स्वत्वाचं इतरांसोबत समकरण आणि विनिमय

त्सेनझाब सरकॉंग रिंपोछे यांनी निधनाच्या दोन महिने आधी पुढील शिकवण डॉ. बर्झिन यांना सांगितली आणि काटेकोरपणे लिहवून घेतली. ही आपली सर्वांत महत्त्वाची शिकवण म्हणून जतन करावी, असंही त्यांनी सांगितलं. आपली स्वप्रेमाची प्रवृत्ती हा आपल्या दुःखांचा व समस्यांचा सर्वांत मोठा स्रोत असतो, त्यावर मात करण्यासाठीच्या साधनेचं तपशीलवार स्पष्टीकरण या शिकवणीत दिलं आहे. शिवाय, स्वप्रेमाची प्रवृत्ती सोडून त्याऐवजी इतरांवर प्रामाणिकपणे प्रेम करण्याची- सर्व आनंदाचा स्रोत असलेली- प्रवृत्ती विकसित कशी करावी, हेही इथे सांगितलं आहे.

बोधिचित्त- पूर्णतः इतरांना समर्पित मन- कसं साधायचं आणि इतरांना शक्य तितकं लाभदायक ठरण्यासाठी साक्षात्कार कसा साधावा, हे सांगणाऱ्या दोन परंपरा आहेत. सात भागांमधील कार्यकारणभावात्मक परंपरा आणि स्वतःबद्दलच्या व इतरांबद्दलच्या आपल्या प्रवृत्तीचं समकरण करणारी व विनिमय करणारी परंपरा, अशा या दोन परंपरा आहेत. पूर्वप्राथमिक भाग म्हणून आधीच समतोलवृत्ती साध्य करण्याचे वेगवेगळे किंवा भिन्न मार्ग या दोन्ही परंपरांमध्ये आहेत. दोन्हींमध्ये समतोलवृत्तीच साध्य होत असली, तरी ज्या प्रकारची समतोलवृत्ती साध्य होते ती वेगवेगळी असते.

  1. सात भागांच्या कार्यकारणभावात्मक साधनेमध्ये प्रत्येक जण आपली माता राहिल्याचं ओळखण्यापूर्वी समतोलवृत्ती साधायची असेल, तर एखादा मित्र, एखादा शत्रू व एखादी अपरिचित व्यक्ती डोळ्यांसमोर आणावी लागते. जवळीक व तिरस्कार या भावना थांबवणारी ही समतोलवृत्ती असते. किंबहुना, ‘मित्र, शत्रू व अपरिचित व्यक्ती यांच्याबद्दल जवळीक किंवा तिरस्कार वाटणं थांबवणारी निव्वळ समतोलवृत्ती’ असंच याचं एक संबोधन आहे. इथल्या निव्वळ या शब्दामधून असं सूचित केलं आहे की, हाच परिणाम साधणारी दुसरीही एक पद्धत अस्तित्वात आहे.

    ‘श्रावक व प्रत्येकबुद्ध यांच्यात सामायिक समतोलवृत्ती साध्य करण्याचा मार्ग म्हणजे निव्वळ समतोलवृत्ती’ असं पहिल्या प्रकारच्या समतोलवृत्तीचं आणखी एक संबोधन आहे. श्रावक (श्रोते) व प्रत्येकबुद्ध (स्व-उत्क्रांतिकर्ते) हे बुद्धाच्या शिकवणुकीतील हिनयानाचे (निम्न वाहन) दोन प्रकारचे उपयोजनकर्ते आहेत. इथे निव्वळचा गर्भितार्थ असा आहे की, अशा प्रकारच्या समतोलवृत्तीमध्ये आपल्याला समर्पित बोधिचित्त प्राप्त होत नाही आणि आपण त्यात सहभागी होत नाही.
  1. स्वत्व आणि इतरांबाबतच्या आपल्या प्रृवत्तींचं समकरण व विनिमय यांची पूर्वप्राथमिक स्थिती म्हणून आपण जी समतोलवृत्ती साधतो ती निव्वळ वरील प्रकारची समतोलवृत्ती नसते. सर्व मर्यादित जीवांचा लाभ करून देताना, त्यांना मदत करताना आणि त्यांच्या समस्यांचं उच्चाटन करताना आपण जे काही विचार अथवा कृती करतो त्यात जवळकीची अथवा दूरस्थपणाची भावना नसणं म्हणजे ही समतोलवृत्ती होय. समतोलवृत्ती साध्य करण्याचा हा विशेष प्रतिष्ठित, असाधारण असा महायान (मोठं वाहन) मार्ग आहे.
Top