त्यासाठी भावनांसोबत वाहावत न जाण्याची प्रगल्भता असावी लागते. कोणत्याही अनुभवाला सामोरं जाताना आपल्या भावनिक मार्गामधील अंतःस्थ हालचाली समजून घेणं आणि शांत राहणं गरजेचं असतं. भावना आपोआप स्वतःला उत्सर्जित करतात, आपण त्यातील प्राथमिक बोधात्मक रचना पाहिली की त्यातून मनोवृत्ती बदलते.

नकारात्मक परिस्थिती सकारात्मकतेमध्ये बदलणं: आपण इतरांकडे कसं पाहतो

आपल्याला उपासनेसाठी प्रतिकूल असलेली परिस्थिती बदलून अनुकूल करणं, ही पुढची पद्धत आहे. पारंपरिक मन-प्रशिक्षणाच्या संहितांमध्ये हा पहिला धडा दिला जातो. विशेषतः लांग्री तांगपा यांच्या एट व्हर्सेस ऑफ माइन्ड ट्रेनिंग यांसारख्या संहितांमध्ये हे सांगितलेलं आहे. महान भारतीय गुरू शांतिदेव यांच्या बोधिचर्यावतार या संहितेमधील एका कडव्यात अशा प्रकारच्या दृष्टिकोनाचं सूचन केलेलं आहे. ते लिहितात-

(VI १०) दुरुस्ती शक्य असेल तर कोणत्याही गोष्टीवरून मनस्थिती का बिघडवून घ्यायची? आणि दुरुस्ती शक्य नसेल, तर त्या गोष्टीबद्दल मनस्थिती बिघडवून घेऊन तरी काय उपयोग?

एखादी परिस्थिती बदलण्यासाठी काही करणं आपल्याला शक्य असेल, तर त्याबद्दल नाराज का व्हायचं? ती परिस्थिती बदलायची. आणि त्याबद्दल काहीच करणं आपल्याला शक्य असेल, तरी त्याबद्दल नाराज का व्हायचं? नाराज होऊनही काही उपयोग होणार नाही. तर, आपल्याला अतिशय अडचणीची, अवघड वाटणारी परिस्थिती असेल- म्हणजे कोणी टीका करत असेल किंवा गोष्टी चुकीच्या घडत असतील आणि आपल्याला परिस्थिती बदलणं शक्य नसेल, तर त्याबद्दल नाराज का व्हायचं? केवळ आपली त्याकडे पाहण्याची मनोवृत्ती बदलायची.

विपरित परिस्थिती सकारात्मक परिस्थितीमध्ये बदलण्याच्या अनेक पद्धती आहेत. कोणी आपल्याला त्रास देत असेल तेव्हा त्यांच्याकडे निराळ्या पद्धतीने पाहणं, या मुद्द्याशी संबंधित असलेले मनोवृत्ती बदलण्याचे अनेक मार्ग आहेत. आणि या अवघड परिस्थितींमध्ये असताना आपण स्वतःकडे कसे पाहतो यांच्याशी संबंधित इतर काही मार्ग आहेत. इतरांविषयीच्या आपल्या मनोवृत्तीबाबतच्या मार्गांचा सुरुवातीला विचार करू.

त्रासदायक लोकांकडे इच्छापूर्ती करणाऱ्या मोत्याप्रमाणे पाहणं

त्रासदायक लोकांबद्दलची आपली मनोवृत्ती बदलण्याचा एक मार्ग म्हणून त्यांच्याकडे “इच्छापूर्ती करणाऱ्या मोत्याप्रमाणे” पाहावं. उदाहरणार्थ, आपण असा विचार करू शकतो की, “ही व्यक्ती मला आव्हान देते आहे; ती मला वृद्धिंगत होण्याची संधी देते आहे, मी किती विकसित झालोय याची चाचणी घेतेय. हे किती चांगलं आहे.” किंवा, “या व्यक्तीने मला भोजनासाठी बोलावलं आहे, आणि ती सतत तक्रार करत असते, त्यामुळे मला उदास व्हायला होतं, हेही किती चांगलं आहे! या व्यक्तीने निमंत्रित केल्यामुळे मला संयमाची व समजुतीची उपासना करण्याची संधी मिळेल.” तर, ही व्यक्ती खरोखरच इच्छापूर्ती करणाऱ्या मोत्याप्रमाणे आहे. “माझ्या शेजाऱ्याने त्यांचं बाळ माझ्याकडे सांभाळण्यासाठी दिलेलं आहे आणि संध्याकाळभर ते बाळ रडेल व ओरडेल हे मला माहिती आहे. हे किती छान आहे.”

शांतिदेव यांनी अतिशय सुंदरपणे म्हटलंय की,

(VI. १०७) माझ्या घरामध्ये खजिन्याप्रमाणे उपटलेल्या शत्रूमुळे मी अत्यानंदी व्हायला हवं, हा खजिना प्राप्त करण्यासाठी मला स्वतःचा घाम गाळावा लागलेला नाही, आणि तो बोधिसत्त्वचर्येमध्ये माझा सहायक होईल.

इतर सर्वांच्या लाभासाठी साक्षात्कार प्राप्त करू पाहणाऱ्या, त्यासाठी समर्पित करून घेतलेल्या व्यक्तीला, म्हणजेच बोधिसत्त्वाला सर्वाधिक आनंद कशाने होतो? कोणीतरी त्यांना काही मदतीची मागणी केली, की त्यांना सर्वाधिक आनंद होतो. कोणीही त्यांना मदतीसाठी आवाहन करत नसेल तर त्यांना दुःखी वाटतं, आपण निरुपयोगी आहोत असं वाटतं. माझं एक संकेतस्थळ आहे आणि मला बऱ्याच ई-मेल येतात. त्यात प्रश्न विचारलेले असतात, किंवा काही गोष्टी करायला सांगितलेलं असतं, या सगळ्या पत्रांच्या संख्येनेच त्रस्त होणं अगदी सोपं आहे. पण मी त्याचा आनंद घेण्याच्या दृष्टीने उपासना करतो. मला जितकी अधिक पत्रं येतील तितकी लोकांना मदत करण्याची मला अधिक संधी मिळणार आहे. “मी सर्वांना लाभदायक ठरो” अशी बौद्ध पद्धतीची प्रार्थना आपण करत असलो, आणि मग अधिकाधिक लोक आपल्याकडे येत असले व आपली मदत मागत असले, तर आपली प्रार्थनाच फळाला आलेली असते, नाही का?

शांतिदेवांनी लिहिल्याप्रमाणे:

(VII. ६४) लोक आनंदासाठी कृती करत असले, तरी ते आनंदी होतील की नाही हे स्पष्ट नसतं; पण ज्याच्या (बोधिसत्त्वाच्या) कृती वस्तुतः आनंददायी असतात, तो त्या कृती केल्याशिवाय आनंदी कसा होऊ शकेल?

आपल्या आजारी बाळासारख्या त्रासदायक लोकांसंबंधी

आपल्या आजारी बाळासारख्या आपल्याला त्रास देणाऱ्या व आपल्याला न आवडणाऱ्या व्यक्तीसंबंधीची मनोवृत्ती बदलणंही आवश्यक असतं. आपलं बाळ आजारी असेल, रडत असेल, तेव्हा त्यातून आपल्याला बराच त्रास होऊ शकतो. पण तरीही आपल्याला बाळाबद्दल प्रचंड प्रेम वाटतं, कारण ते आजारी आहे हे आपल्याला समजतं. त्यांना झोपवण्याची किंवा इतर कशाची गरज असेल, हे आपण समजून घेतो. “मला तू आवडत नाहीस आणि मला झोपायचं नाहीये”, असं आपलं अतिशय थकलेलं बाळ म्हणत असेल, तरी आपण ते गांभीऱ्याने घेत नाही, कारण ते आजारी असतं. अशाच प्रकारे आपल्याला ज्या व्यक्तीसोबत असायला आवडत नाही, तिच्याबाबतीतही आपली मनोवृत्ती बदलण्याची गरज असते. त्या व्यक्तीला त्रस्त कीटक मानण्याऐवजी आजारी बाळ मानणं आवश्यक असतं. अशा प्रकारे आपल्याला स्वतःविषयी नव्हे तर त्या व्यक्तीविषयी चिंता वाटू लागते.

आपल्या शिक्षकांसारख्या त्रासदायक लोकांसंबंधी

तिसरा मार्ग म्हणजे त्यांना आपले शिक्षक मानायचं. एक प्रसिद्ध कथा आहे- अतिश तिबेटला गेले तेव्हा त्यांनी सोबत एक भारतीय आचारी आणला होता. हा भारतीय आचारी कधीही सूचनांचं पालन करायचा नाही आणि सतत उलट उत्तरं द्यायचा. तिबेटी लोक अतिश यांना म्हणाले, “तुम्ही त्यांना भारतात परत का पाठवत नाही? आम्ही तुमच्यासाठी स्वयंपाक करू.” त्यावर अतिश म्हणाले, “नाही, नाही! तो माझा फक्त आचारी नाहीये; तो माझा संयम उपासनेमधला शिक्षक आहे.” तर, आपल्या जीवनामध्ये कोणी त्रासदायक नातेवाईक असेल, आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्याला त्याला सामोरं जावंच लागत असेल, तर या व्यक्तीला आपण संयमाच्या उपासनेतील आपला शिक्षक मानणं अत्यंत मदतीचं ठरू शकतं.

किंबहुना, लोक आपल्याला अनेक, अनेक गोष्टी शिकवू शकतात. उदाहरणार्थ, वाईट वागून ते आपल्याला तसं वागू नये हे शिकवतात. अगदी आपला कुत्राही आपला शिक्षक असू शकतो. तुम्ही दिवसाच्या वेळात कुत्र्याला बाहेर फिरायला घएऊन गेला, तर तो जमिनीवर कुठेही आडवा होतो व आराम करतो, आणि अगदी झोपीही जातो. पण आपण विचार करतो, “अरे, विशेष पलंग असायला हवा, त्यावर विशेष कापड असायला हवं, आणि ते मऊ असायला हवं” किंवा “ते कडक असायला हवं” किंवा असं किंवा तसं. कुत्रा अशी तक्रार करत नाही. कुत्रा कुठेही पहुडतो. ही मोठी शिकवण आहे. इतरांकडून आपल्याला त्रास होत असेल तेव्हा त्यांच्याकडे निराळ्या दृष्टीने पाहण्याचे हे मार्ग आहेत- त्यांच्याकडे इच्छापूर्ती करणारा मोती म्हणून पाहावं, किंवा आपलं आजारी बाळ म्हणून किंवा शिक्षक म्हणून पाहावं.

नकारात्मक परिस्थितीला सकारात्मकतेमध्ये बदलणं: आपण इतरांकडे कसं मानतो

इतरांना विजयी होऊ देणं

अशा परिस्थितीत आपण स्वतःविषयीची मनोवृत्ती कशी बदलावी आणि स्वतःकडे निराळ्या तऱ्हेने कसं पाहावं याच्याही काही पद्धती आहेत. “इतरांना विजयी होऊ द्यावं आणि स्वतः पराभव स्वीकारावा” ही पहिली पद्धत. निराळ्या शब्दांत सांगायचं तर, स्वतःला बहुमोल मानण्याच्या वृत्तीनुसार आपण असा विचार करतो की, “मी जिंकायलाच हवं; मला माझ्या मार्गाने पुढे जाताच यायला हवं आणि दुसऱ्या व्यक्तीने हात टेकायलाच हवेत,” याउलट आपण स्वतःचा पराभव स्वीकारला, तर युक्तिवादच संपुष्टात येतो. एक सोपं उदाहरण पाहू- तुम्ही तुमच्या मित्रासोबत किंवा जोडीदारासोबत आहात आणि तुम्हाला कोणत्या उपहारगृहात जायचं ते ठरवायचं आहे. अशा वेळी तुमच्या मित्राला एखाद्या विशिष्ट ठिकाणी जायचं असेल आणि तुम्ही दुसऱ्या कुठेतरी जायचा आग्रह धरलात, तर तुमचा एकमेकांशी युक्तिवाद सुरूच राहील. पण अखेरीस त्यातून काय फरक पडतो? तुम्ही सरळ सहमती दर्शवून, “बरं, तू म्हणतोयंस त्या रेस्टॉरन्टमधे जाऊ” असं म्हणालात तर युक्तिवाद संपून जातो. निराळ्या शब्दांत सांगायचं तर, स्वतःपेक्षा दुसऱ्या व्यक्तीला आपण जास्त बहुमोल मानलं तर युक्तिवाद संपून जातो आणि आपण दुसऱ्या व्यक्तीला विजयी होऊ देतो.

इथे आपण खरोखरच्या भयंकर परिस्थितींबद्दल बोलत नाहीयोत. इतर व्यक्ती काहीतरी अतिशय नकारात्मक व विध्वंसक सुचवत असेल, अशा परिस्थितीला हे लागू नाही. फारसा फरक पडत नसेल अशा परिस्थितीत इतरांना विजयी होऊ द्यावं. या डावपेचाबद्दलही आक्षेप अर्थातच असू शकतात, तुम्ही सतत दुसऱ्या व्यक्तीला विजयी होऊ देत असाल, तर ती व्यक्ती तुमचा फायदा उपटू शकते, त्यामुळे ही पद्धत कधी वापरायची याबद्दल संवेदनशील असावं लागतं. पण समस्या सोडवण्यासाठी ही सर्वोत्तम पद्धत ठरेल, अशा अनेक परिस्थिती असतात.

माझ्या स्वतःच्या अनुभवातून मी एक उदाहरण देतो. बर्लिनमध्ये उपहारगृहांनी गजबजलेल्या एका मुख्य चौकाजवळ मी राहतो. मी ज्या इमारतीत राहत होतो, तिथे तळ मजल्यावर एक अतिशय शांत भोजनालय होतं, पण मग तिथे नवीन उपहारगृह सुरू झालं- अतिशय लोकप्रिय झालेलं ते स्पॅनिश उपहारगृह होतं. आठवड्याचे सातही दिवस सकाळी सात ते सकाळी तीन वाजेपर्यंत हे उपहारगृह उघडं असतं. हवामान उबदार असेल तेव्हा आमच्या इमारतीच्या दोन्ही बाजूंनी बाहेर टेबलं लावलेली असतात. लोक सकाळी तीन वाजेपर्यंत तिथे बाहेर बसून बीअर किंवा वाइट पीत असतात, आणि मोठमोठ्या बोलतात व हसत असतात. हे उपहारगृह सुरू झालं तेव्हा इमारतीखालची टेबलं माझ्या बेडरूमच्या खिडक्यांच्या अगदी लगेच खाली होती. मी रात्री तिथे आडवा व्हायचो, पण गोंगाटामुळे मला झोप यायची नाही. त्रस्त आणि हताश होऊन मी स्वतःचाच विचार करायचो आणि त्या लोकांचा वेळ मजेत जातोय त्याबद्दल विचार करायचो. माझ्या मनात अनेक प्रकारच्या कल्पना यायच्या. मी एखाद्या मध्ययुगीन किल्ल्यात आहे अशी कल्पना करायचो, त्या कल्पनेत माझ्याकडे उकळत्या डांबराचं मोठं पिंप असायचं आणि ते डांबर मी खाली लोकांवर ओतायचो. पण मला कायम हाका मारून किरकीर करणारा म्हातारा व्हायचं नव्हतं. “लोकांना शांत बसायला सांगा, नाहीतर मी पोलिसांना बोलावेन!” असं बोलायचं नव्हतं. याचा काही उपयोग नव्हता.

त्यामुळे मी त्या समस्येवरचा उपाय म्हणून इतरांना विजयी होऊ दिलं आणि स्वतः पराभव स्वीकारला. त्यांनी उन्हाळ्यातल्या संध्याकाळी मजा करणं, हे मी माझ्या बेडरूममध्ये झोपण्याहून अधिक महत्त्वाचं होतं. माझ्या घराची रस्त्याला लागून नसलेली एकमेवर खोली म्हणजे माझं स्वयंपाकघर. माझ्या घरातलं स्वयंपाकघर खूप मोठं आहे, तिथे उंचावलेला ओटा आहे. तिथे आसपास बरीच मोकळी जागाही आहे. त्यामुळे उबदार हवामान असेल त्या काळात मी तिथे झोपतो. दिवसाच्या वेळी मी माझी चटई गुंडाळून स्वयंपाकघराच्या भिंतीला लावून ठेवतो आणि रात्री जमिनीवर अंथरतो व झोपतो. स्वयंपाकघरात पूर्ण शांतता असते, किंबहुना घरातली ती सर्वांत थंड खोली असते.

स्वयंपाकघरात झोपताना मला अतिशय आनंद होतो. मी त्यांना विजयी होऊ दिलं, आणि ते कितीही मोठ्याने बोलले तरी मला फरक पडत नाही, कारण मी त्यांचं ऐकत नाही. नववर्ष जवळ येतं त्या दरम्यानच्या दिवसांमध्येही याचा खूप उपयोग होतो, कारण जर्मनांना फटाके खूप आवडतात. त्या वेळी रस्त्यावर प्रचंड गोंगाट असतो. पण इथेही मी माझी मनोवृत्ती बदलतो आणि त्यांना मी विजयी होऊ दिलं आहे, त्यामुळे मी स्वयंपाकघरात झोपतो, त्याने मला काही अडचण होत नाही.

माझ्याबाबतीत घडणाऱ्या नकारात्मक गोष्टी माझं नकारात्मक कर्म वजा करत असतात

आपल्याबाबत घडणाऱ्या नकारात्मक गोष्टी “आपलं नकारात्मक कर्म वजा करत असतात”, असं पाहणं ही दुसरी पद्धत झाली. याचा अर्थ घडणाऱ्या गोष्टी आपण शिक्षा म्हणून स्वीकाराव्यात असं नव्हे, पण या अवघड गोष्टी घडल्यामुळे आपल्यालामधील काही नकारात्मक कर्म थोड्याफार प्रमाणात वजा होत असेल, आणि तसं झाल्यामुळे भविष्यातील अधिक भयंकर गोष्ट घडणं टळत असेल, असा विचार आपण करतो. याचं एक सोपं उदाहरण असं: तुम्ही वाहतूककोंडीमध्ये अडकला आहात आणि दीर्घ काळ तुम्हाला हलताच येत नाहीये. अशा वेळी आपण विचार करावा की, “भारी! यामुळे माझं पक्षाघात होण्याचं कर्म वजा होतं आहे, भविष्यात मला पक्षाघाताचा झटका आला तर मला अजिबातच हलता येणार नाही.” अशा प्रकारे आपण नकारात्मक गोष्टी घडल्याचा आनंद मानतो, कारण अशा मुळे आपलं भविष्य अधिक चांगलं होण्याचा मार्ग मोकळा होतो. 

पारंपरिक बौद्ध हानिकारक आत्म्यांवर विश्वास ठेवतात. आपण त्यांचंही अस्तित्त्व मान्य केलं, तर मग आपल्याला मनोवृत्तीचा हा बदल आणखी एक टप्पा पुढे नेता येतो. मग आपण हानिकारक आत्म्यांना विचारू शकतो की, “मला आणखी हानी पोचवा. आणखी करा.” असा एक अतिशय चांगला अनुभव मला अलीकडेच आला. जुलैच्या मध्यात हे सुरू झालं आणि सुमारे दोन महिने सगळं बिघडतच होतं. सगळं तुटत होतं. माझ्या पाठीला कसला तरी विचित्र संसर्ग झाला आणि मला सुमारे दोन महिने व्यायामशाळेत जाता आलं नाही, कारण शेवटी संसर्ग साफ केल्यानंतर तिथे वाढ झालेला भाग काढून टाकावा लागला. मग माझ्या संगणकावर एक भयंकर व्हायरस आला. त्याने माझी हार्ड-डिस्कही खराब करून टाकली, त्यामुळे महिनाभर मला माझा नेहमीचा संगणक वापरता आला नाही. मग माझा प्रिंटर मोडला; माझ्याकडे दोन व्हिडिओ-प्लेअर होते, ते दोन्ही तुटले. मी ज्योतिषशास्त्राचा खूप मोठा चाहता आहे- तर मी लोकांकडून जमवलेला कुंडल्यांविषयीचा सर्व डेटा अस्पष्ट कारणांमुळे पुसला गेला. ती माहिती परत मिळवण्याची कोणतीही शक्यता नव्हती. मग माझ्या नेहमीच्या वापरातला आवडता कपही तुटला, आणि या दरम्यान, परम पूजनीय दलाई लामांच्या शिकवणुकीसाठी मी फ्रान्सला जात होतो तेव्हा विमानतळावर माझं सामान हरवलं.

ही शेवटची घटना होती. माझं सामान हरवल्यानंतर मी नुसता हसलो; हे खरोखरच पूर्णतः हास्यास्पद होतं. मग मी विचार केला, “हानिकारक आत्म्यांनो, आणखी गोष्टी घ्या! आणखी काय झालं की हे सगळं बिघडेल असं तुम्हाला वाटतंय?” असा विचार केल्यावर मला बरं वाटू लागलं. हस्तक्षेपांना बाजूला सारण्यासाठी भावनिक भिंती उभारण्याऐवजी मी हस्तक्षेप मोकळेपणाने स्वीकारले, एवढंच नव्हे तर त्यांचं स्वागत केलं.

काही वर्षांपूर्वी माझ्या जबड्याच्या हाडाजवळ, एका दाताखाली संसर्ग झाला होता, तिथेच पूर्वी मी रूट-कॅनाल करून घेतलं होतं. आता जबड्याच्या हाडाचा थोडा भाग कापण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागणार होती. फ्रान्सचा प्रवास करून आल्यावर लगेचच मी दंतवैद्याकडे गेलो आणि त्यांनी मला आनंदाची बातमी दिली की, आधीचा संसर्ग जखमेच्या तंतूंमध्ये परत आला आहे, त्यामुळे आणखी हाड कापण्यासाठी मला दुसरी शस्त्रक्रिया करून घ्यावी लागली. ही बातमी सकारात्मकतेमध्ये रूपांतरित करणं मला शक्य झालं, कारण “भारी! माझ्या संकेतस्थळावर आणखी एका भाषेचा विभाग सुरू करण्यामधील अडथळे या वेदनांमुळे वजा होत आहेत,” अशा मनोवृत्तीने मी विचार केला.

बौद्ध शिकवणुकींनुसार, तुम्ही काही साध्य करण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्हाला ते करण्यापासून रोखणारे जितके अधिक अडथळे असतील तितकं सकारात्मक मानावं. त्यामुळे या सर्व घटना म्हणजे भविष्यातील अडथळे वजा करणाऱ्या विलक्षण घटना आहेत, असं मी मानलं. हानिकारक आत्म्यांना मी म्हटलं, “आणखी अडथळे आणा; माझ्यावर अडथळ्यांचा मारा करा!” सगळं मोडत होतं आणि वाईट गोष्टी घडत होत्या, त्या संपूर्ण काळात अशी मनोवृत्ती ठेवताना मी अजिबात दुःखी नव्हतो. मनाचं प्रशिक्षण करताना तुम्ही खरोखरच ही पद्धत वापरलीत, तर त्याचा चांगला परिणाम होतो. परिस्थिती खूप अवघड, भयंकर व निराशाजनक आहे असं मानण्याऐवजी आपली मनोवृत्ती बदलावी आणि परिस्थिती विलक्षण आहे, असं मानावं.

इतरांना आनंद द्यावा आणि त्यांचं दुःख आपण घ्यावं (तोंग्लेन)

मला उल्लेख करायची असलेली शेवटची पद्धत बहुधा सर्वाधिक प्रगत आणि सर्वाधिक अवघड असावी. ही तोंग्लेनची- देवाणघेवाणीची- उपासना आहे. आपल्याला काही अवघड परिस्थिती अनुभवावी लागत असेल, उदाहरणार्थ- दात दुखत असेल, तेव्हा असा विचार करावा की, “प्रत्येकाची दातदुखी थांबू दे आणि माझी वाढत जाऊ दे. इतरांची दातदुखी मी स्वतःवर घेईन, त्यामुळे इतर कोणालाही पुन्हा कधीच दातदुखी होऊ नये.” आपलं मन व काळीज इतरांसाठी खुलं करून आणि त्यांचं दुःख स्वेच्छेने स्वीकारून आपण “बिचारा मी” असा विचार करण्यामधील ताठरता, भीती व दुःख यांवर मात करतो. तोंग्लेनद्वारे आपण याच्याही पुढे जाऊन असा विचार करतो की, “माझी सगळी वेदना व दुःख मी संपवून टाकेन, आणि मग माझ्या मनातील मूलभूत आनंद सर्वांना देईन.”

इथे आपल्याकडून हुतात्मा होण्याचा पवित्रा घेतला जाऊ नये याची अतिशय काळजी घ्यायला हवी. “मी तुझ्यासाठी दुःख सहन करेन” असा विचार केला तर त्याने आपलाच अहंकार वृद्धिंगत होतो. या पद्धतीचा मला खूप चांगला वापर करता येत नाही, हे मला कबूल करायलाच हवं. ही पद्धत प्रामाणिकपणे वापरण्यासाठी आपल्यामध्ये प्रचंड धाडस हवं, पण अलीकडे मी यासंबंधीचा प्रयत्न केला होता.

मला माझ्या जबड्याची शस्त्रक्रिया दोनदा करून घ्यावी लागली, याचा उल्लेख मी केला आहेच, आणि पूर्ण शस्त्रक्रिया होईपर्यंत मला जागं राहावं लागलं. हे खूपच आनंददायी होतं! ते तोंडाच्या एका बाजूच्या हिरड्यांना कापतात, त्याची साल काढतात आणि इलेक्ट्रिक करवतीसारखं काहीतरी घेऊन जबड्याचं हाड व दाताच्या तळातला एक तुकडा कापून टाकतात, शिवाय त्याभोवतीचं थोडं मांसही काढून टाकतात. हे सगळं ज्या प्रकारे केलं जातं ते अगदी मध्ययुगीन काळातलं वाटतं. मी हे पहिल्यांदा करवून घेतलं, तेव्हा त्यांची कृती मला खूपच रोचक वाटली होती. तेव्हा फारशा वेदनाही झाल्या नव्हत्या, कारण भूल चांगल्या प्रकारे दिलेली होती. पण मध्ये मला पुन्हा भूल घ्यावी लागली. दुसऱ्या शस्त्रक्रियेवेळी संसर्ग जास्त मोठा होता, आणि नोव्होकेन हे भूल देण्यासाठी वापरलं जाणारं औषध संसर्गावर परिणामकारक ठरत नाही, त्यामुळे खूप वेदना झाल्या.

महामुद्रेमध्ये वापरली जाणारी पद्धत वापरण्याचा प्रयत्न मीही केला- ही केवळ एक संवेदना आहे, त्यात फार काही मोठं नाही, असा विचार करायचा प्रयत्न केला. आपण हाताला गुदगुल्या केल्या किंवा चिमटा काढला किंवा ओरखडा काढला किंवा कापलं, तरी ती केवळ एक शारीरिक संवेदना असते, त्याहून अधिक काही नाही, त्यामुळे त्याला अवाजवी महत्त्व देऊ नये. असा विचार केल्याचा काही प्रमाणात सकारात्मक परिणाम झाला, पण मग मला तोंग्लेन आठवलं. तिबेटमध्ये मोठ्या प्रमाणात छळ व अत्याचार सुरू होते, तो हा काळ होता. तिथल्या लोकांना अनुभवाव्या लागणाऱ्या टोकाच्या वेदनेचा विचार करायला मी सुरुवात केली आणि त्याची तुलना माझ्या तेव्हाच्या अनुभवाशी केली- मग माझी वेदना अगदीच क्षुल्लक ठरली. दोनच मिनिटं ही वेदना होणार होती आणि मग ती संपणार होती.

त्यामुळे “बिचारा मी, मला खूप त्रास होतोय” असा विचार करण्याऐवजी मी माझी मनोवृत्ती विस्तारली आणि तिबेटमधल्या सर्व लोकांचा विचार केला, “त्यांना सहन करावं लागणारं दुःख माझ्या या छोट्या दुःखापेक्षा कितीतरी जास्त आहे”, अशा विचारामुळे माझ्या दुःखाला पूर्णतः निराळं परिप्रेक्ष्य मिळालं. मग मी विचार केला, “त्यांचं सर्व दुःख व वेदना माझ्या जबड्यातील दुःखामध्ये सामावलं जाऊ दे, आणि या कालावधीमध्ये शांत व आनंदी राहून मला त्यांना मनःशांती देता येऊ दे.”

मी अर्थातच १०० टक्के योग्य रितीने हे करू शकलो नाही, पण ती परिस्थिती हाताळताना मला याचा खूपच उपयोग झाला. हे योग्यरित्या केलं, तर आपल्याला खरोखरच इतरांची वेदना जाणवून घ्यावंसं वाटतं आणि त्यातून आपली वेदना वाढावी असं वाटतं. हे प्रामाणिकपणे करण्यासाठी खूपच प्रगत मनोवृत्ती लागते. हे शब्दांत बोलता येतं, पण त्याचा अर्थ काही लागत नाही. असं खरोखरच घडणं ही बरीच वेगळी गोष्ट आहे. पण त्यांचं दुःख शोषून घेण्याची भावना आणि त्यांच्या दुःखाच्या तुलनेत आपल्या दुःखाकडे पाहणं- किमान या पातळीवर तरी हे शक्य असतं. 

हे खरोखरचं तोंग्लेन आहे असं मात्र मानू नये. खरोखरची ती मनोवृत्ती खूपच जहाल असते, कारण ही मनोवस्था विकसित करत असताना, तिचा वापर करत असताना आपण वेदनेशी लढण्याऐवजी स्वेच्छेने तिचा स्वीकार करतो, आणि आत्मविश्वासाने तिला सामोरे जाऊ शकतो. प्रत्येकाच्या दुःखाच्या संदर्भात, व्यापक पातळीवर हे आपण करत असू, तर आपली स्वतःची वेदना स्वीकारून तिला सामोरं जाण्याचा व तिच्याशी लढण्याचा आत्मविश्वास अर्थातच आपल्याकडे असतो. अशा वेळी स्वतःच्या वेदनेने आपण त्रस्त होत नाही. तर, ही जादुई पद्धत नाही. यामध्ये काय घडतंय याचं विश्लेषण केलं, तर ती अतिशय अर्थपूर्ण ठरते.

सारांश

तर, मनाच्या प्रशिक्षणामध्ये, लोजोंगमध्ये, वापरल्या जाणाऱ्या या काही पद्धती आहेत. स्वतःला बहुमोल मानण्यावर मात करून इतरांबद्दल प्राथमिक चिंता वाटण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. आपल्या प्रेरणेची पातळी कितीही असली, तरी मनोवृत्तीमध्ये असा बदल करणं अतिशय मदतीचं ठरतं. या प्रक्रियेतून आत्मपरिवर्तन होतं आणि “कितीही विपरित, अवघड परिस्थिती येऊ दे, मी स्वतःचा ‘बिचारा’ असा विचार करणार नाही आणि त्या परिस्थितीने स्वतःची हानी करून घेणार नाही. त्या परिस्थितीमुळे स्वतःला निराश होऊ देणार नाही” असा विचार करण्याची व तसं प्रामाणिकपणे जाणवण्याची क्षमता आपल्याला प्राप्त होते. उलट, “काहीही घडलं, तरी मी त्यात बदल घडवू शकतो. इतरांविषयी मला अधिक चिंता वाटावी यासाठी मी त्या परिस्थितीचा वापर करून घेईन. त्याने मला अडथळा होणआर नाही,” अशा पद्धतीची मनोवृत्ती आपल्याला प्राप्त होते. अशा मनोवृत्तीमुळे जीवनामध्ये आपल्यात प्रचंड धाडस येतं.

Top