ध्यानधारणेसाठी आवश्यक मानसिक घटक

विवेकी ध्यानधारणा

सर्वसाधारणपणे ध्यानधारणेत दोन पातळ्या असतातः विवेकी ध्यानधारणा आणि स्थिरतादायी ध्यानधारणा. विवेकी ध्यानधारणेत आपण प्रागतिक पातळ्यांवर किंवा तर्काच्या आधारावर काम करतो. जसे चिंतन प्रक्रियेत आपण एक विशिष्ट चित्तवृत्ती विकसित करायचा प्रयत्न करतो, जिच्याशी आपण परिचित असावे असा आपला प्रयत्न असतो. करुणेच्या बाबतीत आपण प्रथम स्वतःच्या दुःखापासून सुरुवात करतो आणि त्या दुःखांपासून मुक्ती मिळवण्याचा संकल्प करतो. नंतर, या आधारावर आपल्या भोवतालातील अमर्याद जिवांची आपण कल्पना करतो आणि स्वतःला आसक्ती, घृणा आणि तटस्थतेपासून दूर ठेवत त्या प्रत्येकाप्रति आपल्या मनात उदार दृष्टिकोन बाळगतो. त्या नंतर या सर्व जिवमात्रांवर लक्ष केंद्रित ठेवून आणि त्या सर्वांसोबतचा आपला अतर्संबंध आणि परस्परनिर्भरता यांचे स्मरण ठेवून निश्चित क्रमाने मार्गक्रमण करतो. 

या जिवमात्रांवर लक्ष केंद्रित केलेले असतानाच आपण स्वतःला ते अनुभवत असलेल्या दुःखांचेही स्मरण करून देतो. बहुतांशी वेळा हे जीव दुःखी आणि निराश असतात आणि त्यांच्या जीवनात एखादे सुख लाभले तरी ते चिरंतन असत नाही आणि समाधान देत नाही. ते स्वतःला सुखी ठेवायचा प्रयत्न करतात, पण सुखप्राप्तीसाठी ते जे काही करतात, जसे सौंदर्य वाढवण्यासाठीचे प्रयत्न किंवा आणखी वस्तू जमा करण्यासारख्या गोष्टीही फार उपयुक्त ठरत नाहीत. उलट त्यातून अधिक समस्या उद्भवतात. अशा स्थितीत आपण स्वतःला ही जाणीवही करून देतो की आपण सर्वच जण जवळपास एकसमान स्थितीत आहोत आणि आपल्याला परस्पर सहकार्याची गरज आहे कारण प्रत्येक जण स्वार्थीपणे वागला तर प्रत्येकाला दुःख भोगावे लागेल. 

अशा रीतीने आपण स्वतःला करुणेची भावना अनुभवण्यायोग्य बनवतो, ज्याच्या आधारे आपण जिवांच्या त्या अमर्याद समुदायावर लक्ष केंद्रित करतो आणि त्यातील प्रत्येकाप्रति समतेच्या पातळीवर इच्छा बाळगतो की ते आपल्या दुःखातून मुक्त व्हावेत. आणि या शिवाय आपण अशी ही इच्छा बाळगतो की आपण स्वतः त्यांच्या दुःख निवारणासाठी व्यक्तिगत पातळीवर कृतिशील राहावे. 

विवेकी ध्यानधारणेसोबत आपण करुणा भावाने जिवमात्रांच्या विशाल समुदायावर लक्ष केंद्रित करतोच, पण सोबतच आपण त्या सर्व गोष्टींबाबत सचेतन राहतो ज्यांच्या साहाय्याने आपण करुणा भाव विकसित करू शकतो. यासाठी आपल्या करुणामय मनोवस्थेत स्थूल अभिज्ञान आणि सूक्ष्म विवेकासारखे घटक समाविष्ट असतात. स्थूल अभिज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला आपण लक्ष केंद्रित केलेल्या घटकांविषयीचे सर्वसाधारण ज्ञान होते, जसे त्यांच्या जीवनात दुःख आहे याची जाणीव..त्या नंतर सूक्ष्म विवेकाच्या माध्यमातून आपल्याला ते भोगत असलेल्या दुःखांच्या विविध प्रकारांची विवेकी जाणीव होती. या दोन्हीच्या एकत्रित अविष्कारातून आपण आपल्या लक्ष्याविषयीच्या सर्व बाबी ओळखू आणि समजू शकतो, जे एखाद्या विस्तृत, गहन बोधाप्रमाणे एका मनोवस्थेच्या रुपात संयोगित असतात, पण आपण प्रत्येक बिंदुविषयी आपल्या मनात स्वतंत्रपणे विचार करत नाही. जर आपले स्थूल अभिज्ञान आणि विवेक क्षीण झाला, तर आपण त्या सर्व बिंदुंविषयी पुन्हा विचार करतो आणि पुन्हा एकवार स्थूल अभिज्ञान, सूक्ष्म विवेक आणि एकाग्रतायुक्त करुणा भाव विकसित करतो. 

स्थिरतादायी ध्यानधारणा

आपण विवेकी ध्यानधारणा स्थिरतादायी ध्यानधारणेसोबत करतो. या अभ्यासात आपण त्याच करुणा भावाने त्या जिवमात्रांच्या विशाल समुदायावर लक्ष केंद्रित करतो, पण यावेळी त्यांच्या दुःखांच्या स्थूल अभिज्ञान किंवा सूक्ष्म विवेकाशिवाय, तरीही त्यांच्या दुःखांबाबत जाणीव ठेवून त्याबाबत सचेतन राहतो.

हीच ध्यानधारणेची प्रक्रिया असते; की तुम्ही एखादा भाव कशा रीतीने स्वीकारता , स्वतःला त्यासाठी कशा रीतीने सवय जडवता. मग यात भलेही आपण एखाद्या अशा ध्यानधारणे विषयी चर्चा करत असू, ज्यात तुम्ही एखाद्या घटकावर लक्ष केंद्रित केले आहे, किंवा अशी ध्यानधारणा ज्यात तुम्ही स्वतःला विशिष्ट मनोवस्थेत ठेवले आहे किंवा या दोन्हीचे एकत्रीकरण असलेली ध्यानधारणा असेल, या सर्व प्रक्रियांमध्ये आणि या सर्व विवरणांच्या दृष्टीतून ती एकसारखीच असते.     

विवेकी आणि स्थिरतादायी ध्यानधारणेमधील फरक

परमपूज्य दलाई लामा विवेकी आणि स्थिरतादायी ध्यानधारणेतील फरक तुमच्या मानसिक कार्यप्रणालीच्या ऊर्जेच्या संदर्भातून स्पष्ट करतात. दोन्ही ध्यानधारणेतील फरक स्पष्ट करण्यासाठीची ही एक सूक्ष्म आणि परिष्कृत पद्धत आहे. विवेकी ध्यानधारणेत तुमची ऊर्जा बहिर्गामी असते, याचा अर्थ ती एखाद्या गोष्टीच्या संपूर्ण विवरणाचे विवेकी आकलन करत असते. तर स्थिरतादायी ध्यानधारणेत तुमची ऊर्जा अंतर्गामी असते, अर्थात विवेकी ध्यानधारणेच्या परिणामस्वरूप उत्पन्न होणाऱ्या मुख्य बिंदुंविषयी सचेतन बोध करून घेऊन त्या आधारे त्या मनोवस्थेला समजून घेण्यासाठी वेळ दिला जातो. इथे विवेकी ध्यानधारणेप्रमाणे ऊर्जा विवरणामध्ये पसरली जात नाही, तर ती मुख्य बिंदुवर केंद्रित होते. 

करुणेच्या आधारे एखाद्या व्यक्तीला समजून घेणे – जिथे ऊर्जा एक प्रकारे पूर्णतः बाह्य विवरणावर केंद्रित असते – आणि त्या करुणेला स्थिर करणे, जिथे ऊर्जा अधिक केंद्रित असते, यातील फरक ओळखण्याची प्रक्रिया फार गुंतागुंतीची असते. चित्त शांत करण्याच्या प्रक्रियेतून मिळणाऱ्या लाभांपैकी हा एक लाभ आहे. जर तुम्ही तुमच्या आत चाललेला गोंधळ (सततची बडबड, सततच्या प्रतिक्रिया, सतत आयपॉडवर संगीत ऐकणे) शांत करण्यात अंशतः जरी यशस्वी झाला, तर तुम्ही तुमच्यातील ऊर्जेप्रति संवेदनशील बनता. आणि तुम्ही तुमची मानसिक ऊर्जा कोणत्या अवस्थेत आहे, हे ओळखू शकता.  

आपल्या उर्जेप्रति संवेदनशील होण्याची सुरुवात करण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे आपली ऊर्जा अव्यवस्थित आहे की शांत आहे, यावर आपले लक्ष केंद्रित करणे. उदाहरणार्थ, तुम्ही राग, भीती, चिंता, लोभ किंवा अहंकारासारख्या तणावदायी भावनांच्या प्रभावाखाली आहात की नाही, हे शोधण्याचा मार्ग म्हणजे तुमची ऊर्जा शांत आहे अथवा नाही हे पाहणे. एखाद्या व्यक्तीशी बोलताना जर तुमच्या पोटात अढी जाणवत असेल आणि तुमची ऊर्जा अस्ताव्यस्त असल्याची लक्षणे जाणवत असतील, तर तो तुमच्यातील तणावदायी भावनांना ओळखण्याचा चांगला संकेत आहे. शक्यता आहे की तुम्ही त्या व्यक्तीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत असाल किंवा एखाद्या गोष्टीविषयी आश्वस्त करत असाल किंवा एकूणच तुमच्या वागण्यात आक्रमकता असेल – यापैकी कोणत्याही गोष्टीचे अस्तित्व तुमची मानसिक अशांती स्पष्ट करते. एकदा का तुम्ही ओळखू शकलात की काहीतरी गडबड आहे, तेव्हा तुमची वैचारिक प्रकिया नव्याने आरंभ करण्याची ही संधी असते- अर्थात जसे तुमचे मन रिबूट करून तुमच्या परस्परांर्गत क्रियांमागील मनोभाव बदलून त्या जागी लाभकारक मनोभावांचा पर्याय स्वीकारता येईल. विशेषतः एखाद्या दुसऱ्या व्यक्तीसोबतच्या आदान-प्रदानाच्या प्रक्रियेदरम्यान आपल्यातील तणावदायी भावनांची जाणीव होण्याची क्षमता आपल्यात असायला हवी.

कालांतराने आणि सरावाने, आपण इतके संवेदनशील होत जातो की विवेकी ध्यानधारणेतील बाह्य व्याप्त ऊर्जा आणि स्थिरतादायी ध्यानधारणेतील अंतर्गामी व संकुचित ऊर्जेदरम्यानचा फरक करण्याची क्षमता आपल्यात विकसित होते. 

एकाग्रता मिळवण्यासाठी आवश्यक घटक

विवेकी ध्यानधारणा आणि स्थिरतादायी ध्यानधारणा दोन्हींसाठी एकाग्रता मिळवण्यासाठीच्या एकसारख्याच घटकांची आवश्यकता असते. शांतिदेवांनी आपल्या बोधिचर्यावतार ग्रंथात नैतिक आत्मानुशासन विकसित करण्याच्या संदर्भात या घटकांची चर्चा केली आहे. त्यामुळे सर्वप्रथम आपण या पद्धती आपल्या कृती आणि वाणी सारख्या स्थूल स्वभावात विकसित करण्याची गरज असते आणि त्यानंतर त्यांना आपल्या चित्तवृत्तींना लागू करायला हवे. 

दोन्ही प्रकारात ज्या मुख्य मानसिक घटकाची आवश्यकता असते, ती म्हणजे सचेतनता, जी एखादी विशिष्ट मनोवस्था किंवा वर्तन कायम ठेवण्यासाठी मानसिक डिंकासारखी काम करते. हे ‘आठवण ठेवणे’ या शब्दासारखेच असते, पण याचा संदर्भ मनाच्या कप्प्यातील एखादी आठवण बाहेर काढून तिची उजळणी करण्याशी नसतो. त्याचा अर्थ असा नसतो. त्याचा संबंध  एखाद्या बोधाची जाणीव ठेवण्याशी, त्याचे स्मरण करण्याशी असतो. आपण ज्या गोष्टीवर आपले लक्ष केंद्रित करत आहोत आणि ज्या रीतीने आपले चित्त त्याच्याशी जोडलेले आहे, त्याबाबत सातत्य ठेवण्यासाठी आपल्याला मानसिक डिंकाची गरज असते. 

सचेतनतेची ध्यानधारणा करतेवेळी आपण आपल्या मानसिक पकडीवर लक्ष ठेवतो. त्सोंगखापा सांगतात की या वेळी आपण स्थूल शोधाच्या मानसिक घटकाचा प्रयोग सामान्यतः या दृष्टिकोनातून करतो की आपली मनोवस्था तणावदायी भावना, मानसिक चंचलता किंवा मानसिक शिथिलतेच्या प्रभावाखाली तर आली नाही ना हे पाहता यावे. इथे ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण आहे की त्यांनी सूक्ष्म विवेकाच्या जागी स्थूल शोधाचा उल्लेख केला आहे. सूक्ष्म विवेकाच्या दृष्टिकोनातून तुम्ही बारकावे शोधण्यात गुंग होऊन जाऊ शकता, ज्यामुळे तुमचे ध्यान तुमच्या लक्षावर केंद्रित राहणार नाही. ध्यानधारणेत एक मोठी चिंता असते, ती म्हणजे तुमचे लक्ष विचलित होत राहते आणि त्यामुळे तुम्ही तणावग्रस्त होऊ शकता. त्यातून मोठी समस्या निर्माण होऊ शकते. दुसरीकडे तुम्ही तणावमुक्त आणि निष्काळजीपूर्वकही वागू इच्छित नसता, त्याने काही फायदा होत नाही. 

अशा वेळी आपल्याला सतर्कतेची गरज असते, जी एखाद्या अलार्म व्यवस्थेसारखी काम करते. जेव्हा आपल्या लक्षात येते की आपले लक्ष विचलित होत आहे, तेव्हा सतर्कता अलार्म वाजवून सावध करते की कुठेतरी सुधारणेची गरज आहे. आणि आपण ध्यान एकवटून आपली एकाग्रता परत मिळवतो. 

सुधारण्याची गरज असलेले दोष

आपण जे दोन दोष सुधारू पाहतो, ते दोन प्रकारात मोडतातः ‘मानसिक अस्थिरता’ आणि ‘मानसिक शिथिलता’. मानसिक अस्थिरतेच्या अवस्थेत आसक्ती किंवा लालसेमुळे आपले मन भरकटते. याचा प्रत्यय मनातल्या मनात चाललेल्या विचारातून किंवा एखाद्या मानसिक चलचित्रातून येऊ शकतो. बहुतांश पारंपरिक ग्रंथांमध्ये मानसिक अस्थिरता लैंगिक आकर्षणाच्या संदर्भातून चर्चिली गेली आहे, हे कदाचित यामुळे झाले असावे की त्यावेळचा श्रोतागण किंवा पाठक हा मुख्यतः ब्रह्मचारी भिक्षु आणि भिक्षुणीच असत, ज्यांच्यापुढे लैंगिक भावनांवर विजय मिळवण्याचे मुख्य उद्दिष्ट होते. पण आसक्ती ही अन्नाप्रति किंवा संगीताविषयीही किंवा अन्य एखाद्या गोष्टीप्रतिही असू शकते. तर दुसरीकडे मन भरकटण्यासाठी तणावदायी भावना, विचार किंवा अगदी एखादा आवाज किंवा संवेदी आगंतुकताही कारणीभूत असू शकते. सामान्यतः मानसिक भरकटीला ‘ध्यान भंग’ही संबोधले जाऊ शकते.

एखादे लक्ष्य किंवा भावनेवर लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टीने मानसिक अस्थिरतेच्या अनेक पातळ्या असू शकतात. 

  • स्थूल अस्थिरता – लक्ष्यावरील तुमची पकड पूर्ण निसटते आणि तुम्ही निरनिराळ्या गोष्टींच्या विचारात गुंतून जाता. सचेतनतेच्या रुपात काम करणारा मानसिक डिंक इतका दुबळा होतो की तुम्ही तुमचे लक्ष्य पूर्ण विसरून जाता. 
  • सूक्ष्म अस्थिरता – आपल्या लक्ष्यावरील पकड तुम्ही पूर्णपणे सोडत नाही, पण आपल्या लक्ष्यावरील पकड कायम ठेवलेली असतानाच तुम्ही अन्य गोष्टींच्या विचारातही गुंतून जाता. 
  • सूक्ष्मतम अस्थिरता – तुमच्या मनात एखाद्या अन्य गोष्टीचा विचार करण्याचा अंतर्प्रवाहही नसतो, पण एक सुप्त इच्छा छळत राहते की तुम्ही आपले लक्ष्य सोडून इतर गोष्टींचा विचार करावा. असे तेव्हा घडते जेव्हा मानसिक पकड अधिक घट्ट झालेली असते.

मानसिक शिथिलतेचा संबंध लक्ष्याविषयीच्या स्पष्टतेशी आहे, जी एखाद्या मानसिक  प्रतिमेच्या रूपातील असू शकते किंवा करुणेसारख्या मनोवस्थेतील भावनेच्या रूपात असू शकते.  

  • स्थूल शिथिलता – तुमच्या मनाची ‘प्रतिमा बनवण्याची क्षमता’ इतकी क्षीण होते की ती कोणत्याही प्रकारच्या मानसिक प्रतिमा किंवा भावना उत्पन्न करू शकत नाही. यासोबत आणखी दोन घटक जोडलेले असू शकतात, ज्यांना ‘अस्पष्ट मनोवस्था’ म्हणून ओळखले जाते, ज्यात शरीर आणि मनात जडत्वाची, पेंगुळलेपणाची किंवा निद्रितावस्थेची भावना असते. 
  • सूक्ष्म शिथिलता – यात प्रतिमा दिसते, पण त्यावरची पकड पुरेशी मजबूत नसल्याने त्यात स्पष्टता नसते. इथे आपण केवळ मानसिक प्रतिमेच्या संपूर्ण विवरणाच्या  स्पष्टतेविषयी बोलत नाही, तर करुणेसारख्या भावनेची एकाग्रताही नष्ट पावण्याची शक्यता असते. ही एखादी अशी अस्पष्ट भावना असू शकते, जसे ‘प्रेम, शांती, माझे सर्वांवर प्रेम आहे.’- तुम्ही असा भाव विकसित करत असता, पण त्यातील ती भावना सर्वांना त्यांच्या दुःखापासून आणि दुःख निर्माण करणाऱ्या कारणांपासून मुक्त करण्याच्या इच्छेवर केंद्रित नसते. आपल्याला हे लक्षात ठेवायला हवे की आपण जी मनोवस्था विकसित करू इच्छितो त्यात स्पष्टता हवी – ती अस्पष्ट असता कामा नये.
  • सूक्ष्मतम शिथिलता – या अवस्थेत आपल्या मनात एखादे लक्ष्य तयार होते तेव्हा आपले चित्त पूर्णतः त्यावर केंद्रित होते, पण त्यात सातत्य ठेवण्यासाठी आवश्यक असणारी पकड मजबूत नसते आणि ती पुरेशी स्पष्ट आणि जिवंतही नसते. ती प्रत्येक क्षण स्पष्ट आणि ताजी असायला हवी, एखाद्या शिळ्या भाकरीप्रमाणे सुकलेली आणि कठीण असता कामा नये. 

जेव्हा आपण ‘स्तंभित’ होण्याविषयी बोलतो, तेव्हा त्याचा संदर्भ वर सांगितलेल्या कोणत्याही दोषाशी असू शकतो, त्यामुळे त्यापैकी कोणताही दोष उत्पन्न होताच, तो ओळखणे गरजेचे असते. सर्वात आधी तर तुम्ही आपले लक्ष्य किंवा चित्तावस्थेवर मानसिक पकड घट्ट करता. आणि मग सचेतनतेच्या मानसिक डिंकाच्या मदतीने ती पकड सुटू देत नाही. 

सफल ध्यानधारणेसाठी हा सर्वात महत्त्वपूर्ण घटक आहे. पकड असू द्या, पण फार घट्टही नको आणि फार सैलही नको. उदाहरणार्थ, तुम्ही मर्यादीत संतुलित आहार स्वीकारला असेल आणि अशा अवस्थेत जेव्हा तुम्ही एखाद्या बेकरी समोरून जात असाल, जिथे खिडकीत सुंदर केक ठेवलेले असतील, तेव्हा तुम्हाला तुमच्या संतुलित आहार घेण्याच्या लक्ष्यावर पकड कायम ठेवायला हवी, कारण असे होऊ नये की केक बघून तुम्ही लगेच बेकरीत जाल आणि चॉकलेट केकचा तुकडा विकत घ्याल. किंवा असेही होऊ शकते की तुम्ही जेवायला गेला आहात आणि तिथे पंक्तीत आइसक्रीम दिले जात आहे, तेव्हा तुम्ही ‘मी आभारी आहे. पण मला आइसक्रीम नको’ असे म्हणत आपल्या संतुलित आहाराच्या लक्ष्यावरील पकड कायम राखाल.

त्यासाठी आपण आपल्या मार्गावरून विचलित तर होत नाही ना हे ओळखता यायला हवे. ‘आपल्या लक्ष्यावर चित्त केंद्रित करण्यात आणि त्यावर पकड ठेवण्यात माझ्याकडून काही चूक तर होत नाही ना? माझ्या मनात लक्ष्य किंवा इच्छित भावनांच्या उत्पत्तीच्या दृष्टीने काही दोष तर नाही ना?’ जर आपल्याला एखादी त्रुटी लक्षात आली, तर सतर्कता आपल्यातील आंतरिक अलार्म वाजवते आणि सावधगिरी आपले ध्यान पुन्हा लक्ष्यावर केंद्रित करण्यास मदत करते. अशा वेळी आपली स्थिती एखाद्या भ्रमित अवस्थेतील पोलीसासारखीही होऊ नये, जिथे पोलीस असलेला ‘मी’ आणि साधक असलेला ‘मी’ यांच्यामध्ये द्वैत निर्माण होईल. ही दुविधा टाळण्यासाठी आपल्याला स्वसंदर्भातल्या शून्यत्वाची जाणीव असायला हवी – अशा असंभव दुविधेत आपल्या अस्तित्वाला काही अर्थ राहत नाही.   

ध्यानधारणेत शिकलेल्या कौशल्यांचा व्यावहारिक अंगीकार 

आपल्या दैनंदिन जीवनात आपण कोणत्याही लक्ष्यावर सचेतनतेने आणि एकाग्रतेने लक्ष केंद्रित करण्याची गरज असते. त्यासाठीच आपण ध्यानधारणा करतोः की जेणेकरून आपण विकसित केलेल्या लाभदायी सवयी प्रत्यक्ष जीवनात लागू करू शकू. उदाहरणार्थ, आपण एखाद्या व्यक्तीशी बोलत असू किंवा त्यांचे म्हणणे ऐकत असू तर आपल्याला त्यावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता असते. आपण आपले चित्त एकाग्र ठेवण्याची गरज असते आणि मनातल्या मनात जेवणाचा किंवा ‘तुझी बडबड बंद कर आणि जा इथून’ असा विचार करता कामा नये. म्हणून वैयक्तिक संवाद, आपले काम आणि आपला अभ्यास, ही क्षेत्रे एकाग्रतेच्या ध्यानधारणेसाठी सर्वात उपयुक्त आहेत. 

चार आधारस्तंभ

ध्यानधारणेत एकाग्रता साध्य करण्यासाठी ज्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या आहेत सामर्थ्य (अनेकदा त्याला चिकाटीही संबोधले जाते) आणि संयम. सामर्थ्य म्हणजे एखाद्या सकारात्मक उद्दिष्टाच्या प्राप्तीसाठीचे वीरतापूर्ण साहस आणि प्रयत्न. तर संयम म्हणजे क्रोधित किंवा निराश न होता कठीण परिस्थिती आणि समस्यांचा सामना करण्याची क्षमता. शांतिदेव आपल्या बोधिचर्यावतार ग्रंथात सामर्थ्य विकसित करण्यास साहाय्यक ठरणारे सहा घटक स्पष्ट करतात. त्यांना चार आधारस्तंभ आणि दोन बल म्हणूनही ओळखले जाते, आणि त्यांनी समजून घेणे आणि उपयोगात आणणे उपयुक्त असते.

पहिला आधारस्तंभ असतो दृढ विश्वास किंवा दृढ आकांक्षा. ‘आकांक्षा’ एखाद्या प्रबळ इच्छेसाठी वापरला जाणारा पर्यायी शब्द आहे. आणि त्याच्या व्याख्येत एखाद्या विशिष्ट उद्दिष्टाच्या प्राप्तीमुळे होणारे लाभ आणि ते उद्दिष्ट प्राप्त न झाल्याने होणारे नुकसान याबाबतचा दृढ विश्वास अपेक्षित असतो. त्यामुळे ते उद्दिष्ट प्राप्त करण्याच्या ध्येयापासून विचलितही होता येत नाही किंवा त्यापासून पाठ फिरवता येत नाही. जेव्हा आपण अशा विभिन्न प्रकारच्या मनोवस्थांविषयी वाचतो, ज्या बौद्ध साधनेच्या माध्यमातून साध्य करू इच्छितो, तर त्यात मुख्य मुद्दा हा त्यांच्या प्राप्तीमुळे होणारे लाभ किंवा ते साध्य न झाल्याने होणारे नुकसान यावरच भर असतो. त्यांचा अभ्यास महत्त्वपूर्ण आहे. शांतिदेव यांनी आपल्या ग्रंथात हेच स्वरूप स्वीकारले आहे, ज्यातील पहिले प्रकरण बोधिचित्तविषयक आहे. आपण ती मनोवस्था प्राप्त झाल्याने होणाऱ्या लाभांविषयी आश्वस्त असतो आणि त्यातून आपल्याला ते साध्य करण्यासाठीची ऊर्जा आणि आनंद प्राप्त होतो. जेव्हाजेव्हा आपण निराश होतो, तेव्हा स्वतःला ती चित्तावस्था विकसित केल्याने होणाऱ्या लाभांची आठवण करून देणे चांगले आहे.

पुढील आधारस्तंभ दृढता किंवा आत्मविश्वास हा आहे. ‘दृढते’चा अर्थ साधनेबाबत ठाम विश्वास आणि चिकाटी असणे, जी आपले उद्दिष्ट साध्य करण्यास आपण पात्र आहोत का हे तपासण्यातून आणि त्याबाबत खरोखरच आश्वस्त होण्यातून येते. आत्मविश्वासासोबत आपण दृढतेने साधना करतो, मग भलेही आपल्या प्रगतीत चढउतार येवोत – कारण चढउतार येणे हे वास्तविक आहे. एखाद्या दिवशी आपली साधना चांगली होईल, तर कधी असफल होईल. एखाद्या दिवशी आपण साधनेसाठी उत्साहित असू, तर एखाद्या दिवशी आपल्याला अजिबात साधना करावी वाटणार नाही. जर आपण त्याच्या लाभांप्रति आश्वस्त होऊ आणि आपल्यात चिकाटी असेल, कारण चिकाटीला एखाद्या सुरक्षा कवचाप्रमाणे वर्णिले गेले आहे, तेव्हा आपण विचार करू की, ‘काही फरक पडत नाही. जरी माझ्या साधनेत चढउतार जाणवला, तरी मी रोज नित्याने साधना करत राहीन. आणि मला खात्री आहे की कालांतराने ते शक्य होईल.’              

जेव्हा आपण पुढे मार्गक्रमण करतो आणि दीर्घकाळ साधना करतो, तेव्हा आपण स्वतःतील एकाग्रता वाढली असल्याचे अनुभवू शकतो आणि त्यातून आपण आपला पुढील आधार अर्थात ‘आनंद’ विकसित करतो. आपण थोड्याशा प्रगतीने समाधानी नसतो, त्यामुळे आत्मसंतुष्टीच्या जाणिवेसह अधिकाधिक प्रगती साध्य करण्यात आनंद मानतो. परिणामी अर्थातच आपल्याला अधिक आनंद प्राप्त होतो कारण आपला मूळ उद्देशच दुःख निवारण असतो. जेव्हा आपले चित्त कमी विचलित होईल, कमी अस्वस्थ आणि अशांत असेल, तेव्हा अर्थातच आपण आनंदी असू. ही संभावना समजल्यानंतर आपला उत्साह आणखी वाढतो आणि आपण आपल्या साधनेत अधिकाधिक प्रगती साध्य करण्याप्रति अधिक उत्साही होतो. 

चौथा आधार स्तंभ विश्राम हा असतो, म्हणजे थकल्यावर काही काळ विसावा घेणं. हा आळशीपणा नाही, तर स्वतःला ताजेतवाने करण्यासाठीची विश्रांती असते. स्वतःवर नको इतका ताण टाकण्याइतके वाईट दुसरे काही नाही कारण त्यातून थकायला होते. अतिरिक्त ताण आपल्या शरीरातील ऊर्जेचे संतुलन बिघडवतो- जसे फुगा इतका दाबला जातो की तो फुटून जाईल. आपण स्वतःच्या अवस्थेचे निरीक्षण करणे आवश्यक असते, जेणेकरून आपल्याला केव्हा विश्रांतीची गरज आहे, ते आपल्याला ठरवता येईल- आणि अपराधीही वाटणार नाही. त्यामुळे ज्या गोष्टीतून आपल्याला निवांतपणा जाणवेल आणि तणावदायी भावनाही जाणवणार नाहीत, अशी गोष्ट निवडणे योग्य ठरते. अर्थात व्यक्तिगणिक ही गोष्ट वेगळी असेल. हेच सामर्थ्याचे चार आधारस्तंभ आहेत. 

दोन बल

आता आपण दोन बलांविषयी बोलणार आहोत. पहिला आहे सहज स्वीकार, ज्याचा अर्थ आहे की आपल्या लक्ष्यापर्यंत पोहचण्यासाठी आपल्याला जी साधना करायची आहे आणि त्यासाठी ज्या गोष्टींचा त्याग करायचा आहे, त्याचा सहज स्वीकार करावा. आपण आपली वास्तव परिस्थिती पाहू शकतो आणि स्वतःला अशांतकारी भावनांसारख्या गोष्टींपासून मुक्त करताना येणाऱ्या अडचणींचा सहज स्वीकार करतो. आपण लक्ष्य ठरवतेवेळीच व्यावहारिक दृष्टिकोन ठेवायला हवा, जेणेकरून नंतर आपल्याला हे पाहून आश्चर्य वाटू नये की ते काम किती कठीण आहे.

जसे परमपूज्य दलाई लामा नेहमी सांगतात, ‘जर कुणी बौद्ध गुरू किंवा एखादी व्यक्ती असा दावा करत असेल की बौद्ध धर्मातील साधना खूप सोपी आहे आणि ती कमी वेळात सहजसाध्य आहे – तर तुम्हाला ती व्यक्ती आणि त्याच्या उद्देशाबद्दल शंका घ्यायला हवी, कारण बौद्ध साधना बिलकुलच सोपी आणि सहजसाध्य नाही. आपण आपल्या तणावदायी भावनांना इतके सरावलेले असतो की एखादी गोळी घेऊन त्यांच्यापासून मुक्त व्हावे, असा एखादा सोपा मार्ग इथे नाही.’ माझे आणखी एक गुरू गेशे न्गवांग धारग्ये कायम सांगायचे, ‘जर एखादी व्यक्ती बौद्ध धर्मातील सोप्या आणि जलद परिणाम देणाऱ्या मार्गांकडे आकर्षित होत असेल, तर त्यासाठी आळस कारणीभूत असतो. असे लोक त्यासाठी आवश्यक असणारे परिश्रम करण्यासाठी तयार नसतात.’ 

दुसरे बल नियंत्रण मिळवण्यासंबंधी असते, ज्याचा अर्थ स्वतःवर नियंत्रण मिळवून, आपल्याला इच्छित असलेल्या उद्दिष्टप्राप्तीसाठी प्रयत्न करणे. आपला आळशीपणा किंवा एखाद्या तणावदायी भावनेला आपल्यावर नियंत्रण न मिळवू देता, आपले उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठीची आकांक्षा नियंत्रण मिळवते. आपण स्वतःला सांगतो, ‘बाळबोध वागणे बंद कर, स्वतःला सावर आणि कामाला लाग’   

थकलेला की आळशी?

एखाद्याला प्रश्न पडू शकतो की आपण थकवा आणि आळसामध्ये कसा काय फरक करू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे आळशीपणाचे अनेक प्रकार असतात, जसे एखाद्या किरकोळ गोष्टीमुळे आपले लक्ष विचलित होऊ शकते. आपण इतके आळशी असतो की आपली ध्यानधारणा किंवा साधना आपल्याला करावी वाटणार नाही, पण त्याजागी आपण टेलीव्हिजन कार्यक्रम किंवा इंटरनेट सर्फिंगमुळे विचलित होऊ शकतो. एक दुसऱ्या प्रकारचा आळस असतो, ज्यात आपण नंतर करू म्हणून गोष्टी टाळतो, आणि त्यात तुम्ही गोष्टी कायम पुढे ढकलने शक्य असल्याचा विचार करता. आणखी एक अशा प्रकारचा आळसही असतो जिथे तुम्ही कारणे शोधत राहता, जसे, ‘मी खरेच हे करू शकत नाही.’

आपण थकलेले असतो तेव्हाही आपल्याला काम करण्याची इच्छा असतेः ‘मला खरेच हे करायचे आहे, पण मला आत्ता खरेच झोप येत आहे, म्हणून मी थोडी विश्रांती घेईन आणि पुन्हा आपल्या कामास लागेन.’ इथे आपण बहाणा करत नसतो किंवा निष्काळजीपणाही करत नाही. आळशीपणात ही पुन्हा कामाला लागण्याची इच्छा नसते.  

सारांश

ध्यानधारणा करणे सोपे नाही आणि जर कुणी दावा करत असेल की खूप जलद असाधारण ज्ञानप्राप्तीचे सोपे मार्ग उपलब्ध आहेत, तर आपल्याला अशा व्यक्तीपासून सावध राहायला हवे. कारण सर्वसाधारणपणे असे कधीच होत नाही.

आपली ध्यानधारणा एक सक्रिय प्रक्रिया असणे गरजेचे असते, सुस्त किंवा कंटाळवाणी असता कामा नये, कारण ज्या शिकवणींचे आपण श्रवण आणि मनन केलेले असते, त्यांचे सखोल आकलन करता येईल. जर आपण हे दिन प्रतिदिन, वर्ष दरवर्ष करु शकलो, तर शिकवण आपल्यात खोलवर रुजेल, यात शंकाच नाही आणि जेव्हा समस्या किंवा नकारात्मक भावना उद्भवतील आणि त्या उद्भवणारच असतात, तेव्हा आपण त्यांचा सहज सामना करू शकू. 

Top