सम्यक प्रयास, सचेतनता आणि एकाग्रता

संक्षिप्त आढावा

आपण तीन साधना आणि त्यांच्या अंगीकारासाठी आवश्यक अष्टांगिक मार्गांची आपल्या दैनंदिन जीवनातील उपयुक्तता याविषयी चर्चा करत आहोत. हे तीन अभ्यास आहेतः

  • नैतिक अनुशासन
  • एकाग्रता
  • विवेकशील जागरूकता

आपण नैतिक अनुशासन विकसित करण्यासाठी सम्यक वाणी, कार्य, व्यवहार आणि जीविताचा अंगीकार करतो. आता आपण एकाग्रतेसंदर्भातील प्रशिक्षणावर नजर टाकू, ज्यात सम्यक प्रयास, सम्यक सचेतनता आणि सम्यक एकाग्रतेची आवश्यकता असते.

सम्यक प्रयास म्हणजे हानिकारक विचारांच्या साखळीतून मुक्तता मिळवून ध्यानधारणेसाठी उपयुक्त मनोवस्था प्राप्त करणे. 

सचेतनता एखाद्या मानसिक डिंकासारखी काम करते, जी एखादी गोष्ट धरून ठेवते आणि आपल्याला एखादी गोष्ट विसरण्यापासून वाचवते. 

  • आपल्या शरीराचे, भावनांचे, मनाचे आणि मानसिक घटकांचे मूळ स्वरूप न विसरणे, जेणेकरून ते आपलं चित्त भरकटू देणार नाहीत.
  • आपल्या नैतिक मार्गदर्शिका, नियम आणि आपण काही प्रतिज्ञा केल्या असतील, तर त्या विसरू न देणे
  • ज्या उद्दिष्टांवर आपण लक्ष केंद्रित केले आहे, ते न विसरणे

त्यामुळे आपण ध्यानधारणा करत असू, तर आपल्याला सचेतनतेची आवश्यकता असते, जेणेकरून आपले आपल्या उद्दिष्टांवरचे लक्ष विचलित होणार नाही. जर आपण एखाद्या व्यक्तीसोबत संवाद साधत असू, तर आपण त्या व्यक्तीवर आणि त्याच्या बोलण्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असते.

एकाग्रताचा अर्थ एखाद्या उद्दिष्ट्यावर ध्यान केंद्रित करणे. त्यामुळे जेव्हा आपण एखाद्याचे बोलणे ऐकत असू, तर त्याच्या अर्थ आपले लक्ष त्याच्या बोलण्यावर, त्याच्या दिसण्यावर, त्यांच्या वागण्यावर एकाग्र झाले आहे. सचेतनता आपल्याला एकाग्र राहण्यासाठी मदत करते, ती एखाद्या डिंकासारखी तिथे बांधून ठेवते, जेणेकरून आपण विचलित होणार नाही किंवा सुस्तावणार नाही. 

प्रयास

अष्टांगिक मार्गाचे हे पहिले तत्त्व आहे, जे आपण एकाग्रता विकसित करण्यासाठी वापरतो. आपण एकाग्रतेला बाधक ठरणारे विचलित करणारे विचार आणि मनोवस्थांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि चांगले गुण विकसित करण्यासाठी प्रयत्न करतो. सर्वसाधारणपणे, जर आपल्याला जीवनात काही हवे असते, आपल्याला ते मिळवण्यासाठी प्रयत्नांची करण्याची गरज असते. शांत बसून राहून गोष्टी मिळत नाहीत किंवा कुणी ते तितके सहजसाध्य आहे, असेही सांगितलेले नाही. पण आपण इतरांबाबतची आपली कृती, आचार आणि विचारांच्या संदर्भातील नैतिक अनुशासनाच्या माध्यमातून क्षमता विकसित केली, तर त्यातून मानसिक आणि भावनिक समतोल साध्य करण्यासाठीच्या प्रयत्नांसाठीची ताकद प्राप्त होते.  

चुकीचे प्रयत्न

आपलं चित्त विचलित करणाऱ्या आणि एकाग्रतेला बाधा पोहचवणाऱ्या हानिकारक विचारशृंखलांवर लक्ष केंद्रित करणे म्हणजे चुकीच्या दिशेने प्रयत्न करणे होय. हानिकारक विचारांचे तीन प्रमुख प्रकार असतातः 

  • लोभीपणे विचार करणे
  • द्वेषपूर्ण विचार करणे
  • शत्रुत्वाच्या भावनेतून विकृत विचार करणे

लोभीपणे विचार करणे 

इतरांकडे असलेल्या गोष्टी, त्यांनी साध्य केलेल्या गोष्टी आणि समाधानाबाबत मत्सराच्या भावनेतून लोभी विचार करणे. अशा मानसिकतेत तुम्ही विचार करता की ‘ते मला कसे मिळेल?’ तुमच्यात असलेल्या आसक्तीतून अशा विचारांचा जन्म होतो. आपल्याकडे नसलेल्या गोष्टी, मग ते यश असो, सुंदर जोडीदार असो, नवी कार असो किंवा आणखी काहीही, ते दुसऱ्याकडे असेल, तर आपल्याला ते सहन होत नाही. आपण सतत त्याचा विचार करतो आणि ती फार त्रासदायक मनोवस्था असते. त्यामुळे आपली एकाग्रता पूर्णतः भंग पावते, हो ना ?

परिपूर्णतावादही या घटकात समाविष्ट होऊ शकतो – ज्यात आपण कायम स्वतःला परिपूर्ण ठेवण्यावर भर देतो. हे अगदी एखाद्याबाबत मत्सर बाळगण्यासारखेच आहे. 

द्वेषपूर्ण विचार करणे

इतरांना इजा पोहचवण्याचा विचार म्हणजे द्वेषपूर्ण विचार होय, जसे ‘या माणसाने मला आवडणार नाही, असे काही केल्यास मी बदला घेईन’ असा विचार. आपण कदाचित पुढील वेळी तो माणूस भेटल्यावर तसे बोलू असा विचारही करून ठेवू किंवा तो आपल्याला बोलला त्याचवेळी आपण प्रत्युत्तर का दिले नाही, याबाबत पश्चातापही करू. आपण ते आपल्या मेंदूतून काढू शकत नाही आणि सतत त्याचा विचार करत राहतो. 

शत्रुत्वाच्या भावनेतून विकृत विचार करणे 

शत्रुत्वाच्या भावनेतून विकृत विचार करणे म्हणजे, जसे, कुणी स्वतःत सुधारणा घडवण्यासाठी प्रयत्नशील असेल किंवा इतरांना मदत करण्यासाठी प्रयत्नशील असेल, तर आपण विचार करू की, ‘ते मूर्ख आहेत – ते जे काही करत आहेत, ते फायद्याचं नाही. सगळ्यांची मदत करत बसणे मूर्खपणाचे आहे.’

काही लोकांना खेळ आवडत नाहीत आणि ते जेव्हा इतर खेळणाऱ्या व्यक्तींना, टीव्हीवर फुटबॉल बघणाऱ्यांना किंवा प्रत्यक्ष खेळ बघायला जाणाऱ्या लोकांना बघतात, तेव्हा ते त्यांना मूर्ख समजतात. पण खेळ आवडण्यात काहीच हानिकारक नाही. खेळ खेळणे मूर्खपणाचे आणि वेळ वाया घालवण्याचे काम समजणे म्हणजे ती विकृत मनोवस्था असते.

किंवा कोणीतरी गरिबांना पैसे देत असेल किंवा मदत करत असल्यास तुम्ही विचार करता की ‘ओह, तुम्ही फारच मूर्खासारखं वागत आहात.’ जर आपण सतत इतर लोक कसे मूर्ख आहेत आणि ते जे काही करतात , अविवेकी आहे, असा विचार करत असू, तर आपण कधीच एकाग्र होऊ शकणार नाही. अशा प्रकारच्या विचारांपासून आपल्याला मुक्ती मिळवण्याची गरज असते. 

सम्यक प्रयास

सम्यक प्रयास म्हणजे आपली ऊर्जा हानिकारक, विघातक विचारशृंखलांपासून सकारात्मक लाभदायी गुणांच्या विकासाकडे वळविणे. त्यासाठी आपण पाली भाषेत ज्याला ‘चार सम्यक प्रयत्न’ म्हणतात, त्यासंदर्भातून बोलणार आहोत. संस्कृत आणि तिबेटी संस्कृतीत त्यांना ‘सम्यक मुक्तीच्या प्राप्तीसाठीची चार तत्त्वे’ संबोधलं जातं. दुसऱ्या शब्दात सांगायचं झाल्यास आपल्या कमतरतांवर मात करण्यासाठीचे चार शुद्ध प्रयत्नः 

  1. यात प्रथम आपण ज्या अवस्था अद्याप विकसित केलेल्या नाहीत, अशा नकारात्मक गुणांच्या विकासापासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करतो. उदाहरणार्थ, आपल्याला लगेच व्यसन जडत असेल, तर आपण ऑनलाइन  मुव्ही स्ट्रीमिंग सेवेचं सदस्यत्व घेणार नाही, ज्यात तुम्ही एका मागोमाग एक वेबसीरिज पाहत संपूर्ण दिवस खर्च कराल. असं करणं फारच नुकसानदायी आणि एकाग्रतेचा भंग करणारं ठरेल. 
  2. नंतर आपण आपल्यात आधीच विकसित झालेल्या नकारात्मक गुणांपासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रयत्न करू. त्यामुळे आपल्याला एखाद्या गोष्टीचे व्यसन जडलेले असेल, तर ते एका मर्यादेत ठेवण्यास मदत होईल. उदाहरणार्थ आपल्याला असे लोक माहीत असतात, ज्यांना त्यांच्या आयपाॅडचं व्यसन असतं आणि ते संगीत न ऐकता कोठेही जाऊ शकत नाहीत. जणू ते शांततेलाच घाबरत असतात. कोणताही विचार करायला घाबरत असतात, म्हणून त्यांना सतत संगीताची साथ हवी असते. अर्थात, तुम्ही वाहन चालवत असाल तर तुम्हाला झोप लागू नये म्हणून मोठ्या आवाजातील संगीत उपयोगी ठरते किंवा व्यायाम करतानाही उपयोगी ठरते आणि सौम्य संगीत काम करतेवेळी तुमचे चित्त स्थिर ठेवू शकते, पण संगीत तुम्हाला एखाद्यासोबत संवाद साधताना लक्ष केंद्रित करण्यासाठी फायदेशीर ठरू शकत नाही. उलट, त्यामुळे लक्ष विचलित होते.
  3. त्यानंतर आपल्याला चांगले सकारात्मक गुण विकसित करण्याची आवश्यकता असते.
  4. आपल्यात आधीपासून अस्तित्वात असलेले चांगले गुण कायम ठेवण्यासाठी आणि ते वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करतो.  

याविषयी विचार करणे आणि त्यांच्या व्यावहारिक वापरांसाठी प्रयत्न करणे मनोरंजक आहे. अगदी माझच उदाहरण पाहायचं झालं तर माझी संकेतस्थळाबाबत एक वाईट सवय आहे. माझ्याकडे यावर काम करणारे जवळपास ११० लोक आहेत, ज्यांच्याकडून मला भाषांतराच्या आणि संपादित केलेल्या फाइल्सच्या अनेक इमेल येत असतात - दिवसभरात मला अनेक इमेल येत असतात. माझी वाईट सवय म्हणजे मी त्या मेल मला आणि माझ्या साहाय्यकांना लगेच सापडतील अशा रीतीने विभागवार वेगवेगळ्या फोल्डरमध्ये ठेवण्याऐवजी डाऊनलोड करून एकाच फोल्डरमध्ये ठेवत होतो. ही खरोखरच फार वाईट सवय होती. कारण माझ्या असमर्थतेमुळे त्या इमेल शोधण्यात खूप वेळ वाया जात होता आणि कामावर लक्ष केंद्रित करताना अडचण होत होती. त्यामुळे इथे कोणता चांगला गुण अपेक्षित होता? अशी व्यवस्था तयार करणं, ज्यामुळे कोणतीही फाइल आली की ती लगेच योग्य फोल्डरमध्ये जाईल. यातून आळसाने गोष्टी इतस्तः विस्कटण्याऐवजी सुरुवातीपासूनच गोष्टी त्यांच्या योग्य जागी ठेवण्याची एक सवय विकसित होते 

वरील उदाहरणात आपल्याला एक नकारात्मक गुण, अनुत्पादक सवय आणि सकारात्मक गुण याविषयी माहिती मिळाली. त्यामुळे आपण नकारात्मक गुण टाळण्यासाठी प्रयत्न केले आणि एक फाइल व्यवस्था तयार केली, ज्यामुळे आपला नकारात्मक गुण कायम राहणार नाही. साधनेच्या एका सामान्य स्तरावर आपण अशाच अभ्यासाविषयी बोलत आहोत. 

एकाग्रतेतील पाच अडथळ्यांवर विजय मिळवणे 

सम्यक प्रयत्नात एकाग्रतेच्या मार्गातील पाच अडथळ्यांवर विजय मिळवण्यासाठीचे प्रयत्नही समाविष्ट आहेत, ते खालीलप्रमाणे आहेतः 

पाच ज्ञानेंद्रियांमार्फत मिळणाऱ्या अनुभवांपैकी कोणताही अनुभव घेण्याचा संकल्पः

सुंदर दृश्य, आवाज, गंध, चव आणि शारीर अनुभव हे पाच इंद्रिय अनुभव आहेत. या अडथळ्यांमधून बाहेर पडण्यासाठी आपण प्रयत्न करतो, तो एखाद्या गोष्टीतील एकाग्रता कायम ठेवण्यासाठी असतो, जसे आपल्या कामाविषयी, आपण एकाग्र व्हायचा प्रयत्न करत असतो, पण आपण काही विचारांनी विचलित होऊ शकतो, जसे ‘मला चित्रपट पाहायचा आहे.’ किंवा ‘मला फ्रिजमधील खायला घ्यायचे आहे.’, तर इथे आपण इंद्रिय अनुभवांकडे लक्ष केंद्रित केले आहे, जसे खायला हवे असणे, संगीत ऐकावेसे वाटणे, इत्यादी. आपल्यात जेव्हा अशा इच्छा उद्भवतात, तेव्हा अशा गोष्टी साध्य न करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असते, जेणेकरून आपण केंद्रित राहू. 

द्वेषपूर्ण विचार 

हे दुसऱ्याला नुकसान पोहचवण्याच्या विचाराविषयी आहे. जर आपण कायम द्वेषपूर्ण विचार करत असू की ‘या माणसाने मला त्रास दिला आहे. मला तो अजिबात आवडत नाही. मला त्याचा कसा बदला घेता येईल?’ - हा एकाग्रतेतला मोठा अडथळा असतो. आपण इतरांविषयीच्या आणि स्वतःविषयीच्याही अशा विनाशक विचारांपासून स्वतःला रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असते. 

मानसिक गोंधळ आणि सुस्ती 

ही अशी अवस्था असते, ज्यात आपले मन गोंधळलेले असते आणि स्पष्ट विचार करू शकत नाही. सुस्तीच्या अवस्थेत अर्थातच आपण पेंगुळलेले असतो. आपण प्रयत्नपूर्वक त्याचा सामना करायला हवा. भलेही आपण काॅफी घेऊन किंवा मोकळ्या हवेत जाऊन जाणीवपूर्वक ही अवस्था टाळण्याचा प्रयत्न केला तरी हरकत नाही. पण त्या अवस्थेत लक्ष केंद्रित करणे फारच कठीण होत असेल तर त्यासाठी एखादी सीमा, मर्यादा निश्चित करायला हवी. जर तुम्ही घरी काम करत असाल तर, ‘मी एक डुलकी काढेन किंवा वीस मिनिटांचा ब्रेक घेईन.’ आणि तुम्ही जर कार्यालयात असाल तर, ‘मी काॅफीसाठी दहा मिनिटांचा ब्रेक घेईन’, अशा रीतीने एक मर्यादा निश्चित करा आणि कामाला लागा. 

मनाचा लहरीपणा आणि पश्चाताप

लहरीपणा म्हणजे आपले मन एका गोष्टीवरून दुसऱ्या गोष्टीवर उडत राहते, फेसबुक, युट्युब किंवा आणखी काही. आणि पश्चाताप म्हणजे मनात उद्भवणारी अपराधी भावना, जसे ‘मी असे केले, त्यामुळे मला फार वाईट वाटते आहे.’ अशा पद्धतीचा विचार विचलित करणारा असतो आणि आपल्याला एकाग्रतेपासून दूर ठेवतो.  

अस्थिर चित्त आणि शंकेखोर स्वभाव

शेवटी आपल्याला आपले अस्थिर चित्त आणि शंकेखोर स्वभाव कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. ‘मी काय करायला हवे?’ ‘मी जेवणात काय खाऊ, मी हे खाऊ की ते खाऊ?’ अशा पद्धतीच्या निर्णय घेण्यातल्या गोंधळामुळे खूप वेळ वाया जाऊ शकतो. आपले मन कायम शंकेखोर स्वभावाने भरलेले असल्यास आपण एकाग्र होऊ शकणार नाही, त्यामुळे अस्थिर चित्त आणि शंकेखोर स्वभावापासून मुक्ती मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करण्याची गरज असते.  

त्यामुळे सम्यक प्रयास हा योग्य प्रयत्न करण्याशी संबंधित आहेः 

  • तणावदायी आणि विनाशक विचारांपासून दूर राहणे
  • आपल्या वाईट सवयी आणि कमतरतांवर विजय मिळवणे
  • आपल्यामध्ये पूर्वीपासून असलेले चांगले गुण आणि आवश्यक असलेले गुण विकसित करण्यासाठी प्रयत्न करणे
  • एकाग्रतेतील अडथळ्यांवर विजय मिळवणे

सचेतनता 

एकाग्रतेशी संबंधित अष्टांगिक मार्गांचा पुढचा घटक सचेतनता आहे. 

  • सचेतनता  एखाद्या मानसिक डिंकासारखी असते. जेव्हा तुम्ही चित्त एकाग्र करण्याचा प्रयत्न करता, सचेतनता विचलित करणाऱ्या गोष्टींना धरून ठेवते. या सचेतनतेच्या नियंत्रणामुळे तुम्ही वाहवत जात नाही. 
  • याला सतर्कतेची  जोड असते. तुमचे चित्त भरकटले किंवा सुस्त झाले तर ती लगेच तुम्हाला सतर्क करते. 
  • त्यानंतर आपण ध्यानाचा प्रयोग करतो. आणि आपल्या ध्यानाला महत्त्व देतो. 

इथे आपण आपले शरीर, भावना, मन आणि विविध मानसिक घटकांबद्दल आपला दृष्टिकोन काय आहे, यावर ध्यान केंद्रित करतो. आपले शरीर आणि भावनांसंबंधीच्या गैर विचारांना आपण धरून ठेवत नाही, त्यांना जाऊ देतो, कारण आपण तसे केले नाही, तर आपल्या एकाग्रतेत खंड पडू शकतो. त्यामुळे इथे सचेतनतेच्या अयोग्य आणि योग्य प्रकारांकडे लक्ष पुरविणे आवश्यक आहे. 

आपल्या शरीरासंबंधीचा दृष्टिकोन

जेव्हा आपण शरीराविषयी बोलतो, त्याचा संदर्भ आपले मूळ शरीर, त्याच्या इंद्रिय संवेदना आणि शारीरिक घटकांशी असतो. निसर्गतः आपले शरीर आल्हाददायक, स्वच्छ आणि सुंदर आहे, हा शारीरिक दृष्टिकोन अयोग्य आहे. आपण कसे दिसतो - आपले केस, मेकअप, वेशभूषा आणि इतर बाबी -  याबाबतच्या चिंतेत आपला अमूल्य वेळ वाया जात असतो. अर्थात स्वतःला स्वच्छ आणि नेटके ठेवणे चांगलेच आहे. पण त्यासाठी आपण जेव्हा मर्यादा ओलांडतो तेव्हा शरीर हे समाधानाचे माध्यम आहे, ते आदर्शच असायला हवे आणि इतरांना आकर्षित करणारे असायला हवे, असा विचार आपल्याला अधिक अर्थपूर्ण गोष्टींकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी पुरेसा वेळ देत नाही. 

शरीराकडे आपण थोड्या वास्तववादी दृष्टिकोनातून पाहू. तुम्ही फार काळ एका जागी बसलात, तर तुम्हाला अस्वस्थ वाटू लागते आणि तुम्ही चुळबूळ करता. तुम्ही एकाच स्थितीत पडून असाल, तरी तुम्ही अस्वस्थ होता आणि पुढेही तसेच होते. आपण आजारी पडतोः शरीर म्हातारं होतं. शरीराची योग्य ती काळजी घेणं, आणि व्यायाम व आहाराच्या उत्तम सवयी बाळगून शरीराची काळजी घेणे आवश्यकच आहे. पण शरीरच आपल्या समाधानकारक भावनांचा स्रोत आहे, असे समजून त्यावर अधिकाधिक लक्ष केंद्रित करण्यात खरी समस्या आहे. 

या चुकीच्या सचेतनतेपासून आपण मुक्ती मिळवायला हवी. आपले केस फार महत्त्वाचे आहेत. ते कायम नीट रंगवलेले असावेत आणि त्यातूनच आपल्याला सुख मिळेल, अशा पद्धतीच्या विचारांपासून आपण दूर राहायला हवे. अशा पद्धतीचे विचार पकडून ठेवणे थांबवायला हवे आणि योग्य सचेतनतेची मशागत करायला हवी. ‘माझे केस आणि कपडे काही खऱ्या सुखाचा स्रोत नाहीत. त्याच्याविषयी अधिक विचार करणे वेळेचा अपव्यय आहे आणि त्यामुळे मी अधिक अर्थपूर्ण विचारांवर चित्त एकाग्र करू शकत नाही.’

आपल्या भावनांसंबंधीचा दृष्टिकोन

इथे आपण सुख आणि दुःखाच्या भावनांविषयी चर्चा करणार आहोत, या भावना आपल्या वेदनेच्या स्रोताशी निगडित असतात. जेव्हा आपण दुःखी असतो, आपण ‘व्याकुळलेले’ असतो - आपण दुःखाचे मूळ केव्हा नष्ट होईल, यासाठी व्याकुळलेले असतो. तसेच जेव्हा आपण थोडेसे सुखी असतो, आपण अधिक सुखासाठी व्याकुळलेले असतो. हेच खरे समस्यांचे मूळ असते. 

जेव्हा आपण दुःख ही जगातील सर्वात वाईट गोष्ट आहे, असा दृष्टिकोन ठेवतो, तेव्हा त्यातून एकाग्रतेची समस्या निर्माण होते. कसे? ‘मी थोडा अस्वस्थ आहे’ किंवा ‘मी चांगल्या मूडमध्ये नाही’ किंवा ‘मी दुःखी आहे.’ बरं मग? तुम्ही जे करत होता, ते करत राहा. जर तुम्ही तुमचा वाईट मूड जगातली सर्वात वाईट गोष्ट आहे असे समजाल आणि तेच धरून राहिलात तर तुम्ही करत असलेल्या कामावर चित्त एकाग्र करण्यातला तो सर्वात मोठा अडथळा ठरेल.  

जेव्हा आपण आनंदी असतो, तेव्हा आपण हा विचार करून विचलित होऊ नये की तो आनंद वाढत जावा आणि कायमस्वरूपी टिकावा. ध्यानधारणेवेळी तुम्ही हा अनुभव घेऊ शकता. तुम्ही ध्यानधारणा सुरू करता आणि तुम्हाला छान वाटायला लागते. किंवा तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत आहात किंवा तुमचा आवडता पदार्थ खात आहात, इथे अयोग्य सचेतनता म्हणजे ‘हे किती मस्त आहे’ असे म्हणून तो क्षण पकडून ठेवण्याचा प्रयत्न करणे आणि त्या विचारामुळे विचलित होणे. त्या क्षणाचा आनंद घ्या, पण त्यातून मोठ्या अपेक्षा निर्माण करू नका. 

मनासंदर्भातील दृष्टिकोन 

जर आपण निसर्गतः क्रोध, मूर्खपणा आणि अज्ञान या गोष्टी आपल्या मनात अंतर्भूत असतात आणि आपले मनच मूर्खपणा आणि अज्ञानाने  व्यापलेले असते, असा विचार केला तर एकाग्रता अगदीच अशक्य होऊन जाईल. आपण कधीच स्वतःसंदर्भात फार चांगला विचार करत नाहीः ‘मी असा नाही. मी तसा नाही. मी काहीच नाही.’ किंवा प्रयत्न करण्यापूर्वीच ‘मला काहीच कळत नाही’ असे म्हणणे. आपण अशा कल्पना पकडून ठेवल्या तर तिथे आशेला वावच राहणार नाही. उलट योग्य सचेतनतेत आपण विचार करू की, ‘मला आत्ता तात्पुरतं समजत नसेल, मी आत्ता गोंधळलेलो असेन, पण याचा अर्थ माझे मनच तसे आहे, असा बिलकूल होत नाही’. अशा विचारातून आपल्याला कामासाठी आवश्यक एकाग्रतेबाबतचा विश्वास प्राप्त होईल. 

मानसिक घटकांसंदर्भातील दृष्टिकोन

चौथा मुद्दा आपली बुद्धी, दयाभाव, संयम आणि इतर मानसिक घटकांसंदर्भात आहे.  चुकीच्या सचेतनतेत आपण या सर्व भावना स्थिर असल्याचा समज करून घेतो. ‘मी असाच आहे आणि प्रत्येकाने माझा असाच स्वीकार करायला हवा. मी स्वतःला बदलण्यासाठी काहीच करू शकत नाही.’ योग्य सचेतनतेत आपल्याला जाणीव होते की हे घटक स्थिर घटक नसून उलट एकाग्रतेसाठी त्यांना विकसित करणे शक्य आहे. 

स्वतःवर नियंत्रण मिळवणे 

जेव्हा आपला मूड खराब असेल किंवा आपल्यात अपराधी भावना दाटलेली असेल तेव्हा आपण आत्मनिरीक्षण करतो, तेव्हा हे पाहणं फारच विचित्र असतं की आपण आपला मूड कशा पद्धतीने पकडून ठेवला आहे आणि आपण एकच गोष्ट धरून बसलेले आहोत. किंवा अपराधी भावनेमध्ये, आपण केवळ आपल्या हातून घडलेल्या चुकीचाच विचार करत बसलो आहोत. आपण माणसं आहोत आणि आपण सर्वच जण चुका करतच असतो. अयोग्य सचेतनतेत आपण ते विसरून जाऊ न देता पकडून ठेवतो. आणि स्वतःला वाईट समजून बडवत राहतो.  पण योग्य सचेतनतेत , मूड बदलत असतो आणि तो कारण व परिस्थितीतून उत्पन्न होत असतो, याची जाणीव होते. आणि कारण व परिस्थितीही कायम बदलत असते, ती ही कायमस्वरूपी नसते, याचीही जाणीव वाढते. 

बौद्ध शिकवणीतला सर्वात महत्त्वाचा सल्ला म्हणजे ‘स्वतःवर नियंत्रण मिळवणे’. हे आपण पेंगुळलेले असताना आणि अंथरुणात पडून राहायला छान वाटत असतानाही सकाळी उठण्यासारखे आहे. तुम्ही फक्त स्वतःवर नियंत्रण मिळवता आणि उठता. हो ना ? आपल्याकडे तसे करण्याची क्षमता असते, नाहीतर आपल्यातले निम्मे लोक सकाळी उठलेच नसते. हेच आपला मूड वाईट असताना किंवा आपल्याला थोडे अस्वस्थ वाटत असताना लागू होते. आपण स्वतःवर नियंत्रण मिळवू शकतो - ‘चल उठ. करून टाक.’ - आपण त्या भावनेसमोर हार पत्करत नाही, फक्त जे करणं आवश्यक आहे, ते करतो. 

सचेतनतेचे इतर पैलू

एकूणच सचेतनता फार महत्त्वाची आहे. ती आपल्याला गोष्टी विसरण्यापासून वाचवते. जर आपल्याला काही साध्य करायचे असल्यास, योग्य सचेतनता आपल्याला त्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी मदत करते. सचेतनतेचा संबंध स्मरणाशी आहे, त्यामुळे कदाचित तुम्हाला  टीव्हीवरच्या तुमच्या आवडत्या कार्यक्रमाची आठवण राहील. पण हे एखादी गोष्ट पकडून ठेवण्यासारखे ठरेल, जी फार महत्त्वाची नाही आणि त्यामुळे तुम्ही एखादी महत्त्वाची गोष्टही विसरू शकता.  

जर आपण एखादे विशिष्ट प्रशिक्षण घेत असू, तर योग्य सचेतनता आपल्याला ते कार्य करत राहण्यात मदत करते. आपण व्यायाम करत असू, तर दररोज व्यायाम करणे आवश्यक असते. आपण संतुलित आहार घेत असू, आपण याबाबत सचेतन असायला हवे आणि आपल्या समोर आलेल्या केकच्या तुकड्याच्या मोहात पडता कामा नये. 

सचेतनता म्हणजे आपण जे कार्य करत असू, त्यावर आपले लक्ष केंद्रित करणे आणि बिनमहत्त्वाच्या, गौण गोष्टींनी मन विचलित होऊ न देणे. 

कुटुंबासोबत असताना सचेतनता कायम ठेवणे

अनेक लोकांना आपल्या मित्रांसोबत किंवा अपरिचितांसोबत असताना जी नैतिक सचेतनता बाळगणे शक्य असते, ती सचेतनता कुटुंबासोबत शक्य होत नाही. आणि आपलाही तोच अनुभव असेल तर आपल्याला सुरुवातीलाच एक दृढ निश्चय करणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या नातलगांना भेटणार असाल, तर तुम्ही निश्चय करू शकता की, ‘मी माझ्या रागावर नियंत्रण ठेवेन. मी लक्षात ठेवायचा प्रयत्न करेन की ते माझ्याशी दयाळूपणे वागले आहेत. ते माझ्या जवळचे आहेत आणि मी त्यांना ज्या पद्धतीने वागवतो, त्यामुळे ते दुःखी होऊ शकतात.’ सुरुवातीच्या टप्प्यात असा विचार करणे फार आवश्यक आहे.  

आपण स्वतःला ही आठवणही करून द्यायला हवी की ती ही माणसेच आहेत. आपण त्यांना फक्त आई, वडील, भाऊ, बहीण, किंवा अन्य नात्यातल्या भुमिकेतून पाहू नये. तुम्ही त्यांच्या विशिष्ट भुमिकेलाच धरून राहिलात तर त्यांच्या जबाबदाऱ्यांबद्दलच्या आपल्या कल्पना, भूतकाळ, त्यांच्याकडून असलेल्या आशा, त्यांच्याकडून झालेली निराशा अशा संदर्भातून विचार करत राहता. त्यांचा इतर माणसांप्रमाणेच विचार करणे जास्त योग्य ठरेल. जर ते असा विचार करत नसतील आणि आपल्याला बाळच समजत असतील, तर आपणही त्याच पद्धतीने विचार करण्याच्या प्रकारात अडकू नये. आपण लक्षात ठेवायला हवे की ती माणसे आहेत आणि खेळत बसण्यात अर्थ नाही; शेवटी टॅंगो नृत्य करायचे असेल तर दोन माणसांची गरज असते.  

अलीकडेच माझी मोठी बहीण आठवडाभरासाठी माझ्याकडे आली होती. ती रात्री बरीच लवकर झोपायला जायची. ती माझी आई असल्यासारखी म्हणायची, ‘तुही जाऊन झोप.’ पण मी जर लहान मुलांप्रमाणे प्रतिक्रिया दिली असती की, ‘नाही. मी इतक्या लवकर झोपणार नाही. मला जागं राहायचं आहे. तू मला झोपायला का सांगते आहेत?’ मग हा एकसारखाच खेळ ठरला असता. आणि आम्ही दोघेही अस्वस्थ झालो असतो. तेव्हा मला स्वतःला ही आठवण करून द्यायला हवी की ती हा सल्ला माझ्या काळजीपोटी देत आहे, मी चिडावे म्हणून नाही. तिला वाटते की मी लवकर झोपी जाणे माझ्यासाठी चांगले आहे. त्यामुळे आपण प्रयत्नपूर्वक वास्तववादी दृष्टिकोन ठेवून जे चालले आहे, त्याची जाणीव ठेवायला हवी, निव्वळ कल्पना करत बसू नये.  

त्यामुळे आपण कुटुंबीयांना भेटण्यापूर्वी, आपण आपल्या प्रेरणांबाबत सचेतन असायला हवे, याचा अर्थः 

  • आपले उद्दिष्टः आपले उद्दिष्ट असेल आपले कुटुंबीय, ज्यांची आपल्याला काळजी असते आणि जे आपली काळजी करतात, त्यांच्यासोबत चांगला संवाद घडावा. 
  • साहाय्यक भावनाः मानवी जिवाप्रमाणे कुटुंबाची काळजी घेणे

याकडे पाहण्याचा आणखी एक दृष्टिकोन म्हणजे, त्याला एक भयंकर अनुभव न समजता, एक आव्हान किंवा संधी म्हणून पाहावेः ‘मी माझा पारा चढू न देता माझ्या कुटुंबासोबत रात्रीचे जेवण घेऊ शकतो का?’

आणि तुमचे कुटुंब तुम्हाला सतावायला लागते, जसे पालक सतत करत असतात, ‘तू लग्न का करत नाहीस? तू आणखी चांगली नोकरी का बघत नाहीस? तुला अजून मूल का नाही?’(मला पाहिल्या पाहिल्या माझी बहीण म्हणाली होती की, तुझे केस कापण्याची गरज आहे.) त्यामुळे आपल्याला ही जाणीव होणे गरजेचे असते की ते हे सर्व आपल्या काळजीपोटी विचारत आहेत आणि आपण त्यांना फक्त एवढेच म्हणू शकतो की ‘तुम्ही दाखवलेल्या काळजीबद्दल मी तुमचा आभारी आहे.’

आपण त्यांनी विचारलेल्या गोष्टींचा विचार करताना त्याची पार्श्वभूमीही पाहायला हवी. त्यांचे अनेक मित्र त्यांना विचारत असतील की  ‘तर तुमचा मुलगा काय करतो? तुमच्या मुलीचं काय सुरू आहे?’ आणि त्यांना त्यांच्या मित्रपरिवारासोबत सामाजिक संवाद साधणेही आवश्यक असते. ते तुमच्या लग्नाविषयी विचारतात, तेव्हा ते कसल्याही द्वेषाच्या भावनेतून विचारत नसतात, तर तुमच्या सुखाची त्यांना चिंता असते. त्यामुळे पहिली पायरी ही असते की त्यांच्या भावना स्वीकारून त्याचा आदर राखणे. आणि तुमची इच्छा असेल तर तुम्ही लग्न का करत नाही, हे तुम्ही त्यांना शांतपणे समजवून सांगू शकता. 

अयोग्य किंवा चुकीच्या सचेतनतेत तुम्ही कायम अनावश्यक, अनुत्पादक गोष्टींचा विचार करत राहता. जसे एखादी फार जुनी गोष्ट असू शकते, ‘तुम्ही दहा वर्षांपूर्वी असे का वागला?’ किंवा ‘तू तीस वर्षांपूर्वी असं म्हणाला होतास.’ आपण हेच धरून बसतो आणि समोरच्या व्यक्तीला संधीही देत नाही, समोरची व्यक्ती आत्ता कशी आहे, यावर लक्ष केंद्रित करण्यापासून स्वतःला दूर ठेवतो. आपण त्याच कल्पना घेऊन बसतो, ‘बाप रे, हे फारच धोकादायक आहे. माझे आईवडील येत आहेत.’ ज्यात आपण आधीच ठरवून मोकळे झालेले असतो की ते फारच वाईट असेल आणि त्यामुळे जेवणापूर्वी मोठा तणाव निर्माण होईल. योग्य सचेतनतेचा आधार घेऊन आपण ही परिस्थिती बदलू शकतो, ते कसे आहेत, हे जाणून घेण्याची संधी म्हणून आपण याकडे पाहू शकतो. आणि कोणत्याही पूर्वधारणेशिवाय वागण्याची संधी म्हणूनही आपण याकडे पाहू शकतो.  

सचेतनता कायम ठेवण्यासाठी व्यावहारिक सल्ला

प्रतिकूल परिस्थितीतही आपण आपली सचेतनता कशी कायम ठेवू शकू? त्यासाठी खालील गोष्टी स्वतःत रूजवायला हव्यातः

  • उद्दिष्ट - गोष्टी न विसरण्यासाठीचे दृढ निश्चयी उद्दिष्ट
  • परिचय - एकाच प्रक्रियेचा पुन्हा पुन्हा सराव करून ते आपोआप आठवावे, यासाठी परिचित होणे
  • सतर्कताः  अशी सतर्क करणारी व्यवस्था असावी, जी आपण सचेतनता हरवायला लागलो की लगेच सतर्क करेल.

हे सर्व काळजीवाहू दृष्टिकोनावर अवलंबून आहे, जिथे तुम्ही तुमच्या वागण्याचा स्वतःवर आणि इतरांवर होणाऱ्या परिणामाबाबत काळजी करत असाल. तुम्ही तुमच्या वागण्याबाबत काळजी घेत नसाल, तर सचेतनता कायम ठेवणे शक्य नाही कारण तिथे अनुशासनच नसेल. आपण काळजी का करायची? कारण आपण माणूस आहोत. तुमचे आईवडील माणूस आहेत. आणि आपल्या सर्वांनाच सुखी व्हायचे आहे. कोणालाच दुःखी व्हायचे नाही. आपण इतरांशी कसे वागतो, बोलतो त्यावर त्यांच्या भावना अवलंबून असतात, त्यामुळे आपण वागताना काळजी घ्यायला हवी. 

आपण स्वतःचे आणि आपल्या प्रेरणांचे परीक्षण करायला हवे. फक्त इतरांना आपण आवडायला हवे म्हणून आपण चांगले वागणार असू तर ते थोडं बालिश आणि मूर्खपणाचं असेल. सचेतन राहण्यासाठी आणि सचेतनता कायम ठेवण्याचे सर्वात योग्य कारण हेच आहे की आपल्या काळजी करण्याच्या दृष्टिकोनावर आधारित आपण इतरांची काळजी घेत असते. 

एकाग्रता

एकाग्रतेसाठी अष्टांगिक मार्गातील आपण जो तिसरा घटक वापरतो, त्याला सम्यक एकाग्रताच संबोधले जाते (हो. एकाग्रताच). एकाग्रतेचा अर्थ एखाद्या उद्दिष्टावर चित्त स्थिर करणे. जेव्हा आपल्याला साध्य करायच्या उद्दिष्टावर आपण लक्ष केंद्रित करतो, सचेतनता आपल्याला एकाग्रता हरवू देत नाही. पण त्यासाठी सुरुवातीला उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असते, तीच एकाग्रता असते.  

एखाद्या गोष्टीवर चित्त एकाग्र करण्यासाठी आपण ध्यान किंवा लक्ष केंद्रित करण्याच्या प्रक्रियेचा वापर करतो. भूतकाळाच्या तुलनेत आजच्या काळात काय घडते आहे, तर आपण आपल्या ध्यानाची विभागणी करत आहोत, त्यामुळे कोणत्याच गोष्टीवर संपूर्ण लक्ष केंद्रित करू शकत नाही. जेव्हा तुम्ही टीव्हीवर बातम्या पाहता, स्क्रीनच्या मधोमध एक व्यक्ती बातम्या सांगतो आहे, स्क्रीनच्या खालच्या पट्टीवर वेगळ्याच बातम्या दिसत आहेत आणि कोपऱ्यात आणखी काही वेगळंच आहे. आपण त्यातल्या एकाही गोष्टीवर लक्ष स्थिर करू शकत नाही. आपण तसा विचार केला तरी आपण ते साध्य करू शकत नाही, कोणीच करू शकत नाही - जर तुम्ही बुद्ध नसाल - तुम्ही एकाच वेळी अनुभवत असलेल्या अनेक गोष्टींवर १०० टक्के लक्ष पुरवण्यासाठी. 

काही वेळा आपण कुणासोबत तरी असतो, ते आपल्यासोबत बोलत असतात, पण आपले लक्ष आपल्या फोनवर असते. ते आपल्याशी बोलत असताना, आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही, हे फारच चुकीचे आहे. जरी आपले एकाच गोष्टीवर लक्ष असले तरी ते ही कायम ठेवणे अवघड आहे. हल्ली गोष्टी इतक्या वेगाने बदलतात की आपण त्या बदलाला सरावलेले आहोत आणि एकामागोमाग एक बदलणाऱ्या गोष्टींकडे लक्ष देणेही आपल्याला कंटाळवाणे होते. अशा पद्धतीची एकाग्रता असणे- एका क्षणी यावर, तर दुसऱ्या क्षणी त्यावर - हाच एक अडथळा आहे. ही चुकीची एकाग्रता आहे. योग्य रीतीने एकाग्र होण्याचा अर्थ कंटाळा न करता, गरज असेपर्यंत दीर्घकाळ एकाग्र होता येण्याची क्षमता  आणि आपल्याला रस राहिला नाही म्हणून सोडू न देणे. 

सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे आपल्याला आपले मनोरंजन होत राहावे, असे वाटत राहते. हे चुकीच्या सचेतनतेतून घडते, ज्यात आपण क्षणिक सुख आपल्याला समाधान देईल असा विचार करतो, पण त्यामुळे आपल्या तृष्णेत भर पडते. सामाजिक शास्त्रज्ञांनी शोध लावला आहे की आपल्याकडे मनोरंजनाचे जितके अधिक पर्याय आहेत - इंटरनेटने या अमर्याद शक्यता निर्माण केल्या आहेत - तितके अधिक आपण कंटाळलेले आणि तणावपूर्ण होत आहोत. जेव्हा आपण एखादी गोष्ट बघत असतो, तेव्हा आपल्याला वाटत राहते की त्याहून रंगतदार आणखी काहीतरी असेल आणि आपल्याला ते अनुभवता येणार नाही. याच पद्धतीने तुम्ही विचार करत राहता आणि कोणत्याच विशिष्ट गोष्टीवर लक्ष केंद्रित करत नाही. एकाच वेळी करायला अनेक गोष्टी असणार नाहीत, अशा पद्धतीचे तुमचे आयुष्य अधिक सुलभ करू पाहण्याची कल्पना कठीण वाटत असली तरी खरोखरच चांगली कल्पना आहे. जसजसे तुमची एकाग्रता अधिकाधिक विकसित होत जाते, तुम्ही करू इच्छित असलेल्या आणि तुम्हाला शक्य असलेल्या गोष्टींचा परीघ वाढवणेही शक्य होईल. 

जर तुमच्यात चांगली एकाग्रता असेल, तर तुम्ही या क्षणी एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकाल, त्यानंतर दुसऱ्या क्षणी दुसऱ्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकाल; पण विचलित न होता एका वेळी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकाल. हे एखाद्या वैद्यकीय चिकित्सकाप्रमाणे असेल, जो एका वेळी एकाच रुग्णावर लक्ष केंद्रित करतो आणि आधीच्या किंवा नंतरच्या रुग्णांचा विचार न करता केवळ त्याच रुग्णाचा विचार करतो. जरी डाॅक्टर दिवसभरात अनेक रुग्ण तपासू शकत असले तरी एका वेळी ते एकाच रुग्णावर लक्ष केंद्रित करतात. हे एकाग्रतेसाठी फार चांगले आहे. 

हे फार आव्हानात्मकही आहे. माझ्या बाबतीत पाहायचे झाल्यास मी संकेतस्थळासंबंधी अनेक कामे पाहतो, अनेक भाषांमधील कामे पाहतो. त्यामुळे एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे फारच अवघड आहे. एकाच वेळी अनेक गोष्टी समोर येत असतात. गुंतागुतीच्या व्यवसायात असणाऱ्यांचा हाच अनुभव असेल. पण एकाग्रता टप्प्याटप्प्याने विकसित करता येऊ शकते. 

सारांश

स्वतःला एकाग्रतेच्या मार्गातील अडथळ्यांपासून मुक्त करण्याचं कार्य फार व्यापक स्वरूपाचं आहे. सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे काम करतेवेळी आपला फोन बंद करणे किंवा एखादी विशिष्ट वेळ ठरवणे, ज्या वेळी दिवसातून एखाद-दुसऱ्यावेळी आपण इमेल चेक करू शकू, जेणेकरून आपण आपल्या कामावर अधिक चांगल्या पद्धतीने एकाग्र होऊ शकू. हे डाॅक्टर किंवा प्राध्यापकांच्या कामाच्या विशिष्ट वेळेसारखं असेल, तुम्ही केंव्हाही उठून त्यांच्याकडे जाऊ शकत नाही. आपण हे स्वतःलाही लागू करू शकतो, ते आपल्याला एकाग्रता वाढवण्यासाठी साहाय्यक ठरेल. 

इथे सामाजिक विकासाबाबत चर्चा करणेही मनोरंजक असेल. पूर्वी आपली मनोवस्था,  मानसिक चंचलता, दिवास्वप्नं पाहायची सवय किंवा इतर गोष्टी एकाग्रतेतील प्रमुख अडथळा असायच्या. आता त्याहून फारच अधिक अडथळे आहेत आणि बहुतांशी अडथळे बाह्य स्रोतांतून आलेले आहेत, जसे मोबाइल, फेसबुक आणि इमेल. वास्तविक या सगळ्याच्या प्रभावाला हरवण्यासाठी फारच प्रयत्नांची गरज असते. आणि हे करण्यासाठी त्या माध्यमाचे दुष्परिणाम आपल्याला ओळखता यायला हवेत. सगळ्यात महत्त्वाचे, जे अनेक लोकांनी अनुभवले असेल, ते म्हणजे एखाद्या गोष्टीकडे लक्ष देण्याचा काळ कमी कमी होत चालला आहे. ट्विटरकडे मर्यादीत शब्दसंख्या असते, तर फेसबुकचे फीड सातत्याने अपडेट होत असते. हे इतक्या वेगाने होत आहे की तो बदल सवयीचा होऊ लागला आहे, जो एकाग्रतेतील मुख्य अडथळा होऊ शकतो. कारण तुम्ही कोणत्याच गोष्टीवर दीर्घकाळ लक्ष केंद्रित करू शकत नाही. प्रत्येक गोष्ट सातत्याने बदलते आहे. ही अशी अवस्था आहे, ज्याबाबत आपण सचेतन होणे आवश्यक आहे. 

Top