ध्यानधारणेचे अनेक सर्वसाधारण प्रकार आहेत. त्यातील कोणत्याही प्रकारातील ध्यानधारणा प्रभावीपणे करायची असल्यास प्रथम आपल्याला नक्की कोणती चित्तावस्था विकसित करण्याची इच्छा आहे, याची निश्चित माहिती असणे आवश्यक असते. याबाबतच्या तपशिलात अनेक प्रकारची माहिती समाविष्ट असते, जसे आपल्याला कोणत्या गोष्टीवर लक्ष्य केंद्रित करायचे आहे, त्या केंद्रित लक्ष्याचे तपशील काय आहेत, आपल्या मनाचा त्याच्याशी असलेला संबंध काय आहे, ती चित्तावस्था विकसित करण्यासाठी काय लाभकारक आहे आणि काय बाधक आहे, एकदा ती चित्तावस्था प्राप्त केल्यानंतर ती कशी लागू करायची आणि ती चित्तावस्था कोणते दोष दूर करेल. या शिवाय आपल्याला ध्यानधारणेसाठी योग्य व्यवस्था करण्याचीही गरज असते, योग्य मुद्रा आणि आसन, आणि ध्यानधारणेचे सत्र सुरू करण्यासाठी आणि संपवण्यासाठीची पद्धत समजून घेणेही आवश्यक असते.