बुद्धाचे मानसदर्शन

अनेक ध्यानधारणांच्या अभ्यासामध्ये मानसदर्शन केले जाते. या ठिकाणी दर्शन या शब्दाचा उपयोग कदाचित संभ्रमित करणारा ठरू शकतो कारण आपण पाहण्यासाठी आपल्या डोळ्यांचा वापर करीत नाही. आपण आपल्या कल्पनेचा उपयोग करून पाहत असतो. त्यामुळे त्याचा संबंध हा केवळ दृष्टीशी नाही, तर आपण ध्वनी, गंध, स्वाद आणि भौतिक संवेदनांचीही कल्पना करतो. जेव्हा आपण विविध भौतिक पदार्थांचा मुलामा देतो तेव्हा आपण त्यातून प्राप्त होणाऱ्या संवेदनांच्या आनंदाचीही कल्पना करू लागतो. मात्र, आपण केवळ समोर दिसणाऱ्या दोन वस्तुनिष्ठ चित्रांची कल्पना करीत नाही. आपण फक्त एखादे चित्र, एखादे रेखाचित्र, एखादी प्रतिमा यांची कल्पना करीत नाही, तर आपण सजीव त्रिमितीय प्रकाशयुक्त आकृत्यांची कल्पना करतो. 

बुद्धावर ध्यान केंद्रित करणे 

महायान परंपरेमध्ये एकाग्रताविषयक ध्यानधारणा करीत असताना अनेक गुरू श्वासावर ध्यान केंद्रित करण्याचा सल्ला देत असतात. ते केवळ एवढ्याचसाठी की तो सर्वांत सोपा मार्ग आहे. परंतु या परंपरेमध्ये एका छोट्या बुद्धाच्या मानसदर्शनाच्या माध्यमातून एकाग्रता प्राप्त करण्याचा प्रयास करणे ही साधना सर्वाधिक केली जाते. जेव्हा आपण एखाद्या सफरचंदाकडेसुद्धा एकटक पाहून स्वत:ला एकाग्र करू शकतो. परंतु एखाद्या सफरचंदाला बघून आपला स्वत:चा काय लाभ होणार आहे? जर आपण बुद्धावर ध्यान केंद्रित केले तर एकाग्रता तर साध्य होतेच परंतु त्याचबरोबर आपण बुद्धाच्या इतर गुणांचाही अंगीकार करण्याबाबत सचेत होऊन जातो आणि बुद्धाने ज्या दिशेने जाण्याविषयी सूचित केले आहे त्या दिशेने जाण्यासाठी आपण आपल्या जीवनाला दिशा देऊ शकतो. त्याद्वारेच आपण बोधिचित्त विकसित करून स्वत: बुद्धत्व प्राप्त करू शकतो. 

या शिवाय, प्राचीन भारतातील आचार्य असंग यांनी सांगितले होते की, संपूर्ण एकाग्रतेला कोणत्याही इंद्रिय ज्ञानाने नाही तर मानसिक सचेतनेद्वारेच प्राप्त केले जाऊ शकते. याचे कारण आपण एकाग्रतेचा उपयोग प्रेमभाव,  करूणा,  शून्यतेचा बोध आदींच्या विकासासाठी करीत असतो. आपण ज्या चित्तावस्थेचा विकास करू पाहत असतो त्यात एकाग्रता प्राप्त करण्यासाठी बुद्धाचे मानसदर्शन करणे हे एक साधन आहे. त्याच्या मदतीने आपण आपल्या मानसिक बोधाचा अभ्यास करू शकतो. त्यामुळेच संपूर्ण एकाग्रता प्राप्त करण्यासाठी तिबेटियन गेलुग परंपरेमध्ये बुद्धाचे मानसदर्शन करण्यावर अधिक भर दिला जात असल्याचे विशेषत्वाने दिसून येते. 

तिबेटच्या शाक्य, न्यिंग्मा, काग्यू परंपरेत मात्र सर्वसाधारणपणे श्वासावर ध्यान केंद्रित करण्यास अथवा बुद्धाचे एखादे चित्र वा प्रतिमेला पाहत दृष्टी एकाग्र करण्याचा सल्ला दिला जातो. मग त्या विषयी काय? असंग यांनी जो सल्ला दिला आहे त्याचे खंडन करणारा हा सल्ला आहे का? नाही. कारण त्यासाठी चित्त आपले लक्ष्य कसे जाणतो याविषयीची त्यांची व्याख्या समजून घ्यावी लागते. हे तीनही संप्रदाय सांगतात की, दृष्टी बोध हा केवळ रंगीत आकृत्यांच्या संदर्भात सचेत होत असतो आणि एका वेळी केवळ एका क्षणासाठीच सचेत होत असतो. याच पद्धतीने श्रवणबोध देखील केवळ ध्वनीच्या संदर्भात फक्त एकाच वेळी एकाच क्षणापुरता सचेत होत असतो. त्यानंतर त्याच्याशी वैचारिक बोध जोडला जातो आणि मग आपण एखाद्या ‘सामान्य वस्तू’चे नाव देऊ शकतो असे स्वरूप त्याला प्राप्त होते. 

उदाहरणासाठी सांगायचे झाले तर, सफरचंद म्हणजे केवळ लाल रंगाची गोल आकृती नाही. एखादी विशिष्ट चव किंवा एखादा विशिष्ट गंध यापुरतेही ते मर्यादित असू शकत नाही. ते केवळ हातात घेतल्याने कोणती विशिष्ट अनुभूती किंवा दातांनी चावल्यानंतर होणारी विशिष्ट ध्वनीसुद्धा नाही. त्याचे अस्तित्व हे केवळ एक क्षण किंवा त्यापुढील क्षणापुरतेसुद्धा नाही. ही त्या सगळ्यापेक्षा संपूर्णत: वेगळी वस्तू आहे. कालांतरामध्ये सातत्य असते. अंतिमत: ते सफरचंद सडून जाईल आणि नष्ट होईल. परंतु एखादे साधे सफरचंदसुद्धा काही दिवस निश्चितपणे टिकून राहते. जेव्हा आपण सफरचंद पाहत असतो तेव्हा वस्तुत: आपण एखादी मानसिक रचना पाहत असतो. 

बोध ग्रहण प्रक्रियेच्या या व्याख्येच्या दृष्टिकोनातून विचार करायचा झाल्यास, आपण एखाद्या सफरचंदावर किंवा श्वासावर जेव्हा लक्ष केंद्रित करीत असतो तेव्हा ती एक मानसिक वस्तू असते आणि मानसिक वस्तुंवरील ध्यान हे मानसिक सचेतनेसह केले जात असते. वैचारिक दृष्टीने आपण रंगीत आकृत्या, गंध आणि नंतर येणाऱ्या क्षणांना एकत्र ठेवून एखाद्या वस्तुचे रूप देत असतो. त्याला आपल्या सामान्य बुद्धीने आपण सफरचंद किंवा अन्य जी कुठली वस्तू असेल तिचे नाव देतो. अशाप्रकारे असंग यांनी सांगितलेल्या गोष्टीचा हे संप्रदायसुद्धा आदर करतात. आपल्याला एकाग्रतेचा विकास करण्यासाठी मानसिक सचेतना आवश्यक असते. 

प्रत्यक्ष अभ्यास 

जर आपण एकाग्रता साध्य करण्यासाठी समोर एखादी बुद्धाची मूर्ती ठेवून अभ्यास करणार असू तर ती आकृती आपल्या अंगठ्याच्या आकारापेक्षा मोठी असता कामा नये. ती आपल्यापासून एक हाताच्या अंतरावर असणे गरजेचे आहे. आपले डोळे खालच्या बाजूला पाहत असतात. ते त्या आकृतीला पाहत नसतात. कारण एकाग्रता आपल्या डोळ्यांच्या माध्यमातून विकसित होत नसते. आपण खालच्या दिशेने पाहत असतो आणि बुद्धाची आकृती आपल्या डोक्याच्या बरोबरीने थोड्या उंचीवर असते. 

हे वाटते तेवढे अवघडसुद्धा नाही. खाली जमिनीवर पाहावे आणि त्यानंतर आपल्या अंगठ्याला वर डोक्याच्या उंचीपर्यंत वर नेत जावे. आपला अंगठा तिथे असल्यासारखे आपल्याला जाणवू लागते. आपण त्याकडे न पाहताही अंगठ्यावर लक्ष केंद्रित करू शकतो. ठिक आहे? यानंतर आपण आपला हात खाली आणला तरीही जिथे आपला अंगठा होता त्या बिंदूवर आपण ध्यान केंद्रित करू शकतो. हे सोपे आहे. 

अनेक थेरवादी बौद्ध अभ्यासकांमध्ये डोळे बंद करून ध्यान करण्याविषयी आग्रह धरला जातो. परंतु महायान ग्रंथांमध्ये डोळे उघडे ठेवण्याचा सल्ला दिलेला आहे. काही विशेष साधना अशा आहेत जिथे डोळे बंद ठेवायचे की उघडे ठेवायचे हे सांगितलेले आहे. परंतु सर्वसाधारणपणे महायानमध्ये डोळे उघडेच ठेवले जातात. डोळे बंद केले जात नाहीत. आपल्याला डोळे पूर्णपणे उघडे ठेवायचे नसतात कारण डोळे उघडे राहिल्यास ध्यान भंग होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे आपण खालच्या बाजूला, आपल्या नाकाच्या टोकाकडे दृष्टी एकाग्र करतो. याचा अर्थ असा नाही की आपण प्रयत्न करताना तिरळे होऊन जावे. उलट आपण नाकाच्या टोकाकडे पाहत असताना दृष्टीला हलकेपणाने केंद्रित करीत असतो. फार जोर लावून लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता नसते. जमिनीवर पडलेली कॉन्टॅक्ट लेन्स शोधायला जावे इतक्या बारकाईने पाहण्याची गरज नाही. 

डोळे बंद ठेवून ध्यानसाधना  करण्याचे काही तोटेही आहेत. जर आपल्याला स्वत:ला शांत करण्यासाठी आणि प्रेम व करुणा विकसित करण्यासाठी आपले डोळे बंद करण्याची सवय लागली तर दैनंदिन जीवनात या भावांचा विकास करण्यात अनेक अडचणी येऊ शकतात. जर तुम्ही लोकांशी बोलत असाल तर त्यावेळी मध्येच डोळे बंद करून तुम्ही कुठलीही चित्तावस्था विकसित करू शकत नाही. असे करणे जरा विचित्रच ठरेल. महायानमध्ये आपण म्हणून डोळे थोडे उघडे ठेवतो. आपण जे काही मिळवण्याचा प्रयत्न करीत आहोत ते इतर जिवांच्याही मदतीसाठी असते. त्यामुळे डोळे बंद करून आपल्याला त्या साऱ्यांना बाहेर सोडून द्यायचे नाही. डोळे बंद करून ध्यानसाधना करण्याची आणखी एक सूक्ष्म समस्या पूजनीय दलाई लामा सांगतात. अशा अवस्थेत पापण्या मिचकावल्या जाण्याची शक्यता असते. कारण बऱ्याचदा डोळ्यांसमोर लाल ठिपके नाचताना दिसतात व त्यामुळे ध्यान भंग होते. 

मानसदर्शनाचे दोन पैलू 

जेव्हा आपण मानसदर्शन करू तेव्हा आपण दोन प्रमुख पैलू लक्षात घेणे गरजेचे आहे. पहिला म्हणजे एखाद्या गोष्टीचे दर्शन घेण्यासंदर्भात आहे. ज्याला आपण स्पष्टता असे म्हणतो. परंतु हा काही खूप चांगला शब्द नाही कारण याचा एक सुप्त अर्थ असा होतो की एखादी गोष्ट ध्यानाच्या केंद्रस्थानी आहे. आपण आपल्या कल्पनेत एखादी गोष्ट प्रकट करीत असतो हा मुद्दा इथे अधिक महत्त्वाचा आहे. दुसऱ्या घटकाचा शाब्दिक अर्थ अभिमान होतो. आपण ज्या गोष्टीचे मानसदर्शन करीत आहोत ती गोष्ट वास्तवात उपस्थित आहे याचा आपल्याला अभिमान आहे असा त्याचा अर्थ होतो. 

त्सोंग्खापा म्हणतात,  की हा अभिमान, हा भाव सुरुवातीच्या काळात खूप महत्त्वाचा असतो. आपल्या मानसदर्शनाची आकृती ध्यानाच्या केंद्रात आहे की नाही याची आपण फारशी काळजी करायची गरज नसते. उलट बुद्ध आपल्या समक्ष आहेत असा अनुभव आपण जर घेऊ शकलो तर ते आणखीनच चांगले. फक्त आपल्यासमोर काहीतरी दृश्य प्रतिमा असणे गरजेचे आहे. मग अगदी आपल्यासमोर पिवळा प्रकाश जरी असेल तरीही आपण असा विचार करायला हवा की, होय बुद्ध तिथे प्रत्यक्षात उपस्थित आहेत. जसजशी आपली एकाग्रता वाढत जाईल त्यानुसार त्या दर्शनाविषयीची आपली स्पष्टता अधिकाधिक वाढत जाईल. 

फार जोरजबरदस्ती नको 

साधक म्हणून आपल्याकडून ज्या चुका होत असतात त्यातील एक सर्वांत मोठी चूक ही असते की आपण ज्या आकृतीचे मानसदर्शन करण्याचा प्रयत्न करीत असतो त्याच्या तपशिलांमध्ये आपण फार अडकून पडतो. त्याचे वस्त्र आभूषण कसे आहेत, त्याच्या डोळ्यांचा रंग कोणता आहे. इत्यादी. यातून कदाचित आपल्याला इतका ताण येऊ शकतो की कदाचित अजिबात साधना होऊ  शकणार नाही अशी परिस्थिती उद्भवू शकते. जेव्हा आपण खूप साऱ्या आकृत्यांचे मानसदर्शन करण्याचा प्रयत्न करू लागतो तेव्हा परिस्थिती आणखीनच बिघडते. अशावेळी ग्रंथांचासुद्धा उपयोग होत नाही कारण त्यामध्ये तर अधिकच बारकाईने सारे तपशील दिलेले असतात. त्यामुळे त्याचे वाचन केल्यावर असे वाटू लागते की सुरुवातीपासूनच आपल्याला सारे तपशील दिसणे गरजेचे आहे. अनेक आकृत्यांमधील मानसदर्शन करीत असताना त्यातील बऱ्याच तपशिलांचे दर्शन आपल्याला कल्पनेमध्ये होणे ही फार मोठी उपलब्धी मानली जाते. त्यामुळे जेव्हा आपण सरावाने त्यासाठी सज्ज होऊ तेव्हा आपण संपूर्ण मानसदर्शन करू शकू. परंतु सुरुवातीच्या टप्प्यावर आपण इतके खोलात शिरण्याची गरज नाही. जर आपण सारे तपशील दिसावेत म्हणून ओढूनताणून प्रयत्न करू लागलो, तर तिबेटियन भाषेत ज्याला ‘लंग’ म्हणतात तशी आपली स्थिती होऊन जाण्याचा दाट संभव आहे. या स्थितीमध्ये आपली ऊर्जा अस्ताव्यस्त होऊन जाते आणि आपला सारा उत्साह देखील मावळून जाण्याची भीती असते. 

मानसदर्शने निर्माण करणे 

त्सोंग्खापा यांनी दोन परंपरांचा उल्लेख केलेला आहे. त्यांनी अवघड अशा मानसदर्शनाच्या अभ्यासांसंदर्भात अतिशय व्यावहारिक असा सल्ला दिलेला आहे. पहिला म्हणजे सूक्ष्म तपशिलांच्या बाबतीत आपण एकेक करून त्यांना आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा. जोपर्यंत आपल्याला पूर्ण चित्राचे दर्शन होत नाही तोपर्यंत आपण एकेका तपशिलाला दुसऱ्याशी जोडत राहण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. काही विशेष व्यक्तिमत्त्वांसाठी ही पद्धत उपयुक्त आहे. बहुसंख्य सामान्यांना मात्र एका पूर्णाकृतीच्या दिशेने जाण्यासाठी काही अस्पष्ट आकृत्या पाहतच सुरुवात करावी लागते. पुढे जाऊन त्या आकृतीमध्ये अन्य तपशील भरले जाऊ शकतात. 

या प्रक्रियेमध्ये संचयी पद्धतीने या तपशिलांना जोडण्याचे काम होणे गरजेचे आहे. यामध्ये एखाद्या तपशिलाला स्पष्ट केंद्रामध्ये घेऊ शकतो आणि पहिल्या तपशिलातील ध्यान हालू न देता दुसरा तपशील त्याला जोडावा. या स्थितीमध्ये दोन तपशील आपल्या स्पष्ट केंद्रामध्ये आलेले असतील. आणि मग आपण त्या दोन्हीवरून ध्यान ढळू न देता तिसरा तपशील त्याला जोडू शकाल. यापद्धतीने पुढे तपशील जोडत असताना आपण ज्या तपशिलांवर आधी ध्यान केंद्रित केलेले आहे त्यापासून ध्यान विचलित होऊ नये याची मात्र काळजी घ्यावी लागते. 

त्सोंग्खापा सल्ला देतात की, बुद्धाच्या आकृतीचे मानसदर्शन करीत असताना त्यांच्या डोळ्यांपासून सुरुवात करायला हवी. त्यानंतर ते सांगतात की त्यांच्या देहाची आकृती स्पष्ट झाली असेल तर, त्यावर ध्यान केंद्रित ठेवणे आवश्यक आहे. जर सामान्य आकृती स्पष्ट झालेली नसेल आणि त्याचे काही काही सुटे भाग आपल्याला स्पष्ट झालेले असतील तर ज्या स्पष्टपणे लक्षात येत आहेत त्या आकृतींच्या तपशिलांकडे आपण लक्ष द्यायला हवे. यातील काही भाग धूसर, अस्पष्ट झाले तरीही आपल्याला पुन्हा नव्याने सामान्य आकृती विकसित करावी लागेल. 

सचेतनतेचा विस्तार करण्यासाठी मानसदर्शनाचा एक साधन म्हणून उपयोग 

मानसदर्शन करण्याच्या या अवघड प्रक्रियेचे उद्दिष्ट काय आहे? मानसदर्शनाच्या स्पर्धेमध्ये उतरून सुवर्णपदक मिळवण्याच्या आकांक्षेने केवळ मानसिक क्रीडा कौशल्याचा विकास करायचा हा त्या मागचा उद्देश निश्चितच नाही. मानसदर्शनामधील सारेच तपशील अनेक विविध लक्ष्यांच्या संदर्भात एकाच वेळी आपल्या चित्ताची सचेतनता आणि बोधाचा विस्तार करण्यासाठी खूप उपयोगी ठरतात. कोण कोणत्या गोष्टी कशा दिसतात हे फारसे महत्त्वाचे नाही. तर प्रत्येक तपशील कोणत्या गोष्टीकडे निर्देश करतो हे आपल्याला समजून घ्यायचे आहे. 

बुद्ध बनण्याचा मार्ग प्रशस्त करणाऱ्या विभिन्न अनौपचारिक साधनांचा विचार करायचा झाला तर अशा एकूण ३२ प्रकारच्या साधना आहेत. एकाच वेळी या ३२ प्रकारच्या साधनांवर ध्यान केंद्रित ठेवणे ही खूप अवघड गोष्ट असते. विशेषत: जेव्हा या साधना आपण अमूर्त स्वरूपात करीत असतो तेव्हा ते आणखीनच अवघड असते. जर आपण या ३२ साधनांना चित्रात्मक रुपात, बुद्धाच्या शरीरातील ३२ उत्कृष्ट संकेतांच्या रुपात म्हणजे त्यांचे दक्षिणावर्त कुरळे केस अशा स्वरूपात प्रस्तुत केले तर सर्व साधनांना एकत्रित करणे सोपे होऊ शकते. हेच आपले खरे उद्दिष्ट आहे. जर आपण यातील प्रत्येक बोधाला एकेक करून विकसित करू शकलो नाही तर या सगळ्याला एकत्रित समूहबद्ध कसे करू शकू? आपल्याला सर्व जिवितमात्रांचे कल्याण करायचे आहे. याचा अर्थ आपल्याला एकाच वेळी सर्व जिवांच्या प्रति सचेत राहावयाचे आहे. आपल्यातील सजगतेचा हळूहळू विस्तार करण्यासाठी आपल्या मनाचा विस्तार करणे गरजेचे आहे. ही गुंतागुंतीची मनोदर्शने त्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरणारी आहेत. 

सारांश 

आपल्याला जर एखाद्या गोष्टीविषयी उत्साह निर्माण झाला तर आपण कधीही आळशी राहत नाही. परंतु आपण ते झाल्यानंतर थोडेसे थांबलो तर याचा अर्थ आपण आळशी आहोत असा बिलकुल होत नाही. आपण थकून ते काम करणे सोडूनच देऊ नये यासाठी विश्रांती आवश्यक असते आणि त्यासाठी नेमके कधी थोड्या काळासाठी थांबावे हे कळणे गरजेचे आहे. आपल्याला एकदा शिकवणुकीतील नेमका संदेश काय आहे हे समजले, तो तपासून पाहता आला आणि त्यावर ध्यान करता येऊ लागले की सातत्य आणि आनंदयुक्त प्रबलता यांचा विकास आपोआपच हळूहळू होऊ लागतो. आपल्यातील एकाग्रता आणि सचेतनता यांचा विश्वास बसणार नाही इतका विकास करण्यासाठी मानसदर्शनाच्या बौद्ध पद्धती अतिशय उपयुक्त ठरतात. हे साध्य करण्यासाठी हा अभ्यास योग्य क्रमाने करणे गरजेचे आहे. जर आपण याच्या अभ्यासात सातत्य राखले तर स्वत:साठी आणि इतरांची मदत करण्याच्या दृष्टीने अत्यंत लाभदायक अशा चित्तावस्था विकसित करू शकतो. 

Top