ध्यानधारणेच्या आरंभापूर्वीची तयारी

Week%203%20preliminaries%20to%20meditation%20%281%29

ध्यानधारणेसाठी उपयुक्त ठरणारे वातावरण 

ध्यानधारणा करण्यासाठी आपल्याला उपयुक्त ठरेल अशी परिस्थिती खरोखर आवश्यक असते. ध्यानधारणेसाठी साह्यभूत ठरतात असे अनेक घटक असतात. परंतु त्यांची चर्चा अथवा सादरीकरण हे एकांतवासातील ध्यानधारणेच्या संदर्भात प्रामुख्याने केली जाते. वस्तुत: आपल्यातील बहुतांश जण हे आपल्या घरामध्ये ध्यानधारणा करीत असतात. 

घरामध्ये ध्यानधारणा करीत असतानाही सर्वांत महत्त्वाची उपयुक्त गोष्ट हीच असते की आपले ध्यान भंग होऊ नये. जितके शक्य आहे तितके शांत वातावरण असे श्रेयस्कर असते. आपल्यातील बहुतांश लोक हे कायम गजबजलेल्या रस्त्यांजवळ  किंवा जिथे कायम गोंधळ गडबड सुरू असते अशा ठिकाणी राहतात. अगदी पहाटेच्या वेळी किंवा रात्री उशीरानंतर ही वर्दळ बरीचशी कमी झालेली असते. त्यामुळे त्या वेळी ध्यानधारणा करणे चांगले ठरते. याशिवाय, आजूबाजूच्या वातावरणात शेजारपाजाऱ्यांकडे लावलेले संगीत अथवा टीव्हीचा आवाजही असू नये. या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. जर शांत वातावरणात ध्यानधारणा करणे शक्य होत नसेल तर आजूबाजूचा गोंधळ कानावर पडू नये म्हणून आपण इयर प्लगचा वापर करू शकता. असे केल्याने आजूबाजूचा गोंधळ पूर्णपणे थांबणार नाही हे जरी खरे असले, तरी त्याचा प्रभाव निश्चितपणे कमी करता येऊ शकतो. 

प्रत्येकाकडे स्वत:ची ध्यानधारणेची खोली असेल इतके भाग्यवान सगळेच असतील असे नाही. बहुसंख्य लोकांकडे ती नसणारच. त्यामुळे जी जागा उपलब्ध असेल त्या जागेवरून आपण ध्यान करू शकतो. जर आवश्यकता भासली तर आपण अगदी आपल्या निजायच्या जागेवर बसूनसुद्धा ध्यान करू शकता. त्यामध्ये कोणतीही अडचण नाही. भारतात वास्तव्य करून असणारे बहुसंख्य तिबेटियन लोक हे आपल्या निजायच्या जागेवरच ध्यान करतात. 

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्या खोलीमध्ये ध्यानधारणा करणार आहोत ती खोली नीटनेटकी आवरलेली असली पाहिजे. जर आपल्या सभोवतालचे वातावरण प्रसन्न आणि स्वच्छ असेल तर आपली चित्तशुद्धी राखली जाण्याच्या दृष्टीने ते साह्यभूत ठरते. जर साधनेची खोलीच अस्ताव्यस्त, अस्वच्छ असेल तर चित्तवृत्ती तशीच होत जाते. त्यामुळेच ध्यानधारणेची सुरुवातीची तयारी करीत असताना ध्यानधारणेची खोली स्वच्छ करणे आणि मग एक कप पाण्याचा का असेना भोग चढवणे हे आवश्यक मानले जाते. यातून आपण ध्यानधारणेप्रति आदरसन्मान प्रकट करू पाहत असतो. आपल्या ध्यानधारणेच्या वेळी जर आपण बुद्धांना आणि बोधिसत्त्वांना निमंत्रित करणार असू तर अर्थातच कोणत्याही अस्ताव्यस्त आणि अस्वच्छ खोलीत आपण हे कदापि करणार नाही. सामान्य मानसिक पातळीवर विचार करायचा झाला तरीदेखील, आपण जे काही काम करीत आहोत त्या प्रति सन्मानाचे भाव जपणे आणि एक विशेष संधी म्हणून त्याकडे पाहणे महत्त्वाचे असते. ‘विशेष’ याचा अर्थ असा अजिबात नाही की, हॉलीवूडच्या एखाद्या भव्यदिव्य सेटप्रमाणे उदबत्त्या आणि मेणबत्त्या लावून फार मोठी वातावरण निर्मिती करायची आहे. एक साधीसुधी, साफ व स्वच्छ आणि सन्मानजनक व्यवस्था खोलीत असावी इतकीच माफक अपेक्षा आहे. 

मुद्रा

आशियातील विभिन्न संस्कृतींमध्ये ध्यानधारणेसाठी लोकांनी विविध प्रकारच्या मुद्रांचा अंगीकार केल्याचे दिसते. भारत, तिबेट, चीन, जपान आणि थायलंड या ठिकाणच्या ध्यानधारणेच्या सर्व मुद्रा एकमेकांपेक्षा भिन्न आहेत. त्यामुळे यांपैकी एकच एक मुद्रा योग्य आहे असे आपण म्हणू शकत नाही. भारतीय आणि तिबेटीयन हे मांडी घालून बसतात तर जपानी आणि चीनी लोक पाय अंगाखाली दुमडून बसतात. थाई लोक आपल्या दोन्ही पायांना एका बाजूला करून बसतात. तंत्राच्या साधनेमध्ये आपण शरीरातील ऊर्जांचा अभ्यास करीत असतो. त्यानुसार, पूर्ण पद्मासन आवश्यक आहे. परंतु आपल्यातील बहुतांश लोक हे साधनेच्या त्या उंचीवर अद्याप पोहोचलेले नाहीत. अशाप्रकारच्या साधनेचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला त्या योग्य बनायचे असेल, तर आपण लहानपणापासूनच पद्मासनात बसण्याचा सराव करायला हवा असे सांगितले जाते. कारण वय वाढल्यानंतर, मोठे झाल्यानंतर पूर्ण पद्मासनात बसणे अवघड होते. पाश्चिमात्य लोकांना सांगायचे झाले तर, आशियायी मुद्रांपैकी कोणत्याही मुद्रेमध्ये आपण बसू शकलात तरी चालेल. जर बसता आले नाही तर खुर्चीतही बसू शकता. आपली पाठ सरळ राहिली पाहिजे ही सर्वांत महत्त्वाची बाब यात ध्यानात घेणे गरजेचे आहे. 

दृष्टी केंद्रीत करणे 

डोळ्यांचा विचार करायचा झाला तर, काही ध्यानधारणा या डोळे बंद करून केल्या जातात. काही उघड्या डोळ्यांनी केल्या जातात. काही खाली पाहून केल्या जातात तर काही वरच्या दिशेने पाहून केल्या जातात. कोणत्या प्रकारची ध्यानधारणा आपण करीत आहोत यावर ते ठरत असते. सर्वसाधारणपणे ध्यानधारणेतील तिबेटियन जाणकार लोक  डोळे बंद करून ध्यान करू नये असाच सल्ला देतात. एकदा डोळे बंद केले की झोप येण्याची दाट शक्यता असते हा एक महत्त्वाचा मुद्दा त्यात आहेच. मात्र, त्याशिवाय आणखी एक मानसिक अडथळासुद्धा निर्माण होतो. कारण ध्यान करायचे म्हणजे डोळे बंद करूनच करावे लागते अशी आपली समजूत होऊ लागते. एकदा का असे जाणवायला लागले की मग ध्यानधारणेच्या मदतीने जो भाव तुम्ही विकसित करू पाहत आहात त्याला प्रत्यक्ष जीवनात उतरवणे अवघड होऊन बसते. उदाहरणादाखल सांगायचे झाले तर, जर मी एखाद्या व्यक्तीशी बोलत आहे आणि मला त्याच्याविषयी प्रेमभाव विकसित करण्यासाठी जर डोळे मिटावे लागत असतील तर ते विचित्र वाटेल. त्यामुळे तिबेटियन परंपरेमध्ये बहुतांश ध्यानधारणा या डोळे अर्धे उघडे ठेवून केल्या जातात. शिथील केंद्रित आणि खाली जमिनीकडे पाहत या ध्यानधारणा केल्या जातात. 

आसन 

जर तुम्ही मांडी घालून बसणार असाल तर बसण्यासाठी योग्य आसन निवडणे आवश्यक ठरते. काही लोक एकाच पद्धतीने बराच वेळ जमिनीवर बसून राहू शकतात आणि तरीही त्यांच्या पायाला मुंग्या येत नाहीत. उदाहरणार्थ परमपूज्य दलाई लामा हे उपदेश करीत असताना आपल्या गादीवर याच पद्धतीने बसतात. परंतु गादीशिवाय आपण असे बसायला गेलो तर आपल्यातील बहुतांश लोकांचे पाय बधिर होऊन जातील. त्यामुळे जर आपल्याला ही अडचण येत असेल तर आपण स्वत:साठी गादी टाकून बसावे जेणेकरून आपला पार्श्वभाग हा गुडघ्यांपेक्षा अधिक उंचीवर राहू शकेल. आपल्यासाठी सर्वाधिक उपयुक्त ठरेल असेच आसन आणि जाड किंवा पातळ, मऊ किंवा कडक गादी निवडावी. प्रत्येक व्यक्ती ही दुसऱ्यांपेक्षा वेगळी असते. आपण सर्वांत सुखकारक स्थितीमध्ये असणे सर्वांत महत्त्वाचे आहे आणि आपण जी आसनस्थिती घेऊ त्यामुळे पायांना बधिरता येणार नाही हे पाहायला हवे. कारण ते खूप त्रासदायक होऊ शकते. अनेक बुद्ध केंद्रांमध्ये जाडजुड, गोल किंवा चौकोनी उशा मिळतात. परंतु जपानी मुद्रेमध्ये बसण्यासाठी त्या उपयुक्त ठरतात. त्यामध्ये पाय दुमडून आपल्या शरीराखाली ठेवले जातात. काही लोक त्यावर कदाचित मांडी घालून आरामात बसू शकतात. परंतु बहुतांश लोकांसाठी त्या खूप उंच आणि कडक ठरू शकतात. जर तुमच्या केंद्रामध्ये केवळ या मोठ्या उशा मिळत असतील तर कदाचित तुम्हाला तुमचे आसन स्वत:ला घेऊन यावे लागेल. 

ध्यानधारणेसाठी वेळ ठरवणे 

बहुतांश लोकांसाठी ध्यानधारणेची सर्वांत चांगली वेळ ही सकाळी अगदी लवकर किंवा मग रात्री सगळी कामे संपल्यानंतरची असते. कारण या दोन्ही वेळी दैनंदिन कामांतील व्यस्तता खूप कमी असते. काही लोक सकाळच्या वेळी प्रसन्न असतात तर काही जण रात्रीच्या वेळी अधिक ताजेतवाने असतात. ते ‘पहाटेचे पक्षी’ किंवा ‘रात्रीचे घुबड’ असतात. अन्य कुणाहीपेक्षा आपल्याला आपली जीवनशैली नेमकेपणाने ठाऊक असते. त्यामुळे दिवसातील नेमकी कोणती वेळ ध्यानधारणेसाठी चांगली असेल हे आपणच आपल्यापुरते ठरवायला हवे. जेव्हा डोळ्यांवर झोप असेल तेव्हा ध्यानधारणा करण्याचा सल्ला कुणीही देत नाही. जर रात्रीच्या वेळी तुम्हाला झोप येते आहे आणि तरीही तुम्ही ध्यानधारणा करण्याचा आटापिटा करू पाहाल तर ध्यानधारणेच्या मध्येच तुम्हाला झोप येऊन जाईल व त्याने कोणताही लाभ होणार नाही. त्याचप्रमाणे जर झोप पूर्ण झालेली नसताना तुम्ही सकाळच्या प्रहरी ध्यानधारणा करायला जाल तर ती प्रभावी होणार नाही. त्यामुळे स्वत:साठी कोणती वेळ ध्यानधारणेसाठी असावी हे आपले आपणच ठरवायचे. सकाळी लवकर उठून ध्यानधारणा करण्यापूर्वी चहा अथवा कॉफी प्यायली तरी काहीही हरकत नाही. अर्थात बहुतांश तिबेटियन साधकांना याची अजिबात सवय नसते. 

माझे शिक्षक त्सेनझाब सरकांग रिंपोछे हे परमपूज्य दलाई लामा यांच्या शिक्षकांपैकी एक होते. ते सांगत असत की, तिबेटमधील तांत्रिक मठामध्ये त्यांनी शिक्षण घेतले होते आणि तिथे ते कशा रीतीने ध्यानधारणा करत असत. सर्व भिक्षू हे ध्यानधारणेच्या खोलीत बसत असत आणि ते तिथेच बसल्या जागी झोपी जात असत. त्यांचे शरीर एका बाजुला हलके झुकत असे आणि डोके शेजारी बसलेल्या भिक्षुच्या मांडीवर असायचे. तिबेटियन लोकांना शारीरिक स्पर्शाची कोणतीही अडचण नव्हती. त्यांना सकाळी खूप लवकर उठवण्यासाठी घंटी वाजवली जात असे आणि त्यांनी उठून ध्यानधारणा आणि सस्वर पाठ आदी बाबी सुरू कराव्यात अशी अपेक्षा केली जात असे. रात्री अपरात्री जागे होऊन एखाद्या डॉक्टरने शस्त्रक्रिया करावी, अशा पद्धतीचा आपल्याला सराव नसेल तर उठल्यानंतर लगेचच ध्यानधारणा सुरू करणे आपल्यासाठी अवघड होईल. 

ध्यानधारणा किती वेळ करावी

जेव्हा आपण ध्यानधारणेची सुरुवात करू, तेव्हा आपल्या ध्यानधारणेची सत्रे लहान असावीत ही महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात घ्यावी लागते. मात्र ती वारंवारही करावी लागतात. नवसाधक असताना एकाच बैठकीत खूप वेळ ध्यान करीत बसणे ही एक मोठी कठीण परीक्षाच होऊन बसते. काही ठिकाणी या पद्धतीचाही अवलंब केला जातो. मात्र तिबेटी लोक मात्र असे करू देत नाहीत. कारण अगदी सुरुवातीच्या टप्प्यावरच जर अशी कठीण परीक्षा द्यावी लागली, तर आपल्याला ध्यानधारणेची गोडी लागणारच नाही. कधी एकदा हे साधना सत्र संपते याचीच आपण वाट पाहत राहू. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यावर केवळ पाच मिनिटांसाठी ध्यानधारणा करावी. सुरुवातीला तेवढेच पुरेसे आहे. थेरवादी मठांमध्ये तेथील भिक्षू आलटून पालटून बसून आणि चालत राहून ध्यानधारणा करतात. त्यामुळे एकच प्रकारचा अभ्यास दीर्घकाळासाठी करावा लागत नाही. 

हे समजून घेण्यासाठी तिबेटी लोक एक उदाहरण देतात. जर एखादा मित्र तुम्हाला भेटायला आला आणि लवकर न जाता खूप काळ थांबूनच राहिला तर आपण अस्वस्थ होऊन त्याच्या जाण्याची आतुरतेने वाट पाहू लागतो. आणि हा मित्र एकदाचा गेला की पुन्हा लगेच त्याला भेटण्यासाठी आपण उतावीळ नसतो. परंतु आपल्याला मित्रासमवेत आणखी काही वेळ घालवावा असे वाटत असेल आणि त्यासाठी तुम्ही उत्सुक असाल आणि अशाच वेळी तो मित्र जर तिथून गेला तर त्यानंतर तो अल्पावधीत परत आला तरी त्याला भेटण्यासाठी आपण निश्चितच उत्सुक असू. त्याचप्रमाणे आपली ध्यानधारणेसाठी स्वीकारलेली मुद्रा, ध्यानधारणेसाठी निवडलेले आसन आणि ध्यानधारणेचा कालावधी हे सारे काही योग्य प्रमाणात असेल तर आपण निश्चितपणे उत्साहाने साधना करीत राहू. 

संकल्प निश्चिती 

ध्यानधारणा सुरू करण्यापूर्वी आपण संकल्प निश्चित करणे महत्त्वाचे असते. किंबहुना सकाळी सकाळी डोळे उघडण्याबरोबर आपला संकल्प मनाशी निश्चित करण्याविषयी सांगितले जाते. सकाळी उठल्याबरोबर आपल्या जागेवरून उठण्यापूर्वी आपण त्या दिवसाचा संकल्प निश्चित करू शकतो. आपण असा विचार करू शकतो, ‘‘आज मी कुणावरही न रागावण्याचा प्रयत्न करेन. मी अधिक सहनशील बनण्याचा प्रयत्न करेन. मी दुसऱ्याप्रति अधिक सकारात्मक भाव विकसित करण्याचा प्रयत्न करेन. मी आजचा दिवस सार्थकी लावण्याचा प्रयत्न करेन आणि आजचा दिवस व्यर्थ जाऊ नये यासाठी मनापासून प्रयत्न करेन.’’

एक अतिशय सुंदर अशी जेन विचारधारा आहे. ती मला खूप आवडते. ‘‘मृत्यू कोणत्याही क्षणी येऊ शकतो. शांत राहा.’’ जर आपण याविषयी नीट विचार केला तर हा एक अतिशय गंभीर असा विचार आहे. मृत्यू कोणत्याही क्षणी येऊ शकतो या भीतीने आपण तणावग्रस्त झालो आणि भयभीत व चिंताक्रांत झालो तर, आपण कोणतेही काम कधीही पूर्ण करू शकणार नाही. आपल्या मनात कदाचित असे विचार येतील, ‘‘मी गरजेपेक्षा जास्त कष्ट घेत आहे. मी त्यासाठी सक्षम, समर्थ नाही. ’’ परंतु मृत्यू केव्हाही, कोणत्याही क्षणी येऊ शकतो याचा बोध आपणांस झालेला असेल आणि त्या बोधासह आपण संयत वृत्ती बाळगू शकलो तर आपण जे काही करू ते सार्थक आणि व्यावहारिक पद्धतीने करू. चिंतीत, भयभीत आणि तणावग्रस्त होणार नाही. 

त्यामुळे मृत्यू कोणत्याही क्षणी येऊ शकतो ही गोष्ट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आणि शांत राहा. 

ध्यानधारणा करण्यापूर्वी आपण पहिल्यांदा हा संकल्प करतो, ‘‘मी अमुक मिनिटांसाठी ध्यानधारणा करणार आहे. मी आपल्या ध्यानाला केंद्रित करण्याचा प्रयत्न करणार आहे. जर मला असे वाटले की मला आता झोप येते आहे तर मी स्वत:ला जागे ठेवण्याचा प्रयत्न करेन. जर माझे ध्यान विचलित झाले तर मी पुन्हा ते ध्यान केंद्रित करण्याचा प्रयत्न करेन.’’ ही गोष्ट स्वत:च्या मनाला गांभीर्याने सांगावी. नुसते पुन्हा पुन्हा उच्चारण करून काही होणार नाही. आपल्या संकल्पावर दृढ राहणे ही तशी सोपी गोष्ट नसते. जर आपल्या ध्यानधारणेच्या वेळी आपण अन्य विषयांचा मग भले ते धर्माविषयीच्या विचारांशी संबंधित असले तरी अशा दुसऱ्या विषयांचा विचार एकदा का ध्यानधारणेच्या वेळी करू लागलो तर ही सर्वांत वाईट सवय लागते. आणि ही वाईट सवय एकदा जडली की मग ती सोडणे अवघड होऊन बसते. मी माझ्या अनुभवातून हे सांगतो आहे, ही वाईट सवय सोडणे खरोखर अवघड जाते. त्यामुळे आपल्या ध्यानधारणेची सुरुवात करीत असताना एक योग्य संकल्प मनाशी निश्चित करावा आणि त्याचे पालन करण्याचा प्रयत्न करावा.  

प्रेरणा 

पुढचा टप्पा असतो प्रेरणेचा. तिबेटी बौद्ध संदर्भात प्रेरणेचे दोन भाग होतात. पहिला भाग असतो लक्ष्याचा. आपण नक्की काय प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत आहोत? या संदर्भांतील सामान्य लक्ष्यांचा उल्लेख ‘मार्गातील क्रमिक चरण’ (लाम रिम) मध्ये केलेला आहे. लाम रिम मध्ये सांगितल्यानुसार, क) भविष्यातील जन्मांत सुधारणा करणे. ख) पुनर्जन्मातून पूर्णपणे मुक्त होणे. ग) पुनर्जन्मातून मुक्ती मिळवण्यासाठी इतरांची मदत करण्याच्या दृष्टीने ज्ञानोदय प्राप्त करणे. 

दुसरा भाग म्हणजे, आपल्या त्या लक्ष्याच्या दिशेने जाण्यासाठी प्रेरणा देणारा मनोभाव असतो. आपल्या प्रेरणेच्या संदर्भात विचार करताना अतिशय प्रामाणिक राहणे आवश्यक असते. माझा खरोखर पुनर्जन्मावर विश्वास आहे? आपल्यातील बहुतेक लोक यावर विश्वास ठेवत नाहीत. त्यामुळे ‘मी हे काम यासाठी करतो आहे की पुढच्या जन्मी पुन्हा एकदा बहुमूल्य असे मानवी जीवन मला प्राप्त व्हावे.’ किंवा ‘या पुनर्जन्मातून पूर्णपणे मुक्ती मिळवण्यासाठी मी हे करतो आहे.’ असे म्हणत असताना जर आपला पुनर्जन्मावरच विश्वास नसेल तर या बोलण्याला काहीही अर्थ उरत नाही. 

त्यामुळे जर आपण ‘धर्म लाईट’ म्हणून ध्यानधारणा करीत असाल तर ते काही प्रमाणात ठीक आहे. याचा अर्थ पुनर्जन्माविना बौद्ध धर्माचे स्वरूप मान्य करून त्याला साधनेचा एक भाग मानून साधना सुरू करणे असा होतो. या संदर्भात आपल्याला इतर कुणालाही काही सांगायची गरज नाही. परंत स्वत:च्या प्रेरणेसंदर्भात, स्वत:बाबतीत आपण प्रामाणिक असणे मात्र नितांत गरजेचे आहे. ‘‘मी या जन्मातील स्वत:ची स्थिती सुधारण्यासाठी ध्यानधारणा करीत आहे.’’ जर या विचारांप्रति आपण प्रामाणिक असू तर ही एक योग्य प्रेरणा आहे असे म्हणता येईल. त्याचवेळी दुसरीकडे दीर्घ काळ लागू शकणारी प्रामाणिक ध्येय आहेत. त्यांना मी ‘रियल थिंग धर्म’ म्हणतो. त्या संदर्भात आदराची भावना मनात बाळगणे आणि बौद्ध धर्मातील साधना केवळ या जन्मातील स्थिती सुधारण्यापुरती मर्यादित नाही असा विचार मान्य करणेसुद्धा महत्त्वाचे ठरते. 

आपल्या प्रेरणेचा दुसरा भाग म्हणजे आपल्याला आपल्या लक्ष्याच्या दिशेने प्रेरित करणाऱ्या मनोभावाचा संबंध आहे. रियल थिंग किंवा खऱ्या प्रेरणेचा पहिला स्तर असतो. ‘‘माझे ध्येय हे भविष्यातील जन्मांमध्ये बहुमुल्य असा मानवी जन्म प्राप्त करण्याचे आहे. कारण एखादी माशी, झुरळ किंवा इतर कोणत्याही खालच्या पातळीवरचा पुनर्जन्म कसा असेल या कल्पनेनेच आपण भयभीत झालेले असू. मला अशा भविष्यापासून खरोखर वाचायचे आहे. आणि मला विश्वास आहे की यातून वाचण्याचा एक मार्ग उपलब्ध आहे.’’ याच गोष्टीचे धर्म लाईट संस्करण हे पुढील प्रमाणे असेल. ‘‘माझे ध्येय आहे की माझे येणारे जीवन चांगल्या रीतीने जावे आणि पुढे जाऊन माझे जीवन अधिक चांगले व्हावे. कारण परिस्थिती बिघडली तर किती वाईट होऊ शकते याचा विचार करून मी भयभीत झालो आहे. या परिस्थितीत आपण अडकू नये म्हणून त्यासाठी मी निश्चितपणे काही सकारात्मक काम करू शकतो. 

दोन्ही स्थितींमध्ये आपल्याला पंगू करून सोडेल अशी भीती निश्चितच नाही. जसे की ‘‘परिस्थिती खूप निराशाजनक आहे. माझेच नशीब म्हणायचे.’’ हा एक प्रकारचा स्वस्थ बोध आहे. ‘‘असे व्हावे असे मला अजिबातच वाटत नाही. आणि या परिस्थितीपासून बचाव करण्याचा एक मार्ग आहे.’’ आपण जेव्हा वाहन चालवत असतो तेव्हा एखादा अपघात तर होणार नाही ना ही भीती वाटते त्याप्रमाणे हे आहे. मी वाहन चालवताना सावधगिरी बाळगेन. परंतु मी इतकाही शक्तीहीन होणार नाही की मी पुन्हा ड्राईव्ह करण्यापासूनच पाठ फिरवेन. 

दुसरा रिअल थिंग स्तर आहे. ‘‘मी पूर्णपणे विरक्त झालेलो आहे. पुनर्जन्माच्या चक्राने वैतागून गेलो आहे आणि थकून गेलो आहे (मनोभाव) आणि मला या स्थितीतून बाहेर पडायचे आहे. (लक्ष्य) निवृत्तीच्या भूमिकेमागे मनोभाव हा असतो की, पुन्हा एकदा लहान बाळाच्या रुपामध्ये जन्म घेणे, पुन्हा नव्याने सगळे काही शिकणे, शिक्षण प्राप्त करणे आणि उपजीविकेचे साधन शोधणे या बाबी खरोखर कंटाळा आणणाऱ्या आहेत. वारंवार आजारपणाशी लढत राहणे आणि म्हातारे होत जाणे हेसुद्धा थकवणारे काम आहे. एखादा वाईट चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावा लागण्यासारखे हे आहे. मी आता त्या गोष्टींनी कंटाळून गेलो आहे.” 

सर्वांत उन्नत प्रेरणा ही ज्ञानोदय प्राप्तीची आहे. (लक्ष्य) बोधिचित्ताची प्राप्ती ही लक्ष्याला सोबत घेऊन चालत असते आणि करुणेने ती प्रेरित होते. (मनोभाव) ‘‘सर्व लोकांना इतके दु:ख व्हावे हे मला अजिबात सहन होण्यासारखे नाही. दु:खावर विजय मिळवण्यासाठी मी सर्वांना मदत करू शकेन इतके सामर्थ्य माझ्या अंगी यावे या अवस्थेला मला पोहोचायचे आहे.”  

आपण आपले ध्येय साध्य केल्यानंतर आपण काय करणार ही गोष्ट सुद्धा प्रेरणेच्या कक्षेत येते. जेव्हा आपण महायान परंपरेचा अभ्यास करतो तेव्हा आपल्या प्रेरणेचा प्रत्येक स्तर हा ज्ञानप्राप्ती करण्याच्या दिशेने प्रवास करण्यासंदर्भातील असतो. त्या स्थितीमध्ये ज्ञानोदयापर्यंत पोहोण्याचा भाव निश्चित करणे आणि लक्ष्यापर्यंत पोहोचल्यानंतर आपण काय करणार हे निश्चित करणे आवश्यक आहे. 

धर्म लाईटच्या स्तरावर हे सोपे असेल असा मूर्खपणाचा विचार करू नये. या जीवनात जितके शक्य असेल तितकी ज्ञानोदयाची प्रगती आणि प्राप्ती करावी. अन्यथा जेव्हा आपण मृत्यूच्या जवळ जातो तेव्हा लक्षात येते की आपल्याला अद्याप ज्ञानोदय प्राप्त झालेला नाही आणि मग आपण तेव्हा निराश आणि खिन्न होऊन जातो. 

रियल थिंग प्रेरणेच्या तीन स्तरांमध्ये पहिला स्तर असतो, ज्ञानप्राप्तीच्या मार्गावर पुढे जात राहण्यासाठी मनुष्याच्या रुपामध्ये आणखी एक बहुमुल्य असा पुनर्जन्म मला मिळावा. कारण हे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी मला अनेक जन्म लागणार आहेत. 

दुसरी प्रेरणा आहे, ‘‘कर्म आणि अशांत करणाऱ्या भावनांपासून मला मुक्ती हवी आहे. कारण जर मी दुसऱ्यांवर रागवत राहिलो अथवा त्यांच्या प्रति  आसक्तीमध्ये गुंतत राहिलो किंवा मग एखाद्या गोष्टीची बाधा होऊन मी कृती करीत राहिलो तर मी त्यांची मदत करू शकणार नाही. जर दुसऱ्यांची मदत करताना मी अहंकारी भावनेने ग्रासलो गेलो तरीदेखील मी त्यांची मदत करू शकणार नाही. त्यामुळे मी स्वत:ला मुक्त करणे गरजेचे आहे.’’

सर्वोच्च प्रेरणा म्हणजे, ‘‘मी ज्ञानप्राप्ती करू इच्छितो कारण प्रत्येक व्यक्तीला मदत करण्याच्या सर्वोत्तम अशा उपायांचा संपूर्ण बोध मला व्हावा.’’

प्रेरणा खूप महत्त्वाची असते. त्सोंग्खापा यावर भर देतात की आपली प्रेरणा केवळ ध्यानधारणेचे सत्र सुरू होतानाच नाही तर संपूर्ण दिवसभर टिकून राहणे आवश्यक आहे. आणि ही प्रेरणा केवळ चांगले शब्द बोलण्यापुरतीच मर्यादित राहून उपयोगी नाही. आपल्याला हा विषय गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. आणि गंभीर होण्याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ प्रेरणा इतकी वास्तविक, सहज व्हावी आणि आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनून जावी. ध्यानधारणेच्या माध्यमातून ही अवस्था आपण प्राप्त करावी. 

चित्त शांत करणे 

एकदा अपेक्षित असणारे भौतिक वातावरण तयार झाले आणि आपला संकल्प आणि प्रेरणा निश्चित झाली की आपल्याला चित्त शांत करणे आवश्यक असते. त्यासाठी बहुतेक वेळेला आपला श्वास मोजण्यासारखी श्वासाची ध्यानधारणाही आवश्यक ठरते. त्यासाठी श्वासाशी संबंधित विविध अवघड अभ्यासप्रकारांचाही अभ्यास करता येऊ शकतो. परंतु नाकाने सामान्य रीतीने श्वास घेत अकरा वेळेला श्वास आत बाहेर करून त्याची आवर्तने करीत राहणे हे सामान्यत: या प्रकारासाठी उपयुक्त ठरण्यासारखे आहे. अशा पद्धतीने आपले चित्त शांत केल्याने आपण आत्तापर्यंत जे काही करीत होतो आणि यानंतर आपण जी ध्यानधारणा करणार आहोत त्यामध्ये एक शांततेचे अवकाश निर्माण होते. अशा प्रकारच्या शांततेचे अवकाश निर्माण झाल्यानंतर आपली ध्यानधारणा आणि आपले धकाधकीचे जीवन यात बदल घडवून आणण्यात मदत मिळते. 

                 

सप्तांग साधना 

आपल्या ध्यानधारणेच्या सत्राची सुरुवात करताना काही सकारात्मक ऊर्जा विकसित करणे गरजेचे आहे, असे बहुतेकदा सुचवले जात असते आणि त्यासाठी आपण जो अभ्यास करतो त्याला सप्तांग प्रार्थना आणि सप्तांग साधना म्हटले जाते. या संदर्भात ‘अंग’ म्हणजे ‘चरण’ असा अर्थ घेतला जातो. 

) शरणागती आणि बोधिचित्त यांना साष्टांग दंडवत 

पहिले अंग आहे साष्टांग प्रणामाचे. ज्यांनी ज्ञानोदय प्राप्त केलेला आहे त्यांच्या प्रति आदरभाव व्यक्त करणे. आपल्या स्वत:च्या संदर्भात भविष्यात प्रकट होणाऱ्या ज्ञानोदयाविषयी आदरभाव व्यक्त करणे आणि आपल्याला आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचवण्यासाठी साह्यभूत ठरणाऱ्या आपल्या स्वत:च्या बुद्ध स्वरूपाविषयी आदरभाव व्यक्त करणे आवश्यक आहे. अशाप्रकारे साष्टांग प्रणाम करण्याची प्रार्थना शरणागतीला ग्रहण करण्याच्या दृष्टीने आणि बोधिचित्त आपल्या जीवनात समाविष्ट करण्यासाठी केली जाते. बुद्ध जन, धर्माच्या बाबतीत त्यांची शिकवण आणि सिद्धी, स्वयंमुक्ती व ज्ञानोदय प्राप्त करण्याच्या मार्गावर चालणारा संघ समुदाय ती सुरक्षित दिशा दाखवून देतो, ज्या दिशेने आपल्याला पुढे जाण्याची इच्छा असते. आपले बुद्धिचित्त लक्ष्य केंद्रित होऊन आपण स्वत: बुद्ध बनण्याची इच्छा आपल्या चित्त आणि मनामध्ये धारण करतो. 

) पूजा 

दुसरे अंग हे पूजा करण्याचे असते. हा सुद्धा आदरभाव व्यक्त करण्याचाच एक मार्ग आहे. 

) आपल्यातील त्रुटी मान्य करणे 

त्या पुढचा विषय आपल्यातील चुका आणि त्रुटी मान्य करण्याचा असतो. आपल्या चुकांप्रति आपण आपल्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण करून घ्यावी असा याचा अर्थ नाही. अपराध बोधाची भावना मनात निर्माण होणे योग्य नाही. जेव्हा आपण आपल्याच एखाद्या कृतीविषयी आणि स्वत:विषयी मनात अपराधीपणाची भावना निर्माण करतो त्यातून अपराधबोध निर्माण होत असतो आणि आपल्याला तो भाव सोडावासा वाटत नसतो. आपण घरातून कचरा बाहेर फेकून देतो पण इथे परिस्थिती तशी नाही. इथे आपण कचरा घरातच ठेवतो आणि विचार करतो, ‘‘हा कचरा फारच वाईट आहे. याचा किती दुर्गंध येतो आहे.’’ अपराधीपणाची भावना मनात घर करण्याऐवजी हे तिसरे अंग आपल्या चुकांचे प्रायश्चित्त घेण्याच्या भावाशी संबंधित आहे. ‘‘मी माझ्या कृत्यांसाठी प्रायश्चित्त करतो आहे. अशी कृत्ये माझ्या हातून पुन्हा होऊ नयेत यासाठी मी मनापासून प्रयत्न करेन. मी माझ्यातील कमतरता दूर करण्यासाठी भरपूर प्रयत्न करेन.” 

) उल्हासित होणे 

चौथ्या पायरीमध्ये आपल्या व इतरांच्या सकारात्मक कामांसाठी आपण आनंदी व्हायला शिकायचे आहे. यामुळे आपण स्वत:च्या संदर्भात आणि इतरांच्या बाबतीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला शिकतो. 

) आपल्याला सतत शिकवावे यासाठी आग्रही राहणे 

यानंतर आपण शिक्षकांना आणि बुद्धजनांना आग्रह करतो की त्यांनी आम्हाला शिकवावे. ‘‘कृपया आम्हाला सदैव शिकवत राहावे. ते ग्रहण करण्यासाठी मी उत्सुक आणि ग्रहणशील आहे.” 

) शिक्षकांनी सोडून जाऊ नये म्हणून विनंती करणे 

पुढची पायरी आहे, ‘‘कृपया आम्हाला सोडून जाऊ नये, दिवंगत होऊ नये. मी शिकण्यासाठी खूप गंभीर आहे. त्यामुळे मी विनंती करतो की कृपया आपण आमच्यासमवेत राहावे.” 

) समर्पण 

शेवटची पायरी ही समर्पणाची असते. एका दृष्टीने समर्पण ही आपल्यातील ऊर्जेला एका निश्चित दिशेने वळवण्याची प्रक्रिया आहे. आपण असा विचार करतो की, ‘‘जी सकारात्मक शक्ती, जो बोध विकसित झालेला आहे. मी अशी प्रार्थना करतो की माझा संकल्प पूर्ण करण्यासाठी त्याची मदत व्हावी.’’ याची तुलना मी कॉम्प्युटरवर केलेले आपले काम सेव्ह करण्याच्या कृतीशी करेन. याचा अर्थ आपण जर त्याला एखाद्या विशेष फोल्डरमध्ये म्हणजे, मुक्ती अथवा ज्ञानोदय अशा एखाद्या फोल्डरमध्ये सेव्ह करणार नाही, तर सामान्य सेटिंग असे असेल की आपले काम आपोआप ‘प्रपंचाच्या गतीमध्ये सुधारणा’ या फोल्डरमध्ये सेव्ह केले जाईल. आपल्या श्रमाचे फळ हे ‘प्रपंचाच्या गतीमध्ये सुधारणा’ यात सेव्ह करणे हे एका मर्यादेपर्यंत ठीक आहे. परंतु जर ते आपले लक्ष्य नसेल आणि आपल्याला आपले काम मुक्ती किंवा ज्ञानोदयापर्यंत न्यायचे असेल तर त्यातच ते सेव्ह करावे लागेल. हेच समर्पण आहे. आपण त्याच्या विषयी गंभीर असतो. आपण हे शब्दांत सांगत नाही. आपण करुणेसारख्या मनोभावाद्वारे सकारात्मक ऊर्जेला ते समर्पित करतो. 

सप्तांग प्रार्थनेनंतर आपण खरी ध्यानधारणा सुरू करतो आणि ध्यानधारणा पूर्ण झाल्यानंतर आपण आणखी एक समर्पण करतो. 

सारांश 

ध्यानधारणा ही तशी खूप गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. ते करण्यासाठीच्या सूचना आणि निर्देश अतिशय सुस्पष्ट आहेत. इथे एका पद्धतीच्या संदर्भात सूचना स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक विशिष्ट प्रकारच्या ध्यानधारणेसाठी विशिष्ट दिशानिर्देश असतात. परंतु प्रत्येक प्रकारच्या ध्यानधारणा करीत असताना आपण नक्की काय करीत आहोत, ते कशा पद्धतीने करायला हवे, कोणत्या उद्देशाने आपण ध्यानधारणा करीत आहोत या सर्वांची सुस्पष्ट अशी जाणीव असणे आवश्यक आहे. 

जेनसारख्या काही बौद्धपरंपरांमध्ये सांगितले जाते की, ‘‘बसा. ध्यानधारणा करा. आणि जसजसे तुम्ही प्रगती करत जाल तसतसा तुमचा स्वत:चा बोध विकसित होत जाईल.’’ अर्थात काही लोकांसाठी ही पद्धत योग्य ठरू शकते, परंतु अनेकांसाठी ती अतिशय अवघडही असू शकते. अनेकांना ही पद्धत अतिशय अवघड वाटते म्हणून इथे भारतीय-तिबेटी परंपरेतील पद्धत सांगितली आहे. 

Top