विवेकशील जागरूकता म्हणजे योग्य-अयोग्य, हानिकारक आणि उपयुक्त यातील भेद ओळखण्याची क्षमता. यासाठी अष्टांगिक मार्गातील शेवटचे दोन मार्ग आवश्यक आहेतः सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प (सम्यक प्रेरणादायी विचार)
सम्यक दृष्टीचा संबंध आपल्या सत्यतेबाबतच्या विश्वासाशी असतो, जो योग्य-अयोग्य, हानिकारक-उपयुक्त यात विवेकशील भेद करू शकेल. तर सम्यक प्रेरणा विधायक मनोवस्थेचं लक्षण असते.
दृष्टी
आपल्याकडे योग्य किंवा अयोग्य विवेकी जागरूकता असू शकतेः
- आपण योग्य भेद करून त्याला सत्य समजू शकतो.
- आपण अयोग्य भेद करून त्यालाच सत्य समजू शकतो.
चुकीच्या दृष्टीमुळे आपण चुकीच्या पद्धतीने भेद करतो आणि तेच सत्य असल्याचे धरून बसतो. तर सम्यक दृष्टीमध्ये आपण योग्य भेद करून सत्य शोधतो.
अयोग्य दृष्टी
आपल्या कृतींना विघातक किंवा विधायक असे कसलेही नैतिक आयाम नसल्याचा समज आणि आपल्या अनुभवांचा आपल्या कृतींशी कसलाच संबंध नसल्याचा विश्वास बाळगणे म्हणजे अयोग्य दृष्टी होय. हे ‘जे होईल ते होईल’ अशा प्रकारच्या मानसिकतेत पाहायला मिळते, जी आजकाल अनेकांमध्ये प्रत्ययास येते. ज्यात एखाद्याला कसलाच आणि कोणताच फरक पडत नाही. काहीही असो; मी काहीही करो किंवा न करो, काहीही फरक पडत नाही. हे अयोग्य आहे. तुम्ही धूम्रपान करता की नाही, त्याने निश्चितच फरक पडतो. तुम्ही धूम्रपान करत असाल, तर त्याचा तुमच्या तब्येतीवर घातक परिणाम होईल.
आणखी एक अयोग्य दृष्टिकोन म्हणजे आपल्या कमतरतेवर मात करण्याचा किंवा स्वतःत सुधारणा करण्याचा कोणताच मार्ग उपलब्ध नसल्याचा विचार करणे, आणि म्हणून प्रयत्नच न करणे. हे अयोग्य आहे कारण परिस्थिती स्थायी, नियमित किंवा निश्चित नसते. काही लोकांना वाटते की इतरांशी दयाळूपणे वागण्यात आणि मदत करण्यात काहीच अर्थ नसतो, उलट प्रत्येकाचा फायदा उठवून शक्य तेवढा नफा मिळवून आपल्याला सुख मिळवता येऊ शकते. हे अयोग्य असते कारण त्यातून खरे सुख मिळतच नाही. त्यातून वाद, तणाव, मत्सर आणि इतर लोक आपल्या गोष्टी चोरत असल्यासारख्या चिंता निर्माण होतात
अयोग्य भेदाचे अनेक प्रकार असतात. ते वेदना आणि त्याच्या कारणांशी निगडित असू शकते. उदाहरणार्थ, तुमच्या मुलाची शिक्षणात फार प्रगती नसेल, तर अयोग्य भेदाच्या विचारधारेत तुम्हाला वाटेल की ‘हे सगळं माझ्यामुळे होतं आहे. पालक म्हणून हा माझाच दोष आहे.’ हे परिस्थितीविषयी अयोग्य भेदातून काढलेले अनुमान असते. गोष्टी फक्त एका कारणामुळे घडत नसतात. गोष्टी अनेकानेक कारणे आणि परिस्थितीच्या एकत्रित परिणामातून घडत असतात. एकाच कारणातून नाही. त्याला आपण काही प्रमाणात कारणीभूत असू शकतो, पण आपणच एकमात्र कारण नसतो. किंवा काही वेळा आपण कारणीभूत नसतोच - तो केवळ आपला गैरसमज असतो. मला एका फार तणावग्रस्त व्यक्तीचे उदाहरण आठवते आहे - तो फुटबाॅल पाहायला गेला आणि त्याची टीम हारली. त्याला वाटले की फक्त त्याच्या उपस्थितीमुळे त्याची टीम हारली. त्याने तो अपशकून मानलाः ‘आमची टीम हारली , हा माझा दोष आहे.’ हे फारच हास्यास्पद आहे. हा कार्यकारण भावाचा अविवेकी भेद आहे.
सम्यक दृष्टी
योग्य भेद फार महत्त्वाचा असतो आणि त्यासाठी आपल्याला वास्तवाचे योग्य भान आणि कार्यकारण भावातील सत्यतेचे आकलन करून घेणे आवश्यक असते, जसे हवामान अनेक कारणे आणि परिस्थितीच्या मिश्रित परिणामातून तयार होते. आपण स्वतःला परमेश्वरासारखे समजू नये की केवळ आपल्या एखाद्या कृतीने सर्व काही चांगले होईल, अगदी आपल्या मुलाची शैक्षणिक प्रगतीही सुधारेल. गोष्टी या पद्धतीने कार्य करत नाहीत.
विवेकशील जागरूकतेसाठी सामान्य समज, बुद्धी आणि एकाग्रता आवश्यक असते, ज्याच्या आधारावर योग्य भेद करण्यावर आपण लक्ष केंद्रित करू शकू. त्यासाठी आपल्याला अनुशासनाची गरज आहे. अशा पद्धतीने एकत्रित परिणामातून गोष्टी घडतात.
सम्यक संकल्प (प्रेरणादायी विचार)
एकदा आपण हानिकारक व उपयुक्त, वास्तव आणि अवास्तव गोष्टीतील भेद ओळखला की आपल्यातल्या प्रेरक विचारांना नेमकी जाणीव होते की या भेदामुळे आपल्या वागण्या-बोलण्यात कशा पद्धतीने बदल होतो किंवा आपला दृष्टिकोन कसा असतो. जर आपण चुकीच्या पद्धतीने भेद केला तर त्यामागोमाग चुकीचे प्रेरक विचार येतात आणि योग्य भेदामुळे सम्यक प्रेरक विचार येतात.
अयोग्य संकल्प
तीन क्षेत्रांवर संकल्प किंवा प्रेरक विचार प्रभाव पाडतातः
इंद्रिय इच्छा
चुकीचे प्रेरक विचार इंद्रियजन्य इच्छांवर आधारित असू शकतात - इंद्रियजन्य कामना आणि इच्छा, जी सुंदर वस्तू, चांगले भोजन, चांगले कपडे अशा गोष्टींसंदर्भात असू शकते. आपल्या इंद्रियजन्य इच्छा पूर्ण करण्याचे प्रेरक विचार त्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, या भावनेतून उत्पन्न झालेले असू शकतात. आपण योग्य भेद करू शकलो, तर आपल्याकडे समतोल वृत्ती असेल, जी इंद्रियजन्य इच्छांपासून मुक्त संतुलित मनोवृत्ती असेल.
अयोग्य भेदाचे आणखी एक उदाहरण म्हणजे रात्रीचे जेवण कोठे करावे आणि जेवणात काय खावे, याबाबतचा विचार. आपण विचार करतो की आपण योग्य जागा आणि योग्य भोजन निवडल्यास आपल्याला आनंद मिळेल. पण तुम्ही योग्य भेद केलात, तर तुमच्या लक्षात येईल की ही फार महत्त्वाची गोष्ट नाही. आणि जीवनात जेवण आणि टीव्हीवरचे कार्यक्रम याहून महत्त्वाच्या अनेक गोष्टी आहेत. अशा विचाराने तुमचे मन तणावमुक्त आणि संतुलित होते.
द्वेषभाव
दुसरा चुकीचा प्रेरक विचार किंवा संकल्प म्हणजे द्वेषभाव, दुसऱ्यांना इजा पोहचवण्याची इच्छा किंवा इतरांना खरोखरच नुकसान पोहचवणे. जसे एखादा काहीतरी चूक करतो, तुम्ही त्याच्यावर रागावता आणि विचार करता की तो फारच वाईट आहे आणि त्याला शिक्षा करायला हवीः हा चुकीचा भेद असतो.
आपण चुकीचा भेद करत असतो की, लोक चूक करूच शकत नाहीत, हे फारच विचित्र आहे. आपण इतके रागावलेले असू शकतो की आपण एखाद्यावर हल्ला करू शकतो. त्याच जागी आपण योग्य भेद केला तर आपण परोपकारी वृत्ती विकसित करू शकतो. ही इतरांना मदत करण्याची आणि त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याची इच्छा असते आणि यात सामर्थ्य आणि क्षमाशीलता अंतर्भूत असते. जर एखाद्याने चूक केली, तर आपल्याला जाणीव होते की ते नैसर्गिक आहे आणि आपल्या मनात कोणताही द्वेषभाव राहत नाही.
क्रूरता
तिसरा चुकीचा प्रेरक विचार म्हणजे क्रूरतेनं भरलेली मानसिकता, ज्यात विविध घटक असू शकतातः
- गुंडगिरी - करुणेचा अभाव असणारी क्रूरता, जिथे आपण दुसऱ्यांना दुःख देण्याचा विचार करतो. उदाहरणार्थ, आपण दुसऱ्या फुटबाॅल टीमच्या समर्थकांना वाईट समजून त्यांच्यामध्ये भेद करतो. आणि फक्त त्यांना दुसरी टीम आवडते म्हणून त्यांच्यासोबत भांडत असतो.
- आत्म-घृणा - आत्मप्रेमाचा क्रूर अभाव, ज्यात आपण स्वतःला वाईट व्यक्ती समजून स्वतःचा आनंद उध्वस्त करतो. आणि आपण सुखप्राप्तीसाठी लायक नसल्याचे समजतो. धोकादायक नातेसंबंध, वाईट सवयी आणि गरजेपेक्षा अधिक खाण्याच्या सवयीतून आपण असे वागतो.
- विकृत आनंद - इतर लोकांचे दुःख पाहून किंवा ऐकून आपल्याला क्रूर आनंद होतो. तुम्हाला वाटते की एखादी व्यक्ती वाईट आहे, आणि दुःख मिळण्याच्याच लायकीची आहे. जसे आपल्याला आवडत नसलेल्या राजकारण्याने निवडणूक हरणे. इथे आपण चुकीच्या पद्धतीने भेद करतो की काही लोक वाईट असतात आणि ते शिक्षेस पात्र असतात. आणि त्यांच्याबाबतीत वाईट घडावे. तर दुसऱ्यांच्याबाबतीत विशेषतः आपल्या स्वतःच्या बाबतीत सगळे चांगलेच घडावे.
सम्यक संकल्प
योग्य भेदावर आधारित सम्यक संकल्प हा अहिंसात्मक दृष्टिकोन असतो. तुम्ही अशा मनोवस्थेत असता, जिथे तुम्ही इतरांच्या दुःखाचे कारण होऊ इच्छित नाही. आधीपासूनच त्रासात असणाऱ्या व्यक्तीला पुन्हा त्रास देऊ इच्छित नाही. दुसऱ्यांच्या आयुष्यातील दुःख बघून आपण सुखी होऊ शकत नाही. इतरांनी वेदनेपासून आणि वेदनेच्या कारणांपासून मुक्त व्हावे, असा करुणादायी दृष्टिकोन आपण बाळगतो. कारण प्रत्येकालाच दुःख भोगायची इच्छा नसते, पण तरी प्रत्येक जण दुःख भोगत असतो. लोकांकडून चूक झाली तर आपण समजून घेतो की ते त्याच्या गोंधळाच्या स्थितीतून घडले असेल आणि ते मनाने तसे वाईट नाहीत. सम्यक भेद आणि सम्यक संकल्पामुळे आपण नैसर्गिकपणे सम्यक वाणी आणि सम्यक कृतीचा मार्ग अवलंबतो.
आठ तत्त्वांचे एकीकरण
अष्टांगिक मार्गातील आठही तत्त्वे एकमेकास पूरक आहेतः
- सम्यक दृष्टी आणि संकल्प हे आपल्या जीवनात सम्यक वाणी, सम्यक कृती आणि सम्यक जीविताच्या अंगीकारासाठी एक पाया निर्माण करतात. त्यामुळे आपल्या वागण्याचा इतरांवर होणारा परिणाम, इतरांच्या मदतीची भावना आणि इतरांना नुकसान न पोहचवण्याची भावना अशी योग्य विभागणी शक्य होते.
- या आधारावर आपण स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो. चांगले गुण विकसित करण्यासाठी आणि आपल्या शरीर व भावनांबाबत विचित्र संकल्पना न बाळगण्यासाठी प्रयत्नशील राहतो. उपकारक गोष्टी करण्यावर लक्ष केंद्रित करतो. त्यातून आपला संकल्प अधिक सक्षम होत जातो. अशा रीतीने सर्व गोष्टी परस्पर पूरक आहेत.
जरी आपण तीन साधना आणि अष्टांगिक मार्गांची क्रमवार मांडणी करत असलो, तरी आपले अंतिम उद्दिष्ट हे त्या सर्वांचा एकत्रित अंगीकार करणे हेच असते.
सारांश
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या संवेदना मनोरंजनासाठी आसुसलेल्या असतात. आपले डोळे सुंदर गोष्टी पाहण्यासाठी, आपले कान मधुर गोष्टी ऐकण्यासाठी आणि आपले तोंड उत्तम पदार्थांची चव चाखण्यासाठी आसुसलेले असते. अर्थात अशा सुखकारक अनुभवांची अपेक्षा गैर नाही, पण हेच आपले अंतिम उद्दिष्ट असेल तर आपण कधीच समाधानी होणार नाही आणि आपण कधीच अंशभरही एकाग्रचित्तता विकसित करू शकणार नाही.
नैतिकता, एकाग्रता आणि जागरूकतेसंदर्भातील तीन अभ्यास आपल्याला जीवनातील प्रत्येक क्षण भरभरून जगण्याची अनुमती देतात. केवळ आपल्या सुखाचा विचार करण्याऐवजी अष्टांगिक मार्ग आपल्याला फक्त स्वतःच्याच नाही, तर इतरांच्या फायद्याचा विचार करायला लावतात. जेव्हा आपण सम्यक दृष्टी कशी योग्य असते आणि चुकीची दृष्टी फायद्याची नसते, सम्यक कृती विधायक असते आणि अयोग्य कृती विघातक असते, याचे निरीक्षण करायला लागू, आपण आपोआपच स्वतःच्या जीवनात सुधारणा घडवायला लागतो. आणि आपण ‘परिपूर्ण बौद्ध जीवना’च्या दिशेने मार्गस्थ होतो.