ध्यानधारणेपूर्वी समजून घेण्याजोग्या गोष्टी

आपल्या क्षमतांची जाणीव

आपण आत्तापर्यंत ज्या सर्व गोष्टींविषयी बोललो आहे, त्या आपल्याला प्रत्यक्षात साध्य करणे शक्य आहे की नाही किंवा मी ते साध्य करण्यासाठी सक्षम आहे का याविषयी आपण फारसे बोललेलो नाही. यातूनच बुद्ध-स्वरूपाचा मुद्दा उपस्थित होतो, ज्याचा संदर्भ अशा घटकांशी असतो, जे आपल्या आत असतात आणि आपल्याला बुद्ध रूपात रुपांतरित होण्यासाठी साहाय्यक असतात. याचा संबंध मूलतः चित्त प्रवृत्तीशी असतो. 

गोष्टी समजून घेण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे का?  होय. एखाद्या गोष्टीबाबत कायम सजग राहण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे का?  तर  काही काळापुरते आपण एखाद्या गोष्टीबाबत सजग राहू शकतो. मग तो कालावधी वाढवणे शक्य आहे का?  होय. ध्यानधारणा आणि विविध अभ्यास पद्धतींतून आपण तो कालावधी वाढवू शकतो. परंतु आपल्याला त्याची कितपत आवड आणि प्रेरणा आहे यावरच त्यातील यश अवलंबून असते. फक्त तो अभ्यास आपल्यासाठी महत्त्वाचा आणि प्रासंगिक असायला हवा. 

ही स्थिती तशीच आहे, जसे तुम्ही खरेदीला जाता तेव्हा तुमच्याकडे किती पैसे आहेत याविषयी तुम्ही सजग असणे गरजेचे असते कारण त्यापेक्षा अधिक तुम्ही खर्च करू शकत नाही. दुसरीकडे जेव्हा तुम्ही घरामध्ये निवांत बसलेले असता तेव्हा तुमच्या खिशामध्ये किती पैसे आहेत याचा तसा फार काही फरक पडत नाही. ते अप्रस्तुत असते आणि त्यामुळे तुम्हाला त्याची पर्वा नसते. त्याचप्रमाणे, जेव्हा आपण शिकवणींबाबत चिंतन करतो तेव्हा त्या प्रासंगिक असायला हव्या. आणि त्या प्रासंगिक आहेत हे समजून घेण्यासाठी त्यांची कार्यपद्धती आणि त्यांचे महत्त्व आपल्या लक्षात येणे गरजेचे असते. त्यासाठी आपण आपल्या मनाची एक मुलभूत अवस्था ज्याला ‘काळजी घेण्याचा स्वभाव’ (दुसऱ्याची काळजी घेण्याची वृत्ती) म्हणतो त्या अवस्थेपर्यंत येणे आवश्यक आहे. त्यात आपल्याला स्वत:ची,  आपल्या बाबतीत जे घडते त्याची आणि आपण ज्याचा अनुभव घेतो त्याची काळजी असते. 

स्वत:ची काळजी घेणे

जेव्हा इतरांच्या संदर्भातून काळजी करण्याच्या वृत्तीकडे पाहिले जाते, तेव्हा कदाचित आपण या काळजी करण्याच्या वृत्तीला अधिक चांगल्या रीतीने समजून घेऊ शकतो. जर मला दुसऱ्याची  काहीही पर्वा नसेल तर मी काय करतो अथवा बोलतो किंवा त्यांना ते आवडते अथवा नाही याने मला काहीही फरक पडत नाही. परंतु जर मी त्यांना महत्त्वाचे मानले तर त्यांच्यावर माझ्या वागण्याचा काय परिणाम होतो याचा अधिक गांभीर्याने विचार करू लागतो. हीच काळजी घेण्याची वृत्ती आपण स्वत:च्या बाबतीत विकसित करणेही गरजेचे आहे. ते म्हणजे,  मी माझा वेळ असाच वाया जाऊ दिला आणि मला जे अमूल्य असे मानवी जीवन लाभले आहे त्याचा योग्य लाभ घेतला नाही, तर आपण किती मोठे नुकसान करवून घेतले आहे अशी खंत मनामध्ये ठेवून एका क्षणी मी मरून जाईन. 

हे आपण आपल्या रोजच्या जगण्यातील सामान्य गोष्टींच्या संदर्भातूनही पाहू शकतो. जसे आपल्याला आपल्या मुलांचे संगोपन, आपले काम या गोष्टींची काळजी असते. आपल्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्याची काळजी असते. अशा स्वरूपाच्या दृष्टिकोनातून आपण शिकवणींना आपल्या जीवनात महत्त्व देऊ. या शिकवणींना मनात ठेवून हळूहळू आपण त्यांचे स्मरण करू शकू, अगदी सर्वकाळ शक्य झाले नाही, तरी बहुतांश वेळ करण्याचा प्रयत्न करू. ध्यानधारणा ही शिकवणींना वारंवार स्वतःशी परिचित करण्याची पद्धत आहे, जेणेकरून त्या आपल्या चित्तवृत्तीचा भाग बनतील. आणि आपल्याला त्यांचे स्मरण करण्यासाठी विशिष्ट प्रयत्न करण्याचीही गरज उरणार नाही.  

ही अंतर्दृष्टी मिळण्याची क्षमता आपल्यात असल्याबाबत आपण आश्वस्त झालो की आपण त्या गोष्टी साध्य करण्यासाठी सर्वस्वी प्रयत्न करतो. पण आपण त्याबाबत आश्वस्त नसलो तर आपली अवस्था त्यासाठी प्रयत्न करायला बाहू फडफडवण्यासारखी होईलः पण त्याची तरी कशाला चिंता करायची? सुरुवातीला कदाचित आपल्याला मुक्ती किंवा ज्ञानप्राप्ती म्हणजे काय हे सुद्धा माहीत नसेल, परंतु आपण ते समजून-जाणून घेण्याचे दीर्घकालीन लक्ष्य ठेवतो  आणि त्या दिशेने प्रयत्न सुरू करतो. तर मृत्युविषयक जाणीव आपल्याला जीवन व्यर्थ घालवण्यापासून स्वतःला रोखण्यासाठी प्रेरित करते. 

करुणेसंबंधी ध्यानधारणा 

आता आपण ध्यानाच्या तिस-या पायरीकडे लक्ष देण्यासाठी तयार झालेले आहोत. या विषयाची ओळख करून देत असताना महान तिबेटी बौद्ध गुरू त्सोंगखापा यांनी फार मोलाचा सल्ला लिहून ठेवला आहे. त्यांच्या सूत्र आणि तंत्रसंबंधी व्यावहारिक उपदेश पत्रात ते लिहितात, ध्यानधारणा करण्यासाठी आपल्याला ‘त्या कारणांचा शोध घ्यावा लागेल, ज्यामुळे आपल्याला अपेक्षित असलेली चित्तवृत्ती प्राप्त करता येईल.’ त्यामुळे आपल्याला जर करुणाभाव विकसित करायचा असेल, तर तो विकसित करण्यासाठी आवश्यक कारणांचा शोध घ्यावा लागेल आणि त्यांचा विकास करावा लागेल. 

हे अवलंबनाचे तत्त्व आहे -  इतरांना दुःख आणि दुःखाच्या कारणांपासून मुक्त करण्याची इच्छा (बौद्ध धर्मातील करुणेची व्याख्या) विकसित करायची असेल, तर त्याचा आपल्याशी आंतरिक संबंध आहे, याची जाणीव होणे गरजेचे आहे. अन्यथा आपल्याला त्यांची जराही काळजी वाटणार नाही. त्यामुळे इतर सर्वजण आपल्यासाठी घेत असलेले कष्ट आणि त्यांची दयाभावना यांच्यावर आपले संपूर्ण अस्तित्व अवलंबून आहे याची जाणीव व्हायला हवी. त्यामध्ये ज्यांनी ज्यांनी आपल्यासाठी अन्न पिकवले, रस्ते बांधले अशा अनेक गोष्टी करणाऱ्या  प्रत्येकाविषयी ही भावना मनात रुजणे गरजेचे आहे. त्या सर्व लोकांनी आपल्यासाठी केलेल्या कामाबद्दल उपकृत झाल्याने आपण कृतज्ञता आणि कौतुकाचा भाव विकसित करतो. जेव्हा अतिशय मनापासून आणि खोलवर ही जाणीव निर्माण होते, तेव्हा आपल्या मनातील कृतज्ञतेच्या भावनेतून त्यांच्याप्रति नैसर्गिकरीत्या प्रेमाची उत्कट भावना निर्माण होते. एकदा आपण त्यांच्यावर प्रेम करू लागलो की मग त्यांच्या बाबतीत काहीही अघटित घडले की आपल्याला अतिशय वाईट वाटू लागते. यातून आपले प्रेम वाढत जाते. ते आनंदी असावेत अशी इच्छा मनात वाढीस लागते आणि त्यांच्या आनंदासाठी कारणे शोधली जातात. परंतु जेव्हा ते आनंदी नाहीत उलट अनेक प्रकारच्या त्रासांतून त्यांना जावे लागत आहे असे आपल्याला दिसते तेव्हा आपल्या मनात करुणा विकसित होते. आपल्या मनात करुणेचा विकास हा या सगळ्या पातळ्यांवरून गेल्यानंतर योग्य अशा सुसंगत पद्धतीने होत जातो. 

करुणा ही सर्वसंगपरित्यागावर सुद्धा अवलंबून असते. स्वत:च्या दु:खाची जाणीव होऊन,  त्यातून मुक्त होण्याचा निर्धार करणे आणि त्यानंतर प्रत्येकाला असेच समान दु:ख आहे आणि त्याला त्यातून मुक्त होण्याची इच्छा आहे, याचीही जाणीव होणे. सर्वसंगपरित्याग म्हणजे थोडक्यात सांगायचे झाले तर - दु:खातून मुक्त होण्याचा निर्धार होय. असाच निर्धार जेव्हा आपण इतरांच्या दु:खाच्या बाबतीत करतो तेव्हा त्याला करुणा म्हणतात. परंतु त्यासाठी आपण स्वतःबाबत असाच निर्धार केला आहे का यावर ते स्पष्टपणे अवलंबून असते. 

त्यामुळे ध्यानधारणेमध्ये करुणा समाविष्ट व्हावी असा आपला प्रयत्न असेल तर हे अवलंबित्व खरोखर महत्त्वाचे आहे, कारण प्रयत्न आणि सातत्य असेल तर आपण तत्काळ करुणा विकसित करू शकतो, मात्र आपल्याला त्याचे खरे गांभीर्य लक्षात येण्याची मानसिक स्थिती निर्माण होण्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यावर या सगळ्या पायऱ्यांतून जाऊन ती मानसिकता तयार करावी लागते. आपल्याला करुणेसंबंधी ध्यानधारणा करायची असेल तर त्यासाठीच्या पायऱ्या आणि ज्या कारणांवर करुणा अवलंबून असते ती कारणे जाणून घेणे आवश्यक असते.

त्सोंगखापा या संदर्भात पुढे जाऊन म्हणतात की,  आपल्याला त्याचे ‘सर्व पैलू जाणून घेणे.’ महत्त्वाचे आहे.  याचा अर्थ जर आपल्याला करुणा विकसित करावयाची असेल आणि प्रत्येक जण दुःखातून मुक्त व्हावा अशी इच्छा असेल, तर आपल्याला दुःखाचे सर्व घटक आणि दुःखाच्या कारणांशी संबंधित सर्व घटक समजून घेणे आवश्यक आहे. याचा अर्थ केवळ त्यांच्यासाठी एखादी चांगली नोकरी मिळवून देण्यासाठी मदत करणे किंवा त्यांना काहीतरी चांगले खाण्यासाठी देणे अशा कृतींपुरता मर्यादित नाही. आपण अनियंत्रित अशा वारंवार घडणाऱ्या पुनर्जन्माच्या फेऱ्यातून (संसार) निर्माण होणारे सर्वव्यापी दुःख आणि वास्तवाबद्दलची मुलभूत अनभिज्ञता आणि संभ्रमितावस्था यामुळे निर्माण होणारे सांसारिक अस्तित्व आणि त्याचे सातत्य याविषयी बोलत आहोत. प्रेम आणि करुणेसंबंधी ध्यानधारणा करण्यासाठी केवळ तिथे बसणे आणि विचार करणे की, ‘ओह, किती छान, मी प्रत्येकावर प्रेम करतो.’ यात कसलीच स्पष्टता नाही - आपण एक विशिष्ट चित्तवृत्ती विकसित करू इच्छितो. त्सोंगखापा मनाची ती विशिष्ट अवस्था प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी विशद करतात. 

मनाची अशी एक विशिष्ट चित्तवृत्ती प्राप्त करू पाहत असताना आपण नक्की कशावर लक्ष केंद्रित करीत आहोत हे जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे ठरते. आपल्या मनामध्ये नक्की काय प्रकट होणे गरजेचे आहे? आपण इतर सर्वजण व त्यांचे दु:ख यांचा करुणेसह विचार करण्यावर लक्ष केंद्रित करीत आहोत. आणि इथे केवळ करुणा नाही तर ‘महाकरुणा’ अपेक्षित आहे. कारण ती प्रत्येकाला समभावाने पाहते. आणि इथली जीवमात्रांची संख्या तरी प्रचंड आहे – यात  प्रत्येक जण समाविष्ट आहे. हा खरोखरच अविश्वसनीय अमर्याद व्यापक विचार आहे, ‘या विश्वातील प्रत्येक जीवमात्राला मी मदत करणार आहे.’  आपण इथे प्रत्येकाच्या व्यक्तिगत पातळीवरच्या अखंडित मानसिकतेबद्दल बोलत आहोत, ज्यांच्या कर्मामुळे त्यांना आता कीटकाचे आयुष्य जगावे लागते आहे. याचा अर्थ ते कायमच कीटक आहेत असा अजिबात नाही – आपण त्यांना मुक्त करण्याचा प्रयत्न करणार आहोत, या आयुष्यात जरी त्यांना कीटकाचे आयुष्य मिळालेले असले, तरी पूर्वायुष्यात ती माझी माता होती. आणि आपण या आयुष्यात जी आपली माता आहे तिलाही या मुक्त करणार आहोत, जी कदाचित तिच्या पूर्वजन्मात एखादा कृमी असेल. 

प्रत्येक जीवमात्राची कल्पना करणे तसे सोपे नाही, परंतु उदारचित्त महायान बौद्ध पद्धतीमध्ये आपण ध्यानधारणा करीत असताना आपल्या सभोवतालच्या जिवांच्या एका विशाल समूहाची कल्पना करत असतो आणि आपण त्यामध्ये प्रत्येकाला त्यांच्या दु:खातून मुक्त करत असतो. अनेक महायान सुत्रांच्या सुरुवातीला आपल्या भोवतालात हजारो करोडो जीव उपस्थित असल्याचे वर्णन केले जाते, ज्यातून प्रार्थनेच्या व्यापकतेचा अंदाज येऊ शकतो. 

अशा पद्धतीने प्रत्येक जीवमात्राविषयी वैश्विक करूणेची भावना निर्माण होणे वास्तवात अकल्पनीय अशी गोष्ट आहे. याचा मुख्य आधार समतेची भावना आहे, ज्यात आपण आपले मन इतरांसाठी खुले करतो. करुणेसंबंधीच्या योग्य ध्यानधारणेसाठी आपल्याला या सर्व गोष्टींचे ज्ञान असणे आवश्यक आहे. 

या शिवाय, आपण ज्याच्यावर लक्ष्य केंद्रित करतो त्याच्याशी असलेला मनाचा संबंधही समजून घेणे आवश्यक असते. आपण जर करुणाविषयक ध्यानधारणा करत असू तर इतरांची त्यांच्या दुःखातून मुक्ती व्हावी आणि त्यांच्या दु:खाची सारी कारणे नष्ट व्हावीत, अशी आपली इच्छा असते. त्यांना मदत करण्यासाठी इतर कुणीतरी पुढाकार घेईल किंवा ते दु:ख असेच निघून जावे अशी ही इच्छा नसते, तर त्या दु:खावर त्यांना मात करता यावी म्हणून आपण स्वत: त्यांना मदत करण्याशी याचा संबंध असतो. 

त्सोंगखापा पुढे म्हणतात की, करुणा विकसित करण्यासाठी आपल्याला कोणती गोष्ट  लाभकारक आणि मदतगार ठरेल आणि काय हानिकारक किंवा नुकसान करणारे ठरेल याची माहिती असणे आवश्यक आहे. कोणती गोष्ट फक्त करुणा विकसित करण्यासाठीच फायदेशीर ठरणार नाही, तर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपण त्याबाबत पूर्ण आश्वस्त असू की ती लोकांना दुःखापासून मुक्त करण्यासाठी हमखास उपयुक्त ठरेल. जर आपलाच त्यावर विश्वास नसेल तर आपण तशी इच्छा तरी बाळगू शकू का किंवा त्या दिशेने प्रयत्न तरी करता येतील का?  त्यामुळे याचा मुलभूत आधार म्हणजे मी दु:खातून मुक्त होऊ शकतो आणि इतरांनाही दु:खातून मुक्त करण्यासाठी त्यांना मदत करण्यास मी सक्षम आहे हा दृढ विश्वास स्वत:ला असायला हवा. त्यासाठी आपल्याला स्वतःच्या क्षमतांचे आणि अगदी बुद्धाच्या क्षमतांचेही वास्तविक आकलन असणे गरजेचे आहे. तर आपल्यातील करुणेच्या विकासासाठी जे  हानिकारक आहे, ते म्हणजे फक्त आत्मकेंद्रिपणा किंवा स्वार्थीपणा नाही, तर निरर्थक भीती आणि आत्मविश्वासाचा अभावही त्याला कारणीभूत आहे. त्यामुळेच बुद्ध म्हणतात की कुणाच्या पायामध्ये रुतलेला एखादा काटा दूर करावा त्याप्रमाणे दु:ख दूर करता येत नाही. अगदी साक्षात बुद्धसुद्धा फक्त मार्ग दाखवू शकतात. परंतु त्यासाठीचे कष्ट ज्याचे त्यालाच घ्यावे लागतात. आपण बुद्धांनाही मागे टाकू शकू अशी अपेक्षा आपण कशी करू शकू? 

थोडक्यात, करुणेसाठी आवश्यक असणारी मन:स्थिती कशा पद्धतीने तयार व्हायला हवी याची समज जर आपल्याला नसेल तर आपण फार लांब जाऊ शकणार नाही. या पद्धतीने प्रत्यक्षात ध्यानधारणा किती नेमकी आणि परिष्कृत आहे याचे आपल्याला कौतुक वाटू लागते. त्यामुळे आपण त्याला ‘मनाचे शास्त्र’ म्हणू शकतो.

ध्यानधारणा सत्रांच्या दरम्यान

ध्यानधारणा सत्रांदरम्यान असणारा कालावधीही फार महत्त्वाचा असतो, याकडे त्सोंगखापा आवर्जून निर्देश करतात.  आपण ज्यासंबंधी  ध्यानधारणा करीत आहोत, त्याच्याशी संबंधित विविध आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन करण्याचा सल्ला ते देतात. त्यामुळे एका बाजूला आपण जे काही करीत आहोत ते बुद्धांच्या शिकवणुकीशी सुसंगत आहे याची विचारनिश्चिती होऊ शकेल.  आणि दुसऱ्या बाजूला महान संतांनी आत्मसात केलेले गोष्टींच्या वाचनातून प्रेरणाही मिळू शकेल. या सगळ्यांवर त्सोंगखापा म्हणतात की, आपण सकारात्मकतेची शक्ती उभी करणे गरजेचे आहे आणि स्वच्छतेची सवय लावून आपल्यातील नकारात्मकतेची शक्ती पूर्णपणे दूर करणे गरजेचे आहे. 

‘गुणवत्ता’ हा शब्द वापरण्यापेक्षा मी ‘सकारात्मक शक्ती’ हा शब्द पसंत करतो. कारण गुणवत्ता शब्दातून चुकीची कल्पना तयार होते. या शब्दातून कुठेतरी गुण जमा करण्याचा आणि तुम्ही १०० गुण जमवले की तुम्ही विजयी झालात असा काहीसा चुकीचा अर्थ ध्वनित होतो. परंतु आपण जे काही करीत आहोत त्यातून आपण सकारात्मक उर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहोत, ज्यातून गोष्टी प्रत्यक्षात कार्यान्वित होण्यासाठीची आवश्यक ऊर्जा प्राप्त होते, जसे आपण आपला मोबाईल चार्ज करतो. त्यामुळे आपल्या विचारांमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या ज्या जागा असतात त्यामुळे आपल्याला काहीही समजत नाही असे वाटू लागते अशा अडथळ्यांच्या जागा मोकळ्या करण्यासाठी आपण मनाच्या स्वच्छतेची प्रक्रिया वेळोवेळी करणे आवश्यक असते. आपल्या मनातील हे अडथळे बऱ्याचदा भावनिकही असू शकतात. त्यामुळे एक सकारात्मक शक्ती निर्माण करून आणि मन स्वच्छ करणाऱ्या विविध पद्धतींद्वारे आपण अशा अडथळ्यांपासून मुक्त होऊ शकतो. त्याद्वारे आपल्याला अंतर्दृष्टी आणि आकलनक्षमता प्राप्त होऊ शकते. 

व्यावहारिक पातळीवर याचा अर्थ काय होतो? व्यावहारिक पातळीवर त्याचा अर्थ असा होतो : जेव्हा आपण एखादी गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करीत असतो, मग ती कदाचित आपल्या कामाशी संबंधितही असेल, पण ती आपल्याला नीट समजत नसेल, तर आपण अशा वेळी  काही काळ एखादा ब्रेक घेतो. आपण तिथून बाहेर पडतो आणि इतरांना या ना त्या प्रकारे मदत होईल असे काहीतरी करत राहतो. असे केल्यानंतर सर्वसाधारणपणे आपण जेव्हा परत येतो तेव्हा आपले मन अधिक सकारात्मक आणि उन्नत अवस्थेत असते आणि निराशेच्या भावनेपेक्षा स्वत:चे मोल अधिक नेमकेपणाने जाणण्याच्या अवस्थेत असते. त्यामुळे आपल्याला पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या रीतीने गोष्टींचे आकलन होऊ लागते. त्यामुळे आपण कोणीही असलो तरी इतरांना मदत होईल अशी कोणतीतरी कृती करण्यात स्वत:ला गुंतवणे केव्हाही चांगले असते. मग प्रसंगी आपण आपल्या मुलांसमवेत अधिक वेळ घालवला, एकाकी असणाऱ्या आपल्या एखाद्या वयोवृद्ध नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलो असे कोणतेही चांगले सकारात्मक काम असू शकते. काहीतरी सकारात्मक करणे हे अत्यंत महत्त्वाचे असते.  आपण अनेक धार्मिक गोष्टी करू शकतो, परंतु प्रत्यक्ष जीवनातील काही सकारात्मक गोष्टी करणे हे अधिक प्रभावी ठरत असते. 

आपली प्रगती तपासणे

आपल्यातील बहुतांश लोकांकडे आपली प्रगती तपासणारे कुणी खासगी शिक्षक नसतात, परंतु लोजाँग किंवा मनाला प्रशिक्षण देणारी शिकवण हेच सांगते की आपणच आपले सर्वोत्तम साक्षीदार असतो. आपण खरंच चांगल्या रीतीने मन एकाग्र करू शकत आहोत की नाही, किंवा आपले चित्त भरकटले आहे की स्थिर आहे, हे आपण स्वत:लाच विचारून पाहायला हवे. इतर कुणीही हे आपल्यासाठी तपासून पाहू शकत नाही. सर्व प्रकारच्या शिकवण आणि पद्धतींचा  आपली भावनिक स्थिती सुधारण्याचाच उद्देश असतो. आपण आपल्यावरच काम करावे अशी अपेक्षा त्यात असते. आपल्याला अजूनही राग येतो का की आपला राग आता लोप पावत चाललेला आहे,  हे आपण स्वतःच अधिक चांगल्या रीतीने तपासू शकतो. 

आपण एक तत्त्व कायम लक्षात ठेवणे गरजेचे असते, ते म्हणजे आयुष्यात चढ उतार हे येतच असतात, त्यामुळे प्रगतीसुद्धा एकरेषीय असू शकत नाही. ती दररोज चांगली आणि अधिक चांगली होत जाईल असे नाही. जोवर आपण मुक्ती प्राप्त जीव होत नाही, तोपर्यंत चढउतार होतच राहणार. जरी आपण दीर्घकाळ सराव केलेला असेल आणि सर्वसाधारणपणे आपल्या रागावर नियंत्रण मिळवले आहे, असे वाटत असले, तरी काही वेळा आपल्याला राग येऊच शकतो. परंतु त्यामुळे खचून जाण्याचे काहीही कारण नाही. एका बाजूला आपल्यामध्ये प्रगती व सुधारणा व्हावी म्हणून आपल्याला खूप कष्ट करावे लागतात, परंतु दुसऱ्या बाजूला जेव्हा आपण चुकतो तेव्हा स्वत:ला शिक्षा करू नये अथवा स्वत:ला दोष देऊ नये. परमपूज्य दलाई लामा म्हणतात, जेव्हा आपण आपल्या प्रगतीचे अवलोकन करत असतो, तेव्हा केवळ आठवड्याभराचा नाही तर पाच वर्षांचा कालावधी विचारात घेणे गरजेचे आहे. पाच वर्षांपूर्वी आपण जशा पद्धतीने गोष्टी हाताळत होतो त्यात आता काय बदल झालेला आहे, याचा आपण विचार केला तर आपण नक्की किती प्रगती केलेली आहे हे आपल्याला स्पष्टपणे दिसते.

सारांश

ध्यानधारणेसाठी खास जागाच हवी असे काहीही नाही. तुलनेने शांत आणि स्वच्छ असेल अशा कोणत्याही जागी ध्यानधारणा करता येऊ शकते. परंतु तेही उपलब्ध नसेल तर त्याने काहीही अडत नाही. माझी एक मैत्रीण एका छोट्याशा इमारतीमध्ये तिच्या आईसमवेत राहायची.  तिथे मुळातच एक खोली होती आणि त्यात आईचा टीव्ही आणि रेडिओसुद्धा होता. जर तिने ध्यानधारणा किंवा त्याच्या संबंधित काही करायचा प्रयत्न केला तर तिची आई अस्वस्थ होत असे. त्यामुळे जेव्हा ती टॉयलेटमध्ये बसलेली असे तेव्हाच ती ध्यानधारणा करू शकत असे. तिथेच ती दररोज ध्यानधारणेचा सराव करत असे आणि त्यात काहीही गैर नव्हते. ध्यानधारणा करताना मेणबत्त्या लावणे, उदबत्ती लावणे किंवा इतर काही गोष्टींनी वातावरण निर्मिती करणे याची काहीही गरज नाही. कारण त्या फक्त बाह्य ‘गोष्टी’ आहेत. आपण आपले चित्त कसे हाताळतो, ती गोष्ट अंतिमत: सर्वांत महत्त्वाची ठरते. ध्यानधारणा म्हणजे एका विशिष्ट मानसिक स्थितीचा सातत्याने केलेला सराव आहे. त्यामुळे ते आपण कधीही, कुठेही करू शकतो. काही वेळेस आपण जेव्हा सबवे किंवा बसमध्ये असतो तेव्हाही काही चित्तवृत्ती  विकसित करणे शक्य असते. जेव्हा आपल्याला आपल्यातील संयम वाढवायचा आहे, सर्वजण आनंदी झालेले पाहायचे आहेत आणि कोणत्याही प्रकारचे दु:ख सभोवताली नको आहे अशा वेळी एखाद्या खोलीत एकट्याने बसून लोकांची कल्पना करण्यापेक्षा गर्दीने भरलेली बस ही अधिक चांगली जागा ठरणार नाही का?

ध्यानधारणेतील सर्वात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे,  ध्यानधारणेचा सराव आपण न चुकता दररोज करतो. जसे तुम्ही स्वतःचे दात घासायला किंवा प्रातर्विधीला जायला विसरत नाही, तसेच ध्यानधारणेचाही विसर पडता कामा नये. तो आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग बनणे गरजेचे आहे. मग ती ध्यानधारणा दिवसातून अवघ्या पाच मिनिटांसाठी का केलेली असेना. आपण भलेही कोणी असू, आपल्या दिनक्रमात ध्यानधारणा करण्यासाठी पाच मिनिटे अगोदर नक्कीच उठू शकतो. हे काही एखादी अग्नीपरीक्षा देण्यासारखे वाटू नये, उलट त्यातून आपल्या जीवनात एक वेगळी स्थिरता येऊ शकते. आपला दिवस कितीही गुंतागुंतीचा असला, तरीही सातत्य टिकवण्यासाठी आपण स्वत:साठी वेळ काढणे गरजेचे आहे.

Top