मन शांत करणे
आपल्याला एकाग्रता प्राप्त करायची असेल तर अगोदर मन शांत करावे लागते. त्यामुळे काही ध्यान प्रक्रियांमध्ये सांगतात त्यानुसार, आपण मनाच्या अधिक नैसर्गिक अवस्थेमध्ये येतो. परंतु अधिक स्पष्ट करून सांगायचे तर, आपल्याला विचारहिन, झोंबीसारखे मन अशी अवस्था किंवा एखाद्या बंद केलेल्या रेडिओसारखी अवस्था प्राप्त होणे इथे अपेक्षित नाही. जर अशी अवस्था असेल तर त्यापेक्षा शांतपणे केवळ झोप घेणे केव्हाही श्रेयस्कर. आपल्या मनाला अस्वस्थ करणाऱ्या सर्व गोष्टींपासून मुक्त होणे हे आपले ध्येय आहे. काही भावना या अतिशय अस्वस्थ करणाऱ्या असतात. निराश होणे, चिंताक्रांत होणे, घाबरून जाणे अशा काही. आपले लक्ष्य या सगळ्यांमधून बाहेर पडून शांत होणे हे आहे.
आपण जेव्हा आपले मन शांत करतो, आपल्या मनाची अवस्था ही सुस्पष्ट आणि जागृत असते. त्यामध्ये आपण काही प्रमाणात प्रेम आणि समजूतदारपणाही आणू शकतो. किंवा नैसर्गिकरित्या आपल्या सर्वांमध्ये असणारी मानवी उबही आणू शकतो. त्यासाठी अतिशय सखोल अशी शिथिलतेची अनुभूती देणारी विश्रांती गरजेची आहे. केवळ शरीरातील स्नायूच नव्हे तर आपल्या मानसिक आणि भावनिक बद्धतेलाही रोखून आपण नैसर्गिक उब अनुभवतो आणि मनाच्या पातळीवरची स्पष्टताही अनुभवास येते किंवा इतर काहीही स्पष्टपणे जाणवते.
काही जण ध्यानाचा चुकीचा अर्थ घेतात. त्यांना वाटते की ध्यान म्हणजे विचारांना थांबवणे. किंबहुना, विचारांना थांबवणे यापेक्षा ध्यानामुळे अतिरेकी, अनावश्यक असणारे विचार थांबायला हवेत. जसे की, भविष्याविषयी अस्वस्थ करणारे विचार (मला रात्री जेवायला काय मिळणार आहे?) आणि नकारात्मक विचार (तू माझ्याशी काल खूप वाईट वागलास. तू एक अतिशय भयानक व्यक्ती आहेस.) अशा प्रकारचे सगळे विचार हे मनाला वाहवत नेणारे आणि अस्वस्थ करणारे विचार आहेत.
मन शांत असणे हे एक साधन आहे. ते अर्थातच अंतिम लक्ष्य नाही. जेव्हा आपले मन अधिक शांत, सुस्पष्ट आणि अधिक खुले असते तेव्हा आपण त्याचा अधिक चांगल्या रीतीने वापर करू शकतो. आपण त्याचा दैनंदिन जीवनात प्रभावीपणाने वापर करू शकतो. त्यामुळे आपण जेव्हा ध्यान करू तेव्हा आयुष्यातील परिस्थितीविषयी अधिक समजूतदार आकलन आपल्याला होऊ शकते. जेव्हा अस्वस्थ करणाऱ्या भावनांपासून आणि बाह्य विचारांपासून मन मुक्त असते तेव्हा आपण महत्त्वाच्या विषयांचा अधिक सुस्पष्टतेने विचार करू शकतो. जसे की, ‘मी माझ्या आयुष्यात नक्की काय करतो आहे? महत्त्वाच्या नातेसंबंधांच्या बाबतीत नक्की काय घडते आहे? हे चांगले आहे की वाईट?’ आपण त्याचे योग्य पद्धतीने विश्लेषण करू शकतो. त्यालाच आत्मपरीक्षण असे म्हणतात. त्यामुळे असे सर्व विषय साकल्याने समजून घेण्यासाठी आणि भविष्यात उपयुक्त ठरेल असे आत्मपरीक्षण करू शकण्यासाठी आपल्याला सुस्पष्टता आवश्यक असते. आपले मन अतिशय स्थिर, शांत असावे लागते आणि ती स्थिती प्राप्त होण्यासाठी ध्यान हेच महत्त्वपूर्ण साधन आहे.
संकल्पनात्मक विचार म्हणजे मेंदूमध्ये गोष्टींची विभागणी करणे
जर संकल्पनात्मक विचार ही गोष्ट शब्दांशी किंवा समजुतीशी संबंधित नसेल तर मग मुद्दा काय आहे? संकल्पनात्मक मन म्हणजे काय आणि आपण बंधनातून मुक्त व्हायचे आहे असे जेव्हा आपण सांगतो तेव्हा त्या ध्यानातील सूचनेचा नेमका अर्थ काय होतो? ध्यानाच्या सर्व टप्प्यांवर आणि पायऱ्यांवर ही सूचना आवश्यक असते का? त्याचप्रमाणे दैनंदिन आयुष्यातही आवश्यक असते का? या मुद्द्यांबाबत सुस्पष्टता येणे आवश्यक आहे.
संकल्पनात्मक मन म्हणजे आपल्या विचारांची विविध प्रकारांमध्ये विभागणी करणे, थोडक्यात प्रत्येक गोष्टीसाठी एक स्वतंत्र खोका तयार करणे. जसे की, चांगले किंवा वाईट, काळे किंवा पांढरे, कुत्रा किंवा मांजर.
आता जेव्हा आपण बाजारात खरेदीसाठी जातो तेव्हा आपल्याला अर्थातच सफरचंद आणि संत्रे यांच्यामध्ये भेद करता यायला हवा. किंवा कच्चे फळ आणि पिकलेले फळ हे सुद्धा कळायला हवे. अशा दैनंदिन गरजांमध्ये अशा पद्धतीने विभागणी करून विचार करण्यात काहीच गैर नाही. परंतु त्यामध्ये इतर काही प्रकार आहेत तिथे मात्र ही समस्या ठरते. त्यातीलच एका प्रकाराला आपण पूर्वकल्पना असे म्हणतो.
पूर्वकल्पनेचे उदाहरण द्यायचे झाले तर, आपण नेहमी माझ्याशी वाईट, दुष्ट हेतू ठेवूनच वागत आला आहात. तुम्ही एक भयानक व्यक्ती आहात कारण भूतकाळात तुम्ही अमुक केले आहे आणि ते केले आहे. आणि आताही मी सांगू शकतो की काहीही झाले तरीही भविष्यातही तुम्ही एक भयानक व्यक्तीच राहाल. यामध्ये आपण अगोदरच ठरवून टाकलेले आहे की ही व्यक्ती भयानक आहे. आणि अर्थातच आपण जर या पद्धतीने विचार केला आणि आपण मनात एखाद्या व्यक्तीची अशी प्रतिमा तयार करून ठेवली की हा व्यक्ती दुष्ट हेतू ठेवून वागणारा आहे आणि तो कायमच माझ्याबाबतीत भयानक वागत राहणार आहे. तर अशा परिस्थितीत ती व्यक्ती आणि आपल्यामध्ये एक मोठेच अंतर पडते. आपल्या पूर्वकल्पनेचा आपण त्या व्यक्तीशी कसे जोडले जातो यावर खूप परिणाम होत असतो. त्यामुळे पूर्वकल्पना ही मनाची अवस्था महत्त्वाची असते त्यामध्ये आपण विभागणी करतो आणि त्यानुसार विविध गोष्टी विभागणी करून मेंदूमध्ये साठवतो.
सारांश
विविध प्रकारचे संकल्पनात्मक विचार समजून घेतल्याखेरीज ध्यानामध्ये किंवा आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये इतर सारे संकल्पनात्मक विचार हानिकारकच आहेत, असा चुकीचा ग्रह करून घेऊ शकतो. बहुतांश ध्यान प्रकारांमध्ये आपल्याला डोक्यातील सारे आवाज बंद करायचे असतात आणि सर्व पूर्वकल्पना सोडून द्यायच्या असतात. परंतु दीर्घकाळ ध्यानाचा सराव करणाऱ्या व्यक्तींचा अपवाद वगळता ती गोष्ट शब्दांत मांडली अथवा मांडली नाही तरीही आपल्यामधील आणि ध्यानाच्या बाहेरील काहीही समजून घेण्यासाठी एक विशिष्ट मनोवस्था प्राप्त करावी लागते.